अशी स्मिता होणे नाही...

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
17 Oct 2016 - 3:51 pm

लौकिकार्थाने काही लोक आपल्यात नसले तरीही त्यांच्या कार्याने, कलाकृतीने ते कायम आपल्या सोबत असतात. पु.ल. , वसंतराव देशपांडे हि अशीच काही माणसं. स्मिता पाटील पण अगदी याच रांगेत सहज सामावून जाते, ते तिच्या अभिनयामुळे. आज तिचा ६१ वा वाढदिवस. मी वाढदिवस या साठी म्हणतोय कि ती कुठे गेलीच नाही, ती कायम आपल्यात वावरत असते कधी उंबरठा मधली सुलभा बनून तर कधी जैत रे जैत मधली नाग्याची चिंधी बनून. उण्यापुर्या ७५ चित्रपट आणि ३१ वर्षांच्या आयुष्यात तिने अनेकांच्या हृदयावर अमीट छाप सोडली.

दूरदर्शनची निवेदिका ते एक यशस्वी अभिनेत्री हा तिचा प्रवास खरंच रोमांचक होता. सुंदर डोळ्यांच लेणं लाभलेल्या स्मिताचा जन्म पुण्याचा. समाजसेविका आई आणि राजकारणी वडील यामुळे समाजसेवेचं बाळकडू तिला घरूनच मिळालं होतं जे तिच्या सार्वजनिक जीवनात कायम दिसत होत. रेणुका स्वरूप शाळेत शिक्षण घेऊन तिने पुढे फिल्म इन्स्टिटयूट मधून कारकीर्द सुरु केली. दूरदर्शन मध्ये निवेदिका म्हणून काम करत असतांना प्रतिथयश दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी तिला पाहिलं त्यांना तिचे बोलके डोळे आवडले होते. त्यांनी तिला 'चरणदास चोर (१९७५)' या चित्रपटात भूमिका दिली आणि त्यानंतरचा सगळा इतिहास ज्ञात आहेच. पण त्या आधी सामना (१९७४) मधल्या कमळी मधून तिची झलक दिसली होतीच. त्या श्याम बेनेगल आणि दूरदर्शन चा मी कायम ऋणी राहील ज्याच्यामुळे इतकी सुंदर अभिनेत्री लाभली.

तिची भूमिका असणारा गुजरातच्या दूध व्यापाऱ्यांवर आधारलेला मंथन (१९७६) हा सिनेमा यशस्वी तर झालाच पण भारतीय सिनेजगतात आजही सिनेमा महत्वाचा मानल्या जातो. १९७७ हे वर्ष तिच्या आयुष्यतील खूप महत्वाचं असं वर्ष ठरलं तिने काम केलेल्या 'भूमिका' चित्रपटातल्या रोल साठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिक मिळालं. पुढे 'चक्र' मध्ये याची पुनरावृत्ती झाली. त्या दशकात तिने शबाना आझमी, ओमपुरी, नसरुद्दीन शाह यांसारख्या कसदार अभिनेत्यांसोबत काम केले पण, यामुळे तिच्या वर समांतर चित्रपटात काम करणारी अभिनेत्री हा शिक्का बसला तो कायमचा. पण कोण काय बोलेल याचा विचार करणारी ती अभिनेत्री नव्हतीच. त्याच साली आलेल्या जैत ते जैत या चित्रपटामध्ये चिंधी ची भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या चित्रकारणाच्या वेळी ती भूमिकेत एवढी समरस होऊन गेली होती कि एखाद्या सामान्य कातकरी स्त्रीप्रमाणे सहजच डोंगर चढायची उतरायची. पुढे तिने गमन, अर्थ, चक्र,बाजार यासारख्या वेगळी धाटणीच्या चित्रपटात पण भूमिका केल्या आणि अभिनयाचा वस्तुपाठ घालून दिला. यापैकी अर्थ मधली 'कविता संन्याल' आणि बाजार मधली 'नजमा' माझ्या खासच आवडीची. समांतर चित्रपटांसोबत तिने व्यावसायिक हिंदी सिनेमे हि केले आणि ते हि तितकेच हिट झाले. अमिताभ सोबत 'नमक हलाल' मध्ये 'आज रपट जाये तो' मध्ये काय दिसलीये ती. या गाण्यातली तिची हि निराळी अदा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आणि ती कमर्शियल चित्रपटात सुद्धा तितक्याच सहजपणे काम करू शकते हे सिद्ध झालं.

मग १९८२ साली आला जब्बार पटेलांचा 'उंबरठा' त्यात तिने 'सुलभा महाजन' ची साकारलेली भूमिका अजूनही मराठी चित्रपटसृष्टीमध्ये बिनतोड आहे. सार्वजनिक जीवनात हि ती महिलांविषयक काम करणाऱ्या अनेक संस्थांशी प्रत्यक्ष पण जोडली गेली होती. त्यामुळे उंबरठा मधल्या तिने साकारलेली भूमिका अधिकच वास्तवदर्शी वाटते. आपल्या संबंध आयुष्यात ती कायमच सडेतोड राहिली आहे. समाज काय म्हणेल याची तिने कधीच फिकीर केली नाही. राज बब्बर सोबत केलेलं लग्न हे त्याचं उत्तम उदाहरण . असं म्हणतात कि तिच्यामुळे राज बब्बर चा संसार मोडला, पण हे बिलकुल खरं नव्हतं. कोणाच्या संसारात आपणहून उध्वस्त करणे तिला कधीच पटलं नसतं. एखाद्या गोष्टीत सर्वस्व झोकून देण्याची तिची वृत्ती होती. पण त्यातुन जर पूर्णत्व भेटलं नाही तर ती जाणीव तिला अस्वस्थ करायची. हे आपल्यात असलेले अपूर्णत्व आहे असं तिला कायम वाटायचं. अपुर्णत्वाशी तिचा असलेला संघर्ष हा तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत सुरु होता.

१० वर्षांच्या कारकिर्दीत स्मिताने अनेक उत्तम चित्रपट देऊन चितपट सृष्टीमध्ये एक अढळ स्थान निर्माण केलं होतं, म्हणून....

तू साकारलेल्या 'चिंधी' ला सलाम....
निगेटिव्ह शेड्स मधल्या 'कविता संन्याल' ला सलाम ....
स्वत्वाची जाणीव करून देणाऱ्या 'सुलभा महाजन' ला सलाम .....
'स्मिता' तुला सलाम. !!!!

पण शेवटी स्मिता होणे नाही असंच म्हणावं वाटतं.

स्मिता

संस्कृतीकलासमाजचित्रपटआस्वादलेखप्रतिभा

प्रतिक्रिया

सानझरी's picture

17 Oct 2016 - 4:49 pm | सानझरी

सुंदर लेख!! फार आवडला..
दीप्ती नवल ने Smita and I अशी कविता लिहीलिये..

Always on the run
Chasing our dreams
We met each time

At baggage claims
VIP lounges
Check- in counters

Stood a while together
Among gaping crowds
Spoke, unspoken words

Yearning to share
Yet afraid, afraid
Of ourselves

All around us
People cheering, leering
And we, like spectacles
Amidst all the madness

Trying to live a moment
Of truth
A glance, a touch
A feeling to hold on to
And move on…

The last time we sat together
Waiting for a flight
I remember I’d said,

‘There must be another way
Of living this life!’

For a long time
You remained silent

Then,

Without blinking
Without turning
Said,

‘There isn’t’

Today
You are gone, and
I’m still running…

Still trying
To prove you wrong...

पुंबा's picture

17 Oct 2016 - 5:08 pm | पुंबा

अप्रतीम!

अभ्या..'s picture

17 Oct 2016 - 4:53 pm | अभ्या..

आह्ह्ह्ह,
स्मिता पाटील. डोळ्यात जीव होता राव सगळा.
अस्सल सौन्दर्य. अस्सल अभिनय.

सस्नेह's picture

17 Oct 2016 - 5:13 pm | सस्नेह

स्मिता म्हणजे तेज धारेची तलवार होती.
लेख छानच. पण त्रोटक वाटला. आर्ट आणि कमर्शिअल आशा दोन्ही प्रकारच्या चित्रपटातील भूमिका तितक्याच ताकदीने पेलणारी स्मिता ही एक अजोड अभिनेत्री होती. तिचा चेहेराच नव्हे, तर अंगप्रत्यंग बोलत असे. शब्दांनी अभिनय करण्याची कधी तिला गरज भासली नाही. भूमिका जगत असे ती.
अर्थ, मिर्च मसाला, भूमिका, मंथन, आखिर क्यू , अर्ध सत्य हे हिंदी आणि उंबरठा, जैत रे जैत, सामना सह काही थोडे मराठी असे चित्रपट तिच्या अभिनयाने गाजले.
खरोखरच स्मिता एक अद्वितीय अभिनेत्री होती. तिच्या स्मृतीला प्रणाम !!

महासंग्राम's picture

17 Oct 2016 - 5:16 pm | महासंग्राम

लेख छानच. पण त्रोटक वाटला.

लेख त्रोटक झालाय खरा, पण तिला शब्दात बांधणे खरंच कठीण. इथे माझे शब्द कमी पडतात. __/\__

गुणाला दीर्घायुष्याचं वरदान लाभायला हवं... नाहीतर ते चिरंतन वेदनेचं कारण बनतं....

अप्पा जोगळेकर's picture

17 Oct 2016 - 5:17 pm | अप्पा जोगळेकर

एवढ काही अद्वितीय वगैरे वाटत नाही. बरी होती.
स्मिता पाटील म्हटल की 'जैत रे जैत' चित्रपट आठवतो आणि डोक्यात तिडीक जाते.
दांडेकरांच्या सुंदर, चित्रदर्शी, वास्तव वाटेल अशा पुस्तकाची माती केली. तो मोहन आगाशे म्हणे नाग्या आणि ती स्मिता पाटील 'चिंधी'.
भंकस तेज्यायला.

स्वाती दिनेश's picture

17 Oct 2016 - 6:15 pm | स्वाती दिनेश

कायमच आवडत आलेली अभिनेत्री..(स्टार, नटी पेक्षा अस्सल अभिनेत्रीच ती..)
लेख आवडला, त्रोटक वाटला पण तिला शब्दात बांधणे इतके सोपेही नाही हे सुध्दा बरोबरच.
स्वाती

बोका-ए-आझम's picture

18 Oct 2016 - 9:42 am | बोका-ए-आझम

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या मधले तिचे एक्सप्रेशन्स निव्वळ अप्रतिम आहेत.
अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील अफाट होती. माझे सर्वात आवडते मिर्च मसाला, अर्थ, जवाब आणि मराठीत उंबरठा. जैत रे जैत ची गाणी सोडली तर बाकी चित्रपट गंडलेला आहे हे स्पष्ट मत आहे, पण गाण्यांमध्ये तिचा अभिनय अप्रतिम आहे, विशेषतः मी रात टाकली मध्ये.
तिने चित्रपट निवडताना दाखवलेला चोखंदळपणा राज बब्बरच्या वेळी कुठे गेला होता देव जाणे. विनाशकाले विपरित बुद्धी याचं हे दुर्दैवी उदाहरण आहे.

वटवट's picture

18 Oct 2016 - 10:37 am | वटवट

तिने चित्रपट निवडताना दाखवलेला चोखंदळपणा राज बब्बरच्या वेळी कुठे गेला होता देव जाणे.>>>>> पूर्णपणे सहमत... (ते तिचं व्यक्तिगत आयुष्य असलं तरी)

अनुप ढेरे's picture

18 Oct 2016 - 10:54 am | अनुप ढेरे

तिने चित्रपट निवडताना दाखवलेला चोखंदळपणा

"कसम पैदा करने वाले की" वगैरे सिनेमे विसरलात का? अजूनही आहेत बरेच :)

महासंग्राम's picture

18 Oct 2016 - 11:02 am | महासंग्राम

प्रत्येक कलाकार कधीही परीपूर्ण नसतो. किंबहुना तो त्याच हे अपूर्णत्व दूर करायचा कायम प्रयत्न करतो. त्यात कधी कधी चुकीचे निर्णय हि घेतले जातात. अगदी अमिताभ बच्चन सुद्धा याला अपवाद नव्हता.

चोखंदळपणा म्हणाल तिच्या समकालीन अभिनेत्रींच्या बाबतीत स्मिता पाटील हि कायमच सरस होती.
अर्थ, बाजार, मंथन या सारखे चित्रपट उदाहरण म्हणून देता येतील.

चुकीचे निर्णय म्हणण्यापेक्षा प्रॅक्टिकल निर्णय म्हणणं योग्य वाटेल. आर्ट सिनेमा करून कोणाचं पोट भरलं नाही. पैसे मिळवायला तुम्हाला काँप्रोमाइज करायला लागतचं. नसीरुद्दीन शहाने देखील स्पर्श सारखा सिनेमा फुकट केला. पण नंतर त्रिदेव/हिरो हिरालाल/ विश्वात्मा छाप कमर्शिअल सिनेमे देखील केले.

नाखु's picture

18 Oct 2016 - 9:44 am | नाखु

अमिताभच्या अगदी भरात असतानाही तिने थेट दखलपात्र अभिनय शक्तीमध्ये केला (दोन अत्यंत प्रभावी अभिनेते असूनही) आणि नमक हलाल मध्ये मिश्कील पणा अमिताभच्या तोडीस तोड रंगवला आहे.

सगळ्यांपेक्षा मिर्चमसाला फार वेगळ्या उंचीवरचा सिनेमा होता (लज्जा पेक्षा फार आधी आला होता म्हणून्च मी तो काळाच्या आधीचा होता असे म्हणेन)

अनुप ढेरे's picture

18 Oct 2016 - 10:06 am | अनुप ढेरे

स्मिता पाटलांची काही दुर्मीळ छायाचित्र इथे बघायला मिळतील.
http://scroll.in/article/758181/photos-smita-patil-loved-the-camera-and-...

उल्का's picture

18 Oct 2016 - 10:22 am | उल्का

लेख आवडला. स्मिता तर खूपच लाडकी. दीप्ती नवलची कविता पण आवडली. थँक्स इथे शेअर केल्याबद्दल.

स्मिता पाटील यांची आठवण हळवी करून गेली.

बबन ताम्बे's picture

18 Oct 2016 - 6:54 pm | बबन ताम्बे

मिर्च मसाला, मंडी, उंबरठा .... एकाहून एक सरस भूमिका

Smita Patil pencil sketch

महासंग्राम's picture

19 Oct 2016 - 9:21 pm | महासंग्राम

सर्वांचे मनापासून धन्यवाद !!!!

आपलाच
मंदार