एन डी पाटिल - महाराष्ट्रातील एक लोकनेते - मुलाखत

बिपिन कार्यकर्ते's picture
बिपिन कार्यकर्ते in जनातलं, मनातलं
25 Mar 2009 - 7:22 pm

सध्या घरच्या डिशटिव्हीच्या कनेक्शनचे काहीतरी लफडे झाले आहे. वृत्त वाहिन्यांमधे फक्त झी२४तास आणि आयबीएन-लोकमत या दोनच वाहिन्या उपलब्ध आहेत. 'समथिंग इज बेटर दॅन अज्जिबात नथिंग' या न्यायाने सध्या आयबीएन-लोकमतच बघत असतो. नाविलाज आहे. पण परवा अचानक एक चांगला कार्यक्रम बघायला मिळाला.

'ग्रेट भेट' नावाचा एक कार्यक्रम असतो. त्यात आयबीएन-लोकमतचे सर्वेसर्वा निखिल वागळे हे प्रसिद्ध आणि महत्वाच्या व्यक्तींच्या मुलाखती घेतात. परवाच्या कार्यक्रमात अतिशय जुने आणि वरिष्ठ राजकारणी डॉ. एन. डी. पाटिल यांची मुलाखत घेतली गेली. एनडी (त्यांना सगळे एनडीच म्हणतात) बद्दल मला फक्त एवढीच माहिती होती की ते एक राजकारणी आहेत आणि शे. का. पक्षाचे प्रमुख नेते आहेत. मुलाखत बघताना हा माणूस किती मोठा आहे हे कळले. मुलाखत अर्ध्याच तासाची होती.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला म्हणले गेले तसे, जरी त्यांनी शे.का. पक्षाचे नेतृत्व केले असले तरी आज ते खर्‍या अर्थाने सर्वपक्षिय झाले आहेत. महाराष्ट्रातील सगळ्याच प्रमुख लोकचळवळींशी ते आजही जातीने निगडीत आहेत. त्यांना बघूनही ते ८० वर्षांचे असतील असे वाटत नाही. महाराष्ट्रात जिथे जिथे सेझ विरोधात म्हणा किंवा तथाकथित आधुनिक विकासामुळे भूमिपुत्र भरडला जात आहे तिथे त्यांचा सक्रिय पाठिंबा आहे. ते स्वतः तिथे जाऊन मार्गदर्शन करतात.

त्यांच्या बोलण्यात खूपच सच्चेपणा वाटला. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता, आपलं मत ते बेधडक मांडतात. आयुष्यभर स्वच्छ राहिलेला माणूसच हे करू शकतो. इतर राजकीय नेत्यांबद्दल त्यांनी मांडलेली मतं खरोखरच जहाल आहेत. देशातील सगळेच राजकारणी हे कोणाला ना कोणाला तरी विकले गेले आहेत हे स्वतः राजकारणात राहून स्पष्टपणे ठणकावून सांगणे हे सोपे नाही. आधुनिक चाणक्य शरद पवार हे त्यांचे मेव्हणे. पवार हे एनडींच्या बायकोचे भाऊ. पण पवारांच्या प्रभावाखाली नसलेला एकमेव नेता असे त्यांचे वर्णन केले जाते असे वागळे म्हणाले. कर्मवीर भाऊराव पाटिलांच्या तालमीत तयार झालेला हा गडी अजूनही रयत शिक्षण संस्थेची गाडी हाकत आहे.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला राजकारणी वाटलेले एनडी मुलाखतीच्या शेवटी मात्र त्यापेक्षा खूप मोठ्ठे समाजकारणी आहेत असेच वाटले.

हा कार्यक्रम आपल्याला http://www.ibnlokmat.tv/gallery.php?id=1&conid=57082 या लिंकवर बघता येईल. माझ्याकडे सगळे भाग उतरवून घेतले आहेत. कोणाला या दुव्यावरून बघता येत नसेल तर मी हे भाग आंतरजालावर चढवायचा प्रयत्न करेन.

समाजजीवनमानराजकारणशिक्षणविचारबातमीशिफारसमाध्यमवेध

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

25 Mar 2009 - 7:34 pm | मुक्तसुनीत

मुलाखत पूर्ण पाहिली. पाटलांसारख्यांचे हात आपण सर्वानी मजबूत करायला हवेत. आपण जी लढाई लढू शकत नाही ती ते लढत आहेत. त्यांचे काम फार महत्त्वाचे आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Mar 2009 - 7:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

फक्त त्रास होऊन, नैराश्य येऊन काहीच भरीव आणि ठोस होणार नाही.

अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

शक्तिमान's picture

25 Mar 2009 - 9:29 pm | शक्तिमान

+१

प्राजु's picture

26 Mar 2009 - 7:52 am | प्राजु

+२
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अनामिका's picture

25 Mar 2009 - 10:20 pm | अनामिका

त्यांच्या बोलण्यात खूपच सच्चेपणा वाटला. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता, आपलं मत ते बेधडक मांडतात. आयुष्यभर स्वच्छ राहिलेला माणूसच हे करू शकतो. इतर राजकीय नेत्यांबद्दल त्यांनी मांडलेली मतं खरोखरच जहाल आहेत. देशातील सगळेच राजकारणी हे कोणाला ना कोणाला तरी विकले गेले आहेत हे स्वतः राजकारणात राहून स्पष्टपणे ठणकावून सांगणे हे सोपे नाही

बिपिनदा !!!!!!!
मुलाखत बघितली आणि लोप पावलेल्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्यात असे म्हंट्ले तर वावगे ठरणार नाही.

"अनामिका"

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Mar 2009 - 11:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा.एन.डी.पाटलांची मुलाखत पाहिली, ऐकली. शेती, सहकार, शिक्षण या विषयावर सतत अभ्यासपूर्ण लेखन करणारे विचार मांडणारे म्हणून प्रा.पाटील यांची ओळख अनेकांना आहे. 'आजचे शिक्षण' नावाचा एक धडा दोन वर्षापूर्वी मराठीच्या अभ्यासक्रमात होता. 'शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी' या ग्रंथातून तो घेतलेला होता. त्यातील महत्वाचा जो विचार होता तो मला सांगण्याचा मोह आवरत नाही . बहुतांश समस्या या निरक्षरतेतून उद्भवलेल्या आहेत आणि गेली अनेक वर्ष आपण चुकीची धोरण स्वीकारल्यामुळे आपण शासनाचा शिक्षणाचा पैसा मूठभर लोकांच्या शिक्षणासाठी खर्च करत आहोत. शिक्षण ही मुठभरांची मक्तेदारी ठरता कामा नये,राजकर्ते हे शिक्षणाच्या बाबतीत दुतोंडीपणा करतात. प्राथमिक शिक्षणाच्या वाटणीचे पैसे इतरत्र खर्च केल्या जातात. खरे तर जो पैसा जनतेच्या प्राथमिक अग्रहक्काने खर्च करण्याची गरज आहे तो पैसा राज्यकर्ते इतर बाबींवर खर्च करत आहेत. प्रार्थमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्याची गरज असतातांना त्यावरच्या खर्चाच्या टक्केवारीत घट होतांना दिसते, इतकेच नव्हे तर उच्च शिक्षणात धनदांडग्यांची मक्तेदारी सुरु झालेली आहे. एक दिवस शिक्षण सर्वसामान्य माणसाच्या हातून निसतून केवळ धनदांडग्याची मक्तेदारी होईल अशी अवस्था शिक्षणक्षेत्रात होणार आहे, असे ते म्हणतात.

मुलाखतीतला राजपूत्र हॅम्लेटची गोष्ट त्याच धड्यातली आहे, आजतागायत सामान्य माणसाला दूर करुन आर्थिक व शैक्षणिक धोरण आखल्या जात आहेत. राजपूत्र हॅम्लेटला न घेता नाटकाचा प्रयोग चालला आहे असे ते म्हणतात. गरिबांना घेऊनच शिक्षणाचा प्रयोग झाला पाहिजे. शिक्षणाच्या वाढीसाठी खत हे झाडाच्या बुंध्याला घातले पाहिजे, शेंड्याला नव्हे.. हा विचार म्हणजे प्रार्थमिक शिक्षणाला महत्व दिले पाहिजे... प्रा.एन.डी.पाटील सामाजिक क्षेत्रात जागृती आनणारा माणूस आहे..इतकेच या मुलाखतीच्या निमित्ताने म्हणावे वाटते.

बीपीन आपले आभार ! आपण एका चांगल्या माणसाची, बदलांचा आशावाद उभा करणार्‍या माणसाची या निमित्ताने आठवण करुन दिली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Mar 2009 - 1:39 am | बिपिन कार्यकर्ते

प्रा. डॉ. छानच माहिती दिलीत. एनडींचे विचार अर्थातच खरे आहेत.

अवांतर: मला नेहमी असे वाटते, शिक्षण खाते हे दुय्यम खाते समजले जाणार्‍या राज्यकर्त्यांकडून काय अपेक्षा ठेवायच्या? (पण आजकाल शिक्षणखाते दुय्यम राहिले नसावे असे वाटते.)

बिपिन कार्यकर्ते

मुक्तसुनीत's picture

26 Mar 2009 - 1:41 am | मुक्तसुनीत

बिरुटे यांचा प्रतिसाद आवडला !

नितिन थत्ते's picture

26 Mar 2009 - 9:15 pm | नितिन थत्ते

बिरुटे सरांच्या मतांशी सहमत.
सामान्य माणसाला बाजूला ठेवून आखलेल्या योजनांना विरोध करणार्‍यांना 'विकासाचे विरोधक', 'आडमुठे' आणि ते डावे असतील तर (पोथीनिष्ठ) वगैरे म्हणण्याची पद्धत आहे.
सामान्यांसाठी काय चांगले ते ठरवण्याचा मक्ता पूर्वीच्या नियोजन मंडळ व मंत्री/ नोकरशहा वगैरेंकडे होता. सध्या तो मक्ता कॉर्पोरेट जगातल्या 'जाणते राजे' म्हणवल्या जाणार्‍या (नारायणमूर्ती वगैरे) उद्योजकांकडे हळुहळू हस्तांतरित होत आहे.
दोन्ही काळात कायम 'देशा'चा विकास हा चर्चेचा विषय असतो. सामान्य माणसाच्या विकासाविषयी कोणालाच पडलेली नाही. सामान्य माणसाला कोणी विचारातही घेत नाही.

खराटा
(रंग माझा वेगळा)

अडाणि's picture

27 Mar 2009 - 12:36 am | अडाणि

खुप चांगली माहिती मिळाली. दुवा दिल्याबद्दल दुवा !
-
अफाट जगातील एक अडाणि.

श्रावण मोडक's picture

27 Mar 2009 - 1:43 pm | श्रावण मोडक

जुनी घटना आहे ही. मी प्रत्यक्ष अनुभवलेली नाही. पण अनुभवणाऱ्यांकडून दोन तास चर्चा करीत ऐकलेली. पुलोदच्या काळातील ही घटना. बहुदा १९८० ची असावी. कोल्हापुरात बिंदु चौकात मुख्यमंत्र्यांची सभा होती. बहुदा शरद पवारांना यायला उशीर होता. ठरलेल्या वेळेच्या कितीतरी अधिक. त्या रात्री मुख्यमंत्री येईपर्यंत तीन तास एन. डी. पाटलांचे भाषण झाले. त्या भाषणातून त्यांनी अर्थसंकल्प म्हणजे काय हे असे सांगितले की, सभा जागच्या जागी होती. मध्यरात्र उलटून गेली तरीही. मुख्यमंत्री येत नाहीत, उशीर होतोय वगैरे कारणे शिल्लकच ठेवली नाहीत एन.डीं.नी. माझ्या या पत्रकार मित्रांच्या मते त्यांनाही त्या दिवशी अर्थसंकल्प म्हणजे काय हे प्रथमच चांगल्या पद्धतीने उमगले. ही एन.डीं.ची खासीयत.
पवार कॉंग्रेसचे मुख्यमंत्री होते. एन.डीं.नी काही मुद्यावरून (बहुदा साखर कामगारांचा किंवा ऊस तोडणी कामगारांचा मुद्दा असावा) मुंबईत उपोषण केले. पावसाला सुरवात झाली तो काळ होता. पवारांनी तडजोड घडवून एन.डीं.चे उपोषण सोडवले. एन.डी. पावसात भिजले होते. गारवा होता. उपोषण सोडवले, आता एन.डीं.ना ऊब द्या, असे कोणीतरी पवारांना सुचवले. पवार म्हणाले, "ती तर आधीच दिली आहे त्यांना." संदर्भ पवारांची बहिण ही एन.डीं.ची पत्नी हाच होता.
(काही तपशील कदाचित चुकतील. वय झाले, आठवणी पक्क्या नाहीत असे म्हणूया)

घोडीवाले वैद्य's picture

27 Mar 2009 - 6:04 pm | घोडीवाले वैद्य

एन.डीं.ना ऊब द्या, असे कोणीतरी पवारांना सुचवले. पवार म्हणाले, "ती तर आधीच दिली आहे त्यांना." संदर्भ पवारांची बहिण ही एन.डीं.ची पत्नी हाच होता.

हा संवाद झाल्यानंतर तिथे खसखस पिकली, हास्यकल्लोळ झाला, की गंभीर नीरव शांतता दाटली, याविषयी काही माहिती आहे का तुमच्याकडे?

श्रावण मोडक's picture

27 Mar 2009 - 6:42 pm | श्रावण मोडक

काय घडले असावे? तुमचा अंदाज?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Mar 2009 - 6:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काय घडले असावे? तुमचा अंदाज?

घोडीवाल्या वैद्यांना असेच विचारतो !
(काही तरी जबरदस्त माहितीच्या प्रतिक्षेत)

घोडीवाले वैद्य's picture

28 Mar 2009 - 1:11 pm | घोडीवाले वैद्य

नाही पण काय घडले असेल हो..
बघा ना काही माहिती मिळ्तेय का, बघा...

भोचक's picture

28 Mar 2009 - 4:22 pm | भोचक

माझं शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतच झालं. त्यावेळी एन. डी. पाटील व दि. बा. पाटील ही जोडगोळी संस्थेत चर्चेत असायची. त्यातल्या दिबांनी शेकाप सोडून शिवसेनेची कास धरली. एनडी मात्र अजूनही तत्वाला चिकटून लढाई एकटेपणाने लढताहेत. रयतशी तर त्यांचे नाते अजूनही तितकेच जिव्हाळ्याचे आहे.
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/