एक संघ मैदानातला - भाग १३

शि बि आय's picture
शि बि आय in जनातलं, मनातलं
5 Jun 2016 - 5:41 pm

आम्ही सगळ्याजणी दादा कधी परत येतायत आणि काय सांगतायत ह्याची वाट बघत होतो. आमचं आवरून झालं होत.मेस मध्ये जाऊन जेवण आणि मग रूमवर धतिंग हा अघोषित कार्यक्रम होता. ह्यावेळी 'चद्दर प्रोग्राम'चा बकरा कोण ह्याचा मी आणि योग्या विचार करत होतो. आमच्या डोळ्यांनी चाललेल्या खाणाखुणा दीदीने पहिल्या आणि डोळे वटारले. आम्हीही निर्लज्जासारखं स्माईल दिलं आणि बकरा शोध मोहिमेवर लक्ष केंद्रित केलं. तेवढ्यात डुलत-डुलत दादा आले. "दादा... कशाला आले होते ते ? काय म्हणाले ?" आम्ही दादांवर आँलमोस्ट झडप घातली.
" अरे.. काय आहे हे.. थांबा जरा.. अजून आमची राहायची व्यवस्था झाली नाहीये आजची रात्र मला तुमच्या खोलीतच काढावी लागणार आहे बहुतेक... त्यासंबधीच बोलायला आले होते... झालं समाधान"
" काय...आमच्या खोलीत? "
" हो ना.. कोच आणि टीम मँनेजर यांना राहायला दिलेल्या रूम्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे असे ते सर सांगत होते. बघू आता आपलं जेवण होईपर्यंत दुसरी काही सोय करतात का ते.. "
" च्यायला... आता रुममध्ये हे पण घुसणार का?" तुप्या योग्याच्या कानात कुजबुजली.
" बघूया काय करतायत ते संयोजक ... नाही तर आपली वाट आहे... सगळ्या प्लानवर पाणी... "
चालत चालत मेसमध्ये आलो. इतर संघांची जेवण सुरु होती. काही जण जेवण झाल्यावरही बाहेर टंगळ-मंगळ करत होते. आमचा नंबर लागायला थोडा वेळ लागणार होता. तेवढ्यात कोल्हापूर टीमचे सर परत दादांना बाजूला घेऊन काही तरी बोलत होते. आम्ही फार लक्ष दिले नाही कारण ते बहुदा राहण्याच्या जागेवरूनच असणार ह्याची आम्हाला खात्री होती. आम्ही आपलं आजूबाजूच्या हिरवाईचं दर्शन घेत टाईमपास करत होतो.
पंधरा मिनिटांनी दादा आमच्याकडे आले आणि म्हणाले, "कोल्हापूरच्या टीमचा थोडा प्रॉब्लेम झालेला आहे.. त्यांचे सर सांगत होते की आपली उद्या दुसरी मँच खेळवण्याऐवजी तिसर्या दिवशी म्हणजे क्वाटर फ़ायनल सुरु होतात त्या दिवशी खेळली तर चालेल का ?"
" का असं का ? त्यांचा प्रॉब्लेम आणि आम्ही का अँडजस्ट करायचं ?" जागू एकदम उसळलीच.
" दादा एवढा प्रॉब्लेम काय आहे? " दीदीने शांत स्वरात विचारलं.
" अग त्यांच्या दोन मेन प्लेयर कोल्हापूरमध्ये जॉब करतात.. त्यांना उद्या संद्याकाळी ६.३० ची मँच गाठणं कठीण होणार आहे. त्यांची आपल्याबरोबर दुसरी आणि वसई बरोबर पाचवी मँच आहे. त्यांनी आधी वसईच्या टीमला विचारलं पण ते अँडजस्ट करायला तयार नाहीत असं वाटत त्यामुळे ते आपल्याला विचारायला आले आसावेत... आणि परवा रविवार असल्यामुळे लवकरची मँच असली तरी त्यांना चालणारी आहे... "
खर तर ह्या अँडजस्टमेंटची मुंबईच्या टीमला सवय असतेच कारण सगळ्यांनाच खेळाच्या जीवावर नोकर्या लागत नसल्यामुळे आपापले पोटापाण्याचे उद्योग सांभाळून खेळ खेळला जात असतो. त्यामुळे हि कसरत आम्हाला नवीन नव्हती. कदाचित काही वर्षांनी आमच्यापैकी काहींना ही कसरत करावी लागणार होती.आणि हीच गोष्ट समोर डोळ्यासमोर ठेऊन मुंबईत सगळ्या राज्यस्तरीय किंवा जिल्हास्तरीय पातळीवरील सामने थोडे उशिराने सुरु होतात. असो....
आम्ही सगळ्या विचारात पडलो. १२ पैकी ७ जणींच 'चालणार आहे' असं मत पडलं तर उरलेल्या ५ जणींच 'चालणार नाही' खंर तर आमचं मत कोणी विचारलच नव्हत पण तरीही आम्ही आपली आमची मत ठरवून एकमेकींना सांगून मोकळ्या झालो होतो. जेवणासाठी आमचा नंबर लागला. जेवताना पण तोच विषय चालू होता. जेवणखाण आटपून रमत-गमत रूमवर आलो. कुलूप उघडून लाईट लावला पण लाईटचा पत्ताच नव्हता. बैठ्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ५ पैकी २ खोलींचे लाईट नव्हते. आम्ही आपलं आत बाहेर करत राहिलो. दादा संयोजक टिमला ही गोष्ट सांगायला परत बाहेर पडले.

आत सामानात खुड्बुडून बँटरी शोधली आणि तश्याच गप्पा मारत बसून राहिलो असताना अचानक आमच लक्ष ट्यूबच्या ठिकाणी गेलं आणि लाईट न लागण्याच कारण आम्हाला लगेच समजल. जर ट्यूबच्या जागी ट्यूब नसेल तर उजेड पडणार कसा? अचानक आमच्यातला 'सीआयडी' जागा झाला आणि ट्यूब कोणी उडवली ह्याचा शोध सुरु झाला.

संध्याकाळी आंघोळी उरकलेल्या असल्यामुळे कपडे वळण्यासाठी आम्ही खिडक्या उघड्या ठेवल्या होत्या. त्यापैकी दोन खिडक्यांचे गज तुटले असल्याने कोणीतरी तिथून येउन हे काम केलं असावं असा आमचा संशय होता. सगळ्यात आधी आम्ही आमच्या बँगा चेक केल्या. सगळ सामान पैसे नीट होते. संध्याकाळी असणारी ट्यूब कोण आणि का गायब करेल? आम्ही संजू आणि मीनाला जरा सगळ्या रूमचा सर्वे करायला पाठवलं. त्या राजरोस दरवाज्याच्या मार्गाने सर्वे करत होत्या तर मी तुप्या आणि जागू बँटरी घेऊन मागच्या बाजूने सर्वे करत होतो. बाकीच्यांना रूमवर बसवून ठेवलं होत. दादा आले पटकन तर... उगाच गोंधळ नको म्हणून सगळ्याबरोबर दीप्तीलाही ठेवलं होत. अशा गोंधळाच्या वेळी ती बरोबर मँनेज करते हे आम्हाला अनुभवाने माहित झालं होत.
मागच्या बाजूने आम्ही जाऊन प्रत्येक खोलीत प्रत्यक्षात चालू ट्यूब किती आहेत आणि किती बंद आहेत ह्याचा अंदाज घेत होतो. जिथे मुली होत्या तिथे फक्त १ ट्यूबच दिसत होती. तसा १ ट्युबचा प्रकाश अपुरा वाटत होता पण काही इलाज नव्हता. ती शाळा c आकाराची असल्यामुळे मागच्या बाजूने सर्वे करण आम्हाला सोप जात होत. अगदी शेवटच्या खोली पर्यंत आलो तरी आम्हाला सगळीकडे १च ट्यूब दिसत होती. त्यामुळे आमच्या सीआयडीगिरीचा पोपट होणार आहे अस जाणवू लागलं होत पण तेवढ्यात सगळ्यात शेवटच्या वर्गात म्हणजे नाशिकच्या मुलींच्या रुममध्ये २ ट्यूब दिसल्या. त्यातली १ आमची आहे देखिल आम्ही पटकन ओळखलं कारण त्या ट्यूबवर पडलेले गुलाबी रंगाचे डाग.. ह्या वर्गांना नुकताच रंग लावलेला जाणवत होता आणि प्रत्येक वर्गाला वेग-वेगळा रंग दिला असल्याने ट्यूबवरच्या रंगाच्या डागाने ती ट्यूब कोणत्या वर्गातील आहे हे सहज कळत होत त्यामुळे आम्हालाही ती ओळखायला काही अडचण आली नाही. आम्ही ती ट्यूब लगेच ओळखली. आता प्रश्न होता कि संयोजक येईपर्यंत वाट बघायची की.... ??

आम्ही परत रूमवर आलो आणि आम्हाला समजलेली माहिती इतरांना दिली. नेहमीप्रमाणे दीदीने शांत बसून दादांची वाट बघण्याचा सल्ला दिला. १० मिनिटांची वेळ लावत तो आम्हीही पाळायचा ठरवलं. दादा आले पण सगळे जेवायला बसले असल्यामुळे संयोजकांनी अर्धा- पाऊण तासात माणूस पाठवतो म्हणाले. ११.३० वाजले होते अजून साधारण तास भर म्हणजे झालचं.. जागूने पुढाकार घेतला.. तुप्या, जागू, मी, संजू, योग्या आणि मीना सगळ्यांना बाहेर काढून मागच्या रस्त्याने शेवटच्या वर्गापर्यंत आणलं आणि आता आपण थर लाऊन ट्यूब काढायची आहे असं जवळ जवळ धमकावलं. आमच्यासारख्या त्याही खिडक्यांच्या गजाची अवस्था असल्यामुळे हे काम फार अवघड नव्हत.
२ तुटलेले गज काढून आहे नाही तो जोर लावून आम्ही तिसराही गज काढला आणि त्या खोलीत घुसलो. तिथे गेल्यावर ह्या मुली एवढ्या रात्री कुठे भटकत आहेत ? त्यांना त्यांचे सर झापत नाही का? कि तेही त्यांच्या बरोबर भटकत आहेत? असे बरेच प्रश्न दीप्तीच्या डोक्यात यायला लागले आणि ते ती तिथे आम्हाला विचारून डोक पिकवायला लागली ... तुप्याने तिला गांx पे लाथ (जी पी एल) दिल्यावर तिची टकळी बंद झाली. आवाज न करता हे काम करायचं असल्यामुळे मूकपणे हातवारे करत बराचसा गोंधळ घातल्यावर त्या अंधारात आम्ही थर लावले आणि त्यावर मीनाला चढवले. ५ अयशस्वी प्रयत्न केल्यावर ६ व्या प्रयत्नाला तिचा हात ट्यूबला लागला मग तिनेही हुशारीने कुठेही न फोडता ट्यूब काढली. आम्ही गपचूप आलो त्या रस्त्याने परत आमच्या खोलीवर आलो. अचानक सगळ्याजणी हातात ट्यूब घेऊन आल्यावर दादांना काय बोलाव कळेना... हि कुठून आणलीत? त्यावर दीप्तीने पुढाकार घेऊन दादांना पूर्ण घोळात घेतलं तोपर्यंत आमची ट्यूब पण लागली.
एकाच खोलीत कपडे बदलणे शक्य नसल्यामुळे दादा बाहेर थांबले. आम्ही कपडे बदलून घेतले. तेवढ्यात दादांची झोपायची व्यवस्था केली आहे आणि आमच्या ट्युबचा गोंधळ निस्तरण्यासाठी संयोजकांनी माणूस पाठवला. ट्यूब लागलेली बघून तो आमच्याकडे विचित्र नजरेने बघत दादांना निरोप देऊन निघून गेला. दादा बँग घेऊन निघाले जाताना," आपण इथे असेपर्यंत प्लीज अजून कोणताही गोंधळ घालू नका" असं सांगून गेले. त्यांचा हा डायलॉग ऐकल्यावर तर आपण काय चूक केली जे त्यांनी असं ऐकवलं ह्यावर चर्चा सुरु झाली.
त्या सगळ्या गोंधळात आमचा ह्यावेळचा 'चद्दर प्रोग्राम'चा बकरा संजूला करायचं असं डोळ्यांनी ठरवलं. परत खोली झाडून स्वच्छ करून अंथरूण घालून त्यावर पत्ते कुटायला आम्ही सज्ज झालो. पत्त्यांबरोबर कोल्हापूरबरोबर मँच कधी खेळायची ह्यावर चर्चा पण सुरु झाली. जर आम्ही परवा खेळलो तर आम्हाला कोल्हापूरला कितीने मारायचं ह्याचं टार्गेट ठेवण सोपं जाणार होत कारण वसई बरोबर त्यांची आधी मँच होणार असल्यामुळे आणि आमची मँच टाय झाल्यामुळे जो कोल्हापूरला जास्तने मारेल तो विनर असा साधा हिशोब असणार होता. त्यामुळे उगाच आडमुठेपणा दाखून आम्हाला फायदा तर नाहीच पण नुकसान व्हायचे चान्सेस जास्त दिसत होते. ह्या सगळ्याचा हिशोब केल्यावर उद्या सकाळी वाँर्मअपलाच दादांना परवाच्या मँचसंबधी कोल्हापूरच्या सरांना हो सांगायला लावायचं असं ठरवलं.

क्रमशः

एक संघ मैदानातला - भाग १ http://www.misalpav.com/node/35830
एक संघ मैदानातला - भाग २ http://www.misalpav.com/node/35846
एक संघ मैदानातला - भाग ३ http://www.misalpav.com/node/35878
एक संघ मैदानातला - भाग ४ http://www.misalpav.com/node/35893
एक संघ मैदानातला - भाग ५ http://www.misalpav.com/node/35924
एक संघ मैदानातला - भाग ६ http://www.misalpav.com/node/35954
एक संघ मैदानातला - भाग ७ http://www.misalpav.com/node/35989
एक संघ मैदानातला - भाग ८ http://www.misalpav.com/node/36014
एक संघ मैदानातला - भाग ९ http://www.misalpav.com/node/36071
एक संघ मैदानातला - भाग १० http://www.misalpav.com/node/36205
एक संघ मैदानातला - भाग ११ http://www.misalpav.com/node/36256
एक संघ मैदानातला - भाग १२ http://www.misalpav.com/node/36281

समाजविरंगुळा

प्रतिक्रिया

एस's picture

5 Jun 2016 - 7:42 pm | एस

भारी!

संजय पाटिल's picture

6 Jun 2016 - 10:31 am | संजय पाटिल

छान चालू आहे ...

नाखु's picture

6 Jun 2016 - 10:33 am | नाखु

ट्युब पेटली हे महत्वाचे.

नितवाचक नाखु

मुक्त विहारि's picture

6 Jun 2016 - 10:51 am | मुक्त विहारि

लेखमाला उत्तम सुरु आहे.

पुभालटा

पोरी चाभऱ्या पण हैत. लगे रहो.

बादवे चद्दर प्रोग्राम म्हणजे एकाच्या अंगावर चादर टाकून सगळ्यांनी धुवून घेणे का? आमच्या होस्टेलचा फेवरिट प्रोग्राम त्यो.
का काही लेडीज स्पेशल आहे?

शि बि आय's picture

6 Jun 2016 - 11:34 am | शि बि आय

सेम प्रोग्राम हो... लय उडत असलेल्या पोरीला जमिनीवर आणण्यासाठी असलेला जालिम उपाय

मस्त चालू आहे लेखमाला :) एकदम एक्सायटींग आहे :)

दुर्गविहारी's picture

6 Jun 2016 - 1:27 pm | दुर्गविहारी

लय भारी स्टोरी चालु आहे. +१

ट्यूबचा प्रश्न छान सोडवलात.