बेधुंद (भाग १०)

अविनाश लोंढे.'s picture
अविनाश लोंढे. in जनातलं, मनातलं
11 May 2016 - 7:26 pm

दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५-६ 'ल्यांड क्रुझर ' विद्यापीठात आल्या . आज विद्यापीठ एखाद्या राजकीय सभेची जागा वाटू लागले . आधीच ठरल्याप्रमाणे अश्विनी , नित्या , अक्षा अन सुऱ्या सकाळीच आपापल्या घरी निघून गेले होते , तशी सूचना त्यांना Student Council कडून आली होती .
अमीरच्या वडिलाने कॉलेजच्या 'डीनला अन 'रेक्टरला' सुट्टी असताना पण बोलवले !
'काय काय करणार आहे हि 'ब्याच' अजून ! आजपर्यंत ची सर्वात वाईट 'ब्याच' ही - ' असे कितीतरी वेळा बोलून डीन रिकामे झाले होते अन तसाच भाव 'डीनच्या' चेहऱ्यावर दिसत होता .
डीन ने student council च्या फायनल एअरच्या विद्यार्थ्याबरोबर मीटिंग घेतली ! अमीर ने बोलायला सुरुवात केली अन उत्तेजित झालेले त्याचे वडील तावातावाने बोलत होते - ' यही है तुम्हारे कॉलेज की सेकुरेटी ???
'रेक्टर' फक्त ऐकून घेत होते . फायनल एअर चे विद्यार्थी मुद्दामच हॉस्टेलवर थांबले होते , अमीरच्या वडिलांचे बोलून झाल्यावर student council ने आमिरच्या 'ड्रग्स अन अल्कोहोल' चा मुद्दा उचलून धरला . सुरुवातीला पोलिसात तक्रार करणारच ,ह्याचा आग्रह करणारे अमीरचे वडील आपल्या पोराचे 'पराक्रम' ऐकून गप्प बसले . पोलिसात गेलो तर 'ड्रग्सचा' किस्सा बाहेर येयील अन तो त्यांच्या राजकीय भविष्यासाठी चांगला नसावा ,त्यामुळे त्यांनी प्रकरण मिटवायचे ठरवले .
अमीरनेही इथून पुढे विद्यापीठात रहायची धसकि घेतली होती . एखादी मुलगी जेव्हा मारते तेव्हा कदाचित सगळ्यात जास्त लागत असावं ! अमीर ने आपल्या 'ब्याग्स ' भरल्या अन तो त्याच 'ल्यांड क्रुझर ' मधून परत कायमचा परत निघाला , पुन्हा कधीही परत न येण्यासाठी ! काही दिवसाने असही ऐकल की त्याने बिहार मध्ये कुठल्या तरी विद्यापीठात प्रवेश घेतला म्हणून !

-
सेमिस्टर तिसरी : सेकंड एअर:

सुट्टी संपवून सगळे परत होस्टेलवर आले . ह्यावेळी शिवेकामुळे अक्षाचा ग्रेड कमी आला होता . चंद्या , तात्या दोघेही पहिल्या पाच मध्ये होते ! सुऱ्या अन नित्या कसेबसे पास झाले होते , शिवेका अजूनही टोपर लिस्ट मध्ये होती . अक्षाच्या किस्स्यामुळे तिचा ग्रेड जराही कमी आला नव्हता , ह्या पोरी कसा काय टेन्शन मध्ये ही अभ्यास करत असतात काय माहित ? की अजिबात टेन्शन च घेत नाहीत ?
'सेकंड एअर' मध्ये आल्याने सगळ विद्यापीठ अजूनच फुलल्यासारखं वाटत होत . आत्ता 'फाईव्ह स्टार्स' सेनिअर्स झाले होते , सिनिअर होण्याचा आनंद वेगळाच असतो , कुठेही कसही फिरा , काहीही करा , आरामात बसा , एकदम बिनधास्त !!!
नवीन फर्स्ट एअर ची नवीन फुले विद्यापीठात डोलवत होती , नाही म्हटले तरी अजूनही नवीन फर्स्ट एअरची' रेग्गींग' पुन्हा सुरु झाली होती ! कदाचित आपल्याला झालेला बदला म्हणून किंवा शिस्त म्हणून किंवा रेग्गिंग नाही घेतली तर जुनिअर्स आपल्याला 'रिस्पेक्ट' कसे देणार म्हणून ! ही 'रिस्पेक्ट ' पण भयानक गोष्ट आहे , मिळवण्यापेक्षा ती बळकावायला बरी वाटते !
नेहमी 'थर्ड एअर ' फर्स्ट एअरची 'रेग्गींग' घेत असत . 'सेकंड एअर' नवीन - नवीन सेनिअर झाल्याने त्यांना रेग्गिंग घेण्याची परवानगी नसे , पण तरीही काही 'हिरो ' राग्गिंग घेत होते . फर्स्ट एअरच्या रडणाऱ्या मुलांना समजावयाचे , रेग्गिंग शिस्तीसाठी कस अन किती चांगल आहे , आमची पण रेग्गिंग झालीच होती ना - असं फर्स्ट एअर ला समजावून सांगायचे ! एकूणच काय की नवीन सवतीला आपल्या नवऱ्याचे चांगले , वाईट गुण समजावून सांगायचे , त्याचा अत्याचार शिस्तीसाठी किती चांगला आहे , हे समजावयाचे !
'फाईव्ह स्टार्स' मात्र 'रेग्गींग'पेक्षा जुनिअरशी मैत्री करण्यात उत्सुक असत , ' त्यामुळे ते कुणाच्या मध्ये पडत नसत . मेस मध्ये जाने , जेवण करणे , एखाद्या दुसऱ्या जुनिअर्स शी बोलणे अन परत येणे , असा त्यांचा दिनक्रम असे !
फर्स्ट एअरचे काही जन ग्राउंड वर येत असत . त्यामुळे सिनिअर्स मुद्दामच सुरुवातीचे काही दिवस तरी , ग्राउंड वर नवीन 'हिरवळ' बघायला येत असत . , जिमखान्यात एका बाजूला badminton court होते , त्याच्याच एका बाजूला प्रेक्षकासाठी पायऱ्यांची सोय होती , पायऱ्यांच्या शेजारी जिम होती . badminton court च्या समोर काही अंतरावर टेबल टेनिस खेळण्यासाठी २-३ टेबल होते .
अक्षा अन सुऱ्या badminton खेळत होते अन तेवढ्यात काळ्या 'ट्राक प्यांट' अन पांढऱ्या 'टी शर्ट' मध्ये हर्षला आत मध्ये आली .

नित्या अन सुऱ्या हर्षलाला बघितच राहिले कधीकधी काही व्यक्तींना बघितल्यावरच मनात अन डोक्यात काहीतरी वाजायला सुरुवात होते . कुठून तरी संदेश येतो कि हीच ती आहे , जिच्याबरोबर आपल्याला आयुष्य घालवायचं आहे . अगदी तसंच झालं नित्याबरोबर !
.
'आईला नित्या , काय आयटम आहे य्यार' - सुऱ्या अन नित्या खेळायचं थांबवून हर्षलाला बघत जिमखान्याच्या बाहेर आले .
नित्या तिच्याकडे बघतच राहिला . बघताक्षणीच ती त्याला का माहित पण आपलीशी वाटू लागली . जन्माजन्माच नात आहे हिच्याबरोबर असं वाटू लागलं . तो कुठेतरी हरवला .
' ही जरा तुझ्या त्या बारावीतल्या आईटम सारखी दिसते ना ? - सुऱ्या तिच्याकडे बघतच होता .
' लxx , आईटम नको म्हणू तिला ! ती काही आईटम नव्हती , आवडत होती फक्त , पण ही दिसते तर जरा तशीच - नित्या आपल्या केसांवरून हात फिरवत बोलला .
' आयटम नको तर मग काय म्हणू ?' झाडी '? - सुऱ्या हसत बाहेर पळाला अन नित्या त्याच्या मागे त्याला मारायला बाहेर पळाला .

बाहेर आल्यानंतर थोडा वेळ दोघेही बेंच वर बसले . कसलातरी विचार करत अन अचानक नित्या बोलला .
' अश्विनी कुठाय यार , तिला सांगितले पाहिजे सेटिंग कर म्हणून हिच्याशी ! - नित्या
' मला नाही माहित यार ! पण ती तुला ह्यात अज्जिबात साथ देणार नाही , तिच्याकडून काही अपेक्षा नको ठेउस ! , त्या अमीर ने तिला पूर्ण बदलवून टाकलाय , 'देवदासी ' झालीये ती - कॉलेज अन लायब्ररी असच सुरु आहे तीच ! - सुऱ्या
' कोण आहे यार पण ही , नाव काय हीच ? , सुऱ्या काहीही म्हण पण हिला पटवणारच ' - नित्या
' बर , पटव - त्या अक्षाच्या शिवेका सारखी नसावी म्हणजे झालं , आधीच एंगेज ' - सुऱ्या हसत बोलला .

शेजारून काही फर्स्ट एअर ची मुले जात होती , सुऱ्याने एकाला बोलावले !
' Good Evening सर ??? मान खाली ठेवत तो जुनिअर बोलला .
आजपर्यंत आपण दुसर्यांना सर बोलत होतो , आज कोणीतरी बोलतय हे बघून दोघानाही खूप विचित्र वाटले अन तेवढेच बरे वाटले . माणसाचा स्वभाव पण खूप विचित्र आहे , कधीकधी आपण सहन केलेला अन्याय दुसरे अनुभवताना त्यांना बरे वाटते .
' सर नको बोलूस रे भावा ! - सुऱ्या त्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलला .
' बर सर ' तो घाबरत अन थोडस हसत बोलला .
'आयला ... कळत नाही का तुला , बर सोड , नाव काय तुझ ? - नित्या त्याच्या खांद्यावर हात टाकत बोलला ! अन पुन्हा जिमखान्यात त्याच्याबरोबर जिमखान्यात हर्षलाला बघण्यासाठी गेला .
' निलेश ! ' थोडंस घाबरत त्याने उत्तर दिल .
' ह्या पोरीचं नाव काय ? - टेबल टेनिस खेळत असणाऱ्या हर्षला कडे बघत त्याने विचारलं .
' माहित नाही सर ! - निलेश
' काय भारी आईटम आहे ना , हो कि नाही ? - सुऱ्या हळूच त्याच्या कानात पुटपुटला .
निलेश इकडेतिकडे बघत गुपचूप उभा राहिला !
' अरे काही नाही रे , बोल ना , आवडते का ती तुला ? - सुऱ्या
' हो - निलेश घाबरत बोलला !
' लxx कापून हातात देईन पुन्हा तिच्याकडे बघितलं तरी ! अन सगळ्या फर्स्ट एअरच्या पोरांना सांग की कुणी तिच्यावर ट्राय केला तर चांगल नाही होणार, कळाल ना ? - नित्या रागाने बोलला .
निलेश पुरता घाबरून गेला , ' अरे काही नाही रे , घाबरू नकोस , 'रेग्गिंग' होत ना मेस मध्ये - हे सर तुझी चेष्टा करत आहेत तुझी ! चांगले आहेत हे सर , ये नित्या xxx असं बोलू नको रे , आजपासून जान जिगरी आहे हा माझा - सुऱ्या नित्याकडे बघत बोलला .
हे ऐकून निलेशला जरा बरे वाटले .
ह्या सरांना 'ती' पोरगी आवडली आहे , तू एक काम कर उद्या तिचा बायो डाटा आण , नाव , गाव , पत्ता , असला तर मोबाईल नंबर , आवडता हिरो , आवडती हिरोइन , जन्मदिन , ध्येय अन मैत्री कुणाशी करायला आवडेल , उद्या संध्याकाळ पर्यंत आणला पाहिजेस ! एक कागद घे , त्यात हे सगळ लिही अन तिला दे , ती तुला लिहून परत देईल , आधी आणलास असशील की कुणाचा तरी बायो -डाटा ? - सुऱ्या थोडस हसत बोलला .

फर्स्ट एअर च्या मुलींचा असा बायोडाटा मागून ही पण एक परंपराच होती . मुलीही लिहून द्यायच्या , पण कुणालाही ह्या बायोडाटा वरून आजपर्यंत पोरगी पटली नव्हती . मुलीची कदाचित टायम पास म्हणून बघत असाव्यात !

' हो मागितलाय बायोडाटा , पण तिने लिहून नाही दिले तर ??? - निलेश घाबरत बोलला .
' अरे देईल रे ती , आम्ही पण हेच केलंय मागच्या वर्षी , कितीतरी पोरींचे बायोडाटा दिलेत सिनिअर्स ना ! - सुऱ्या

दुसऱ्या दिवशी नित्या अन सुऱ्या निलेशला दुपारी मेस मध्ये भेटले .
' का रे ? काय झाल ? - नित्या त्याच्या समोर जाऊन उभा राहिला . '
' गुड आफ्टरनून सर ' निलेश उठून उभा राहिला .
' बस रे यार , मला हे सर , विश नको करत जाऊ , टिपिकल सिनिअर नाहीये मी बस , बोललास का तिला ? - नित्या
' हो ती बोलली की , ज्याने बायो डाटा मागितलाय अगोदर त्याचा घेऊन ये म्हणून - निलेश
' नित्या , हाह्हाहा - सुऱ्या जोरजोराने हसू लागला . 'साताऱ्याचा कंदी पेढा आहे अस समजल होतं , हि तर महाराणी आहे की !' हर्षला साताऱ्याची आहे , एवढी तरी माहिती नित्या अन सुऱ्याने काढली होती .
' बर , नित्याने एक कागद घेतला अन स्वतः :चा बायोडाटा लिहून त्याला दिला , जा दे तिला दुपारी '

पुन्हा पुढच्या दिवशीही निलेश रिकामा आला .
' सर , ती मला बोलली की दुसरी काही कामं नाहीत का तुला ???? - निलेश
'नित्या ,तुझा कंदीपेढा डेअरिंगबाज आहे यार ! मागच्या वर्षी आपल्या क्लास मधल्या कोणत्याही पोरीने असे उत्तर दिले नव्हते ' - सुऱ्या
' रेग्गींग' कमी झाल्याचा अजून एक दुष्परिणाम , काय करणार , आपलेच दात , आपलेच ओठ ! - नित्या हसत बोलला .

अश्विनी ला फोन लाव ! हा घे - नित्या आपला मोबाईल सुऱ्या कडे देत बोलला .सुऱ्याने फोन लावला .

' हेल्लो अश्विनी , काय तुम्ही जुनिअर्सना काही सांगता / शिकवता का नाही ? एका पोरीचा बायो डाटा मागीतला तर तीचे किती नखरे ? काय रिस्पेक्ट देत नाही सिनिअर्सना '
'पागल झालाय का तुम्ही दोघं ? अरे ती HDसर ची बहिण आहे ! नाद सोडा तिचा ! अन त्या अक्षा अन शिवेका च्या किस्स्यानंतर पण तुला अक्कल आली नाही सुऱ्या ! - अश्विनी रागात बोलली .
' अशे , मैत्री करायचीय नित्याला फक्त ! सांग तिला ! बायोडाटा मागितलाय फक्त !
' मी काहीही , कुणाला सांगणार नाही , ठेव आत्ता ! लायब्ररीतून हेच बोलायला आले का मी बाहेर ?, अन पुन्हा तिच्या बद्दल मला फोन नका करू ' मग तुमच्यात अन त्या अमीर मध्ये काय फ़रक ? अन अश्विनीने रागाने फोन कट केला .

' नित्या , ती त्या HD ची बहिण आहे , उगीच नको पडू लफड्यात ! -सुऱ्या बोलला .
'अरे डोळ्यासमोरून जात नाही यार , काय जादू केलीय हिने काय माहित नाही राव ! - नित्या विस्कटलेला होता .

दुसऱ्या दिवशी निलेश त्यांना भेटला , हर्षला ने बायोडाटा लिहून दिला होता . निलेशने तो नित्या कडे दिला .
नित्या अन सुऱ्या तसाच तो घडी केलेला 'A ४ 'साईज चा पेपर घेऊन होस्टेल वर रूम मध्ये आले ! नित्या ची छाती का कुणास ठाऊक धडधडत होती .
उघड आत्ता , लव्ह लेटर असल्यासारखे नखरे तुझे ! - सुऱ्या
नित्या ने तो उघडला , हर्षलाच हस्ताक्षर खरच सुरेख होत .

पानाच्या वरतीच -

IIजयभवानीII II जय शिवाजी II
नाव : हर्षला देशमुख
पत्ता : सातारा
जन्मदिवस : १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी - जो आवडेल तो समजावा .
मोबाईल नंबर : ९८७६५४३२१०
छंद : बायोडाटा लिहिणे .
आवडता हिरो : इमरान हश्मी .
आवडती हिरोईन : बिपासा बसू .
आवडता चित्रपट : जिस्म , मर्डर .
ध्येय : आदर्श गृहिणी बनणे (हे खर आहे )
देशाविषयी मत : सांगून काय फायदा ???
मित्र कसा असावा : मैत्री करण्यासाठी नाही आले कॉलेज मध्ये !

हुश्श ! यार हि तर बरीच खतरा पोरगी आहे ! मला नाही वाटत तुझं काही होईल हिच्याबरोबर ! आपल्या भावासार्खीच शहाणी दिसते ! -सुऱ्या
' यार , तू एक नाही वाचल नीट - ध्येय : आदर्श गृहिणी बनणे (हे खर आहे ) !!! ह्याचा काहीतरी अर्थ होत असावा , हो ना सुऱ्या ….

बेधुंद - भाग १ : http://www.misalpav.com/node/34768
बेधुंद - भाग २ : http://www.misalpav.com/node/34925
बेधुंद - भाग ३ : http://www.misalpav.com/node/35006
बेधुंद - भाग ४ : http://www.misalpav.com/node/35777
बेधुंद - भाग ५ : http://www.misalpav.com/node/35798
बेधुंद - भाग ६ : http://www.misalpav.com/node/35832
बेधुंद - भाग ७ : http://www.misalpav.com/node/35859
बेधुंद - भाग ८ : http://www.misalpav.com/node/35885#new
बेधुंद - भाग ९ : http://www.misalpav.com/node/35937
'

(क्रमश :)

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

सुखी's picture

11 May 2016 - 7:52 pm | सुखी

कडक!

आनन्दा's picture

12 May 2016 - 8:28 am | आनन्दा

वाचतोय.

मस्त मस्त :) लवकर टाका पुढचे भाग.

बापू नारू's picture

12 May 2016 - 12:26 pm | बापू नारू

हा भाग पण मस्त जमलाय...