मी आणि शाळेचे Reunion - (भाग ५)

Anand More's picture
Anand More in जनातलं, मनातलं
10 Feb 2016 - 12:29 pm

भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
_________________________________________________
शाळेसमोर उभा होतो. Reunion चौथ्या मजल्यावरील सभागृहामध्ये होतं. मी जिममध्ये केलेल्या सरावाचे स्मरण करत जिना चढून वर गेलो. मुलींनी छान रांगोळी वगैरे काढली होती. खुर्च्या मांडल्या होत्या. स्टेजच्या मागे पडद्यावर Reunion चा फ्लेक्स लावला होता. काही जण माझ्या आधीच येउन बसले होते. हुबळी वरून किरण, पुण्यावरून स्वाती, राज, सारंग, अनघा, मीनल, मुंबई वरून ओंकार असे कोण कोण कुठून कुठून आले होते. मुली साड्या नेसून तर मुलं झब्बे बिब्बे घालून, सगळे छान दिसत होते. त्यांच्या सगळ्यात, सुटलेले पोट दिसू नये म्हणून ढगळ टी शर्ट घातलेला मी वेगळा दिसतोय असे मला वाटू लागले. पण मग माझे लक्ष जरा बारीक झाले. अनेकांची पोटे माझ्यापेक्षा जास्त सुटली आहेत, कित्येकांच्या केसावर काळाने आपला हात फिरवला आहे हे दिसू लागले. मला थोडे माणसात आल्यासारखे वाटू लागले. ग दि मांच्या "प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट" या उक्तीचा प्रत्यय येऊ लागला. मी तिला शोधत होतो. अजून कुठे दिसत नव्हती.

मग चहापान झाल्यावर ओळखीचा कार्यक्रम सुरु झाला. मिलिंदने छान विनोदी अंगाने स्वतःची ओळख करून दिली. मी विनोदी लिहितो असा प्रचार झाल्याने सगळ्यांचे लक्ष माझ्याकडे लागले होते. माझा नंबर आला. पण ती आली नव्हती. मला काय बोलायचे तेच सुचेना. मी काहीतरी बोलून खाली बसलो. एक दोघांनी, हा खरंच लिहितो का दुसऱ्याकडून लिहून घेतो? असे एकमेकांना विचारल्याचे मला ऐकू आले. मग खेळ सुरु झाले. गाण्याच्या भेंड्या. मुली जिंकल्या. खरे म्हणजे मुले हरली म्हणून मुली जिंकल्या. अमरेंद्रने आणि स्वातीने छान सूत्र संचालन केले होते. पण मग गाणी तीच तीच होऊ लागली. मुलांना कंटाळा येऊ लागला आणि अमरेंद्र पार्श्यालिटी करतोय असे आरोप करत ओरडत शेवटी आम्ही डाव सोडला. वय वाढले तरी हा आचरटपणा काही कुणाच्या अंगातून गेला नाही ते कळले.

मग कुणाला तरी आठवले की मी उलटे गाणे म्हणतो. त्याचा आग्रह सुरु झाला. लग्न होऊन पंधरा वर्षे झाल्याने मी उलटे गाणेच काय पण उलटे बोलणे पण विसरलो होतो, तरी पण विसुभाऊ बापटांच्या ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ च्या कार्यक्रमासारखे

ईमाखरू लीसरू न
तऱ्यापको लीसब न
लाच उजा लायसापू || धृ ||

ती णको लीमे नीज का नीब
चीती शीक लीके
नीह्या णीवे णीफ
णळद नवूपसं लागे लसेअ
डीगलु लायवाधू |

वगैरे म्हणून टाळ्या मिळवल्या. बाकीचे कुणीच काहीच करायला तयार नव्हते, म्हणून सारंगने मला अजून एक गाणं उलटं म्हणायला सांगितलं. सगळ्यांना महत्वाच्या व्यक्तींबरोबर सेल्फी काढायचे होते आणि काय अप्पावर आणि चेहरा पुस्तकावर पाठवयाचे होते. त्यामुळे सगळ्यांनी सारंगला लगेच अनुमोदन दिले. मी कसनुसा हसत होकार दिला. पण गाणंच आठवेना. मग एकदम शाळकरी गाणं घेतलं. नुकत्याच स्वर्गवासी झालेल्या पाडगावकारांच्या स्मृतीप्रित्यर्थ. आणि "नाच रे मोराचे" उलटे करून, "चना रे रामो च्याब्याअं तनाव " म्हटले. जो तो कावळ्यासारखी वाकडी मान करून, तिला कासवासारखी थोडी पुढे काढून, भुवया उंचावून, प्रचंड खेळकर हसू चेहऱ्यावर आणत फोटो काढण्यात दंग होता.काही मुली तसे करताना फार वेधक, मनोहारी आणि गोजिरवाण्या दिसत होत्या. माझी नजर, विधात्याने तयार केलेल्या त्या लक्षवेधी कलाकृतींवर पुन्हा पुन्हा जाऊ लागली. पण मग तसे सारखे सारखे बघणे बरे नव्हे हे जाणवून, मी उलटगीत साधनेत तल्लीन झाल्यासारखे दाखवत, डोळे मिटून उलटे गाणे म्हटले आणि सारंगच्या दोस्तीला जागलो. फुलराणी आली नसल्याने मी आवरते घेतले. आणि मी खाली बसलो.

आता सेल्फीचा कार्यक्रम रंगात आला होता. एकीला, चाळीशीत येउन सुद्धा टिकून राहिलेल्या सौंदर्याचा अभिमान होता. त्यामुळे ती सगळ्यांना "तू खीच मेरी फोटो…… तू खीच मेरी फोटो" असे लाडे लाडे सांगत होती. 'पडत्या फळाची आज्ञा म्हणजे काय?' हे समजून घ्यायचे असेल तर, वाचकांनी त्यावेळी तिथल्या पुरुष वर्गाची लगबग बघायला हवी होती. तिच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी सगळे अगदी नम्रपणे रांगेत उभे राहून, रांगेचा फायदा सर्वांना चे तत्व आपल्याला कसे पटले आहे ते दाखवत होते. संजय तर त्या सेल्फीच्या आशेने इतका नम्र झाला होता की त्याचे ते रांगेतील चिमणी पावले हळू हळू टाकत चालणे आणि आपला नंबर कितवा आहे ते बघण्यासाठी मान तिरकी करून अख्खे शरीर वळवणे पाहून, मला माय नेम इज खान मधल्या शाहरूखचीच आठवण झाली. इतर मुली मात्र या उद्योगाने थोड्या नाराज झालेल्या वाटत होत्या. त्यांचे हावभाव पाहून स्त्रीच स्त्रीची खरी वैरीण असते असे निरीक्षण मी नोंदवून ठेवले. फुलराणी अजूनही येऊ शकते आणि तिला जर मी असा रांगेचा फायदा घेताना दिसलो असतो तर तिचे उदास हसू अधिकच उदास होईल असा विचार करून मी रांगेत उभा न राहता विचारी माणसासारखा, गुढघ्यावर कोपर टेकून आणि पालथ्या मुठीवर हनुवटी ठेवून मंद स्मित करीत शून्यात नजर लावून बसलो होतो.

मग एकाएकी स्वातीने स्टेजचा ताबा घेतला. ती सध्या योगाचे प्रशिक्षण देण्यात नाव कमावून आहे असे मगाशी कळले होते. तिचा स्टेजवर येण्याचा आवेश पाहून मला उगाचच ती आता सगळ्यांना कपालभाती, प्राणायाम वगैरे करायला लावेल असे वाटू लागले. तिने सगळ्यांना सेल्फीपासून पांगवले. चाळीशीतली सुंदरी हिरमुसली आणि एकटीच आपल्या फोनशी चाळा करीत बसली. तिचे सांत्वन करायला तिच्या जवळ जाऊन बसावे असे माझ्या हळव्या मनाला वाटले पण केवळ फुलराणीच्या येण्याच्या शक्यतेने मी हळवेपणा त्यागून, मन कठोर करून, त्या सुंदरीचे दुरूनच निरीक्षण करीत, मनातल्या मनात सांत्वन करू लागलो. स्वातीला सगळ्यांचे शाळेतील गुण आठवत होते. मग तिने एकेकाची नावे घेत त्यांना स्टेजवर बोलावत त्यांच्याकडून त्यांचे पूर्वीचे गुण उधळून घ्यायला सुरवात केली. मला स्वातीच्या स्मरणशक्तीचे कौतुक वाटले. तिला केवळ योगबळामुळेच हे सारे आठवत असावे अशी माझी खात्री झाली. आणि आता जिमनंतर थोडा वेळ योगाभ्यास चालू करायचा आणि ते नाही जमले तर निदान पतंजली ची बिस्किटे आणि नूडल्स खाऊनतरी मेंदूला चालना द्यायची असा निश्चय केल्यावरच माझे मन शांत झाले.

मग मीनल ने "माझे माहेर पंढरी" म्हटले. तर प्रसादने "मृदुल करांनी छेडीत तारा" म्हटले. सुशीलने "स्वये श्री राम प्रभू ऐकती" म्हटले. नितीनने "माझे जीवन गाणे" म्हटले. शाळेत असताना कधी गायचा नाही नितीन. पण आता मात्र छान गातो. माणसाचे सुप्त गुण कधी आणि कसे बाहेर येतील काही सांगता नाही.काही फुले उशीरा फुलतात हेच खरे. पण उशीराने का असेना, प्रत्येक फुलाचे फुलणे सुंदर वाटते. या सगळ्या जुन्या विविध गुणदर्शनामुळे एकदम शाळेचा ऑफ पिरीयड असल्याचा फील आला. आणि मला माझे ऑफ पिरीयडमधले एकपात्री नाटुकले आठवले.

पिक्चरची ऑडीशन असते. महाभारतावरचा पिक्चर. कास्टिंग डायरेक्टर बसलेला असतो. मग एक हसऱ्या येतो, एक लाजऱ्या येतो, एक नाचऱ्या, एक दारुड्या, एक बोबडा, एक बायक्या, एक विसरभोळा असे वेगवेगळे लोक येतात आणि त्या सगळ्यांकडून तो कास्टिंग डायरेक्टर एकच वाक्य म्हणून घेतो, "अर्जुना, उचल तो बाण आणि मार त्या पोपटाच्या डोळ्याला." आणि अख्खा वर्ग हसायचा. माझे नशीब चांगले की मी असे काही करायचो ते कुणाला आठवले नाही म्हणून.

मग ओंकारला गाण्याचा आग्रह झाला. त्याने मला हात धरून खेचत स्टेजवर नेले आणि मला पण त्याच्याबरोबर गाणे म्हणायला सांगू लागला. मी आपला, "भेटी लागी जीवा … लागलीसे आस" च्या मूडमध्ये होतो. म्हणून मग मी सारंग आणि विजयलापण बोलावले. चौघांनी मिळून अश्या वेळी कोरसमध्ये म्हणायचे जगप्रसिद्ध गाणे, की जे म्हटले नाही तर पाप लागते अशी वदंता आहे ते म्हटले. “देखा ना, हाय रे सोचा ना, हाय रे रख दि निशाने पे जान". मी थोडासा कंटाळलो होतो म्हणून शाळेत तेराच्या, सतराच्या, एकोणीसच्या पाढ्यांना करायची युक्ती केली. फक्त तोंड हलवत राहिलो. आणि “कुक्डू कु ककू….टणॅण ढणॅण णॅक “ च्या वेळी मात्र जोरात ओरडत राहिलो. आता ओंकार बेभान झाला होता. त्याने त्याच्या खास आवाजात्त सर्वांच्या मनातले गाणे सुरु केले. "हिची चाल तुरु तुरु, उडती केस भुरू भुरू" आणि सगळ्यानी ताल धरला. सगळे कोरस मध्ये गाऊ लागले. आपण कितीही मोठे झालो तरीही आपल्या उमलत्या वयातील गाणी आपल्यातील जोष जागे करतात हेच खरे. आता सगळ्यांचा उत्साह उतू जाऊ लागला. आणि मोठी मौज उडाली.

मग शरीराने कधी काळी आणि मनाने अजूनही मुलीच असलेल्या चाळीशीच्या उंबरठ्यावरच्या ललनांनी फेर धरून नाच सुरु केला. गाणे होते, "पंखीडा तू मोतियो की ला बहार रे, मेरे मीत का मै करूंगा श्रींगार रे". हे गाणे मी गेली इतकी वर्षे ऐकतोय की ते ऐतिहासिकच काय पण पौराणिक म्हणून देखील खपेल अशी मला खात्री आहे. मला तर वाटते, हे गाणे वेदातील पहिली ऋचा रचली जाण्याच्या अगोदर रचले गेले असावे. आणि भगवान श्रीकृष्ण यमुनेच्या तीरी याच गाण्यावर रासलीला करीत असावेत. मला पंचवीस वर्षापूर्वीचे दहावीचे स्नेहसंमेलन आठवले. हे गाणे तेंव्हा आसावरीच्या ग्रुपने केले होते. ती कुठे दिसली नाही म्हणून एकदोघांना विचारले तर कळले की आसावरी अंदमानला गेली आहे. माझ्या डोळ्यासमोर, इथे तिच्या मैत्रिणी पंखीडा वर नाचत असताना तिकडे ती मात्र कमला (भाग दोन) लिहित असेल, असे चित्र येतच होते तर लगेच स्वातीने, ती तिथे ऑफिसच्या कामासाठी गेली आहे असे स्पष्टीकरण दिले आणि माझ्या मनातील आसवरीच्या हातून एक महान कलाकृती होता होता राहून गेली.

मग जेवायची वेळ झाली. डायट कॉन्शस मुली बेतास बात खात होत्या. माय नेम इज खानच्या शाहरूखच्या भूमिकेत शिरलेला नम्र संजय चाळीशीतल्या सुंदरीला काय हवे काय नको त्यावर जातीने देखरेख ठेवत होता. एकदम सगळे वाढून घेतले तर चांगले दिसणार नाही या विचाराने मी थोडेसेच पदार्थ वाढून घेतले तर काही जण, 'उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म' चा अर्थ शब्दश: घेऊन यज्ञात टाकण्यासाठी समिधा गोळा कराव्यात तश्या लगबगीने ताट भरून घेत होते आणि आपापल्या खुर्च्या पकडून पोटात चेतलेला वन्ही शांत करीत होते. जवळ जवळ अर्धा तास सभागृहात शांतता होती. केवळ खाताना होणारा तोंडाचा आणि वाढताना होणारा भांड्यांचा आवाज येत होता. त्या शांततेचा भंग फक्त तीन वेळा, एकाने वाढताना पळी पाडली, दुसऱ्याने बसताना वाटी सांडली आणि कुणी एकाने वन्ही शांत झाला आहे याची पोचपावती मोठ्याने डरकाळी फोडून दिली तेंव्हाच झाला. माझ्या सुटलेल्या पोटाबद्दल अनेकांनी वाचले असल्याने, मी कमी खाणार असे त्यांनी गृहीत धरले होते. त्यामुळे मी वाढण्याच्या काउन्टर कडे जाऊ लागलो की सगळे आपापले खाणे थांबवून, सिंहाची चाहूल लागली की हरणांचा कळप जसा चरता चरता थांबून, मान उंचावून त्याचा कानोसा घेतो, अगदी तशाच प्रकारे माझ्याकडे बघू लागत. आणि मी अवघडून प्रत्येक वेळी फक्त काकडी, टोमेटो आणि लिंबू घेऊनच परत येत होतो.

जेवणे झाली. मंडळी विखरून बसली. मी पण मित्रांच्या एका घोळक्यात जाऊन बसलो. स्टेजवरून काही जण आपापले जीवनानुभव सांगत होते. फुलराणी आली नव्हती. त्यामुळे थोडा निराश झालो होतो. मग मी पेंगू लागलो.

आणि एकाएकी माझ्या मुलांचा आवाज ऐकू येऊ लागला, "उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्यवरान, निबोधत… बाबा उठ… जिमला जायचंय ना तुला….उठा राष्ट्रवीर हो…. सुसज्ज व्हा उठा चला …" मला कळेच ना काय झालंय ते. Reunion च्या कार्यक्रमात माझे कुशलव कसे काय आले? या विचाराने मी पूर्ण गांगरून गेलो. बरं आवाज येतोय म्हणजे आले आहेत, पण कुठे दिसतही नव्हते आणि त्यांचा आवाज बंद न होता मोठा होत चालला होता. शेवटी तो संपूर्ण सभागृहात घुमू लागला आणि हिने मला शेजारून ढोसले. म्हणाली, "अहो उठा. तुमचा अलार्म बंद करा. जळ्ली मेली लक्षणं. उठायचं तर नाव नाही. आणि अलार्म लावून ठेवतायत."

मी धडपडत उठलो. अंगावरचे पांघरूण काढून टाकले. अंधारात चाचपडत फोन शोधला. अलार्म बंद केला आणि काय चालू आहे त्याचा अंदाज घेऊ लागलो. हळू हळू माझ्या डोक्यात प्रकाश पडू लागला की मी इतका वेळ स्वप्न बघत होतो. आधी एकट्याने तीन आणि मग Reunion ची बातमी देणाऱ्या मित्राबरोबर दोन अश्या पाच प्लेट पाणीपुऱ्या खाऊन, मी जेवणार नसल्याचे जाहीर करून, हिच्या सहलीचे, Reunion चे आणि वरखर्चाचे पैसे भरून झाल्यावर, बाकीचे कुटुंबीय बाहेरच्या खोलीत जेवत असताना मी बेडरूम मध्ये येउन पडलो होतो. आणि मग सुंखासुठें बरोबरच्या संवादाची मनातल्या मनात उजळणी करताना मला नववीची आठवण झाल्यावर मी कधी झोपलो ते माझे मलाच कळले नव्हते. त्यानंतरचा सगळा घटनाप्रवास मी स्वप्नातच पुरा केला होता. स्वप्नातच Reunion अनुभवले होते. खरे वाटावे असे विलक्षण स्वप्न.

अजूनही विश्वास बसत नव्हता, म्हणून आरशात तोंड बघितले, केस कापायचे अजून बाकी होते. फेशिअल ब्लिचिंग ची डागडुजी चेहऱ्यावर दिसत नव्हती. कपाट उघडून बघितले, नवीन कपडे दिसत नव्हते. दुधाची पिशवी घेण्यासाठी दार उघडल्यावर शू - रॅक सुद्धा उघडून बघितला, नवीन घेतलेले बूट कुठे दिसत नव्हते. आता मात्र मला खात्री पटली, की मी अतिशय बारीक तपशीलांसहित स्वप्न बघितले होते. मला हसावे की रडावे तेच कळेना. पण मग एकाएकी जाणवले की याचा अर्थ माझे पोट दोन इंचांनी सुटलेले नाही आहे, Reunion अजून झाले नाही आहे, ते अजून तीन आठवड्यांनी होणार आहे. आणि त्याला कदाचित फुलराणी येऊ शकते. या विचारांनी मी खूष झालो आणि झटपट तयारी करून जिमच्या रस्त्याला लागलो. फुलराणी आलीच तर आता तिला दबक्या आवाजात कदाचित प्रश्न विचारावासा वाटणार नाही, पण गोजिरवाणा रविकर व्हायला काय हरकत आहे? मी न विचारता आलेल्या तिच्या नकारामुळे माझी झाकून राहिलेली मूठ सव्वा लाखाचीच कशाला चांगली सव्वा खर्व निखर्वाची होती असे तिला वाटायला लावण्यास काय हरकत आहे?

समाप्त

विनोदमौजमजालेखविरंगुळा

प्रतिक्रिया

स्पा's picture

10 Feb 2016 - 12:37 pm | स्पा

च्याला शेवट अगदी फिल्मी केलात हो

बाकी तुमच्या लेखात रीडिंग बिटवीन द लाईन्स हा जो काय प्रकार असतो , तो आपल्याला जाम आवडतो पण :)

बाबा योगिराज's picture

10 Feb 2016 - 1:01 pm | बाबा योगिराज

वाह. लै डिटेल मंदी सपान पल्डय.
भेष्टच. आवड्यास.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Feb 2016 - 1:07 pm | निनाद मुक्काम प...

शेवट आवडला
विशेतः एक यादगार रविवार
उतार वयात अश्याच आठवणीचा कोलाज आपले उर्वरीत आयुष्य सुखाने घालवतो.

अपेक्षेपेक्षा बोअर शेवट. नाही आवडला.
सुरुवातीपासून चढती कमान वाचल्याने अपेक्षा वाढल्या होत्या.
मला जास्त काही कळत नाही पण उपमा अन चमकदार शब्दप्रयोगासहीत डिटेलिंग देण्याच्या नादात मूळ कथावस्तूकडे दुर्लक्ष होतय का जरासे?
पॉझीटिव्हली घ्यावी कमेंट मोरेसाहेब.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. नोंद घेतली आहे.
आणि हो कमान म्हटले की आधी चढून मग उतरणारच. पण तुम्हाला माझ्याकडून अपेक्षा आहेत ही भावना सुखकारक आहे.

संदीप डांगे's picture

10 Feb 2016 - 1:15 pm | संदीप डांगे

अभ्याशी शमत हाय...

उगा काहितरीच's picture

10 Feb 2016 - 1:11 pm | उगा काहितरीच

मस्त मालिका ! आवडली. अजून एक गोष्ट आवडली ती म्हणजे तुमची कंसिस्टंसी ! नाहीतर काही दुदु लेखक चांगल्या चांगल्या मालिका अर्धवट सोडतात राव . लिहीत रहा असेच .

काय प्रत्ययकारी लिहिलंय.आमच्या शाळेच्या रियुनियनची आणि ती बुडवणार्या माझी आणि एका समविचारी मित्राची पण आठवण आली.सगळे शाळेतले लोक,गाणारे नाचणारे पण अगदी खरे वाटले बुवा!

पिलीयन रायडर's picture

10 Feb 2016 - 1:26 pm | पिलीयन रायडर

हा भाग तितकासा नाही जमलाय. अजुनही छान लिहीता आला असता. पण तरीही आवडल

लिहीत रहा!

अगम्य's picture

10 Feb 2016 - 1:43 pm | अगम्य

रियुनियन चे वर्णन सुद्धा केलेत आणि शेवट हा अगदी शेवट न करता, भविष्या कडे optimistically पाहत जगणे हेच जीवन असा काहीसा विचार मांडलात

तीन शेवट डोक्यात होते. पहिल्या शेवटात मला न टाळता येण्यासारखे काम आयत्या वेळी येते आणि मी रियुनीयनला न जाता whatsapp वर केवळ फोटो बघत बसतो... हा लिहून झाल्यावर मला आवडला नाही म्हणून वगळला... मग दोन उरले... एक हा धक्का शेवटवाला जो स्वप्न सांगतो म्हणून यातले अनुभव शाळेतले पंचवीस वर्षापूर्वीचे ठेवणे आवश्यक होते... आणि दुसरा खऱ्या रियुनीयनला जाऊन फुलराणी भेटण्याचा... पण मग त्यातील प्रसंग थोडे गंभीर आणि शेवट चिंतनात्मक झाला असता.... मग मला आत्तापर्यंत मी न हाताळलेल्या धक्का तंत्राने मोहात पाडलं... कारण त्यात मला अधीर आणि शांत अशा दोन्ही स्वभावांची सांगड घालता येत होती आणि फुलराणीला प्रत्यक्ष प्रकटण्यापासून वाचवता येणार होतं... इच्छित स्थळी पोचण्यापेक्षा तिथपर्यंतचा प्रवासच मला आवडतो... त्यात अपेक्षापूर्तीचे सूख किंवा अपेक्षाभंगाचे दुःख दोन्ही नसते... आशा मात्र कल्पनेचे पंख लावून उडत असते... तुम्हाला ते जाणवले, असे तुमच्या प्रतिसादावरून वाटते आहे... धन्यवाद... नंतर कधी वेळ मिळाला तर प्रत्यक्ष भेट झाली असती तर,वाला न लिहिलेला शेवट पण टाकीन... :-)

सुबोध खरे's picture

10 Feb 2016 - 7:35 pm | सुबोध खरे

मोरे साहेब
लेखकाचे स्वातंत्र्य अबाधित असते. कुणाला आवदो अथवा न आवडो तुम्ही तुम्हाला पाहिजे तसे लिहा. स्वच्छंदी लेखनच शेवटी जास्त चांगले असते असे माझे मत आहे. आणी तुम्ही असे का लिहिलेत हे सांगण्याची गरज नाही कि ते सांगण्यास तुम्ही बांधील ही नाही.
लिहिते राहा. तुम्ही जसे लिहिता तेच चांगले आहे.

अगम्य's picture

10 Feb 2016 - 10:44 pm | अगम्य

बाडिस

भुमी's picture

10 Feb 2016 - 10:26 pm | भुमी

इच्छित स्थळी पोचण्यापेक्षा तिथपर्यंतचा प्रवासच मला आवडतो... त्यात अपेक्षापूर्तीचे सूख किंवा अपेक्षाभंगाचे दुःख दोन्ही नसते... आशा मात्र कल्पनेचे पंख लावून उडत असते...

हे अगदी खरं...मस्त लिहीता तुम्ही...

भाते's picture

10 Feb 2016 - 1:56 pm | भाते

तरीही संपुर्ण लिखाण आवडले. काल्पनिक गोष्ट इतक्या सुरेख रितीने फुलवण्याची पध्दत छान आहे.
आणखी लिहित रहा.

मस्त मालिका
आवडल लिहीत रहा!

कुसुमिता१'s picture

10 Feb 2016 - 2:26 pm | कुसुमिता१

छान लिहीले आहे..पण स्वप्नातल्यापेक्षा प्रत्यक्षातल्या रीयुनियन बद्दल वाचायला जास्त आवडले असते.

सहज सुंदर प्रसन्न शैली आवडली.
नर्मविनोद आजकाल दुर्मिळ झालाय तो तुमच्या लिखाणात आढळला.
आशय मात्र विषयासारखाच "शाळकरी" होता.
आणि लिहीतांना तुम्ही फार ऑडीयन्स कॉन्शस असतात असे जाणवते.
तरी लिहीत राहावे ही विनंती

उगा काहितरीच's picture

10 Feb 2016 - 2:39 pm | उगा काहितरीच

ऑडीयन्स कॉन्शस

असे वाटत होते थोडेसे . पण तरीही चांगलेच आहे.

पैसा's picture

10 Feb 2016 - 2:41 pm | पैसा

:)

मी-सौरभ's picture

10 Feb 2016 - 6:08 pm | मी-सौरभ

पु. ले. शु.

सुमीत भातखंडे's picture

10 Feb 2016 - 6:59 pm | सुमीत भातखंडे

लेखन नेहमीप्रमाणेच आवडलं पण शेवट नाही आवडला :)

एक एकटा एकटाच's picture

10 Feb 2016 - 7:14 pm | एक एकटा एकटाच

लेखन आवडले

शेवट काही असू दे. छान लिहिलय. लिहित राहा.

आदूबाळ's picture

11 Feb 2016 - 3:45 am | आदूबाळ

आनंदराव, छान लिहिलंय!

यशोधरा's picture

11 Feb 2016 - 3:55 am | यशोधरा

आवडले.

अर्धवटराव's picture

11 Feb 2016 - 4:27 am | अर्धवटराव

एकदम झकास.

सिरुसेरि's picture

11 Feb 2016 - 11:19 am | सिरुसेरि

छान लेखमाला . "प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायु असतो" याचा पडताळा आला .

कालचे प्रतिसाद वाचल्यानंतर या सखारामच्या आयुष्यातील बोळा निघालाय. पाणी वाहते झाले आहे. :-)

तुम्हाला तुमची फुलराणी भेटो. :)

शब्दबम्बाळ's picture

12 Feb 2016 - 5:50 pm | शब्दबम्बाळ

जमून आलेली लेखमाला, तुम्ही उत्तम लिहिताच! असेच लिहित राहा...
शेवटी एकदमच कोलांटी मारलीत पण! :)
फुलराणी विषयी उत्सुकता वाढवून...

हे तुम्ही बर न्हाई केलत मास्तsssssर! ;)

रातराणी's picture

13 Feb 2016 - 11:58 am | रातराणी

मस्त मालिका!

धन्यवाद. अनेकांची अशी समजूत होत होती की मी सत्य कथन विनोदी अंगाने करतो आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना तो शेवट म्हणजे फसवणूक किंवा "taken for ride" वाटला असण्याची शक्यता आहे, ज्याची मी कमी केली असली तरी थोडी अपेक्षा होतीच. पण कौतुकाबद्दल मनापासून धन्यवाद.