एक संघ मैदानातला - भाग ८

शि बि आय's picture
शि बि आय in जनातलं, मनातलं
12 May 2016 - 3:51 pm

सकाळी उशिरा उशिरा म्हणतानासुद्धा ८ ला जाग आली. अजून एवढेचं वाजतायत म्हणजे काकांना निघायला अजून २ तास आहेत. मी परत पांघरुणात डोक खुपसलं. ते आईने पाहिलं आणि मला उठवलं. मी तिला खुणेने गप्प बस सांगायचा प्रयत्न करत असताना बेडरूममध्ये काका शिरले आणि मोठ्या आवाजात मला उठवायला लागले. आता काही इलाजच नव्हता. गपचूप उठून बसले. तोंड धुवून चहा घेईपर्यंत शांतपणे ते पेपर वाचत होते. माझा चहा पिउन झाल्याबरोबर मला हाक मारून मला समोर बसायला लावले. मला वाटलं झालं आता हे लग्नाचा वैगरे विषय काढणार पण त्यांनी तस केल नाही. त्यांनी त्यांच्या कुळाची माहिती द्यायला सुरुवात केली आणि मग हळूहळू गाडी सतीशकडे वळवली. तेवढ्यात त्यांना रोखण्यासाठी आजी घाईघाईने बाहेर आली पण तोपर्यंत माझ्या तोंडून," काका तुम्ही मला हे सगळ का सांगताय?" असा प्रश्न निघाला. आँलमोस्ट माझ्याच हातून विषयाला तोंड फोडलं गेलं होत. मनातल्या मनात स्वतःची अक्कल काढत ओढवून घेतलेल्या प्रसंगाला तोंड द्यायचं ठरवलं.
मी डायरेक्ट असं विचारल्यावर तेही थोडे गडबडले आणि त्यांच्या मनात काय आहे हे सांगायला लागले.," त्यांच्या चुलत बहिणीच्या मुलाला म्हणजे सतीशला मी आवडते आणि आता त्याच्या लग्नाचा विचार त्याच्या घरचे करायला लागले असताना त्यानेच हे त्याच्या आईला सांगितले म्हणून मी इथे तुझ्या आई बाबांचा विचार घ्यायला आलो आहे."
आता एवढं स्पष्ट बोलल्यावर मलाही काही तरी रिप्लाय करण भाग होत कारण अशा वेळी आई बाबांना विचारा म्हणणं आणि नंतर "मी नाही त्याच्याशी लग्न करणार" म्हणून सांगणं म्हणजे आई बाबांनाच तोंडघाशी पाडण्यासारख होत आणि ते मला चुकीचं वाटत होत. मी मिनिटभर शांत बसले. आमच्यातले हे संवाद ऐकून आजी हादरली होती. आईपण ऑफिसची तयारी करत असताना बाहेर येउन उभी राहिली.
ती मिनिटभराची शांतता त्या दोघींना असह्य झाली आणि आजी म्हणाली, " अरे भाऊकाका कुठं त्या पोरीच्या नादाला लागतोयस अजून लहान आहे ती एवढा मोठा निर्णय असा पोरवयात थोडचं घेता येणार आहे तिला …आणि अजून बाळाशी (माझे बाबा) पण बोलण व्हायचंय रे.. मग बघू काय ते "
" मग बघू काय ते... म्हणजे?... तुम्ही काही ठरवलंय का?" आता माझ्या आवाजाला धार आली आणि मी आई आणि आजीकडे बघून विचारलं
" नाही ग सोने... अजून तुझ्या बाबाशी नाही बोलण झालं अजून. कालच तर तुझ्या काकानं बाळाच्या कानावर घातलंय.. बघू शांतपणे.... विचार केल्याशिवाय का आम्ही काही निर्णय घेणार आहोत.." आजीचा असा रिप्लाय ऐकल्यावर तर डोक्याची तारच सटकली.
" एक मिनिट... कोणीही कोणताही निर्णय घेण्याआधी निदान मला काय वाटत ह्याचा विचार करणार आहात का?"
" राणी.. बाळा तुम्हाला एक सांगतो.. लग्नाची पसंती, बोलणी, देवघेव ठरवायला मोठी माणस असतात.. त्यांच्या विचारानं चालावं.. आयुष्य सुखकर होत बघा.. आता हि माणस काय तुमचं वाईट करणार आहेत का ? नाही ना मग....! खरं तर आपल्याकडे लग्नाची हि अशी बोलणी लग्नाच्या पोरीशी अजिबात करत नाही पण तुमची आणि सतीशची गोष्ट वेगळी आहे म्हणून मी आलो बोलायला " काकांनी होकार पदरात पडून घेण्यासाठी नरमाईची सूर धरला.
" हं... म्हणताय ते बरोबर आहे.. पण मुलगी आपली पसंती नापसंती कोणाला सांगते..?"
" अर्थात तिच्या घरच्यांना "
" मग तुम्हीही घरचेच आहात ना...?? मग तुम्ही आणि मी मोकळेपणाने ह्या विषयावर बोललो तर बिघडलं कुठं ?"
" राणी जरा तू शांत बस.. उगाच अगाऊपणा करू नकोस.. आम्ही बोलू काय ते.. अजून तुझ्यापर्यंत काही आलं नाहीये" आई गुरगुरली.
" वाहिनी बोलू द्या त्यांना .. त्यांचा मनात काय आहे ते तरी कळेल.."
मी उठून आत जावं म्हणून आई खाणाखुणा करत होती आणि मी ... माहित नाही का पण तिथून मी अजिबात हलायला तयार नव्हते.
असं वाटत होत कि मी कॉर्नरला आहे आणि एखादा आगाऊ प्लेयर मी चूक करावी म्हणून मला चिडवत आहे आणि तेव्हाच मीही माझ्या मनाशी ठरवते कि थांब आता मी तर चूक करणार नाहीच पण तुझ्याकडून झालेली एक चूक किंवा माझ्यावरून हटलेली तुझी नजर आणि तू माझ्या डँशने ग्राउंडच्या बाहेर... अस्स काही तरी होत होतं मला.. स्वतःवर बराच संयम ठेवत मी त्यांना सांगितलं,
" काका माझं अजून साधं ग्रज्युऎशन पण झालं नाहीये.. मला पुढे मास्टर्स करायचं आहे.. त्यामुळे एवढ्यात मला लग्नाचा विचार करणं बरोबर वाटत नाही"
आई डोळे वटारून मला गप्प करायच्या प्रयत्नात होती, आजी मी आता काय बोलेन अशा चिंतेत होती , काकांना माझ्याशी बोलणे तसे पटलेच नव्हते पण ते बोलत होते त्या बोलण्यात मला कुठेतरी 'हे असचं होणार तू कितीही नाही म्हण' असा सूर होता.
तेवढ्यात बेल वाजली. पप्या घरी आला होता.
" हे बघा.. तुमचं म्हणण आम्हाला पटत… शिक्षण झालचं पाहिजे.. त्याशिवाय माणसाला अक्कल येत नाही.. म्हणूनच मी म्हणतो कि तुमचं पुढंच शिक्षण आपण बारामतीला करू आणि त्यापुढंच जसं सतीशला पुण्याला किंवा मुंबईत नोकरी मिळेल तिथे करा... त्याकरता लग्नाचं कशाला थांबायचं? काय म्हणता वाहिनी ?"
" नाही...मला हे पटत नाही..मी एवढ्यात लग्न करणार नाही...सतीशच लग्नाचं वय झालंही असेल पण माझं नाही "
" हो ताईचं बरोबर आहे... " पप्या पटकन बोलून गेला. आईले त्याला खेचत बेडरूममध्ये नेलं.
" काका त्यापेक्षा आपण अस करू.. सतीशचा बारामतीच्या ऑफिसचा बॉंड संपला कि त्याला जॉब बघू दे तोपर्यंत माझं ग्रज्युऎशन पण झालं असेल मग तेव्हाच ठरवू काय ते.. उगाच आत्तापासून कशाला ठरवून ठेवायचं सगळ.. "
" बर तसं करू पण निदान साखरपुडा करून ठेवूया ना.. ? काय म्हणता आजी… ?"
" ह... अरे भाऊ घाई होतीय रे जरा... थोडं थांब... "
" काका... माझा निर्णय झालाय... शिक्षण झाल्याशिवाय लग्न नाही... जर सतीशला थांबायचं असेल तर थांबू दे पण मी त्याला आत्ता कुठल्याही प्रकारची कमिट्मेण्ट देऊ शकणार नाही... "
" बघा परत विचार करून.. सोन्यासारखं स्थळ आहे.. आयुष्यभर बसून खाल्लं तरी कुठ काही कमी व्हायचं नाही.. त्यातून एकुलता एक.."
" काका मग त्याला गावाकडच्या किती तरी मुली सहज मिळतील ना.. "
" हा... हा… तोंड संभाळून बोला... त्याला तुम्ही आवडता म्हणून इथे आलो ना.."
" सॉरी काका... पण माझा खरंच नाहीये एवढ्यात लग्नाचा विचार …तुम्ही सतीशला सांगा.. "
" हुं… बराय…. तुमचा निरोप देतो.. "
"थ्यांक्यू काका... "
" हुं… तुम्ही आजकालच्या पोरी तुमच्या कलानं घ्यावं लागतं… चला आता चालतो मी.. मुहूर्त गाठायचाय.. "
काका तयारीला लागले. ते बेडरूम मध्ये गेल्याचं बघत आईने माझा कानच धरला आणि "काय ग... कसला आगाऊपणा चालला होता? आम्ही अजून जिवंत आहोत.." असं म्हणाली. माझ्याही नकळत मी तिच्या हाताला जोरदार हिसका देत उठले आणि म्हणाले,
" जे मला हवं, जसं हवं तसचं मी करणार.. उगाच माझ्या तर्फे कोणालाही कसलीही कमिट्मेम्ट देऊ नकोस.. "
असं बोलून मी तरातरा गच्चीत गेले. तिथे गेल्यावर खूप मोकळ मोकळ वाटलं आणि माझ्याच ठामपणाचं मलाच आश्चर्य वाटलं. असं एवढं कसं बोलून गेले आईला... ? काकांना तर मला शांत बसवायचं होत म्हणून... पण आईला…? चूक केल कि बरोबर केलं ते समजत नव्हत. अजून थोडा वेळ गेला आणि मी खाली आले. आई ऑफिसला गेली होती. घरी पप्या आणि आजी होते. मी आजीशी बोलायला गेले तर आजीच्या डोळ्यात पाणी आलं. मी आजीला सॉरी म्हणून लागले कि मी आईशी चूकीच वागले … पण आजीने मला जवळ घेतलं आणि म्हणाली,
" तुझी आई तुझ्या ह्या वागण्याने खुश झाली गं बाळा..! " आता शॉक बसायची वेळ माझी होती.
" काय म्हणतेस ? का ? मी काय केलं?"
" तू मोठी झालीस आणि तुझे निर्णय तू घेऊ शकतेस हे तिला पटलं गं.."
" म्हणजे आधी काय वाटत होत तिला कि मी लहान आहे? मला तेव्हाही कळत होत गं.. "
" तसं नाही ग ताई... आधी तू आईला बहुतेक मंद वाटत असावीस पण तुझाही करंट पेटतो हे पाहिल्यावर ती खुश झाली." पप्याने अक्कल पाजळली.
चला निदान कोणालाही हर्ट न करता सतीशला लांब ठेवण्यात यश मिळालं तर... सुटले बुआ.. आता उद्याची तयारी करायला हवी म्हणून घेऊन जायचे कपडे गोळा करायला घेतले आणि बाबांना येताना काय काय खाऊ आणायला सांगायचा ह्याची तोंडी यादी केली. यादी तशी मोठी झाली होती.. बट की फर्क पैंदा है... कुडी भी तो बडी हो गई है ना… ! आजची प्रँक्टीस पार पडली कि झालं मग... मिशन सांगली...!

क्रमशः

एक संघ मैदानातला - भाग १ http://www.misalpav.com/node/35830
एक संघ मैदानातला - भाग २ http://www.misalpav.com/node/35846
एक संघ मैदानातला - भाग ३ http://www.misalpav.com/node/35878
एक संघ मैदानातला - भाग ४ http://www.misalpav.com/node/35893
एक संघ मैदानातला - भाग ५ http://www.misalpav.com/node/35924
एक संघ मैदानातला - भाग ६ http://www.misalpav.com/node/35954
एक संघ मैदानातला - भाग ७ http://www.misalpav.com/node/35989

लेखनविषय::

समाजविरंगुळा

प्रतिक्रिया

हाहाहा! चांगलंच उडवून लावलंत! आता 'मिशन सांगली' च्या प्रतीक्षेत.

मस्त. आता मैदानावर काय होतंय ते वाचायला उत्सुक आहे.

संजय पाटिल's picture

12 May 2016 - 4:31 pm | संजय पाटिल

आधी तू आईला बहुतेक मंद वाटत असावीस पण तुझाही करंट पेटतो हे पाहिल्यावर ती खुश झाली.".....
लोल...
बादवे ... मस्त चालू आहे..

अप्पा जोगळेकर's picture

12 May 2016 - 5:42 pm | अप्पा जोगळेकर

मस्तच चालू आहे सीरीज.

मुक्त विहारि's picture

12 May 2016 - 5:44 pm | मुक्त विहारि

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

बोका-ए-आझम's picture

12 May 2016 - 6:37 pm | बोका-ए-आझम

असंच पाहिजे. पुभाप्र!

ज्जे बात :) मस्त टोला हाणला ..आता मिशन सांगलीच्या प्रतिक्षेत :)

नाखु's picture

13 May 2016 - 8:44 am | नाखु

गुण लै भारी.

पुढच्या सामन्याच्या प्रतिक्षेतला नाखु