द मेन्स्ट्रुअल मॅन

इरसाल कार्टं's picture
इरसाल कार्टं in जनातलं, मनातलं
10 Feb 2017 - 2:49 pm

द मेन्सट्रुअल मॅन, वाचून थोडे दचकलात ना? पण मी आज एका अश्या माणसाची गोष्ट सांगत आहे ज्याला अख्खं जग याच नावाने ओळखायला लागलंय त्याचं खरं नाव आहे अरुणाचलम मुरुगनाथम . आणि विशेष म्हणजे हा माणूस आपल्याच भारतातला आहे. चारचौघातला, पण त्याचं काम एवढं जबरदस्त आहे कि त अनेकांसाठी प्रेरणास्थान बनलाय.
आमच्या क्लासमेट्स फाउन्डेशन ची मूळ प्रेरणाच तो आणि त्याचे कार्य आहे.
माझी याच्याशी ओळख झाली इंटरनेट वरील या व्हिडिओ मुळे. साधारणत: ५-६ वर्षापूर्वी मी हा व्हिडिओ बघितला आणि डोक्यात पार झिणझिण्या आल्या. १५-१६ वर्षापूर्वी या माणसाने जे केलंय ते करण्याचा विचार आजही कोणा पुरुषाच्याच काय तर स्त्रीच्याही डोक्यात येणे कठीण आहे.
गोष्टीची सुरुवात हते १९९८ मध्ये. आपल्या हीरोचं नुकतंच लग्न झालं होतं. शांती त्याच्या बायकोचं नाव. सगळं जग गुलाबी दिसत होतं त्याला. सुखाचा संसार चालू असताना एक दिवस त्याला शांती काहीतरी गुपचूप सुकत टाकत असताना त्याने बघितले. त्याने विचारले तर ‘त्याच्याशी तुमचं काय देणं घेणं नाही’ असं उत्तर त्याच्या तोंडावर मारलं गेलं. बरंच खोदून विचारल्यावर तिने सांगितलं कि जे घाणेरडे कापड ती सुकत टाकत होती, ते कपडे ती मासिक पाळी आली असताना वापरते. मुरुगनाथम म्हणतो कि ते कपडे एवढे घाणेरडे हते कि त्याने ते गाडी पुसायलाही वापरले नसते. त्याने शांतीला विचारले कि ती ‘सॅनिटरी पॅड्स’ का वापरत नाही तेव्हा तिने सांगितले कि ते एवढे महाग आहेत कि जर ती दर महिन्याला सॅनिटरी पॅड्स वापरायला लागली तर त्यांना रोज लागणारे दुध बंद करावे लागेल.
तरीही, मुरुगानाथान ने एका दिवशी शांतीला इम्प्रेस करण्यासाठी औषधांच्या दुकानातून सॅनिटरी पॅड्स चं एक पॅकेट विकत घेतलंच. आणि इथे त्याला धक्का बसला. त्याने पहिले कि हे सॅनिटरी पॅड्स म्हणजे निव्वळ कपड्याचे तुकडे अन कापूस होता. त्याकाळी जवळ जवळ 4 रुपयांना मिळणार्या पॅक साठी लागणारा कच्चा माल जेमतेम १० पैस्यांचा होता. त्याकाळी एवढे महाग असलेले सॅनिटरी पॅड्स गावांतील बायका का वापरत नाहीत याचे उत्तर त्याला मिळाले. आणि त्याने ठरवलं कि यावर पर्याय शोधायचाच जेणेकरून जगातल्या प्रत्येक सामान्य वा गरीब स्त्रीला ते वापरता आले पाहिजेत. आता त्याच्या डोक्यात फक्त मासिक पाळी आणि सॅनिटरी पॅड एवढंच होतं.
त्याने कापूस आणि कापडाचे तुकडे शिवून एक पॅड बनवला आणि तो शांतीला दिला, तिची मतं बघण्यासाठी. पण झालं उलटंच, त्याची स्वत:ची बायकोही त्याच्याशी मासिक पाळी विषयी बोलायला तयार नव्हती. सगळे प्रयत्न करूनही जेव्हा शांती बोलत नाही म्हटल्यावर त्याने आपला मोर्चा बहिणींकडे वळवला. तो दर महिन्याला त्यांच्याकडे जाऊ लागला, त्याने बनवलेले पॅड्स घेऊन. पण जिथे बायको काही बोलेना तिथे बहिणी कश्या बोलणार? त्यांनी या विषयावर काहीही चर्चा करण्यास नकार दिला. एक वेळ अशी आली कि मुरुगनाथम ला बघून त्याच्या बहिणी दारावाजे बंद करून घेऊ लागल्या. ‘दादा, तु चार दिवस येवून, खाऊन-पिऊन जा पण असले घाणेरडे विषय काढू नकोस’ सारखी वाक्यं त्याच्या तोंडावर मारली जाऊ लागली. आता कुटुंबाने त्याला पाहून नाकं मुरडायला सुरुवात केली होती.
‘परिसरातील बायका अडाणी आहेत त्यांना काही कळत नाही’ असा काहीसा विचार करून त्याने सरळ एक वैद्यकीय महाविद्यालय गाठले. वैद्यकशास्त्र शिकणाऱ्या मुली आपल्या प्रश्नांची न लाजता उत्तरे देतील एवढीच काय ती अपेक्षा. त्याने सरळ सरळ एक सर्व्हेक्षण अर्ज तयार करून पॅड्स च्या बरोबर मुलींना वाटले. एक-दीड महिन्यानंतर जाऊन ते घेतलेही. आपण बनवलेले पॅड्स वापरायोग्य आहेत असे त्याला सर्वेक्षणाअंती दिसून आले पण त्याने अजून थडे दिवस थांबायचा निर्णय घेतला. कॉलेज मध्ये पॅड्स आणि सर्वेक्षण अर्ज देणे चालूच होते. एक दिवशी जेव्हा तो मुलींच्या वसतिगृहात सर्वेक्षण अर्ज आणायला गेलं तेव्हा त्याला कळलं त्याचे पॅड्स एका दमात ‘परफेक्ट’ कसे झाले ते. खरंतर सगळ्या मुली स्वत:चा अर्ज स्वत: भरतच नव्हत्या, कोणीतरी एकच मुलगी सगळ्यांचे अर्ज मनात येईल त्या पर्यायासमोर काट मारत भरत होती. एका दमात.
आता मुरुगनाथम हतबल झाला. सुशिक्षितांनीही त्याचा भ्रमनिरास केला होता. आणि आता एकच पर्याय उरला होता...
स्वत: सॅनिटरी पॅड वापरणे.
तो या जगातील पहिला...कदाचित एकमेव पुरुष होणार होता... सॅनिटरी पॅड वापरणारा.
त्याला तर पाळी येतच नव्हती, येणे शक्यही नव्हते. मग पॅडची कार्यक्षमता कळणार कशी? स्त्रीच्या शरीरातून निघणार स्त्राव कसा बनवणार? आणि तो दिवसभर थोडा थोडा कसा बाहेर येणार? असे असंख्य प्रश्न होते.
त्याने एक शक्कल लढवली, त्याने रबराची एक पिशवी बनवली ज्यात तो बकऱ्याचे रक्त साठवून ठेवू शकेल. बकऱ्याचे रक्त त्याच्या खाटिक असलेल्या मित्राने द्यायचे काबुल केले, प्रत्येक वेळी जेव्हा तो बकरा कापायला जाणार असेल तेच मुरुगनाथनच्या घराजवळ येऊन सायकल ची घंटी वाजवायचा. हि एक खूण होती मुरुगनाथम साठी. मग मुरुगनाथम त्याच्या मागे जाऊन गुपचूप ते रक्त घ्यायचा. पण तरीही एक समस्या होतीच, हे रक्त लगेच गोठून जायचं. त्याला उत्तर त्याच्या एका फार्मासिस्ट मित्राने दिलं. रक्त गोठू नये म्हणून वैद्यक शास्त्रात वापरलं जाणारं रसायन तो मुरुगनाथम ला द्यायचा. आता रक्त गोठण्याची समस्या संपली होती आणि मुरुगानाथामाच्या खऱ्या कामाला सुरुवात झाली.
मुरुगनाथम या पिशवीमध्ये रक्त भरून आपल्या पँट मध्ये घालत असे आणि वर त्याने बनविलेले पॅड्स थोड्या थोड्या वेळाने ती पिशवी दाबत असे. मासिक पाळीची नक्कल करणे एवढाच हेतू. पण आपले रक्ताने माखलेले कपडे जेव्हा तो विहिरीवर धुवायला लागला तेव्हा त्याला एखादा गुप्तरोग झाला आहे अशी आवई गावात उठली. एव्हाना शांती, त्याची बायको त्याल सोडून गेली होती. पंचक्रोशीतल्या स्त्रिया, ज्यांच्यासाठी तो या सगळ्या उठाठेवी करीत होता, त्याच्याकडे तिरस्काराने बघू लागल्या होत्या. पण तो हारला नाही त्याचे प्रयत्न चालूच होते. यश काही मिळत नव्हतं. व्यावसायिक पॅड्स मध्ये पाईन या झाडाच्या बुंध्यापासून मिळणारे सेल्युलोज वापरले जाते म्हणूनच ते एवढे कार्यक्षम असतात हे कळायला त्याला दोन वर्षे लागली. मग त्याने मुंबईतून विक्रेता शोधून काढला. पण अजून एक समस्या होतीच, व्यावसायिक उत्पादनासाठी लागणारी यंत्रे अत्यंत महाग होती, एवढी महाग यंत्रे त्याला विकत घेणे शक्य नव्हते म्हणून त्याने स्वत: नवीन यंत्रे बनवून घेतली आणि यशस्वीरीत्या सॅनिटरी पॅड्सचं उत्पादन सुरु केलं. अगदी स्वस्तात. म्हणजे एवढं स्वस्त कि रु. ३,५०,००,००० ची यंत्रे जे काम करतात तेच काम करणारी यंत्रे त्याने ६५,००० रुपयांना बनवली, इतरांना उपलब्ध करून दिली. तसेच या यंत्रांना चालवणं अशिक्षित तसेच अकुशल कामगारांना देखील सहज शक्य होतं, आहे. त्याच्या यंत्रांची दाखल IIT Madras ने घेतली जेव्हा तो हे तंत्रज्ञान त्यांना दाखवायला गेला. त्यानंतर त्याला निधी उपलब्ध झाला आणि जगणे त्याच्या कष्टाला मान्यता दिली.
मिळालेल्या निधीमाधुनच त्याने जयश्री इंडस्ट्रीज ची स्थापना केली. खरंतर तो हे तंत्रज्ञान हव्या त्या किमतीने विकून भरपूर पैसे कमवू शकला असता परंतु त्याचा मुळ उद्देशच पैसे कमावणे नसून जनसेवा होता म्हणूनच त्याच्या यंत्रांची किंमत एवढी कमी आहे. आणि हि यंत्रे तो देशभरातील महिला बचत गटांना विकतो तसेच त्यांना प्रशिक्षण देतो. देशभरातील ग्रामीण भागातून कित्येक महिला बचत गटांना त्यामुळे काम मिळाले तसेच गरीब तरुणी/महिलांना एक स्वत:च्या आरोग्यासाठी आवश्यक असलेला अत्यंत स्वस्त पर्याय मिळालाय. आणि हे फक्त भारतातच नव्हे, जगभरातल्या अविकसित, विकसनशील देशात मेन्सट्रुअल मॅन ची यंत्रे पोचलीत.
देश-विदेशात कित्येक पुरस्कारांनी सन्मानित झालेला हा आपलं हिरो मात्र एकाच नावाने ओळखला जातो... द मेन्सट्रुअल मॅन.
एकविसावं शतक उजाडलं तरीही आमच्या आजूबाजूला हे चित्र बदलेलं नाहीये. एक सर्वेक्षणानुसार शाळा सोडणाऱ्या मुलींपैकी तब्बल ५० टक्के मुली या केवळ मासिक पाळी आणि त्यासंबंधी समस्यांमुळे शाळा सोडतात. आमच्या आदिवासीबहुल जिल्ह्यात हा आकडा तर त्याहीपेक्षा जास्त असेल. आणि विशेष म्हणजे खूपच कमी स्वयंसेवी संस्था या विषयावर काम करतायत, शासनाकडून तर अपेक्षाच नाही. आजही चारचौघात या विषयावर बोलताना लोकं कचरतात, यात सुशिक्षितांचाही समावेश आहे.
खरंतर समृध्द वेदांची परंपरा लाभलेल्या आपल्या देशात जिथे काही ठिकाणी आजही मुलीच्या पहिल्या मासिक पाळीच्या वेळी साग्रसंगीत समारंभ आयोजित केले जातात, तिला मातृत्वाचम वरदान लाभलंय म्हणून पूजतात त्याच देशात अज्ञान आणि अंधश्रद्धेमुळे हा संवेदनशील विषय तेवढाच दुर्लक्षित राहिलेला आहे. पालघरसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात तर हे चित्र अधिकच विदारक आहे. म्हणूनच क्लासमेट्स फाउन्डेशन ची सुरुवात करताना आमचं मुख्य उद्दिष्ट हि दरी भरून काढणे हेच होतं.
बर्याच जणांना वाटतं कि क्लासमेट्स फाउन्डेशन हि काही वर्गमित्रांनी मिळून साकारलेली एखादी स्वयंसेवी संस्था आहे. पण मुळात असे काही नाही, आम्ही एक उद्दिष्ट ठेऊन एकत्र आलो आहोत, या आदिवासी तसेच गरीब मुलांचे वर्गमित्र बनून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करणे हेच ते उद्दिष्ट. भौतिक स्वरूपात मदत तर आम्ही करणारच आहोत पण त्यांच्या उमलत्या मनाचा ठाव घेऊन, त्यांच्याशी बोलून त्यांच्या मनातील तरुण्यासुलभ भावना आणि न उलगडलेले प्रश्न सोडवणे हेच आमचं मुळ उद्दिष्ट आहे आणि असेल.
आतापर्यंत फक्त मदत मिळवून देणे आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यापर्यंत मर्यादित असलेले आमचे काम येत्या जून पासून खऱ्या अर्थाने विस्तारत आहे, सुरुवात म्हणून प्रायोगिक तत्वावर आम्ही एका शाळेत समुपदेशन, प्रत्येक महिन्याला सॅनिटरी पॅड्स वाटप आणि आरोग्य शिबिरं असे उपक्रम राबवणार आहोत. हळूहळू कामाचा विस्तार वाढवणार आहोत. आमच्या या मोहिमेला काहींनी प्रोत्साहन दिले तर काहींनी नाकं मुरडलीत, अगदी हिणावलंही, पण आम्ही पुढे चालत आहोत, जमेल त्या वेगाने, येईल त्याच्या जोडीने.
आपण याल आमच्या मदतीला?

email: classmates.foundation@gmail.com
facebook: www.facebook.com/ClassmatesFoundation

समाजजीवनमानआरोग्यशिक्षणविचारसद्भावनाआरोग्य

प्रतिक्रिया

या विषयी लोकसत्ता च्या लोकरंग मध्ये लेख वाचला होता. आपल्याकडुन अधिक माहिती समजली.
पाटीलभाऊ's picture

10 Feb 2017 - 3:50 pm | पाटीलभाऊ

या माणसाविषयी फेसबुकवर वाचले होते.
खरंच महान माणूस आहे. _/\_
क्लासमेट्स फाउन्डेशन हा नक्कीच स्तुत्य उपक्रम आहे.
आपल्या उपक्रमास खूप साऱ्या शुभेच्छा..! संधी मिळाल्यास आपल्या या उपक्रमात सहभागी होण्यास नक्की आवडेल.

आपल्या उपक्रमास खूप साऱ्या शुभेच्छा..! संधी मिळाल्यास आपल्या या उपक्रमात सहभागी होण्यास नक्की आवडेल.

हेच बोल्तो.. कांही करण्यासारखे असेल तर सांगा हो..!!

इरसाल कार्टं's picture

10 Feb 2017 - 5:36 pm | इरसाल कार्टं

नक्की, हक्काने सांगेन. सध्या पूर्वतयारी चालू आहे.

अनिंद्य's picture

10 Feb 2017 - 3:59 pm | अनिंद्य

@ इरसाल कार्टं / क्लासमेट्स

तुम्ही एका दुर्लक्षित पण महत्वाच्या विषयाला हात घातला आहे. तुम्हाला आणि तुमच्या टीमला मनापासून शुभेच्छा!

पैसा's picture

10 Feb 2017 - 4:23 pm | पैसा

मुरुग बद्दल तपशीलवार वाचलं आहे. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन तुम्ही विद्यार्थी लोक उत्तम काम करत आहात. तुमच्या टीमला मनःपूर्वक शुभेच्छा! मिपाकरांकडून काय मदत होउ शकेल जरूर लिहा.

इरसाल कार्टं's picture

10 Feb 2017 - 5:33 pm | इरसाल कार्टं

पण खरेतर आमच्यापैकी कोणीही विद्यार्थी नाहीत. सगळे स्ट्रगलर्स आहोत तिशीच्या आतले.
माणूस हा जन्मभर विद्यार्थी असत या न्यायाने मात्र विद्यार्थी आहोत. आताशा शिकायला लागलोय. : )

शलभ's picture

10 Feb 2017 - 5:07 pm | शलभ

छान माहिती..
तुमच्या कार्यास शुभेच्छा..

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Feb 2017 - 5:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

एका प्रसिद्धीपरान्मुख स्पृहणिय कामाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !

तुम्हा मित्रांचा उपक्रमही कौतुकास्पद आहे. प्रत्यक्ष जागेवर येऊन काम करता आले नाही तरी त्या कामाला हातभार कसा लावता येईल ते लिहिलेत तर उपयोगी ठरेल.

वाचून आनंद झाला. तुमचे आणि तुमच्या फाउंडेशनचेही कौतुक.

अभ्या..'s picture

10 Feb 2017 - 6:35 pm | अभ्या..

इरसालदादा,
आयडीया आणि उपक्रम उत्कृष्ट आहे. अभिनंदन. शुभेच्छा.
ह्याच प्रोजेक्टनुसार महिला बचत गटांनी त्यांचे उत्पादन चालू केल्याचे पाहण्यात आहे. होते काय की शाळेतल्या मुली टीव्ही वगैरेंशी परिचित असतात. टीव्हीवर वेगवेगळ्या ब्रॅन्डच्या नॅपकीन्सच्या जाहीरातींचा मारा सतत चालू असतो. त्या पॅकींग आणि ब्रॅन्डपुढे आपण केलेले पॅकींग आणि ब्रॅडिंग फिके पडते. तुमचे हे धोरण कसे आहे? म्हणजे विकणार आहात की वाटप करणार आहात? नॅपकीन्स या कन्सेप्टची ओळख करुन देणार आहात की आरोग्य व त्याची गरज ह्यावर डिटेल प्रबोधन करणार आहात? एखादे प्रॉडक्शन युनिट स्वतः उभारायचा विचार आहे की अशाच एखाद्या बचतगटासारख्या उपक्रमात बनवलेले पॅड्स तुम्ही डिस्ट्रीब्त्युट करणार आहात?
असे उपक्रम राबवलेले मी पहिलेले आहेत पण तुमचे कसे प्लॅनिंग आहे ते लक्षात येत नाहीये. डिट्टेलवार लिहिल्यास जेवढी जमेल तेवढी मदत करायचा मी शब्द देतो.

इरसाल कार्टं's picture

10 Feb 2017 - 7:58 pm | इरसाल कार्टं

सद्या फक्त वाटप करणारे, मुरुगप्पा कडुन स्वस्तात मिळतील बहुतेक. संपर्क करतोय त्यांच्याशी.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

10 Feb 2017 - 6:44 pm | अॅस्ट्रोनाट विनय

द मेन्स्ट्रुअल मॅनला सॅल्यूट __/\__
तुमचा उपक्रमही स्तुत्य आहे. अशीच इरसाल कामं करत रहा

कंजूस's picture

10 Feb 2017 - 7:03 pm | कंजूस

लेख वाचलाय.

सविता००१'s picture

10 Feb 2017 - 7:21 pm | सविता००१

द मेन्स्ट्रुअल मॅन ला साष्टांग दंडवत.
आणि तुमच्या उपक्रमालाही खूप खूप शुभेच्छा!

इरसाल कार्टं's picture

10 Feb 2017 - 8:13 pm | इरसाल कार्टं

खरंतर मी असा बचत गट शोधतोय जो आदिवासी महिलांचा असेल आणि त्या पॅड्सच्या ऊत्पादनात रस घेतील.
अवती भवती एवढ्या गरीब आदिवासी तरुणी-महिला आहेत की त्यांना ग्राहकांची कमी नाही.
स्वत: क्लासमेट्स फाऊंडेशन त्यांच्याकडुन पॅड्स विकत घेऊन मोफत वाटप करील.
पण त्यासाठी नियमित निधी लागेल.
दुर्दैवाने आमच्या परिसरातिल संस्था फक्त प्रसिद्धीसाठी कामं करतात. नेमकी हीच गोष्ट आम्ही त्यांना देऊ शकत नाहीत. म्हणुन सद्या फक्त 'एक गरजु शाळेत' ही संकल्पना राबवुन मगच पुढे जाणार आहे.

पिलीयन रायडर's picture

10 Feb 2017 - 8:42 pm | पिलीयन रायडर

माबोवर ह्या माणसाबद्दल वाचलं होतं. थक्क होणासारखीच गोष्ट आहे ही...

तुम्हाला शक्य ती सगळी मदत नक्की करु. फक्त इथे लिस्ट टाका की नक्की काय अपेक्षित आहे.

धर्मराजमुटके's picture

10 Feb 2017 - 9:22 pm | धर्मराजमुटके

उत्तम लेख ! अरुणाचलम मुरुगनाथम आणि त्यांचे काम बर्‍यापैकी प्रसिद्ध आहे. मात्र नॅपकीन्स वापरण्याबद्द्ल जेवढ्या प्रमाणात जागरुकता आहे तेवढी त्याची विल्हेवाट कशा पद्धतीने लावावी याबद्द्ल नाही असे खेदाने म्हणावे लागेल.
हीच गोष्ट निरोध, सॅनिटरी नॅपकीन्स आणि इतर जैविक कचर्‍याबद्द्ल (एवढेच काय ओला कचरा, सुका कचरा) याबद्द्ल लागू आहे. जैविक कचरा झाडुवाल्याने कोणतीही खळखळ न करता उचलावा अशीच सध्या तरी बर्‍याच जणांची अपेक्षा दिसते. काही काही स्त्रिया तर हे नॅपकीन्स सरळ शौचालयाच्या भांड्यात टाकून फ्लश करतात. ८-१५ दिवसांनी ड्रेनेजचे पाईप तुंबतात तेव्हाच हे प्रकरण उघडकीस येते.

तुमचा उपक्रम स्त्युत्य आहे पण हा ही एक भाग त्यात जोडावा ही विनंती. !

इरसाल कार्टं's picture

10 Feb 2017 - 11:34 pm | इरसाल कार्टं

या बाबतीतही लक्ष घालतो.

संदीप डांगे's picture

11 Feb 2017 - 12:37 am | संदीप डांगे

संपूर्ण प्रतिसादाशी सहमत... तुम्ही एक महत्त्वाचा विषय मांडला आहे.

मागे कचर्‍याबद्दल अभ्यास करतांना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवलेली व सर्व जगातही नॅपकिन्सचा कचरा याविषयी गंभीर चर्चा व संशोधन चालू आहे. सॅनिटरी नॅपकिन्स, लहान मुलांचे नॅपी'ज.. इत्यादी तत्सम पॅड्स हे वापरुन झाल्यावर मोठा प्रश्न निर्माण करतात. ह्यांचे विघटन होत नाही, पुनर्वापर, रिसायकलिंग शक्य नाही. त्यामुळे हा कचरा सरळ डम्पिंग ग्राउंड वर जातो व जमीनीत दाबला जातो. कालांतराने (व भारतात तरुण लोकसंख्या जास्त असल्याने आता पुढील काही दशके प्रजनन जास्त होत राहिल, त्यातून जागृतीमुळे नॅपिज च्या वापरात वाढ होत राहिल) हा कचरा अधिकाधिक जमीन कायमस्वरुपी खात जाणार आहे. त्यातून जलस्रोत खराब होणे, जमीनीचा पोत बिघडणे यासारखे कायमस्वरुपी परिणाम घडवणारे बदल होण्याचे स्पष्ट संकेत आहेत.

मुरुगनाथम यांचे काम खरंच ग्रेट आहे व त्यात कसलाही मतभेद नाही. पण भविष्याचा विचार करता नॅपकिन्सचा पर्याय शोधायला लागणे ही आता लगेचची मोठ्ठी गरज आहे. रियुजेबल-पुनर्वापर करता येण्याजोगे नॅपकिन्स चे शोधही लागले आहेत, आम्ही आमच्या मुलांसाठी असे नॅप्पिज मागवले होते, पण त्यामध्ये काही प्रॅक्टिकल समस्या आहेत. त्या लवकरात लवकर दूर होऊन १००% पुनर्वापर होऊ शकणारे नॅपिज तयार व्हावेत यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत.... तसेच ज्या मोठ्या बहुराष्ट्रिय कंपन्या आहेत त्या आपला फायदा पाहून रियुजेबल पेक्षा वन-टाइम-युज ह्याप्रकारच्या उत्पादनांवरच भर देतील हेही स्पष्ट आहे. त्यामुळे आता रियुजेबल नॅप्किन्स ही लोकचळवळीच्या माध्यमातूनच उभी राहू शकतील असे वाटते... त्यासाठी धागाकर्ते करत आहेत तशा अनेक संघटनांची आवश्यकता भासणार आहे.

पिलीयन रायडर's picture

11 Feb 2017 - 1:16 am | पिलीयन रायडर

नॅपकीन्सला "कप" हा पर्याय आलेला आहे. तो वापरण्याची मानसिक तयारी व्हायला बराच वेळ जाईल. पण त्यावर भरभक्कम चर्चा केल्यावर हा एक सक्षम पर्याय आहे असे माझे तरी मत झालेय. (लिंक ऐसी.. वर नेईल. मी तिथेच पहिल्यांदा वाचलं म्हणून ती लिंक देतेय.)

ऑफिसेस मध्ये नॅपकिन्सची विल्हेवाट लावायला वेगळे डम्पिंग बीन्स असतात जेणेकरुन सफाई कामगारांनाही त्रास होऊ नये.

पण अर्थात हा फार मोठा मुद्दा आहे. ह्यावर नक्कीच विचार व्हायला हवाय.

संदीप डांगे's picture

11 Feb 2017 - 1:56 am | संदीप डांगे

खूप खूप धन्यवाद लिंक व माहिती पुरवल्याबद्दल.
सर्वच बाजूंनी खूप सोयीचा असला तरी पूर्णपणे अंगिकारण्यास सुरुवातीला कठिण वाटेल हा पर्याय... (काही वर्षांनी पर्यायच न राहिल्याने आजचा भीतीचा पर्यायही आपसूक राहणार नाही)
हे भयाचे भिताड कसे पाडावे ह्यावर डोक्यात विचारांची गिरणी सुरू झाल्येय... जरा वेळाने चर्चा करुयात ह्यावर. मी अजून माहिती मिळवतो. याबाबतीत काहीतरी विधायक करता येईल असे वाटत आहे.

पिलीयन रायडर's picture

11 Feb 2017 - 8:31 am | पिलीयन रायडर

ह्या लेखाच्या लेखिका मिपाकर आहेत बहुदा. त्या ह्यावर बरंच काम करत आहेत. बर्‍याच पेपर मध्ये हा लेख आलेला आहे. त्यांच्याशी संपर्क करु शकता.

शिवोऽहम्'s picture

11 Feb 2017 - 4:12 am | शिवोऽहम्

सॅनिटरी नॅपकिन्सच्या विल्हेवाटीची समस्या आणि उपाय यावर हा लेख वाचनात आला. स्वाती व श्यामसुंदर बेडेकर या दांपत्याने हा उपक्रम चालू केला आहे. ग्रामीण भारतीय परिस्थितीत अशा प्रकारचे संशोधन फायदेशीर ठरेल.

https://qz.com/557026/this-machine-to-discard-sanitary-pads-could-make-a...

इरसाल कार्टं's picture

11 Feb 2017 - 7:58 am | इरसाल कार्टं

चांगला ऊपक्रम आहे.

संदीप डांगे's picture

11 Feb 2017 - 9:02 am | संदीप डांगे

ही लिंक कामाची आहे...

http://unicef.in/CkEditor/ck_Uploaded_Images/img_1513.pdf

मला वाटतं, ड्रेनेज चोक होण्याच्या समस्या असलेल्या सोसायट्या स्वतःचे बर्नर उभे करू शकतील तेही कमी खर्चात. स्त्रियांना अडचणीचे वाटणार नाही अशा पद्धतीने नॅपकिन गोळा करणे करावे लागेल...
प्रत्येक सोसायटीने आपल्याच जागेत हे केले तर शासकीय यंत्रणेवर ताण कमी होईल व बराच खर्च वाचेल.

ह्या बर्नर मधून बाहेर पडणाऱ्या हानिकारक वायूंबद्दल मात्र मला अजून शंका आहे, संशोधकांनी म्हटलंय कि असा धोका नाहीये म्हणून...