स्वानंदचा बावरा आणि कबीराचा निरंजन

Anand More's picture
Anand More in जनातलं, मनातलं
7 Mar 2016 - 12:08 am

एक एक सकाळ एक एक नवीन गाणं घेऊन येते. आणि मग तेच गाणं दिवसभर माझा ताबा घेऊन बसतं. दोन दिवसापूर्वी असंच झालं. "हजारो ख्वाहिशे ऐसी" या चित्रपटातलं, "बावरा मन देखने चला एक सपना" हे गाणं आठवलं. स्वानंद किरकिरे साहेबांनी एकंच शब्द वापरला आहे "बावरा" पण काय मौज केली आहे !

या "बावराला" समर्पक शब्द मला मराठीत सापडला नाही. पण त्याला जवळ जाणारा एक शब्द आहे बेभान. तुम्हाला अजून चांगला शब्द सापडला तर कमेंट मध्ये सुचवा. गाण्याचे बोल खाली देतोय.

बावरा मन देखने चला एक सपना

बावरे से मन की देखो बावरी हैं बातें
बावरी से धड़कने हैं, बावरी हैं साँसें
बावरी सी करवटों से, निंदिया दूर भागे
बावरे से नैन चाहे, बावरे झरोखों से, बावरे नजारों को तकना
बावरा मन देखने चला एक सपना

बावरे से इस जहाँ मैं बावरा एक साथ हो
इस सयानी भीड़ मैं बस हाथों में तेरा हाथ हो
बावरी सी धुन हो कोई, बावरा एक राग हो
बावरे से पैर चाहें, बावरें तरानो के, बावरे से बोल पे थिरकना
बावरा मन देखने चला एक सपना

बावरा सा हो अंधेरा, बावरी खामोशियाँ
थरथराती लौ हो मद्धम, बावरी मदहोशियाँ
बावरा एक घुंघटा चाहे, हौले हौले बिन बताये, बावरे से मुखड़े से सरकना
बावरा मन देखने चला एक सपना

हा चित्रपट आणि त्यातलं हे गाणं माझ्या लग्नानंतर जवळपास पाच वर्षांनी आलं.मी हा चित्रपट पाहिलेला नाही, त्यामुळे तिथे हे गाणे कुठल्या संदर्भात मांडले आहे ते मला माहिती नाही. पण त्यातलं दुसरं कडवं मला तर मला अजूनही वेड लावतं. तरूण वयात, कुणीतरी आपल्या प्रेमात पडलं असताना, सळसळत्या उर्जेने, अख्खं जग बदलण्याचा जोर आपल्या मनगटात आहे असा विश्वास मनात असताना, कुठलाही प्रियकर जे विचार करत असेल ते इतक्या समर्पक शब्दात बाकी कुठेही मांडलेले मला दिसले नाहीत.

"बेभान जगात फिरताना मला तितकीच बेभान साथ हवी आहे. बेभान जगात राहूनही भान न हरपलेल्या लोकांच्या गर्दीत तुझा हात माझ्या हातात असू दे."

हे गाणं वाचताना जी मजा येते तितकीच बहार शंतनू मोईत्रा च्या संगीताने उडवून दिली आहे. ही आहे त्या गाण्याची यु ट्यूब वरची लिंक.

गाणं गुणगुणत क्लासला जायची तयारी करत होतो, बावरा शब्दाच्या पुनरावर्तनामुळे होणारा आनंद अनुभवत होतो, आणि गंमत झाली.

एकदम अजून एक गाणं आठवलं. एकाच शब्दाची पुनरावृत्ती करून मन मोहून टाकणारी रचना. फक्त इथे बेभान जगात तितकेच बेभान जगण्याची इच्छा नाही. तर त्याच्याउलट जगाचे सारे रंग शेवटी डागाळलेले, कलंकित, काळे आहेत आणि त्यांचे हे स्वरूप कळल्यामुळे गीताचा रचनाकार, परमेश्वराच्या निष्कलंक रंगात मिसळून जाण्याची इच्छा धरतो आहे. शब्द आहेत संत कबीर दासांचे तर स्वर आणि संगीत कुमार गंधर्वांचे. यात अंजन म्हणजे काळा / कलंकित तर निरंजन म्हणजे काळेपणाचा लवलेश नसलेला / निष्कलंक हे ध्यानात ठेवलं तर रचनेचा अर्थ आपोआप उलगडतो.

"राम निरंजन न्यारा रे
अंजन सकल पसारा रे...

अंजन उत्पति ॐकार
अंजन मांगे सब विस्तार
अंजन ब्रहमा शंकर इन्द्र
अंजन गोपिसंगी गोविन्द रे

अंजन वाणी अंजन वेद
अंजन किया ना ना भेद
अंजन विद्या पाठ पुराण
अंजन हो कत कत ही ज्ञान रे

अंजन पाती अंजन देव
अंजन की करे अंजन सेव
अंजन नाचे अंजन गावे
अंजन भेष अनंत दिखावे रे

अंजन कहाँ कहाँ लग केता
दान पुनी तप तीरथ जेता
कहे कबीर कोई बिरला जागे
अंजन छाडी अनंत ही दागे रे

राम निरंजन न्यारा रे
अंजन सकल पसारा रे...

ही आहे राम निरंजनची यु ट्यूब लिंक.

बावरा मध्ये आयुष्याचा प्रवास सुरु होतानाची लगबग आहे. तर राम निरंजन मध्ये तो प्रवास पूर्ण करून आलेले शहाणपण आहे. बावरा ची रचना ओढ लावते तर राम निरंजन ची रचना हुरहूर, चुटपूट लावते. बावरा म्हणजे, रंगलेल्या गरब्यातून आपल्या मित्राने किंवा मैत्रिणीने बाहेर धावत येऊन आपल्या हाताला धरून खेचत त्या गरब्यात आपल्याला घेऊन जाण्याचा अनुभव आहे. तर राम निरंजन म्हणजे, सूफी साधकाने स्वतःभोवती मारलेली धुंद गिरकी आहे. बावरा म्हणजे, सुस्नात होऊन, प्रसन्न मनाने, उगवतीच्या प्रकाशात, पक्ष्यांच्या किलबिलाटात केलेली मोठ्या प्रवासाची सुरवात आहे तर राम निरंजन म्हणजे मावळतीच्या प्रकाशात, गावाच्या वेशीत शिरून त्या प्रवासाचा शेवट होत असताना दूरच्या देवळातून ऐकू आलेले एकतारीवरचे भजन आहे. बावरा म्हणजे, जमिनीतून नुकतंच उगवलेलं वडाचं झाड आहे तर राम निरंजन म्हणजे त्या झाडाची पूर्ण वाढ झालेली आणि खाली जमिनीत पुन्हा पोचलेली पारंबी आहे. बावरा म्हणजे नुकत्याच जन्मलेल्या तान्हुल्याच्या चेहऱ्यावरचं निर्व्याज हसू आहे तर राम निरंजन म्हणजे अनुभवसंपन्न आणि किल्मिषविरहीत वृद्धाच्या चेहऱ्यावरचं कृतकृत्य हसू आहे.

नेहमी एकंच गाणं आठवतं आणि माझा दिवस भारून टाकतं पण परवा मात्र शब्दाच्या पुनरावर्तनाचा खेळ करणारी, आणि प्रवासाची निष्कपट सुरवात ते प्रवासाचा अनुभवसंपन्न शेवट हा प्रचंड मोठा पल्ला दाखवणारी दोन गाणी एकाच वेळेला आठवली आणि मी एकाच वेळी स्वानंद साहेबांच्या साथीने सुरू केलेला प्रवास संत कबीरांच्या हाताला धरून पुरा करू शकलो.

---oOo---

संगीतकविताशब्दक्रीडामौजमजाचित्रपटआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

7 Mar 2016 - 12:39 am | अभ्या..

हे वाचून मला संजयजींनी केलेल्या बहारदार रसग्रहणांची आठवण आली.
तसेच अनवट वाटतील असे शब्द, सामान्यापलिकडे जाऊन उत्कटतेने अनुभवलेले मांडायची स्टाइल. अगदी तोच अनुभव. १०० टक्के.
मोरेसाहेब छान लिहिलेय.

रमेश आठवले's picture

7 Mar 2016 - 5:11 am | रमेश आठवले

"या "बावराला" समर्पक शब्द मला मराठीत सापडला नाही"
वाभरे मन = बावरा मन ?

शब्द गोड आहे.... आणि त्याला बावराची थरथर पण आहे... मला सुचला नाही खरा... पण त्यात बेभान आणि भान न हरपलेले, असा शब्दखेळ करता नाही येणार.

मितान's picture

7 Mar 2016 - 12:16 pm | मितान

सुरेख !!!!!

राही's picture

7 Mar 2016 - 1:31 pm | राही

लेख सुंदरच आहे. पण त्यात 'बावरा'च्या अभिप्रेत अर्थाविषयी थोडी वेगळी समजूत दिसली.
बांवरा हा बाँवलाशी संबंधित असावा, जसा साँवरा हा साँवलाशी संबंधित आहे.
बावरा म्हणजे संभ्रमित, 'कावरा-बावरा'मधल्यासारखा. घाबरलेला, गोंधळलेला. आपण बावळट म्हणतो ते बावळाचे ट्रिविअलाय्ज़ेशन आहे. इथे बेभान म्हणजे बेधुंद मस्त कलंदर नव्हे. तर मोहित झाल्यामुळे (मूढ, मुग्ध) भान हरपलेला. एखाद्या सुंदर गोष्टीचा, अकल्पित अनुभूतीचा प्रत्यय आल्यानंतर भान हरपते ती बावरी अवस्था म्हणता येईल.
लेख आवडला हे वेगळे सांगायला नको.

तर्राट जोकर's picture

7 Mar 2016 - 2:02 pm | तर्राट जोकर

बराचसा सहमत.

हिंदित बावरा म्हणजे भोळा, भोळसट. जनरित, दुनियादारी, छक्केपंजे ह्यापासून दूर आपल्याच तंद्रीत जगणारा. उदा: बैजू बावरा.

बावरा मन...ह्या गाण्यात मन एक स्वप्न बघतंय. हे स्वप्न बघण्यासाठी त्याला वास्तव नाकारायचं आहे. वास्तव अडथळा ठरतंय म्हणून मन भोळं बनतंय. दुनियेच्या कट्टर वास्तवास समजुन घेण्यास विरोध करणारं मन स्वतःला मी बावरा म्हणजे भोळा आहे हो, माझ्यासाठी हे स्वप्न दुनियेच्या वास्तवापेक्षा जास्त खरं आहे असे म्हणतंय. कोणी त्याला स्वप्न नको बघु असं सांगू नये, ते स्वप्न तकलादु आहे असे समजवण्याच्या फंदात पडू नये, म्हणून (स्वप्नाच्या प्रेमापायी) मन भोळं, निरागस, निष्कपट होणं पत्करतंय.

राही's picture

7 Mar 2016 - 2:47 pm | राही

'बावरा'मध्ये विकलता आहे, कातरता आहे तर 'बेभान'मध्ये एक 'दुनिया मेरी मुट्ठी में' प्रकारचा उन्मनी आत्मविश्वास, किंचित उन्मत्त ताकद आहे, मनःपूत जगण्याची लालसा आहे. 'बावरा'मध्ये समर्पण आहे. बेभानमध्ये ते नाही. उलट बांध फोडून वाहाण्याची जिद्द आहे.

तर्राट जोकर's picture

7 Mar 2016 - 3:01 pm | तर्राट जोकर

अचूक सांगितलंत. :-)

बावरा म्हणजे संभ्रमित, 'कावरा-बावरा'मधल्यासारखा.

+१

बावरा चा मूळ अर्थ कावरा - बावरा, बावळट, बावळा वगैरेंच्या जास्त जवळ जातो हे मला पण या गाण्याला ऐकायच्या आधी वाटायचे. पण मग जेंव्हा हे गाणे ऐकले आणि त्यातले माझे आवडते दुसरे कडवे ऐकले तेंव्हा माझ्या मनात या गाण्यातला बावरा, बेभानच्या शेजारी जाऊन बसला. आणि मला कावरा - बावरा ते बेभान मधल्या अवस्थेसाठी शब्द न सापडल्याने मी बेभानला आपलेसे केले. मला तो बावरा, संपूर्ण सृष्टीबद्दल बोलतोय असे वाटते. त्या बावराने मला प्रियकराचा जग जिंकण्याचा विश्वास, त्याला खुळ्यात काढणाऱ्या लोकांशी लढण्यासाठी फक्त एका, पण तितक्याच खुळ्या प्रेयसीची गरज, दाखवली. आणि मला कुणी या अर्थाने बावरा म्हटले तर आनंद वाटेल अशी माझी मनोमन खात्री पटली.

ऐकणं हा अनुभव जबरदस्तच! रच्याकने मला वाटतं एखाद्या भाषेतला शब्द भाषांतरित करणं ही कधीकधी कसरत असते. तो शब्द त्या भाषेला अपरिहार्यपणे बिलगून असणारी संस्कृती घेऊन येतो आणि भाषांतरात परका वाटतो. मराठीत नसेना का बावरा साठी समर्पक शब्द, काय फरक पडतो? त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे गं - यातल्या ' पिसे ' मधला राधेचा भाव हा बावरा च्या जवळ येतो असं मला वाटतं.

+१००
लेख आवडला हेवेसांन.

विवेक ठाकूर's picture

7 Mar 2016 - 7:32 pm | विवेक ठाकूर

प्रेमाकडे एक संबंध म्हणून बघितलं तर ते संपण्याची, त्यातली एकसंधता हरवण्याची शक्यता आहे. पण प्रेमाचा अनुभव एक चित्तदशा म्हणून असेल तर मग हीच दुनिया जन्नत आहे. अभ्यानं वर म्हटलेल्या धाग्याची बहुदा ही लिंक आहे दुनिया किसीके प्यारमे जन्नतसे कम नही.

स्वानंद सध्याच्या पिढीतला एक दिलकश शायर आहे आणि शांतनु मोईत्रा सलील चौधरींच्या संगीताचा महौल चित्रसृष्टीत पुन्हा निर्माण करायचा प्रयत्न करतोयं. मराठीत संदीप खरेच्या कवितेत त्या उत्कटतेचा अनुभव आहे.

बावराचा अर्थ प्रेममग्न असा आहे. पण ते प्रेम कुणा एकाप्रती नाही, ती बावर्‍याची चित्तदशा आहे. सूफीजममधे त्याला `मस्त' असा शब्द आहे.

लेख छान झालायं.

अनुप ढेरे's picture

8 Mar 2016 - 4:02 pm | अनुप ढेरे

हजारों... मध्येच एक कौवाली आहे. मन ये बावरा म्हणून. तीदेखील छान आहे. त्याचा वापर पण सिनेमात छान केलाय.

मन ये बावरा, तुझं बिन मानेना
ढूंढे रात-दिन क्या बावरा,
मन ये बावरा, सुध-बुध खो रहा
जागे रात-दिन क्यूं बावरा.

सिनेमाच्या शेवट शेवटपण, ट्रक अ‍ॅक्सिडेंटच्यावेळी, हेच गाणं वापरलय. ते देखील चपखल. शायनी आहुजाची कुतरओढ किंवा डेस्परेशन फार छान दिसून येते या गाण्यानी.

अनुप लिंक बद्दल धन्यवाद.
काय हवं आहे ते माहित्ती नाही. किती हवं आहे ते माहिती नाही. कसं मिळवणार ते माहिती नाही. कधी पर्यंत मिळालं नाही की त्रास करून न घेता थांबणार, ते देखील माहिती नाही. ज्यांच्याबरोबर असताना आपण आपल्या मनात स्वप्न बघितली ती त्यानी पण तशीच बघितली असतील असला खुळा विश्वास. आणि मग अश्या बेधुंद अवस्थेत आयुष्याचा प्रवास सुरु केलेल्या प्रत्येकाला अनेकदा बावरा व्हायला होतंच असतं.

सुमीत भातखंडे's picture

9 Mar 2016 - 1:53 pm | सुमीत भातखंडे

खूप छान लिहिलंय