बोट – Girl In Every Port

स्वीट टॉकर's picture
स्वीट टॉकर in जनातलं, मनातलं
19 Jul 2016 - 4:27 pm

Girl In Every Port हे वाक्य ऐकल्यावर डोळ्यासमोर असं चित्र उभं राहातं – समुद्रकिनार्यावर एक सुंदर मुलगी बंदरात शिरणार्या बोटीकडे प्रेमाने भरलेल्या नजरेनी बघतिये आणि बोटीच्या पुढच्या टोकाला उभा असलेला कॉमिकमधल्या पॉपॉय (Popeye) सारखा एक खलाशी तिला फ्लाइंग किस देतोय. बोट बंदराला लागल्या लागल्या तो तिच्याकडे धाव घेतो. बोट निघायची वेळ झाली की हाच सीन जरा वेगळा. तो मान अवघडेपर्यंत वळून वळून तिच्याकडे बघत बोटीवर चढतो. ती अश्रुपूर्ण डोळ्यांनी त्याला निरोप देते. आणि त्याच्या पुढच्या ट्रिपची वाट बघायला सुरवात करते!

वास्तव असं थोडंच असतं? फार थोड्या बोटी अशा असतात की त्या पुनःपुन्हा त्याच बंदरात जातात. बहुतांशी बोटी या रिक्षा किंवा टॅक्सीसारख्या असतात. जिथे भाडं मिळेल तिथे जायचं. क्वचितच असं ही होऊ शकेल की दहा दिवसात परत त्याच बंदरात परततील, किंवा आयुष्यात परत कधीच येणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रेमात मुली पडण्याचा प्रश्नच नाही. मग खलाशांच्या गळ्यात गळे घालून मुंबईच्या बॅलार्ड पियरजवळ फिरताना दिसायच्या त्या कोण? त्या धंदा करणार्या.

वीस पंचवीस वर्षांपूर्वी अशी स्थिती होती की बॅन्कॉकला बोट गेली की सगळ्यात आधी बायकांची टोळी बोटीवर हजर व्हायची. येणार्या जाणार्या प्रत्येकाकडे बघून लाडिक “हेलो हॅन्सऽऽऽम” चालायचं. दिसायला कितीही छोट्या दिसल्या तरी यांना कोणी ‘गर्ल’ म्हणू शकेल काय? जर त्यांना वर यायला मज्जाव केला तर बोटीवरील माल उतरवायचं किंवा चढवायचं काम करायला बंदरातले लोक यायचेच नाहीत. बोटीचं भाडं तासाला हजारो रुपये असतं. शेवटी बायकांना येवू द्यावंच लागायचं. मगच बोटीचं काम सुरळित सुरू व्हायचं.

पुढे जगभर दहशतवाद बोकाळल्यामुळे सगळीकडेच बंदरांची आणि बोटींची सिक्युरिटी महत्वाची झाली. त्या मुलींना बंदरात प्रवेश मिळेनासा झाला आणि ही प्रथा संपुष्टात आली.

जगभर धंदा करणार्या लाखो बायका आहेत. जगातले सगळे मिळून खलाशी देखील तेवढे नसतील. अर्थातच या बायकांची आमदनी मुख्यत्वे भूवासियांकडूनच येत असणार. फक्त खलाशांवर अवलंबून राहिल्या तर उपासमारच होईल. मग ‘ गर्ल इन एव्हरी पोर्ट’ हा वाक्प्रचार प्रचलित होण्याचं कारण काय? याची कित्येक कारणं आहेत. आता ‘आहेत’ म्हणण्यापेक्षा ‘होती’ असं म्हणायला हवं कारण आता दारू आणी सिगरेटप्रमाणे ही देखील कालबाह्य होत चालली आहेत.

पूर्वी बोटींचं जमिनीशी आणि एकमेकांशी संभाषण ‘मोर्स कोड’ वापरून व्हायचं. (टिंब, डॅश म्हणजेच डिड्, डा म्हणजेच ‘a’ वगैरे.) त्याला दोन्हीकडे रेडियो ऑफिसर लागायचे. म्हणजे घरच्यांशी संभाषणाचा प्रश्नच येत नाही. पत्रांद्वारेच संपर्क. ती सिस्टिम बेभरवशाची होती. पण त्याचं कारण पोस्टाची अकार्यक्षमता अजिबात नव्हे. आमच्या बोटींचाच प्रोग्रॅम सतत दोलायमान. जिकडे माल चढवायचा किंवा उतरवायचा आहे ती बंदरं कित्येक वेळा बदलायची. (याची कारणं कमर्शियल आहेत त्यात आत्ता शिरायला नको.) जर कंपनीने वेळच्या वेळात पत्रांचं पार्सल (कुटुंबीयांनी पत्र नेहमी कंपनीलाच पाठवायची. कंपनी सगळ्या पत्रांचं एक पार्सल बनवून पुढे पाठवायची.) एका बंदरावरच्या एजंटकडे पाठवलं आणि ते बंदर रद्द झालं तर एजंटला फारसे पैसे मिळायचे नाहीत. मग त्याच्याकडून या आलेल्या पार्सलबद्दल हयगय व्हायची. तो ते वेळेत परतही पाठवायचा नाही, ना पुढच्या बंदराला. शिवाय आता ते पत्रांच्या रूपात नसून पार्सलच्या रूपात असल्यामुळे पोस्टाबरोबर कस्टम्सचा ही सहभाग असायचा. कित्येक गठ्ठे गहाळ व्हायचे.

असं होऊ नये म्हणून कंपनी बंदर पक्कं ठरेपर्यंत पत्र पाठवायची नाही. यात कधीकधी फार उशीर व्हायचा आणि बोट निघून गेल्यानंतर पत्र तिथे पोचायची. कधी नंतर लिहिलेलं पत्र आधी आणि आधी लिहिलेलं नंतर बोटीवर पोचायचं. वाचताना काही संदर्भच लागायचा नाही. एक न एक. नकटीचं लग्नं.

आई-वडील, पत्नी किंवा मुलं यांच्याशी संपर्क फार कमी झाला की प्रेमाचे पाश शिथिल होतात. विवेकाचा अंकुशही बोथट होतो.

पूर्वी सगळं जगच धीम्या गतीनी चालायचं. बोट बंदरात गेली की आठवडाभर तरी राहायचीच. खलाशांकडे भटकायला जास्त वेळ असायचा. शॉपिंग करून झालं की बारमध्ये जाणं हे नित्यनेमाचं असायचं. तिथे मदिरेबरोबर मदिराक्षीही घुटमळंत असायच्याच.

रक्तात अल्कोहोल, भरीस पाडायला मित्रमंडळी, खिशात बर्यापैकी पैसे , भोवती बारबाला आणि जाब विचारणारं कोणी नाही. कित्येकांचा पाय घसरायचा, काहींचा नियमितपणे.

मात्र दर्यावर्दींच्या आयुष्याविषयी भूवासियांना गूढ आकर्षण असतं. त्यामुळे सुट्टीवर आल्यानंतर याचं जे वर्णन मित्रमंडळींना केलं जायचं (अजूनही जातं) त्यात ती मुलगी धंदेवाईक नसून दुकानातली सेल्सगर्ल, ऑफिसमधली असिस्टंट किंवा तत्समच असायची. असं म्हणतात की आपण तीन वेळा मोठ्याने खोटं बोललो की ते आपल्यालाच खरं वाटायला लागतं. त्यामुळे बाकीच्या जगालाच नव्हे, तर खुद्द दर्यावर्दींनादेखील आपण कॅसिनोव्हा आहोत असं वाटायला लागलं.

तात्पर्य काय, तर ‘गर्ल इन एव्हरी पोर्ट’ ही कित्येक दर्यावर्दींच्या बाबतीत रिऍलिटी असते, पण त्या ‘गर्ल’ नसतात.

बाकीच्या दर्यावर्दींच्या बाबतीत ही गर्ल व्हर्चुअल असते.

त्यांच्या थापांवर विश्वास ठेवणार्या भूवासियांच्यासाठी ती व्हर्चुअल रिऍलिटी असते.

“ते थापा मारतात” असं लिहून मी त्यांच्या या सवयीवर पांघरूण घालायचा प्रयत्न करतो आहे का? तसं नाहिये. पण वस्तुस्थिती अशी आहे की आपल्या लैंगिक क्षमता आणि कर्तृत्व यांबाबत खुशाल थापा मारणे हा युवकांचा स्थायी स्वभाव आहे. दैनंदिन जीवनात “अमुक अमुक मुलगी माझ्यावर फिदा आहे” अशी थाप तो मारूच शकंत नाही कारण लगेचच त्याचं पितळ उघडं पडतं. मात्र जेव्हां काही सिद्ध करावं लागत नाही तेव्हां? सर्वेक्षणांना दिलेल्या उत्तरांमध्ये याची प्रचीती येते.

दर दोन वर्षांनी ‘इंडिया टुडे’ चा ‘Survey of India’s Sex Habits’ किंवा तत्सम नाव असलेलं मुख्य फीचर असलेला अंक येतो. खरं तर वीस-पंचवीस वर्षांपूर्वी मुलामुलींच्या मिसळण्यावर बर्यापैकी निर्बंध होते. पण इंडिया टुडेमधले भन्नाट आकडे वाचून असं चित्र उभं राहायचं की कॉलेजांच्या गच्च्या आणि अर्ध्या-एक तासासाठी रूम भाड्यानी देणारा कळकट लॉज या दोन्हींमध्ये सारख्याच प्रमाणात लफडी चालतात!

‘इंडिया टुडे’ वर माझा पूर्ण विश्वास. मात्र डोळ्यानी जी स्थिती दिसायची ती काही इतकी भयानक नक्कीच नव्हती. या दोन्हीची सांगड घालता येईना.

याचा उलगडा कालांतराने झाला. मी तेव्हां सिंदिया स्टीमशिप्स या कंपनीत काम करीत होतो. बॅलार्ड पियरच्या आमच्या कंपनीच्या मुख्य कचेरीत आमचा एक कोर्स चालू होता. तिथे कुठल्याशा नियतकालिकाचा प्रतिनिधी स्मग्लिंगबद्दल सर्वेक्षण करायला आला होता. त्या काळात स्मग्लिंग खूप चालायचं कारण सर्वच आयात केलेल्या वस्तूंवर कस्टम्स ड्यूटी भरमसाठ होती. बोटीवरच्या काही लोकांचाही त्यात हात असायचा त्यामुळे आमच्या ऑफिसमध्ये प्रतिनिधी आला होता सर्वेक्षण करायला.

अंडरवर्ल्डच्या भाई लोकांच्या पिक्चरमधल्या उदात्तीकरणामुळे त्यांची एक खोटी प्रतिमा निर्माण केली जाते. वास्तवात ते जग भयंकर cut throat आहे. नको त्या गोष्टी आपण बघणं देखील आपल्या तब्येतीच्या दृष्टीनी बरं नाही. बोटीवरच्या फारच थोड्या जणांचा स्मग्लिंगमध्ये सक्रीय भाग असायचा. पण माझ्या बरोबरच्या ऑफिसर्सनी त्या प्रतिनिधीसमोर असली वर्णनं केली जणु ते सगळेच जण युसुफ पटेल आणि हाजी मस्तानचे लंगोटीयारच आहेत! स्तंभामध्ये ते छापून आलं देखील! तेव्हांपासून माझा सर्वेक्षण आणि त्यावरून काढलेले निष्कर्ष यांच्यावरचा विश्वासच उडाला.

तात्पर्य काय, तर मुलींनी आपल्यावर भाळावं अशी सगळ्यांचीच सुप्त इच्छा असते त्यामुळे चान्स मिळाला की ते वाट्टेल त्या थापा मारतात. खरं तर मुली हुशार असतात. त्या भाळंत बिळंत काही नाहीत.

काही थोड्यांच्या बाबतीत मात्र ‘Girl In Every Port’ हे अगदी खरं होतं. कसं ते सांगतो.

जेव्हां कम्युनिस्ट सत्तेवर होते तेव्हां रशियाच्या प्रत्येक बंदरात InterClub नावाची ऑर्गनाइझेशन असायची. या InterClub नी चालवलेले बार आणि Convenience Centers प्रत्येक रशियन बंदरात असायचे. त्यात इंग्लिश उत्तम बोलणार्या मुली असायच्या. त्यांचं काम म्हणजे खलाशांसाठी सहली, प्रेक्षणीय स्थळांना भेटी आयोजित करायच्या, भाषेमुळे ज्या काही अडचणी त्यांना येण्याची शक्यता आहे त्यात मदत करायची, इन्टरक्लबमध्ये पार्ट्यांच्या वेळी त्यांच्या बरोबर डान्स करायचा वगैरे वगैरे. हे सर्व करीत असताना जगाला तारायला कम्युनिझमच कसा सर्वोत्तम उपाय आहे याचं आमचं बौद्धिक त्या वाक्यावाक्याला घेत असायच्या. खरं तर हेच त्यांचं मुख्य काम होतं. त्यासाठीच इन्टरक्लब्सची स्थापना तिथल्या सरकारने केली होती.

तेव्हां रशियामध्ये प्रत्येक वस्तूचा तुटवडा असायचा. त्याबद्दल एक विनोद होता – रशियन मनुष्याला कुठल्याही दुकानासमोर रांग लागलेली दिसली की प्रथम तो त्या रांगेत सामील होतो. नंतर चौकशी करतो ती रांग कशासाठी आहे त्याची!

सामान्य रशियन नागरिकाचं जीवन खडतर होतं. एखाद्या विदेशी ऑफिसरच्या प्रेमात पडून लग्न करून देश सोडणे हा एक त्यातून सुटण्याचा मार्ग होता. त्याकरता त्या मुलींना खूपच प्रयत्न करायला लागायचे कारण कम्युनिस्ट राजवटीत कुठलीच गोष्ट सोपी नव्हती. कित्येक बोटी रशियाच्या तीन तीन बंदरांवर माल उतरवंत. या मुली बोटीच्या पाठोपाठ ट्रेननी त्या त्या बंदराला जाऊन त्यांच्या दर्यावर्दी प्रियकरांना भेटत. या थोड्या दर्यावर्द्यांच्या बाबतीत मात्र ‘Girl In Every Port’ हे शब्दशः खरं होतं. त्या ‘गर्ल’ होत्या आणि ‘एव्हरी पोर्ट’ला असायच्या!

लग्न करून भारतात आल्यावर त्या खूपच एकट्या पडंत पण बहुतेक सगळ्यांनीच व्यवस्थित संसार केला. मात्र नव्वद सालानंतर कम्युनिझम कोसळल्यामुळे रशियामध्ये खूपच बदल झाले. सामान्य माणसाचं जीवनमान सुधारलं. कित्येक बायका नवरेमुलांसकट रशियाला (किंवा एस्टोनिया, लॅटविया वगैरेला, जे पूर्वी रशियाच्या अधिपत्याखाली होते) परत गेल्या. काही घटस्फोट घेऊन गेल्या, काही इथेच राहिल्या.

ज्याला बघून मुली विरघळून जातील असा राजबिंडा तरूण आस्तित्वात आहे की नाही मला माहीत नाही. पण असलाच तर तो सिनेसृष्टीत जायचं सोडून बोटीवर धक्के खायला थोडाच जाईल?

कथाजीवनमानkathaaप्रवासदेशांतरनोकरीलेखअनुभव

प्रतिक्रिया

नाखु's picture

19 Jul 2016 - 4:36 pm | नाखु

व रोचक माहीती, आणि परिघाबाहेरच जग. एक कुतुहल जे थोडं फार तुमच्यामुळे सम्जतयं.

पुभाप्र

टवाळ कार्टा's picture

19 Jul 2016 - 4:37 pm | टवाळ कार्टा

भारी :)

मी-सौरभ's picture

19 Jul 2016 - 5:41 pm | मी-सौरभ

आमच्या टक्कुच्या प्रत्येक धाग्यावर मैत्रिणी आहेत असे प्रास दादा म्हणत होते, असे मी कुणाकडून तरी ऐकले.
ख खो दे जा

अजया's picture

19 Jul 2016 - 4:41 pm | अजया

बोटीच्या आतलं खरं जग तुमच्यामुळे आम्हाला दिसतंय! पुभाप्र.

चंपाबाई's picture

19 Jul 2016 - 4:42 pm | चंपाबाई

छान... मायग्रेशन -- एस टी डी -- एच आय व्ही हे सगळे पुस्तकात शास्त्रीय भाषेत वाचले आहे. ललित भाषेत वाचुन छान वाटले.

बोटींवरचं हे सुरस, चमत्कारिक असं हे अद्भूत विश्व तुम्ही सुंदर शैलीत आमच्यासमोर उभं करता आहात.

महासंग्राम's picture

19 Jul 2016 - 4:47 pm | महासंग्राम

सहीच विषय ...

उगाच नानावटी केसची आठवण झाली

आदूबाळ's picture

19 Jul 2016 - 4:54 pm | आदूबाळ

क्या बात, क्या बात!

जिकडे माल चढवायचा किंवा उतरवायचा आहे ती बंदरं कित्येक वेळा बदलायची. (याची कारणं कमर्शियल आहेत त्यात आत्ता शिरायला नको.)

ही काय कारणं आहेत? डिमरेज? पोर्टमधल्या वेटिंग लिस्टा?

मी-सौरभ's picture

19 Jul 2016 - 5:41 pm | मी-सौरभ

और भी आन्दो!!

मुक्त विहारि's picture

19 Jul 2016 - 5:51 pm | मुक्त विहारि

धन्यवाद

खेडूत's picture

19 Jul 2016 - 5:55 pm | खेडूत

-. .. -.-. . / .- .-. - .. -.-. .-.. .

अर्थात लेख खूप आवडला!!

शि बि आय's picture

19 Jul 2016 - 6:05 pm | शि बि आय

नविन जगाशी ओळख करून देताय त्याबद्दल धन्यवाद.
पुलेप्र

सुबोध खरे's picture

19 Jul 2016 - 7:18 pm | सुबोध खरे

आपल्या लेखनामुळे पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. एक तर नौदलात असल्यामुळे हे जग खूप जवळून पाहिलेले आहे शिवाय नौदलातील अनेक निवृत्त अधिकारी/ मित्र /रुग्ण म्हणून या गोष्टी अनेकदा ऐकायला मिळत.
अशा गर्ल्स चा एक अनुभव-- मी विक्रांत वर असताना(१९९०) आमचा एक इंजिनियर मित्र टायगरगेट( बॅलार्ड पियर कडून) मधून बाहेर पडून कुलाब्याकडे( नौदलाच्या मेस मध्ये) साधारण ६-६.३० ला मोटार सायकलने जात असे. तेंव्हा रिझर्व्ह बँकेच्या स्टॊपवर त्याला एक टापटीप कपडे घातलेली मुलगी दिसत असे. एक दिवस धीर करून त्याने तिला लिफ्ट हवी आहे का ते विचारले. तिने पण आनंदाने हो म्हटले. मग ती त्याच्या मागे बसली. आता याने तिला विचारले तुला कुठे जायचंय? ती म्हणाली तू जिकडे नेशील तिकडे.
यावर तो हादरला. त्याला लक्षात आले ही "तसली स्त्री" आहे. पुढे म्युझियमशी आल्यावर प्रसंगावधान राखून तो तिला म्हणाला. मला एक मिनिट पोलीस मुख्यालयात काम आहे. त्यावर ती म्हणाली मी बाहेरच थांबते, तू जाऊन ये. याने एक गेट मधून मोटारसायकल आत नेली आणि दुसऱ्या गेटने पोबारा केला. त्या दिवसानंतर पुढे बरेच दिवस तो लायन गेट मधून बाहेर जात असे.( आम्ही त्याला चिडवत पण असू)
सांगण्याचा मुद्दा असा की तेंव्हा अशा गर्ल्स मुंबईत पण सहज "उपलब्ध" असत आणि बोटीवरच्या माणसांकडे त्या "लक्ष" ठेवून असत.

सुबोध खरे's picture

19 Jul 2016 - 7:27 pm | सुबोध खरे

ती मित्र नौदलाच्या मेस मध्ये कुलाब्याला राहत असे आणि गणवेशात येत जात असे

बोका-ए-आझम's picture

19 Jul 2016 - 7:21 pm | बोका-ए-आझम

छान लेख!

एस's picture

19 Jul 2016 - 7:24 pm | एस

:-)

मृत्युन्जय's picture

19 Jul 2016 - 7:28 pm | मृत्युन्जय

मस्त लेख. डॉक्टरांचा प्रतिसाद देखील मजेशीर

पिशी अबोली's picture

19 Jul 2016 - 7:34 pm | पिशी अबोली

वेगळंच जग आहे. सुरस आणि चमत्कारिक. तुम्ही खूप छान लिहिता हे सगळंच..

पण असलाच तर तो सिनेसृष्टीत जायचं सोडून बोटीवर धक्के खायला थोडाच जाईल?

पण बोटीवर असणाऱ्या मुलांबद्दल फार फार आकर्षण असतं बऱ्याच जणींना हे मात्र खरं आहे. ते म्हणजे हॅण्डसमच असणार अशी बऱ्याच मुलींना फार खात्री असते.. :D

युनिफॉर्म गं कडक युनिफॉर्म ;)

लेख खुप च सुंदर आहे. एक वेगळाच दृष्टीकोन आणि तो देखील तुमच्या स्वतःच्या अनुभवातुन आलेला ! तुमचे लेख आले की मी आवर्जुन वाचतेच. कधी ही निराशा होत नाही.

लडकियां तो युनिफॉर्मवालों पे मरती है : रंग दे बसंती

हाहा, खोटं नाही फार त्यात ;)

कैलासवासी सोन्याबापु's picture

20 Jul 2016 - 11:36 pm | कैलासवासी सोन्याबापु

महाराष्ट्रातल्या मुली फट्टू असतात (जनरलायझेश नाही तर वैयक्तिक अनुभव) अर्ध्याहून जास्त फक्त आयटीवाला अन पिंपळे सौदागरात फ्लॅट इतकीच आस लावून बसलेल्या भेटल्या, शेवटी राजपुतान्या मधल्या एका अनिवासी मराठी शेरनी ने होकार दिला तेव्हा ह्या शिपुरड्याचं लगीन झालं

टवाळ कार्टा's picture

21 Jul 2016 - 12:09 am | टवाळ कार्टा

कचकुन सहमत

तू काय सहमत रे आणि? तू आर्मीत आहेस का?

पिशी अबोली's picture

21 Jul 2016 - 11:10 am | पिशी अबोली

उग्गाच आपला एक विनोदनिर्मितीचा बारीकसा प्रयत्न गं त्याचा..आपला लाडका आहे ना, समजून घ्यायचं.. ;)

@टक्कूमक्कूशोनु- अच्चं जालं तल. होईल हं होईल लग्न. ललायचं नाई..

संदीप डांगे's picture

21 Jul 2016 - 1:09 am | संदीप डांगे

ओ शिपुरडे, तुम्ही पण ना!

मुलीने आपल्यावर मरणे आणि आपल्याशी लग्न करणे दोन येगळ्या गोठी हायेत, समजत नै का!

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Jul 2016 - 11:15 am | कैलासवासी सोन्याबापु

येऊद्या बोधामृत बयाजवर!

स्रुजा's picture

21 Jul 2016 - 3:36 am | स्रुजा

देवा! हा कुठला नवीन ट्रॅक सुरु केलात बापू? या बाबतीत अगदी स्वानुभव तर सोडा पण जवळपासच्या नात्यांमध्ये कुणी मुलगा च नाही आर्मीत तर त्याच्या साठी बघितलेल्या पोरींचे अनुभव कुठुन माहिती असणार ! तस्मात पास.

चिनार's picture

21 Jul 2016 - 9:52 am | चिनार

अर्ध्याहून जास्त फक्त आयटीवाला अन पिंपळे सौदागरात फ्लॅट इतकीच आस लावून बसलेल्या भेटल्या,

या वाक्याला अगदी शब्दश: नसले तरी लय वेळा अनुमोदन !
कितीतरी मुलींना अगदी वेल सेटल्ड बिझीनेस असलेल्या मुलापेक्षा नोकरीवाला बरा असं वाटते. आणि नोकरी म्हणजे आयटी हे समीकरण पक्कं आहे.
पिंपळे सौदागरात फ्लॅट म्हणजे तर सोन्याहून पिवळं...

जव्हेरगंज's picture

19 Jul 2016 - 9:58 pm | जव्हेरगंज

अजून वाचायला आवडेल!!

झेन's picture

19 Jul 2016 - 10:11 pm | झेन

नेहमीप्रमाणेच खुसखुशीत लेखन आणि बोटीवरील दुनियेची अजून एक सफर. "तात्पर्य काय, तर मुलींनी आपल्यावर भाळावं अशी सगळ्यांचीच सुप्त इच्छा असते त्यामुळे चान्स मिळाला की ते वाट्टेल त्या थापा मारतात. खरं तर मुली हुशार असतात. त्या भाळंत बिळंत काही नाहीत." हे बरिक खरं.

लाल टोपी's picture

20 Jul 2016 - 5:33 am | लाल टोपी

अतिशय उत्तम शैलीतले तुमचे सर्वच लेख वाचले आहेत. प्रतिक्रिया मात्र आजच देत आहे. तुमचे लेख एका नव्याच विश्वात घेऊन जातात. पु.ले.शु.

विलक्षण रोचक लेख. वेगळं जग. धन्यवाद.

चलत मुसाफिर's picture

20 Jul 2016 - 8:08 am | चलत मुसाफिर

स्वप्नरंजन आणि वास्तव यातला फरक मिस्किलपणे पण थेट प्रकारे समोर आणणारा लेख.

संत घोडेकर's picture

20 Jul 2016 - 8:20 am | संत घोडेकर

छान!
वेगळ्या जगाची ओळख झाली.

प्रमोद देर्देकर's picture

20 Jul 2016 - 8:46 am | प्रमोद देर्देकर

आम्हाला एक वेगळं जग दाखवत आहात.
धन्यवाद.

छान लेख. "एमटी आयवा मारु"ची आठवण झाली .

मदनबाण's picture

20 Jul 2016 - 11:39 am | मदनबाण

सुरेख लेखन ! :)

खरं तर मुली हुशार असतात. त्या भाळंत बिळंत काही नाहीत.
संपूर्ण लेखाचे सार ! :) आपण काय हाव-भाव केले कि त्याचे काय परिणाम होतात ते पाखरांना व्यवस्थित ठावूक असतं. ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hello (Adele) - Indian Classical Version

गामा पैलवान's picture

20 Jul 2016 - 12:46 pm | गामा पैलवान

स्वीट टॉकर,

>> खरं तर मुली हुशार असतात. त्या भाळंत बिळंत काही नाहीत.

म्हणजे अनंत सामंत यांच्या कथांत नायकावर भाळलेली बड्या बापाची सुंदर पोरगी खोटीच होती तर! हाय रे दैवा! ;-(

आ.न.,
-गा.पै.

स्नेहल महेश's picture

20 Jul 2016 - 12:52 pm | स्नेहल महेश

वेगळ्या जगाची ओळख झाली

निर्धार's picture

20 Jul 2016 - 1:23 pm | निर्धार

अरबी कथांसारख्या सुरस आहेत तुमच्या गोष्टी..
"आई-वडील, पत्नी किंवा मुलं यांच्याशी संपर्क फार कमी झाला की प्रेमाचे पाश शिथिल होतात. विवेकाचा अंकुशही बोथट होतो." :(

स्वीट टॉकर's picture

20 Jul 2016 - 1:29 pm | स्वीट टॉकर

सर्वजण,
धन्यवाद!

मी-सौरभ : नवी मुंबैमधल्या महाकट्ट्याच्या रिपोर्टमधला टक्याचा गौरांगनांबरोबरचा खेचाखेचीचा फोटो पाहिला का? विघ्नसंतोषी लोक असं ही म्हणतात की ती कमाल फोटोशॉपची आहे. अजिबात नव्हे. टक्याची आहे.

मंदार भालेराव - नाणावटी केस खूपच वेगळी आहे. त्यात त्याची बायको खरोखरंच दुसर्याच्या प्रेमात पडली होती.

आदूबाळ - समजा तीस हजार टन गहू घेऊन बोट येत आहे, तर ज्याने ती बुक केलेली असते तो काही या तीस हजार टनांचा अंतिम विक्रेता नसतो. तो डिस्ट्रिब्यूटर असतो. त्याने समजा सहा मोठ्या व्यापार्यांना पाच पाच हजार टन विकले. हे व्यापारी देशभर विखुरलेले असतात. प्रत्येकापर्यंत माल पोहोचवायला किती खर्च येईल याची गणितं मांडली जातात. वेगवेगळी बंदरं वापरावी लागतात. त्यात एखादे वेळेस ओरिजिनल ठरलेलं बंदर अजिबात नसतंच.
शिवाय तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्या बंदराला गर्दीमुळे फार दिवस थांबायला लागेल असं वाटलं तर दुसरीकडे जाणं सोयीचं ठरतं. (वाचकांना 'डेमरेज' माहीत नसेल.) जर एखाद्या बोटीला बंदरानी सांगितलं की अमुक तारखेला तुम्हाला आत घेऊ आणि अमुक दिवसात मोकळं करू आणि जर ते तसं करू शकले नाहीत तर बंदर नुकसानभरपाईपोटी बोटीला दर दिवशी अमुक रक्कम देतं. याला 'डेमरेज' असं म्हणतात.

खेडूत - मला आधी वाटलं की तुम्ही मोर्स कोडमध्ये काही शब्द लिहिले आहेत. पण असं वाटंत नाही.

खरेसाहेब - तुमची कॉन्ट्रिब्यूशन नेहमीप्रमाणेच मजेदार!

पिशी अबोली - 'ते म्हणजे हॅण्डसमच असणार अशी बऱ्याच मुलींना फार खात्री असते.. :D' यावरून आठवलं. हल्ली जवळ जवळ प्रत्येक मुलगी उन्हावार्यापासून चेहरा जपण्यासाठी सबंद चेहरा स्कार्फनी झाकते. दिसलेच तर फक्त डोळे नाहीतर त्यावरही गॉगल. त्यावर एक मित्र म्हणाला, "या त्यांच्या सवयीमुळे शहरातली प्रत्येक मुलगी अफलातून सुंदर आहे अशी कल्पना करायला आपण मोकळे होतो."

सर्वजण - पुन्हा एकदा धन्यवाद!

जर एखाद्या बोटीला बंदरानी सांगितलं की अमुक तारखेला तुम्हाला आत घेऊ आणि अमुक दिवसात मोकळं करू आणि जर ते तसं करू शकले नाहीत तर बंदर नुकसानभरपाईपोटी बोटीला दर दिवशी अमुक रक्कम देतं. याला 'डेमरेज' असं म्हणतात.

हांए? मला असं वाटत होतं की बोटीच्या मालकाला आणि अन्य इंट्रेस्टेड पार्ट्यांना (उदा. हॉलिएर) हे डिमरेज चार्जेस चार्टरर** देतो. या त्याच्यासाठी उगाचच उद्भवलेला खर्च असतो, म्हणून तो नजीकच्या बंदरात माल उतरवून तोटा कमी करायचा प्रयत्न करतो.

**इंपोर्टर म्हणत नाही कारण चार्टरर आणि इंपोर्टर वेगवेगळे असू शकतात.

टवाळ कार्टा's picture

20 Jul 2016 - 2:11 pm | टवाळ कार्टा

नवी मुंबैमधल्या महाकट्ट्याच्या रिपोर्टमधला टक्याचा गौरांगनांबरोबरचा खेचाखेचीचा फोटो पाहिला का? विघ्नसंतोषी लोक असं ही म्हणतात की ती कमाल फोटोशॉपची आहे. अजिबात नव्हे. टक्याची आहे.

आयला...बघा...इथे कोणी विश्वासच ठेवत नव्हते...बरे झाले तुम्हीच सांगितलेत =))

वरुण मोहिते's picture

20 Jul 2016 - 1:30 pm | वरुण मोहिते

आताही गोकुळ बार मुंबई ह्या रोड वर इथे हा प्रकार चालतोच की...fakta गर्ल्स ऑन एव्हरी पोर्ट बाबत म्हणत आहे ..बाकी तर सगळीकडेच चालत .

चिनार's picture

20 Jul 2016 - 1:53 pm | चिनार

मस्त लिखाण !!
अजुन येउ द्या स्वीट टॉकरजी !!

कैलासवासी सोन्याबापु's picture

20 Jul 2016 - 3:33 pm | कैलासवासी सोन्याबापु

उत्तम अन वास्तववादी परामर्श घेतलात सर एका नाजूक विषयाचा, ही लेखमाला जर २००३-०४ दरम्यान वाचण्यात आली असती तर कदाचित आमच्या पालकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळून आम्ही दर्यावर्दी झालो असतो! असो, खोया उसका गम नही पाया किसीसे कम नही :)

अजून एक म्हणजे, तुम्ही थाई मुलींचे (गर्ल्स) चे उदाहरण दिलेत, त्या हळूहळू गोदीतून कश्या हद्दपार झाल्या ते पण समजवलेत तरी बरीच जनता (मिपाबाह्य) अजूनही "माय जॉली सेलर बोल्ड" गाण्यासारखाच विचार करते! व्हिक्टोरियन काळातील ह्या काही निवडक गाण्यांमुळे अन त्यांच्या आजही प्रसिद्ध असण्यामुळे गैरसमज वाढतात असे वाटते, आधीच महासागर अनंत रहस्य दडवून असलेले, त्याला थोडा हैदोस टाईप तडका मारला की अजून खमंग रेसिपी तयार होतात बहुदा!

चिनार's picture

20 Jul 2016 - 8:38 pm | चिनार

हैदोस!!! तुम्ही साहीत्यविश्वातल्या "त्या" अनमोल खजान्याविषयी बोलताय का बाप्पू ?

कपिलमुनी's picture

20 Jul 2016 - 9:04 pm | कपिलमुनी

याच्या अधिक माहिती साठी मवाळ पोर्ट्याला विचारा =))

नेहमी प्रमाणे माहितीपुर्ण आणि खुसखुशीत लेख. डॉ. साहेबांचा किस्सा पण भारीय.

यशोधरा's picture

20 Jul 2016 - 9:11 pm | यशोधरा

मस्त लिहिता तुम्ही.

अभिजीत अवलिया's picture

20 Jul 2016 - 9:13 pm | अभिजीत अवलिया

भारी किस्सा. दर्यावर्दी व्ह्यायची खूप इच्छा होती. पण त्यासाठी काय करावे लागते हेच माहीत नसल्याने नाही होऊ शकलो. मी 10 वीत असताना मिपा असायला पाहिजे होते आणि घरी नेट.

स्वीट टॉकर's picture

20 Jul 2016 - 10:39 pm | स्वीट टॉकर

आदूबाळ - तुमचं म्हणणं देखील बरोबर आहे. मी सुलभीकरणासाठी डेमरेजचं एकंच अंग सांगितलं. जर बंदरानी आधीच सांगितलं असेल की तुम्हाला अमुक दिवस थांबायला लागेल तर ते डेमरेज देत नाहीत. जर चार्टररने दर दिवशी इतके डॉलर अशा करारावर बोट घेतली असेल तर तो दर दिवशीप्रमाणे पैसे देत राहातो आणि डेमरेजचा प्रश्न उद्भवत नाही. जर बोट व्हॉयेज चार्टर वर घेतली असेल तर बोटीचं नुकसान कोणालातरी भरून द्यावच लागतं. कधी चार्टरर तर कधी बंदर. फार खोलात शिरलं की वाचणार्यालाही कंटाळा येतो म्हणून मी ते टाळण्याचा प्रयत्न करतो.

सोन्याबापू - खोया उसका गम नही पाया किसीसे कम नही| मस्त वाक्य आहे!

अभिजित - You haven't missed much. बोटीवर जाण्याचे तोटे देखील बरेच आहेत.

निओ's picture

18 Nov 2016 - 1:27 am | निओ

>>आई-वडील, पत्नी किंवा मुलं यांच्याशी संपर्क फार कमी झाला की प्रेमाचे पाश शिथिल होतात. विवेकाचा अंकुशही बोथट होतो.
हे आवडले.

खोया उसका गम नही पाया किसीसे कम नही .....
समांतर : जो गया वो ख्वाब है | जो पाया वो लाजबाब है

स्वीट टॉकर's picture

18 Nov 2016 - 3:21 pm | स्वीट टॉकर

नियो आणि अविनाश - :)