विश्वाचे आर्त - भाग ३ - अस्तिस्तोत्र

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
6 Dec 2015 - 7:36 pm

"समुद्राचा विस्तार निश्चल आहे. त्याच्या किनाऱ्यावरील क्षारांच्या खडकांत मृत आकृती जन्म घेतात, प्रतिबिंबांत आपल्या खुणा उमटवतात. परंतु त्यामुळे समुद्रात विचलता येत नाही. त्याला भरती नाही म्हणून त्याला ओहोटीही नाही. त्याच्यात जन्माचा स्फोट नाही त्यामुळे मरणाचे विसर्जनही नाही. त्याला मृत्यूची भीती नाही, त्यामुळे मृत समुद्र अमर आहे.

त्यालाच चिंतन नाही, कारण त्याच्या चिंतनाची सर्व सांगता झाली आहे.

आता समुद्र केवळ आहे."

जी. ए. कुलकर्णी, ‘अस्तिस्तोत्र’ - सांजशकुन, पॉप्युलर प्रकाशन.
-----

जी. ए. कुलकर्णींच्या कथांमध्ये आपल्याला एका अजब विश्वातून भरकटवत नेण्याची शक्ती आहे. त्यांच्या प्रासादिक भाषेमुळे हा प्रवास करताना आपण गुंग होऊन त्या विश्वात सामावून जातो. 'अस्तिस्तोत्र' ही अशी बलवान कथा. ही खरी तर कथा म्हणण्यापेक्षा मृत समुद्राच्या अस्तित्वाचे, त्याच्या आसपास चालू असणाऱ्या अव्याहत मृत्यूचक्राचे चित्रण आहे. किनाऱ्यावर महाप्रचंड प्राण्यांचे अवशेष मृत्यूच्या खुणा दाखवतात. एकेकाळी कोण्या जिवाला आधार देणाऱ्या त्या हाडांमध्ये कोणी नवीन जीव आसरा घेतो, मृत पावतो आणि त्याचा सांगाडा अजून दुसऱ्या जिवाला आत पोसतो. एकात एक गुंतलेली ही जिवांची मालिका चालू असताना समुद्र शांत, स्तब्ध, निर्मम, निरीक्षक असतो. तो हे जीव निर्माण करत नाही की मारत नाही. तो केवळ असतो.

या कथेतल्या समुद्रातला भगभगीत कोरडा मेलेलेपणा काढून टाकला तर निसर्गाबद्दलही असेच म्हणता येते.

निसर्ग केवळ आहे.

मात्र मृत समुद्र एकीकडे आणि वाळूत वावरणारे जीव एकीकडे अशी स्पष्ट रेखीव विभागणी करणारा किनारा निसर्गाला नाही. कारण जीव आणि भौतिक असे द्वैतच त्याच्याकडे नाही. जल-वायू-भूमी-आकाश-अग्नि अशी पंचमहाभूते एकमेकांत मिसळून जीव तयार करतात, जगवतात, मारतातही. निसर्गात घडणाऱ्या घटनांचा प्राण्यांवर प्रभाव होतो, तर प्राण्यांच्या अस्तित्वाने निसर्गाला आकार येतो. निसर्ग म्हटल्यावर आपल्या मनात एक लसलसते काही डोळ्यासमोर येते. रूढार्थाने मंगळावरही 'निसर्ग' आहे. मात्र प्राणीसृष्टीचा अभाव असल्यामुळे आपल्या मनातला निसर्ग तिथे नाही. हिरवी झाडे, दवाचे थेंब, हवेत भरलेला एक जीवंत वास, आसपास चाललेली पक्ष्यांची भिरभिर - काही काही नाही. आपल्यासमोर निसर्ग म्हणजे काय याची काही एक कल्पना असते. तरीही आपण निसर्गाला आपल्या शरीराच्या मर्यादेच्या पलिकडचे काहीतरी - असे मानतो. आपण आपल्या शरीराच्या मर्यादेनंतर संपतो - त्याच्या बाहेर जे काही आहे त्याचे आपण नैसर्गिक आणि कृत्रिम असे नीटस दोन भाग करतो. मी - माझ्या आसपास दिसणारे मानवनिर्मित जग - या दोन गोष्टी सोडल्या की बाकीचा सगळा निसर्ग.

ही विभागणी अनेक वेळा सोयीची पडते खरी पण अनेक वेळा त्यामुळे अडचणही निर्माण होते. कारण आपणही निसर्गाचाच एक भाग आहोत हे आपल्याला विसरायला होते. अनेक वेळा 'मी आणि निसर्ग' या द्वैताचे रूपांतर 'मी विरुद्ध निसर्ग' या मांडणीत होते. मानवनिर्मित ते सगळे वाईट, आणि नैसर्गिक म्हणजे सर्व काही सुंदर अशा रोमॅंटिक कल्पनाही बळावतात. किंवा निसर्ग गेला खड्ड्यात, माझे सुख तेवढे महत्त्वाचे अशी तद्दन भोगवादी प्रवृत्तीही दिसते. काही वेळा निसर्गात घडणाऱ्या गोष्टी जणू काही मानवाच्या कृत्यांपोटी होतात अशी समजूत निर्माण होते. सर्वच आदीम संस्कृतींमध्ये निसर्गाच्या शक्तींना देव मानण्याची आणि त्यांची पूजा करण्याची प्रथा आढळून येते. अवर्षण झाले, याचे कारण गावात काहीतरी पाप घडले. भूकंप झाला, कारण धरतीमाता कोपली. रोगराईची साथ आली, कारण समाजात अनाचार वाढला. एक ना दोन, अनेक बाबतीत निसर्गावर मानवी भावनांचे आरोपण करून नैसर्गिक घटनांचे वेगळे अर्थ काढले जातात. पाऊस पडावा म्हणून पूजा करणे इथपर्यंतही काही हरकत नाही, पण त्यासाठी नरबळी देण्यापर्यंतही मजल जात असे.

आता आपल्याला माहीत आहे की पाऊस का पडतो, मान्सूनचे वारे कसे फिरतात, ज्वालामुखीचे उत्पात का होतात, रोगराईच्या साथी कशामुळे पसरतात. समाज म्हणून हे ज्ञान वापरून आपण अनेक बाबतीत ताबा मिळवला आहे. देवी, पोलिओसारख्या घातक रोगांचे उच्चाटन केलेले आहे. पावसावर ताबा आला नसला तरी पाण्यावर थोडाफार ताबा मिळवलेला आहे. पशूंपासून स्वतःचे रक्षण केलेले आहे. मात्र निसर्गाच्या गूढपणाचा सुंभ जळला असला तरी त्याला व्यक्तीरूप देण्याचा, त्याला मानवकेंद्रित बनवण्याचा पीळ अजून शिल्लकच आहे. आपल्या विचार करण्याच्या आणि ते व्यक्त करण्याच्या पद्धतीतून तो वेळोवेळी दिसून येतो. 'ओल्ड टेस्टामेंट'मधला देव जेव्हा म्हणतो की 'मी हे विश्व मानवासाठी निर्माण केलेले आहे, जा त्याचा आनंद घ्या.' तेव्हा तो याच मानवकेंद्रित निसर्गाचा अवतार बनतो. या दृष्टिकोनामुळे एका बाजूला भविष्याचा विचार न करता स्वार्थीपणाने केलेली निसर्गाची नासधूस दिसते तर दुसऱ्या बाजूला निसर्गाच्या कुठच्याही बाबतीत कणभरही ढवळाढवळ करणे म्हणजे पाप अशी विचारसरणी दिसते.

याचे मुख्य कारण म्हणजे माणूस स्वतःला निसर्गापासून वेगळे स्थान देतो. ते अगदीच गैर नाही - मानवासारखा बुद्धिमान प्राणी आजपर्यंत झाला नाही. इतर कुठचाही प्राणी मानवाइतक्या कौशल्याने भाषा किंवा अवजारे वापरत नाही. या बौद्धिक वर्चस्वामुळे आपल्याला सतत कुठेतरी वाटत राहाते की माणूस हा सर्वश्रेष्ठ आहे. तो निर्माण व्हावा ही निसर्गाची इच्छा आहे. इतर प्राणीमात्र त्यापेक्षा कनिष्ठ आहेत. हे चित्र अर्थातच साफ चूक आहे.

जीवसृष्टी कशी निर्माण झाली हे कोडे उत्क्रांतीवादामुळे सुटलेले आहे. त्यातून माणूस हाही इतर प्राण्यांप्रमाणेच उत्क्रांत झाला हे स्पष्ट झालेले आहे. आपण कपडे घालत असलो तरी त्यांच्या आत लपलेले शरीर हे इतर प्राण्यांप्रमाणेच रक्ता-मांसा-पेशींचे बनलेले आहे. ज्या चिंपांझींचे आपण दूरचे भाऊबंद लागतो त्यांच्याप्रमाणेच आपणही हिंस्र आणि हिंसक आहोत. कळपाने राहाण्याची, कळपातल्यांना मदत करण्याची, प्रसंगी प्राणही देण्याची प्रवृत्तीही आपल्यात इतर प्राण्यांप्रमाणे दिसते. इतर अनेक सजीवांप्रमाणे आपल्यालाही दात-नखे आहेत, तसेच धडधडणारे हृदयही आहे. ही सजीवसृष्टी आपोआप, नैसर्गिक नियमांनुसार बनली. ती निसर्गाने 'निर्माण केली' असे म्हणता येत नाही. डोंगराच्या उतारावरून पावसाचे पाणी अनेक धारांतून एकत्र येऊन खाली पडते. त्याला आपण ‘डोंगराने हा प्रवाह निर्माण केला’ असे म्हणत नाही. पाऊस पडतो, पाणी खळाळते, एकमेकांत मिळते तितक्याच सहजपणे निसर्गात जीव निर्माण होतात, नैसर्गिक निवडीने काही काळाने बदलतात, त्यांच्यापासून प्रजाती वेगळ्या होतात, आणि आपापले जीवन जगतात. निसर्ग त्यांना तयार करत नाही. किंबहुना या प्रक्रियेतून जे निर्माण झाले त्या चराचराला आणि त्यातल्या घटकांच्या परस्परसंबंधांना आपण निसर्ग म्हणतो. मनुष्यप्राणी तयार व्हावा अशी निसर्गाची इच्छा नाही. कारण निसर्गाला इच्छाच नाही. मनुष्य हा इतर प्राण्यांसारखाच एक प्राणी आहे. इतर प्राणी निर्माण झाले तसाच मनुष्यही उत्क्रांत झाला. तो सर्वात उत्क्रांत, सर्वश्रेष्ठ वगैरे नाही. कारण उत्क्रांतीत सर्वश्रेष्ठ असणे महत्त्वाचे नाही, तर आसपासच्या परिस्थितीत, इतर प्राण्यांच्या संगतीने आणि त्यांच्याशी झगडा देत तग धरून राहाणे हेच केवळ ध्येय असते.

निसर्गाचा अमुक दिशेने जावे असा प्रयत्न नसतो. भौतिकशास्त्राच्या नियमांनुसार घटना घडतात. गुरुत्वाकर्षणाने वस्तू खाली पडतात. कमी-अधिक दाबाप्रमाणे वारे वाहातात आणि महाकाय डोंगर पोखरतात. रासायनिक अभिक्रिया आपोआप घडतात. आपल्या शरीरामधली प्रत्येक पेशी एखाद्या जगड्व्याळ फॅक्टरीप्रमाणे ठराविक पदार्थ आत घेते, प्रक्रिया करते, हवी ती रसायने घडवते, ऊर्जा तयार करते, आणि कचरा बाहेर टाकते. प्राणी जन्मतात, पक्षी उडतात, झाडे हिरवीगार होतात तीही आपोआपच. निसर्ग ती ठरवून बनवत नाही. सर्व भौतिक नियमांनी घडणाऱ्या या चमत्कृतीपूर्ण वाटणाऱ्या घटनांतून निसर्ग प्रतीत होतो. तो कर्ता नाही, तर कर्म आहे. त्याला कसले नियंत्रण करण्याची इच्छा नाही, गरज नाही, कारण घटना नियंत्रण करण्याची त्याची क्षमताच नाही. तोच एक घटित आहे - सर्व घटनांच्या परिपाकांतून दिसून येणारे.

निसर्ग केवळ आहे.

(मी मराठी लाइव्हवर पूर्वप्रकाशित)

हे ठिकाणविचार

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Dec 2015 - 8:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

छान लेख.

मात्र...

देवी, पोलिओसारख्या घातक रोगांचे उच्चाटन केलेले आहे.

देवी (Smallpox) चे उच्चाटन झाले आहे पण पोलिओचे उच्चाटन अजून झालेले नाही*.

हे वाचून कोणत्या वाचकाने "आता आपल्या मुलांना पोलिओची लस देण्याची गरज नाही" असा धोकादायक गैरसमज करून घेऊ नये यासाठीच हा प्रतिसाद.

====================

* : या वर्षात, ०२ डिसेंबर २०१५ पर्यंत, जगभरात ६० पोलिओचे रोगी सापडलेले आहेत.

विलासराव's picture

7 Dec 2015 - 12:02 am | विलासराव

जे पिंडी ते ब्रह्माण्डी !!!
जेजे काही शरीराबाहेर घडतय तसच शरीराच्या आतही.
हे विपश्यना साधना करुन कोणीही जाणून घेऊ शकतो.

निसर्गाचा अमुक दिशेने जावे असा प्रयत्न नसतो. भौतिकशास्त्राच्या नियमांनुसार घटना घडतात. गुरुत्वाकर्षणाने वस्तू खाली पडतात. कमी-अधिक दाबाप्रमाणे वारे वाहातात आणि महाकाय डोंगर पोखरतात. रासायनिक अभिक्रिया आपोआप घडतात. आपल्या शरीरामधली प्रत्येक पेशी एखाद्या जगड्व्याळ फॅक्टरीप्रमाणे ठराविक पदार्थ आत घेते, प्रक्रिया करते, हवी ती रसायने घडवते, ऊर्जा तयार करते, आणि कचरा बाहेर टाकते. प्राणी जन्मतात, पक्षी उडतात, झाडे हिरवीगार होतात तीही आपोआपच. निसर्ग ती ठरवून बनवत नाही. सर्व भौतिक नियमांनी घडणाऱ्या या चमत्कृतीपूर्ण वाटणाऱ्या घटनांतून निसर्ग प्रतीत होतो. तो कर्ता नाही, तर कर्म आहे. त्याला कसले नियंत्रण करण्याची इच्छा नाही, गरज नाही, कारण घटना नियंत्रण करण्याची त्याची क्षमताच नाही. तोच एक घटित आहे - सर्व घटनांच्या परिपाकांतून दिसून येणारे.

असेच ज्या रासायनिक प्रक्रीया शरीरात घड़तात , त्यामुळे ज्या संवेदना होतात,त्यालाच सुखद दुखद मानुन पूर्वसंस्काराच्या प्रभावामुळे आपन प्रतिक्रया करत राहतो. इथेच सगळी समस्या आहे. निसर्गाप्रमानेच आपल्याला या सवेदनांप्रती तटस्थ रहायला हवे. म्हणजे नवीन संस्कार बनत नाहीत. आणि जे आधीचे संस्कार आहेत ते प्रकट होऊन शरिरावर संवेदना होतात. आताही आपन प्रतिक्रया न देता तटस्थ राहिले तर ते संस्कार इरेज होतात. असे करत करत जेव्हा सर्व् संस्कार संपतात तेव्हा कुठलीही प्रतिक्रया होत नाही .
तुम्ही वर सांगितल्याप्रमाने फक्त असणे शिल्लक रहाते. मी संपूण जातो फ़क्त घटना घड़तात . यालाच बुद्धांनी निर्वाण म्हटले आहे.

आरोह's picture

7 Dec 2015 - 1:55 am | आरोह

आपण सर्व त्रिमिती सजीव आहोत आणि आपला वावर त्रिमितीय आहे म्हणजे cartesian फॉर्म मध्ये..अजून काही वेगळ्या मिती असू शकतील का? आपल्या नसात वाहणारया रक्तात असलेल्या जिवाणू/विषाणू साठी आपल्या शरीराचा एक छोटासा भाग हे त्यांचे विश्व असू शकेल? कदाचित त्यांच्यासाठी केवळ एकच मिती असूशकेल? आपण फक्त ज्या गोष्टी पहातो, ऐकतो त्याच गोष्टींचे आपल्याला आकलन होते उदा.आवाज..काही विशिष्ट frequency चे आवाज आपण ऐकू शकत नाहीत पण दुसरे सजीव ऐकू शकतात तसेच प्रकाशाचे..आपण जे पाहतो, ऐकतो, त्या जाणिवेने आपण आपल्या विश्वाचे आकलन करतो. जर आपल्या जाणिवा (consciousness) वाढवल्या तर? त्या कश्या वाढतात? त्या आपोआप वाढतात कि काही

दत्ता जोशी's picture

7 Dec 2015 - 9:14 am | दत्ता जोशी

वाचून थोडा गोंधळ उडाला. म्हणजे कशावर चर्चा करावी तेच समजेनासे झालेय. उत्क्रांती कि पर्यावरणाचा ऱ्हास? पण उत्क्रांती हा घासकवडी सरांचा आवडता विषय आहे त्यामुळे त्यावर त्यांचा अधिक अभ्यास असावा असं वाटतंय. म्हणून पडलेले काही प्रश्न. सारणी थोडे मार्गदर्शन करावे.अशी इच्छा.

निसर्गाचा अमुक दिशेने जावे असा प्रयत्न नसतो. भौतिकशास्त्राच्या नियमांनुसार घटना घडतात.

मग उत्क्रांती कशी होते? म्हणजे जर जलचर -----> उभयचर -------> भूचर अशी उत्कांती झाली असली आणि जीव उत्क्रांत व्हायला काही दश लक्ष वर्षे लागली असतील तर जलचर हे उभयचर होईपर्यंत कसे टिकले असावेत ? एकाद्या जीवला उत्क्रांत होणे म्हणजे काय कसे समजत असावे? तसेच उत्क्रांती साठी अमुक एक बदल करून घेण्याची बुद्धी/ प्रेरणा/ दिशा कोण ठरवून देत असावे (भौतिक शास्त्र कि निसर्ग?) भौतिक शास्त्र आणि निसर्ग एकच आहेत कि वेगळे?

भौतिकशास्त्राच्या नियमांनुसार घटना घडतात. गुरुत्वाकर्षणाने वस्तू खाली पडतात. कमी-अधिक दाबाप्रमाणे वारे वाहातात आणि महाकाय डोंगर पोखरतात. रासायनिक अभिक्रिया आपोआप घडतात. आपल्या शरीरामधली प्रत्येक पेशी एखाद्या जगड्व्याळ फॅक्टरीप्रमाणे ठराविक पदार्थ आत घेते, प्रक्रिया करते, हवी ती रसायने घडवते, ऊर्जा तयार करते, आणि कचरा बाहेर टाकते.

big bang च्या वेळी असे कोणतेही भौतिक शास्त्राचे नियम अस्तित्वात नव्हते असे म्हणतात. मग हे नियम कोठून आणि कसे अस्तित्वात आले असावेत ?
हे नियम जर ठरले तर अपवाद का आणि कसे निर्माण झाले? उदा. निसर्गातली कोणतीही गोष्ट थंड केली कि आकुंचन पावते हा झाला नियम. पण पाणी मात्र हा नियम एका मर्यादेनंतर पाळत नाही. असे का? म्हणजे ४ अंश से. खाली पाणी अचानक प्रसरण पावू लागते. त्यामुळेच बर्फाची घनता हि पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असते, पुन्हा भौतिकशास्त्राच्या कि निसर्गाच्या नियमानुसार जरी पाण्याचेच घन रूप असले तरी कमी घनतेमुळे बर्फ पाण्यावर तरंगते. असा तरंगणारा बर्फ पाण्यावर एक चादर ( blanket ) तयार करतो ज्यामुळे बर्फाखालील पाणी वातावरणाच्या तापमानापेक्षा तुलनेने अधिक गरम राहून गोठत नाही आणि जलचर जीव गोठून मरण्यापासून वाचतात आणि सृष्टी अखंड राहते. यात उत्क्रांती कोठे आणि कशी कार्य करते हे मला समजले नाही.

त्यातून माणूस हाही इतर प्राण्यांप्रमाणेच उत्क्रांत झाला हे स्पष्ट झालेले आहे. आपण कपडे घालत असलो तरी त्यांच्या आत लपलेले शरीर हे इतर प्राण्यांप्रमाणेच रक्ता-मांसा-पेशींचे बनलेले आहे. ज्या चिंपांझींचे आपण दूरचे भाऊबंद लागतो त्यांच्याप्रमाणेच

असेलही. चिपांझी, बोनोबो आणि गोरीलाची किमान शरीर रचना मानवाच्या शरीर रचनेशी साधर्म्य दर्शवते. पण गम्मत म्हणजे जेव्हा आधुनिक विज्ञानाने डीएनए समजून घ्यायला सुरवात केली उत्क्रांती वाद अधिक गूढ झाला . म्हणजे असं कि डी एन ए चा विचार केला तर पहिल्या दोन प्रकारात (चिपांझी, बोनोबो) ९९% तर गोरिलाचे ९८% डीएनए मानवाशी साधर्म्य दाखवतात असे वाचले आहे. असे असूनही मानवाच्या जवळ जावू शकेल अशी कोणतीही प्रजाती शोधून सापडलेली नाही. सुमारे ४ लाख वर्षे मानवाच्या सानिध्यात राहूनही कोणत्याही प्राण्याला स्वतःची भाषा विकसित करता आलेली नाही. कला, वांग्मय, गणित आणि शास्त्रे फार लांबच्या गोष्टी झाल्या.
हुश्श बाकी शंका वेळ मिळेल तेव्हा विचारतो.

राजेश घासकडवी's picture

7 Dec 2015 - 6:36 pm | राजेश घासकडवी

एकाद्या जीवला उत्क्रांत होणे म्हणजे काय कसे समजत असावे? तसेच उत्क्रांती साठी अमुक एक बदल करून घेण्याची बुद्धी/ प्रेरणा/ दिशा कोण ठरवून देत असावे (भौतिक शास्त्र कि निसर्ग?)

एखादा जीव उत्क्रांत होण्याचा प्रयत्न करतो ही लामार्कियन मांडणी झाली. उत्क्रांती अशी घडत नाही. बुद्धी-प्रेरणा-दिशा असं काहीच नसतं. ज्या प्रकारचे जीव टिकून राहातात त्यावरून पुढच्या पिढीत कसे जीव असतील ते ठरतं. पुढच्या काही भागांमध्ये ही प्रक्रिया नैसर्गिक निवडीतून कशी घडते याचं वर्णन आहे. तेव्हा तेच इथे परत लिहीत नाही. कृपया धीर धरा.

मग हे नियम कोठून आणि कसे अस्तित्वात आले असावेत ?

याबाबत माझा काही अभ्यास नाही, त्यामुळे काही विधानं करणं योग्य ठरणार नाही. सध्या मी फक्त नियम काय आहेत आणि त्यातून उत्क्रांती कशी होते यावर लक्ष केंद्रित करतो आहे. या दुव्यावर काही चर्चांचे संदर्भ आहेत. मात्र या लेखमालेवर ही चर्चा अवांतर ठरेल.

हे नियम जर ठरले तर अपवाद का आणि कसे निर्माण झाले?

तुम्ही दिलेलं पाण्याचं उदाहरण हा नियमाला अपवाद म्हणण्यापूर्वी नियम म्हणजे काय हे समजावून घ्यायला हवं. 'थंड केल्यावर वस्तू आकुंचन पावतात' याला इंपिरिकल नियम म्हणता येईल. अणुरेणू एकमेकांकडे आकर्षित होण्याचं बल आणि उष्णतेने वाढणारी हालचाल यांच्यातल्या रस्सीखेचाचा परिणाम म्हणून आपल्याला तो नियम दिसून येतो. पाण्याच्या बाबतीत मूलभूत नियम तेच राहातात. रस्सीखेचाचा परिणाम वेगळा दिसतो. इथे काही अधिक वाचायला मिळेल. बर्फ पाण्यावर तरंगतो यामुळे काही प्राण्यांना आतमध्ये तगून राहाता येतं. त्यामुळे अर्थातच तशा जगू शकणाऱ्या प्रजाती निर्माण झाल्या.

सुमारे ४ लाख वर्षे मानवाच्या सानिध्यात राहूनही कोणत्याही प्राण्याला स्वतःची भाषा विकसित करता आलेली नाही.

इतर प्राणी आणि मानव यांच्यात बुद्धिमत्तेचा प्रचंड फरक आहे. हा शारीरिक क्षमतेचा फरक आहे. असे फरक सान्निध्यात राहून नष्ट होत नाहीत. समजा मानव जर जिराफांच्या सान्निध्यात राहिला तर त्याची मान उंच होणार नाही तसंच.

डीएनएची टक्केवारी ही खूपच गमतीदार गोष्ट आहे. आपल्यात आणि केळ्यात ५०% डीएनए कॉमन आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे या ट्क्केवारीवर फार भर देऊ नये.
'मी ठासून सांगतो मी काल रात्री नऊ वाजता केळं खाल्लं'
'मी ठासून सांगतो मी काल रात्री नऊ वाजता केळं खाल्लं नाही'
या दोन वाक्यांतही नव्वद टक्के शब्द कॉमन आहेत. पण अर्थ पूर्णपणे वेगळा आहे. तसंच काहीसं.

असो. ही लेखमाला मोठी आहे. प्रत्येक लेखात लहान मुद्देच मांडलेले आहेत. तेव्हा धीर धरा इतकंच म्हणेन.

राजेश जी
कृपया या लेखमालेसाठी व अगोदरही या विषयासंदर्भात आपण ज्या ज्या ग्रंथांचे वाचन केलेले आहे.
त्यांची कृपया सुची द्यावी. त्यामुळे ज्यांना या विषयात सीरीयसली रस असेल त्यांना या विषयाच्या
सखोल अभ्यासासाठी एक दिशा मिळेल , व मोठी मदत होइल.
इंटरनेट वरील माहीती व्हेरीफाय करण्यात व तुटक तुटक स्वरुपात बरेचदा असल्याने त्यापेक्षा एकेक ग्रंथ वाचल्याने विषयाचे आकलन अधिक अचुकतेने होते.
व एकदा ग्रंथांचा बेस असल्यावर इंटरनेट वरील माहीतीची पडताळणी व वापर देखील साक्षेपाने करता येतो.
म्हणुन आपणास विनंती की एकदा ग्रंथ सुची इन्ट्रॉडक्टरी ते अ‍ॅडव्हान्स पर्यंत लेखकाचे नावासहीत द्यावी.
धन्यवाद

संदीप डांगे's picture

7 Dec 2015 - 2:16 pm | संदीप डांगे

अहो, ते आयआयटीतले शास्त्रज्ञ आहेत. त्यांचा या विषयावरचा अभ्यास आजचा नाही तर अनेक वर्षांचा आहे. मला नाही वाटत की त्यांनी पुस्तकांची लिस्ट दिली तर सर्व वाचून सगळं काही समजेल. म्हणजे राजेशजींच्या व्यासंग, अभ्यासाच्या पातळीवर पोचता येणार नाही. उदा: एखादी ओळ वा आकडेवारी कुठून घेतली हे सांगता येईल पण त्या ओळ किंवा आकडेवारीच्या मागचे संदर्भ शास्त्रिय अभ्यासाच्या बैठकीशिवाय कळणारे नाहीत. जे वर 'काळ', 'सिन्ग्युलॅरिटी' ह्या शब्दांबाबत झाले.

मला वाटतं आधुनिक विज्ञानाच्या अनेक शाखांचा अनेक वर्ष अभ्यास करण्याची परिस्थिती असेल तरच ह्या फंदात पडलेले बरे. तुमच्या-माझ्यासारख्या लेमॅनला तरी विज्ञानातही 'बाबा वाक्यम् प्रमाणम्' शिवाय उपाय नाही. काय म्हणता?

मारवा's picture

7 Dec 2015 - 4:01 pm | मारवा

सर्वप्रथम राजेशजींच्या व्यासंगाविषयी आणि अधिकाराविषयी पुर्णपणे सहमत आहे. तिथपर्यंत पोहोचेल की नाही हे खरचं माहीत नाही. पण हा प्रश्न विचारतांना ही तुलनात्मक अशी महत्वाकांक्षा डोक्यात नव्हतीच इतकं प्रामाणिकपणे सांगतो. प्रत्येक व्यक्ती अ‍ॅट द मोस्ट जीवनात एकाच विषयाची सर्वोत्तम तज्ञ बनु शकते हे पुर्णपणे मान्यच आहे.
मात्र म्हणुन कोणी स्वतःचा सोडुन इतर कुठलाच विषय अभ्यासु नये असे नाही. दुसरं अस आहे की जेव्हा एक व्यक्ती एका विषयाची अधिकारी असते तेव्हा ते फार योग्य रीतीने त्या विषयावर मार्गदर्शन करु शकतात म्हणुन आपण त्यांचा सल्ला घ्यावा यात व्यावहारीक फायदाच आहे.
स्वतः शोधण्यात फार वेळ श्रम जातात चुकत चुकत योग्य रस्त्यावर येऊही शकतो पण निष्कारण श्रम व्यर्थ होतात हमाली होते. ते अनावश्यक फाफटपसारा टाळून चार उत्तम पुस्तके त्या विषयावरील सुचवतील तर त्याने माझे अनेक तासांचे श्रम वाचतात. मी वादात प्रश्न उपस्थित करण्यासाठी नव्हे तर विषयाचे अजुन व्यवस्थित आकलन व्हावे या हेतुने सुचीची मागणी केली. माझा अनुभव असा आहे की संबंधित क्षेत्रातील अधिकारी व्यक्तीचे रेकमेंडशेन अनेक अनावश्यक वेस्ट ऑफ एनर्जी वाचवतात. अनेकदा रीकमेंडेड पुस्तके सहसा अचुकच असतात. त्यानंतर जेव्हा आकलन झाले व त्यानंतर कुठे मतभेद वाटला तर त्यावर आपण राजेशजींना तिथे तिथे क्रॉस करु शकतो. तो अर्थातच फार पुढचा भाग झाला त्यातही गुरुचाच गळा धरण्यात काहीही गैर नाही नव्हे तो एक कदाचित अपरीहार्य टप्पा असतो. जिज्ञासा शोध वाटचाल अशीच असते.
मुळात एका चांगल्या हेतुने शोध घेण्यात गैर काय ? वेळ लागेल तो लागेल आपल्याला काय मारामारी थोडी करायचीय स्पर्धा नाही एक शोध आहे एक जिज्ञासा आहे बस. पात्रता आज शुन्य असेल उद्या हळु हळु दोन होइल परवा ५ होइल कदाचित दहाच्या पुढेही जाणार नाही जिथपर्यंत जाऊ तिथपर्यंत, अडखळलो तर अडखळलो चुकलो तर सुधारुन घेऊ. शोध घ्यायला हरकत काय ? फंदात तर पडलचं पाहीजे असे माझे मत आहे.
एक रजनीश फार महान वाचक होते अक्षरश : हजारो ग्रंथांचा व्यासंग होता त्यांचा. त्यांच एक पुस्तक आहे बुक्स आय हॅव लव्हड फार रोचक आहे ते अनेक रोचक पुस्तकांचा पत्ता त्यात सापडतो. नोबेल विनर पुस्तके असतात जरुरी नाही ग्रेट च असतील पण चाळणी फार मोठी लावलेली असते त्यामुळे अप टु सर्टन स्टॅन्डर्ड असतात. फायदा होतो. एक पुस्तक आहे नरेंद्र नावाच्या कवीच पहील मराठीतल पहील महाकाव्य ज्ञानेश्वरांच्या अगोदरचं रुक्मीणी स्वयंवर याचा उल्लेख एकदा वाचला कुतुहल निर्माण झाल बरेच दिवस शोधल कुठेच काहीच सापडल नाही. बरेच दिवसांनी एका तज्ञ व्यक्तीने एकच पुस्तक सजेस्ट केलं सुहासिनी इर्लेकरांच बास, परफेक्ट आख्या ग्रंथाचा अत्यंत सखोल अभ्यास अप्रतिम उतारे टीपण दिलेल नरेंद्रच्या पुस्तकाचा पुर्ण अर्क हातात आला. नाहीत झामलत फिरत होतो त्याच्या प्रतीच उपलब्ध नाहीत कुठे फारच कमी फारच त्रोटक स्वरुपात उरलय. त्यात मराठीतल पहील लव्हलेटर आहे इ.इ. तर असा फायदा असतो.
म्हणुन आपल्या सारख्या सामान्य वाचकांना उपयोगी पडावेत म्हणुन राजेशजींना बिगीनर्स ते अ‍ॅडव्हान्स लीस्ट ची मागणी केली. काहीतर देऊ शकतील ना ते. सोप होइल ना मग आपल काम
काय म्हणता ?

संदीप डांगे's picture

7 Dec 2015 - 4:09 pm | संदीप डांगे

सहमत... नव्या भिडूंसाठी विज्ञानाची पुस्तके असतात. त्याचा लाभ घेणे आहेच की हाती.

राजेश घासकडवी's picture

7 Dec 2015 - 11:35 pm | राजेश घासकडवी

मला मराठीतली पुस्तकं फारशी माहिती नाहीत, माझं सर्व वाचन इंग्रजीमधूनच झालं. पण उत्क्रांती म्हणजे काय हे समजावून घेण्यासाठी रिचर्ड डॉकिन्सची पुस्तकं वाचावीत असा सल्ला देतो. त्याच्या लेखनामध्ये रोखठोकपणा आहे. विचारांची स्पष्टता आहे. आणि स्वच्छ साध्या भाषेत वैज्ञानिक संकल्पना समजावून सांगण्याची क्षमता आहे.

१. ब्लाइंड वॉचमेकर - सजीवसृष्टीची निर्मिती कोणीही घडवून न आणता निसर्गनियमांनी कशी झाली हे उत्तम रीतीने समजावून सांगितलेलं आहे. त्यामुळे हे पुस्तक पहिल्यांदा वाचावं.
२. सेल्फिश जीन - त्याचं सगळ्यात गाजलेलं पुस्तक. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट सारख्या आत्मकेंद्री तत्त्वज्ञानातून तयार होणाऱ्या प्राण्यांतही परोपकाराची भावना का दिसून येते याचं साद्यंत उत्तर देणारं पुस्तक
३. ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ - उत्क्रांतीचे पुरावे नक्की काय असा जर प्रश्न पडलेला असेल तर त्याचं उत्तर देणारं हे पुस्तक आहे. त्याने दिलेले युक्तिवाद वाचले की किती भक्कम पायावर हा सिद्धांत उभा आहे हे दिसून येतं.
४. क्लाइंबिंग माउंट इंप्रॉबेबल - यात 'निर्जीव ते सजीव' या प्रवासाविषयी लेखन आहे.
५. अनवीव्हिंग द रेनबो - गूढ उकलण्यामुळे जीवनातला आनंद नष्ट होतो का? या प्रश्नाला उत्तर असं आहे की वरवर दिसणारी सामान्य गूढं उकलली की त्यातून जे नवीन विश्व दिसायला लागतं ते अधिकच अद्भूत असतं.

शेवटची दोन पुस्तकं ही अधिक काव्यमय भाषेत लिहिलेली, तर पहिली तीन ही अधिक परखड भाषेतली आहेत. पण सगळीच वाचनीय आहेत.

मारवा's picture

7 Dec 2015 - 11:49 pm | मारवा

वरील पुस्तकांच्या सुचवणीसाठी अनेक धन्यवाद !

संदीप डांगे's picture

8 Dec 2015 - 12:00 am | संदीप डांगे

शतशः धन्यवाद!

मार्मिक गोडसे's picture

7 Dec 2015 - 3:17 pm | मार्मिक गोडसे

Whereof one cannot speak, thereof one must be silent."

एकेकाळी कोण्या जिवाला आधार देणाऱ्या त्या हाडांमध्ये कोणी नवीन जीव आसरा घेतो, मृत पावतो आणि त्याचा सांगाडा अजून दुसऱ्या जिवाला आत पोसतो.

याचप्रमाणे एकमेकांवर पूर्णपणे अवलंबून असल्यानेच अस्तित्व टिकू शकणारे जीव. अगदी नर-मादी रचना, वृक्षांच्या बाबतीत नर झाड-मादी झाड. परागीभवन.

नरमादी एकत्र येणार, तेव्हा त्यांना मानसिक प्रेरणांमधून एकत्र येण्यास प्रोत्साहन मिळणार. झाडांबाबत परागकण वाहून नेणं कदाचित आपापतः होत असलं तरी ते घडवून आणणार्‍या किड्याला आकर्षित करणारे रस बनवले जाणार इतकंच नव्हे तर त्या किड्याच्या मादीसारखा आकार फुलं धारण करणार.

हे सर्व पाहता मुख्य मुद्दा असा मनात येतो की जर आपापतः घडत गेलेल्या घटनांच्या साखळीतून जीव तयार झाले असते तर ते स्वतःपुरते परिपूर्ण ऑल इन वन, कम्प्लीट पॅकेज असे झाले असते. अनेक बाह्य (स्वतःबाहेरच्या) घटकांचं अस्तित्व आणि वागणूक "गृहीत" धरुन, बाह्य फॅक्टर्स "समजून" घेऊन त्यांना मोहात पाडणारी, त्यांच्या क्रियांवर आपल्या क्रियांचं अवलंबित्व असणारी रचना डेव्हलप होत जाणं हे जास्त गूढ वाटतं.

किड्याच्या मादीसारखा आकार असलेली फुलंच टिकून राहिली असं सोपं स्पष्टीकरण देता येईल. पण सर्वत्र असणार्‍या नर आणि मादी या दोन वेगवेगळ्या सिस्टीम कोणत्या आपोआप घटनेतून झाल्या असाव्यात हा विचार येतो. अमीबासारखेच पण प्रगत, पूर्ण सिस्टीम एकातच डेव्हलप झालेले जीवच का नाही झाले ?

मिठाच्या स्फटिकांचा आपोआप ठराविक आकृतीबंध होणं हे स्वयंभू असणार, पण इथे दोन किंवा अधिक पूर्ण "एक्स्टर्नल फॅक्टर्स" गृहीत धरुन त्यांना एकत्र आणण्याचा प्लॅन (किंवा ते एकत्र येणारच हे आधीच "गृहीत धरुन केलेला "प्लॅन") वाटण्याची शक्यता नक्कीच जास्त असते..

डोंगराच्या उतारावरून पावसाचे पाणी अनेक धारांतून एकत्र येऊन खाली पडते. त्याला आपण ‘डोंगराने हा प्रवाह निर्माण केला’ असे म्हणत नाही. पाऊस पडतो, पाणी खळाळते, एकमेकांत मिळते तितक्याच सहजपणे निसर्गात जीव निर्माण होतात

ही वाक्यं म्हणजे उपरोक्त उदाहरणांचं ओव्हरओव्हरओव्हरओव्हर^nसिम्प्लिफिकेशन वाटतं.

अर्थातच त्यामुळे "हे देवाने घडवलं" हे मान्य करण्याची सुतराम गरज नाही. पण आजरोजी "समजत नाही" हे खरं.

राजेश घासकडवी's picture

7 Dec 2015 - 6:49 pm | राजेश घासकडवी

अनेक बाह्य (स्वतःबाहेरच्या) घटकांचं अस्तित्व आणि वागणूक "गृहीत" धरुन, बाह्य फॅक्टर्स "समजून" घेऊन त्यांना मोहात पाडणारी, त्यांच्या क्रियांवर आपल्या क्रियांचं अवलंबित्व असणारी रचना डेव्हलप होत जाणं हे जास्त गूढ वाटतं.

अर्थातच. प्राण्यांच्या बाह्य परिस्थितीशी मिळतंजुळतं घेणारे, त्यांचा फायदा करून घेणारे गुणधर्म विकसित होतात, पुढच्या पिढीत जातात. पण बाह्य परिस्थितीचा एक प्रचंड मोठा भाग म्हणजे आसपास असणारे इतर जीव आणि त्यांचे गुणधर्म. आणि हा गुणधर्मसमुच्चय एकमेकांशी गुंफून पुढे बदलत जातो. म्हणजे शंभर लोकांनी हात गुंफून एक मोठं रिंगण घातलं असावं आणि ते हळूहळू सरकत जावं तसे सगळ्यांचेच गुणधर्म एकमेकांमुळे एकत्रितपणे बदलत जातात.

या विषयाला वाहिलेलं 'एक्स्टेंडेड फेनोटाइप' हे डॉकिन्सचं पुस्तक वाचावं. त्यात आपल्याला थक्क करून टाकणारी उदाहरणं आहेत.

ही वाक्यं म्हणजे उपरोक्त उदाहरणांचं ओव्हरओव्हरओव्हरओव्हर^nसिम्प्लिफिकेशन वाटतं.

डोंगराचं रूपकच वापरलेलं आहे. त्यात या लेखाचा संदेश अधोरेखित असा करायचा आहे, की पाणी विशिष्ट पॅटर्नने वाहातं म्हणजे त्याला डोंगर कारणीभूत असतो असं म्हणता येईल. पण डोंगरावर व्यक्तिमत्त्वाचं आरोपण करून 'त्याची इच्छा म्हणून पाणी असं वाहातं' असं म्हणणं योग्य नाही. डोंगर केवळ बाउंडरी कंडिशन्स म्हणून आहे.

जीवसृष्टीच्या बाबतीत या बाउंडरी कंडिशन्स इतक्या स्टॅटिक स्थिर अचल नसतात. इथे डोंगर बदलत असतो, आणि त्याप्रमाणे वाहाणाऱ्या धारांची दिशा बदलते, आणि या दिशांमुळे पुन्हा डोंगर बदलतो. या एकमेकांना बदलण्याच्या प्रक्रियेमुळे काही भन्नाट पॅटर्न्स तयार होताना दिसतात.