नवीन नियमावली

अॅस्ट्रोनाट विनय's picture
अॅस्ट्रोनाट विनय in जनातलं, मनातलं
14 Mar 2017 - 2:40 pm

प्रशासनातर्फे नवीन नियमावली जारी करण्यात येत आहे. ती वाचून ध्यानात घ्यावी. काही अडचण, शंका असल्यास या धाग्यावर चर्चा करावी.

बदलत्या काळात टिकून रहायचं असेल, प्रगती साधायची असेल तर बदल आवश्यक असतात. आजकाल सगळ्याच क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत, जुन्या कार्यपद्धती मागे पडून नवनवीन संकल्पना समोर येत आहेत. म्हणून आपणहीआपल्या जुनाट कार्यपद्धतींमध्ये सुधारणा करत आहोत.

१. सबंध भारतात झाडांची संख्या कमी होत चालली आहे. त्यातल्या त्यात आपल्या बांधवांना प्रिय वड, पिंपळ, चिंच अशी झाडे तर दुर्मिळच म्हणावी लागतील. त्यामुळे निवाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अमेरिकेतील ब्लडी मेरी नावाच्या भगिनींनी शेकडो वर्षांपूर्वी झाडांवर राहण्याचा विचार केला होता पण नंतर तो विचार त्यागून त्यांनी आरशात रहायला सुरुवात केली. आज तिकडे त्या खुप प्रसिद्ध झाल्या आहेत. कुणीही बाथरूममधल्या आरशात पाहून तिनवेळा ब्लडी मेरी म्हटल्यास त्या अवतीर्ण होतात आणि त्यानंतर आपलं कर्तव्य बजावतात. त्यांच्याकडून ट्रेनिंग घेण्यासाठी मंडळाने चार हडळींना अमेरिकेत पाठवलं होतं. त्या सगळं तंत्र शिकून परत आल्या आहेत आणि इतरांना हे प्रशिक्षण देणार आहेत. येत्या अमावस्येपर्यंत सर्व हडळ भगिनींनी जवळच्या स्मशानकार्यालयात नोंदणी करावी. त्यांना आरशात निवास करण्याचं प्रशिक्षण दिलं जाईल.

पण आपल्याकडे अजूनही बऱ्याच लोकांकडे बाथरूम नसतात, असले तरी त्यात आरसे नसतात. म्हणून हडळी कुठल्याही आरशात राहू शकतील अशी मुभा देण्यात आली आहे. त्यांची मुलं वाहनांच्या साइडग्लासमध्ये राहतील/दिसतील.

हडळी राहत असलेली झाडं बेघर वेताळ आणि मुंजा यांना दिली जातील.

२. दोन महिन्यांपूर्वी भु. आशा पुराणिक यांचं आपल्या संघटनेत आगमन झालं. आल्याआल्या त्यांनी स्त्रीभुतांचे काही प्रश्न मांडले. ते असे –
प्रादेशिक आणि हिंदीभाषिक वाहिन्यांवरील भुतांच्या मालिका, भयचित्रपट यांच्यामधे दाखवण्यात आलेली ८० टक्के भुते स्त्रिया असतात. यामुळे मेल्यानंतर फक्त स्त्रियांचेच भुतं बनतात, त्याच सर्वाधिक त्रासदायक असतात असा मर्त्य मानवांमध्ये गैरसमज पसरत आहे. शिवाय त्यांचा पोशाखही पांढरी साडी, लांब केस, विदाऊट सॅंडल उलटे पाय अशा जुनाट प्रकारचा असतो. ह्या गंभीर बाबींवर मंडळाच्या वार्षिक मिटींगमध्ये चर्चा करण्यात आली. असे गैरसमज पसरवणाऱ्या दिग्दर्शकांना झपाटण्याचे आदेश झोटिंगांना देण्यात येत आहेत.

३. आजपर्यंत आपण कुठल्याही मनुष्यावर हमला करून भक्ष मिळवत असू. पण असं करणं धोक्याचं आहे हे संशोधनाअंती सिद्ध झालं आहे. व्यसनाधीन, चुकीच्या आहाराला बळी पडलेले, व्याधीग्रस्त भक्षचं मास किंवा रक्त ग्रहण केल्यामुळे आपली ताकद कमी होत चालली आहे. त्यामुळे भक्ष मिळवण्यासंबंधी काही नियम लक्षात ठेवावेत –
बिअरबार, डान्सबार, दारूचे गुत्ते, जुगारांचे अड्डे टाळावेत. नशेची आवड असणाऱ्यांची पावले तिकडे खेचली जाऊ शकतात पण त्यांनी संयम बाळगावा. फास्ट फूड सेंटरला नियमित भेट देणाऱ्यांच्या नांदी लागू नये.
व्यायामशाळा, फिटनेस सेंटर, योगा आणि नॅचरोपॅथी केंद्र यांच्यावर नजर ठेवावी. बाजारात कारले खरेदी करणारेसुद्धा निरोगी असण्याची शक्यता आहे. फिल्मसिटी आणि मॉडेलींग कार्यक्रमांच्या आसपास सर्वोत्तम दर्जाचं भक्ष मिळू शकेल.

४. सर्वांनी हमला करतांना किंवा फक्त भीती दाखवायला गेले असतांना उत्तम पोशाख करून, निटनेटक्या पद्धतीने जावं. मागे एका वर्तमानपत्रात ‘घाणेरड्या सुळ्यांच्या भुतांनी केला हमला’ अशी बातमी छापून आली होती. अशा गोष्टींमुळे आपलं नाव खराब होतं, नाहीनाही ते गैरसमज पसरतात. इथून पुढे कुणीही गबाळ्या वेषात शिकारीला बाहेर पडणार नाही. तसं आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल.
आंतरजालाचा आधार घ्या, फॅशनला वाहिलेल्या घोस्ट वेबसाईट्सवरून काही टिप्स घ्या.
( माहिती: सुळे शुभ्र करणारं कवटीमंजन स्मशानबाजारात आलं आहे. )

५. वंपायर लोकांना सूर्यकिरणांपासून वाचवणाऱ्या आदित्यरक्षक अंगठ्या आयात करण्यात आल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या प्रमुख कब्रस्थानात त्या उपलब्ध आहेत. प्रत्येक वंपायरने दहा आत्मे डिपॉझीट ठेवून त्या घेऊन जाव्यात. येत्या माघी अमावस्येनंतर ज्यांच्याकडे अंगठ्या असणार नाहीत त्यांचं वंपायरत्व काढून घेण्यात येईल.

६. मोठाले गुन्हेगार पकडण्यातलं पोलीस आणि तपासयंत्रणेचं अपयश लक्षात घेता प्लँचेटला सुगीचे दिवस येतील असा अंदाज आहे. प्लँचेटद्वारे बोलावलेल्या आत्म्यांना नियोजित ठिकाणी लवकर पोहोचता यावं यासाठी जलद वाहतूकव्यवस्था उभारण्यात येत आहे, शिवाय प्लँचेट जागरूकता मोहिमही सुरू करण्यात येणार आहे. याकामी ज्यांना स्वयंसेवक म्हणून काम करायचं आहे त्यांनी नजीकच्या ब्रह्मराक्षसाशी संपर्क साधावा.

७. देणगी संदर्भात नियम बदलण्यात आले आहेत. यानंतर स्वहस्ते किंवा मध्यस्थामार्फत दिलेल्या देणग्या स्वीकारल्या जाणार नाहीत. झपाटलेल्या कुरियरमार्फतच त्या पाठवाव्यात. आपली मदत योग्य हातांत पडावी यासाठी केलेली ही तजवीज आहे. मध्यस्थ तुम्हाला फसवू शकतात आणि तुमचं रूप घेऊन देवदूत आम्हाला.

बेवारस प्रेतात्म्यांसाठी उघडण्यात आलेलं अनाथालय, शिकार करायला नकार देणाऱ्या बालात्म्यांसाठीचं बालसुधारगृह, तेरवीनंतर पुढे काय? या प्रश्नाने चाचपडणाऱ्यांसाठीचं मार्गदर्शन केंद्र इत्यादी समाजोपयोगी कार्यांकरिता तुमची देणगी वापरण्यात येईल.

८. प्रत्येक विभागातील ३० टक्के भुतांनी शहरात स्थलांतरीत होणं बंधनकारक करण्यात आलं आहे. शहरात अंधाऱ्या जागा कमी असल्या तरी झपाटण्यासाठी अंधारी मनं भरपूर सापडतील.

९. विर आणि निमा हे क्षत्रिय समाजातील भुतांचे प्रकार होते. पण आजकाल शुद्ध क्षत्रिय वंश उरला नसल्याने ह्या दोन्ही भुतजातींचा दर्जा काढून घेण्यात येत आहे. सध्याच्या विर आणि निमा यांना त्यांच्या आवडीच्या कुठल्याही भुतजातीत मोफत प्रवेश मिळेल. इतर जातीच्या भुतांचा दर्जा खालीलप्रमाणे अबाधित ठेवण्यात आला आहे –

ब्रह्मराक्षस व मुंजा : ब्राह्मणांची भुतं
देवचार आणि चेटकीण/डाव : मागासवर्गीयांची भुतं
खविस : मुसलमानांचं भुत
झोटींग : खारवी किंवा कोळी समाजातील भुत
खुन्या : हरिजन समाजातील भुत

मनुष्यजातीच्या मराठा आरक्षणाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता मराठा समाजातील भुतांनीसुद्धा वेगळ्या भुतप्रकाराची मागणी केली आहे. याबाबत चर्चा सुरू आहे.

१०. लग्न न होता मेलेल्यांसाठी वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे.

########################
.............. जय नरकासुर.......
########################

द्वारा
स्मशानवासी विनय खंडागळे
वय: ७७८ वर्षे (मृत्यूपश्चात)
अध्यक्ष, विदर्भ भुतमंडळ

मुक्तकशब्दक्रीडाविनोदप्रकटनविचारप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

14 Mar 2017 - 3:18 pm | अत्रुप्त आत्मा

पांडुराज्य कथा!

जव्हेरगंज's picture

14 Mar 2017 - 3:29 pm | जव्हेरगंज

कडक!!!

कंजूस's picture

14 Mar 2017 - 4:45 pm | कंजूस

मिपानियमावली समजून आलो.

जरा गमतीदार करा.

राजाभाउ's picture

14 Mar 2017 - 4:54 pm | राजाभाउ

जबरदस्त!!!!

अॅस्ट्रोनाट विनय's picture

14 Mar 2017 - 5:46 pm | अॅस्ट्रोनाट विनय

मिपानियमावली समजून आलो.
>> हाच उद्देश होता माझा. ख्या: ख्या:

अॅस्ट्रोनाट विनय's picture

14 Mar 2017 - 6:09 pm | अॅस्ट्रोनाट विनय

जरा गमतीदार करा.

>> आधी गमतीदार पद्धतीने लिहणार होतो. लिहूनही काढलं होतं. पण वाचून बघितल्यावर लक्षात आलं की हे 'गुटखा आणि तंबाखूचे लग्न, प्रेषक: कॅन्सर, लग्नस्थळ: कैलास स्मशान' वगैरे प्रकाराची थोडी बरी आवृत्ती होती. लिखाणाचे कागद मग फाडून टाकले अन भूतमंडळ अध्यक्षाच्या नजरेतून विचार सुरू केला.

मग सगळंच बदललं, भुतबांधवांचे वास्तव प्रश्न डोळ्यांसमोर नाचायला लागले. आणि वरील लिखाण सुचलं.

गामा पैलवान's picture

14 Mar 2017 - 7:29 pm | गामा पैलवान

आ.वि.,

पहिल्या परिच्छेदातली झाडांची संख्या म्हणजे झपाटण्याजोग्या झाडांची संख्या असं वाटून गेलं. ;-) ती जर खरंच कमी झाली तर भयानक आपत्ती ओढवेल की हो.

आ.न.,
-गा.पै.

ravpil's picture

14 Mar 2017 - 8:16 pm | ravpil

Anybody has mobile number of vattel te WhatsApp group ? Please share.

पैसा's picture

15 Mar 2017 - 7:24 pm | पैसा

भुतांची शिरगणती झाली म्हणायची!