✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बोट - वादळवारा

स
स्वीट टॉकर यांनी
Mon, 03/14/2016 - 16:38  ·  लेख
लेख
नोकरीसाठी गेल्यावर सायकोमेट्रिक परीक्षा घेतात त्यात असे प्रश्न असतात – लाल रंगाची वस्तू सांगा म्हटल्यावर तुमच्या मनात खालील चारपैकी कुठली वस्तु आधी येते? लाल गुलाब, ट्रॅफिक सिग्नल, रक्त, आगीचा बंब. यात बरोबर/चूक असं उत्तर नसतंच. पण तुमच्या उत्तरावरून तुमच्या विचारधारेची कल्पना येते (असं म्हणतात तरी). तसं ‘बोट’ म्हटलं की भूवासियांच्या मनात लगेच ‘वादळ’ हे येतंच. आणि त्यात चूक काहीच नाही. वादळाबद्दल उत्सुकता आणि भीती सगळ्यांना असतेच. आपल्या वाचण्यात येतं की आन्ध्र प्रदेशला किंवा बांगलादेशला चक्री वादळाचा तडाखा बसला. समुद्रकिनार्‍यापासून दीडशे कि.मी. पर्यंत हानी झाली. दीडशेच्या पुढे का नाही? कारण वादळाचा जोर ओसरला. प्रत्येक चक्री वादळ हे समुद्रावरच सुरू होतं. त्याची उर्जा समुद्राच्या पाण्यातूनच त्याला मिळते. एकदा जमिनीवर आलं की त्याची ऊर्जा विनाशात ओतली जाते आणि विरून जाते. ते जोपर्यंत जमिनीवर येण्याचा धोका नसतो तोपर्यंत ते कोणाच्या खिजगणतीतही नसतं. कोणाच्याही नसतं असं नाही म्हणता येणार. बोटींच्या असतं. बोट बंदरात असली की महाकाय दिसते. खासकरून गोदीमध्ये बोटीच्या जवळ उभं राहिलं की ही पोलादाची उंचच्या उंच भिंत अजस्त्रच दिसते. त्यातला माल उतरवण्याचं काम जर चालू असेल तर ती दिवसेन् दिवस पाण्यातून बाहेर येत असते आणि एखाद्या किल्ल्याचं बांधकाम चालू असल्यासारखा हा लोखंडी बुरूज वाढतंच जातो. मात्र समुद्रात ही बोट एखाद्या खेळण्यासारखीच असते. जे पाणी अशा अजस्त्र बोटीला सहजगत्या उचलून धरू शकतं ते राग आल्यावर तिला झोडूनही काढू शकतं. एखादा गुन्हेगार पोलिसांच्या हातात सापडावा आणि माहिती काढून घ्यायला पोलिसांनी त्याला सहजगत्या डाव्या उजव्या कानशिलात सणसणीत थपडा माराव्या तशी वादळामध्ये बोटीची अवस्था असते. “कशाला आलीस इथे?” फटॅक! “मागच्या वेळेस सांगितलं होतं ना तुला?” फटॅक! “हिवाळ्यात कॅनडाला येशील पुन्हा? येशील?” फटॅक! मात्र एकाच कानशिलात. ज्या बाजूनी वारा आणि लाटा येत असतात त्या! प्रत्येक लाटेनी बोट वर हळु उचलली जाते आणि भसकन खाली येते. त्यामुळे पुढची लाट आली की डेकचा काही भाग पाण्याखाली जातो! दोन सेकंदांनी हीच लाट बोटीला वर उचलते आणि डेकवरचं सगळं पाणी धबधब्यासारखं दोन्ही बाजूंनी सांडून जातं. सुरवातीला मला प्रत्येक लाटेला पोटात गोळा यायचा आणि वाटायचं 'आता खलास!' पण तसं कधीच झालं नाही. यू ट्यूबवर 'Storms at sea' टाकलं की तुम्हालाही घरच्या सुरक्षिततेत ही वादळं बघायला मिळतील. वादळ अर्थात कुठेही कधीही निर्माण होऊ शकतं पण जागा, काळ आणि वार्‍याचा वेग याचं एक गणित आहे. हिवाळ्यात उत्तर अटलान्टिक आणि उत्तर पॅसिफिक, जून, जुलै ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये साउथ चायना समुद्र, पावसाळ्यात भारतीय महासागर वगैरे. दक्षिण अमेरिकेच्या दक्षिणेला वर्षभरंच. दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिणेला अचानक एक महाकाय लाट (हिला Freak Wave असं म्हणतात)कधीही येऊ शकते. त्या काळात आपल्या बोटीला तिकडचं भाडं मिळालंय असं ऐकलं की कपाळावर आठी येते. हवामान हा प्रचंड गुंतागुंतीचा विषय आहे. सुपर कॉम्प्यूटर बनवायची जरूर पहिल्यांदा जी वाटली ती या हवामानाचं पृथक्करण करण्यासाठीच. पूर्वी सरसकटीकरण साधणार्‍या ओळी असायच्या. Red sky in the morning, sailor’s warning. Red sky at night, sailor’s delight वगैरे. त्या आता कालबाह्य झाल्या आहेत. कोट्यवधी डॉलर्स खर्च करून बांधलेले आणि अवकाशात फिरणारे उपग्रह म्हणजे अल्टिमेट सी सी टी व्ही कॅमेरे. ते आता पृथ्वीच्या प्रत्येक चौरस मैलावर नजर ठेवून आहेत. त्यामुळे प्रत्येक तयार झालेलं वादळ आता काय करीत आहे याची उत्तम माहिती आपल्याला आहे. मात्र ते उद्या काय करणार आहे हे मात्र अजून आपण सांगू शकंत नाही. दोनशे वर्षांपूर्वी बोटी लहान होत्या, लाकडाच्या होत्या. शिडामुळे पूर्णपणे वार्याच्या आधीन होत्या. शीतकरणाची सोय नसल्यामुळे खाण्यापिण्यावर प्रचंड निर्बंध. वादळ कधी येईल सांगता येत नाही. किती दिवस राहील सांगता येत नाही. अफाट वारा आपल्याला मार्गापासून किती दूर घेऊन जाईल ते सांगता येत नाही. कोणाचीही मदत मिळण्याची शक्यता नाही. ढगाळ वातावरण असलं तर तारे न दिसल्यामुळे आपण कुठे आहोत ते शोधून काढणं ही अशक्य! संपूर्ण जगाची नीट माहिती ही नाही. अशा काळातले दर्यावर्दी हे खरे दर्यावर्दी ! त्यांच्या समोर आम्ही किस पेड की पत्ती ! या वादळांमध्ये वार्‍याचा वेग किती असेल, लाटांची उंची किती असेल याचा अंदाजही वर्तवलेला असतो. या माहितीत सारखी भर पडंत असते कारण ज्या बोटी त्या भागातून जातात त्या प्रत्यक्ष काय परिस्थिती आहे याचे रिपोर्ट पाठवतात. त्या अनुसार बाकीच्या बोटी आपापला मार्ग निश्चित करतात. हे वाचून असं वाटायची शक्यता आहे की वादळ आलं रे आलं की बोटी सैरावैरा पळतात. कोणी डावीकडे सटकली तर कोणी उजवीकडे. “मी नाही जात बाई!” असं म्हणंत कोणी बंदरातच परत गेली! असं नसतं. मग ‘मार्ग निश्चित करतात’ म्हणजे काय? याला वेगवेगळे आयाम आहेत. सगळ्यात महत्वाची सुरक्षितता. त्यामुळे वादळाच्या डोळ्यातून (eye of the storm) कोणीही जाऊ इच्छित नाही. मात्र वादळ पूर्णपणे टाळण्याचाही प्रयत्न केला जात नाही. बोट बांधण्याचं आणि चालवण्याचं तंत्रज्ञान अशा ठिकाणी पोहोचलं आहे की जोपर्यंत त्यातला माल व्यवस्थितपणे भरला आहे आणि घट्ट बांधला आहे, त्यातली मशिनरी व्यवस्थित चालू आहे आणि चालवणारे काही चूक करीत नाहीत तोपर्यंत वाईटात वाईट वादळ बोटीला बुडवू शकंत नाही. मात्र जर का मुख्य इंजिन वादळात बंद पडलं तर मात्र परिस्थिती ढासळतेच. बोट असहाय्य होते आणि लाटा तिला सहज फिरवतात. एकदा बोट लाटांना समांतर झाली की खैर नाही. प्रचंड वजनाची प्रत्येक लाट आपटायला बोटीची उजवी किंवा डावी भलीमोठी एरिया उपलब्ध असते. बोट उलटू शकते. उलटली नाही तरी डेकवरून धबधब्यासारख्या वाहाणार्‍या हजारो टन पाण्याच्या आघातानी पाईप्स, मशिनरी वगैरेचं अपरिमित नुकसान होतं. काही महिन्यापूर्वी (५ ऑक्टोबर २०१५ला) ‘एल् फॅरो’ नावाची एक अमेरिकन बोट फ्लॉरिडाजवळच ‘जोकिम’ नावाच्या चक्री वादळात शिरली ती कायमचीच. तेहेतीस जण होत्याचे नव्हते झाले. ती कशामुळे बुडली हे कळेल की नाही हे सांगणं अवघड आहे कारण जिथे ती बुडली तिथे समुद्र पंधरा हजार फूट खोल आहे. बाकीच्या बोटी तेव्हां त्या परिसरात होत्याच. मग त्या धोक्यात का सापडल्या नाहीत? त्यांनी जे वादळ चुकवलं ते ‘एल फॅरो’ने का चुकवलं नाही? याला बहुदा पुढील दोन कारणांपैकी एक कारण असतं. फाजील आत्मविश्वास, किंवा आर्थिक दबाव. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायलाच हवी. बोटी काही मला नोकरी मिळावी किंवा तुम्हाला मिसळपाववर गोष्टी वाचायला मिळाव्या यासाठी बनवल्या गेल्या नाहीत. हा पूर्णपणे व्यापारी क्रियाकलाप आहे (commercial activity). आपण साधारण नव्वद हजार टन माल नेणार्‍या बोटीचं उदाहरण घेऊ. बोटीच्या वाटेत वादळ आहे असं लक्षात आलं, (आम्ही ‘वादळ’ हा शब्द सहसा वापरंत नाही. खराब हवामान ‘Bad weather’ असं म्हणतो) की वेगवेगळी गणितं मांडली जातात. जर वादळाची पर्वा न करता सरळ आपल्या मार्गानं गेलं तर बोटीचा वेग खूपच कमी होतो. अंतर वाढलं नाही तरी सफरीचा वेळ वाढतो. या बोटीला एक दिवसासाठी चाळीस टन इंधन लागतं. (दर दिवशी साधारण एक्केचाळीस हजार लिटर!) जास्त वेळ म्हणजे जास्त इंधन. आज बोटीच्या खर्चात सगळ्यात मोठा हिस्सा म्हणजे इंधन! बाकीचे खर्च आहेतच. शिवाय थपडा खाऊन खाऊन बोटीच्या सांगाड्यात (ज्याला आम्ही ‘hull’ म्हणतो), बारीक बारीक क्रॅक जातात ज्यांनी बोट काही बुडत नाही पण खर्चिक दुरुस्तीची जरूर पडते. त्यात इंजिन बंद पडलं तर धडगत नाही. त्यामुळे कोणीही हा पर्याय पसंत करीत नाही. बरं, आता वळसा घालून जायचं तर किती मोठा वळसा घालावा? वादळाचा परिणाम म्हणून आसपासचा समुद्रदेखील खवळतो. वादळाच्या ताकदीनुसार शंभर मैलापर्यंत तर कधी कधी सातशे मैलांपर्यंतचा! आपल्या बोटीवर कुठल्या प्रकारचा माल आहे, किती उंचीपर्यंत रचलेला आहे, इंजिनची ताकत आणि कंडिशन काय आहे, बोट किती जुनी आहे, माल पोहोचवणं किती तातडीचं आहे यावर किती मोठा वळसा घालायचा ते ठरतं. दर वेळेला अति सावधपणा दाखवला तर कंपनी घाट्यात जाऊन बंद पडेल. अति शौर्य दाखवणार्‍याला निसर्ग शिक्षा करतो. ९९.९९ टक्के निर्णय बरोबर ठरतो. मात्र या निर्णयप्रक्रियेत बोटीवरच्या लोकांच्या आरामाला काहीही महत्व नसतं. वादळात लोकांचं काय होतं? वादळात बोट मुख्यतः वर खाली होत असते (ह्याला pitching पिचिंग असं म्हणतात. भसकन खाली जाऊन वर यायला बोटीला साधारण सहा सेकंद लागतात) व उलट्या लंबकाप्रमाणे डावीउजवीकडे हेलकावंत असते (ह्याला rolling रोलिंग असं म्हणतात. एक झोका पूर्ण व्हायला आठ ते दहा सेकंद). या दोनही हालचाली एकत्र होतात म्हणजे कॉर्क स्क्रू मोशन (cork screw motion). हा कॉर्क स्क्रू कधी क्लॉकवाइज् फिरतो तर कधी उलटा. तेव्हां लक्षांत येतं की आपल्या छातीच्या खालच्या पोकळीत असलेली संपूर्ण पचनसंस्था - जठर, छोटं अन् मोठं आतडं,लिव्हर आणि जे काय असतील ते सर्व अवयव एकमेकापासून स्वतंत्र हालचाली करू शकतात. शेवटपर्यंत पोकळीतच राहातात हे आपलं नशीब. मी इंजिनिअरिंगला असताना माझ्या एका के. ई. एम्. मध्ये MBBS करणार्‍या मित्रामुळे मला ऑपरेशन बघायला मिळालं होतं. पॅन्क्रियाची सर्जरी. विद्यार्थ्यांची रेलचेल. तोंडाला मास्क आणि त्यांचे झगे घातले की डॉक्टर कोणाही विद्यार्थ्याला ओळखू शकत नाही. बेशुद्ध पेशंटभोवती विद्यार्थ्यांची ही गर्दी. पॅन्क्रियाच्या ऑपरेशनसाठी पोटातलं सगळं सामान बाहेर काढायला लागतं का शिकवण्यासाठी त्यांनी काढलं होतं ते मला माहीत नाही. पण त्यांनी काढलं होतं. बाकीचे विद्यार्थी प्रश्न विचारत होते. ऑपरेशन करून मुख्य डॉक्टर निघून गेले. त्यांच्या असिस्टंटनी एखादी बॅग भरावी तसं परत सगळं आत भरलं आणि पोट शिवून टाकलं. माझ्या शालेय पुस्तकातल्या चित्रावरून मला वाटायचं की प्रत्येक अवयवाला स्वतःची अशी जागा असते आणि distinct आकार असतो म्हणून. पण तसं काही नसतं हे बघून मला आश्चर्य आणि काळजी देखील वाटली होती. या कॉर्क स्क्रू मोशनचा आपल्याला प्रचंड त्रास होत असेल असं वाचून वाटेल कदाचित. पण तसं नसतं. कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याची शरीराची अफलातून क्षमता असते. फक्त मनानी तसं ठरवायला लागतं. सुरवातीला बहुतेकांना मोशन सिकनेसचा त्रास होतो. काहींना कमी, काहींना जास्त. पोटात काही रहात नाही. सारखी मळमळ, डोकेदुखी, चक्कर. जेवणाची कल्पनादेखील सहन होत नाही. सारखं फिरतंय असं वाटंत राहातं. याच्या बद्दल एक विनोद आहे. There are two stages of sea sickness. The first is when you think you will die. The second is when you hope you will die! अशा वेळेला जर त्या मनुष्याला आराम करायला परवानगी दिली की संपलंच. मग त्याचा सी सिकनेस जात नाही. सारखं कामात ठेवायचं. काही दिवसात तो सरावतो. सरावल्याची उत्तम खूण म्हणजे वाइट हवामानात नेहमीपेक्षा जास्त भूक लागायला लागते. बिछाना बोटीला समांतर असतो. बिछान्यावर पडलं की रोलिंगमुळे उशीवरची मान एकदा डावीकडे, एकदा उजवीकडे असं हळुहळु ‘नको नको नको नको’ चालतं. उशा लावून जमेल तितकं स्थैर्य आणायचं. रोलिंग वाढलं की नुसत्या मानेवर न भागता पूर्ण शरीरंच आपल्या मनाविरुद्ध लोळतं. आमच्या कॅबिनमध्ये जो सोफा असतो तो नेहमी बिछान्याला काटकोनात असतो. अति रोलिंगमुळे बिछान्यात झोपणं अशक्य झालं तर सोफावर लेटायचं. आता डावं उजवं काही नाही. सगळं रक्त डोक्यात, पाच सेकंदानी पायात. पाच सेकंदानी डोक्यात! असं रात्रभर! पिचिंगला मात्र काहीच करता येत नाही. पण ‘आलिया भोगासी असावे सादर’ असा विचार करण्याऐवजी जर ‘अम्यूजमेंट पार्कसारखी मजा येतिये’ असा विचार केला तर खरोखरंच त्रास होत नाही. I am not joking. सगळीकडे चालताना आधारासाठी रेलिंग लावलेली असतात. त्यांना धरून प्रत्येक जण चालत असतो. झोकांड्या जात असतात. तेव्हां फक्त अशी कल्पना करायची की वादळ बिदळ काही नाहिये. सगळे जण पिऊन तर्र झाले आहेत आणि बारकडून लडबडंत घरी चालले आहेत. जाम करमणूक होते! आमची टेबलं तर जमिनीत रोवलेली असतातच, पण खुर्च्यांना देखील सीटखाली एक साखळी लावलेली असते. जमिनीला एक हुक असतो. वादळ आलं की खुर्च्या जमिनीला फिक्स करायच्या. नाहीतर आपल्याच पायांनी भटकायला सुरू करतात. जेवणाच्या टेबलावरचा टेबल क्लॉथ एका चौकोनी फ्रेमनी टेबलाला फिक्स केलेला असतो. टेबल क्लॉथला ओलं केलं की त्यावर चिनी मातीची प्लेट अजिबात घसरंत नाही. आपली खुर्ची जमिनीला फिक्स केलेली आहेच. आपली तशरीफ खुर्चीला चिकटून ठेवण्याची जबाबदारी आपली. ही थोडी अतिशयोक्ती झाली. खरं सांगायचं तर तोल सांभाळण्याचा इतका प्रॉब्लेम नसतो. सवय झाली की सोपं वाटतं. आपल्याला माहीतच आहे की जर गाडीचा वा बसचा ड्राइव्हर चांगला नसेल तर प्रवास संपेपर्यंत आपण नाहकच दमून जातो. त्याचं कारण असं की सारखे जे डावे उजवे झटके आणि ब्रेकचे हिसके लागतात तेव्हां आपलं शरीर correction करण्यासाठी आपल्या नकळत सारखी ताकद लावंत असतं. तसंच बोटीवर होतं. फरक इतकाच की ड्राइव्हर असतो आकाशात आणि प्रवास संपता संपत नाही. दमून जायला होतं. या काळात सगळ्यांची काम करण्याची गती कमी होतेच, शिवाय कामही वाढतं. असं व्यस्त प्रमाण फार दिवस चालणं बोटीच्या दृष्टीनी ठीक नसतं. बोटीच्या डेकवर किती लाटा येणार हे बोटीचा आकार, उंची, वेग, दिशा, वादळाचा वेग, दिशा यावर ठरतं. या लाटांमुळे डेकवरच्या मशिनरी आणि साधनसामुग्रीला अपाय होतो. या दिवसात डेकवर जिवाला धोका असल्यामुळे बाहेर जायला बंदी असते. मात्र कित्येक वेळा जाण्याशिवाय गत्यंतरच नसतं. अशा वेळेला बोटीचा वेग आणि दिशा बदलून, डेकवर लाट येणार नाही अशी व्यवस्था करूनच लोकांना डेकवर कामासाठी तात्पुरतंच जाऊ दिलं जातं. जिवाच्या सुरक्षिततेला कायमच प्राथमिकता. आमच्या बोटीच्या इंजिनला जरी डीझेल इंजिन म्हणत असलो तरी प्रत्यक्षांत डीझेल वापरणं परवडण्यासारखं नसतं. कच्च्या तेलातून त्यातले वेगवेगळे घटक काढल्यानंतर शेवटी खाली जो गाळ राहातो तो काळ्याकुट्ट मधासारखा चिकट असतो. डीझेलहून खूप स्वस्त. हेच आमचं इंधन. त्याला ‘हेवी ऑइल’ असं म्हणतात. त्याला १४० डि. सेंटिग्रेडपर्यंत तापवूनच वापरायला लागतं. त्यात घाणही खूप असते. या हेवी ऑइलला गरम आणि साफ करण्याची यंत्रणा आमच्याकडे असते. बरीचशी घाण ज्या टाक्यांत हेवी ऑइल साठवलेलं असतं त्याच्या तळाशी जाऊन बसते. जेव्हां वादळामुळे बोट फार हिंदकळायला लागते तेव्हां ही तळाशी बसलेली घाण पुन्हा वर येते, सिस्टिममध्ये खेचली जाते आणि ती साफ करण्याची सिस्टिम ओव्हरलोड होते. शिवाय काही घाण इंजिनपर्यंत पोहोचून तिथे त्रास द्यायला लागू शकते. यामुळे फिल्टर्स चोक होतात आणि इंजिन बंद पडण्याची शक्यता बळावते. तसं होवू नये म्हणून फार काळजी घ्यावी लागते. कामाचे तास वाढतात. एकंदर काय, तर वादळ म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. बोट जर बुडायला लागली तर जीव वाचवण्याचा उपाय म्हणजे बोटीच्या दोन्ही बाजूंना असतात लाइफ बोट्स् आणि लाइफ राफ्ट. मात्र एक लक्षात ठेवायला हवं की आग लागल्यामुळे किंवा टायटॅनिकप्रमाणे हिमनगावर किंवा एकमेकावर आपटून बोट बुडण्याची शक्यता निर्माण झाली तर खरा या लाइफ बोट्स् चा उपयोग असतो. जे वादळ बोटीला बुडवू शकतं त्या वादळात लाइफ बोट्स् उतरवून सुखरूप जाणं केवळ दुरापास्त! या बोटी (सरावासाठी) उतरवतानाच कित्येक अपघात होऊन जीवितहानी झालेली आहे. जगभरच्या नाविक जगताला एकसंधपणा यावा म्हणून जी आंतरराष्ट्रीय संघटना आहे तिचं नाव ‘इंटरनॅशनल मॅरिटाइम ऑर्गनाइझेशन’ (IMO) असं आहे. तिथे असा वाद चालू आहे की ‘वादळांचा विचार केला तर आजपर्यंत या लाइफ बोट्स् नी जास्त जीव वाचवले आहेत का घेतले आहेत?’ त्यामुळे हल्लीच्या नवीन पद्धतीप्रमाणे बोटीच्या मागच्या बाजूला लोखंडी घसरगुंडीवर एकच लाइफ बोट ठेवलेली असते. त्यात सगळ्यांनी बसायचं. कळ दाबली की घसरंत खाली येऊन ती धपकन् पाण्यात पडते. आधीच्या लाइफ बोट्स् पेक्षा जास्त सुरक्षित, पण याच्या स्वतःच्या वेगळ्याच समस्या आहेत. बोटीवर कधी कधी नुकते लग्न झालेले भारतीय तरुण ऑफिसर्स पत्नीसह असायचे. माझी पत्नी शुभदा अनुभवी. वादळात त्या हिच्याकडे यायच्या. रडवेल्या स्वरात म्हणायच्या, “अब सहन नही हो रहा है दीदी. अगले पोर्टसे मैं वापस घर जा रही हूं.” तेव्हां ही त्यांना सांगायची, “ये तूफान क्या, आज है, कल नही. मगर ये सोच लो, अगर तुम घर गयी तो तुम्हे अकेले तुम्हारी साँस के साथ रहना पडेगा! एकही गेली नाही! -------------------------------------------------------------------------------- आधीच्या लेखाची लिंक http://www.misalpav.com/node/35243

Book traversal links for बोट - वादळवारा

  • ‹ बोटीवरील जीवन
  • Up
  • दैव जाणिले कुणी (आमच्या बोटीवर झालेल्या हल्ल्याची हकीकत) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
जीवनमान
kathaa
राहणी
प्रवास
भूगोल
देशांतर
सामुद्रिक
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
अनुभव
माहिती
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
38215 वाचन

💬 प्रतिसाद (70)

प्रतिक्रिया

एकदमी वादळी....

तर्राट जोकर
Mon, 03/14/2016 - 16:54 नवीन
एकदमी वादळी....
  • Log in or register to post comments

वाह भारीच

महासंग्राम
Mon, 03/14/2016 - 16:57 नवीन
वाह भारीच लिहिताय कि राव तुम्ही वेगळ्या जगताची ओळख करून देताय … नाही तर आमचं ज्ञान 'पायरेट्स ऑफ द कॅराबियन' पाहून तोंडात बोटे घालण्या इतपतच… लिहते रहो
  • Log in or register to post comments

+१११

राजाभाउ
Mon, 03/14/2016 - 18:23 नवीन
+१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

उत्तम, माहितीपूर्ण लेख,

यशोधरा
Mon, 03/14/2016 - 17:11 नवीन
उत्तम, माहितीपूर्ण लेख, धन्यवाद.
  • Log in or register to post comments

अफलातून. एकदम कडक.

भाऊंचे भाऊ
Mon, 03/14/2016 - 17:18 नवीन
तूफानी लिखाण.... शेवटची ओळ तर मास्टर स्ट्रोक :)
  • Log in or register to post comments

आइशप्पथ. खात्तरनाक भाव.

अभ्या..
Mon, 03/14/2016 - 17:24 नवीन
आइशप्पथ. खात्तरनाक भाव. काय लिहलय, काय लिहलय. भाउ आपण तुम्चे प्रॉपेलर फॅन आजपासून. (आता अ‍ॅप्रुव्हल आले की शंका इचारायला चालू करणार) . लास्टचा पंच सॉलीड. ;)
  • Log in or register to post comments

मस्त लेख..

जेपी
Mon, 03/14/2016 - 17:25 नवीन
मस्त लेख..
  • Log in or register to post comments

..

नीलमोहर
Mon, 03/14/2016 - 17:28 नवीन
१-२ दिवस प्रवास करायचा म्हटलं तरी नकोसं होतं, असं सतत मोशन मध्ये राहणं म्हणजे अवघड आहे. बाकी लेख भारीच.
  • Log in or register to post comments

खत्रा

टवाळ कार्टा
Mon, 03/14/2016 - 17:29 नवीन
खत्रा Image removed.
  • Log in or register to post comments

जबराट लेख

नाखु
Mon, 03/14/2016 - 17:45 नवीन
आणि समेवर संपवलाय.... शंका जरा ५-६ भागानंतर कारण जमीनीवरच्या लोकांना जास्त भीती+कुतुहल पाण्यातल्या आणि हवेतल्यांच्या लोकांच्या जीवनाची !!! जमीनीवरचा ख खुलाषी नाखु
  • Log in or register to post comments

लेख वाचुन ठेवला होता.. पण

पिलीयन रायडर
Mon, 03/14/2016 - 18:26 नवीन
लेख वाचुन ठेवला होता.. पण प्रतिसाद राहुन गेलेला... फारच आवडलेला आहे!! मस्त लिहिता तुम्ही!
“ये तूफान क्या, आज है, कल नही. मगर ये सोच लो, अगर तुम घर गयी तो तुम्हे अकेले तुम्हारी साँस के साथ रहना पडेगा! एकही गेली नाही!
=))
  • Log in or register to post comments

+१

राघवेंद्र
Tue, 03/15/2016 - 01:54 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

गविंनी काही वर्षापुर्वी

सौंदाळा
Mon, 03/14/2016 - 18:28 नवीन
गविंनी काही वर्षापुर्वी मिपाकरांना विमानातुन फिरवुन आणले आता तुम्ही बोटीतुन फिरवा :) पुभाप्र
  • Log in or register to post comments

तुमच्या भन्नाट शैलीत नवीन

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 03/14/2016 - 18:55 नवीन
तुमच्या भन्नाट शैलीत नवीन जगाची ओळख होतेय ! शेवट तर केकवर चेरी !! =))
  • Log in or register to post comments

बाबौ!!

नाना स्कॉच
Mon, 03/14/2016 - 19:01 नवीन
जिथे ती बुडली तिथे समुद्र पंधरा हजार फूट खोल आहे. विषय संपला ____/\____ डाइविंग बोर्ड वरुन सुर मारताना गड़बड़ झाली ह्या कारणाने एकदाच पूल मधे 15 (अक्षरी पंधरा फुट फ़क्त) खोल पाण्यात नाकातोंडात पाणी गेले होते ते परत लैडर हातात येईस्तोवर जिवात जीव नव्हता, इथे विषयाची खोली 1000 पट जास्त आहे देवा !!! आमची औकाद नाही बोलायची ! त्या 33 दर्यावर्दी मंडळीला साष्टांग नमस्कार _____/\_____
  • Log in or register to post comments

अफलातून. काय विश्व आहे.

गवि
Mon, 03/14/2016 - 19:36 नवीन
अफलातून. काय विश्व आहे. थ्रिलिंग. लिहा लिहा लवकर. हवामानशास्त्र, नॅव्हिगेशन , कोर्स ट्रॅकिंग (हेडविंड/ टेलविंड करेक्शन, विशेषतः मॅन्युअल केसेसमधे. ), अपघात यांवरही लिहा.
  • Log in or register to post comments

अ फ ला तु न लेख आहे. मस्तं

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 03/14/2016 - 20:04 नवीन
अ फ ला तु न लेख आहे. मस्तं लिहिलयं. एका वेगळ्या करिअरची त्यामधल्या आव्हानांची छान ओळख होतेय.
  • Log in or register to post comments

खतरा लेख

होबासराव
Mon, 03/14/2016 - 21:48 नवीन
___/\___
  • Log in or register to post comments

जबरदस्त

श्रीरंग_जोशी
Tue, 03/15/2016 - 00:03 नवीन
तुमची वर्णनशैली एकदम जबरस्त आहे. तसा कळायला थोडा अवघड असलेला विषय तुमी इतका सहजपणे समजावून सांगत आहात की एकदा वाचायला सुरुवात केली की संपल्याशिवाय थांबवत नाही. समुद्री मालवाहतुकीबाबत तुम्ही या लेखात लिहिलं आहे. हे वाचून पहिला प्रश्न मनात आला की क्रुझ शिप्सला या सर्व आव्हानांना तोंड द्यावे लागत नाही का? की ठरवून सोप्या भागांत व वर्षाच्या ज्या काळात कमी कमी वादळांची शक्यता असते तेव्हाच क्रुझ शिप्स चालवल्या जातात?
  • Log in or register to post comments

अत्यंत मस्त लेखमाला

विवेक ठाकूर
Tue, 03/15/2016 - 00:18 नवीन
आणि कमालीची चित्तवेधक स्टाईल , मजा आली . माझा एक मित्र दर्यावर्दी आहे त्याचं वाक्य आठवलं , इन डेंजर , बोट इज द बेस्ट लाइफ जॅकेट !
  • Log in or register to post comments

वादळी लेखन आहे. कल्पना करू

रेवती
Tue, 03/15/2016 - 00:34 नवीन
वादळी लेखन आहे. कल्पना करू शकत नाही. एक कथा म्हणून वाचतिये. मस्त लिहिताय.
  • Log in or register to post comments

तुफान लेखमाला

रामपुरी
Tue, 03/15/2016 - 02:58 नवीन
पु ले प्र
  • Log in or register to post comments

व्वा.. क्या बात...

संजय पाटिल
Tue, 03/15/2016 - 06:32 नवीन
जबरदस्त लेखन. बायदवे स्विट टॉकर म्हणजे गोड्बोले काय?
  • Log in or register to post comments

जबरदस्त...दुसरा शब्द्च नाही.

स्मिता चौगुले
Tue, 03/15/2016 - 09:57 नवीन
जबरदस्त...दुसरा शब्द्च नाही. :) खूप छान आणि सोप्या भाषेत लिहिताय. एका नवीन विश्वाची ओळख. पुढ्चे लिखान वाचण्याची, अजून जाणून घेण्याची इच्छा आहे. लवकर लवकर लिहा.
  • Log in or register to post comments

लेख आवडला...

मुक्त विहारि
Tue, 03/15/2016 - 11:23 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments

ज्जे बात !!! किती छान

पियुशा
Tue, 03/15/2016 - 11:41 नवीन
ज्जे बात !!! किती छान लिहिलेत अनुभव न त्याला विनोदाची झालर ही चपखल बसली आहे :)
  • Log in or register to post comments

खुप छान !!

आनंद
Tue, 03/15/2016 - 12:00 नवीन
खुप छान !! एम आय टी आयावा मारु आठवली.
  • Log in or register to post comments

जबरदस्त

स्वच्छंदी_मनोज
Tue, 03/15/2016 - 12:10 नवीन
जबरदस्त. खिळवून टाकणारा लेख.
  • Log in or register to post comments

प्रतिसादांना प्रतिसाद

स्वीट टॉकर
Tue, 03/15/2016 - 15:56 नवीन
सर्वजण, खरोखर मनापासून धन्यवाद! अभ्या - फॅन झालोय असं म्हणून लाजवू नकोस. माझ्याहून वयानी बराच लहान आहेस असं वाटल्यामुळे 'अरे' म्हणायची मोकळीक घेतली आहे. टवाळ कार्टा - माझ्या मुलीच्या मैत्रिणी मला 'पॉपायअंकल' म्हणतात. शंका विचारायला हरकत नाही. नाना स्कॉच - सहा फुटातल्या गटांगळ्या आणि पंधरा हजार फुटातल्या - सेम टु सेम! गवि - अजून तुमचं लेखन वाचता आलेलं नाही पण विमानापेक्षा आमचं नॅविगेशन वगैरे जास्त सोपं. श्रीरंग_जोशी - जर क्रूझ लायनर्स नी वादळात प्रवासी नेऊन त्यांना उलट्या वगैरे होऊ दिल्या तर बोटी रिकाम्या पडतील आणि कंपनीचं दिवाळं निघेल. ते शक्यतो तो भाग टाळतात. शिवाय त्यांच्या बोटींवर रोलिंग होऊ नये म्हणून खास मशिनरी देखील बसवलेली असते. रेवतीताई - कृपया 'कथा' म्हणून वाचू नका. कथेत काहीही लिहिता येतं. हकीकतीला मात्र सत्यालाच धरून राहावं लागतं. तीच त्याची ताकद असते. संजय पाटील - करेक्ट! नावाचंच भाषांतर आहे. काही काळानी सौभाग्यवतीही हजर होतील. त्यांचं सद्स्यनाम 'स्वीट टॉकरीणबाई'. पियुशा - कुठल्याही कथनात थोडा विनोद करता आला तर ऐकण्या- वाचणार्यालाही प्रसन्न वाटतं अशी माझी धारणा. म्हणून असा प्रयत्न.
  • Log in or register to post comments

ज्जे बात...पुण्यात असलात तर

टवाळ कार्टा
Wed, 03/16/2016 - 00:05 नवीन
ज्जे बात...पुण्यात असलात तर लवकरच "invitation only" कट्टा ठरवतो आहे त्याला येणार का :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वीट टॉकर

सागरी वादळाइतकेच भन्नाट लेखन

सस्नेह
Tue, 03/15/2016 - 16:49 नवीन
सागरी वादळाइतकेच भन्नाट लेखन ! जबरी .
  • Log in or register to post comments

अगदि मनकवडे आहात. मनात आत्ता

प्रमोद देर्देकर
Tue, 03/15/2016 - 16:53 नवीन
अगदि मनकवडे आहात. मनात आत्ता पर्यंत जे जे प्रश्न आले होते त्यांची सगळी उत्तरे मिळताहेत, येवु दे पुढचा लेख. बोट प्रवासाची ओढ असणारा पम्या
  • Log in or register to post comments

जबरदस्त

सुमीत भातखंडे
Tue, 03/15/2016 - 17:14 नवीन
लिखाण!
  • Log in or register to post comments

भन्नाट...!!!!!!!!!

प्रचेतस
Tue, 03/15/2016 - 17:36 नवीन
भन्नाट...!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

जबरदस्त.

मधुरा देशपांडे
Tue, 03/15/2016 - 19:32 नवीन
जबरदस्त.
  • Log in or register to post comments

पुर्ण लेखमाला वाचायला प्रचंड

आनन्दिता
Wed, 03/16/2016 - 00:23 नवीन
पुर्ण लेखमाला वाचायला प्रचंड उत्सुक आहे.
  • Log in or register to post comments

खूप छान लेखमाला

इडली डोसा
Wed, 03/16/2016 - 02:16 नवीन
पुढचे भाग वाचायची उत्सुकता प्रत्येक लेखागणिक वाढते आहे.
  • Log in or register to post comments

हा ही भाग आवडला.

राघवेंद्र
Wed, 03/16/2016 - 02:29 नवीन
हा ही भाग आवडला. एक प्रश्न - माझा मित्र, एक महिना बोटीत बिघाड झाल्यामुळे पोर्ट मध्ये बोटीवर अडकला होता त्याच्याकडे अमेरिकेचा विसा असला तरी तो अमेरिकेत आत येऊ शकला नाही . काही वेगळे नियम असतात का ?
  • Log in or register to post comments

व्हिसा - हो. आमच्या व्हिसाचा

स्वीट टॉकर
Wed, 03/16/2016 - 09:13 नवीन
व्हिसा - हो. आमच्या व्हिसाचा नंबर सी १ - डी असा असतो. हा टूरिस्ट व्हिसा नव्हे. नियमांना अंतच नाही. बोट व्यवस्थित चालू असली आणि दोन महिने अमेरिकेतच असली तर नियम वेगळे, बंद पडल्यामुळे राहावं लागलं तर नियम वेगळे. चार दिवसात काम आटपून बाहेर पडली तर वेगळे!
  • Log in or register to post comments

लेख खूप आवडला

बेकार तरुण
Wed, 03/16/2016 - 09:21 नवीन
लेख खूप आवडला
  • Log in or register to post comments

सुरेख लेखन... :)

मदनबाण
Wed, 03/16/2016 - 10:00 नवीन
सुरेख लेखन... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-विकिपिडीया पे चेक कर ले, गुगल तू सर्च कर ले, बेबी जरा लुक अराउंड कर ले...नैयो मिलेगा ऐसा यार सोणिये...इक नंबर. इक नंबर. इक नंबर... :- Sanam Teri Kasam
  • Log in or register to post comments

जबरदस्त लेख.पुलेशु.

अजया
Wed, 03/16/2016 - 11:49 नवीन
जबरदस्त लेख.पुलेशु.
  • Log in or register to post comments

लेख मस्त आहे.

मराठी कथालेखक
Wed, 03/16/2016 - 15:40 नवीन
लेख मस्त आहे. कमी प्रतीच्या इंधनावर चालणार्‍या डिजेल (?) इंजिनाबद्दल अजून माहिती देवू शकता का ? कोणत्या कंपनीचे असतात हे इंजिन्स (कमिन्स, MAN वगैरे आहेत का ?) असे हलक्या प्रतीचे इंधन वापरल्यावर कंपनी वॉरंटी क्लेम स्वीकारते का ? अजस्त्र इंजिनांची छायाचित्रे टाकू शकता का ? तसेच इंजिनाची तांत्रिक माहिती (सिलिंडर्स, शक्ती, टॉर्क, सीसी ई), इंजिनाचा आवाज किती डेसिबल्सपर्यंत असतो ? एका बोटीला किती इंजिन्स असतात ?
  • Log in or register to post comments

अजून एक

मराठी कथालेखक
Wed, 03/16/2016 - 15:44 नवीन
नेहमीच ते हलक्या प्रतीचे इंधन वापरले जाते की किमान वादळाच्या काळात तरी इंजिनास डिजेलचा खुराक मिळतो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

स्वीट टॉकर साहेब,

बेकार तरुण
गुरुवार, 03/17/2016 - 08:09 नवीन
स्वीट टॉकर साहेब, मला स्वतःला समुद्र सफरींची प्रचंड आवड आहे, दुर्दैवाने त्यात करीयर करु शकलो नाही. पण मला काही बेसिक (बालिश) शंका आहेत, तुम्हाला वेळ झाला तर उत्तरे जरूर द्या १. मोठ्या बोटीला ब्रेक असतो का? का आहे तोच पंखा (प्रोपेलर) उलटा फिरवतात स्पीड कमी करायला. तसेच जेव्हा बोट बंदरातुन बाहेर निघायला सुरुवात करते, तेव्हा पंखा चालु करू शकते का? तसे केल्याने तयार होणार्‍या लाटांचा त्रास होतो का? २. बर्‍याच वेळा अजस्त्र बोटीवर कंटेनर्स लादले असतात ते बोटीच्या अनेक मजले वर पर्यंत गेले असतात. ते कशाने बांधुन ठेवले असतात. जर काही दुर्दैवाने बोटीस वजन कमी करावे लागले प्रवासात तर अश्या कंटेनर्स चे काय करतात (म्हणजे जर फेकुन देत असतील तर क्रम कोण ठरवतो, इथे मी हे अध्या।रुत धरले आहे की बोट कंपनी बोटीच्या कपॅसिटीहुन १ हि कंटेनर कमी भरुन बोट पाठवण्यास तयार नसेल). ३. कार्गो बोट कधी जीवंत जनावरे वगैरे घेउन जातात का? (दुसर्‍या देशातील कत्तलखान्यासाठी वगैरे). जर जात असतील तर काही विषेश काळजी घ्यावी लागते का? मला अजुन काही रिग्स संबंधी प्रश्न आहेत, ते पण विचारतो (चालेल का?)
  • Log in or register to post comments

अरे वा स्वीट टॉकर सरजी

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 03/17/2016 - 08:26 नवीन
कुठेही अन कितीही वेळा तुमची ही सीरीज वाचली तरी परत परत वाचावी वाटते हे तुमच्या शैलीचे बलस्थान आहे बरंका!! ____/\___
  • Log in or register to post comments

भन्नाट लेख

स्मिता.
गुरुवार, 03/17/2016 - 08:34 नवीन
लेख वाचाताना मन कधी बोटीवर जावून पोहोचले कळलेच नाही. असं वाटलं सिनेमाच बघत आहे. गविंच्या विमान सफरी बरेच दिवसांपासून झाल्या नाहीत, आता तुमच्या जहाजांच्या सफरीची उत्सुकता आहे. शेवटचं वाक्य तर 'चेरी ऑन द केक' ;-)
  • Log in or register to post comments

भन्नाट लेख

स्मिता.
गुरुवार, 03/17/2016 - 08:35 नवीन
लेख वाचाताना मन कधी बोटीवर जावून पोहोचले कळलेच नाही. असं वाटलं सिनेमाच बघत आहे. गविंच्या विमान सफरी बरेच दिवसांपासून झाल्या नाहीत, आता तुमच्या जहाजांच्या सफरीची उत्सुकता आहे. शेवटचं वाक्य तर 'चेरी ऑन द केक' ;-)
  • Log in or register to post comments

अतिशय वाचनीय लेखन!

समीरसूर
गुरुवार, 03/17/2016 - 09:30 नवीन
अतिशय वाचनीय लेखन! लिखाणशैली फारच ओघवती आणि उत्कंठावर्धक! अजून येऊ द्या. असे जगावेगळे, ऊबदार आणि सुखासीन वातावरणातून बाहेर पडून घेतलेले धाडसी आणि कष्टप्रद अनुभव गाठीला असले की लिखाणातदेखील एक आगळाच डौल येतो. तो तुमच्या लिखाणात ठायी ठायी आहे. अनुभव जितके वेगळे, कष्टप्रद (शारिरीक, मानसिक, भावनिक, आर्थिक, सामाजिक), आणि माणसाच्या धैर्याचा कस पाहणारे तितके लिखाण अधिक सकस आणि वाचनीय असे एक निरीक्षण आहे. मला पोहता येत नाही. समुद्रावर गेल्यानंतर अगदी थोडं अंतर पाण्यात जाऊन डुंबत रहायचं एवढाच काय तो समुद्राचा अनुभव. बायको काठावर उभी राहून मी जास्त आत जाऊ नये म्हणून ओरडत असते. तिथे थोडं अधिक धाडस दाखवत एक मीटर आत जाऊन वीरश्री खेचून आणल्याच्या अविर्भावात बायकोकडे बघायचं ही आमची समुद्रावरील धाडसाची परमसीमा! असे धाडसी जीवन जे जगतात ते खरंच ग्रेट असतात. अजून येऊ द्या! पुढील लिखाणास शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

बायको काठावर उभी राहून मी

मराठी कथालेखक
गुरुवार, 03/17/2016 - 11:48 नवीन
बायको काठावर उभी राहून मी जास्त आत जाऊ नये म्हणून ओरडत असते. तिथे थोडं अधिक धाडस दाखवत एक मीटर आत जाऊन वीरश्री खेचून आणल्याच्या अविर्भावात बायकोकडे बघायचं ही आमची समुद्रावरील धाडसाची परमसीमा!
माझ्याबाबत हे उलटं असतं बायको समुद्रात घुसते मी काठावर उभा असतो. मी समुद्राचे पाणी शरीराला लागू देत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा