कोळीगीतः समींदरा, जपून आण माझ्या घरधन्याला

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
18 Dec 2021 - 2:09 am

समींदरा रे समींदरा,
तू जपून आण माझ्या घरधन्याला
लई दिवसांन परतून येईल घराला ||धृ||

नको उधाण आणू तुज्या पाण्याला
नको मस्ती करू देऊ वार्‍याला
काय नको होवू देऊ त्याचे होडीला
तू जपून आण माझ्या घरधन्याला ||२||

नारळ पौर्णिमेचा सण आता सरला
तुला सोन्याचा नारल वाढवला
नेल्या होड्या त्यानं मासेमारीला
तू जपून आण माझ्या घरधन्याला ||३||

मी कोलीण घरला एकली
सारं आवरून बाजारा निघाली
म्हावरं विकून येवूदे बरकतीला
तू जपून आण माझ्या घरधन्याला ||४||

एकवीरा आई माझी डोंगरावरी
खणा नारळांन ओटी मी भरीन
नवस केलाय मी खंडोबाला
तू जपून आण माझ्या घरधन्याला ||५||

पंधरा दिवस जायी तो समींदरात
ते दिवस जातात माझे झुरण्यात
सोनसाखली मला करण्यास
तू जपून आण माझ्या घरधन्याला ||६||

- पाषाणभेद (कोळी)
१८/१२/२०२१

festivalskokanकोळीगीतसंस्कृतीनृत्यसंगीतकविताप्रेमकाव्यसमाजजीवनमानमत्स्याहारी

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

18 Dec 2021 - 11:44 am | चित्रगुप्त

वा पाषाणभेदराव. अतिशय र्‍हद्य, भावपूर्ण पद्यरचना. दादला दर्यावर गेल्यावर मोठीच जोखीम असते, त्यातून त्याची काहीही खबरबात मिळणे शक्य नसते. अश्या स्थितीत त्याच्या व्याकुळ पत्नीच्या मनात उसळणारे भावतरंग काय असतील, त्याची कल्पनाही आपल्यासारख्या शहरी लोकांना करता येणार नाही. ते तुम्ही त्या कोळिणीच्या जणु आंतरंगातच शिरून व्यक्त केले आहेत. खूप खूप छान. असेच लिहीत रहा, आम्ही वाचत राहू. अनेक आभार.
शेवटला सोनसाखळीचा उल्लेख तसा मजेशीर वाटला, पण मनात प्रश्नचिन्हही जागवून गेला.

कर्नलतपस्वी's picture

18 Dec 2021 - 12:53 pm | कर्नलतपस्वी

कदाचित तीचा घो म्हणत असेल

दुर टेकडीवरी पेटती निळे ताबंडे दिवे
सांगतात ते मजला आता घरी जायला हवे
कुसुमाग्रज

पण तीला कसे कळणार?

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Dec 2021 - 4:03 pm | अमरेंद्र बाहुबली

भारी

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Dec 2021 - 4:21 pm | ज्ञानोबाचे पैजार

आवडली कविता
पैजारबुवा,

मदनबाण's picture

18 Dec 2021 - 5:15 pm | मदनबाण

मस्त !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Saami Saami Lyrical... :- Pushpa

Bhakti's picture

18 Dec 2021 - 5:29 pm | Bhakti

छान आहे कोळीगीत!
अशाच कोळीण स्त्रीची व्याकुळता दाखवणार माझं एक आवडत गाणं आहे. नाख्वा हो उधाण आयलया!