विंदा करंदीकरांच्या विरूपिका - (१) २८ जानेवारी १९८०

ॐकार's picture
ॐकार in जे न देखे रवी...
20 Dec 2007 - 10:10 am

प्रस्तावनेतील दोन ओळी -
एखादा भावलेला अनुभव,विचार किंवा अवस्था विरूपाच्या आधाराने काव्यरूप झालेली दिसली की त्या कवितेला मी विरूपिका म्हणतो. याहून अधिक मूल्यामूल्यविवेक करून या संग्रहाला नसते वजन प्राप्त करून देण्याचा मोह मी टाळतो!

- विंदा करंदीकर

गेले काही दिवस मी विरूपिका वाचतो आहे. त्यातल्या विषयांना, कल्पनांना, विचारांना त्या त्या काळचे अथवा बर्‍याचदा कालनिरपेक्ष संदर्भ असल्यासारखे वाटते. वृत्त, जाति, छंद यांच्या वादात न पडता त्यांनी असे का? नक्की काय? कुणासाठी? लिहिले हे प्रश्न प्रामुख्याने मला पडले. त्यातल्या मला आवडलेल्या, कळलेल्या आणि न समजणार्‍याही (!) विरूपिकांना इथे टंकण्याचा मोह आवरत नाही म्हणून हा उद्योग.

२८ जानेवारी १९८०

आजचा दिवस मला साजरा करू दे.

आज आर्. के. लक्ष्मणने लिहिली
आधुनिक भारताची सर्वश्रेष्ठ विद्रोही कविता
अर्धी रेषांत, अर्धी शब्दांत :
"नगरपालिकेने स्वच्छतेपोटी
कचर्‍याचे ढीग इथून हालवले
तर आम्ही भुकेने मरू."

आजचा दिवस मला साजरा करू दे.

कचर्‍यातील अन्नांश उचलून
जिवंत राहण्याचा हा हक्क
आपल्या घटनेत अंतर्भूत आहे का?
तसे नसल्यास,
सर्वजनिक वस्तूची चोरी केल्याबद्दल
आपले सरकार या लोकांवर
फिर्याद घालू शकेल की नाही?
-- हे प्रश्न जाणकारांनी धसाला लावण्यापूर्वी

आजचा दिवस मला साजरा करू दे.

- विंदा करंदीकर

संस्कृतीवाङ्मयकवितावादआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

20 Dec 2007 - 10:49 am | मुक्तसुनीत

फार फार सुंदर कविता. कितीतरी वर्षानी वाचली ही. धन्यवाद.

तुमच्याकडे "अजुनि या विजनातही" आहे का हो ? असेल तर टाका प्लीज ! आणि हो "एक दिवस असा येतो .." ही सुद्धा ! या विरूपिका नव्हेत पण माझ्या लाडक्या आहेत फार !

विसोबा खेचर's picture

20 Dec 2007 - 10:46 pm | विसोबा खेचर

त्यातल्या मला आवडलेल्या, कळलेल्या आणि न समजणार्‍याही (!) विरूपिकांना इथे टंकण्याचा मोह आवरत नाही म्हणून हा उद्योग.

स्वागत आहे!..

कचर्‍यातील अन्नांश उचलून
जिवंत राहण्याचा हा हक्क
आपल्या घटनेत अंतर्भूत आहे का?
तसे नसल्यास,
सर्वजनिक वस्तूची चोरी केल्याबद्दल
आपले सरकार या लोकांवर
फिर्याद घालू शकेल की नाही?
-- हे प्रश्न जाणकारांनी धसाला लावण्यापूर्वी
आजचा दिवस मला साजरा करू दे.

जबरा!!

तात्या.

धनंजय's picture

20 Dec 2007 - 11:46 pm | धनंजय

का?
(मोठे कारण) प्रजासत्ताक शासन मिळून इतकी वर्षे झाल्यानंतर घटनेने उकिरडा कोरून भूक शमवणार्‍या प्रजेला काय हक्क दिला, काय सत्ता दिली? हा प्रश्न पडतो
(तात्कालिक कारण) २६ जानेवारी १९८०ला ३०वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटाने साजरा झाला. २८ जानेवारीला आर.के.लक्ष्मण यांचे ते व्यंगचित्र बहुधा प्रकाशित झाले असावे.

नक्की काय?
माझ्या निबर झालेल्या संवेदनांना, न्यायबुद्धीला कवी विचारतो, की आपण नेमके काय साजरे करत आहोत?

कुणासाठी?
ही कविता माझ्यासाठी लिहिलेली आहे. (किंवा माझ्यासारख्याच संवेदना निबर झालेल्या दुसर्‍या कोणासाठी.)

अवांतर : वृत्त वगैरे. विंदांचा "संहिता" हा काव्यसंग्रह वाचून (त्यात ही कविता आलेली आहे) मला स्पष्ट दिसले की यात ठेकेबद्ध काव्य आहे, पण पुष्कळदा वृत्त सांगता येई ना. म्हणून उपक्रमावर चर्चा केली होती.
http://mr.upakram.org/node/706

प्राजु's picture

21 Dec 2007 - 1:37 am | प्राजु

कचर्‍यातील अन्नांश उचलून
जिवंत राहण्याचा हा हक्क
आपल्या घटनेत अंतर्भूत आहे का?
तसे नसल्यास,
सर्वजनिक वस्तूची चोरी केल्याबद्दल
आपले सरकार या लोकांवर
फिर्याद घालू शकेल की नाही?
-- हे प्रश्न जाणकारांनी धसाला लावण्यापूर्वी
आजचा दिवस मला साजरा करू दे.

काय लिहीले आहे... सह्ह्ह्ही. बरच वर्षांनी वाचली ही कविता.

- प्राजु.

चित्रा's picture

21 Dec 2007 - 7:44 am | चित्रा

वाचलेली नव्हती. खूपच दाहक आहे.