एक संघ मैदानातला - भाग ३

शि बि आय's picture
शि बि आय in जनातलं, मनातलं
1 May 2016 - 2:13 pm

सकाळी ग्राउंडवर गेल्यावर समजले की दीप्तीचा खांदा बसवला आहे आणि ४ दिवस विश्रांती नंतर ती प्रँक्टिस करू शकेल. ऐकून बर वाटलं..... पण आमच्या मिशाळ गब्बरला ते पटलं नाही. आम्हीच तिला मोडलंय अस समजून आप्पांनी जे काही लेक्चर द्यायला सुरुवात केली. अखंड पाऊण तास बोलून झाल्यावर बहुतेक ते दमले... शेवटी आम्ही मांडवली करत स्किल प्रँक्टिस घ्या असं सांगितल्यावर ते गप्प बसले.
नियमांच्या यादीत अजून एका नियमाचा समावेश झाला. व्यायाम करताना, स्किल प्रँक्टिस करताना कामाशिवाय बोलायचं नाही. हे ऐकल्यावर रेश्मा वैतागून आमच्याकडे बोट दाखवत आणि अप्पांची स्टाईल मारत म्हणाली, " उद्यापासून तुम्ही श्वास घ्यायचा नाही… कामाशिवाय एकमेकींशी अजिबात बोलायचं नाही..... " नेमकं हे नाटक त्यांनी पाहिलं आणि त्याच स्टाईलने तिला मैदानाला ५ मोठे राउंड मारायला लावले.
काल हीच कसरत जरा सोपी वाटली होती पण आज खूप जास्त त्रास झाला. सकाळी सकाळी बसायचे पण वांधे झाले होते. उठलं तर बसवतं नाही आणि बसलं तर उठवत नाही अशी परिस्थिती झाली होती. चेंजरूम मध्ये गेल्यावर सगळ्या ज्युनियर मुलींना लवकर पिटाळायच्या दृष्टीने आम्ही त्यांना आधी हात पाय धुवायला दिले. कपडे बदलताना पण आम्ही हळूहळू टाईमपास करत राहिलो. त्या सगळ्या गेल्यावर कालच्या प्रकाराबद्दल चर्चा सुरु झाली. खर तर चूक कोणाचीच नव्हती पण कारण नसताना त्याचा फटका तिला बसला होता. तुप्याला तर तिच्या टर्नच्या चुकीच्या अँगलमुळे हे झालंय असे वाटू लागले होते. बर्याच चर्चेनंतर दीदीने तिला अँगल सुधारण्यासाठी स्किल प्रँक्टिस करायला सांगितले आणि जे झाले त्यात कोणाचा काही दोष नाही हे सगळ्यांना समजावले. कारण ह्याचं गिल्ट मनात ठेवून खेळणे कठीण झाले असते. जाता जाता ती एवढ्येच म्हणाली की, "परत असला प्रकार नको असेल तर ग्राउंडवर नीट वागा… मी काय म्हणतेय ते तुम्हाला समजलंच असेलं.." आम्ही एकमेकींकडे पाहिलं… ती म्हणाली म्हणून शांत राहायचं की त्यांचा माज त्यांना साभार परत करायचा.... सगळ्यांच्या मनात घोळ कायम होता... परत असली मोडतोड नको होती पण म्हणून तो माजही सहन करायचा नव्हता.
संध्याकाळी प्रँक्टिसच्या आधी आम्ही दीप्तीला भेटायला गेलो. तर हा बंड्या फ्रँक्चर हात गळ्यात घेऊन केळ खात टी. व्ही. बघत बसला होता. घरात असलेल्या खाऊचा, फळांचा समाचार घेत तिची चौकशी आणि ग्राउंडवरच्या लेटेस्ट खबरी देण्याचा कार्यक्रम पार पडला. मी आणि तुप्या तिला अगणित वेळा साँरी म्हणालो. तिनेही ते मनावर घेतलेले नव्हते पण आम्हाला कळत होते. बहुदा ह्या वर्षी तिचे सिलेक्शन होणार होते... आणि त्यासाठी ती खूप मेहनत घेत होती. आणि जर ह्या कारणामुळे तिला अनफिट ठरवले किंवा ह्याचा त्रास तिला तिथे झाला आणि त्यामुळे ती परफोर्म करू शकली नाही, तिचे सिलेक्शन नाही झाले तर… देवा... नको असे व्हायला… तिला लवकर बर कर… सध्या तरी आम्ही एवढंच म्हणू शकत होतो.
ग्राउंडवरच वातावरण नेहमीसारखंच आहे बघून मनाला जर बर वाटलं. आम्ही दीप्तीला भेटायला जाणार होतो हे समजल्यामुळे सगळ्या लहान मुली तिची चौकशी करायला आमच्याकडे आल्या. तिची खुशाली आणि ५ व्या दिवशी ती ग्राउंडवर खेळायला येणार हे समजल्यावर आनंदाने नाचत गेल्या. त्यावेळी त्या एवढ्या निरागस वाटल्या की माझीच मला लाज वाटली… सालं आपण ताई म्हणवून घेतो आणि हे असं वागतो… बर त्या रागाची शिक्षा कोणाला मिळते?… आपण नक्की कसा विचार करत आहोत ते समजेनासं झालं होत. वाँर्म -अप करताना कव्हर लावताना सगळ्या वेळी तोच विचार… त्यादिवशीची प्रँक्टिस पार पडली. किरकोळ जखमा सोडल्या तर सगळ्याजणी हाती पायी धड होत्या.
असेच शांततेत ४ दिवस गेले. फार रावडी कोणीच खेळलं नाही. एकमेकांना जर जपूनच खेळत होतो. ग्राउंडवर ऐकायला मिळणाऱ्या शिव्या आणि धुसफूस पण झाली होती. दिवसेंदिवस फिटनेस सुधारत होता. टूरला आता आठवडा राहिला होता. उद्या दीप्ती येणार होती. त्यानंतर तिची कंडीशन बघून राईट टर्नचा विचार केला जाणार होता. आम्ही ज्युनियरच्या यशोदाकडून तो टर्न फिरवून घेत होतो पण दीप्तीला ती रिप्लेस करू शकेल अशी परिस्थिती नव्हती. सध्या समोर असलेल्या २ पर्यायांचा आळीपाळीने वापर करायचा असे ठरवले तर होते. त्यावेळी नक्की काय होणार हे आत्ता कोणीच सांगू शकणार नव्हते.
तसे ही ह्या अनिश्चिततेची सवय झालेली होतीच आम्हाला... कारण हा खेळच असा आहे ना. ताकद… वेग…चपळता…अचूक आणि वेगवान निर्णयक्षमता … ह्याचेच दुसरे नाव कबड्डी आहे ना...

क्रमशः

एक संघ मैदानातला - भाग १ http://www.misalpav.com/node/35830
एक संघ मैदानातला - भाग २ http://www.misalpav.com/node/35846

समाजविरंगुळा

प्रतिक्रिया

भारी सुरू आहे मालिका! पुभाप्र.

माम्लेदारचा पन्खा's picture

1 May 2016 - 3:32 pm | माम्लेदारचा पन्खा

अजून पुढचे भाग टाका हो.....

हे असलं आधी कधीच वाचलेलं नाही. भयंकर आवडतीये मालिका.

धन्यवाद!

अभ्या..'s picture

1 May 2016 - 7:02 pm | अभ्या..

भारीच आं. एकलंबर.

शि बि आय's picture

2 May 2016 - 12:59 am | शि बि आय

धन्यवाद मंडळी...

शि बि आय's picture

2 May 2016 - 1:00 am | शि बि आय

धन्यवाद मंडळी...