शैलेंद्रच्या निमित्ताने...

Primary tabs

मायमराठी's picture
मायमराठी in जनातलं, मनातलं
29 Mar 2020 - 11:42 am

एका मुलाला ओळखता का? डोंबिवली शहराबाहेरील पाथर्ली गावात शंकराच्या देवळाजवळ एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर रहायचा. खाली रस्त्याला लागून त्यांचे दुकान होते. ज्या शाळेला मैदान नाही, स्कुल बस नाही. ते कशाला शाळेला स्वतःची इमारतही नव्हती. शाळेची किल्ली नाही मिळाली म्हणून किंवा धो धो पावसात छत गळत असल्यामुळे सुट्टी देणाऱ्या शाळेत शिकला तो. ४ थी, ७ वी शिष्यवृत्ती नाही, प्रज्ञा शोध परीक्षेचा शोध त्याला लागलाच नव्हता, होमी भाभा हे शास्त्रज्ञाचे नाव एवढीच माहिती होती, त्या नावाने परीक्षा बिरीक्षाही असतात हे काही त्याला ठावं नव्हते. ( त्याला असेलही कदाचित पण मला नक्की ठावं नव्हतं.) दहावी व बारावीलाही तो बोर्डाबाहेर लै लांब उभा होता. "अशी मुलं आपल्या समाजात काय हो शिकत असतील? "असा प्रश्न सगळ्या हुश्शार मुलांना व त्यांच्या पालकांना पडतोच, होय ना? "त्याने Bsc ला ऍडमिशन घेतली असेल, होय ना?" एकदम बरोब्बर!

यथावकाश काही वर्षांनी पदवी मिळाल्यावर Msc पण झाली. बारावीनंतर ६किंवा ७ वर्षे लागली असतील हे सगळं व्हायला ( डुलक्या मारत मारत). कोणता विषय घेतला होता, असा प्रश्न पडू देऊ नका. कारण आपल्याला काहीच फरक पडत नाही. दुसरं म्हणजे मुळातच Bsc वगैरे या बाजूना स्कोप नसतोच मग कशातही करू द्या की आम्हा काय त्याचे? थोडक्यात तो स्वर्गीय IIT किंवा जमिनीवरील साधा अभियंता नव्हे. डॉक्टर, CA ( आमचा परम्प्रिय ( परमप्रिय नव्हे) मित्र जयंतसारखा) वकीलही नव्हे. तो परदेशातही राहत नाही. अभिनेता/ त्री, मॉडेलही नाही. ही निंदा नव्हे तर ओळख आहे त्या मुलाची. तुम्ही ओळखलं का कोण ते?

त्याच्यााबद्दल आपण आपल्या नातलगांशी, मुलांशी, मित्रमैत्रिणींशी चर्चा करणार का? काहीच विशेष नाहीए मग काय कप्पाळ सांगायचं अशा माणसाबद्दल. खरंच की, कारण त्याने नेमकं काय केलं, सध्या काय करतोय ते नीटपणे कळलं तर पाहिजे की राव. तुम्ही त्याला काल किंवा आज टीव्हीवर बघितलं असाल, एका मुलाखतीला उत्तर देताना. तो तोंडाला मास्कबिस्क लावून सांगत होता काहीतरी. सगळे शब्द मास्कनेच गिळल्यामुळे काही फारसं कळलं नाही. असो. त्याच्या कंपनीने detection kit शोधलंय. जे विकण्याचा परवाना त्याला परवाच मिळालाय. निव्वळ अडीच तासात रोगनिदान होऊ शकते. एका किटमध्ये अनेकशे रुग्णांची तपासणी करता येऊ शकते. सध्या एका आठवड्यात लाखभर किट बाजारात पुरवण्याची त्याच्या कंपनीची क्षमता आहे. आता तुम्ही रोग नक्की ओळखला असाल. तोच तो अवघ्या जगाचा जिव्हाळ्याचा विषय झालाय तो Covid 19. आता तरी मुलगा ओळखा की हो.

त्याच्या घरी पितळ्याची एक पानसुपारी ठेवायची एक मस्त Vintage कार होती. त्याच्या घरात कुठेही बसलं तरी ती कार लक्ष वेधून घ्यायची. त्याची आई मोठ्ठ कुंकू लावून तिचं भव्य कपाळ मिरवत आम्हाला काहीबाही खायला द्यायची. मधेच अभ्यासावर विषय आला की आम्ही तो टाळून गच्चीत पळायचो. ज्या गच्चीत मी आयुष्यात पहिल्यांदा ह्या मुलाच्या मांजरीने चिमणीला पकडून तिला फस्त करताना बघितले होते. बहिणींची खोडी काढल्यावरून ह्याच्या आईला मी कधीतरी ह्याला रागेजताना, धपकवताना पण बघितलंय. पण खरंच सांगतो , मित्राच्या आईचे त्याला ओरडणे, धपकवणे फारच मोहक असते. त्याचे बाबा संध्याकाळी खाली दुकानात असायचे. शांत, समाधानी चेहरा कुटुंबाला हात देण्यासाठी करावी लागणारी मध्यमवर्गीय धडपड लपवत राहायचा. तरीही डोळ्यांत एक जरबही होती. ह्याला ह्याचे मिस्कील डोळे बाबांकडून आणि फसफसतं मनमोकळं हसू त्याच्या आईकडून मिळालंय. हा दुकानही सांभाळायचा. "अख्ख्या दुकानातील वस्तूंच्या किंमती तुला पाठ कश्या?" हा माझा आवडता प्रश्न असायचा. मी त्याची खात्री करायचो. वेगवेगळ्या वस्तूंच्या किंमती विचारायचो . मला शाळेत गणितात उत्तम गुण मिळायचे. ह्या मुलाला त्यापेक्षा कमी मिळायचे. पण माझा पहिला किंवा दुसरा नंबर मी मनातल्या मनात ह्या मुलाला अनेकवेळा देऊन टाकला होता. त्या दुकानात बसल्या बसल्या त्याला मिळालेल्या व्यवहारज्ञानाने दुनियेची व माणसांची पारख करण्याची हातोटी मिळाली, असं तो मानतो. नुसतं दुकांन नाही तर सकाळी 4 ते 9 दुधाचा धंदाही हा पठठ्या आरामात बघायचा. गद्धे पंचविशीत बऱ्याच वेळा सकाळी ७ ते ८:३० या वेळेत जयंत, मी आणि ह्याच्या दुधाच्या दुकानात वैश्विक, अध्यात्मिक व तरुणाईने बहरलेल्या चर्चा झडलेल्या आहेत. ( जयंत हे वेगळंच प्रकरण आहे. त्याबद्दल वेगळा अध्याय लिहायला लागेल.) ओळखलंत का नाही?

हा इसम सायकलने पुणे ते लोणावळा जातो व सायकलनेच परतही येतो. डोंबिवलीतली २ वर्षांपूर्वीची सायकल स्पर्धा जिंकलेली आहे. त्याला ड्रायविंग आवडते म्हणून तो पुण्याहून त्याच्यासारख्याच काही उनाड मित्रांना घेऊन त्याची गाडी घेऊन लडाखला गेला होता व गाडी चालवत चालवत परत आला. लडाखने त्याच्या पायावर स्नेहांकन करून त्याचा आदरसत्कार करून परत पाठवलं होतं. त्याच्या मामाच्या 'राजूर' गावाजवळचे बरेचसे किल्ले त्याने पायाखालून घातलेले आहेत. त्याच्या हातात कॅमेरा देऊ नका. तो जीवघेणे फोटो काढतो ( ही १००% स्तुती आहे). तुम्ही त्याच्या कविता वाचल्यात का? कृष्ण व कर्ण, राधाकृष्ण, दुपार...? नाही? बरं निदान तुम्ही त्याचे वेगवेगळ्या मासिकांमधले लेख वाचले असाल? 'मानवाची उत्क्रांती' या विषयावर तुम्ही आठवडाभर त्याचं व्याख्यान ठेवू शकता. 'साबण' या विषयावर त्याचा लेख वाचायला साबणांनीही गर्दी केली होती म्हणे. एकेक शब्द मोजका असतो, तो वाक्यात चपखल बसतो, वाक्यरुपी फुलांचे परिच्छेदात्मक हार ओवले जातात. ज्यांच्या अर्थांचे सुवास तुमच्या आसपास दरवळत राहतील. तुमच्या जगण्याच्या जाणीवा समृद्ध करत राहतील. मी म्हणतो, वाचून तर बघा. पण आधी सांगा ओळखलं का ह्याला?

Molecular Biology, Biochemistry, DNA,Genetics, RNA, Biotechnology ही यादी लांब आहे. या विषयांवर हा मुलगा गप्पा मारू शकतो. ह्याची lab आहे. He is executive director of Mylab Solutions. ही सुरू करायचा विचार कसा व कुठे आला, याची मनोरंजक कहाणी आहे. एकदा त्यालाच विचारा. माणूस एकदम निवांत आहे. मातीत मुळं घट्ट असलेला एकदम मोकळाढाकळा आहे. बोलण्यात तुम्हाला कधी धोबीपछाड टाकून आडवा करेल याचा भरवसा नाही. तुमचं बोलणं ऐकताना किंवा वाचताना त्याचे ते रहस्यमयी डोळे चमकले तर समजून जा की तुमच्यावर उल्कापात होणार आहे. तरीही त्याचा धाकटा लेक त्याला वेळोवेळी आडवा घालण्यात यशस्वी होतोच. त्याला मिळालेल्या अनेक देणग्यांपैकी Humour ही फार मोठ्ठी देणगी आहे. आता तर तो पुण्यात राहायला आला मग काय विचारायची सोय नाही. खांद्यावर दोन शालेच्या जोडी हा नेहमीच घेऊन फिरतो. आपल्याला कोणत्या देणग्या मिळाल्यात हे सगळ्यांनाच कळत नाही. ती देणगी जरा विरळाच असते पण ह्यांच्याकडे आहे असं वाटतं. एव्हाना कमीत कमी कुतूहल तरी वाटतंय की नाही? की एवढं सगळं कसं जमवलं ह्या गडयाने? राक्षसासारखं वाचलंय, वाचतो हा माणूस. माणसं, त्यांची आयुष्यही वाचायला शिकला. जगण्याची काही विशिष्ट सूत्रे, नियम कधीच नव्हती व नसतीलही. याने स्वतःच्या अनुभवावरून सूत्रे बनवली; त्यावर काम केले; जोखीम घेणं हा पाया मानला. तरीही हा मनुक्ष योगायोगाला गुरू मानतो.

आज त्याची भारतातील एकमेव कंपनी आहे जी सर्व भारतीयांच्या आरोग्याकरता अत्यावश्यक असे काम करतेय. अशी माणसं समाजाकरता अमूल्य ठेवी असतात. हेवा नेहमी वाईट नसतो. सकारात्मकही असू शकतो की . तुम्हाला ह्याचा वाटला तर अजिबात नवल वाटून घेऊ नका. हे सगळं त्याच्या यशाबद्दल नव्हे. खूप दिवस हे मनात दडलेलं होतं. निमित्त गावत नव्हतं. आज गावलं खरं. शिक्षण चुकीचं नसतं. ते कसं, कुठं वापरावं, कसं वाढवावं हे कळायला पाहिजे. त्यापेक्षाही सतत स्वतःला जाणीवपूर्वक शिकवत रहायला पाहिजे. सगळंच काही पालक, शिक्षक देऊ शकत नाही ना? आपल्या आत खोलवर दडलेल्या स्वतःला नेहमीच स्कोप असतो. त्याला विचारून तर बघा. त्याला कोणत्यातरी एका डिगरीने झाकून टाकू नका.

यश हा शब्द फार फसवा आहे. व्यक्तिसापेक्षही आहे. तसंही हा माणूस यशाबिशात अडकून जाऊन तिथे राहुट्या ठोकून बसणारा नाही. हा आपली कर्मे करत पुढे जाईल. अशा पावलांना बोरकरांनी आधीच गौरवून ठेवलंय " देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालली ". तुम्हीच मागून त्याच्या सावलीकडे बघत बसाल. ती पण त्याच्याबरोबर मोठी होत जाईल व तुम्हाला झाकून टाकेल. प्रेरणा देऊन सोडून देईल. ह्या माणसाकडे बघितलं तर-

" नाभिषेको न संस्कारः सिंहस्य क्रियते वने ।
विक्रमार्जितसत्वस्य स्वयमेव मृगेन्द्रता ॥ "

हा श्लोक आठवतो. मित्रा, आम्हाला असंच प्रेरित करण्यासाठी खूप खूप पुढे जा. डोंगरबिंगर माहीत नाही रे! पण मानवजातीला अडचणीच्या काळात मदत करण्याने उत्तुंग वाटतोस. (भाई, पुढच्या वेळेला रोगराई पसरूच नये म्हणून काही शोधून ठेवा.) तुम्ही सगळेच ( आणि मी सुद्धा) सध्या कोरोनाच्या कृपेने मोकळे आहोत म्हणून जरा धारिष्ट्य दाखवलं. त्याबद्दल ऐसपैस माफी असावी. मला तरी ओळखलंत का?

शैलू, तुझ्यासारखा मित्र लाभल्याचा सार्थ अभिमान आहे.
तुझ्या सर्व कुटुंबियांचंही मन:पूर्वक अभिनंदन !

- अभिजीत श्रीहरी जोगळेकर
२४.०३.२०२०

मुक्तकप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

29 Mar 2020 - 11:53 am | कुमार१

शैलेंद्र यांचे पुन्हा एकवार मन:पूर्वक अभिनंदन !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Mar 2020 - 12:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शैलेशची ओळख आवडली आणि काम तर नंबर एक.

आभारी आहे.

-दिलीप बिरुटे

Nitin Palkar's picture

29 Mar 2020 - 1:00 pm | Nitin Palkar

शैलेंद्र यांचे मन:पूर्वक अभिनंदन! छानशा लेखाबद्दल अभिजीत श्रीहरी जोगळेकर तुमचेही अभिनंदन!!

चांदणे संदीप's picture

29 Mar 2020 - 1:10 pm | चांदणे संदीप

>>
हे आवडलं आणि शैलेन्द्र यांचा परिचयही आवडला.

सं - दी - प

शैलेंद्रचे मनःपूर्वक अभिनंदन. परिचय खूप सुरेख.

प्रकाश घाटपांडे's picture

29 Mar 2020 - 4:39 pm | प्रकाश घाटपांडे

शैलेंद्र साहेब वळख ठेवा म्हन्लं.

शैलेन्द्रराव तुम्हाला एक दंडवत. (तुमचे ग्रुपमधले नांव इथे जाहीर करत नाही कारण तुमच्या खांद्यावरच्या शालीचा ऐवज आमच्या डोक्यावर येईल) :D

जोगळेकरसाहेब.. या लेखाबद्दल अनेक धन्यवाद..!!

भ ट क्या खे ड वा ला's picture

30 Mar 2020 - 10:08 am | भ ट क्या खे ड वा ला

फार मोठे काम करताय शैलेंद्रजी .
तुमच्या लेखांचा पंखा आहेच . या कार्यामुळे आदर वाढलाय .

किरण कुमार's picture

30 Mar 2020 - 10:40 am | किरण कुमार

आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे , असेच उत्तमोत्तम कार्य तुमचे हातून घडत राहो .

चिगो's picture

30 Mar 2020 - 2:06 pm | चिगो

अभिनंदन, शैलेन्द्रजी.. फार मोठं, अभिमानास्पद काम केलंयत तुम्ही.. देश तुमचा ऋणी आहे.

ह्या सुंदर व्यक्तिओळखेसाठी अभिजीत ह्यांचेपण धन्यवाद..

शैलेंद्रचे अभिनंदन कितीवेळाही केले तरी कमी पडेल त्याच्या या कार्यामुळे.

मित्रहो's picture

30 Mar 2020 - 9:51 pm | मित्रहो

शैलैंद्र यांचे मनःपूर्वक अभिनंदन. फार मोठे काम केले आहे.

प्रशांत's picture

30 Mar 2020 - 11:21 pm | प्रशांत

शैलेंद्र यांचे पुन्हा मन:पूर्वक अभिनंदन!

हरवलेला's picture

31 Mar 2020 - 3:18 am | हरवलेला

डोंबिवली फास्ट !!!

तुषार काळभोर's picture

31 Mar 2020 - 6:34 am | तुषार काळभोर

आणि मायमराठी यांचेही..

शैलेंद्र सर, त्यांचे सर्व सहकारी व कुटुंबिय यांचे हार्दिक अभिनंदन!

शैलेंद्र आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार!

आणि अभिजीत, ओळख करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!

दुर्गविहारी's picture

31 Mar 2020 - 11:46 pm | दुर्गविहारी

ओळख आवडली आणि ती करून दिल्याबद्दल जोगळेकर साहेबांचे आभार !
शैलेंद्र सर यांच्या कार्यबधदलं अभिमान आहे. _/\_

निनाद आचार्य's picture

1 Apr 2020 - 5:52 pm | निनाद आचार्य

शैलेंद्रजी तुमचे मन:पूर्वक अभिनंदन!
लेख छान जमलाय.

छान, शैलेंद्र यांचे अभिनंदन आणि आभार

आमचे शेजारीच पण कधी ऐकले नव्हते.

राच्याकाने, कालच यांच्या टीम मधील मीनल डाखवे यांच्या बद्दल एक लेख आला, आपल्यासाठी तो देत आहे. जर ही माहिती खरी नसेल तर संपादकांना विनंती की हा प्रतिसाद उडववा. पण जर खरी असेल तर मीनल यानां शेकडो सलाम

--
झाशीची राणी पाठीवर बाळ घेत लढली,, ही पोटात बाळ घेऊन लढणार होती...!!!

---
भारत खूप कमी लोकांच्या कोरोना टेस्टस करतोय असं जगाकडून हिणवलं गेलं. अन हे खरंही होतं कारण भारतात फक्त 118 च्या आत लॅब्स आहेत आणि प्रत्येक 10 लाख लोकांमागे भारत फक्त 7 लोकांच्या टेस्ट करत होता. हो फक्त 7. जिथं साऊथ कोरिया सारख्या अतिशय छोट्या देशातही 650 लॅब्स आहेत तिथं 1.3 बिलियन लोकांच्या आपल्या देशात फक्त 118.
यामुळं सतत अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमधून कॉल्म्सच्या कॉल्म्स भरून यायला लागले.
हे आपल्यासाठी भारतीय म्हणून मान खाली घालायला लावणारं होतं.

खरंतर Mass टेस्ट करण्यात अनेक अडचणी होत्या. 4 ते 5 हजार रुपयांना तेही जर्मनी वरून इम्पोर्ट करावं लागणारं टेस्टिंग किट. त्यात विमानांचं लॉकडाऊन. त्यातून या किट्सचे खूप उशिरा येणारे रिपोर्ट्स. एक एक मिनिट महत्वाचा असताना, 9 ते 10 लागणारे तास. त्यात हजारो वेटिंग रुग्ण. यामुळं रिजलट् यायला 7 ते 8 दिवस लागायला लागले. मग रिपोर्ट येईपर्यंत हे हजारो रुग्ण तोवर ठेवायचे कुठे? त्यात तिथंच थांबल्यामुळे- कोरोना नसलेल्या लोकांना , असलेल्या, पण माहीत नसलेल्या लोकांकडून इन्फेक्शन झालं तर? किंवा हे रिपोर्टची वाट पाहणारे लोक, चार दिवस घरी आले अन त्यांनी इतरांना इनफेक्ट केलं तर?? ही साखळी अशीच वाढत जाणार. हे भारतासाठी लोकसंख्या पाहता अतिषय धोकादायक होतं.

या सगळ्यावर उत्तर होतं एकच. लवकरात लवकर टेस्टस करता याव्या अन त्याहीपेक्षा महत्वाचं की टेस्टसचे रिजल्ट्स लवकर यावे. नाहीतर देश कधीच न ओढून काढता येईल एवढ्या खोल खाईत लोटला जाणार...
पण हे किट्सचं कसं शक्य होईल?

असा एक आजार जो जगभरात हाहाकार माजवतोय त्याच्या साध्या टेस्टस करण्याची सुविधा सुद्धा आपल्याकडे नसावी? ही जगभरातून शरमेची बाब म्हणायला जाऊ लागली... मुंबई, बंगलोर, दिल्ली, कोलकाता, नागपूर, हैद्राबाद इथं सांडतील एवढी टाचोटाच भरलेली माणसं. खेडे गावं अन छोटी शहरं तर सोडूनच दिली. कसं शक्य होणार मग यांचं टेस्टिंग...??

हे प्रॉब्लेम स्टेटमेंट कॅबिनेट, पंतप्रधानापासून ते शास्त्रज्ञ सगळ्यांना माहिती होतं. पण माहिती नव्हतं ते -- सोल्युशन.

देशातल्या अनेक किट्स बनवणाऱ्या लॅब्स हे काम करायचा प्रयत्न करत होत्या. पण फेल होत होत्या... एकजणही यशाच्या जवळ पोचत नव्हता. देशाची लाज वाचवणं अन देशातले लोक वाचवणं अत्यंत गरजेचं असताना अन त्यासाठी किट हातात असणं गरजेचं असताना याची जबाबदारी ओळखून पुण्याच्याही एका लॅबने हे काम हाती घेतलं होतं. पण यात त्यांच्यासाठी एक फार मोठी अडचण होती... साधारणतः कोणतेही आजाराचे टेस्ट किट बनवायला अनेक ट्रायल्स घ्यावे लागतात. सॅम्पल्स अतिशय काळजीपूर्वक हाताळावे लागतात. धोके खूप जास्त असतात अन त्यातून या शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाच्या टीमची लीड होती एक स्त्री... ती काबिल प्रचंड होती. पण हे कठीण काम करायचं असताना ती अवघडलेली होती. ती आपल्या प्रेग्नंनसीच्या 8 व्या महिन्यात होती. खरंतर अशा वेळी जितक्या रिस्कस कमी घेतल्या जातील तेवढं चांगलं असतं. प्रत्येकजण जपायला सांगतं. 98 टक्के स्त्रिया तर घरीच राहणं पसंत करतात. मग अशात तिच्याकडं हे काम कसं सोपवायचं??? आपल्या संस्थेची ही अडचण ओळखून पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे देशाचं भविष्य पणाला लागलंय हे ओळखून एका अदृश्य शत्रूला हरवण्याचा युद्धातलं पहिलं पाऊल टाकायला ही स्वतःहून तयार झाली. ती कदाचित संपूर्ण देशाची जबाबदारी उचलत होती.

रिस्क प्रचंड होतीच यात-
कोणती रिस्क?
तर स्वतःचा, कुटुंबीयांचा, 10 जणांच्या टीमचा अन संपूर्ण देशाचा जीव... हो अशे लाखो करोडो जीव पणाला लागले होते.

ती एवढे सगळे जीव स्वतःच्या खांद्यावर (अन एक न जन्मलेला जीव स्वतःच्या उदरात घेऊन लढणार होती...)

झाशीच्या राणीने लढताना पाठीवर बाळ घेतलं होतं, ही पोटात बाळ घेऊन अजूनच नाजूक परिस्थितीत जगाच्या करोडो वर्ष इतिहासातलं सर्वात अवघड युद्ध लढणार होती...

अक्षरक्ष दिवस अन रात्र न थांबता आठवडे आठवडे हिचं अन या 10 जणांच्या टीमचं काम सुरू झालेलं. प्रचंड हेक्टिक, नाजूक, जबाबदारीचं, धोक्याचं, संयमाचं, परीक्षा पाहणारं, कधी चीड आणणारं, थकवणारं -- खरंतर या कामात कोणती मानवी भावना परीक्षीली जात नव्हती.... सगळ्याच अन त्याही एकत्र.

हे करत असतानाच आता हिला 7 वा संपून आठवा महिना लागलेला. परिस्थिती नाजूक बनत चालली होती... परिणाम कदाचित व्हायचा तोच झाला, एका चेकअपच्या वेळी गायनोकोलॉजिस्टनी प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन्स आहेत म्हणून सांगितलं...
हे ऐकल्यावर आभाळ न कोसळायला कारण काय होतं?

एका बाजूला देश, एका बाजूला कुटुंब, एका बाजूला पोटातला जीव, एका बाजूला सुरू असलेलं हे अवघडातलं अवघड काम...... नॉर्मल स्त्रियाही प्रचंड तणावाखाली असतात, त्यात ही मात्र एवढं मोठं काम करायला निघाली होती...
आता पुढे काय???

जिजाऊ, सावित्रीमाई, इंदिरा गांधी ते कल्पना चावलापासून भारतीय स्त्रियांच्या रक्ताततनं पिढ्यानपिढ्या वाहत आलेला हा वीरतेचा वारसा- हिला तरी हार कशी मानू देणार होता...

हिने खूप विचार केला अन बॉसला अन डॉक्टरला कळवून काम सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला...

काही आठवडे अजून अशेच हेक्टिक गेले अन शेवटी प्रचंड मोठ्या कष्टानं सगळं प्रोपोजल ICMR, FDA आणि CDSCO या सरकारी अप्रुवल बॉडीला पाठवलं गेलं. (हे सगळं कधी तर आपण परवा 18 मार्चला नेहमीसारखे जगातले मरणाऱ्या माणसांचे आकडे मोजत होतो तेव्हा बॅकग्रोउंडमधे सुरू होतं...)

सगळं इतक्या तडकाफडकी की हे सबमिट केलं अन तिला तासाभरातच सिझेरियन साठी दवाखान्यात भरती करावं लागलं... या स्थिततही तिने या किटचे रिजलट्स वेगवेगळे पॅरामिटर्स देऊन प्रत्येक वेळेला accurate येतात की नाही हे 100 वेळेला चेक केलेलं.

18 तारखेला सबमिशन करून, तासाभरात हॉस्पिटल मध्ये सिझेरियन साठी भरती झालेल्या हिच्या पोटातल्या बाळातही तेच भारतीय शूर स्त्रियांचं कणखर रक्त वाहत आलेलं असावं कदाचित, -- म्हणूनच एवढ्या कॉम्प्लिकेशन्स मधूनही पोटातल्या बाळाने जन्मायची जिद्द सोडली नाही.. 19 तारखेला हिला गोडशी मुलगी झाली...

आणि 5 च दिवसात म्हणजे 23 तारखेला हिने अन टीमने बनवलेल्या मायलॅब डिस्कव्हरी कंपनीच्या या किटला सरकारची मान्यता आल्याच सांगावा आला.

हे भारतातलं पहिलं Covid-19 / कोरोना टेस्ट किट म्हणून इतिहासात दाखल झालं......

एका डोळ्यात पहिली लढाई जिंकण्याचं पाणी होतं, तर दुसऱ्या डोळ्यात देश वाचवायच्या धडपडीचं...

हे किट किती जबरदस्त आहे हे यावरून कळेल की,

जिथं 120 दिवस लागतात असं किट बनवायला तिथं
हे किट फक्त 45 दिवसात बनवण्यात आलं. हे एक रेकॉर्ड आहे.

याची किंमत फक्त 1200 रुपये आहे. परदेशी किट 4500-5000 रुपयाला येतं.

या किटचा रिजलट फक्त 2 तासात येतो.
परदेशी किटचा 8 तासात.

या एका किट मध्ये तब्बल 100 टेस्टस होऊ शकतात.

ऍक्युरसी इतकी की तुम्ही 100 सॅम्पल 100 वेळा टेस्ट केले तरी त्याचे रिजलट्स सेम आणि accurateच येणार.
(आणि हे फार अवघड असतं, भले भले इथेच फेल होतात.)

संपूर्ण जगभरात या किट्स निर्माण करण्याची परवानगी आतापर्यंत फक्त 9 कंपन्यांना आहे. त्यात भारतातली ही एकमेव कंपनी.

प्रत्येक महिन्याला आता हे पॅथो डिटेकट नावाचे तब्बल 8 लाख किट्स ही कंपनी संपूर्ण भारतात पाठवू शकते.

हिच्यामुळे देश यासाठी वाचेल की जेवढ्या लवकर आणि अर्ली स्टेज मधे आजार कळेल तितक्या लवकर तो बरा करता येईल...

ही रणरागिणी आहे...---

मिनल डाखवे-भोसले,
रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट चीफ,
Mylabs Discovery.

---

तिला जेव्हा विचारण्यात आलं की तुम्ही एवढ्या सगळ्या रिस्क सोबत असताना का काम करायचा निर्णय घेतला,?
त्यावर त्या हसून फक्त एवढ्याच म्हणतात की,

"देशाची सेवा करायची आहे."
ज्याला जशी जमेल त्याने ती तशी करावी. मला अशी जमली मी अशी केली.

या साध्या वाक्यात खूप मोठा संदेश आहे दोस्तहो...

शेवटी एवढंच की
मिनलने त्या दिवशी 3 गोष्टींना जन्म दिला,

1. तिच्या गोडश्या अन धाडसी बाळाला
2. या रेकॉर्ड बनलेल्या टेस्टिंग किटला
आणि...

3. भारत हे कोरोना युद्ध जिंकेल, या आशेच्या किरणाला...

-
सचिन अतकरे..

https://www.facebook.com/179725075270/posts/10163542726180271/?sfnsn=wiw...

नमस्कार सचिन, डॉ. मीनल यांनी केलेले शोधकार्याचे अभिनंदन.
पोटात बाळ घेऊन 'लढणारी झाशीची राणी' हे शीर्षक जरा अतिरंजित वाटते!
गर्भवती स्त्रिया आपापल्या क्षेत्रात कार्यरत असतात. तसे या ही करत होत्या. त्यांना यश मिळाले ही आनंदाची बाब आहे.
पण
लक्ष्मीबाई लढताना मेली! यामुळे मीनल यांच्या कार्यावर अशुभ प्रभाव पडतोय....

लौंगी मिरची's picture

4 Apr 2020 - 7:04 am | लौंगी मिरची

ते वाक्य फक्त स्त्री अगदि कोणत्याहि परिस्थितीत कणखर असते हे दर्शवन्यासाठी केलेलं असावं , त्यामुळे वाईट प्रभाव कसा पडेल ?
लढताना मेली म्हणुन ?
ये बात कुछ हजम नहि हुई .

लौंगी मिरची's picture

4 Apr 2020 - 7:07 am | लौंगी मिरची

शैलेन्द्र सर तुम्हाला खुप खुप अभिनंदन .
एकदम ‘असो ‘काम केलय तुम्ही
( क्रुपया असो शब्दाचा कुणीहि चुकिचा अर्थ घेऊ नये , त्या शब्दाचा पर्फेक्ट अर्थ त्यांनीच मला सांगितलाय =)) )
जोक्स अपार्ट ..
अभिमान वाटतो तुमचा :)

अर्धवटराव's picture

6 Apr 2020 - 9:00 pm | अर्धवटराव

१३० कर्रोड च्या या जनसागरात कुठल्याही वादळाला पुरुन उरणार्‍या काहि नौका असतात, त्या आम्हाला बरोब्बर किनार्‍यावर आणुन सोडतात.. याची खात्री असल्यामुळेच्ग आम्हि निर्धास्त असतो.

जय हो _/\_

धर्मराजमुटके's picture

8 Apr 2020 - 12:11 pm | धर्मराजमुटके

पुढे काय अपडेटस ? मोठ्या प्रमाणावर किट निर्मिती सुरु झाली काय ? हे किट वापरुन काही पेशंटसच्या चाचण्या झाल्या काय ? माहिती मिळाल्यास येथे लिहा.