एक संघ मैदानातला - भाग ११

शि बि आय's picture
शि बि आय in जनातलं, मनातलं
1 Jun 2016 - 4:34 pm

सकाळी ११ वाजून गेले तरी आम्हाला कोणालाही जाग आली नव्हती. ११.३० च्या सुमाराला आधी दार वाजल्यासारखे वाटले मग थोड्यावेळातच दादांचा आवाज आला.
"ऐ जागू...दार उघड ना… ते बघ बाहेर बोंबलतायत…" रूपाने जागूला ढोसलं आणि स्वत: कूस बदलून झोपून गेली.
" च्यायला… काय कटकट आहे... ह्यांना आत्ता काय इथे काय करायचं आहे..." बडबड करत जागुने दार उघडले.
" काय झालं दादा... ? "
"अरे मला आत तर येऊ दे...आणि तुम्ही अजून झोपा कसल्या काढताय? चला बाहेर..." बँग घेऊन दादा खोलीत घुसलेच.
" दादा... प्लीज अजून थोडा वेळ झोपू दे हो.. काल अजिबात झोप नाही मिळाली... प्लीज.. प्लीज" असं म्हणत त्यांनी काही म्हणायच्या आत जागू परत पसरली.
दादा बँग घेऊन पसरलेल्या मुली आणि त्यांच्या सामानातून वाट काढत एका कोपर्यात गेले आणि सामान ठेऊन परत बाहेर जायला निघाले तेवढ्यात त्यांना काही तरी दिसलं.
" अंकू उठ… ऐ अंकू … उठतेस ना... अंकू ऎ ... " दादा अंकूला हाक मारायला लागले. अंकू नाही पण योग्या उठली.
" ओss .. काय झालं ? उठतो ना आम्ही थोड्या वेळाने.... " योग्याने जाम वैतागून उत्तर दिले.
" योग्या उगाच वैतागून माझ्याशी बोलू नकोस... अंकूकडे बघ म्हणजे तुला कळेल मी तिला का उठवत आहे ते.. " दादांनीही आवाज चढवला. योग्याने अंकूकडे पहिले. रक्ताचा लाल डाग अंथरुणाला लागला होता. योग्या काय ते समजली. तिने दादांकडे पाहिले आणि अंकूला उठवायला लागली.
" मेडिकल कीट घेतलं आहे ना..? आत्ता वापरा काय ते त्यातलं मग संध्याकाळी ग्राउंडवर जाताना बघू काय ते " असं म्हणत दादा खोली बाहेर पडले.
एवढ्या हाक मारून पण अंकू उठत नाही म्हणून योग्याने जोरदार चापटीने अंकिताचे ढुंगण शेकवले.
" ए चंपा... उठ.. बघ.. बर्थडे केलास तू... " अंकिता अजूनही झोपेतच होती पण बर्थडे म्हंटल्यावर तिची झोप खाड्कन उतरली.
" काय ग़ झालं हे ताई.. मला नको होत हे सगळ.. आत्तापर्यंत मी ऐकत होते पण आता मला पण हे सगळ होणार... शीsss... "
" ऐ.. चल उठ.. आधी डोक्यावरून आंघोळ कर मग सांगते तुला अजून गम्मत... बर पॅड आणले आहेस का?"
" नाही.. माझ्याकडे काहीच नाहीये.."
" बर चल.. कपडे घे.. बाकीच मी बघते.. "
अंकू आणि योग्या येईपर्यंत आम्हाला हि खबर लागली होती कारण हे सगळ चालु असताना तुप्याला जाग आली होती. त्यांनी खोलीत पाउल टाकल्याबरोबर आम्ही पारोश्या तोंडाने 'हँपी बर्थ डे' साँन्ग म्हणायला लागलो. आफ्टरऑल तिची फर्स्ट डेट होती ना... सेलिब्रेशन तो बनता है.. नॉनवेज जोक्स ऐकणार्या आणि सांगणार्या टोळीत आज तिचा ऑफ़िशियल समावेश झाला होता.
ब्रश करून आणि फक्त तोंड धुवून आम्ही मेसकडे मोर्चा वळवला. खूप भूक लागली होती. जेवण साधं पण खूप छान होत. भरपेट जेवल्यावर खोलीवर आलों खोली आवरून घेतली आणि ८ जणीत मेंढी-कोटचा डाव सुरु केला जोडीला भसाड्या आवाजातली गाणी होतीच. मध्ये मध्ये अंकूचं बौध्दिक घेण सुरूच होत. साधारण २ तास झाल्यावर मग अंघोळीसाठी लाईन लागली. आमची जिल्हा परिषदेच्या शाळेत सोय केल्यामुळे बाथरूम संडास सगळच सार्वजनिक होत. ४ संडास आणि ४ बाथरूम ५ संघामध्ये शेअर करायचं होत त्यामुळे एकावेळी सगळ्याचं सगळ आवरण शक्य नव्हतं. त्यामुळे एका संघाने नंबर लावला की त्या जीवावर सगळ्या संघाने अंघोळ उरकल्याशिवाय बाथरूम सोडायचं नाही असा अलिखित नियम होता. सुदैवाने त्या दिवशी पाणी असल्यामुळे हे शक्य झालं असावं.
संध्याकाळी ग्राउंडवर ५ चा रिपोर्टिंग टाईम होता. त्यामुळे आम्ही तयारी करून ४ वाजताच बाहेर पडलो. दादा आमच्याबरोबर होतेच. मेसमध्ये चहा घेऊन रस्त्यात मेडिकल आणि केकचं दुकान शोधत पुढे निघालो. दोन्ही दुकानं सापडली. योग्या आणि अंकू मेडिकल मध्ये गेल्या आणि आम्ही हवरटासारख्या केकच्या दुकानाशी जाऊन थांबलो.
" अऎ... पोरींनो.. चला पावलं उचला... असं का थांबलाय?... येतील त्या मागून... आपण पुढे होऊया.."
" दादा थांबा.. केक खायचाय... "
" केक कशाला…? कोणाचा वाढदिवस आहे ? तुझा कि माझा ? उगाच बकरीसारखं चरू नका.. खेळायचं आहे तुम्हाला" असं म्हणत दादा तरातरा पुढे निघाले. आम्ही मात्र खरचं अंकूकडून केक वसूल केला आणि दादांचा केक पार्सेल घेतला. तिला गिफ्ट काय द्यावं ह्याचा विचार करत करत ग्राउंडवर आलो. तोपर्यंत आम्ही आल्याची नोंद दादांनी केलीच होती. प्रवेशद्वाराशी संपूर्ण टीम दिसल्यावर आमच्या नावाचा पुकारा झाला. संचलनासाठी सगळ्या टीम्सना ग्राउंडवर बोलावले होते. जाता जाता दादांच्या हातात त्यांच्या केकचं पार्सेल कोंबलं आणि आम्हाला दाखवलेल्या जागी मैदानात जाऊन बसलो.
स्टेडीयम फुल भरलं होत. लोकांचा उत्साह जबरदस्त होता. ग्राउंडवर रांगोळ्या काढल्या होत्या. लहान मुलांचे कार्यक्रम असणार आहेत हे त्या छोट्यांच्या धावपळीवरून जाणवत होत. संघाच्या नावाची पाटी आम्हाला देण्यात आली. आज तुप्या तो नावाचा बोर्ड घेऊन लीड करणार होती. ग्राउंडमध्ये बसल्या-बसल्या आम्ही आमचं कीट सारख केलं. शूजच्या लेस एकाच पद्धतीने बांधल्या. अप्परची चेन वरपर्यंत लावली. सगळ्यांनी डोक्याला पांढरे हेअरबॅंड लावले. कानातले, अंगठ्या, घड्याळ अश्या सगळ्या वस्तू काढून ठेवल्या आणि संचलनाला तयार झालो. थोड्याच वेळात प्रमुख पाहुणे आले आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. हार-तुरे झाल्यावर ऐक-ऐका संघाच्या नावाचा पुकारा सुरु झाला त्याबरोबर ती टीम मार्च करत स्टेज समोर येत होती. स्टेजसमोर उभारलेल्या तिरंग्याला सँल्यूट करून पाहुण्यांना अभिवादन करून पुढे जात होती. माईकवरून त्या संघाची थोडक्यात माहिती पाहुण्यांना तसेच प्रेक्षकांना दिली जात होत होती. आमच्या संघाचे नाव पुकारले गेले. तुप्याने खणखणीत आवाजात मार्च करण्याची सूचना दिली आणि ठरल्याप्रमाणे आम्ही मार्च सुरु केलं. स्टेज समोरील तिरंग्याला सँल्यूट करून आम्ही पुढे निघून आलो. आम्ही कुजबुजत्या स्वरात "तुप्या... पाहुणे राहिले" म्हणून आठवण करून देत होतो पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. स्टेज बरच मागे पडलं होत. आम्ही आमच्या जागेवर परत आल्यावर तुप्याला हे असं करण्याचं कारण विचारल. तिने अगोदर उडवा-उडवीची उत्तरं दिली मग नंतर सांगते म्हणून आम्हाला गप्प बसवले. अर्थात हि गोष्ट प्रेक्षकांना समजली नाही. सगळा सोहळा आटोपल्यावर आम्ही स्टेडीयम मध्ये बसल्यावर तिने खुलासा केला की तिरंग्याला सँल्यूट केल्यावर तिला प्रमुख पाहुण्यांना अभिवादन करावेसे नाही वाटले... बस्स. आम्हीही गोष्ट वाढवली नाही.

तेवढ्यात दादा आले. येताना लॉट घेऊन आले. आम्ही 'ब' गटात होतो आणि आम्हाला आधी वसईची टीम मग कोल्हापूरची टीम अशा २ मँच होत्या. आजची आमची शेवटची आणि उद्याची दुसरी मँच होती. दोन्ही टीम तगड्या होत्या. वसईची टीम तर आम्हाला भारीच होती कारण त्या खेळाडूंच्या तब्येती जबरदस्त होत्या. संपूर्ण लॉट पाहिल्यावर लक्षात आले कि जर दोन्ही मँचेस जिंकलो तर क्वार्टर फायनलला सोलापूरची टीम पडेल जिला सहज मारता (हरवता) येईल आणि फायनलचे काही चान्स राहतील नाही तर पुण्याची टीम येईल जिला काढण (जिंकणे) आम्हाला चांगलच कठीण जाऊ शकत मग मात्र दुकान बंद करायचीच वेळ (हरल्यामुळे स्पर्धेतून बाद होणे) येईल. आमची विचारचक्र फिरायला लागली. कोणाला कसं कव्हरमध्ये घायचं आणि आपण जाऊन कुठे फसायचं नाही ह्याची गणित सुरु झाली. अजून पहिली मँच पण सुरु झाली नव्हती आणि आमची ५ वी मँच होती.
साधारणत: आमच्या विचारांचा वेग ओसरल्यावर दादांनी रुपाला परत केक विषयी विचारले. त्यांना अजूनही खरच वाटत होत कि कोणाचा तरी वाढदिवस आहे. तेव्हा रूपाने दादांना सांगितलं कि, " दादा आज अंकू मोठी झाली.. आज तिला पहिल्यांदा पिरिएड आले." क्षणभर दादा शांत बसले आणि म्हणाले
" अरे ... एवढ्या कशा ग तुम्ही मुली भराभर मोठ्या होता.. अजून लहान आहे म्हणेपर्यंत चटकन बदलून जाता.. हा वेग आम्हाला नाही झेपत.. उद्या मुन्नू पण मोठी होणारच आहे तेव्हा मी काय करेन ?" दादा एकदम सेंटी झाले.
" दादा आम्ही काय आणि मुन्नू काय वेगळ्या होत का? जे व्हायचे ते होणारच.. पण त्यामुळे माणूस तर नाही ना बदलत.. का उगाच टेन्शन घेताय?"
दादांनी केक संपवला आणि शांत बसून राहिते, ते बहुतेक लेकीच्या आठवणीत रमले. आम्हीही ग्राउंडवर चाललेले लहान मुलांचे कार्यक्रम बघत राहिलो.
साधारण अजून तासाभराने आम्ही उठलो आणि स्टेडीयमच्या मागे वाँर्मअप करायच्या जागेपासून जरा दूर बसलो आणि मँचचं प्लानिंग करायला लागलो. आत्ता कुठे दुसरी मँच सुरु झाली होती. बाथरुमला जाण, थोडं अंग हलकं करण मग वाँर्म-अप ह्यात वेळ जाणारच होता.

क्रमशः

एक संघ मैदानातला - भाग १ http://www.misalpav.com/node/35830
एक संघ मैदानातला - भाग २ http://www.misalpav.com/node/35846
एक संघ मैदानातला - भाग ३ http://www.misalpav.com/node/35878
एक संघ मैदानातला - भाग ४ http://www.misalpav.com/node/35893
एक संघ मैदानातला - भाग ५ http://www.misalpav.com/node/35924
एक संघ मैदानातला - भाग ६ http://www.misalpav.com/node/35954
एक संघ मैदानातला - भाग ७ http://www.misalpav.com/node/35989
एक संघ मैदानातला - भाग ८ http://www.misalpav.com/node/36014
एक संघ मैदानातला - भाग ९ http://www.misalpav.com/node/36071
एक संघ मैदानातला - भाग १० http://www.misalpav.com/node/36205

समाजविरंगुळा

प्रतिक्रिया

नाखु's picture

1 Jun 2016 - 4:39 pm | नाखु

आणि बाप वाक्य.

" अरे ... एवढ्या कशा ग तुम्ही मुली भराभर मोठ्या होता.. अजून लहान आहे म्हणेपर्यंत चटकन बदलून जाता.. हा वेग आम्हाला नाही झेपत.. उद्या मुन्नू पण मोठी होणारच आहे तेव्हा मी काय करेन ?" दादा एकदम सेंटी झाले.

लेकीचा बापुस नाखु

भारी लिहिताय. पुभाप्र.

संजय पाटिल's picture

1 Jun 2016 - 5:57 pm | संजय पाटिल

व्वा.. भारीये..

आनन्दा's picture

1 Jun 2016 - 6:06 pm | आनन्दा

वचत आहे.

रमेश भिडे's picture

1 Jun 2016 - 6:09 pm | रमेश भिडे

मस्त सिरीज सुरु आहे... थोडे मोठे भाग टाकले तर आवडेल.

मुक्त विहारि's picture

1 Jun 2016 - 8:52 pm | मुक्त विहारि

पुभालटा.

अभ्या..'s picture

1 Jun 2016 - 9:51 pm | अभ्या..

भारी लेखन

आणि महत्वाचे म्हणजे तुप्या योग्या अंकू रुपा सगळ्या पोरी एक नंबर भारी. एकदम लव्हेबल अन जबरदस्त टीम रंगवलीय. अशा कॉन्फिडंट स्पोर्ट्सवाल्या मुली पाह्यल्या कि भारी वाटते.
(सगळ्या स्पोर्टसवेड्यांचा फ्यान)

विनू's picture

1 Jun 2016 - 11:29 pm | विनू

लय भारी

आतिवास's picture

2 Jun 2016 - 6:44 am | आतिवास

छान.
वाचते आहे.

अनुप ढेरे's picture

2 Jun 2016 - 9:53 am | अनुप ढेरे

छान लिहिताय. वाचतोय.

बोका-ए-आझम's picture

2 Jun 2016 - 10:08 am | बोका-ए-आझम

एवढ्या संवेदनशील विषयावरही खूप संयमित आणि छान लिहिलं आहे. पुभाप्र!

अनुप ढेरे's picture

2 Jun 2016 - 10:22 am | अनुप ढेरे

कबड्डीची मॅच अथवा टूर्नामेंट हे केवळ रूपक वाटतय. त्याच्या आजूबाजूने चालू असलेला प्रवास गंमतशीर आहे.

अरे देवा! काय प्रतिक्रिया द्यावी कळत नैये.
हे आजवर कधी वाचलं/ऐकलं नवतं.

लिहिलंय मात्र अप्रतिम.
पुभाप्र..

क्रेझी's picture

2 Jun 2016 - 11:17 am | क्रेझी

हा पण भाग मस्त आहे :) किती सहजपणे मुली मोठ्या होण्याबद्दल लिहीलं आहे तुम्ही,वाचतांना अजिबात विचित्र वाटलं नाही :) आणि हॅप्पी बर्थडे वाचून तर शाळेतले दिवस आठवले मला ;)

धन्यवाद.. तुमच्या सकारात्मक प्रतिसादामुळेच मन उघड करणं सोप जातयं.
खेळाडू म्हणुन घडताना आधी माणूस म्हणुन घडलो आणि ही प्रक्रिया एवढी सहजपणे झाली की आम्हांलाही ते नंतर हळूहळू उमगत गेलं. बऱ्याच गोष्टी शिकण्यासाठी काहींना आयुष्य खर्ची घालाव लागतं अशा काही गोष्टी एकमेकांना बघून त्या परिस्थितीत एकमेकींना आधार देता देता शिकायल्या मिळाल्या.

सिरुसेरि's picture

2 Jun 2016 - 12:53 pm | सिरुसेरि

डॅशिंग लेखन .. चक दे इंडिया ..

दुर्गविहारी's picture

2 Jun 2016 - 9:03 pm | दुर्गविहारी

लवकर लवकर भाग टाकत चला. उत्सुकता वाढलिये.

दा विन्ची's picture

2 Jun 2016 - 10:20 pm | दा विन्ची

मस्तच चालू आहे. स्पर्धा बहुतेक तरुण भारत मैदानात असणार. पुभाप्र.