बाप रे बाप..

Primary tabs

ss_sameer's picture
ss_sameer in जनातलं, मनातलं
12 Feb 2018 - 2:37 pm

मला शाळेत एकदा विचारलेले, तुला तुझ्या वडीलांबद्दल काय वाटते? मी सांगितले, "भीती!"

विचारणारा काही क्षण गोंधळून गेला. सारा वर्ग विचारणाऱ्या शिक्षकाच्या चेहऱ्याकडे पाहून फिदीफिदी हसत होता. गोंधळ इतका वाढला की पुछो मत. त्यानंतर बसण्याच्या जागेवर फुटलेल्या फटाक्यांमुळे माझे बसायचे हाल झाले.

हे त्या काळचे उत्तर आहे. सध्या असे कोणी उत्तर दिले तर अमेरिकेत जसा नाईन वन वन ला फोन करतात तसाच पोलिसांना फोन करून वडिलांची(च) चौकशी करायला घेतील.

पूर्वी बापास शाळेत बोलावणे म्हणजे पोराने कोणता तरी अनंत अपराध केल्याची नांदी असे. आजकाल तर पोरांस शाळेत घालणे हाच एक अनंत अपराध होऊन बसला की काय अशी शंका येते.

पिढयांपिढ्या चालत आलेल्या बापां चे किमान तीन पिढ्यांत वर्गीकरण होऊ शकेल. प्राचीन-मध्ययुगीन-अर्वाचीन.

प्राचीन बाप हा मुख्यतः अशिक्षित अडाणी असा असायचा. आपल्याला मोलमजुरी करून रुपये जमा करावे लागतात याची त्याच्या खंगलेल्या पोटाला जाणीव व्हावयाची. त्यामुळे पोराने शिकून "कचेरीत" लागावे इतपत ईच्छा. म्हणून त्यास शिकायला पाठवणारा हा बाप.

त्या पोरांना शाळेत घातले की त्यांचे लग्न लागावयचे ते हिरव्या फोकाशी. शाळेत मास्तरांच्या हातात, घरी बापाच्या. एकूणच काय तर फोक पाचवीला पूजलेलाच. त्यात काही शंका नाही. प्रगती पुस्तक त्यास बहुदा वाचता यायचे नाही. दरसाल पोरगा वरच्या इयत्तेत जातो की नाही इतके हा बाप मास्तराला विचारून गप्प बसायचा. पोरगा वरच्या इयत्तेत गेला तर त्याला नवा सदरा बक्षीसदाखल. जर तो त्याच इयत्तेत राहिला तर घरीच सत्कार समारंभ. तो सोहळा किमान पक्षी पाच सात दिवस तरी पुरे. अशा वेळी पोरे (म्हणजे आमचे बाप) त्यांचा बाप घरात झोपत नाही तोवर बाहेरच "कुटाळक्या" करीत गावभर हिंडत. (असे आम्ही ऐकून आणि वाचून आहोत.)

पोरगा मॅट्रिक ला जाईपर्यंत "कंच्या वरगात?" असे कोणी विचारेस्तोवर बाप इयत्तेत हस्तक्षेप करीत नसे. बऱ्याचदा त्यालाही माहीत नसायचे, दिवटा कुठल्या वर्गात ते.

शाळेत पोराने "दिवे" लावले असे कळले की बस! घरापासून शाळेपर्यंत वरात निघे. मास्तर समोर शिव्यांच्या मंगलाष्टकांसहित यथेच्छ टोलेबाजी होई. एकूणच बापाचा दरारा बाप जाई पर्यंत राही.

या दराऱ्याची खो-खो स्पर्धा आमच्याही नशिबाला आलेली. परंतु बाप थोडा सुशिक्षित असल्याने ही अवस्था थोडी कमी होती.आता घरात फोक शिल्लक राहिले नव्हते त्यामुळे बचावलो.

फटाक्यांचा पूर्वीचा आठवडी बाजार जाऊन त्याची जागा आता "त्रैमासिक" वर्गांनी, आधुनिक भाषेत quarterly meetings ने घेतली. परीक्षांच्या निकालांकडे लक्ष ठेवले जाऊ लागले. परीक्षांचा कालावधी मोक्याचा असे कळल्यानंतर त्या दिवसांत अभ्यास मष्ट झाला. प्रगती पुस्तकांत बापाच्या सह्या लागू लागल्या. यातही पूर्वी बाप लाल शेरा नसेल तर समाधानी राही. पुढे पुढे मार्कंचा आणि टक्क्यांचा लिलाव सुरू होई पर्यंत जीवनमान फार साधे आणि सोपे होते. शाळांची दप्तरे घरांच्या उंबऱ्यांआड कोण कोपऱ्यात पडत, ते सकाळीच जेवणाचा डबा भरेपर्यंत एकटीच पुस्तकवह्यांशी गुलुगुलु गप्पा मारत.

पोरगा शाळेत कोणत्या इयतेत आहे हे आता बापाला माहीत असे. एखादा बाप तुकडी देखील बरोबर सांगे. मास्तरांच्या जागी आता "सरांना" भेटायला जावे लागे. बाप आता पप्पा बाबा या विशेषणांनी ओळखला जाऊ लागला. प्रगतीपुस्तकावरच्या लाल शेऱ्या शिवाय हाणामाऱ्या करायच्या नाहीत असा mutual understanding चा करार झालेला असे. मुळात पोराची आणि बापाची भेट जरी झाली तरी बाप दिवसभर काम करून दमलेला, त्रस्त. कंपन्यांच्या shifts ऍडजस्ट करून आलेला. हा "मध्यमवर्गीय" माणसाच्या उदयाचा आणि स्थिरावण्याचा कालावधी.

पोराचा अभ्यास कमी आहे असे कळल्यावर त्याला शिकवण्या लावल्या जात. बाप पोराच्या अभ्यासात ढवळाढवळ करीत नसे. Give respect take respect असा साधा सोपा करार होता तो. अभ्यासात काही शंका असेल तर "मास्तर" जन्माला आलेले आहेत, उप्स- "सर" जन्माला आलेले आहेत त्यांना विचारा अशी उत्तरे तोंडावर सहज फेकली जात. बाप घरात आल्यावर पोरगं बाहेर जाई असा "रिवाज" त्याही काळात कायम होता. रात्री जेवणात नजरानजर झालीच तर, "आज काय अभ्यास केला?" अशी क्वचित विचारपूस होई. हर एक चुकीवर "ढिशक्यांव" अशी गोळी चालवणे कमी झाले होते. हातातोंडाशी गाठ त्रैमासिक किंवा सहामाहिवर ढकलण्यात आले होते.

हे बापाच्या दृष्टीने सुखाचे दिवस म्हणायचे. या आधिच्या बापांचे विचाराल त्यांचे दिवस आत्यंतिक सुखाचे होते. बाप आणि लेकाच्या सह संबंधात शक्यतो मातेचा हस्तक्षेप होत नसे.

वर्षानुवर्षे जमिनीची झीज होत जाते तसा पिढ्यांपिढ्या बापाचा दरारा कमी होत गेला. सध्याचे पॉप्स आणि डॅड्स याची उत्तम उदाहरणे.

सध्या तर पोरगं घरात आहे हे बापाच्या डोकेदुखीचे कारण असू शकते. पोराच्या शाळेचे घरापासूनचे अंतर बाप आता मीटर्स मध्ये सांगू शकतो. त्याच्या सायन्स च्या पुस्तकांचे तीन वरजन्स आणि experiments त्याला(ही) पाठ असतात. शाळेतल्या सरांची जागा आता teachers ने घेतलेली आहे. वार्षिक सहामाही त्रैमासिक परिक्षांशिवाय बापाला आता surprise टेस्टस, प्रोजेक्ट्स, स्पोर्ट्स डेस, annual days वगैरे गोष्टींवर "फोकस" करायला पोरगा सांगतो.

घरी सावज कधी येणार याची वाट बघत पोरगं दबा धरून बसतं. ज्यादिवशी पोरगं घरी झोपलेलं सापडेल तो दिवस जास्त धोक्याचा. शांततेनंतर येणाऱ्या वादळाची घंटा वाजते. एकतर ते कार्ट आजारी पडून झोपलेलं असतं आणि जर निरागस चेहेरा करून पडलेलं सापडलं तर त्याचा दुसऱ्या दिवशी कोणता तरी प्रोजेक्ट हमखास असतो. मग त्याच्या दप्तराची तपासणी होते. स्वतःच्या मोबाईल ची चेकिंग करूनही काहीच न भेटले तर त्या निरागस वल्लीस उठवावेच लागते. जर त्याने त्याच्या आजोबा किंवा पणजोबाचा अवतार धारण न करता शांत उठून उत्तर दिले तर जमले, नाहीतर....
हरिहरी.... पुढचे प्रसंग वर्णवत नाहीत.

त्याच्या शाळांचे ऍडमिशन हा एक वैचित्र्यांचा प्रकार. त्याव्यतिरिक्त extra curricular activity असतात. कोणी फुटबॉल, स्विमिंग, क्रिकेट आदी खेळात रस काढतात, तर काही मायबाप संगीताच्या शिकवण्यात पोरांस घरून हकलण्याचा प्रयत्न करतात.

यात हेतू एकच असतो की दिवसभराच्या extra activities नंतर पोरगं दमाव आणि रात्री गपगार झोपावं. केवळ गपगार झोपावं नव्हे तर गपगार झोपू द्यावं.

एकूणच काय तर पिढीजात होत जाणाऱ्या बदलात आता भयाची जागा पोरांकडून बापांकडे हस्तांतरित झालेली आहे. अन येणाऱ्या दोन चार दशकांत यांत बापाची बाजू पुन्हा वरचढ करण्यासाठी भरीव संशोधनाची गरज आहे. याची समस्त वैज्ञानिक बांधवांनी नोंद घ्यावी. आम्हा अजाण बापांचे तुम्हीच सुजाण मार्गदर्शक बाप ठरू शकाल अशी आम्हाला आशा आहे.....

प्रकटनविचारमतविनोदसाहित्यिकव्यक्तिचित्रण

प्रतिक्रिया

ज्ञानव's picture

12 Feb 2018 - 2:55 pm | ज्ञानव

पूर्वी तात्या, आबा, दादा हि बाप कॅटेगरी होती. अण्णा, नान, बाबा ही वडील कॅटेगरि झाली. माझा मित्र सकाळी कॉलेजला जाताना उशिरा ट्रेनला पोहोचला कि कारण सांगायचा "काष्ट्याने उठावलेच नाही रे...." पण आम्ही कधी घरी गेलो तर गडी सुतासारखा सरळ असायचा. तात्यांना फुल्टू टरकून...

सुखीमाणूस's picture

12 Feb 2018 - 3:05 pm | सुखीमाणूस

यथार्थ वर्णन केलंय. विशेषता आजच्या काळातल्या वडिलांचे

जेम्स वांड's picture

12 Feb 2018 - 3:38 pm | जेम्स वांड

लैच आवडला लेख!!

मित्रहो's picture

12 Feb 2018 - 8:34 pm | मित्रहो

लेख मस्त आहे. आम्ही कॉलेजला असताना पोर एकमेकाला बापाच्या नावाने हाक मारायचे. ज्याच्या कुणाच्या वडीलांनी आमच्या गप्पा ऐकल्या असतील त्यांची मानसिक अवस्था काय झाली असेल कल्पना न केलेलीच बरी.
बापाची भिती आज कमी झाली हे जरी खरे असले तरी मुलांपासूनच्या अपेक्षा वाढत आहेत.

वकील साहेब's picture

12 Feb 2018 - 8:42 pm | वकील साहेब

वाह एकदम छान लेख. आवडला.
आमच्या लहानपणी आमचे वडील घरी आले की आम्हीही घरी थांबत नसू. किंवा दुसर्या खोलीत जात असू. आता त्याबाबत खूप विचार केला कि आम्ही तेव्हा अस का वागायचो ? तर त्याच कारण अस असायचं की वडिलांना आम्ही त्यांच्या समोर रिकामे बसलेलो दिसलो की ते हटकून एखादे काम तरी सांगायचे किंवा अभ्यासाला तरी बसवायचे. अभ्यास झाला अस सांगितल कि म्हणायचे कि पूर्ण वर्षभराचा झाला का ? काहीच शिल्लक ठेवला नाही का? त्यांनी अस म्हंटल्यावर मुकाट्याने अभ्यासाला बसाव लागत असे. त्यात नंतर नंतर असे कळायला लागले कि ते काम होणे किंवा अभ्यास होणे हा मुद्दा नसून तू माझ्या समोर इतका निवांत बसलासच कसा ? हा तो मुद्दा होता. मग आम्ही भावंडे वडिलांसमोर जायचंच टाळायला शिकलो. मग त्यांना कामाचीही आठवण यायची नाही अन अभ्यासाला हि बसवावंस वाटायचं नाही.
त्या पिढीतल्या सर्व मुलांच हेच कारण असेल का वडिलांसमोर न जाण्याचे कि अन्य काही कारणे होती ?

प्राची अश्विनी's picture

13 Feb 2018 - 9:46 am | प्राची अश्विनी

:):)+१११

मार्मिक गोडसे's picture

12 Feb 2018 - 8:51 pm | मार्मिक गोडसे

मस्त लेख.
आम्ही कॉलेजला असताना पोर एकमेकाला बापाच्या नावाने हाक मारायचे. ज्याच्या कुणाच्या वडीलांनी आमच्या गप्पा ऐकल्या असतील त्यांची मानसिक अवस्था काय झाली असेल कल्पना न केलेलीच बरी.
असले उद्योग कधी कधी अंगाशी यायचे.
http://www.misalpav.com/node/28534

नाखु's picture

12 Feb 2018 - 9:06 pm | नाखु

झाल्यानंतर बापाचे हाल आणि पोरांचे ताल खर्या अर्थाने समजतात.
आपण वाजवीपेक्षा जास्तच वांड होतो का वाजवीपेक्षा जास्तच शामळू ह्याची नैसर्गिक तुलना करून आपलाच लोच्या होतो ते वेगळेच.
लेख आवडला

पितृप्रेमास पारखं होऊनही "बाप"पदाचे आंबटगोड पदार्थ अनुभवत असलेला नाखु पालकायनी

पद्मावति's picture

12 Feb 2018 - 10:06 pm | पद्मावति

मस्तं लेख.

ज्योति अलवनि's picture

13 Feb 2018 - 10:50 am | ज्योति अलवनि

झक्कास

पैसा's picture

13 Feb 2018 - 4:33 pm | पैसा

मस्त! खुसखुशीत!

हतोळकरांचा प्रसाद's picture

16 Feb 2018 - 4:47 pm | हतोळकरांचा प्रसाद

आवडला लेख!