विश्वाचे आर्त - भाग १५ - १३० दाण्यांची द्रौपदीची थाळी

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
21 Jan 2016 - 7:23 am

1
.
भाग १ - काळाचा आवाका, भाग २ - नासदीय सूक्त, भाग ३ - अस्तिस्तोत्र, भाग ४ - उत्क्रांतीचे उत्तर, भाग ५ - कोंबडी आधी की अंडं आधी , भाग ६ - जंबोजेट दृष्टांत, भाग ७ - अचेतनापासून सचेतनापर्यंत, भाग ८ - रेणूंपासून पेशींपर्यंत , भाग ९ - अनैसर्गिक निवड , भाग १० - नैसर्गिक निवड , सिंहावलोकन , भाग ११ - सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट , भाग १२ - सामाजिक डार्विनवाद , भाग १३ - 'आहे' आणि 'असावं' ,भाग १४ - उत्क्रांती आणि हरितक्रांती

मुले आईवडिलांसारखी दिसतात, कधीकधी आजी किंवा आजोबांवर जातात. हे इतके उघड आणि सर्वमान्य आहे की ते सांगण्याचीही गरज नाही. 'वरची वस्तू सोडून दिली की खाली पडते' या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीप्रमाणे ते सार्वत्रिक सत्य आहे. गेल्या लेखात आपण 'रात्री अंधार का असतो?' या प्रश्नाचा खोलवर विचार केला तर विश्वाच्या जडणघडणीविषयी काही निष्कर्ष कसे काढता येतात हे आपण पाहिले. तसेच या साध्या निरीक्षणामागच्या वैज्ञानिक सत्याचा सखोल अभ्यास केला की १३० दाण्यांपासून अब्जावधी लोकांना जीवनदान देण्याची शक्ती येते. ती कशी हे समजून घेण्यासाठी आपल्याला जेनेटिक्स किंवा जनुकशास्त्राची तोंडओळख करून घेणे आवश्यक आहे.

आईवडिलांचे गुणधर्म मुलांत उतरतात या मूलभूत निरीक्षणावर डार्विनचा उत्क्रांतीवाद उभा होता. मात्र हे गुणधर्म नक्की कुठच्या पद्धतीने पुढच्या पिढीत जातात याबाबत निश्चित खात्री नव्हती. एक विचार असा होता की मुलांचे गुणधर्म म्हणजे आईवडिलांच्या गुणधर्मांची सरासरी असते. हे वरवर स्वीकारायला ठीक वाटते पण त्यात दोन मुख्य अडचणी होत्या. एक म्हणजे जर प्रत्येक वेळी साधारण सरासरी येत असेल तर अनेक पिढ्यांनंतर प्रजातीमधले वैविध्य नष्ट व्हायला हवे. म्हणजे समजा एका पिढीतली माणसे उंच, मध्यम, बुटकी अशी आहेत. आता यांच्या कशाही जोड्या लावल्या तरी सर्वात उंच व्यक्तीपेक्षा कमी उंचीचाच जोडीदार मिळणार. अर्थातच पुढच्या पिढीतले त्यांचे मूल हे त्याच्या उंच पालकापेक्षा कमी उंच असणार. हेच बुटक्यांबाबत म्हणता येते. सर्वात बुटक्या व्यक्तीचे मूल त्यापेक्षा कमी बुटके असणार. कारण त्या सर्वात बुटक्या वक्तीचा जोडीदार किंचित का होईना, उंचच असणार. मूल त्यांच्या मध्ये कुठेतरी. आणि हे पिढ्यानपिढ्या चालले तर एक वेळ अशी येईल की सर्वच माणसे सर्वसाधारणपणे सारख्याच उंचीची असतील. या गुणधर्मांच्या सरासरीतून जर प्रजातीतले वैविध्य नष्ट होत असेल तर उत्क्रांतीवाद कोसळतो. कारण नैसर्गिक निवड कार्य करण्यासाठी त्या प्रजातीत वेगवेगळ्या गुणधर्मांसाठी वैविध्य आवश्यकच आहे. कमी किंवा अधिक वेगाने पळणारे चित्ते असतील तरच त्यांना हरणे पकडणे सोपे किंवा कठीण जाईल. आणि तरच काही चित्ते अधिक प्रजा निर्माण करतील तर काही कमी करतील. सर्वच चित्ते सारख्याच वेगाने जात असतील तर नैसर्गिक निवड होऊच शकत नाही. दुसरी अडचण म्हणजे प्रत्यक्षात हे घडताना दिसत नव्हते. म्हणजे आईचे डोळे काळे असतील आणि वडिलांचे निळे असतील तर मुलाचे डोळे काळपट निळे नसतात. ते काळे किंवा निळे असलेलेच दिसून येतात.

डार्विनला अर्थातच हा प्रश्न सतावत होता. गुणधर्म नक्की कसे पुढे जातात? त्याच्या काळात याचा कुठचाच शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास नसल्याने त्याच्याकडे उत्तर नव्हते. पण उत्क्रांती व्हायची असेल तर प्रजातीमध्ये वैविध्य टिकून राहायला हवे हे त्याला माहीत होते. त्याने उत्क्रांतीवाद मांडला, त्याच सुमाराला ग्रेगर मेंडेलने पद्धतशीर अभ्यास करून उत्तर काढले होते आणि ते प्रसिद्धही केले होते. दुर्दैवाने डार्विनला या प्रयोगांविषयी त्याच्या मृत्यूपर्यंत काहीच माहिती मिळाली नाही. आणि आपल्या सिद्धांतातली त्रुटी भरली गेलेली त्याला शेवटपर्यंत कळली नाही.

मेंडेलने मटारच्या शेंगांच्या रंगांचा अभ्यास केला. बहुतांश शेंगा हिरव्या रंगाच्या होत्या. त्यांचे एकमेकांमध्ये परागीभवन करून जी नवीन झाडे येत तीही हिरवीच होती. मग त्याने पिवळ्या शेंगांच्या झाडांबरोबर हिरव्यांचा संकर केला. त्यातली पहिल्या पिढीची सर्वच झाडे हिरव्या शेंगांची आली. आता याच हिरव्यांचे एकमेकांबरोबर परागीभवन केल्यावर मात्र त्याला काही आश्चर्यकारक निरीक्षणे मिळाली. कारण यातली बहुतांश झाडे हिरव्या शेंगांची असली तरी काही झाडे मात्र पिवळ्या शेंगांची होती. म्हणजे दोन हिरव्यांची संतती पिवळी होती. याचा अर्थ पहिल्या पिढीत दिसणारे गुणधर्म हे दुसऱ्या पिढीत दिसले नाहीत, तरी ते पुढे जाऊ शकतील अशा सूप्त स्वरूपात ते शिल्लक होते. त्याने जेव्हा वारंवार प्रयोग करून बघितले तेव्हा त्याच्या लक्षात आले की अशा प्रकारे तिसऱ्या पिढीतल्या पिवळ्यांचे प्रमाण बरोब्बर एक चतुर्थांश असते.

हे असे का होतं? त्याचे उत्तर असे की रंगाचा गुणधर्म हा दोन्ही पालकांकडून येतो. पण त्यातला हिरवा रंगाचा गुणधर्म हा प्रभावी (डॉमिनंट) असतो. तर पिवळा रंग गुणधर्म हा अप्रभावी (रिसेसिव्ह) असतो. याचा अर्थ असा की एका पालकाकडून हिरवा आणि दुसऱ्या पालकाकडून पिवळा आला तर संतती पोपटी होत नाही. तर हिरवीच निपजते. मात्र त्यांमध्ये पुढच्या पिढीत पिवळ्या रंगाचा गुणधर्म पाठवण्याची क्षमता शिल्लक असते. जर दोन्ही पालकांकडून पिवळाच गुणधर्म पुढे गेला तरच संतती पिवळी निपजते. मेंडेलच्या प्रयोगात पहिल्या पिढीचे पालक शुद्ध पिवळे आणि शुद्ध हिरवे होते. म्हणजे दोन्हीत त्यांच्या दोन्ही पालकांकडून एकाच रंगाचा गुणधर्म आलेला होता. दुसरी पिढीत मात्र एक हिरवा आणि एक पिवळा अशी विभागणी होती. हिरवा रंग प्रभावी असल्यामुळे त्यांच्या शेंगा हिरव्या होत्या. मात्र तिसऱ्या पिढीचा जन्म होताना संकर या 'अशुद्ध' हिरव्यांचा झाला होता. म्हणजे त्यांच्यात हि.पि. + हि.पि अशा जोडीचा संकर होता. आता आईकडून कुठचातरी एक आणि वडिलांकडून कुठचा तरी एक असा गुणधर्म पुढच्या पिढीत जात असेल तर त्यांची चार संतती पुढीलप्रमाणे असेल. हि. हि, हि. पि., पि. हि., आणि पि. पि. हिरवा प्रभावी असल्यामुळे पहिले तीन हिरवेच होणार मात्र चौथ्यात दोन्ही पिवळे असल्यामुळे त्याच्या शेंगा पिवळ्या दिसतात. चारऐवजी जर शेकडो संतती असतील तर सरासरी एक चतुर्थांश झाडांना पिवळ्या शेंगा दिसतील.

मेंडेलच्या प्रयोगामुळे हे सिद्ध झाले की संततीमध्ये जाताना, आईवडिलांचे गुणधर्म एकमेकांत मिसळत नाहीत. म्हणजे दोन रंग मिसळून जाऊन मधला रंग तयार व्हावा असे होत नाही. तर अनेक बाबतीत एकतर आईचा किंवा एकतर वडिलांचा असे गुणधर्म येतात. त्यातून हेही दिसते की काही गुणधर्म आईवडिलांत स्पष्ट दिसून येत नसले तरी ते सूप्त स्वरूपात असतात, व वेळोवेळी दिसून येतात. मेंडेलने इतरही काही महत्त्वाचे प्रयोग केले. उदारणार्थ, याच प्रकारचा, पण किंचित अधिक क्लिष्ट स्वरूपाच प्रयोग करून त्याने दोन वेगवेगळे गुणधर्म तपासले. म्हणजे रंग आणि शेंगांवर असलेल्या सुरकुत्या. त्यावरून त्याच्या लक्षात आले की हे दोन गुणधर्म एकमेकांपासून स्वतंत्र आहेत. म्हणजे रंग कुठचा आहे यावर शेंगांचे सुरकुतलेपण अवलंबून नसते.

मेंडेलच्या प्रयोगानंतर शतकाभराने, म्हणजे १९६० च्या दशकात सर्व जग उपासमारीच्या उंबरठ्यावर येऊन पोचले होते. बहुतांश आशियाई आणि आफ्रिकी देश वसाहतवादाच्या जोखडीतून नुकतेच बाहेर पडले होते. हातात राज्य आले होते पण गरीबी, अज्ञान, अनारोग्य आणि अन्नाचा तुटवडा हे प्रश्न शिल्लक होतेच. अनेक रोगांवर औषधे सापडल्यामुळे लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत होती, आणि त्याबरोबर हे प्रश्नही भयंकर होत होते. अशा वेळी अन्नोत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढवणे हा जीवनमरणाचा प्रश्न होता.

तांदूळ हे सर्वच जगाचे मुख्य अन्न. पण उंच, भरपूर पीक देणाऱ्या नवीन जाती निर्माण झाल्या होत्या, पण त्या धान्याच्या वजनाने माना टाकत. यावर उपाय म्हणून या जातींचा बुटक्या जातींशी संकर करून नवीन जात तयार करण्याचा प्रयत्न इंटरनॅशनल राइस रीसर्च इन्स्टिट्यूटने फिलिपीन्समध्ये सुरू केला. १९६२ साली ३८ वेगवेगळे संकर केलेले होते. त्यातली आठवी जात सर्वात चांगली वाटली म्हणून निवडली गेली. तीमध्ये फक्त १३० दाणे होते. या १३० दाण्यापासून कुंडीत रोपे लावली. ही पहिली पिढी - पिढी१. यातली सर्व रोपे उंच होती. ह्या पिढी१ पासून १०००० रोपे लावली. यातली एक चतुर्थांश रोपे बुटकी होती!

आपल्या मेंडेलच्या प्रयोगाप्रमाणे तंतोतंत घडलेले होते. उंचपणाचा गुणधर्म प्रभावी होता, त्यामुळे पहिल्या पिढीत सर्व उंच झाडे असली तरी त्यांमध्ये बुटकेपणाचा गुणधर्म सूप्तावस्थेत होता. पुढच्या पिढीत - पिढी२ मध्ये - जिथे दोन्ही पालकांकडून बुटकेपणाचा गुणधर्म आला तिथे ती झाडे बुटकी होती. हा एक-चतुर्थांश दिसल्यावर लगेच शास्त्रज्ञांना लक्षात आले की हा बुटकेपणाचा एक जीन आपण वेगळा करून तो एकत्र करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. या पिढी२ मधली सर्व उंच झाडे सोडून देऊन पिढी३ तयार केली गेली. यातली २९८ रोपे निवडून त्यांच्या दाण्यांपासून विशिष्ट रांगांमध्ये रोपे लावली गेली - पिढी४. यातल्या २८८ व्या रांगेतले तिसरे रोप सर्वोत्तम ठरलं, आणि त्याला नाव पडले IR8-288-3. याच रोपापासून पुढची बियाणे तयार केली गेली. हाच तो सुप्रसिद्ध IR8! यापासून खत न घालता हेक्टरला पाच टन, तर योग्य खतपाण्यानंतर हेक्टरला दहा टन पीक निघाले. त्याकाळी सर्वसाधारणपणे हेक्टरला एक टन पीक यायचे. तसंच १६० ते १७० दिवसांऐवजी १३० दिवसातच पीक मिळायला लागले. हे बियाणे जगभर फुकटात उपलब्ध करून दिले गेलं, आणि भाताच्या बाबतीत हरितक्रांती घडली.

प्रश्न विचारले, त्यांचा पाठपुरावा केला, आणि शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला की उत्तरे मिळतात. आपल्या परिसरात, आपल्या विश्वात अमुक एखादी गोष्ट का घडते हे समजून येते. आणि हे निव्वळ कोरडे ज्ञान नसते. १८६५ साली मेंडेलचा प्रयोग निव्वळ शास्त्रीय कुतुहल शमवण्याचा भाग वाटलाही असेल कोणाला. पण त्यानंतर शंभर वर्षांनी त्या छोट्याशा कल्पनाबीजापासून IR8 चे पणजोबा असलेले पहिले १३० दाणे झाले. आणि त्या १३० दाण्यांपासून जे अन्न तयार झाले त्यातून अब्जावधी लोक अन्नान्न होऊन तडफडण्यापासून वाचले. द्रौपदीच्या थाळीतून पदार्थ वाढला तरी थाळीतले अन्न संपत नाही, कितीही अतिथी आले तरी त्यांना पोटभर खाऊ घालू शकत असे अशी कथा आहे. या १३० दाण्यांच्या बाबतीत ते अक्षरशः सत्य आहे.

मी मराठी लाइव्हवर पूर्वप्रकाशित

हे ठिकाणविचार

प्रतिक्रिया

भंकस बाबा's picture

21 Jan 2016 - 8:31 am | भंकस बाबा

उत्तम

वा! छान लिहिलेय. द्रौपदीच्या थाळीची उपमा आवडली.

वाह.. क्या बात है. मस्त.

तुषार काळभोर's picture

21 Jan 2016 - 11:20 am | तुषार काळभोर

शेवटून दुसरा परिच्छेद अतिशय रोमांचक!

आपल्या मेंडेलच्या प्रयोगाप्रमाणे तंतोतंत घडलेले होते. उंचपणाचा गुणधर्म प्रभावी होता, त्यामुळे पहिल्या पिढीत सर्व उंच झाडे असली तरी त्यांमध्ये बुटकेपणाचा गुणधर्म सूप्तावस्थेत होता. पुढच्या पिढीत - पिढी२ मध्ये - जिथे दोन्ही पालकांकडून बुटकेपणाचा गुणधर्म आला तिथे ती झाडे बुटकी होती. हा एक-चतुर्थांश दिसल्यावर लगेच शास्त्रज्ञांना लक्षात आले की हा बुटकेपणाचा एक जीन आपण वेगळा करून तो एकत्र करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. या पिढी२ मधली सर्व उंच झाडे सोडून देऊन पिढी३ तयार केली गेली. यातली २९८ रोपे निवडून त्यांच्या दाण्यांपासून विशिष्ट रांगांमध्ये रोपे लावली गेली - पिढी४. यातल्या २८८ व्या रांगेतले तिसरे रोप सर्वोत्तम ठरलं, आणि त्याला नाव पडले IR8-288-3. याच रोपापासून पुढची बियाणे तयार केली गेली. हाच तो सुप्रसिद्ध IR8! यापासून खत न घालता हेक्टरला पाच टन, तर योग्य खतपाण्यानंतर हेक्टरला दहा टन पीक निघाले. त्याकाळी सर्वसाधारणपणे हेक्टरला एक टन पीक यायचे. तसंच १६० ते १७० दिवसांऐवजी १३० दिवसातच पीक मिळायला लागले. हे बियाणे जगभर फुकटात उपलब्ध करून दिले गेलं, आणि भाताच्या बाबतीत हरितक्रांती घडली.

सतिश गावडे's picture

21 Jan 2016 - 11:21 am | सतिश गावडे

जेनेटीक्स समजून घेण्यासाठी मेंडेलच्या प्रयोगाची पारायणे केली होती. मात्र त्याचा भातशेतीमध्ये व्यवहारी वापर झाला आहे हे माहिती नव्हते.

असंका's picture

21 Jan 2016 - 11:36 am | असंका

प्रश्न विचारले, त्यांचा पाठपुरावा केला, आणि शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला की उत्तरे मिळतात.

वा!! सुंदर!

अर्धवटराव's picture

21 Jan 2016 - 1:59 pm | अर्धवटराव

एक्झॅक्ट १/४ रोपं पिवळी का निपजली हे नाहि कळलं. डॉमीनंट्+रिसेसीव्ह च्या दोन जोड्यांचा संकर केला तर सतत डॉमीनंट गुणच प्रभावी ठरण्याची शक्यता नाहि का? नेमकं २५% संततींमधे रिसेसिव्ह गुण का आला?

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Jan 2016 - 2:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमच्या प्रश्नाचे उत्तर लेखतल्या खालील परिच्छेदात आहे:

आता आईकडून कुठचातरी एक आणि वडिलांकडून कुठचा तरी एक असा गुणधर्म पुढच्या पिढीत जात असेल तर त्यांची चार संतती पुढीलप्रमाणे असेल. हि. हि, हि. पि., पि. हि., आणि पि. पि. हिरवा प्रभावी असल्यामुळे पहिले तीन हिरवेच होणार मात्र चौथ्यात दोन्ही पिवळे असल्यामुळे त्याच्या शेंगा पिवळ्या दिसतात. चारऐवजी जर शेकडो संतती असतील तर सरासरी एक चतुर्थांश झाडांना पिवळ्या शेंगा दिसतील.

अर्धवटराव's picture

22 Jan 2016 - 1:15 am | अर्धवटराव

सगळ्या हि-पि अपत्यांमधे पिवळ्या शेंगा येण्याची प्रॉबॅबीलिटी जर केवळ २५% टक्के असेल तर सरासरी १/४ झाडांना पिवळ्या शेंगा का येत असाव्या ? नॅचरल सिलेक्शन होताना २५% प्रॉबॅबिइटी सरासरी १/४ शी मॅच करावी हे थोडं अजब वाटतं ना??

राजेश घासकडवी's picture

22 Jan 2016 - 1:23 am | राजेश घासकडवी

इथे थोडं स्पष्टीकरण आवश्यक आहे.
पिढी पहिली - प्यूअर हिरव्या आणि पिवळ्यांची मुलं. त्या सर्वांत एक हिरवं एक पिवळं अशी जनुकं असतात. ती सगळी हिरवी दिसणार, कारण हिरवा जीन डॉमिनंट आहे.
पिढी दुसरी - या मुलांचा एकमेकांशी संयोग केला की आई आणि वडील या दोघांमध्ये एक हिरवं एक पिवळं असणार. त्यामुळे जर त्यांच्यापासून शंभर मुलं जन्माला घातली तर त्यातल्या फक्त पंचवीसांमध्येच दोन्ही पिवळे असणार. त्यामुळे सुमारे ७५ हिरवी आणि पंचवीस पिवळी दिसतील. (खाली ऑर फंक्शनचं ट्रुथ टेबल दिलेलं आहे त्यात १ म्हणजे हिरवा आणि ० म्हणजे पिवळा असं समजावं).

पण का?
तेव्हढं सुद्ध नको ना. तिसर्‍या पिढीतल्या प्रत्येक अपत्यामधे पॅरेण्ट्सकडुन गुणसुत्र उचलण्याची प्रॉबॅबिलिटी इंडीव्हिज्युअली अप्लाय होईल. प्रत्येकाला १-१ हिरवा आई-वडिलांपासुन १-१ पिवळा परत त्याच आईवडिलांपासुन आला असेल. त्याच्या भावंडाने कुठले गुण उचलले याच्याशी काहिही कर्तव्य नसेल. उपलब्ध चार गुणांपैकी कुठला रंग दाखवायचा याचा निर्णय प्रत्येक शेंग स्वतंत्र घेईल. आणि तिथे ७५% शक्यता हिरव्या रंगाची असेल. त्यामुळे सरासरी २५% पिवळा येणं कठिण असावं ??

राजेश घासकडवी's picture

21 Jan 2016 - 5:12 pm | राजेश घासकडवी

ते थोडंसं ऑर फंक्शनसारखं असतं.

१ ऑर ० = १,
० ऑर १ = १
१ ऑर १ = १
० ऑर ० = ०

म्हणजे आईवडिलांपैकी ते जनुक आलं तर दोन्हीकडून ० येईल तेव्हाच उत्तर ० येतं. हे रॅंडमली होत असेल तर २५% बाबतीत शून्य (रिसेसिव्ह गुण) दिसून येईल.

अर्धवटराव's picture

22 Jan 2016 - 1:18 am | अर्धवटराव

पण ऑर गेट चे इन्पुट्स नॅचरल सिलेक्शन ने होत आहेत, टॅब्युलर डाटाप्रमाणे नाहि. प्रत्येक अपत्यामधे इंडीव्हिज्युअली तीन वि. एक असा सामना असेल तर बहुतेक वेळा तीन ने जिंकायला हवं... सरासरी २५% का येते आहे?

याची निगेटिव्ह साईड नाही का काहीच? फेवरेबल पीक आलं हे उत्तमच. पण काही इतर गुण,क्षमता वगैरे नाहीश्या होणं, काही छुपे अवगुण वाढीस लागणं किंवा परतीची वाट नाहीशी होणं असं काही संभव कितपत?

राजेश घासकडवी's picture

21 Jan 2016 - 5:28 pm | राजेश घासकडवी

प्रत्येकच गोष्टीचे काही ना काही निगेटिव्ह साइड इफेक्ट्स असतात. शंभर रुपये पॉझिटिव्ह मिळण्यासाठी आपण दोनपाच रुपये खड्ड्यात जायला तयार असतो. मात्र या बाबतीत बिलियन लोकांना अन्न पुरवण्याच्या पॉझिटिव्हच्या तुलनेत अगदीच नगण्यही निगेटिव्ह माझ्या एेकिवात नाहीत. नाही म्हणता त्या काळात डीडीटीचा अतिरेकी वापर केला गेला, त्याचे काही वाईट परिणाम झाले हे ऐकून आहे.

परतीची वाट नाहीशी झालेली आहेच. आताच्या काळात जुनी बियाणं लावून हेक्टरी एक टन उत्पादन परवडणारं नाही. त्यामुळे नवीन तांदळांंत जे काही बरंवाईट आहे ते स्वीकारणं भाग आहे.

मराठी कथालेखक's picture

21 Jan 2016 - 3:34 pm | मराठी कथालेखक

लेख मस्त आहे.
पण कहीतरी गडबड होते आहे.
मागच्या लेखात,

१९६० साली इंडियन राइस रीसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना झाली. संशोधनासाठी जगभरातून हजारो जाती मागवण्यात आल्या. त्यांमधले सर्वोत्तम गुणधर्म असलेल्या जाती शोधणे, त्यांच्यात संकर घडवून आणणे आणि त्यांचा अभ्यास करून योग्य ते गुणधर्म असलेली भारताच्या भौगोलिक परिस्थितीत टिकून राहील अशी जात शोधून काढणे हे कर्मकठीण काम होते. सुदैवाने त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि IR8 नावाची जात जन्माला आली.

यावरुन IR8 भारतात जन्माला आली असे वाटले (अर्थातच अभिमानाने छाती फुगून आली) पण आता तुम्ही फिलिपिन्स म्हणत आहात...

राजेश घासकडवी's picture

21 Jan 2016 - 5:07 pm | राजेश घासकडवी

माफ करा, त्या लेखात मी चुकीचा फुलफॉर्म वापरला. गोंधळ होण्याचं कारण असं की हरितक्रांतीसाठीच्या संशोधनाला भारतात सुरूवात झाली. १९४९ साली कटकमध्ये युनायटेड नेशन्सतर्फे एक बियाणं सुधार कार्यक्रम हाती घेतला गेला होता. त्यातही अशाच प्रकारचं संशोधन झालं होतं. त्यात भारतीय शास्त्रज्ञांना एडिटी-२७ आणि महसुरी अशा दोन जाती निर्माण करण्यात यश आलं होतं. हरितक्रांतीचा पहिला टप्पा एडिटी-२७ वर पार पडला. त्यामुळे हरितक्रांतीच्या कथेची सुरूवात भारतात झाली आणि पुढचा प्रवास फिलिपीन्समध्ये झाला असं म्हटलं जातं.

मराठी कथालेखक's picture

21 Jan 2016 - 7:12 pm | मराठी कथालेखक

स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद.
एडिटी-२७ मध्येही इतक (पाच टन प्रति हेक्टर) उत्पादन मिळायचं का ?
आणि आता आपण जे सहसा पहातो ते बासमती, इंद्रायणी, HMT हे सगळे ir8 वरुन पुढे विकसित झालेत का ?

त्यामुळे हरितक्रांतीच्या कथेची सुरूवात भारतात झाली आणि पुढचा प्रवास फिलिपीन्समध्ये झाला असं म्हटलं जातं.

हुश्श..छाती पुन्हा थोडी फुगली

मराठी कथालेखक's picture

21 Jan 2016 - 7:25 pm | मराठी कथालेखक

एकंदरीत असं म्हणता येईल का की तांदळाच्या कोणत्यातरी मूळ जातीत भरपूर उत्पादनाची क्षमता होती मात्र त्याचवेळी ती झाडे उंच असल्याने माना टाकत आणि क्षमता असूनही जास्त उत्पादन घेता येत नसे.
कारण "भरपूर उत्पादनाची" क्षमता मूळात कुठेतरी असल्यानेच पुढे संकरित जातीत आणता आली असेल ना ? कारण थेट जनुकीय फेरफार त्यावेळी तरी होत नसावे.
तसेच आता प्रयोगशाळेत थेट जनुकीय फेरफार शक्य असल्याने probability theory वर अवलंबून राहण्याची गरज कमी झाली असेल ना ?

मेंडेलच्या प्रयोगामुळे हे सिद्ध झाले की संततीमध्ये जाताना, आईवडिलांचे गुणधर्म एकमेकांत मिसळत नाहीत. म्हणजे दोन रंग मिसळून जाऊन मधला रंग तयार व्हावा असे होत नाही. तर अनेक बाबतीत एकतर आईचा किंवा एकतर वडिलांचा असे गुणधर्म येतात.

एक पाश्चात्य विनोद आठवला.
एका कुणा अत्यंत हुशार पण कुरुप अशा लेखकाला एका अतिशय सुंदर तरुणीने लग्नाची मागणी घातली , ती म्हणाली "आपण लग्न करुया. आपल्याला होणारी मुले माझ्यासारखी सुंदर आणि तुमच्यासारखी बुद्दिमान असतील." त्यावर हजरजबाबी लेखकाने उत्तर दिले "पण त्याऐवजी ती माझ्यासारखी कुरुप आणि तुझ्यासारखी निर्बुद्ध झालीत तर ?"

मराठी कथालेखक's picture

21 Jan 2016 - 7:28 pm | मराठी कथालेखक

पुढे जावून गहू, तांदूळ वा इतर धान्ये यांचा आपसात संकर झाला तर ?
कदाचित एकच धान्य (वा पदार्थ) खावून आपल्याला आवश्यक ती अनेक जीवनसत्वे, कर्बोदके, प्रथिने ई मिळू शकतील.
मला वाटतय तो दिवस पण फार दूर नाही.

टिवटिव's picture

22 Jan 2016 - 2:22 am | टिवटिव

छान लेख !!

प्रचेतस's picture

22 Jan 2016 - 6:09 pm | प्रचेतस

उत्कृष्ट लेख.
प्रतिसादांमधली चर्चा पण आवडली.

लेखमाला सुरेख सुरु आहे.

याची निगेटिव्ह साईड नाही का
गवि - Thu, 21/01/2016 - 14:09
याची निगेटिव्ह साईड नाही का काहीच? फेवरेबल पीक आलं हे उत्तमच. पण काही इतर गुण,क्षमता वगैरे नाहीश्या होणं, काही छुपे अवगुण वाढीस लागणं किंवा परतीची वाट नाहीशी होणं असं काही संभव कितपत?

ह्याबद्दल बोलावंसं वाटलं.
काही दिवसांपूर्वी एका संस्थेबद्दल ऐकलं होतं.
मधुमेह /डायबेटिस हा पूर्ण परतावून लावता येउ शकतो; मधुमेहाच्या गोळ्या किम्वा इन्शुलिन इंजेक्शन जे घेतात त्यांचं इंजेक्शन घेणं पूर्णतः थांबवता येउ शकतं; असे दावे संस्थेनं केले.
हे सरळ सरळ "आल्टरनेट मेडिसिन " म्हणता यावं असं होतं. म्हणजे "मॉडर्न मेडिसिन" मध्ये (तथाकथित "अ‍ॅलोपथी" मध्ये ) मध्ये कदाचित बसणार नाही. त्यांनी कित्येक पेशण्ट्स बरे झाल्याचे दावे केले. त्यांनी चक्क जी टी टी -- ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट मध्ये सुद्धा यश मिळवलं. ही टेस्ट म्हणजे ऑल्मोस्ट मधुमेह पूर्णतः परतवल्याची पावती असते. सुमारे ( तब्बल) पंधरा एक चमचे साखर खायला साम्गतात; त्यानंतर दोन तासानं रक्तातली साखर वगैरे तपासतात . तर अशा ह्या टेस्टमध्ये हे लोक यशस्वी झाले.
.
.
ह्यातून मला मिपा आणि उपक्रमावर लिहिलेली नरेंद्र गोळे ह्यांची लिहिलेली मालिका आठवली. त्यांनी हृदयविकार की हाय ब्लड प्रेशर कसे पूर्णतः परतवून लावले ; ह्याबद्दल त्यात लिहिले होते. सहसा ब्लड प्रेशर व डायबेटिस एकदा मागे लागले की जन्मभर तस्सेच राहणार अशीच मानसिकता दिसते. असो. तो मूळ मुद्दा नाही.
.
.

ह्या थेरपी मध्ये बर्‍याच गोष्टी अंतर्भूत आहेत.
त्यांच्या दाव्यांवर विश्वास ठेवणं कठीण होतं.
त्यातील एक महत्वाचा मुद्दा होता; आप्ण खात असलेल्या गव्हाचा वापर संपूर्णतः बंद करणे.
त्याऐवजी "खपली गहू" म्हणजेच " लाँग व्हीट " वापरणे.
सध्या रुढार्थाने आपण सगळे जो गहू खातो;
तो बाय डिफॉल्ट हरित क्रांतीतून आलेला गहू आहे . भरपूर उत्पादन क्षमता असणे , कमी पाणी लागणे ; कापणी वगैरे सोयीची असणे; अशा कारणातून ह्या हरित क्रांतीनंतरच्या हायब्रीड गव्हाचा प्रसार झाला .
त्यापूर्वी बाय डिफॉल्ट गहू म्हणजे खपली गहू असेच समीकरण होते.
तो गहू आज अत्यल्प ठिकाणी मिळतो. प्रचंड शोध घेतल्यानंतर आख्ख्या पुण्यात फक्त दोन किंवा तीन दुकाने साप्डली. अगदि कोपर्‍यावरच्या मारवाडी दुकानांपासून ते मोठ्या मंडईपर्यंत सर्वत्र शोधले. तीन शे चारशे दुकानं पालथी घातली असतील.
अर्थात काही नेहमीचे आक्षेप म्हणजे संस्था कशाच्या ओरावर दावे करते आहे; वगैरे म्हणता येइल.
तर त्यासाठी त्यांनी आधुनिक विज्ञानाल मान्य होतील असा सांख्यिकीय डेटा जमवायला सुरुवात केलेली आहे. मला ह्याबद्दल समजलंं; तेव्हा माझ्या एका परिचित मधुमेहिंना मी ह्याबद्दल सांगितलं.
त्यांचाही विश्वास बसेना. दाव्यातील सत्यता पडताळण्यासाठी ह्याचा कुणी लाभ घेतला आहे का; हे आम्ही शोधू लागलो. मिपाचेच एक माजी संपादक ह्याचा अनुभव घेतलेले आहेत; असे समजले.
ते दहाहून अधिक वर्शे इन्शुलिन घेत होते; इतका त्यांना प्रॉब्लेम होता.
ह्या थेरपीचे कडक पालन केल्याने दोनेक महिन्यात त्यांचे इन्शुलिन पूर्णतः थांबले.
आणी लवकरच गोळ्याही थांबल्या.
.
.
मी परिचिताला ह्याबद्दल ( मिपाच्या माजी संपादकांच्या अनुभवाबद्दल) सांगितलं.
परिचितांनी थेरपी सुरु केली. परिचितांना मधुमेह होउन दोनेक वर्षे झाली होती.
आता त्यांचा मधुमेह ऑल्मोस्ट गेल्यात जमा आहे. ( HBA1C 6.1 आलेली आहे.)
तर मी ज्या संस्थेबद्दल बोलत होतो तिची अधिक माहिती इथे मिळेल :-
http://www.freedomfromdiabetes.org/Program
.
.
ह्या संस्थेतील लोक नवीन काहीही सांगत नाहियेत. त्यांचे बहुतांश उपाय हे नील बर्नार्ड ह्या शास्त्रज्ञाच्या संशोधनावर आधारित आहेत. फक्त त्या़ंनी त्याचं भारतास / भारतीयांस अधिक अनुकूल असं रुपडं बनवलय.
नील बर्नार्ड ह्यांची अधिक माहिती :-

https://en.wikipedia.org/wiki/Neal_D._Barnard
.
.
काही प्रमाणात Dean Michael Ornish ह्यांचीही स्कूल ऑफ थॉट्स हे लोक आचरीत असल्याचं दिसलं
.
.
नवीन मिळणारी हल्लीची कोणतीही प्रजाती लोकवन असो किम्वा अजून कोणतीही ; ही मुळात अस्सल स्थानिक, भारतीय पारंपरिक प्रजाती नाहिये म्हणे. हायब्रीड आहे.
तर ह्या हायब्रीड मध्ये काही त्रासदायक असे गुणधर्म आलेत (किंवा उपयुक्त गुणधर्म त्यातून निघून गेलेत) .
ह्या हरवलेल्या गुणधर्मांमुळे सगळ्यांना नव्हे; पण कित्येकांना मधुमेहाचा धोका कैकपट वाढलाय.
.
.
प्लीझ नोट:-

१. हा प्रकार सध्या मेनस्ट्रिम मध्ये नाहिये; आधुनिक वैद्यकशास्त्र नाहिये; असे म्हणणे असेल तर ते मान्य आहे. आधुनिक वैद्यकास मान्य होण्यासाठी कित्येक निकष असतात; त्यातला सांख्यिकीय निकष, प्लासिबो बरोबर तुलना वगैरे सगळ्याची कल्पना आहे.
"फ्रीडम फ्रॉम डडायबेटिश्या संस्थेतली लोकं; आधुनिक वैद्यकास ( अ‍ॅलोपथीस) मान्य होइल अशी रचना , रिसर्च पेपर बनवत आहेतच. सर्व रुग्णांची माहिती; मेडिकल रिपोर्ट्स ते जमवताहेत.
.
.
२. हे सगळं सांगतोय म्हणजे हरित क्रांती ; हायब्रीड, नॉर्मन बॉरलॉग वगैरेंना नाकारत नाहिये. तातडीचा, महत्वाचा प्रश्न हा अन्न/भूक हा आहेच; हे मी जाणतो. खरं तर बोरलॉग, हरित क्रांती वगैरेला माझ्या
सर्टिफिकेटचीही गरज नाहिये; फक्त मी भ्रमात नाहिये; इतकच सांगायचं आहे.
(खपली गहू हा सामान्य गव्हाच्या चौपट ते पाचपट किमतीस मिळतो; ह्यावरुन काय तो अंदाज बांधावा.)

मराठी कथालेखक's picture

14 Mar 2016 - 3:04 pm | मराठी कथालेखक

मला वाटते हायब्रीड जाती ज्या मूळ जातींपासून विकसित झाल्यात त्या पुर्णपणे नष्ट होवू देवू नये. तसेच त्या जातीच्या मुळ गुणधर्माची , वैशिष्ट्यंआची चाचणी होत राहणे आवश्यक आहे असे मला वाटते.
म्हणजे कालांतराने संशोधनातून , अनुभवांतून , सांख्यिकीतून मूळ जाती तसेच संकरित जातींचे गुण्/अवगूण समोर आल्यास पुन्हा काही प्रयोग करुन संकरित जाती अधिक सुधारता येतील.
प्रत्येक देशाने आपल्या मुख्य पिकांच्या पारंपारिक जाती निदान काही एकरांवर जतन करीत रहाणे शहाणपणाचे ठरेल.