बोर न्हाण

स्वीट टॉकरीणबाई's picture
स्वीट टॉकरीणबाई in जनातलं, मनातलं
28 May 2016 - 4:51 pm

चार महिन्यांपूर्वी माझ्या नातवाचं बोर - न्हाण केलं. जरा वेगळ्या पद्धतीनी.

आपल्या बाळांचे आपण निरनिराळे कार्यक्रम करतो त्यांबद्दल थोडंसं. त्यांना उत्सवमूर्ती म्हणायचं खरं, पण त्यांना त्यात अजिबात रस नसतो. कौतुक आपल्यालाच असतं आणि असावं देखील. आपण आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या उपस्थितीत ते साजरे करतो कारण आपल्याला आपला आनंद त्यांच्याबरोबर वाटण्याची इच्छा असते आणि ती सफलही होते. मात्र पाहुण्यांच्या दृष्टीनी हा अनुभव काही एकमेवाद्वितीय (unique) नसतो.

तर मग आपण आपल्या कार्यक्रमामध्ये अशांना का सहभागी करून घेऊ नये ज्यांना हा अनुभवच कधी घ्यायला मिळालेला नाही आणि मिळण्याची शक्यता देखील कमीच आहे? ह्या विचारानी आम्ही उत्सवचं बोर-न्हाण सिंहगडच्या पायथ्याशी असलेल्या ‘आपलं घर’ नावाच्या अनाथाश्रमात केलं. अनाथ मुलामुलींबरोबर तिथे निराधार वृद्धांची देखील काळजी घेतली जाते.

बोर-न्हाण हा छोट्यांचा कार्यक्रम असल्यामुळे तिथल्या चौथीपर्यंतच्याच मुलामुलींना त्यात सहभागी करून घेतलं होतं. त्यातली सगळ्यात छोटी मुलगी ‘खुशी’ चार वर्षांची आहे. तिचंही बोर-न्हाण केलं. सर्व मुलांना साखरेच्या दागिन्यांचं जाम कुतूहल! डोक्यावर ओतलेली बोरं आणि चॉकलेटं गोळा करायला हीऽऽ झुंबड. मग त्यांचे खेळ घेतले. ते झाल्यावर संस्थेतल्या सर्वांनाच हॉलमध्ये बोलावलं. मग एक तासभर जादूचे प्रयोग झाले. त्यानंतर जेवण. कार्यक्रम समाप्त.

संस्थेला दिलेली देणगी हा कार्यक्रमाचा भाग न ठेवता संस्थेचे संस्थापक, संचालक अर्थात सर्वेसर्वा श्री. फळणीकर यांच्या ऑफिसमध्ये खाजगीत दिली. खरं सांगायचं तर ऑफिस खाजगी नाहीच. संस्थेचे सर्व व्यवहार अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शक. हे सगळं तिथली स्वच्छता, साधेपणा, टापटीप, मुलांची वागणूक आणि स्वावलंबन यातून पावलोपावली दिसून येतं.

काही वर्षांपूर्वी माझ्या मुलीच्या लग्नाचा स्वागत समारंभ करण्याऐवजी ती सगळी रक्कम आम्ही ‘जनसेवा फौंडेशन’ नावाच्या अशाच संस्थेला दिली होती तेव्हां माझा तिथल्या मुलांशी संबंध आला होता तेव्हां देखील मी अशीच इंप्रेस झाले होते. मात्र मला तेव्हां असं वाटलं की ही संस्था खास चांगली आहे म्हणून इथली मुलं इतकी गुणी आहेत. आता माझ्या लक्षात आलं की कळकळीनी चालवलेल्या या सर्वच संस्था भावनिक रीत्या सक्षम अशी पिढी तयार करताहेत. मात्र आपला त्यांच्याशी संबंध नसल्यामुळे आपल्या हे लक्षात आलेलं नाही.

त्यांच्या हॉलमध्ये आम्ही फुग्यांचं डेकोरेशन करायचं ठरवलं होतं. मात्र आपल्या कामासाठी त्यांचं मनुष्यबळ वापरायचं नाही असं ठरवून आम्ही एक तास आधीच तिथे पोहोचलो. फुगे तिथेच फुगवणं जरूर होतं कारण इतका व्हॉल्यूम गाडीत मावणार कसा? मोठे फुगे तोंडानी घट्ट फुगवणं आणि त्यांची नीट गाठ मारणं सोपं नसतं. पहिली ते चौथीची मुलं हे सटासट करू शकतील यावर माझा विश्वास बसला नसता जर मी स्वतः डोळ्यांनी ते पाहिलं नसतं! अर्ध्या तासात हॉल तयार झाला!

जादुगार देखील आम्हाला डेकोरेशनला मदत करंत होते. ते मंगेश पाडगावकरांची एक कविता गुणगुणू लागले. मी मुलांना विचारलं, “ही कविता कुणाची आहे माहीत आहे का रे मुलांनो?” “होऽऽऽ” एकसुरात उत्तर. कविता त्यांच्या अभ्यासक्रमात नसूनसुद्धा त्यांना ते माहीत होतं! त्यांना हे देखील माहीत होतं की काही दिवसांपूर्वीच पाडगावकरांचं देहावसान झालं होतं! Maybe I am out of touch, आणि एकाचं कौतुक करण्यासाठी दुसर्‍याला खाली खेचण्याची जरूर नाही, पण मला वाटत नाही की नॉर्मल मुलांना प्रायमरीमध्येच साहित्याबद्दल इतकी माहिती असते म्हणून. (मराठी साहित्याच्या या अज्ञानात माझी मुलगी आणि तिच्या मैत्रिणीदेखील सामील आहेतच.)

आपण या मुलांना अनाथ म्हणतो खरं, पण वस्तुस्थिती अशी आहे की आज तिथल्या प्रत्येक मुलाला वीस भावंडं, पंधरा मावशा, दहा आजोबा आणि दहा आज्या आहेत. भले त्यांच्याकडे दिवाळीत फोडायला हजारो रुपयांचे फटाके नसोत, पण तिकडे गणपती, दिवाळी, जन्माष्टमी वगैरे जितक्या जोमात साजरे केले जातात तितक्या जोरात बाहेरची मुलं करंत नाहीत. ‘जनसेवा फौंडेशन’ मध्ये लहान मुलांची काळजी घेणार्‍या ज्या मावशी आहेत त्या व्हील-चेअरमध्ये आहेत! त्या नेहमी म्हणतात, “मी मुलांची काळजी घेतेच कुठे? मुलंच माझी काळजी घेतात!”

अशा ठिकाणी मी जाऊन आले की मला अगदी खुजं असल्यासारखं वाटतं.

हल्ली माझ्या डोक्यात एक किडा वळवळतोय. मूल अनाथ कुठलं म्हणायचं? ज्याला आईवडील नाहीत ते, का ज्याच्यावर संस्कार करायला आईवडिलांना वेळ नाही ते?

संस्कृतीसमाजजीवनमानशिक्षणविचारलेखअनुभव

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

28 May 2016 - 5:07 pm | संजय पाटिल

खरं आहे...

मुक्त विहारि's picture

28 May 2016 - 5:31 pm | मुक्त विहारि

"मूल अनाथ कुठलं म्हणायचं? ज्याला आईवडील नाहीत ते, का ज्याच्यावर संस्कार करायला आईवडिलांना वेळ नाही ते?"

नि:शब्द.

देशपांडे विनायक's picture

28 May 2016 - 6:01 pm | देशपांडे विनायक

एकदम मान्य आणि
ज्यांना संस्काराचीच चाड नाही त्यांना बेवारशी म्हणणे पण अयोग्य ठरू नये

चतुरंग's picture

28 May 2016 - 6:11 pm | चतुरंग

एकदम मस्त अनुभव आणि तितकाच सहजपणाने सांगितला आहेत.

"मूल अनाथ कुठलं म्हणायचं? ज्याला आईवडील नाहीत ते, का ज्याच्यावर संस्कार करायला आईवडिलांना वेळ नाही ते?"
हे अगदी पटलं.

खरंच, आपल्याला वाटतं तसं अनाथ वगैरे कीव करण्यासारखं फार क्वचित असतं. आयुष्याला आधार मिळाला की ते कुठेही फुलतं तितक्याच जोमानी! आपल्याला उगीच वाटत असतं आम्ही आईवडील वगैरे...

शिव कन्या's picture

28 May 2016 - 6:33 pm | शिव कन्या

पटलं.भिडलं.
'मूल अनाथ कुठलं म्हणायचं? ज्याला आईवडील नाहीत ते, का ज्याच्यावर संस्कार करायला आईवडिलांना वेळ नाही ते?'
सहज कथन.डोळ्यांत अंजन.

शिव कन्या's picture

28 May 2016 - 6:33 pm | शिव कन्या

पटलं.भिडलं.
'मूल अनाथ कुठलं म्हणायचं? ज्याला आईवडील नाहीत ते, का ज्याच्यावर संस्कार करायला आईवडिलांना वेळ नाही ते?'
सहज कथन.डोळ्यांत अंजन.

रेवती's picture

28 May 2016 - 6:38 pm | रेवती

एकदम पते की बात!
लेखन आवडले. दहा एक वर्षांपूर्वी एकदा मैत्रिणींच्या जमावामध्ये मी हे बोलून दाखवल्यावर मधमाश्यांनी करावा तसा हल्ला माझ्यावर झाला होता. "तुला काय म्हणायचय? आम्ही इतके वाईट आहोत का? काही होत नाही, आजारी मुलांना पाजायचे टायलेनॉल, द्यायचे डे केअरला पाठवून, होतात मोठी! आपण पालकपणाचा बाऊ करतो....." वगैरे. तुम्ही त्यावेळी माझ्याबाजूला असता तर? लेखन आवडले.

बोका-ए-आझम's picture

28 May 2016 - 6:50 pm | बोका-ए-आझम

मूल अनाथ कुठलं म्हणायचं? ज्याला आईवडील नाहीत ते, का ज्याच्यावर संस्कार करायला आईवडिलांना वेळ नाही ते?

सौ सुनारकी एक लुहार की!

नाखु's picture

30 May 2016 - 9:32 am | नाखु

+१११

उघड्या आभाळाखालचा नाखु

सुबोध खरे's picture

30 May 2016 - 11:55 am | सुबोध खरे

+१००००
__/\___

खेडूत's picture

28 May 2016 - 8:35 pm | खेडूत

छान लेख.
या अश्या चांगल्या संस्थांबाबत अजून सविस्तर माहिती समोर यावी.

सखी's picture

29 May 2016 - 11:01 am | सखी

अजुन माहीती वाचायला आवडेल. बाकी तुम्ही ज्या प्रांजळपणे तुमचा अनुभव सांगत आहात- त्याला सलाम!

भाग्यश्री कुलकर्णी's picture

29 May 2016 - 6:57 am | भाग्यश्री कुलकर्णी

सुंदर. अनाथ कुणाला म्हणायचं. अगदी योग्य लिहीलय.

दिपक.कुवेत's picture

29 May 2016 - 1:23 pm | दिपक.कुवेत

सगळ पटलं

स्वीट टॉकरीणबाई's picture

29 May 2016 - 1:51 pm | स्वीट टॉकरीणबाई

सर्वजण,

धन्यवाद!

रेवती - तुमच्या मैत्रिणींचं काहीच चुकंत नाहिये. त्यांना त्यांच्या मुलांना फक्त मोठं करायचं आहे. ते फारच सोपं काम आहे. त्या ते करताहेत.
मात्र आपल्याला आपल्या मुलांना चांगले नागरिक बनवायचं आहे. त्यामुळे आपल्याला मेहनत घेणं आवश्यक आहे.

सुबक ठेंगणी's picture

30 May 2016 - 10:23 am | सुबक ठेंगणी
नुसता आवडलाच नाही तर पोचला.
मूल अनाथ कुठलं म्हणायचं? ज्याला आईवडील नाहीत ते, का ज्याच्यावर संस्कार करायला आईवडिलांना वेळ नाही ते?
पॉइंट ड्रिव्हन होम. अंतरंग: माझी पुतणी (वय वर्ष १०) एलिझाबेथ एकादशी सिनेमा बघून आली आणि तिला तो आवडला का? असं विचारल्यावर "मला ते पुअर लोकांचे सिनेमे आवडत नाहीत" असं म्हणाली तेव्हा काहीतरी चुकतंय असं वाटत होतं. चकाचक आणि एकही सुरकुती नसलेलं जगंच कसं पुअर आहे हे माझ्या मुलांना पटवून देण्यासाठी तरी असा कार्यक्रम केलाच पाहिजे.
देवेन भोसले's picture

30 May 2016 - 11:41 am | देवेन भोसले

मस्त, खुप उत्तम

स्वाती दिनेश's picture

30 May 2016 - 10:52 pm | स्वाती दिनेश

प्रांजल लेख आवडला,
स्वाती

त्रिवेणी's picture

31 May 2016 - 8:33 am | त्रिवेणी

आवडला लेख.तुमच्या आणि काकांच्या लेखातून खुप पॉजिटिव एनर्जी मिळते.
लिहित रहा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 May 2016 - 8:52 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर शैलीतला सुंदर लेख !

हल्ली माझ्या डोक्यात एक किडा वळवळतोय. मूल अनाथ कुठलं म्हणायचं? ज्याला आईवडील नाहीत ते, का ज्याच्यावर संस्कार करायला आईवडिलांना वेळ नाही ते?

हे तर खासचं !!!

खुप स्तुत्य लेखन आणि विशेषतः अशाप्रकारे खासगी समारंभ अनोख्या पद्धतीने साजरा करुन तथाकथित अनाथ म्ह्णवल्या जाणा-या कोवळ्या जिवांच्या आयुष्यात काही आनंदाच्या क्षणांची पखरण करण्याबद्द्ल तुमचे आणि तुमच्या परिवाराचे खुप कौतुक आणि आभार. ह्यातुन प्रेरणा अजुन काहीजण भविष्यात काहीतरी असेच आगळे
वेगळे उपक्रम नक्कीच करतील.

हल्ली माझ्या डोक्यात एक किडा वळवळतोय. मूल अनाथ कुठलं म्हणायचं? ज्याला आईवडील नाहीत ते, का ज्याच्यावर संस्कार करायला आईवडिलांना वेळ नाही ते? - हा विचार खरंच भिडतो.