विश्वाचे आर्त - भाग ३ - अस्तिस्तोत्र
लेखनप्रकार
"समुद्राचा विस्तार निश्चल आहे. त्याच्या किनाऱ्यावरील क्षारांच्या खडकांत मृत आकृती जन्म घेतात, प्रतिबिंबांत आपल्या खुणा उमटवतात. परंतु त्यामुळे समुद्रात विचलता येत नाही. त्याला भरती नाही म्हणून त्याला ओहोटीही नाही. त्याच्यात जन्माचा स्फोट नाही त्यामुळे मरणाचे विसर्जनही नाही. त्याला मृत्यूची भीती नाही, त्यामुळे मृत समुद्र अमर आहे.
त्यालाच चिंतन नाही, कारण त्याच्या चिंतनाची सर्व सांगता झाली आहे.
आता समुद्र केवळ आहे."
जी. ए. कुलकर्णी, ‘अस्तिस्तोत्र’ - सांजशकुन, पॉप्युलर प्रकाशन.
-----
जी. ए. कुलकर्णींच्या कथांमध्ये आपल्याला एका अजब विश्वातून भरकटवत नेण्याची शक्ती आहे. त्यांच्या प्रासादिक भाषेमुळे हा प्रवास करताना आपण गुंग होऊन त्या विश्वात सामावून जातो. 'अस्तिस्तोत्र' ही अशी बलवान कथा. ही खरी तर कथा म्हणण्यापेक्षा मृत समुद्राच्या अस्तित्वाचे, त्याच्या आसपास चालू असणाऱ्या अव्याहत मृत्यूचक्राचे चित्रण आहे. किनाऱ्यावर महाप्रचंड प्राण्यांचे अवशेष मृत्यूच्या खुणा दाखवतात. एकेकाळी कोण्या जिवाला आधार देणाऱ्या त्या हाडांमध्ये कोणी नवीन जीव आसरा घेतो, मृत पावतो आणि त्याचा सांगाडा अजून दुसऱ्या जिवाला आत पोसतो. एकात एक गुंतलेली ही जिवांची मालिका चालू असताना समुद्र शांत, स्तब्ध, निर्मम, निरीक्षक असतो. तो हे जीव निर्माण करत नाही की मारत नाही. तो केवळ असतो.
या कथेतल्या समुद्रातला भगभगीत कोरडा मेलेलेपणा काढून टाकला तर निसर्गाबद्दलही असेच म्हणता येते.
निसर्ग केवळ आहे.
मात्र मृत समुद्र एकीकडे आणि वाळूत वावरणारे जीव एकीकडे अशी स्पष्ट रेखीव विभागणी करणारा किनारा निसर्गाला नाही. कारण जीव आणि भौतिक असे द्वैतच त्याच्याकडे नाही. जल-वायू-भूमी-आकाश-अग्नि अशी पंचमहाभूते एकमेकांत मिसळून जीव तयार करतात, जगवतात, मारतातही. निसर्गात घडणाऱ्या घटनांचा प्राण्यांवर प्रभाव होतो, तर प्राण्यांच्या अस्तित्वाने निसर्गाला आकार येतो. निसर्ग म्हटल्यावर आपल्या मनात एक लसलसते काही डोळ्यासमोर येते. रूढार्थाने मंगळावरही 'निसर्ग' आहे. मात्र प्राणीसृष्टीचा अभाव असल्यामुळे आपल्या मनातला निसर्ग तिथे नाही. हिरवी झाडे, दवाचे थेंब, हवेत भरलेला एक जीवंत वास, आसपास चाललेली पक्ष्यांची भिरभिर - काही काही नाही. आपल्यासमोर निसर्ग म्हणजे काय याची काही एक कल्पना असते. तरीही आपण निसर्गाला आपल्या शरीराच्या मर्यादेच्या पलिकडचे काहीतरी - असे मानतो. आपण आपल्या शरीराच्या मर्यादेनंतर संपतो - त्याच्या बाहेर जे काही आहे त्याचे आपण नैसर्गिक आणि कृत्रिम असे नीटस दोन भाग करतो. मी - माझ्या आसपास दिसणारे मानवनिर्मित जग - या दोन गोष्टी सोडल्या की बाकीचा सगळा निसर्ग.
ही विभागणी अनेक वेळा सोयीची पडते खरी पण अनेक वेळा त्यामुळे अडचणही निर्माण होते. कारण आपणही निसर्गाचाच एक भाग आहोत हे आपल्याला विसरायला होते. अनेक वेळा 'मी आणि निसर्ग' या द्वैताचे रूपांतर 'मी विरुद्ध निसर्ग' या मांडणीत होते. मानवनिर्मित ते सगळे वाईट, आणि नैसर्गिक म्हणजे सर्व काही सुंदर अशा रोमॅंटिक कल्पनाही बळावतात. किंवा निसर्ग गेला खड्ड्यात, माझे सुख तेवढे महत्त्वाचे अशी तद्दन भोगवादी प्रवृत्तीही दिसते. काही वेळा निसर्गात घडणाऱ्या गोष्टी जणू काही मानवाच्या कृत्यांपोटी होतात अशी समजूत निर्माण होते. सर्वच आदीम संस्कृतींमध्ये निसर्गाच्या शक्तींना देव मानण्याची आणि त्यांची पूजा करण्याची प्रथा आढळून येते. अवर्षण झाले, याचे कारण गावात काहीतरी पाप घडले. भूकंप झाला, कारण धरतीमाता कोपली. रोगराईची साथ आली, कारण समाजात अनाचार वाढला. एक ना दोन, अनेक बाबतीत निसर्गावर मानवी भावनांचे आरोपण करून नैसर्गिक घटनांचे वेगळे अर्थ काढले जातात. पाऊस पडावा म्हणून पूजा करणे इथपर्यंतही काही हरकत नाही, पण त्यासाठी नरबळी देण्यापर्यंतही मजल जात असे.
आता आपल्याला माहीत आहे की पाऊस का पडतो, मान्सूनचे वारे कसे फिरतात, ज्वालामुखीचे उत्पात का होतात, रोगराईच्या साथी कशामुळे पसरतात. समाज म्हणून हे ज्ञान वापरून आपण अनेक बाबतीत ताबा मिळवला आहे. देवी, पोलिओसारख्या घातक रोगांचे उच्चाटन केलेले आहे. पावसावर ताबा आला नसला तरी पाण्यावर थोडाफार ताबा मिळवलेला आहे. पशूंपासून स्वतःचे रक्षण केलेले आहे. मात्र निसर्गाच्या गूढपणाचा सुंभ जळला असला तरी त्याला व्यक्तीरूप देण्याचा, त्याला मानवकेंद्रित बनवण्याचा पीळ अजून शिल्लकच आहे. आपल्या विचार करण्याच्या आणि ते व्यक्त करण्याच्या पद्धतीतून तो वेळोवेळी दिसून येतो. 'ओल्ड टेस्टामेंट'मधला देव जेव्हा म्हणतो की 'मी हे विश्व मानवासाठी निर्माण केलेले आहे, जा त्याचा आनंद घ्या.' तेव्हा तो याच मानवकेंद्रित निसर्गाचा अवतार बनतो. या दृष्टिकोनामुळे एका बाजूला भविष्याचा विचार न करता स्वार्थीपणाने केलेली निसर्गाची नासधूस दिसते तर दुसऱ्या बाजूला निसर्गाच्या कुठच्याही बाबतीत कणभरही ढवळाढवळ करणे म्हणजे पाप अशी विचारसरणी दिसते.
याचे मुख्य कारण म्हणजे माणूस स्वतःला निसर्गापासून वेगळे स्थान देतो. ते अगदीच गैर नाही - मानवासारखा बुद्धिमान प्राणी आजपर्यंत झाला नाही. इतर कुठचाही प्राणी मानवाइतक्या कौशल्याने भाषा किंवा अवजारे वापरत नाही. या बौद्धिक वर्चस्वामुळे आपल्याला सतत कुठेतरी वाटत राहाते की माणूस हा सर्वश्रेष्ठ आहे. तो निर्माण व्हावा ही निसर्गाची इच्छा आहे. इतर प्राणीमात्र त्यापेक्षा कनिष्ठ आहेत. हे चित्र अर्थातच साफ चूक आहे.
जीवसृष्टी कशी निर्माण झाली हे कोडे उत्क्रांतीवादामुळे सुटलेले आहे. त्यातून माणूस हाही इतर प्राण्यांप्रमाणेच उत्क्रांत झाला हे स्पष्ट झालेले आहे. आपण कपडे घालत असलो तरी त्यांच्या आत लपलेले शरीर हे इतर प्राण्यांप्रमाणेच रक्ता-मांसा-पेशींचे बनलेले आहे. ज्या चिंपांझींचे आपण दूरचे भाऊबंद लागतो त्यांच्याप्रमाणेच आपणही हिंस्र आणि हिंसक आहोत. कळपाने राहाण्याची, कळपातल्यांना मदत करण्याची, प्रसंगी प्राणही देण्याची प्रवृत्तीही आपल्यात इतर प्राण्यांप्रमाणे दिसते. इतर अनेक सजीवांप्रमाणे आपल्यालाही दात-नखे आहेत, तसेच धडधडणारे हृदयही आहे. ही सजीवसृष्टी आपोआप, नैसर्गिक नियमांनुसार बनली. ती निसर्गाने 'निर्माण केली' असे म्हणता येत नाही. डोंगराच्या उतारावरून पावसाचे पाणी अनेक धारांतून एकत्र येऊन खाली पडते. त्याला आपण ‘डोंगराने हा प्रवाह निर्माण केला’ असे म्हणत नाही. पाऊस पडतो, पाणी खळाळते, एकमेकांत मिळते तितक्याच सहजपणे निसर्गात जीव निर्माण होतात, नैसर्गिक निवडीने काही काळाने बदलतात, त्यांच्यापासून प्रजाती वेगळ्या होतात, आणि आपापले जीवन जगतात. निसर्ग त्यांना तयार करत नाही. किंबहुना या प्रक्रियेतून जे निर्माण झाले त्या चराचराला आणि त्यातल्या घटकांच्या परस्परसंबंधांना आपण निसर्ग म्हणतो. मनुष्यप्राणी तयार व्हावा अशी निसर्गाची इच्छा नाही. कारण निसर्गाला इच्छाच नाही. मनुष्य हा इतर प्राण्यांसारखाच एक प्राणी आहे. इतर प्राणी निर्माण झाले तसाच मनुष्यही उत्क्रांत झाला. तो सर्वात उत्क्रांत, सर्वश्रेष्ठ वगैरे नाही. कारण उत्क्रांतीत सर्वश्रेष्ठ असणे महत्त्वाचे नाही, तर आसपासच्या परिस्थितीत, इतर प्राण्यांच्या संगतीने आणि त्यांच्याशी झगडा देत तग धरून राहाणे हेच केवळ ध्येय असते.
निसर्गाचा अमुक दिशेने जावे असा प्रयत्न नसतो. भौतिकशास्त्राच्या नियमांनुसार घटना घडतात. गुरुत्वाकर्षणाने वस्तू खाली पडतात. कमी-अधिक दाबाप्रमाणे वारे वाहातात आणि महाकाय डोंगर पोखरतात. रासायनिक अभिक्रिया आपोआप घडतात. आपल्या शरीरामधली प्रत्येक पेशी एखाद्या जगड्व्याळ फॅक्टरीप्रमाणे ठराविक पदार्थ आत घेते, प्रक्रिया करते, हवी ती रसायने घडवते, ऊर्जा तयार करते, आणि कचरा बाहेर टाकते. प्राणी जन्मतात, पक्षी उडतात, झाडे हिरवीगार होतात तीही आपोआपच. निसर्ग ती ठरवून बनवत नाही. सर्व भौतिक नियमांनी घडणाऱ्या या चमत्कृतीपूर्ण वाटणाऱ्या घटनांतून निसर्ग प्रतीत होतो. तो कर्ता नाही, तर कर्म आहे. त्याला कसले नियंत्रण करण्याची इच्छा नाही, गरज नाही, कारण घटना नियंत्रण करण्याची त्याची क्षमताच नाही. तोच एक घटित आहे - सर्व घटनांच्या परिपाकांतून दिसून येणारे.
निसर्ग केवळ आहे.
(मी मराठी लाइव्हवर पूर्वप्रकाशित)
वाचने
7321
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
छान लेख.
देवी, पोलिओसारख्या घातक रोगांचे उच्चाटन केलेले आहे.देवी (Smallpox) चे उच्चाटन झाले आहे पण पोलिओचे उच्चाटन अजून झालेले नाही*. हे वाचून कोणत्या वाचकाने "आता आपल्या मुलांना पोलिओची लस देण्याची गरज नाही" असा धोकादायक गैरसमज करून घेऊ नये यासाठीच हा प्रतिसाद. ==================== * : या वर्षात, ०२ डिसेंबर २०१५ पर्यंत, जगभरात ६० पोलिओचे रोगी सापडलेले आहेत.छान चालली आहे लेखमाला.
विश्व एक आभास..माया?
वाचून थोडा गोंधळ उडाला.
In reply to वाचून थोडा गोंधळ उडाला. by दत्ता जोशी
एकाद्या जीवला उत्क्रांत होणे
राजेश जी एक आग्रहाची विनंती
In reply to राजेश जी एक आग्रहाची विनंती by मारवा
अहो, ते आयआयटीतले शास्त्रज्ञ
In reply to अहो, ते आयआयटीतले शास्त्रज्ञ by संदीप डांगे
संदीप जी
In reply to संदीप जी by मारवा
सहमत... नव्या भिडूंसाठी
In reply to संदीप जी by मारवा
मला मराठीतली पुस्तकं फारशी
In reply to मला मराठीतली पुस्तकं फारशी by राजेश घासकडवी
राजेश जी धन्यवाद !
In reply to मला मराठीतली पुस्तकं फारशी by राजेश घासकडवी
शतशः धन्यवाद!
Whereof one cannot speak,
एकेकाळी कोण्या जिवाला आधार
In reply to एकेकाळी कोण्या जिवाला आधार by गवि
अनेक बाह्य (स्वतःबाहेरच्या)