गाव

अनुस्वार's picture
अनुस्वार in जनातलं, मनातलं
20 Dec 2021 - 10:45 am

अगदी साधं गाव होतं ते. लोकसंख्या कशीबशी २०००. गावात कुणी जास्त शिकलेलं नव्हतं, साहजिकच पन्नासेक पोरं तेव्हढी जवळच्या शहरात कामगार म्हणून राहायची. बाकी बराचसा गाव मळ्यांमध्ये राहायला गेलेला. मळ्यात प्यायला विहीरीचं पाणी होतं अन् आकडे टाकायला लायटीची तार पण. गावात शंभरेक घरं अजूनही होती. झेड. पी. च्या शाळेच्या पाच खोल्या (बालवाडी + चौथी) पोरांच्या शिक्षणासाठी कमी आणि लग्नाची बुंदी ठेवायला जास्त कामी येत. पाच वर्षांपूर्वी शिक्षण विभागाने एक नवीन खोली बांधून दिली - संगणक प्रशिक्षणासाठी. त्यात एक भारी टी.व्ही. पण आहे असं काहीजण सांगायचे. विजेची जोडणी नाही म्हणून त्या खोलीला टाळं आहे. पण गावातल्या लहानग्यांना लपंडावात लपायला एक नवीन जागा मात्र झाली.

गावात खास बसायला म्हणून पार नाही. पण त्याची उणीव कधी गावकऱ्यांना भासली नाही. कारण रामदास स्वामींच्या काळातले मारूतीचे मंदिर. खो-खो आणि कबड्डीचं निदान एक मैदान सहज मावेल इतकं भव्य बांधकाम होतं देवळाचं. त्यात देवाचा गाभारा १०×१० फुटाचा फक्त. बाकी सगळी पडवी, छतासहित. बाहेरच्या दोन प्रशस्त ओट्यांवर दोन चिंचांचे गर्द आच्छादन होते. पाऊस सुद्धा ते आच्छादन कधीतरीच पार करू शकत असे. गावात एक पिठाची गिरणी आणि एक किराणा दुकान होतं. गावात तसं म्हणायला गेलं तर गोकुळ नांदत होतं. सारा गाव दिवसभर शेतात राबायचा आणि दिवस मावळतीनंतर तासाभरात अंथरूणात पडायचा. गावात मराठा, वंजारी, महार असे सगळे मिळून राहायचे. जाती त्यांच्या मनात होत्याच पण ती जात कधी जगण्यात उतरली नाही. गावाबाहेरच्या माणसाला कुणाची जात कळूच नये इतकं त्यांचं जगणं समरुप झालेलं होतं. महारांच्या घरात बाबासाहेबांच्या तसबीरी नव्हत्या आणि मराठ्यांच्या घरात शिवरायांच्या. त्या दिखाऊपणाची गावाला कधी गरजच भासली नाही. संन्यास न घेताही सारा गाव सफल योग्याचं जीवन जगत होता. शांती आणि समाधान पैशांपेक्षा कैक जास्त होतं तिथे. चांगल्या गोष्टींना दृष्ट लागते म्हणतात. तसंच काही झालं की काय कुणास ठाऊक. पण गावाचं चित्र लवकरच पालटणार होतं.

---

शाळेच्या भिंतीला खेटून उभ्या राहिलेल्या त्या कामचलाऊ टपरीजवळ सदाशिवाने मंदिरात बसलेल्या सगळ्या बुजुर्ग मंडळींना गोळा केले. एक आरोळी पटांगणात दिसणाऱ्यांसाठी ठोकली. "आवरून घ्या बाबांनो लवकर. लायटीचा टायमिंग आज सहा वाजोस्तवरच हाये", कुणीतरी सुचवलं. 'बजरंग बली की जय' म्हणत सदाशिवाने नारळ फोडला आणि गावात आणखी एका नव्या व्यवसायाची भर पडली - राजे पान शाॅप.
या नव्या व्यवसायाला आता गरज होती ती ग्राहकांची. कदाचित नशा हा एकच व्यवसाय असा असावा जिथे अर्थशास्त्रातलं 'मागणी तसा पुरवठा' हे तत्व उलटं चालतं. नशेचा पुरवठा बिनदिक्कत होत असेल तर मागणी वाढतेच वाढते. गावातली मंडळी मात्र आता कुणी नसलं तर टपरीवाला सदाशिव आहे गप्पा मारायला यातच समाधानी होती. जिथं पूर्वी सुपारी, प्रक्रिया न केलेल्या तंबाखूचा पाला आणि चार-पाच जण लावायचे ती तपकीर यांव्यतिरिक्त बाकी सगळ्या फक्त चांगल्या गोष्टी उपलब्ध होत्या तिथं आता सुगंधित सुपारी, गायछाप जर्दा सहज मिळू लागली. शाळेत जाणाऱ्या पोरांच्या हातात कधी रूपया पडला तर आता त्याला खायच्या गोड चाक्लेट पेक्षा थुंकायच्या वासाच्या सुपारीचं जास्त आकर्षण वाटू लागलं.

एमआयडीसीत काम करणारी पोरं गावात आली अन् गावातली ही नवी 'सोय' पाहून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. खाडखाड आवाज करणाऱ्या मशनींच्या गर्दीत रात्रपाळी करताना या तरुणांना कसल्या व्यसनाने गाठलं नाही तर नवलच. भाड्याची खोली, तिथे दाटीवाटीने राहणारे दोन जास्तीचे मित्र, ढोर मेहनत करून हातात येणारा मोजकाच पैसा आणि जगण्यासाठी परिस्थिती कशी नसावी याची यादी केली तर स्वत:ची रोजनिशी तयार व्हावी, असं आयुष्य जगताना या पोरांना दहा रुपयांच्या पुडीत मेंदूला तंद्रीत ठेवणारं काहीतरी सापडलं. गुटखाबंदीच्या नाकावर टिच्चून मावा आपलं साम्राज्य पसरवत होता. १२०×३००, ३६५×४५० अशा विविध नावांनी ही कीड तरूणांत शिरकाव करत होती. पण गावाकडे आलं की मग मात्र ही पोरं 'कोरडी' रहायची. शहरातून मावा विकत आणता आला असता पण तरूणांना अजूनही गावातल्या मोठ्यांचा धाक होता. मात्र आता खास गावचीच एक पानटपरी झालीये म्हटल्यावर सगळ्या अडचणी एका झटक्यात मिटल्या. या शहारातून आलेल्या पोरांची आणि सदाशिवाची गाठ पडल्यापासूनच्या चौथ्या दिवशी गावात मावा उपलब्ध झाला. गावाला पहिली वाळवी लागली होती.

---

सांजवेळी माणसं छान गप्पा मारायची ओसरीवर बसून. घरातल्या आयाबाया चुलीवर भाकरी भाजताभाजता या गप्पांमध्ये भाग घ्यायच्या. स्त्री-पुरुष समानतेसारख्या पुस्तकी संज्ञा अजून गावात आल्या नव्हत्या पण गावात सगळ्या माणसांना सारखाच मान मिळायचा. तिकडे देशात एक क्रांती जन्म घेत होती. 'तिकड'चा देश अशासाठी की शाळेत म्हटलं जाणारं राष्ट्रगीत सोडलं तर इतर कुठल्याही राष्ट्रीय गोष्टींशी गावचा अर्थाअर्थी काहीही संबंध यायचा नाही. तर देशात आता दूरसंचार क्रांतीचे वारे वाहू लागले होते.

'करलो दुनिया मुठ्ठी में' म्हणत दुनियेऐवजी एक छोटं यंत्र लोकांच्या हातात आलं - मोबाईल. नेहमीप्रमाणे शहरात रुळल्यानंतर हे यांत्रिक खोकं गावाकडे तुरळक दिसू लागलं. पण पुढे हा मोबाईल केवळ संवाद सुकर करणारा बदल राहणार नव्हता. मागच्या सहा-सात वर्षांत गावात मोजून दोन-चार बदल झालेत: माणसांची वयं वाढली, पटांगणातले दोन विशाल कडुलिंब वाळवीने पोखरले आणि मोबाईलची नवनवीन, स्वस्त पण प्रगत माॅडेलं गावात आली. फेसबुक, व्हाॅटस् ॲप म्हणजे गावचे नवे पार झाले. अगदी गावकुसालगतच्या शेतात राबणारी माणसं गावात होणाऱ्या गप्पांमध्ये सहभागी होऊ लागली.

गावातले जुन्या वळणाचे बुजुर्ग सोडले तर जवळपास सर्वच पुरूष आणि तरूणींच्या हातात मोबाईल आणि त्यातलं मुठभर जग आलं. तिकडच्या भारतात काय होतंय हे गावाला 'लाईव' दिसू लागलं. गावातल्या मारूतीच्या देवळात माथा टेकवण्यापेक्षा हनुमानाचा फोटो शेअर करणे हीच खरी भक्ती हा नवा अध्यात्म मार्ग गावाला सापडला होता. बरं यावर शंका घ्यावी तर तो फोटो अगोदरच लाखभर जणांनी शेअर केलेला, मग आपण कोण संशय घेणारे? गावचा मारूती गावकऱ्यांना पारखा झाला. मंदीर जवळपास 'ऑफलाईन' गेल्यात जमा झालं. वाढदिवसानिमित्त जवळच्या शहरातून केक आणून भावाच्या वाढदिवसाला होणारा गावाचा जल्लोश फेसबुकच्या वाॅलवरुन गावातल्या जमिनीवर आलाच नाही.
कुणी 'शिवबाचा कट्टर मावळा' झाला तर कुणी 'भीमाचा सच्चा सैनिक' तर कुणी इतर काही. माणूस या नामाला आता अशा विशेषनामां शिवाय काही अर्थच उरला नाही. स्वत:चे अतिसंपादित (over edited) बटबटीत फोटो आणि त्यासोबत आपल्या सात पिढ्यांची कारकीर्द एकत्र केली तरी जी अतिशयोक्तीच भासेल असा मजकूर यांचं गावात स्तोम माजू लागलं. अर्थात नेहमीप्रमाणे हे सगळं वारं शहरातून गावाकडे वाहत आलं होतं. या वाऱ्याने गावातलं काय-काय भुईसपाट होणार याचा आत्ताच अंदाज लावणं कठीण आहे. पण गाव संपत चाललंय हे नक्की.

धोरणमांडणीवावरकथासाहित्यिकसमाजशेतीप्रकटनविचारमत

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

20 Dec 2021 - 11:25 am | सौंदाळा

मस्तच लिहिलय प्रखर वास्तव, सगळीकडेच मागच्या २५-३० वर्षात झपाट्याने बदल झाले.
११९०-९५ पासून गुटखा आणि मागच्या दशकापासून सोशल मिडीयाने गावाचे गावपण हरवायला लागले.

अनुस्वार's picture

20 Dec 2021 - 8:17 pm | अनुस्वार

गावातले बदल खूप जास्त वेगाने होताहेत पूर्वीपेक्षा. चांगल्या वाईटची चाळणीच हरवली आहे.

तर्कवादी's picture

20 Dec 2021 - 4:11 pm | तर्कवादी

छान लिहिलंय..
खेडेगावाशी माझा प्रत्यक्ष संबंध फारसा नाही पण सगळे बदल वाईटच असतील असं मला वाटत नाही.
खासकरुन स्त्रीशिक्षणाबद्दलचा दृष्टीकोन बदलला आहे असे मला काही नातेवाईकांकडे बघता जाणवते.

अनुस्वार's picture

20 Dec 2021 - 8:07 pm | अनुस्वार

तुम्ही नशीबवान आहात. माझं गाव मराठवाड्यात आहे. आर्थिक मदतीपेक्षा संपूर्ण मराठवाड्याला वैचारिक चालना देणारी एखादी मोठी चळवळ लवकर उभी राहिली नाही तर नजीकच्या भविष्यकाळात हा भाग सरसकट दारिद्र्याचे दशावतार पाहील अशी परिस्थिती आहे.

श्रीगणेशा's picture

20 Dec 2021 - 5:36 pm | श्रीगणेशा

हूरहूर छान व्यक्त केली आहे.
नॉस्टॅल्जिक वाटणं साहजिक आहे.
गावच नाही तर सर्व काही बदललं आहे.
चांगला बदलही आहे, जसं की मिसळपाव संकेतस्थळ :-)

अनुस्वार's picture

20 Dec 2021 - 8:14 pm | अनुस्वार

'मिपा'च्या शहरी आणि ग्रामीण भागातील प्रसाराचा अंदाज घेण्यासाठी काहीतरी क्लृप्ती निघायला पाहिजे.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

पहिला भाग वाचताना छान वाटत होतं,दुसरा भाग वाचताना :(
मी दोन आठवड्यांपूर्वीच हिवरे बाजारला जाऊन आले,तिथे एक पोपटराव आले आणि गावाचा कायापालट केला.डिसले गुरूजींनी झेडपी शाळा बदलली, चिकाटी असणारे सद्गुणी व्यक्ती पाहिजेत.

अनुस्वार's picture

21 Dec 2021 - 8:09 pm | अनुस्वार

या दोन बाजू एकत्र आल्या की गावाचा नुसताच ठोकळा बंदा रूपया होणार.

बहुतेक गांवात सध्या संडास निर्माण झाले आहेत, पाणी पाईप ने घरी पोचत आहे. अनेक ठिकाणी वीज उपलब्ध आहेच पण काहींनी तर सोलर पॅनेल्स सुद्धा बसवली आहेत असे दृश्य नजरेस आले. बहुतेक मुले शाळेंत जात आहेत आणि विशेषतः स्त्रिया शाळेंत जात आहेत. स्त्री आरोग्याची साधने सहजपणे उपलब्ध होते आहेत. बहुतेक मुली ग्रॅज्युएट होण्याची स्वप्ने पाहत आहेत. दारू पिऊन पत्नीला मारहाण करण्याची प्रकारणे शून्य होत आहेत. बहुतेक स्त्रिया सुद्धा आता मर खाऊन गप्प राहत नाहीत. अनेकांना फार तर ३ मुले असतात. मुलीला नवऱ्याने त्रास दिला तर सरळ जाऊन घरी घेऊन येतात. बहुतेक प्रसूती सुरक्षित होत आहेत. बहुतेक मुलांना सर्व व्हॅक्सीन्स मिळतात त्यामुळे अपंगत्वाचे प्रमाण कमी झाले आहे.

पुरुषांनी "ठेवलेल्या" बाईचे प्रमाण गांवात कमी झाले आहे. स्त्री मजुरांचे लैगिक शोषण कमी झाले आहे. अंधश्रद्धेपोटी गरिबांचे शोषण कमी झाले आहे.

बदल हा काळाचा नियम आहे. आपले वय वाढते तसे नॉस्टॅल्जिक होणे साहजिक आहे पण बहुतेक बदल हे चांगल्या दिशेनेच आहे. आपण चुकीच्या गोष्टीवर फोकस करतो आणि चांगल्या गोष्टी आपल्या नजरेत पडत नाहीत.

एके काळी कुठल्याही नेते मंडळींच्या चमच्यावर सुद्धा विनोद करणे कठीण होते आज काल साक्षांत शिळेसैनिक प्रमुख किंवा बाळ पेंग्विन ची खिल्ली लोक बिनधास्त उडवतात.

> भाड्याची खोली, तिथे दाटीवाटीने राहणारे दोन जास्तीचे मित्र, ढोर मेहनत करून हातात येणारा मोजकाच पैसा आणि जगण्यासाठी परिस्थिती कशी नसावी याची यादी केली तर स्वत:ची रोजनिशी तयार व्हावी, असं आयुष्य जगताना या पोरांना दहा रुपयांच्या पुडीत मेंदूला तंद्रीत ठेवणारं काहीतरी सापडलं

त्याकाळी लोक तंबाखू दारू आणि इतर व्यसने करत नव्हते काय ? बाहेरचा राग आपल्या पत्नी किंवा पोरांवर काढत नव्हते काय ? खोलीत दाटीवाटीने राहणारे पुरुष मित्र महिलांची छेड काढणे वगैरे घाणेरड्या गोष्टी चव घेऊन करत नव्हते काय ?

WHO च्या रिपोर्ट प्रमाणे भारतांतील गुटखा सेवन आणि धूम्रपान ह्या दोघांचेही प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले आहे. देशाच्या एकूण प्रौढ लोकसंख्येपैकी साधारण २६% लोक तंबाखू सेवन करतात. आधी हे प्रमाण जास्त होते.

जुन्या पिढी पेक्षा नवीन पिढीत तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी आहे. पण लोकसंख्या वाढल्याने आणि सेवनाचे प्रकार बदलल्याने आम्हाला जास्त लोक तंबाखूच्या आहारी गेले आहेत असे वाटते ती गोष्ट वेगळी.

> संन्यास न घेताही सारा गाव सफल योग्याचं जीवन जगत होता. शांती आणि समाधान पैशांपेक्षा कैक जास्त होतं तिथे.

ह्याला काहीही आधार नाही. हे उगाच आपले "माझी ९९ वर्षाची आजी अतिशय पतिव्रता आहे हो" म्हणून ओरडण्यासारखे आहे. ज्याला पर्याय आहे आणि पर्याय असताना सुद्धा ज्याने सर्वत्र त्याग केला तो संन्यासी. नाहीतर तो फक्त दरिद्री. दारिद्र्याला उगाच संन्यासाची उपमा देऊन त्याला अलंकृत करणे चुकीचे आहे.

गांवात आधी ज्याच्याकडे काहीच नव्हते त्याची धडपड रेडिओ साठी होती, रिडिओ आहे तो टीव्ही मिळवण्याचा मागे लागला होता. पायी चालणार सायकलचे स्वप्न पाहत होता आणि सायकल ने जाणारा स्कुटरचे. मजुरी करणाऱ्याला नोकरी आणि खाजगी करणाऱ्याला सरकारी नोकरीचा हव्यास होता.

गावांत समाधान नव्हते तर होते ते दारिद्य. नवीन संधी निर्माण होतंच गावकर्यांनी मुक्तहस्ते त्यांचा स्वीकार केला आणि आपल्या आयुष्यांत सुख शोधले. चांगलेच झाले.

बाबा रामदास (मूळ नाव रिचर्ड अल्पर्ट) ह्यांनी अगदी ह्याच विषयावर समर्पक लिहिले आहे :

Is the vision of simple living provided by this village in the East the answer? Is this an example of a primitive simplicity of the past or of an enlightened simplicity of the future?

So it is with the village. Its ecological and peaceful way of living is unconsciously won and thus is vulnerable to the winds of change that fan the latent desires of its people. Even now there is a familiar but jarring note in this sylvan village scene. The sound of static and that impersonal professional voice of another civilization — the radio announcer — cut through the harmony of sounds as a young man of the village holding a portable radio to his ear comes around a bend. On his arm there is a silver wrist watch, which sparkles in the sun. He looks at me proudly as he passes. And a wave of understanding passes through me. Just behind that radio and wristwatch comes an army of desires that for centuries have gone untested and untasted. As material growth and technological change activate these yearnings, they will transform the heart, minds, work and daily life of this village within a generation or two.

Gradually I see that the simplicity of the village has not been consciously chosen as much as it has been unconsciously derived as the product of centuries of unchanging custom and tradition. The [villages] have yet to fully encounter the impact of technological change and material growth. When the [villages] have encountered the latent desires within its people, and the cravings for material goods and social position begin to wear away at the fabric of traditional culture, then it can begin to choose its simplicity consciously. Then the simplicity of the [villages] will be consciously won — voluntarily chosen.

----

पर्याय असून सेवेचे व्रत घेतलेले ते बाबा आमटे हे संन्यासी तर आमच्या गांवातील "होमलेस" गणोबा हे संन्यासी नसून नुसतेच दरिद्री. गणोबाला आज १०० दिले तर संध्याकाळी पर्यंत ते दारू आणि मटक्यावर उधळले जातील ह्यांत शंका नाही.

Virginity is often lack of opportunity ही म्हण गांवातील दारिद्र्याचे उद्दात्तीकरणाला लागू पडते.

सुबोध खरे's picture

21 Dec 2021 - 9:39 am | सुबोध खरे

असं कसं

साहना ताई

शहरात राहून भरपूर पैसा कमावल्यावर आपल्याला चार दिवस त्या मोबाईल लॅपटॉप लाऊडस्पिकर पासून दूर राहायला खेडी आणि गावे पूर्वीसारखीच विकासापासून दूर असायला नकोत का?

एक दिवस बैलगाडी, झुणका भाकर, हुरडा आणि चुलीवरचं मटण खायला लांबच्या चुलत्याची अशिक्षित पण अगत्यशील बायको सगळ्यांनाच हवी आहे त्यावर तुम्ही असे पाणी फ़िरवताय?

तुमचा तीव्र निषेध

अनुस्वार's picture

21 Dec 2021 - 4:20 pm | अनुस्वार

कदाचित आपण दोघांनी माझ्या निरिक्षणांचा वेगळा अर्थ घेतलेला दिसतोय.
साहनाजी म्हणताहेत तसा बदल 'वास्तवात' होत असेल तर त्यावर गळा काढणारा अव्वल दर्जाचा नकारात्मक व्यक्ती असेल यात शंका नाही. सुधारणा आणि प्रगतीची आस नेहमीच प्रशंसनीय आहे. फक्त आहे त्यात 'बदल' होतोय म्हणून ते प्रगतिशीलच असेल याची खात्री नसते. काही बदल चुकले तर ते दुरुस्त करण्यासाठी शहरांकडे आर्थिक आणि भौतिक स्त्रोत तुलनेने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. गावांकडे तशी परिस्थिती नाही.
एक उदाहरण देतो.
माझं गाव आहे मराठवाड्यात. आमच्या भागात पिवळ्या बसगाड्यांच्या "CBSE पॅटर्न"च्या खाजगी इंग्रजी शाळांचे प्रचंड पेव फुटले आहे. अंगणवाडी ते दहावी. अंगणवाडीचे शुल्क कमीत कमी वर्षाचे ₹१०,००० आणि दहावीचे ₹२०-२५,००० च्या पुढे + कपडे (कमीत कमी २ प्रकारचे) + पुस्तके, दप्तर शाळेचेच हवे. शिक्षक इथलीच कुडमुडे इंग्रजी बोलू शकणारे डी.एड. वाली मंडळी. पुस्तके CBSCची नाही तर खाजगी प्रकाशनाची. या शाळेने पोरं काही विशेष हुशार होत नाहीत हे कळायला पाचवी-सहावी जाऊ द्यावी लागते. तोवर कुटुंबांची पाल्यांना शहरात शिक्षणाला पाठवायची आर्थिक क्षमता नष्ट झालेली असते. परिणामी पुढे बाहेर चांगल्या शिक्षणाची जी संधी मिळायची ती ही नष्ट होत आहे. हे केवळ एक उदाहरण आहे. शोधली तर मोठी यादी होईल. उदा. आमचे गाव १००% हागणदारीमुक्त असूनही तुम्ही सकाळी गावात यायचे टाळाल! (₹१०ह/वर्ष वगैरे आपणांस कमी वाटत असल्यास माझा मुळ लेख आणि प्रतिसाद निरर्थक रडगाणे आहे हे मी मान्य करतो.)

WHO किंवा सरकारी अहवालावर विसंबून राहून सर्व काही आलबेल असल्याचे स्वप्नरंजन करणे चांगले आहे. पण त्यासाठी झोपायचं म्हणजे धृतराष्ट्राची नजर हवी. आमच्या गावात व्यसनाचे प्रमाण ३००-४००% टक्के वाढले असेल तर WHO चा अहवाल मला काय कामाचा? आपण 'असर' चा ग्रामीण शिक्षणाचा अहवाल पाहा. तसेच अहवालासाठी वापरलेली पद्धती ही तपासा, म्हणजे अहवाल किती सर्वसमावेशी आहे याचा अंदाज येतो.
सुबोधजी, मी शाकाहारी आहे. त्यामुळे तुम्ही वर्णन केलेल्या पाहुणचाराच्या आठवणीने मी व्यथित होण्याचे कारण नाही.
साहनाजींनी वर्णिलेल्या गोष्टी प्रत्यक्षात आल्या तर त्याहून सोन्याचा दिन दुसरा नाही.
बाकी, हस्तिदंती मनोऱ्यांतून मनोहर चित्र पाहायला मलाही आवडेल पण तो मनोरा गावाच्या अस्थींवर उभा नसावा‌.

श्रीगणेशा's picture

21 Dec 2021 - 6:18 pm | श्रीगणेशा

अनुस्वार,
आपल्या खाजगी इंग्रजी शाळेच्या निरीक्षणाशी सहमत.
पोटाला चिमटा घेऊन मुलांना इंग्रजी (नावाला फक्त) शाळेत पाठवायचा हट्ट करणारी कुटुंबे मी स्वतः पाहिली आहेत. त्यापुढे जाऊन, मुलाला शाळेत शिकवलेलं समजत नाही म्हणून शिकवणी वर्गातही गर्दी होत आहे. काही पालक तर मुलगा घरी अभ्यास करत नाही म्हणून शिकवणी वर्गाला पाठवत आहेत, काहीतरी डोक्यात जाईल म्हणून. प्रगतीच प्रगती आहे!

श्रीगणेशा's picture

21 Dec 2021 - 6:25 pm | श्रीगणेशा

शहरातील समाज मुळातच विखुरलेला असणे अपेक्षित आहे. तुलनेने गावातील समाज बऱ्यापैकी एकत्र राहणारा, जगणारा, आपली संस्कृती जपणारा. त्यामुळे शहर आणि गाव अशी सरसकट तुलना करणे योग्य वाटत नाही. धागा लेखकांचं म्हणणं खोडून काढण्यायोग्य निश्चितच नाही.

शिक्षण ह्या विषयावर तुम्ही लिहिलेले पटते. पण ह्याचा संबंध बहुतांशी भारतीय सरकारच्या चुकीच्या आणि धांदात अन्यायी कायद्याशी आहे ज्यावर मी आधी खूप लिहिले आहे.

सकस शिक्षणाचे ध्येय सोडून निव्वळ बेगडी आणि "हाऊ मे आय हेल्प यू मॅडम" वाली किर्यादांची (कोंकणी/ पोतुगीज शब्द) विंग्रजी शिकण्याच्या मागे अंधपणे धावणे ह्याचा बराच वाईट परिणाम ग्रामीण भागांतील लोकांवर होणार आहे. पण सहावीला शाळा सोडून घरी बसणे ह्या पेक्षा महागडी किर्यादांची इंग्रजी शिकणे जास्त चांगले नाही का ? सरकारी आकडे सुद्धा नजरअंदाज केले तरी शाळेंतून ड्रॉप होण्याचा दर आणि विशेषतः मुलींचा ड्रॉप होण्याचा दर खूपच कमी झाला आहे हे सुद्धा पाहायला नको का ?

त्याचे दुसरे एक कारण म्हणजे हुशार लोक आधीच गांव सोडून शहरांत गेले आहेत. बहुतांशी मागे जे राहिले ते एकतर नाईलाज म्हणून किंवा गरीब/कमी हुशार असल्याने मागे राहिले आहेत. ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल. येत्या ५० वर्षांत भारतीय शहरांची खूप वाढ होऊन ग्रामीण भागांतील लोकसंख्या बरीच तुरळक होईल. त्यामुळे ह्या प्रकारचे एकूण व्हिक्टिम्स कमीच असतील.

ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल

बापरे!!

अनुस्वार's picture

22 Dec 2021 - 11:12 am | अनुस्वार

ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल.

आपल्या माणसांचा स्टाॅक एवढ्या सहजासहजी मुर्खात काढून बाजूला नाहीना करता येत साहनाजी. मानवी इतिहासात खेडी समाजजीवनाचा पाया राहिली आहेत आणि राहतील. उदा. कितीही मोठा फॅशन डिझाईनर असला तरी कापूस पिकवणारे शेतकरी आणि विणनारा कारागीर यांच्याशिवाय त्याची किंमत शून्य असते‌, नंतरच्या दोघांचे बाजार मूल्य कमी असले तरी. त्यामुळे ग्रामरुपी आत्मा नष्ट झाला की शहरांचा जीव जायला वेळ लागणार नाही. किंबहूना दोन्ही गोष्टी एकसमयावच्छेदेकरून (simultaneously) होतील.

सरकारी आकडे सुद्धा नजरअंदाज केले तरी शाळेंतून ड्रॉप होण्याचा दर आणि विशेषतः मुलींचा ड्रॉप होण्याचा दर खूपच कमी झाला आहे हे सुद्धा पाहायला नको का?

संख्यात्मक सुधारणा मान्यच. परंतु गुणात्मक फरक पडेना हे सरकारी अहवालच सांगत आहेत.

येत्या ५० वर्षांत भारतीय शहरांची खूप वाढ होऊन ग्रामीण भागांतील लोकसंख्या बरीच तुरळक होईल. त्यामुळे ह्या प्रकारचे एकूण व्हिक्टिम्स कमीच असतील.

भारतीय शहरांची (संख्येने) वाढ होणार नाही तर आहे तीच शहरे विक्राळ रूपात पसरतील. भारतातील "गरिबीचे शहरीकरण" (Urbanization of Poverty) हा अत्यंत चिंतेचा विषय आहे.

मला वाटतं मूळ लेखाकडे ग्रामीण किंवा शहरी परिप्रेक्ष्यातून पाहण्यापेक्षा समाजाच्या (कारण इच्छा असली तरी अंतिमतः तो शहरी-ग्रामीण असा वेगळा करताच येत नाही) एका सदृढ अंगाची (आपल्यावर प्रभाव पाडणारी) रोगराई असे पाहिल्यास प्रश्न समजून घेण्यास आणि उत्तरे शोधण्यास मदत होईल.

सुबोध खरे's picture

22 Dec 2021 - 11:28 am | सुबोध खरे

त्याचे दुसरे एक कारण म्हणजे हुशार लोक आधीच गांव सोडून शहरांत गेले आहेत. बहुतांशी मागे जे राहिले ते एकतर नाईलाज म्हणून किंवा गरीब/कमी हुशार असल्याने मागे राहिले आहेत. ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील

१०० टक्के चुकीचे गृहीतक आहे.

हे गृहीतक बरोबर असते तर शहरातील झोपड्यात राहणारे सगळेच लोक हुशार असायला पाहिजेत. आणि मुम्बईच्या महापालिकेच्या शाळेतील मुले बोर्डात यायला पाहिजे होती.

असं अजिबातच नाही.

बहुसंख्य लोक गावातून केवळ "जगायला" ( पोट भरण्यासाठी) बाहेर पडतात. गावात नोकरीच्या संधी नगण्य असतात.

मागच्या काही पिढ्यात एकाएकाला चार पाच पोरं झाल्यामुळे शेतीचा केवळ छोटासा तुकडा वारसाहक्काने येतो तो दोन वेळचे पोट भरायला मुळीच पुरत नाही म्हणून अनेक तरुण आपले गाव सोडून शहरात येतात.

त्याचा हुशारीशी असा संबंध जोडणे साफ चूक आहे.

तर्कवादी's picture

22 Dec 2021 - 8:27 pm | तर्कवादी

याचे दुसरे एक कारण म्हणजे हुशार लोक आधीच गांव सोडून शहरांत गेले आहेत. बहुतांशी मागे जे राहिले ते एकतर नाईलाज म्हणून किंवा गरीब/कमी हुशार असल्याने मागे राहिले आहेत. ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल. येत्या ५० वर्षांत भारतीय शहरांची खूप वाढ होऊन ग्रामीण भागांतील लोकसंख्या बरीच तुरळक होईल. त्यामुळे ह्या प्रकारचे एकूण व्हिक्टिम्स कमीच असतील.

म्हणजे शहरात जाणारे हे हुशार - गावात राहणारे कमी हुशार , किंबहूना त्याहून पुढे जावून मुर्ख.. आणि मग त्यांच्या पुढच्या पिढ्याही मुर्ख..
वा ... वा... म्हणजे आपला गाव न सोडणारे म्हणजे फारतर सामान्य बुद्धीमतेचे कुणी असेल तर त्यांची गणना मुर्खांत करायची मग त्यांच्या पुढच्या पिढ्याही मुर्खच निपजणार असे समजायचे. हसावे की रडावे तेच कळत नाही

(परदेशी न जाता भारतात राहून काम करणारा सामान्य (किंवा मुर्ख) आय टी प्रोफेशनल )
तर्कवादी

उपयोजक's picture

21 Dec 2021 - 8:10 am | उपयोजक

वास्तववादी!

मुक्त विहारि's picture

21 Dec 2021 - 4:52 pm | मुक्त विहारि

साधं टुमदार, गणपती पुळे आता पर्यटन स्थळ झाले आहे...

मोबाईल, टीव्ही यांचा वापर कशासाठी करायचा? हे भान नसेल तर, घरीघरी भस्मासुरच तयार होतात ...

शूद्ध हवा सोडली तर, गावांत राहणे कठीणच झाले आहे.

शहरांत निदान थोडाफार तरी ध्वनी प्रदूषणावर कंट्रोल आहे, गावांत तर तेही नाही ...

चौथा कोनाडा's picture

21 Dec 2021 - 5:38 pm | चौथा कोनाडा

सही लिहिलंय ! +१

देऊळ सिनेमा आठवला !

जगण्याच्या कल्पना दिवसागणिक बदलत गेल्या त्या १९८५-९० नंतर .... अन बदलांचा वेगही वाढत गेला.
जुने मागे पडत चालले ........ शांत, स्थिर जीवनाचा पाया सैलावत गेला. व्यसने चारी अंगानी वेढू लागली, तीच लाईफ-स्टाईल म्हणून मान्यता पावली !

यातनं कसं स्वतःला जपायच, आधूनिक होता होता काही अंगानी पारंपारिक कसं रहायचं हे आपल्या वरच (वैयक्तिक) अवलंबून आहे !

कालाय तस्मै नम: _/\_

अनुस्वार's picture

21 Dec 2021 - 9:30 pm | अनुस्वार

रील बनवण्यात, नशा‌ करण्यात यांना काही आनंद मिळतोय असंही नाही. पण या गोष्टींचा भडिमार एवढा ताकदवान आहे की जो तो या दिखाऊ आनंदाला मिठी मारतोय.
अगदी ताजे उदाहरण: बेळगावातल्या घटनेचा निषेध म्हणून अगदी छोट्या खेड्यापाड्यांतही राजांच्या पुतळ्याला दुधाने अंघोळ घालण्याचे कार्यक्रम चालू आहेत. तिथे जमा होणाऱ्या ९०% जनतेला बेळगाव कुठे आहे हे माहिती नसेल आणि त्यातल्याही ९०% ना पुढे आयुष्यभर ते माहित होण्याचा संभव नाही. पण 'बाकीच्यांचे स्टेटस येत आहेत मग आपण मागे का रहायचं?' एवढाच त्यामागे विचार (विचाराच्या व्याख्येत बसत असल्यास)!

अनुस्वार's picture

21 Dec 2021 - 9:18 pm | अनुस्वार

श्रीगणेशा, उपयोजक, मुक्त विहारि.

जेम्स वांड's picture

22 Dec 2021 - 9:39 am | जेम्स वांड

आपण पाहत असलेलं गाव एक प्रतिमा होऊन घट्ट रुजलेलं असतं मनात, ते आपलं संचित. आपण नोकरी धंद्याच्या निमित्ताने बाहेर पडतो, हळूहळू रोजीरोटीत व्यस्त होतो, पीएफ, घर बांधणी/ फ्लॅट खरेदी, पोरांची शिक्षणे ह्या रगाड्यात गावच्या चकरा कमी होतात, दरवेळी जाताना नवीन नवीन बदल दिसतात, आधीच अनोळखी शहरात स्वतःची ओळख बनवून एका कोपऱ्यात सेटल व्हायला आतुर आपल्याला इनसिक्युरिटी वाटणे साहजिक होते कारण आपल्या मनात "आपलं" असलेलं गाव बदलत असतं, साहजिक आहे ते फक्त कालाय तस्मै नमः म्हणून घडत असलेले बदल बघत राहणे हेच काय ते आपण करू शकतो.

अनुस्वार's picture

22 Dec 2021 - 11:17 am | अनुस्वार

आपण नोकरी धंद्याच्या निमित्ताने बाहेर पडतो, हळूहळू रोजीरोटीत व्यस्त होतो, पीएफ, घर बांधणी/ फ्लॅट खरेदी, पोरांची शिक्षणे ह्या रगाड्यात गावच्या चकरा कमी होतात, दरवेळी जाताना नवीन नवीन बदल दिसतात.

सगळं समोर घडत आहे म्हणून मन अस्वस्थ होतं.

कर्नलतपस्वी's picture

22 Dec 2021 - 2:50 pm | कर्नलतपस्वी

आता मागे वळुन पहाता असे लक्षात येते की निरंतर समाज हळू हळू बदलत होता.गावात एक अलिखित नाते संबंध होते.

बलुतेदारी जवळपास संपत आली होती पण तरीही दिवाळीच्या पणत्या, संक्रांतीची सुगडं , सणासुदीला पतरावळी द्रोण घरपोच होत होते .गुरविणीचा नैवेद्य नेमाने वाढला जात होता अमावस्येला आवस वाढा बाई आस ऐकताच पिठ, तेल, लाल मिरच्या लेकी, सुना वाढत होत्या. सुया घे, बिब्ब घे आशी हाक देणारी गंगू वैदिण सागरगोटे, सालम मिश्री, सफेद मिश्री पण देत होती.ह्या सगळ्या गोष्टी संपत चाललेल्या बलुतेदारी च्या पुसट खूणा आमच्या पिढीला दिसल्या.

अजुनही नवरात्रात देवी चा भुत्या दिवटी बुदली घेऊन तेल मागायला येत होता. "बाजीराव नाना तुम्ही लग्नाला चला" म्हणत दिवाळी, होळीला सोंग घेऊन येणारा सोंगाड्या, देवळात रामनवमी, हनुमान जयंती, कृष्ण जन्माष्टमी निमित्त किर्तन, चातुर्मासात प्रवचन, काकडा आरती हेच समाज मनोरंजनासाठी होते. गावातील यात्रा, तमाशाचा फड, कुस्तीचा आखाडा हाच विरंगुळा असे तर आर्थिक उलाढाल होत असे. जत्रा, गाड्यांच्या शर्यती, कुस्तीच्या स्पर्धा आणी तमाशा यावेळेस गावगाड्याच्या आर्थिक उलाढाल होत असे. दिव्याची आवस खुप जोरात साजरी होत असे. बैलपोळा अजुनही आठवतो. घायपताच्या पाताचा आसूड, कावेने रंगवलेली मातीचे बैल मुलांचे खास आकर्षण असायचे.

वर्षाचे सण ,परंपरा ,कुळधर्म हौसेने साजरे होत होते. सडा, रांगोळी पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर नागरमोथा व रिठ्याच्या बिया शोधून त्याचा उपयोग शिककई बरोबर केस धुण्यासाठी वापरत होते. हाच त्या काळात "सन सिल्क व पँन्टिन " होता.

गावोगावी अजुनही विज पोहोचली नव्हती. चिमणी, किंवा कंदील प्रत्येक घरातून पेटायचे. चौकात दिव्याच्या खांबावर ग्रामपंचायतीचा कर्मचारी संध्याकाळी रॉकेलचा डबा व बांबू ची शिडी घेऊन दिवा पेटवत असे.

दवंडी हा प्रकार पब्लिक कम्युनिकेशन करता मुख्य साधन होते.आताच्या मोबाईलच्या पिढीला सांगितले तर ते त्यांना खरे वाटत नाही. बाबा तुम्ही काहितरी सांगता आसे म्हटले जाते.

असे असताना त्याचबरोबर रेडिओ, टुरींग टाकिज आणि गणपतीच्या दहा दिवसांत सिनेमा ह्या नवीन बदलाची नांदी सुरू झाली. पक्की सिनेमागृहे, मिनी थिएटर्स,टेप रेकॉर्डर, टेलिव्हिजन, संगणक ,मोबाईल माँल असे अनेक बदल होत गेले. कौलारू घरं केव्हा सिमेंटच्या जंगलात गुडूप झाली कळलेच नाही.

पुजा, संध्या,शुभंकरोती,श्रावणातली व्रतवैकल्ये, सत्यनारायण, सहस्त्र आवर्तने वाडवडिलानीं सांगीतले आणी कुठलाही प्रश्न न विचारता आम्ही करत गेलो. आज मात्र नातवांच्या प्रश्नानां उत्तर देताना नाकी नऊ येते.

ज्या गणेशाला वंदन करून शिक्षणाचा श्रीगणेशा केला तर त्याच गणेशाला आताची पिढी " ओ माय फ्रेंड गणेशा" नावाची मालीका बघत आहे.

कीर्तन ते कार्टुन आसे आयुष्य जगलेले आम्ही गावाकडे शेत, घर ,नातेवाईक मंडळी आशी काहीही नाळ ऊरली नाही तरी आजुनही वेळ मीळाला की गावाकडं पळतो. अजून सुद्धा माणूसकीच्या पाऊलखुणा स्पष्ट दिसून येतात. जुने शाळकरी वाट बघतात. गाव बदलतयं चांगली गोष्ट आहे. गावाकडची माणसं व्यवहार कुशल पण अधुनीकतेच्या जगात त्यानां गावंढळ समजणं चुक वाटतं.

गेलो होतो गावाकडं
शोधत होतो पाऊलखुणा
नदीकाठी होता उभा
म्हातारा वड केविलवाणा

हिरवगाऱ टुमदार गाव
नाव त्याच होतं खेड
सय येता गावाची
मन अजुनही होतं वेडं......

अनुस्वार's picture

22 Dec 2021 - 9:23 pm | अनुस्वार

मी फक्त सागरगोटे आणि काऊने (काव) रंगवलेले मातीचे बैल पाहिले आहेत. बाकी मला गोष्टी नवीनच. धन्यवाद. ‌

अनन्त्_यात्री's picture

22 Dec 2021 - 3:49 pm | अनन्त्_यात्री

गेले वर्ष दीड वर्ष एका हिलस्टेशन जवळच्या निसर्गरम्य गावी राहतोय. इथल्या वास्तव्यावर आधारित माझी निरीक्षणे:

(१) आठवड्यातून किमान एकदा दिवसाचे ४-५ तास व पाऊस / वादळ असल्यास २४ -३६ तास वीज पुरवठा बंद असतो.

(२) सण, समारंभ, लग्न, वाढदिवस यापैकी कोणत्याही निमित्ताने कानठळ्या बसतील अशा आवाजात मराठी/हिंदी/पंजाबी/ गाणी जवळपासचे साधेभोळे गावकरी सकाळी ६ ते रात्री १२ या वेळात कधीही लावतात. जवळच एक "डेस्टिनेशन वेडिंग रिसाॅर्ट व प्री वेडिंग फोटो शूटचा स्टुडिओ" मोठ्या झाडांची कत्तल करून मोकळ्या केलेल्या जागेत चालू झालाय. तिथे येणारी शहरी गिर्‍हाइकेही ध्वनीप्रदूषणाच्या महत्कार्याला इमाने इतबारे हातभार लावतात. शिवाय वीज नसल्यास कानठळ्या बसविण्याच्या अंगीकृत कार्यात खंड पडू नये म्हणून डीझल जनरेटर सेट्स मुक्तपणे वापरले जातात. जवळपासचे अनेक सेकंडहोम वाले मिळकत वाढावी म्हणून आपली घरे शहरातल्या पिकनिकर्सना भाड्याने देतात. हे पिकनिकर्स दारूच्या अंमलाखाली वावरताना दिवसरात्र म्युझिक सिस्टीमच्या peak performanceचा आनंद लुटतात.
ध्वनीप्रदूषण ही संकल्पनाच स्थानिक पोलिसांसकट कोणालाही माहिती नसल्याने पोलीस कंप्लेंटही निरर्थक ठरते.

(३) घरकामासाठी नोकर मिळणे व मिळाल्यास तो/ती नियमित कामावर येणे दुरापास्त आहे.

(४) सुतार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन वगैरे लोक बर्‍याच मिनतवार्‍या केल्यावर काम करतात पण कामाचा दर्जा अतिशय खराब.

(५) कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे बहुतांश गावकरी आपापला कचरा आपापल्या सवडीने स्वत:च्या घराजवळ जाळून टाकतात.

"निसर्गरम्यता गेली खड्ड्यात, आपले शहरच बरे" ही भावना जेव्हा बळावते तेव्हा मग काही दिवस मुंबईतल्या घरी ४-८ दिवस राहून तिथल्या शांततेला कंटाळलो की इथल्या गदारोळात ,कमी प्रदूषित हवेसाठी, गावी परत येतो.

अगदी अगदी. पोरे बीए, बारावी होउन घरी बसणे पसंत करतील, पण असे काम करनार नाहीत.

सुतार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन वगैरे लोक बर्‍याच मिनतवार्‍या केल्यावर काम करतात पण कामाचा दर्जा अतिशय खराब.

एकवेळ भस्मासुरही परवडला पण सुविधा आणि तंत्रज्ञानाचा फ्रॅन्केन्स्टाईन होत चाललाय.

अजुन तरी भारतात Q आला नाही.

तर्कवादी's picture

22 Dec 2021 - 4:57 pm | तर्कवादी

अनुस्वार जी,
लेख आधी मला काहीसा एकांगी वाटला होता. पण तुमचे इतर प्रतिसाद वाचून दिसतंय की तुम्ही खेडे गावाशी जोडलेले आहात त्यामुळे तुम्हाला तिथली सामाजिक परिस्थिती अचूक माहित आहे.
प्रत्यक्ष जोडलेले असल्याने आलेली समज अर्थातच कुठल्यातरी जागतिक अहवालांपेक्षा अधिक वास्तववादी असणार यात वाद नाही. आधीच्या एका प्रतिसादात लिहिले त्याप्रमाणे माझा खेडे गावाशी प्रत्यक्ष संबंध नाही पण मला ग्रामीण समाज जीवनाबद्दल कुतुहल आहे. तुम्ही विविध पैलूंवर अधिक विस्ताराने लिहावे ही विनंती.

अनुस्वार's picture

22 Dec 2021 - 9:44 pm | अनुस्वार

काही प्रतिसादांवरून आणखी लिहण्याची निकड प्रकर्षाने जाणवली. आता एक-एक बाजू समजून घेण्याच्या दृष्टीने लिहिल.
धन्यवाद.