यंदा कर्तव्य आहे? भाग १०

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
25 Mar 2009 - 4:17 pm

यंदा कर्तव्य आहे? पुस्तकाचे
मनोगत
यंदा कर्तव्य आहे? भाग १
यंदा कर्तव्य आहे ? भाग २
यंदा कर्तव्य आहे? भाग ३
यंदा कर्तव्य आहे ? भाग ४
यंदा कर्तव्य आहे? भाग ५
यंदा कर्तव्य आहे? भाग ६
यंदा कर्तव्य आहे? भाग ७
यंदा कर्तव्य आहे? भाग ८
यंदा कर्तव्य आहे? भाग ९
भविष्यकथनाचा आधार
आम्हाला तर ज्योतिषाचा चांगला अनुभव आला. अमुक ज्योतिषाने आमच्या आमच्या भाचीचे लग्नाचे भाकित अगदी बरोबर वर्तवले होते. फार तर आठदहा दिवसांचा फरक असेल. इतके दिवस जमत नव्हतं कुठे? मग कसं काय त्याने बरोब्बर वर्तवल? अशी उदाहरणं आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतात. संभाव्यताशास्त्र म्हणजे सायन्स ऑफ प्रॉबेबिलिटी. याचा मोठा उपयोग भाकिते वर्तवणाऱ्यांना होतो. याचे नित्य परिचयातले उदाहरण म्हणजे मुलगा होईल की मुलगी होईल याचे भाकीत. ते भाकीत पन्नास टक्के बरोबर येणारच असते, पण सामान्य लोक मात्र भाकीत बरोबर ठरल्याचे श्रेय ज्योतिषाला देतात. असे संभवनीयतेचे कितीतरी अनुभव तुमच्या दैनंदिन जीवनात येत असतात. उदा. तुम्ही एखाद्याची आठवण काढायला आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटायला किंवा फोन यायला, तुम्ही एखादे गाणे गुणगुणायला आणि नेमके तेच गाणे रेडिओवर लागायला. एखाद्या घटनेची भीती व्यक्त करायला व ती घटना घडायला एकच वेळ येते. पण हीच संभवनीयता जर ज्योतिषाकडून व्यक्त झाली आणि त्याप्रमाणे घटना घडली तर मात्र ते प्रत्यंतर वा प्रचिती. या संभवनियतेविषयी दीड हजार वर्षांपूर्वी भट्ट नारायण लिखित 'वेणीसंहार` नाटकात दुर्योधनाच्या तोंडी एक वाक्य घातले आहे. ते म्हणजे-
ग्रहाणां चरितं स्वप्नो निमित्तान्युपयाचितम् ।
फलन्ति काकतालीयं तेभ्य: प्राज्ञा न बिभ्यति ।।

अर्थ :- ग्रहांच्या गती, स्वप्न, शकुन, नवस हे काकतालीय न्यायाने फळतात. शहाणे लोक त्यांना घाबरत नाहीत.
वस्तुस्थितीचा अंदाज घेऊन शक्यतेच्या आधारे तारतम्य वापरुन वर्तवलेली 'भाकिते` वेगळी व फलज्योतिषाच्या आधाराने वर्तवलेली भाकिते वेगळी, पण दोन्हींची गल्लत लोक करतात. भाकिते खरी ठरली तरी त्यामागचा कार्यकारणभाव न तपासताच खरी ठरलेली भाकिते जणू काही ज्योतिषाचा वस्तुनिष्ठ पुरावा म्हणून मानला जातो. अशा प्रकारे संभवनियतेच्या आधारे लग्नाची अचूक भाकिते सांगणाऱ्या ज्योतिषाला पत्रिकेवरुन विवाहीत की अविवाहित हे मात्र सांगता येत नाही ही वस्तुस्थिती आहे.

माणसाच्या स्वभावाची एक गंमत आहे. देव नवसाला पावला तर ती देवाची कृपा, नाही पावला तर आपलेच नशीब वाईट, असे स्वत:चे समाधान माणूस सहज करून घेतो. ज्योतिषाचे तसेच असते. एखादे चांगले भाकीत बरोबर ठरले की ती ज्योतिषशास्त्राची किमया, खोटे ठरले तर तुमचे नशीबच फुटके! चुकलेली दहावीस भाकिते कुणाला आठवायची नाहीत, पण एक बरोबर ठरलेले भाकीत मात्र लोकांच्या लक्षात पक्के रहाते, आणि त्याची तोंडोतोंडी प्रसिद्धी होत जाते. चुकला तर ज्योतिषी चुकला कारण तो माणूस आहे त्याच्या ज्ञानाला मर्यादा आहेत पण बरोबर आलं तर फलज्योतिष बरोबर आलं ही मानसिकता ज्योतिषांनीच रूजविली आहे.
'लग्नाचं कसं बरोब्बर वर्तवल?` हे किस्से जसे आहेत तसेच फलाण्या थोर माणसाने आपल्या मृत्यूचा दिवस कुंडलीवरून आधीच वर्तवून ठेवला होता, आणि बरोबर त्याच दिवशी त्याला मृत्यू आला, असेही किस्से अनेकदा ऐकायला मिळतात. ज्याला आपल्या मरणाचा दिवस किंवा वेळ आधीच अचूक कळली तो माणूस थोर, अशी समजूत प्रचलित आहे. ते किस्से खरे असतील तर त्याचा अर्थ असा होतो की कुंडलीवरून मृत्यूची तारीख बरोबर सांगता येते. तसे असेल तर मेलेल्या माणसांच्या पाच-दहा कुंडल्या ज्योतिषाला दिल्या तर निदान एका तरी कुंडलीवरून त्या माणसाच्या मृत्यूची तारीख बरोबर सांगता यायला पाहिजे, पण तसे होत नाही. हा तिढा टाकल्यावर ज्योतिषी कबूल करतात की कुंडलीवरून मृत्यू अचूकपणे वर्तवता येत नाही, पण मृत्यूची शक्यता मात्र वर्तवता येते! 'शक्यता` या शब्दाच्या प्रांतात एकदा शिरल्यावर मूळ प्रश्नाला अनेक फाटे फुटतात, आणि त्यात उत्तर हरवून जाते. सांगायचा मुद्दा हा की, मृत्यूची अचूक भाकिते कुंडलीवरून वर्तवल्याच्या कथा कर्णोपकर्णी फैलावत जातात, पण त्यांची शहानिशा करणे दुरापास्त असते. लोकांना मात्र वाटत रहाते की ज्योतिष किती महान शास्त्र आहे! थोडक्यात संभवनियतेनुसार खरी ठरलेली भाकिते आणि जातकाला मिळालेले मानसिक समाधान वा आधार यालाच तो 'अनुभव` म्हणतो.

ज्योतिषी कशासाठी ?
फलज्योतिषाकडे येणारे लोक विविध प्रकारचे असतात. कुणी हताश होवून येतो. कुणी मार्गदर्शनासाठी येतो. कुणी उत्सुकतेपोटी येतो. भविष्यात काय होण्याची शक्यता आहे या एकाच प्रश्नाचे उत्तराभोवती सर्व जण येवून ठेपतात. नैराश्यापोटी आलेल्या लोकांना मन व मनाचे आजार याविषयी योग्य माहीती दिली गेली पाहिजे. चिंता, नैराश्य हे मनाचे आजार आहेत. मानसोपचार तज्ञांचा सल्ला व योग्य ते मानसोपचारावरील औषधांनी ते बरे होतात. शिवाय कौन्सिलिंग सेन्टर्स हे पण तुमच्या समस्या समजावून घेवून त्यावर कायदेशीर व व्यावहारिक उपाययोजना सुचवतात. सर्वांचे सर्व प्रश्न सुटतीलच असं नाही. वैज्ञानिक दृष्टिकोणाचा अवलंब केला तर तर्कबुद्धी, विवेक व आत्मपरीक्षण यांच्या सहायाने आपले काही प्रश्न सुटू शकतात. अनिश्चितता ही सर्वांसाठीच आहे. ती पचवायला शिकलं पाहिजे. जी गोष्ट आपल्या हातात नाही त्या पेक्षा जी गोष्ट आपल्या हातात आहे तिचा विचार केला पाहिजे. प्रयत्न ही बऱ्याच अंशी हातातली बाब आहे. भविष्याविषयी उत्सुकता असणे स्वाभाविक असले तरी त्यासाठी फलज्योतिषाचा आधार घेवून त्यावर निर्णय घेणे हे संयुक्तिक नाही. फलज्योतिषाकडे वळण्याचे मूळ कारण तपासून पाहिले तर आपल्याला अदृष्टाची भीती व अज्ञाता विषयी वाटणारे गूढ हेच आहे. परंतु विवाहाच्या अनुषंगाने पत्रिका पहाताना या भीतीपोटी कित्येकदा सुस्पष्ट व्यावहारिक गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा माणसांचा कल दिसून येतो व पत्रिका जुळवण्याला निर्णायक महत्व दिले जाते. यातून निर्माण होणाऱ्या समस्यांना विवाह जुळविण्यासाठी व्यवहारोपयोगी असे पर्याय दिले तर ज्योतिषाकडे जाणारा हा ओढा नक्कीच कमी होईल.
लहानपणापासून मनावर झालेल्या संस्कारांचे जोखड फेकून देणे अवघड असते. ज्योतिषांची भाकिते खरी ठरल्याच्या गोष्टी नेहमी कानावर पडत असतात. दोन-अडीच हजार वर्षांच्या या पुराण्या शास्त्राला एकदम बोगस कसे म्हणावे अशी धास्ती वाटते. लग्नाच्या बाबतीत जोडीदार कसा मिळेल? कुणास ठाउक? या अनिश्चिततेपोटी माणसं पत्रिका बघतात. वास्तविक हा ही मार्ग किती अनिश्चित आहे. हे त्यांना समजत असतं पण उमगतं नसतं. यात एक मोठी सोय होते. अपयशाचे खापरं फोडायला ज्योतिषाचा आधार रहातो. स्वत:वर फारशी जबाबदारी यंत नाही. वास्तविक ही अनिश्चितता संपवण्यासाठी आणखी व्यवहार्य पर्याय आपणचं शोधायला हवे आहेत. त्यातला संकोच अनावश्यक ताण कसा संपवता येईल याचा विचार करायला हवा आहे. पण जुना धोपटमार्ग सोडून नव्या वाटेने जायची आसं लागल्यानंतरच माणसानं प्रगतीची नवनवी शिखरं पादाक्रांत केली आहेत. सुरूवातीला ठेचकाळत जाणारे मागच्यांसाठी नवे घाटमार्ग निर्माण करीत असतात.

फलज्योतिषविचार

प्रतिक्रिया

सहज's picture

25 Mar 2009 - 5:22 pm | सहज

आवडला हा देखील भाग.

नितिन थत्ते's picture

26 Mar 2009 - 12:28 am | नितिन थत्ते

ज्योतिषशास्त्राच्या समर्थकांचा एक कॉमन युक्तीवाद म्हणजे 'हवामानखात्याचे विज्ञानाच्या आधारे काढलेले अंदाज नाही का चुकत? मग हवामानशास्त्रज्ञांना का भोंदू म्हणू नये?'

यात एक गल्लत ही आहे की जेव्हा हवामानाचा अंदाज चुकतो तेव्हा अंदाज सांगणारा कमी पडला असे न म्हणता ते शास्त्र सुधारण्याचा प्रयत्न केला जातो.
अवांतरः हवामानाचा अंदाज हा अजूनतरी विनोदाचाच विषय असतो.

उलट ज्योतिषशास्त्र परिपूर्णच आहे पण त्या ज्योतिष्याने चूक केली असा दावा असतो. लेखात म्हटल्याप्रमाणे चुकला तर तो ज्योतिषी चुकला आणि बरोबर आला तर 'बघा ज्योतिषशास्त्राच्या खरेपणाचा पुरावा'.
एखादी गोष्ट शास्त्र म्हणून मान्य व्हायला पुरेशा निरिक्षणांमधून निष्कर्ष काढावा लागतो. सामान्य माणसांना एक केस हा देखील पुरेसा पुरावा वाटतो. पण ते बरोबर नाही. अशी निरिक्षणे कंट्रोल्ड प्रकारे घेण्यास ज्योतिषी नेहमीच विरोध करतात. आधुनिक विज्ञानाच्या कसोट्या प्राचीन शास्त्राला लावता येणार नाहीत असा युक्तिवाद केला जातो. (आयुर्वेदाच्याही बाबतीत असाच दावा असतो).

खराटा
(रंग माझा वेगळा)

मीनल's picture

26 Mar 2009 - 6:55 am | मीनल

लेखमाला उत्तम.
माझा ज्योतिषशास्त्रावर विश्वास नाही असं नाही.पण खात्री वाटत नाही.

लग्नाच्या बाबतीत( मग ते लव्ह असो वा ऍरेंज्ड) मला डॉ.फिल म्हणतात ते पटत कधी कधी.
sometimes you have to make a right decision and sometimes you have to make the decision right.
कित्येकदा घेतलेला decision right करण्याच्या प्रयत्नात दिसतात.

मीनल.

लिखाळ's picture

26 Mar 2009 - 5:05 pm | लिखाळ

वा .. हा लेख सुद्धा छान आहे.
-- लिखाळ.

विशाल कुलकर्णी's picture

26 Mar 2009 - 5:57 pm | विशाल कुलकर्णी

पटतय हळुहळु!!

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)