यंदा कर्तव्य आहे ? भाग ४

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
26 Feb 2009 - 4:29 pm

यंदा कर्तव्य आहे? पुस्तकाचे
मनोगत
यंदा कर्तव्य आहे? भाग १
यंदा कर्तव्य आहे ? भाग २

यंदा कर्तव्य आहे? भाग ३

नक्षत्रदोष
मूळ नक्षत्रावर जन्मल्यावर शांती करावयास सांगतात. मूळ नक्षत्र हे तमोगुणी, दारूण, अनिष्ट मानले गेले आहे. त्यामुळे मूळ नक्षत्रावर मूल जन्मले तर ते आईबापाच्या मूळावर आले आहे असा समज निर्माण झाला. 'शामभट्ट ( एक नामांकित जोशी ) आणि त्याचा शिष्य बटो यांचा वृत्तांत` या चिंतामण मोरेश्वर आपटे लिखित १८९३ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात फलज्योतिष हाच एक विषय सामाजिक कादंबरी साठी घेतलेला आहे. त्यात गोविंदपंत यांना झालेला मुलगा हा मूळ नक्षत्रावर झाला असल्याने ते बापास अनिष्ट आहे असे शामभटाने त्यांना सांगितल्यावर मुलाचा त्याग करणे हाच एक पर्याय शिल्लक राहीला. त्यानुसार त्यांनी तो त्याग केला. पुढे कादंबरीत शिवाजी महाराजांनी या प्रकारचा छडा लावला या कादंबरीतील हकिगती मूळातूनच वाचण्यासारख्या आहेत. दोष आला म्हणजे पुढे परिहार वगैरे गोष्टी आल्या. त्यातला अनिष्ट भाग काढून टाकण्यासाठी त्याची शांती करण्याचे प्रकार अर्थातच भीतीपोटी निर्माण झाला. संत एकनाथ मूळ नक्षत्रावर जन्मले. त्यांनी एके ठिकाणी लिहून ठेवले आहे.
मूळीच्या मूळी एका जन्मला । मायबापे घोर धाक घेतला ।
कैसे नक्षत्र आले कपाळा । स्वये लागला दोहोच्या निर्मूळा ।

शांती हे कर्मकांड भट भिक्षुकांच्या उपजिविकेचे साधन होते. त्यामुळे अशा प्रकारची कर्मकांड जाणीवपूर्वक जोपासली गेली व गतानुगतिकतेचा भाग म्हणून त्याचे अंधानुकरण झाले.
मूळ नक्षत्र हे सासऱ्यास वाईट, आश्लेषा नक्षत्र सासूस वाईट, ज्येष्ठा नक्षत्र दिरास वाईट या गोष्टींचा उगमही याच पद्धतीने आहे. गंमत म्हणजे याच नक्षत्रांचे वेगवेगळे भाग पाडून त्याची फले वेगवेगळी दिलेली आहेत. ती धनवान, दानशूर मंत्री अशी पण आहेत. तसेच ग्रंथकार बदलेले की फलेही बदलतात. काही ग्रंथकारांनी विशाखा व मघा या नक्षत्रांची काही चरणे ही दीर व सासरा यांचेसाठीही मारक म्हटले आहे. मुलगी सासरी आल्यानंतर जर काही दुर्घटना घडली तर त्याचे खापर लगेच मुलीच्या पायगुणाशी जोडून काहीतरी उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच कुठतरी नक्षत्राशी संबंध जोडून काहीतरी बादरायण संबंध प्रस्थापित केला जातो. शंभर आश्लेषा नक्षत्राच्या मुली सून म्हणून घरी आल्यावर त्यातल्या नव्वद सासवा वारल्या असे कुणी सप्रमाण सिद्ध केले आहे काय? एखाद्या घरात आश्लेषा नक्षत्राची मुलगी सून म्हणून आली आणि जर योगायोगाने त्या घरातील सासू वर्षभरात या ना त्या कारणाने वारली तर हा समज इतका घट्ट रुजतो की विषाची परिक्षा कशाला घ्या?

मृत्यू षडाष्टक
मंगळाच्या दहशती शिवाय ही आणखी एक दहशत आहे. समजा तुमची जन्मरास मेष आहे व तुम्हाला सांगून आलेल्या जोडीदाराची रास कन्या आहे. मेषेपासून कन्या रास ६ वी येते. कन्येपासून पुढे मोजल्यास मेष रास आठवी येते. सहा-आठ म्हणजे षडाष्टक. पत्रिकेतील षष्ठ स्थान ह शत्रूचे आणि अष्टम स्थान हे मृत्यूचे आहे. असा योग असलेल्या जोडीदारांचे एकमेकाशी पटत नाही अशी समजूत आहे. षडाष्टक शब्दामागे मृत्यू हा शब्द जोडला म्हणजे एकदम दहशत निर्माण होते. ज्योतिषांना तेच हवे असते. ते अशी समजूत घालतात की मृत्यू शब्दाचा अर्थ वैवाहिक सुखाचा मृत्यू असा घ्यायचा. हाच अर्थ शास्त्रकारांना अभिप्रेत आहे. ज्योतिष्यांचे एकूण धोरण काय तर विवाह या गोष्टीसंबंधात मंगळ, मृत्यूषडाष्टक, एकनाड असे काहीतरी प्रश्न वा अडचणी आपणच आधी निर्माण करायच्या व आपणच त्याला 'शास्त्राधार` देउन मार्गदर्शन करण्याचा आव आणायचा व स्वत:च्या तुमड्या भरायच्या. काही षडाष्टकांमध्ये दोन्ही राशीचे राशीस्वामी एकच असतात किंवा त्यांची मैत्री असते अशावेळी ती षडाष्टके मृत्यू षडाष्टके न होता प्रीती षडाष्टके होतात व ती ग्राहय धरली जातात. उदा. मेष पासून आठवी रास वृश्चिक त्यामुळे षडाष्टक झाले पण दोहोचा राशीस्वामी मंगळ हा एकच असल्याने मृत्यू षडाष्टक ही विसंगती होईल म्हणून हे झाले प्रीती षडाष्टक.
विज्ञाननिष्ठ गुणमेलन ?
आपल्याला आई, बाप, भाउ, बहिण निवडीचे स्वातंत्य्र नाही. कारण या बाबी जन्माधिष्ठीत आहेत. आपल्या आई बापांचा धर्म, जात, पंथ हा त्यांच्या पोटी मिळालेल्या जन्मामुळे आपल्याला चिकटतो. आपला जन्म ही आपल्या हातातील बाब नाही.पण वैवाहिक जोडीदाराची निवड ही आपल्या हातातील बाब आहे. हे आपल्याला व्यवहाराने दिलेले स्वातंत्रय आहे. प्रत्यक्षात हे स्वातंत्रय जोडीदाराचे रंगरुप, शिक्षण व्यवसाय या व्यतिरिक्तच्या इतर बाबतीत मिळविण्यास प्रत्यक्ष विवाहेच्छुकच उदासीन असतात. रंगरुप शिक्षण व्यवसाय या बाबतीत आग्रही भूमिका घेणारे विवाहेच्छुकच मुहूर्त, पत्रिका, देणीघेणी, जातीपाती या बाबतीत मात्र सोयीस्करपणे वडीलधाऱ्यांचे म्हणणे शिरोधार्य मानतात. स्वत:ची स्पष्ट व आग्रही भूमिका घेण्याचे टाळतात. खरं तरं वैवाहिक जीवन सुखी असण्यासाठी सामंजस्य, त्याग हवा, गुणमेलनापेक्षा गुणमीलनाची जास्त आवश्यकता आहे हे मर्म काही आधुनिक ज्योतिषांनी ओळखले. त्यांनी गुणमेलनाची वेगळी पद्धत अवलंबली आहे. यात ते वधूवरांच्या पत्रिका घेवून त्या व्यक्तिमत्व, आरोग्य, आयुर्मान, या पातळींवर एकमेकाशी जुळते का नाही हे स्वत:च तारतम्याने ठरवतात व त्यानुसार निर्णय देतात. ज्योतिषशास्त्रात काळानुरूप बदल केले पाहिजेत आजच्या वैज्ञानिक युगात जुने ते सोने असे म्हणून चालणार नाही, ज्योतिष हे देश, कालवर्तमानानुसार वर्तवले गेले पाहिजे असे म्हणून ज्योतिषाला आधुनिक विज्ञानाची जोड देउन ही मंडळी वैद्यकीय तपासणीचाही सल्ला देतात. सर्व व्यावहारीक गोष्टी जुळत असतील तरच ही मंडळी पत्रिका जुळत असल्याचा फलज्योतिषकीय मानसिक आधार देतात. यात वैज्ञानिक दृष्टिकोण बाळगल्याचे तथाकथित समाधान व परंपरा टिकवल्याचेही समाधान जातक व ज्योतिषी दोघांनाही मिळतं.

यंदा कर्तव्य आहे? भाग ५
यंदा कर्तव्य आहे? भाग ६
यंदा कर्तव्य आहे? भाग ७
यंदा कर्तव्य आहे? भाग ८

फलज्योतिषविचार

प्रतिक्रिया

अवलिया's picture

26 Feb 2009 - 6:33 pm | अवलिया

उत्तम लेख

--अवलिया

सहज's picture

27 Feb 2009 - 7:31 am | सहज

उत्तम लेख.

प्रकाश घाटपांडे's picture

26 Feb 2009 - 9:52 pm | प्रकाश घाटपांडे

टीप - ज्यांची कर्तव्य "उरकून" झाली आहेत त्यांनी पोष्टमॉर्टेम करायला हरकत नाही. त्यांना मृत्यु षडाष्टकाचा आधार घेता येईल.;) ;-)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.