एक संघ मैदानातला - भाग २

शि बि आय's picture
शि बि आय in जनातलं, मनातलं
28 Apr 2016 - 4:52 pm

डायरेक्ट दुपारी ४ ला डोळे उघडले.... मस्त झोप झाली होती. परत जेव्हा संध्याकाळी ग्राउंडवर पोचले तेव्हा एक गुड न्यूज मिळाली... आप्पा फक्त सकाळीच येणार होते. हुशशश..... सुटलो, निदान संध्याकाळी तरी मिलिटरी ट्रेनिंग नसणार हे ऐकून जीवात जीव आणि पायातही जीव आला.
आत्ता काय ह्या पोरी काही सुटणार नव्हत्या. आमचा ओपनच्या टीमचा सगळा सेट असल्यामुळे कव्हर सेट करता येणार होती. कव्हर फिरवल्यावर लगेच पाम्मीने धावत जाऊन टर्न घेतला…. झालं तूप्याची सटकली. तिने पम्मीच बखोट धरलं आणि तिला बाजूला केलं. ' ताई, टर्न मला लावायला सांगितला आहे दादांनी"... पम्मी वैतागून तुप्याला सांगायला लागली. तेवढ्यात मी जाऊन माझा कॉर्नर पकडला…" पम्मी ज्युनियारच्या टीम मध्ये लावतेस ना टर्न तिथेच लाव…. इथे शहाणपणा करू नको…मँचला मला टर्न लावायचा आहे... मला तो सेट करू दे." तुप्या गुरगुरली.
तेवढ्यात ठुमकत ठुमकत मीना आली आणि मला पण कॉर्नर देण्यासाठी सुचवले. मी जाम माझी जागा सोडली नाही, वर कव्हर फिरवून रेड मारायला इतरांना सांगितले. तिचं ते ठुमकत ठुमकत चालणं माझ्या डोक्यात गेलं जसं हि मिस वर्ल्डच आहे. तुप्याने माझ्याकडे बघून डोळा मारला… मीही तिला तसाच रिप्लाय दिला... पण आमच्या ह्या वागण्यामुळे ग्राउंडवर तणाव निर्माण झाला. दीदी आल्यावर पम्मीने लगेच चोंबडेपणा करत झालेला प्रकार सांगितला पण उलट दिदिनेच ज्युनियर मुलींची समजूत काढली आणि लहान टीम बरोबर खेळताना प्लेस द्यायचे कबूल केलं.

दुसर्या दिवसापासून विचित्र प्रकार घडायला लागला. सामानातून कधी नी-कॅप गायब व्हायची तर कधी अँक्लेट... कॉटन बँडेजला तर काय ताळमेळच नव्हता. दोन दिवस झाले हा प्रकार सुरु होऊन पण त्याचा छडा काही लागत नव्हता. त्यातच संजूची हाफ पँट गायब झाली. आता मात्र कमाल झाली होती कपडे पण चोरायला लागल्या होत्या या पोरी.....त्या दिवशी ट्रँकपँट वर वेळ निभावली आणि दुसर्या दिवशी सकाळी सगळा प्रकार अप्पांच्या कानावर घातला... आप्पांनी सगळ्यांचीच शाळा घेतली. संध्याकाळच्या प्रँक्टीसच्या वेळी हाफपँट चेंगरूम मध्ये मुकाटयानं ठेवायला सांगितली आणि जर तसे नाही केले तर मात्र सगळ्यांना शिक्षा अटळ होती. पण सुदैवाने तसे झाले नाही आणि आम्ही कोणी यायच्या आधी हाफ पँट तिथे ठेवलेली सापडली.
त्याची खुन्नस म्हणून प्रँक्टीस करताना एकमेकींना कारण नसताना आपटत होतो.... माहित नाही का पण त्या दिवशी कोणीच नीट खेळत नव्हते कारण जे चालू होत तो खेळ नव्हता.
मी माझ्या कॉर्नरला होते. दीप्ती रेडसाठी आली. कबड्डी ..... कबड्डी…कबड्डी.... तिचा दम सुरु होता... आता ती बोनससाठी आत येणार हे तिच्या स्टेपिंगवरून मला समजले.. म्हणून मी तिचा उलटा पट काढायला गेले आणि तेवढ्यात ती उलट फिरली आणि त्याच वेळेला लेफ्ट टर्नवरून तृप्ती सुटली आणि तिने दीप्तीला डँश दिला..... माझ्या हातात अडकलेले तिचे दोन्ही पाय आणि मागून तिच्या खांद्याला बसलेला तुप्याचा डँश.... ती विचित्रपणे पडली… "आईग...." तिचा दम तुटून आवाज आला… तिचा खांदा निखळला होता. सगळे तिच्या भोवती गोळा झालो. कारण नसताना कुठचा तरी राग, वैताग तिच्यावर निघाला होता. आम्हाला सगळ्यांना वाईट वाटत होते. दीदीने तिला डॉक्टरांकडे नेले त्यानंतर सगळेच शांत होते. विशेष काही करावे असे वाटेना म्हणून जेमतेम प्रँक्टीस करून घरी गेलो. हात-पाय धुताना, कपडे बदलताना नेहमीची बडबड, मस्करी, खेचाखेची सगळ मिसिंग होतं. डोळ्यासमोर दीप्तीच येत होती.
घरी गेल्यावर सगळा प्रकार आजीला सांगत असताना आईने ऐकले आणि माझी शाळा घेतली. "कशाला जातेस खेळायला?….काही गरज नाहीये जायची… हात पाय गळ्यात आला म्हणजे कळेल…. त्यापेक्षा स्वंयपाक शिकून घे… तिथे लाथा झाडून काही मिळणार आहे का?… हे असे खेळ खेळण म्हणजे मूर्खपणाचे लक्षण आहे…भाषा बघ तुझी कशी झालीय… मी बाबांना सांगणार आहे… बास झालं खेळण…." अश्या स्वरूपाच्या बडबडीला सुरुवात केली… जाम भूक लागली होती म्हणून किचनमध्ये चक्कर मारली तर आईला वाटलं की मी लगेच तिचं मनावर घेऊन मदत करायला आले आहे… हि हि हि …
तिने लगेचच काकडी चिरण्याची ओर्डर दिली आणि बडबड पुढे सुरु ठेवली. मी न ऐकल्यासारखं करून पण ऐकत ऐकत परत घराबाहेर पडले आणि वैशालीकडे गेले. तिच्याकडे सगळे जेवायला बसतच होते. सहजच तिच्या आईने "बस जेवायला" म्हंटले.... आणि पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी पण बसले… मस्त तळलेले बोंबील आणि कोलंबीचा रस्सा असा बेत असल्यावर कोण नको म्हणेल …मस्त जेवण झाले… जेवल्यावर थोड्या गप्पाही मारल्या आणि परत उष्ण कटिबंधात आले.
तोपर्यंत मातोश्रींनी माझ्या ऐवजी माझ्या धाकट्या भावाची पूजा बांधली होती. पोट भरलेलं असल्यामुळे टी. व्ही. पुढ्यात लोळत पडणार तेवढ्यात परत माझ्या नावाने शिमगा सुरु झाला. मी पण वैतागून तिला योग्या देते तसा मंद मुलीसारखा लूक दिला… मी असं का बघतेय हे न कळल्यामुळे ती शांत झाली. पुढच्या ५ मिनिटात " राणी पानं घे.." अशी खणखणीत ऑर्डर ऐकू आली आणि मी हादडलेले आणि वैशालीच्या आईने प्रेमाने वाढलेले बोंबील आठवले. माझं तर जेवण झालं होत. "मरा आता… शिव्या खाऊन किंवा परत जेवून…" मी मनातल्या मनात काय करावे आणि कसे पटवावे ह्याचा विचार करत पानं घ्यायला लागले. बाबांना यायला उशीर होणार असल्यामुळे आम्ही जेवायला बसलो तेवढ्यात आसावरी मावशीचा फोन आला आणि मी सुटले. वाढलेला थोडासा भात कसाबसा संपवला. आजीने ते नोटीस केले… तिच्याबघून हसले आणि आजच्या फिस्टचा पत्ता आणि मेनू सांगितला. ती पण हसली.

क्रमशः

एक संघ मैदानातला - भाग १ http://www.misalpav.com/node/35830

समाजविरंगुळा

प्रतिक्रिया

एस's picture

28 Apr 2016 - 5:04 pm | एस

आउर आन्दो. पुभाप्र.

अभ्या..'s picture

28 Apr 2016 - 5:07 pm | अभ्या..

मस्त. येऊद्या

कानडाऊ योगेशु's picture

28 Apr 2016 - 5:09 pm | कानडाऊ योगेशु

आवडला हा ही भाग.
तुमची आजी आवडली.!

अनुप ढेरे's picture

29 Apr 2016 - 11:49 am | अनुप ढेरे

आवडला हाही भाग!

संजय पाटिल's picture

29 Apr 2016 - 3:51 pm | संजय पाटिल

आवडले लेखन. पहिला भाग चुकला होता. तो पण अत्ताच वाचला. दोन्ही भाग आवडले.
बादवे,

मी पण वैतागून तिला योग्या देते तसा मंद मुलीसारखा लूक दिला…

हे कसे करतात?

मुक्त विहारि's picture

29 Apr 2016 - 5:57 pm | मुक्त विहारि

कथानक छान पकड घेत आहे.

शलभ's picture

29 Apr 2016 - 8:31 pm | शलभ

+१

सतीश कुडतरकर's picture

30 Apr 2016 - 12:08 pm | सतीश कुडतरकर

मस्त. येऊद्या

नाखु's picture

30 Apr 2016 - 2:21 pm | नाखु

लिखाण आणि कबड्डीला मिपा साहित्यात पहिल्यांदाच स्थान पाहतो आहे.

पुलेशु

नाखु

वगिश's picture

30 Apr 2016 - 3:40 pm | वगिश

मस्त

विवेकपटाईत's picture

30 Apr 2016 - 4:30 pm | विवेकपटाईत

मस्त आवडलं

अरेच्चा! हे तर काहीतरी फारच भारी निघालं!

पुलेशु!!

टवाळ कार्टा's picture

30 Apr 2016 - 6:44 pm | टवाळ कार्टा

चक दे कबड्डी

पैसा's picture

1 May 2016 - 8:32 pm | पैसा

मस्त आहे!

अदि's picture

3 May 2016 - 1:48 pm | अदि

मस्त तळलेले बोंबील आणि कोलंबीचा रस्सा असा बेत असल्यावर कोण नको म्हणेल...व्वा.. वाचूनच तोंपासु..

सुधीर कांदळकर's picture

4 May 2016 - 8:00 am | सुधीर कांदळकर

मस्तझकास आहेत. आवडल्या.

शि बि आय's picture

4 May 2016 - 10:34 am | शि बि आय

धन्यवाद मंडळी

शि बि आय's picture

4 May 2016 - 10:35 am | शि बि आय

धन्यवाद मंडळी