फेसबुकी सुंद्री आणि नवकवी

खटासि खट's picture
खटासि खट in जनातलं, मनातलं
30 Jan 2016 - 9:20 pm

मधुरा सुंद्रीकर ला फेसबुकवर जबरदस्त फॅन फॉलोइंग होतं. ती काही रोजच आपले फोटो अपलोड करत होती असे नाही. एखादे दिवस गॅप देखील घ्यायची. तिच्या फोटोंमुळे घायाळ झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली होती. ती जेव्हां जेव्हां लॉगिन करीत असे तेव्हां ९०० + फ्रेण्ड रिक्वेस्टी पेंडींग असलेल्या दिसत. त्या वेळीच क्लिअर केल्या नाहीत तर मात्र हा आकडा फुगत जऊन एक दिवस प्रोफाईलचं काही बरं वाईट होईल असं वाटून ती आपल्या कोमल बोटांनी अनेकांच्या रिक्वेस्टींवर कात्री चालवत असे. स्त्री प्रोफाईल्सकडून तिला कमीच रिक्वेस्टी येत. पण ढिगाने आल्या असत्या तरी सगळ्याच अ‍ॅक्सेप्ट करण्यात तिला काही फायदा दिसत नव्हता. त्यामुळे त्यातही कात्री चालवली जायचीच.

फोटोवर कमेण्ट न देणा-यांना आपल्या राज्यातून तडीपार करण्याचे धोरण प्रोफाईलवर दिलेले नसल्याने राज्यात आलेले असे अज्ञ लोक माझे काय चुकले असे तडीपारीनंतर मेसेज बॉक्स मधून विचारीत असत. अशांना मग ब्लॉक करण्यावाचून तिच्याकडे पर्यायच नसे.

काही काही रसिक तिच्यावर किंवा तिच्यासाठी कविता करीत असत. ती आपल्या वॉलवरून तिच्या वॉलवर नेण्यासाठी टॅग नावाचा एक बंध वापरीत असत. यातल्या काही कवितांना तिने लाईक केले की देवीचा अनुग्रह व्हावा तसे इतर लोक त्याला (मनातून खाक होऊनही ) अभिनंदन वगैरे म्हणत असत. मधुरा देखील ही गंमत पाहून सुखावून जात असे. त्यामुळे तिला कवी लोक खूपच आवडू लागले होते. लग्न करावे तर एखाद्या कवीशीच असे तिच्या मनाने घेतले होते.

तिने तिच्या जवळच्या मित्राला आपला हा विचार बोलून दाखवला मात्र, त्याच्या छातीत धस्स झाले. इतकी छानशी मैत्रीण कुणा नवकवीच्या गळ्यात पडणार या कल्पनेने त्यालाच कसं तरी वाटू लागलं. सुंद्रीकरबाईंचा स्वभाव बघता विरोध केला की त्या निर्णयावर ठाम होण्याची शक्यता जास्त होती. त्यामुळे सल्ला देण्याचा विचार बादच झाला.

सुंद्रीकर बाईंचं कवींच्या फ्रेण्ड रिक्वेस्टी धडाधड स्विकारणं चालू झालं. कवी आहे म्हणून फ्रेण्ड रिक्वेस्ट रिजेक्ट होण्याचे अनुभव असलेल्या या मुक्या प्राण्यांना मधुरा सुंद्रीकरसारख्या आयटेम ने फ्रेण्ड रिक्वेस्ट पहिल्या फटक्यातच स्विकारल्याने दुष्काळातून येऊन ताजमहाल हॉटेलात हवं ते खा स्कीममधे सिलेक्शन झाल्यासारखं वाटत होतं.

तेजस्वी कवी उफाणराव शब्दमोडे हा फेसबुकावरचा उगवता नवकवी होता. कवींच्या ग्रुप्स मधे जेव्हढ्या कवींना प्रतिसाद देऊ तितकेच वाहव्वा मिळवून नाव झाल्यावर सरोवराबाहेर पडून जग पाहण्याची त्यास इच्छा झाली. प्रिया बापट सारख्या दिसणा-या चौदा जणींनी नाकारल्यानंतर त्याने पुरूष प्रोफाईल्सकडे आपला मोर्चा वळवला. पण कवितेत टॅग केलं रे केलं की अपमान होण्याचा अनुभव येऊ लागला.

कवितेसारख्या सरस्वतीच्या सेवेने पब्लिक का भडकतं एव्हढं हे त्याला कळत नव्हतं. स्त्री प्रोफाईल्स झुरळासारख्या झटकून टाकत असतानाच उफाणरावास उफाड्याच्या मधुरा सुंद्रीकरचं प्रोफाईल अ‍ॅड फ्रेण्ड मधे दिसू लागलं. प्रोफाईल पाहताच तिचे निरनिराळे फोटो पाहून उफाणराव तर घायाळच झाला. ट्राय करायला काय हरकत आहे असा विचार करून त्याने फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली. ती लगेच स्विकारली गेल्याबरोबर त्याला हर्षवायूच व्हायचा बाकी राहिला होता.

उफाणरावाने तिचे अनेक फोटो लाईक केले. भरभरून लिहीले. मधुरा बाईंच्या आनंदास पारावार राहिला नाही. जुने फोटो भराभरा वर येऊ लागल्याने जुन्या मित्रयादीतले लोकही पुन्हा फोटो अपलोड केलाय असे समजून " सुंदर" अशी कमेण्ट देऊन राहीले. त्यातल्या एकाने महिन्याभरापूर्वीच कमेण्ट दिलेली असतानाही " हा फोटो आजवरच्या सर्व फोटोंमधे आवडलाय बरं का" अशी कमेण्ट दिल्याने मधुराने रागारागाने त्याला नारळ दिला. त्याला आपले काय चुकले, लोचटपणा झाला कि काय असे वाटून मेसेज बॉक्सात क्षमा बिमा मागू लागला.

यावर मेसेज बॉक्समधे त्रास देऊ नये असं नवं स्टेटस टाकण्याची संधी सोडेल ती खरी फेसबुकी सुंद्री कसली ?
या स्टेटस वर किती प्रतिसाद आले हे वाचायला मधुराबाई लॉगिन झाल्या आणि त्यांना आपल्या टैमलाईनवर उफाणरावाची कविता दिसू लागली. ट्यागलं असल्याने नाईलाज होता.

ती कविता वाचू लागली

असंख्य झुरळांनी ड्रेनेजच्या भोकातून वर यावं
तसं झुळुझुळु वाहणा-या नदीवानी
तुज्यावर प्रेम करीत राहीन
तू मरेपर्यंत..

एव्हढं वाचूनच ती ई ई ई असं चित्कारली.
मग ही कविता काढून कशी टाकायची असं जिवश्च कंठश्च मित्राला विचारू लागली. त्याने ऑनलाईन आल्यावर टॅग कसा रिमूव्ह करतात हे सांगितलं. पण थोड्याच वेळात इतर कवींच्या कविता वाचून ती सुखावली.

दुस-या दिवशी पुन्हा उफाणरावांची कविता थेट सुंद्रीबाईंचं नाव घेऊन.

प्रिये
तुला पाहील्यापासून वेडा झालोय इतका
जितके की हे चंद्र तारे चांदण्या
लूत भरलेल्या कुत्र्यासारखे फिरत रहावेत रात्रभर
जसं कि
पिसाळलेल्या लांडग्यासारखे शिकारी असावेत मागावर
तसं
तुझ्या प्रीतीनं येडापिसा होऊन फिरतोय आता
सहस्त्रावधी तुंबलेल्या गटारात
निर्मळ पाण्याचा एक थेंब दिसावा तशी
तू माझ्या आयुष्यात आलीस
तुझ्याशिवाय वाहून जाईन सखे
जसा मैला जातो मुंबईच्या अंडरग्राउंड नाल्यातून
समुद्रात गडप होण्यासाठी

आता मात्र मधुराबाईंना फीट यायची बाकी राहिली होती.
मुश्किलीने अनटॅग करून अ‍ॅस्पिरीनची गोळी घेऊन ती झोपी गेली.

फेसबुकवर यायला पहिल्यांदाच तिला भीती वाटू लागली होती. उफाणरावाला अनफ्रेण्ड करावेसे वाटत होते. पण त्यासाठी फेसबुकवर जाणे भागच होते.

थरथरत्या हाताने तिने लॉगिन आयडी टाईप केला. पासवर्ड दिला. तिच्या नकळत ती राम राम राम राम असे म्हणत होती. आपण इतके घाबरलोत हे पहायला दुसरे कुणी नसल्याने त्यातल्या त्यात बरे वाटले. तिच्या नशिबाने आज उफाणरावाची कविता टैमलाईनवर नव्हती. त्यामुळे मनसोक्त बागडत असतानाच अचानक उफाणराव पुन्हा अवतीर्ण झाले.

हे मधुरा, हे सुंदरा
म्हणालीस मला तू काळ्याउंदरा
चालेल मला चालेल मला
कारण गलबत लागले बंदरा

ही रुबाई कशी वाटली हे अवश्य कळवावे
आपला प्रिय
उफाणराव शब्दमोडे

सुंदराच्या पोटात उंदराच्या उल्लेखाने ढवळू लागले होते. ती थेट वॉशबेसीनकडे वळाली. आता तिला कवितांचं हे टॉर्चर सहन होईनासे झाले. उफाणरावाच्या प्रोफाईलपर्यंत पोहोचून अनफ्रेण्ड करण्याचीही भीती वाटू लागली होती. तिने पुन्हा जिवश्च कंठश्च मित्राला समस्या सांगितली त्याने उफाणरावाला ताकिद दिली. त्यामुळे प्रेमाच्या कविता पाठवणार नाही असे आश्वासन मिळाले.

अर्थात वैचारीक कविता बंद झाल्या असं त्यात अभिप्रेत नव्हतं हे दुस-याच दिवशी लक्षात आलं.

मोबाईलच्या पडद्याकडे
पाहताना दिसतात
घायाळवंती सुंदर्या
अजगराने गिळावा बेडूक
एकेक पकडून
आणि तरीही
पहावं माझ्याकडे
बुभूक्षित नजरेनं
एकटक
जुन्हा जखमेतून पू बाहेर यावा
तसा एक आशेचा किरण
दिसू लागतो
आणि त्यामागोमाग वहावे
शुद्ध रक्त
तसा लालिमा क्षितिजावर दिसतो
पहाट झाली आयुष्याची
असं वाटत असतानाच
ढुंगणावर नवी जखम ठसठसावी
तसा तिचा नकार
टोचत राहतो सकाळी सकाळी
सगळीच गणितं अवघड झालेली
बसायचं कसं नि ....... कसं
याचे फांदे झालेले सांगावं कसं
अजून दिवस जायचाय
या उफाणलेल्या तुफानाला
वाट दाखवा कुणीतरी

मधुराने डोळे उघडले तेव्हां डॉक्टर विचारत होते, " आता कसं वाटतंय ?"
काही ओळखीचे , काही अनोळखी चेहरे दिसत होते.
डॉक्टर एका उमद्या तरुणाशी बोलत होते. त्यानेच आणून अ‍ॅडमिट केलं होतं.

गेल्या महीन्यात ज्याला आपण फोन नंबर आणि पत्ता सांगितला तोच हा जिवश्च कंठश्च मित्र या प्रोफाईलचा मालक हे तिला नव्यानेच कळालं. त्याला पाहूनच तिला बरं वाटत होतं. इतक्या प्रोफाईल्सच्या गर्दीत याच्य़ाबद्दल तशी भावना का निर्माण झाली नाही असं तिला वाटून गेलं.

डॉक्टर गेल्यानंतर त्याने जवळ बसू का असं अदबीने विचारलं. तिने डोळे झपकावून होकार कळवला.
" मग काय मॅडम, कुठल्या कवीशी लग्न करताय ?"
हा प्रश्न विचारल्याबरोबर तिला शुद्ध जाण्याआधी कविता वाचत होतो याची आठवण झाली. त्या दिवशी जि.कं.मि ने त्या भागात येणार आहे. भेटूयात का असा मेसेज टाकला होता. नंतर एसेमेसही केला होता. फोन केल्यानंतर बराच काळ का उचलत नाही म्हणून घरी थडकायचा निर्णय घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला.

हे सगळं कळाल्यावर तिला थोडी लाज वाटली, थोडा स्वत:चा राग आला आणि हे सर्व याला कळाल्याने त्याचाही राग आला. पण त्याचा हसरा चेहरा पाहुन तो लगेचच दूर पळाला.

" उफाणरावांना प्रपोजल पसंत आहे म्हणून कळावायचे का "
या त्याच्या प्रश्नावर राग यायच्या ऐवजी ती खुदकन हसली आणि दुष्ट म्हणून त्याला मारू लागली. या भांडनाचं पर्यावसान थोड्याच वेळात त्याच्या मिठीत विसावण्यावर झालं हे सांगणे न लगे.

तिथून पाय निघत नसतानाही रात्रीची वेळ म्हणून जि.कं.मि. बाहेर पडला.

मोबाईल ऑन केला आणि उफाणरावांची प्रोफाईल डिलीट करण्यासाठी लॉगिन झाला. आता त्याची काही आवश्यकता नव्हती.

हभप खटबोवा

कथाविनोदतंत्रमौजमजासद्भावनामदतविरंगुळा

प्रतिक्रिया

जेपी's picture

30 Jan 2016 - 9:43 pm | जेपी

मस्त ष्टोरी आहे..

एस's picture

30 Jan 2016 - 9:50 pm | एस

:-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jan 2016 - 9:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

:)

उगा काहितरीच's picture

30 Jan 2016 - 9:56 pm | उगा काहितरीच

ये ! जब्राट्ट . मस्त कथा.

खेडूत's picture

30 Jan 2016 - 9:58 pm | खेडूत

हा हा!
आवडली.. वत्सपी सुन्द्रीवर पण लिहा आता.

तुषार काळभोर's picture

30 Jan 2016 - 9:58 pm | तुषार काळभोर

:)

बिपिन वर्टी नायतर चंद्रकांत महामिने दिवाली अंकात असल्या कथा लिहायचे. ज्ञानेश सोनारानी काढलेली मधुरा इम्याजिन झाली डोळ्यासमोर. पुलेशु

अ.वा.वर्टी असतील ते. असल्या कथा लिहिणारे अजून एक म्हणजे श्रीकांत मुंदरगी.

उप्स. सॉरी बोकेशा. मुन्दरगी डॉ. ना बहुतेक?

नाखु's picture

1 Feb 2016 - 9:15 am | नाखु

डॉ आहेत ते शिवाय अशोक पाटोळे आणि इंद्रायणी सावकारही अश्या कथा देत आवाज किंवा जत्रा मध्ये.

चित्रे ज्ञानेश सोनारांपेक्षा पत्कींची असतील तर नक्की उठावदार+ठसठशीत असतील अशी नम्र नोंद करतो.

जत्रा ,आवाज मोहिनी आणि अश्या दिवाळी अंकांचा एकनिष्ठ वाचक नाखु.

पैसा's picture

30 Jan 2016 - 10:31 pm | पैसा

:)

यशोधरा's picture

30 Jan 2016 - 10:33 pm | यशोधरा

एकदम भारी! डोळ्यांपुढे शिदंच्या रेखाचित्रांसकट ष्टोरी आली!

बोका-ए-आझम's picture

31 Jan 2016 - 2:26 am | बोका-ए-आझम

कथेमधल्या उफाणरावांच्या कविता तर अजूनच भारी!

आदूबाळ's picture

31 Jan 2016 - 5:36 am | आदूबाळ

लौल! जबरदस्त!

चांदणे संदीप's picture

31 Jan 2016 - 6:31 am | चांदणे संदीप

लोल

मितान's picture

31 Jan 2016 - 8:07 am | मितान

मजा आली ! मस्त लिहिलंय !!!

अजया's picture

31 Jan 2016 - 8:55 am | अजया

:) मस्तच!
असे एक खरोखरीचे प्रोफाईल नुकतेच बघण्यात आल्याने जास्तच मजा वाटली. त्या बाईंनी घाण कॅमेर्याने काढलेला धुरकट फोटो तिच्या प्रोफाईलवर टाकलाय.त्या धुरकटपणाला नशिले नैन वगैरे कमेंट करणारे अनेक मजनू आणि त्या कमेंटा लाइक करणारी ती सुंद्री हे बघून बरेच मनोरंजन झाले होते!

विजय पुरोहित's picture

31 Jan 2016 - 9:10 am | विजय पुरोहित

अबब!!!
काय लोल कविता आहेत...

माहितगार's picture

31 Jan 2016 - 9:19 am | माहितगार

:) मस्तच ! काही वेळा लेखक कविचे एखादे लेखन वाचनात येते मग तुम्ही त्या लेखक अथवा कविची प्रोफाईल धुंडाळून त्याने अजून काय लिहिले आहे ते शोधून वाचता तसेच ही कथा वाचून वाटले.

आपले मागचे काही मिपावर प्रकाशित लेखन काढून वाचले त्यातील नवे सदस्य , साहीत्य आणि प्रतिसाद, अध:पतन, विद्वत्ताप्रचुर प्रतिसाद कसे द्यावेत ?, शनीशिंगणापूरातून ग्रामस्थांनी बाहेर पडावे काय हे आवडण्यात आले.

सनईचौघडा's picture

31 Jan 2016 - 9:56 am | सनईचौघडा

हायला लय भारी. मस्तंय.

कल्पनेचं झुरळ असं उडत खिडकीवर बसावं सैरभैर हून ----

ज्ञानोबाचे पैजार's picture

31 Jan 2016 - 12:53 pm | ज्ञानोबाचे पैजार

भारी लैच भारी.
कविता तर उच्च प्रतीच्या आहेत.
लिहिता राहा भावा असाच लिहिता रहा.
पैजारबुवा,

जव्हेरगंज's picture

31 Jan 2016 - 1:40 pm | जव्हेरगंज

cat

पद्मावति's picture

31 Jan 2016 - 2:02 pm | पद्मावति

:) मस्तं!

खटासि खट's picture

1 Feb 2016 - 8:22 am | खटासि खट

आभार सर्वांचे.
वर सुचवलेल्या लेखकांचे लिखाण वाचायला पाहीजे.

एक एकटा एकटाच's picture

1 Feb 2016 - 8:44 am | एक एकटा एकटाच

सही आहे...