एक संघ मैदानातला - भाग १०

शि बि आय's picture
शि बि आय in जनातलं, मनातलं
29 May 2016 - 12:46 am

पुणे येईपर्यंत आमच्या दुसर्या सीट रिकाम्या होत्या. अर्थात येउन-जाऊन लोकं त्यावर टेकत होतेच पण ठाण मांडून कोणीही बसलं नव्हत त्यामुळे आम्हीही बिनधास्त होतो. आता पुण्यानंतर झोपायचं त्याआधी एकमेकांवर एक तरी भेंडी चढवण्याच्या इराद्याने अखंड गाणी गायली जात होती. तेवढ्यात पुणे आलं, ठरल्याप्रमाणे ३ सिनियर आणि ३ ज्युनियर अशा बाजूच्या बर्थवर झोपायला जाणार होत्या पण भेंड्याना असा काही जोर चढला होता की आता पुण्याहून गाडी हलली की आपण आपापल्या जागी जाऊ असं ठरवलं.
स्टेशनवर लोकांची चढ-उतार चालू असताना ६ गुजराथी बायका प्रचंड कलकलाट करत डब्यात शिरल्या. आमच्याही वरचढ अजून कोणाचा आवाज आहे हे आम्हीही वाकून बघयला लागलो. ३० ते ४५ वयोगटातल्या त्या बायका त्या पँसेजमध्ये आपली न मावणारी प्रचंड आकाराची शरीरं आणि सामान सांभाळत आमच्या दिशेनेच येत होत्या. त्यांना बसवून द्यायला(?) दोन २० ते २२ वर्षाची पोर आली होती. ६ बायकांची फौज एका दिशेने चढली आणि ती पोर दुसर्या बाजूने चढली आणि त्या बायकांचे सामान वायुवेगाने गाडीत ठेवत होती. गाडी जरी १० मिनिटे तिथे थांबली होती तरी शेवटच्या मिनिटाला ह्या फौजेने गाडीवर चढाई केली होती. त्यांना बसूनसवून दिल्यावर त्यांचा निरोप घेण्यासाठी ती मुलं त्यांच्या जवळ आली. हसर्या चेहऱ्याने माना डोलवत निरोप घेत असताना... ते दृश बघून मी पटकन बोलून गेले, " ते बघा.. दुष्काळाची कारणं आणि दुष्काळाचे परिणाम एकत्र फिरत आहेत..." इथे लगेच हशा पिकला. पण त्याचा परिणाम तिथे काही झाला नाही. हाश.. हुश.. करत त्या बायका आमच्याच रिझर्वेशनच्या सीटवर येउन बसल्या. आम्हीही आमचे काम-धंदे सोडून त्यांच्या निरीक्षणात गुंतलो. कोणी कोणत्या रंगाची साडी नेसली आहे... त्या साडीचे मटेरीअल काय आहे ... एवढ्या अवाढव्य देहांना ६ वारी साडी पुरली का... त्यावरचा ब्लाउज मँचींग आहे की नाही.. त्यावर वर्क काय काय केल आहे.. गळ्यात, कानात, नाकात, डोक्यात, हातात, पायात काय काय घातले आहे आणि ते त्या आवताराला शोभतंय कि नाही... त्यांनी घेतलेली पर्स, बटवा त्याला शोभतोय का... झोपताना त्या केलीली हेअर स्टाईल तशीच घेऊन झोपणार की सोडवून... असे बरेच प्रश्न आमच्या मनात होते आणि त्यावर लगेचच हलक्या आवाजात कुजबुजही सुरु झाली. शेवटी आम्हीही मुली होतो ना... हा ! आता प्लेयर्स असल्यामुळे बरेचदा आम्ही आवतारातच असायचो पण ड्रेसिंग स्टाईल, मेक-अप असे विषय आम्हाला अजिबात वर्ज्य नव्हते. त्यातले जास्त आवडत नसले किंवा कळत नसले म्हणून काय झालं? १२ जणींचे १२ आवाज आणि त्यावर आपापली मत मांडत असताना आमचा आवाज कधी मोठा झाला आम्हालाही समजले नाही. आम्ही त्यांच्या बद्दल चर्चा करत आहोत हे त्यांना एकू गेल्यावर ते आमच्या लक्षात आलं आणि आम्ही परत हळू आवाजात कुजबुजायला लागलो.
आता गाडी हलली होती. आता त्या उठून त्यांच्या बर्थवर जातील अशी आमची अपेक्षा होती पण त्या काही उठायचं नाव घेत नव्हत्या. कोणी नव्हत तोपर्यंत आम्ही गात होतो धमाल करत होतो पण आता त्या येउन बसल्या म्हणून बहुतेक आम्हाला झोप यायला लागली. आता त्यांचा ड्रेसिंग सेन्स सोडून त्यांच्या कॉमनसेन्स विषयी बोलायला लागलो होतो. त्याचाही कंटाळा आल्यावर शेवटी चर्चा करून ठरवलं कि दीदी आणि रूपा त्यांना जाऊन उठण्याविषयी सांगतील. त्या प्रमाणे त्या दोघी गेल्या आणि त्यांना आम्हाला झोपायचं आहे त्यामुळे प्लीज बर्थ रिकामा करता का? असं त्यांना नम्रपणे सांगितले. त्यावर गुलाबी साडीवली बाई उसळली आणि म्हणाली," हमारा रिझर्वेशन है... हम क्यू उठे?" आता चक्रावण्याची पाळी आमची होती. अस कसं शक्य आहे म्हणून दीदीने त्याचं तिकीट बघायला मागितलं तर,
" हम तिकीट टी.सी. को हि दिखायेगे ... तुम लोगोंको नही.. तुम जैसी लडकीयाँ विदाऊट रिझर्वेशन अंदर आयी ही कैसे?" म्हणून उलट आम्हालाच झापायला लागली. आम्ही खरंच रिझर्वेशन केलंय हे दाखवण्यासाठी आम्ही आमचं तिकीट दाखवायला गेलो,
" ये देखो आंटी हमारा भी रिझर्वेशन है.. हम विदाऊट रिझर्वेशन ट्रँव्हल नही कर रहें... आपही देखलो ये तिकीट ।"
" हमें आप लोगों का तिकीट वैगरे नही देखना.. आपको जो भी करना है टी.सी. आने के बाद करना.. हम नही उठेंगे।"
" अरें आप एसे नही कर सकती.. यह बर्थ हमने रिझर्व किया है.. आप प्लीज आपका तिकीट दिखाईयें। "
" ऐ लडकी एक बार बोला समज में नही आया क्या ? अभी जाओ यहसे... हमें सोना है.. साला ये लोग ऐसाही है.. "
आता मात्र हद्द झाली. तुप्या आणि योग्या टी. सी. ला शोधायला गेल्या. डब्यातली बाकीची माणसं आमची गंमत बघत होते. एवढ्या वेळ आम्ही सगळ्या एकत्र बसलो होतो त्यामुळे ते बर्थ खरच आमचे आहे कि नाही या बद्दल तेही कन्फ्युज असावे. आम्ही परत त्यांना समजावण्याचा प्रयत्न करून पहायचा ठरवला.
"आंटी प्लीज आपका तिकीट दिखाईये... हमें लग रह है कि आप शायद गलत डीब्बे में चढ गये हो। "
" देखो... हम सही डीब्बे में सही जगह आ गये है.. तुम लोंग गलत जगह हो.. अपना तिकीट चेक करो.. " ह्या वेळी तिने जवळ जवळ धमकावले. तुप्या आणि योग्या हात हलवत परत आल्या. गाडी फुल असल्यामुळे टी.सी. ला इथे यायला अजून वेळ लागणार होता. या सगळ्यात १ वाजून गेला होता. त्या बायका झोपायची तयारी करून आडव्याही झाल्या होत्या. बर्थच रिझर्वेशन करून आम्ही मात्र धुबडासारख्या जाग्याच होतो. आता टी. सी. येत नाही तोपर्यंत आम्ही झोपू शकत नव्हतो मग त्यांनाही झोपू द्यायचं नाही असं ठरवले. तरी हे सगळ करण्याआधी आम्ही आमचं तिकीटही चेक केलं. तारीख, वेळ, बर्थ नंबर सगळ बरोबर होत म्हणजे गोंधळ त्यांच्याच तिकिटात होता पण त्रास आणि दादागिरी मात्र आम्ही सहन करत होतो. आता बास झाल.. आक्रमण..
मी जागू आणि योग्या आम्ही तिघी जाऊन दोन बर्थ मधल्या जागेत पेपर टाकून बसलो आणि गप्पा मारायला लागलो. त्यांना ते सहन झालं नाही. लाईट लावत त्या सगळ्याजणी उठल्या आणि आमच्या अंगावर ओरडायला लागल्या. गुजराथी मध्ये काही तरी मोठ्याने बोलायला लागल्या. आम्ही देखील उठून शांतपणे उभ्या राहिलो. ह्या वेळी चक्क जागूने एकही शिवी दिली नव्हती ते बघून मी आणि योग्य हैराण झालो. सगळी अवजड समानं गुजराथीमध्ये आरडा-ओरडा करत उठल्यामुळे आमच्याही मुली आल्या. त्यामुळे आता काय चालत्या ट्रेनमध्ये कुस्तीचा डाव रंगतोय असं वाटायला लागलं होत. तसं आम्ही काही करणार नव्हतो पण खुन्नस तर नक्कीच देणार होतो. ट्रेनमधले बाकीचे लोक आम्हाला समजावयाला आले कारण ह्या सगळ्याचा त्यांना त्रास व्हायला लागला होता, त्यांची झोपमोड व्हायला लागली ना... आम्ही शांतपणे त्यांना त्या बायकांचे तिकीट चेक करण्यास सांगितले पण बायकांनी त्यालाही नकार दिला मग मात्र आम्ही इतरांना सॉरी म्हणत परत त्या पेपरवर बसलो आणि आमची पटर-पटर सुरु ठेवली. आता मात्र त्या बायकांनी आमच्याशी भांडायला सुरुवात केली.
आम्ही पण कुठेही कमी नाही दाखवत त्यांच्यावर तुटून पडलो. जवळ-जवळ १५ मिनिट शाब्दिक मुष्टियुद्ध झाल्यावर दोन्हीकडचे योद्धे थंडावले पण परत २ मिनिटच ताज्या दमाच्या योद्ध्यांनी सुरुवात केली. ह्या वेळी मात्र त्यांचा किल्ला लवकर पडला कारण आमच्याकडून हल्ला करायला जागू आणि मी होतो ना ! ह्या गोंधळाला बाकीचे लोक वैतागले आणि काही जण टी.सी. ला शोधायला निघाले. थोड्याच वेळातच ते हि सगळे हात हलवत परत आले तोपर्यंत आम्ही किल्ला लढवत होतो पण गाडी काही पुढे जात नव्हती जागा काही रिकामी होत नव्हती. आता तर खरच झोप यायला लागली होती. आम्हीही उभे राहून भांडण करून वैतागायला लागलो होतो. संजू आणि रेश्मा उठल्या आणि तडक कुठे तरी निघाल्या. आम्ही पण चक्रावलो कि न सांगता ह्या चालल्या तरी कुठे? तरातरा चालत गायब झाल्या आणि २० मिनिटांनी रेल्वे पोलिसांना घेऊन अवतीर्ण झाल्या. पोलिसांना बघून सगळ्यांची हवा टाईट झाली. आमचा कलकलाट बघायला अख्खा डबा गोळा झाला होता त्यामुळे पोलिसांना अजूनच चेव चढला. मोठ्या आवाजात गुरुगुरत त्यांनी सगळ्यांना जागेवर पिटाळले आणि त्या बायकांकडे मोर्चा वळवला. आता मस्त गमत बघायची ह्या हेतूने आम्हीही पोलिसांना जागा करून देत मागे सरकलो. पोलसांनी तिकीट मागितल्यावर मात्र गपचूप त्यांनी तिकीट काढून दाखवलं. पोलिसाच्या हातात तिकीट आलय हे पाहिल्यावर आम्ही लगेच मागच्या बर्थ वरच्या माणसाला त्याच्या बर्थ वरून खाली उतरवून आम्ही तिथे उभ्या राहिलो आणि तिकीट बघू लागलो. ते तिकीट पाहून आम्ही गोंधळलो कारण तारीख, बर्थ सगळ सेम होत... मग गोंधळ कुठेय? तेवढ्यात गीताची ट्यूब पेटली. तारीख बदलल्यामुळे त्यांचा घोळ झाला होता. त्यांना आजच्या गाडीचे तिकीट आहे असे वाटल्यामुळे आजची गाडी पकडली पण प्रत्यक्षात त्यांची कालची गाडी होती. एका तारखेच्या गोंधळामुळे सगळा घोळ झाला होता. आम्ही लगेच गोंगाट घालायला सुरुवात केली मात्र त्या सगळ्या अवजड सामानांची अवस्था वाईट झाली होती. चढवायला आणि सामान उचलायला त्या बिचार्या पोरांनी मदत केली होती उतरते वेळी त्यांनी कदाचित हमाल पहिला असता पण आता असं अधे-मध्ये अडनिड्या वेळेला काय करणार ? त्यांचा सगळा माज पार उतरला होता, चेहरे जोकारासारखे दिसायला लागले होते. त्या पोलिसांचं डोक खायला यायच्या आधी पोलिसच तिथून पळून गेले.. मग मात्र त्यांनी आम्हाला अँडजस्ट होण्यासाठी रिक्वेस्ट केली. त्यांच्या एकूण आकारमान बघता एका बर्थवर दोघी झोपा म्हणणे म्हणजे बर्थच्या मजबुतीची परीक्षा बघण्यासारख होत आम्ही त्यांना २ बर्थची ऑफर दिली. २ लहान मुलींना आम्ही अँडजस्ट केलं. त्या दोन खालच्या बर्थवर सगळी गुजू गँन्ग रात्रभर आमचे समान राखत बसल्या होत्या. जवळ जवळ पावणे दोनला झोपून पहाटे ५ वाजता आम्ही उठलो आणि आमचे बर्थ त्यांना दिले. अनेक वेळा थँक्स म्हणत त्या बर्थवर जाऊन झोपल्या आणि आम्ही पावणे सहाला सांगलीला उतरलो. संयोजकांनी गाडी पाठवली होतीच, त्यात बसून ग्राउंडवर गेलो. पुढच्या १५ मिनिटात चावी मिळाल्यावर आमच्या खोलीवर आलो आणि अंग टाकलं. नाही म्हंटलं तरी जागरण झालचं होतच. संध्याकाळी खेळण्यासाठी फ्रेश असणं गरजेचं होत ना.. !

क्रमशः

एक संघ मैदानातला - भाग १ http://www.misalpav.com/node/35830
एक संघ मैदानातला - भाग २ http://www.misalpav.com/node/35846
एक संघ मैदानातला - भाग ३ http://www.misalpav.com/node/35878
एक संघ मैदानातला - भाग ४ http://www.misalpav.com/node/35893
एक संघ मैदानातला - भाग ५ http://www.misalpav.com/node/35924
एक संघ मैदानातला - भाग ६ http://www.misalpav.com/node/35954
एक संघ मैदानातला - भाग ७ http://www.misalpav.com/node/35989
एक संघ मैदानातला - भाग ८ http://www.misalpav.com/node/36014
एक संघ मैदानातला - भाग ९ http://www.misalpav.com/node/36071

समाजविरंगुळा

प्रतिक्रिया

चैतू's picture

29 May 2016 - 1:21 am | चैतू

आणखी येऊद्या...

मुक्त विहारि's picture

29 May 2016 - 5:53 am | मुक्त विहारि

पुभाप्र.

आणि एक विनंती...

पुभालटा

एस's picture

29 May 2016 - 8:13 am | एस

पुभाप्र.

संजय पाटिल's picture

29 May 2016 - 11:09 am | संजय पाटिल

पुभाप्र...

श्या.....मुख्य स्पर्धेच्या आदला दिवस होता ना तो? त्या रात्री धड झोपा नाहीत मंजे लैच अवघड की!

रच्याकने, त्या प्रवाशांकडे आदल्या दिवशीचं तिकिट असणं म्हणजे तिकीटच नसण्यासारखं झालं की!

गोष्ट मात्र फारच सुरेख!
पुभाप्र!

क्रेझी's picture

30 May 2016 - 8:53 am | क्रेझी

लवकर टाका हो नवे भाग! बाकी कथा मस्त चालू आहे :)

नाखु's picture

30 May 2016 - 9:14 am | नाखु

रिझर्वेशन असूनही त्यांना टीसीने प्रवास करू दिला आणि त्याचा मनस्ताप तुम्हाला,दुसर्या दिवशी स्पर्धा सामना आणि हा ताप.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत...

ता.क. सध्याही कबड्डी चालू आहे का सोडलीय?

काय सांगायचं तुम्हाला ? गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी !!!

माम्लेदारचा पन्खा's picture

30 May 2016 - 7:47 pm | माम्लेदारचा पन्खा

सम्दी सीरिज फालो कर्तोय आमी.........आंदो....!