खादाडी

vcdatrange's picture
vcdatrange in जनातलं, मनातलं
23 Nov 2016 - 11:50 am

गेल्या रविवारी गुळपीठ अन् मी दोघेच घरी होतो. आमच्या मुदपाकखान्यातील कौशल्याची मजल झक्कास म्यागी, उकडलेली अंडी, चहा या सीमांमध्ये मर्यादित आहे. दिवसभर याच सिद्धहस्त पाककृती आलटून पालटून सादर केल्यावर संध्याकाळी आम्ही भेळ खायला गेलो. गावाकडं म्हणजे संगमनेरला बराच फेमस असलेलं घुले भेळ सेंटर इकडं आंबेडकर नगर ला सुरु झालय.......

घुले साहेबांशी गप्पा मारताना लहानपणी संगमनेरात मिळणारी रामदास नढे कडची ओली भेळ आठवली. शनिवारी नढे काका ओली भेळ द्यायचा नाही, कारण त्याच्या चवीची ओली भेळ बनवायला वेळ लागायचा अन बाजारच्या दिवशी हे चोचले त्याला परवडत नसत. एक लक्ष्मीनारायण कचोरी वाला कोथिंबीर वडी आणि दही ईमली असं अप्रतिम कॉम्बिनेशन करून द्यायचा. संध्याकाळी अंधार पडल्यावर गल्लीत एक गुलाबजाम विकणारा यायचा, त्याची आरोळी अजून आठवते "$$$ आली का तोंडाला चव$$$$" असं मोठयानं ओरडायचा...

शिक्षणासाठी पुण्यात गेल्यावर मात्र मेस मधील सरफेस बॉटम, रविवारी फिस्ट नावाने मिळणारे जिलेबीचे दोन वेढे... एवढंच. रविवार संध्याकाळची सोय करण्यासाठी मात्र अंगभूत कौशल्य आणि इतर बरेच खटाटोप करून स्कुटी तत्सम छोट्या गाडयाची पिलीयन राईड घेत इप्सीत साध्य करण्याकरिता अपार साधना, उच्च दर्जाची श्रवणभक्ती अन ' पाय माझा मोकळा' ठेवण्याचा मनोग्रह कामी आला....

हॉस्टेल मधला एक रुम मेट HMCT शिकत होता, कधीतरी तो ODC ला घेऊन जायचा, तेव्हापासून मला वाटतं चोचले सुरु झाले, पण जिभेवरची अन्नपूर्णा जागी झाली ती कोकणात गेल्या वर, हितेश धोडीने बनवलेल्या एक से एक डीश, चिकनचे भन्नाट कबाब, सुरमई फ्राय, श्रीवर्धनला हॉटेल प्रसादमध्ये हादडलेली म्हावऱ, पतंग मध्ये बोंबील फ्राय खाण्यासाठी केलेल्या अलिबागच्या वाऱ्या, पावसाळ्यात शेतात पकडलेले वलगंन, चिंबोरी, गाबोळी तर एकमद वल्लाह!!
साक्षात भगवन्त अवतार असलेल्या मास्यांविषयी जिव्हाळा तसा पूर्वीपासूनच, याच मुख्य कारणांमुळे पहिली गर्लफ्रेंड CKP होती. परवा किचनचा ताबा नानांकडे होता, मला सकाळी 6.45 ला गरम गरम फिश फ्राय करून दिला.शॉटगन आणि माझ्यातला तहाचा हा पोटातून जाणारा खुष्कीचा मार्ग अंमळ उशिराच सापडलाय.

हरिहरेश्वर शेजारी भेंडखोलला अंगणवाडी ताईकडे मिळणारं साजूक जेवण, दिवे आगार शेजारी कोंडीवलीच्या नितांत स्वच्छ सुंदर निवांत बीच वर आणि टीममधील एकाच्या कलिंगडाच्या शेतात रात्री उशिरा पेटवलेली पोपटी पार्टी.

अर्धांग मात्र मासे प्रयोगाबाबत हात राखुन आहे, असाच दुसरा पदार्थ म्हणजे चटणी. काय दुष्मनी आहे चटण्यांशी तिची देव जाणे! शेंगदाण्याचा कूट, लाल तिखट,मीठ, अन् तेल हे मी तुडुंब खाऊ शकतो. परतलेले, न परतलेले, सगाळे, जाडसर, तेलावर फोडणी देऊन, हिरव्या मिरचीची असे सगळेच प्रकार तेवढेच खुमासदार लागतात.

गुरगुट्या भारतासाठी इंद्रायणी, फोडणीच्या वरणासोबत घोटी कोळपी, रस्सा असेल तर आंबेमोहोर, बिर्याणी साठी बासमती तुकडा, नुकताच भावलेला भंडारदऱ्यातला काळ भात घरात कायम भरून ठेवण्याची जहांगीरदारी सांभाळतोय. गरम गरम भात, न हाटलेली तूरदाळ, त्यावर लोटीन ओतलेलं घरच तूप..... या तुपासाठी सावलीचे पूर्ण मार्क मिळतात, एवढया एकमेव पाककृतीची मुदपाकखाण्यात आपली मोनोपली आहे, अगदी दही घुसळण्यापासून बेरी खाण्यापर्यंत!

एका मास्तरांकडे तुडूंब खाल्लेले श्रीखंड अजूनही जिभेवर आहे. देवाने हाताला बोटं ही श्रीखंड चाटून खाण्यासाठीच दिलेली आहेत हे माझं ठाम मत आहे. रमेश तर म्हणायचा - श्रीखंडात तू तुझ्या लेकीला पण वाटा देणार नाही

मित्राच्या मम्मीने बनवलेले पदार्थ जसे innovative असतात तसेच खायला yummy पण, बग्गा कडे मिळणारे टोकरी चाट मम्मीने बराच मागे कधीतरी करून खाऊ घातलेले. त्याच्या घरी खूप अंतराने गेल्यावर देखील काकूने आठवणीने डाळीवरच पाणी वेगळं काढून दिल होत.

आईस्क्रीम खाऊन मन भरत नाही, म्हणून पोटभर आईस्क्रीम खाल्लं पाहिजे अशी वैद्य भय्याराव गौतमांनी वयाच्या ८५ वर्षी दिलेली संथा फार गाम्भिर्याने पाळतोय.कुटुंबासोबत अमूलचे पार्टी पॅक हनी बनाना, संत्रा मंत्रा, अमेरिकन सफ्रॉन, लिची डेअरी डॉन मधील थीक शेक, नेचरल्सच टेंडर कोकोनट, कधीही तयार, अगदी पाऊस पडत असेल तरीही!

आवडी तशाच टिकून असल्यातरी आता अर्धांगाने बरिच वळणं सरळ केलीयेत, हा..... त्या प्लास्टिकच्या भाजीला मात्र अजूनही आमचा विरोध कायम आहे, माझ्या खाण्यामुळे जर जगातल्या कोबीच समूळ उत्पाटन होणार असेल तरच तो शेवटचा कोबी मी खाईन!

बाकी ऑफिस टेबल मध्ये कायम असणाऱ्या कॅडबरी सिल्क गुलाबी जखमा आहेत.........

बादवे, आजही डब्याला फिश फ्राय आहे

संस्कृतीपाकक्रियाइतिहासमुक्तकराहणीमौजमजाप्रकटन

प्रतिक्रिया

पाटीलभाऊ's picture

23 Nov 2016 - 12:59 pm | पाटीलभाऊ

वा...असेच खात राहा...शेवटी खाएगा इंडिया तभी तो बढेंगा इंडिया..!

मृत्युन्जय's picture

23 Nov 2016 - 1:03 pm | मृत्युन्जय

लेख मजकूरात विस्कळीत झाला आहे.

मात्र नढेची आठवण काढलीत राव. काय भन्नाट भेळ असायची नढे कडची. अनेक वर्षे उलटली ती भेळ खाउन आता. तितकी सुंदर भेळ आजवर कुठेही खालेल्ली नाही. आणी त्याबरोबरची ती मिरची. अहाहा. तोंपासु.

vcdatrange's picture

23 Nov 2016 - 7:07 pm | vcdatrange

दादा मार्क दिलेत, मार्गदर्शनही कराच!!!

एस's picture

23 Nov 2016 - 1:32 pm | एस

हाय हाय!

लेखन आवडले. मध्येच काहीवेळा लिंक तुटल्यासारखी वाटली तरी मनापासून लिहिल्याने आवडलेच.