पैठणी दिवस भाग-२

Primary tabs

गुल्लू दादा's picture
गुल्लू दादा in जनातलं, मनातलं
12 Aug 2017 - 6:33 am

ग्रामीण रुग्णालय पैठण येथे आम्हाला एक महिना सेवा द्यायची होती. राहण्यासाठी 2 खोल्या तेथेच उपलब्ध करून दिलेल्या होत्या. सामान टाकून, हात-पाय धुवून आम्ही जवळपास दुपारी 4 च्या दरम्यान डॉ.सचिन सर यांकडे हजेरी लावली. आम्हाला महिन्याचे वेळापत्रक देण्यात आले. 2 जणांना सोबत महिनाभर काम करायचे होते. माझा सहकारी होता सुरज.

संध्याकाळी खुप उत्सुक होऊन धरणावर फिरावयास गेलो असता असे अप्रतिम दृश्य नजरेस पडले. कितीही पाहिले तरी मन भरत नव्हते. हा क्षण नजरकैद करण्यासाठी आपसुकच आमचे कॅमेरे बाहेर येऊन क्लीकक्लीकाट सुरू झाला. पाणी आणि आकाश इतके बेमालूमपणे एकमेकांत गुंफले होते की, त्यांना विभिन्न करणे केवळ अशक्य.

वेळापत्रकानुसार 2 जणांना अपघात विभागात 24 तास आपल्या कामावर हजर रहावे लागे. पैकी रात्री रुग्ण आला तर मामा (वर्ग 4 कर्मचारी) खोलीवर बोलावण्यास येई. उर्वरित सर्वांना बाह्यरुग्ण विभागात (ओ. पी. डी.) 2 वेळा जावे लागे. सकाळी 10-1 आणि दुपारी 2-4 हे कामाचे तास सोडले तर इतरवेळी तुम्ही काहीही करू शकत होतात. कामाच्या वेळी सुद्धा आम्ही बरीच दिरंगाई केली ती गोष्ट वेगळी म्हणा.:) एका वेळी बाह्य रुग्ण विभागात 3 डॉक्टर पुरेसे होते. फक्त शुक्रवारी बाजार असल्यामुळे तुफान गर्दी राहायची. तेव्हा झाडून सर्वांना उपस्थित राहावे लागे.

रुग्णालयाचा परिसर भव्य-दिव्य आहे. वापरात नसलेली पडीक जागा चहूकडे आहे. समोरच छोटासा बगीचा फुलवला आहे. तेवढाच काय तो पडीक जागेचा सदुपयोग. आवारातच पण रुग्णालयापासून राखीव जागेवर शवविच्छेदन कक्ष आहे. रुग्णालयाची संपूर्ण इमारत एक मजली आहे. एव्हाना महिन्याभरात त्याच्या गच्चीवर जाण्याचा रस्ता आम्हाला सापडला नाही. :) रुग्णालयाला आपली अशी हक्काची एक रुग्णवाहिका आहे. पण संपूर्ण महिनाभर आमच्यापैकी कुणीच तिचा आवाजही ऐकला नाही. दोन महिन्यांपासून काहीतरी बिघाड झाल्यामुळे ती बंद होती. चालकाने तक्रार करूनही वरिष्ठांनी त्याकडे उघडपणे डोळेझाक केली होती. त्यामुळे अपघाती रुग्णांनाही स्वखर्चाने रुग्णालयात यावे लागे. गरीब रुग्णांची स्वखर्चात हेळसांड होत असे. माणसाने काहीही असावे फक्त गरीब असू नये. गरीबी हाच मानवतेला मिळालेला सर्वात मोठा शाप आहे असो. रुग्णवाहिका बंद पडल्यामुळे तिच्या चालकाकडे भरपूर वेळ होता. त्यांचं नाव होतं ' इरफान भाई '. याच इरफान भाई सोबत नंतर महिनाभर आम्ही गप्पांचे सत्र रंगविले, पैठण आणि आजूबाजूचा परिसर पालथा घातला. त्यांच्या गप्पीष्ट स्वभावामुळे कधीच कंटाळवाणे वाटायचे नाही. 'पठाण' म्हंटल की त्यांची छाती इंचभर फुगायची. मग ते आपल्या सोबत कुठेही यायला तयार होत. त्यांकडे एक दुचाकी होती. मग त्यांना घेऊन आम्ही फिरायला जायचो. त्यांना सर्व पर्यटन क्षेत्रे पण माहीत असल्यामुळे कधीही अडचण आली नाही. रुग्णालयाची इत्थंभूत माहिती त्यांना होती.या माणसाकडे रुग्णालयाची आणि निगडित कर्मचाऱ्यांची गुपित आहेत. ती आम्हाला पण माहीत आहेत. दुसऱ्याची गुपित कधीच उघडी करू नये, ती गुपितच राहू द्यावी म्हणतात. म्हणून मी ती गुपितच राहू देतो, नाही का..! त्यांनी आम्हा सगळ्यांची टोपण नावे पाडली होती. सुरजला छोटे भाई, विवेकला बडे भाई, अक्षयला अल्लू, सुधीरला लाला, सुमितला डीन सर, मी बऱ्यापैकी मिश्या वाढवल्यामुळे मला बाजीराव. :)

इथे येऊन एक आठवडाही उलटला नाही, तर 9 नोव्हेंबर या दिवशी मोदी सरकारने अचानक नोट बंदीचा निर्णय जाहीर केला. तेव्हा तो कसा फायद्याचा, काळापैसा, त्याचे परिणाम काय होणार वगैरे वगैरे वर चर्चासत्रे झडली.तेव्हा मोदींच्या निर्णयाचे खरोखर कौतुक वाटले होते(अजूनही वाटते यात काही शंकाच नाही). पण हळूहळू आम्हाला पैशांची चणचण भासू लागली. नगद कुणाकडेच नव्हती. मोठमोठाल्या महानगरांचे तर हाल सुरू होते तेथे खेडं वजा शहराची काय गत..! ए.टी.एम. आणि बँकांसमोर भली मोठी गर्दी. गर्दीमध्ये उभं राहायचं म्हणजे 2-4 घंटे गेलेच समजा आणि ड्युटी सांभाळून तर ती खरंच तारेवरची कसरत व्हायची. काही लोक 2-4 ए.टी.एम. कार्ड सोबत घेऊन येत आणि प्रत्येकातून पैसे काढत. रांगेत उभे असलेल्यांना तसेच ताटकळत उभे राहावे लागे. ते 2-4 तास खर्च करूनही नगद हातात पडेल याची शाश्वती नसायची. मधातच ए.टी.एम. मधली नगद संपायची. तेव्हा मात्र फार हिरमोड व्हायचा. काही लोक तर खेड्यापाड्यातून यायची. त्यांची फार आबाळ व्हायची. त्यात बाई-माणूस असेल तर अजूनच गळचेपी. पैश्याच्या बाबतीत ते दिवस फार हलाखीचे होते आणि हो जर पैसे निघालेच तर अख्खी 2000 रु. ची नोट हाती पडे. त्याचे सुट्टे करणे म्हणजे ' वाळूचे कण रगडून तेल काढण्यासारखं होतं '. औरंगाबाद वरून काही मित्र पार्टीसाठी येणार होते त्यांना नगद घेऊन यावे लागले होते. इतकी तंगी आली होती. पण म्हणतात ना काळ हा सर्वश्रेष्ठ असतो त्याचप्रमाणे यथावकाश सर्व सुरळीत होत गेले. या निर्णयामुळे चोखंडभर अनुभवाची, आयुष्याच्या शिदोरीत भर पडल्यामुळे मोदी साहेबांचे आभार. खरंच हा निर्णय खूप काही शिकवून गेला.

बाह्यरुग्ण विभागामध्ये तपासणीसाठी गेलो असता भरपूर रुग्ण आलेले होते. मी जाम खुश झालो, वरून मामा सगळ्यांना ' सरका, सरका डॉक्टर साहेब आले ' म्हणत होते. मला खूपच गुदगुल्या होत होत्या. नवशिखा होतो ना. खूप छान वाटलं तेव्हा. सर्व रुग्ण संपल्यावर मामा हळूच मला म्हणतात, ' सर 50 रु. द्या ना. आठवडी बाजार आहे ना आज, उद्या लगेचच देतो. ' म्हंटल विसरले असतील आज पैसे आणायचे, म्हणून मी लगेचच काढून दिले. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत आमच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की, येथील कुठल्याही कर्मचाऱ्याला पैसे देऊ नका. तुम्हाला ते मागतीलच कधीना कधी. ते दारू पितात त्या पैशाची. माझी जीभ नकळत दाताखाली आली. मामांनी पद्धतशीरपणे माझा ' मिरची मुर्गा ' बनवला होता. सरांनी म्हंटल्याप्रमाणे मामा दुपारच्या सुट्टीत टूल होऊन आले होते. मामाचा पैसे वापस करण्याचा ' उद्या ' कधीच येणार नव्हता. त्या दिवशी पासून मामांनी, ' सरका,सरका.... ' म्हंटल की मला समजायचं की आज आठवडी बाजार आहे. :) मी पण उडवा-उडवीची उत्तरे देऊन नंतर कधीही त्यांना दारू पाजली नाही.

बाह्यरुग्ण विभागात गर्दी आठवड्यातून फक्त 2 दिवस व्हायची. सोमवारी आणि शुक्रवारी. रविवारी सुट्टी असल्यामुळे, सोमवारी आणि शुक्रवारी आठवडी बाजारामुळे. बाजारात आलेला माणूस रुग्णालयात चक्कर टाकल्याशिवाय राहत नाही. आलेल्या पैकी बरेच जण एकच गोष्ट विचारणार, ' खोकल्याची बाटली आहे का? ' व्यसन लागलंय लोकांना खोकल्याच्या बाटलीच. बाटली असली तर खोकला असो व नसो ते बाटली घेऊनच जाणार. आणि त्यांना जर आपण हटकले की, ' तुम्हाला तर खोकला वाटत नाही. ' तर लगेच खोकलून दाखवायला पण मागे पुढे पाहत नाहीत. :) अशा वागण्यामुळे शासकीय औषधांचा 6 महिन्यांचा पुरवठा 2-3 महिन्यांत संपतो आणि खरा गरजवंत वंचितच राहतो. आजही ग्रामीण रुग्णालयाची दयनीय अवस्था आहे. अतिशय तुरळक गोळ्यांवर रुग्णालय चालवावे लागते. आवश्यक तपासण्या होत नाहीत. या परिस्थितीस राजकारणी,डॉक्टर्स आणि तुम्ही-आम्ही सर्वसामान्य लोक पण जबाबदार आहोत. त्या बद्दल विस्तृत लिहेन कधीतरी.

दुपारच्या सत्रात एक सेवानिवृत्त वाटेल असा मनुष्य बाह्यरुग्ण विभागात अवतरला. त्याने खिश्यातून भलीमोठी यादी काढली. त्यामध्ये गोळ्यांची नावे होती. ज्या गोळ्या उपलब्ध होत्या, त्या तो घेऊन जाणार होता. आम्हाला नवलं वाटले. त्यांना म्हंटले, ' रुग्ण आणल्याशिवाय एकही गोळी मिळणार नाही. ' ते साहेब म्हणाले, ' या आधीचे डॉक्टर तर देत होते. ' म्हंटल 'ते देत असतील आम्ही नाही देणार '. त्यांना म्हंटल, ' तुम्ही असं का करता पण, आजारी पडण्याच्या आधीच का साठवून ठेवता गोळ्या. ' ते म्हणाले, ' जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा कधीच येथे औषध उपलब्ध नसते म्हणून पहिलेच घेऊन जातो. ' त्यांना समजावत आम्ही सांगितले, ' काका अशी साठेबाजी जर केली तर कशी पुरणार औषधी.' पण तरी या बाबाच काही समाधान झालेलं आम्हाला दिसलं नाही. पण हा धक्कादायक प्रकार होता. साठवून ठेवलेल्या गोळ्यांची कालबाह्य तारीख (expiry date) कशी कळणार. कारण सरकारी गोळ्या ह्या अखंड पट्टी मध्ये नसतात. वितरणास सोप्या जाव्या म्हणून कापून ठेवलेल्या असतात. अहो तारखेचं काय घेऊन बसलात कधी कधी गोळीच नाव बघायलाही महत्प्रयास पडतात. अशावेळी तापेला संडासची गोळी घेतली जाण्याची शक्यता असते. अतिमात्रा, विषबाधा या घटनाही नाकारता येत नाहीत. औषधी ह्या योग्य प्रमाणातच दवा म्हणून काम करतात अतिमात्रा हे विषचं.

बाह्यरुग्ण विभागात सकाळी 11 च्या दरम्यान एक रुग्ण आला. घसा खरखर करतोय, खोकला आणि ताप अश्या त्याच्या तक्रारी होत्या. आवश्यक ती तपासणी केल्यानंतर त्याला यथोचित गोळ्या लिहून देण्यात आल्या. ' यातील काही गोळ्या बाहेरून घ्याव्या लागतील. आपल्या येथील संपल्या आहेत.' यावर त्याने, ' सरकारी दवाखाना असून गोळ्या कश्या नाहीत. ' म्हणून कांगावा सुरू केला. तो ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. त्याला आमच्या सर्वेसर्वा डॉ.सचिन सर यांकडे पाठवण्यात आले. त्यांकडे ही तो आक्रमकच होता. सरांनी ' सरकारी औषधांचा पुरवठा मर्यादित असतो. ' असे सुनावल्यावरही साहेब हुज्जत घालू लागले. ' मी पत्रकार आहे आणि तुमचे घोटाळे बाहेर काढतो ' असे म्हणू लागले.सरांनी त्यास ओळखपत्र मागितले. त्याकडे ते नव्हते. आता आक्रमक होण्याची पाळी सरांची होती. ' ओळखपत्र दाखवल्याशिवाय माझ्याशी बोलायचं नाही आणि तुला काय छपायचं ते छाप ' असं म्हणून त्याच्या अब्रूची लखतरे वेशीला टांगली. परत कधी मात्र तो पत्रकार दिसला नाही.

ग्रामीण रुग्णालयात काम करत असताना अशा लोकांना सामोरे जावेच लागते. समाजसेवेच्या नावाखाली बरेच राजकारणी येऊन रुबाब झाडून जातात, पत्रकार खोट्या बातम्या छापण्याच्या धमक्या देतात. पोलीस दादा पण ऐटीत असतात. आपण प्रामाणिकपणे काम करत असता, कुणी येऊन जर रुबाब झाडत असेल तर खरंच डोक्यातून संतापाची तिडीक जाते. कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता रांगेत न थांबता थेट येतो. आपला वशिला सादर करतो. बाकी रांगेत असणाऱ्या रुग्णांना आशा असते की, डॉ.साहेब तरी म्हणतील ' रांगेत लागा ' म्हणून. पण अशा वेळी बाचाबाची आणि हमरी-तुमरी टळावी म्हणून आम्हाला निमूटपणे गरिबांच्या अपेक्षांचं ओझं वाहत, काम करत रहावं लागतं. नेते आणि कार्यकर्ते यांना दादागिरी करण्याची संधीच हवी असते. पण आपल्याकडे त्यांच्या तोंडोतोंडी लागण्याइतका वेळही नसतो आणि आपल्याला ह्या गोष्टी शोभत पण नाहीत. :) प्रसंगी निडर होऊन काम करावे लागते. अशा लोकांना वठणीवर आणण्यात पैठणचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन सर यांचा हातखंडा आहे. रुग्णालयाच्या कुठल्याही अधिकाऱ्यापेक्षा त्यांचे नाव जनमाणसांत प्रचलित आहे. प्रत्येक रुग्णाला आपल्याला सचिन सरांनी तपासावे असे वाटते. त्यांच्या नावाचा दाखला घेऊन रुग्ण येतात. विशेष म्हणजे त्यांना कामाचा कुठलाही कंटाळा नाही. सर्व प्रकारचे रुग्ण ते हाताळतात. ते रुजू झाल्यापासून रुग्णांच्या रेफर करण्याचे प्रमाणही कमी झालंय. खेडेगावात विषबाधा, आत्महत्या, मारामाऱ्या, सर्पदंश यांचे प्रमाण अधिक आहे. ही प्रकरणे ही ते लिलया हाताळतात. जमावालाही नियंत्रित ठेवतात. अश्याच कार्यक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांची ग्रामीण रुग्णालयांना आवश्यकता आहे.

वैद्यकीय क्षेत्रामध्ये सेवा देताना रुग्णांच्या स्वास्था प्रमाणे डॉक्टरांना स्वतःच्या स्वास्थाचीही काळजी घेणे आवश्यक ठरते. बऱ्याचदा आवश्यक ते संरक्षण न वापरल्यामुळे रुग्णांकडून डॉक्टरांकडे रोग संक्रमित होतो. समाजात बरीचशी उदाहरणे आजघडीला आहेत. काहीजण तर काळाच्या झडपेने अदृश्य झाले आहेत. ह्या मधे प्रामुख्याने क्षयरोग, कावीळ, एड्स(सुई टोचल्यामुळे, गैरसमज नसावा☺)यांचा समावेश आहे. हा खूप मोठा विषय आहे. या विषयी पण नंतर कधी तरी. :)

बाह्यरुग्ण विभागामध्ये सकाळील सत्रात नियमित 70-75 वय वर्षांच्या आजीबाई येतात. सडसडीत शरीरयष्ठी, जाड भिंगाचा चष्मा, वयाने साथ सोडल्यामुळे थोड्या वाकत काठी टेकवत टेकवत त्या येतात. उपस्थित असणाऱ्या डॉक्टरला त्या एकच तक्रार करतात, अशक्तपणा असल्याची. त्यावर गोळ्या घेण्यास त्या ठाम नकार देतात. आणि सलाईन लावायची विनंती करतात. सलाईन वर त्यांचा खूप विश्वास आहे. त्यांचाच काय पैठणची जनताच सलाईन वर प्रेम करते. सलाईनमध्ये शरीराला आवश्यक असणारे घटक असल्यामुळे ते रुग्णांना तरतरी आणते, त्यांना खूप छान वाटत. पण सलाईन मध्ये कोणत्याही रोगाचे मुळासकट उच्चाटन करण्याची क्षमताच नाही. ते एक औषध देण्याचे माध्यम म्हणून वैद्यकीय क्षेत्र त्याचा वापर करतं. सलाईन हा कुठल्याही आजाराचा परिपूर्ण इलाज नाही. याची जाणीव त्यांना नसते. दारू पिणारे पण भरपूर आहेत. दिवसभर ढोर मेहनत करायची आणि रात्री दारू प्यायची. नशेत असल्यामुळे ते न जेवताच झोपतात. परिणामी रक्तातील शर्करा कमी होते. मग दुसऱ्या दिवशी चक्कर येणे, अशक्तपणा येणे अशा तक्रारी सुरू होतात. अशा रुग्णांना सलाईन लावल्यावर तरतरी येते आणि सलाईन त्यांना माय-बाप भासू लागते. अशा रुग्णांना सलाईन न देता (परिस्थिती बघून) 'वेळेवर आहार घ्या' असा सल्ला देणे उचित ठरते. पण तेथील जनता ज्या डॉक्टरने सलाईन नाही दिली तो चांगला नाही असा निष्कर्ष काढून मोकळी होते. त्यांचा पण काय दोष म्हणा. येथे काम करणाऱ्या आधीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना सलाईनच्या तरतरीची सवय लावली असणार. शेवटी काय रुग्णांना ताबडतोब बरे वाटण्याशी मतलब मग त्याचा मार्ग कोणताही असो. :)

क्रमशः

लेखअनुभवमाहितीकथाऔषधोपचारशिक्षण

प्रतिक्रिया

गुल्लू दादा's picture

12 Aug 2017 - 6:38 am | गुल्लू दादा

गुल्लू दादा's picture

12 Aug 2017 - 6:39 am | गुल्लू दादा


बाजीराव

गुल्लू दादा's picture

12 Aug 2017 - 6:41 am | गुल्लू दादा
गुल्लू दादा's picture

12 Aug 2017 - 6:40 am | गुल्लू दादा
गुल्लू दादा's picture

12 Aug 2017 - 6:40 am | गुल्लू दादा

चांगलं लिहिलंय.. अनुभव मस्त आहेत.. अजून येऊ द्या..

खूप छान अनुभव आहेत. कळकळीने लिहिलंय. सरकारी वैद्यकक्षेत्राची अवस्था पाहता तुमच्यासारखे निस्पृह डॉक्टर पाहून मनाला आधार वाटतो. अजून लिहा. पुभाप्र.

संजय पाटिल's picture

12 Aug 2017 - 12:26 pm | संजय पाटिल

+१
पु.भा.प्र.

गुल्लू दादा's picture

12 Aug 2017 - 1:03 pm | गुल्लू दादा

धन्यवाद एस..!

ज्योति अलवनि's picture

13 Aug 2017 - 12:30 am | ज्योति अलवनि

खुपचण लिहिलं आहात. पु. भा. प्र

राघवेंद्र's picture

13 Aug 2017 - 1:59 am | राघवेंद्र

मस्त लिहिले आहे.
पु, भा प्र.

अत्रे's picture

13 Aug 2017 - 7:11 am | अत्रे

छान लिहिलं आहे.

महेन्द्र ढवाण's picture

13 Aug 2017 - 4:12 pm | महेन्द्र ढवाण

छान लिहिलं आहे.

धर्मराजमुटके's picture

13 Aug 2017 - 7:03 pm | धर्मराजमुटके

आज खुप दिवसांनी फक्त जुनेच लेख वाचायचे ठरवले होते. तुमचा लेख तुलनेने नवाच होता आणि वाचायचा राहुन गेला होता. सध्याच्या सुमार धाग्यांच्या पार्श्वभुमीवर तुमचे लेखन वाचणे हा एक चांगला अनुभव होता.
क्रमशः वाचून तर अतिशय जास्त आनंद झाला. इथे लिहित रहा. चांगल्या लेखांची आणि लेखकांची मिपाला आणि आमच्यासारख्या वाचकवर्गाला गरज आहे.

गुल्लू दादा's picture

13 Aug 2017 - 8:09 pm | गुल्लू दादा

धन्यवाद धर्मराजमुटके.☺

पैसा's picture

13 Aug 2017 - 8:48 pm | पैसा

सरकारी दवाखान्याच्या परिस्थितीवर एका डॉक्टरचे टिपण आजच फेसबुकवर वाचले आहे. एकूण परिस्थिती अवघड आहे. असल्या पेशंट्सना तोंड देणे हे फार धीराचे काम आहे. लहान वयात फार मोठा अनुभव तुम्हाला इथे मिळाला म्हणायचा!

गुल्लू दादा's picture

13 Aug 2017 - 11:46 pm | गुल्लू दादा

भ्रष्टाचार आणि राजकारण यात भरडून निघत आहेत सरकारी यंत्रणा...कुंपणच शेत खात आहे.☺

मस्त लिहिलंय मला माझे पैठणी दिवस आठवले तुमच्या बाजूच्या असलेल्या दातांच्या दवाखान्यात पोस्टींग केलेली आहे नुकतीच तसेच शुक्रवारी असणाऱ्या गर्दीचा चांगलाच अनुभव आहे

गुल्लू दादा's picture

13 Aug 2017 - 11:43 pm | गुल्लू दादा

आनंद झाला..तुम्ही पण पैठण ला होतात हे ऐकून...तुमचे अनुभव पण येऊ देत.