✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

विश्वाचे आर्त - भाग १ - काळाचा आवाका

र
राजेश घासकडवी यांनी
गुरुवार, 12/03/2015 - 18:57  ·  लेख
लेख
(वैज्ञानिक संकल्पनांवर सरळसोप्या भाषेत भाष्य करण्यासाठी ही लेखमाला सुरू केलेली आहे) कधीतरी एखाद्या शांत, स्वच्छ रात्री; शहराच्या प्रकाश प्रदूषणापासून दूर कुठेतरी आकाशात पाहिलं की अक्षरशः अगणित तारे दिसतात. मंदपणे लुकलुकणारे, स्थिर. आणि त्या क्षणात आत्तापर्यंत जन्माला आलेल्या जवळपास प्रत्येक मनुष्यप्राण्याशी आपण जोडले जातो. याच किंवा अशाच आकाशावर त्यांनीही आपले डोळे रोखलेले होते. कोणी तारकांच्या समूहात व्याधांची आणि हरणांची चित्रं पाहिली, कोणी त्यांचा वापर करून जहाजांमधून दर्यावर हुकुमत मिळवत नवीन प्रदेश धुंडाळले, कोणी त्या चांदण्याला कवितेत बांधलं तर कोणी त्यांची निरीक्षणं करून पंचांगं तयार केली, तर बहुतेक इतरांनी जमिनीला पाठ लावल्यावर झोपेच्या अधीन होण्याआधी डोळे भरभरून हे तारे पाहिले. प्रत्येकालाच या अथांग आकाशाने कधी ना कधी मंत्रमुग्ध केलं हे निश्चित. पूर्वी अनेकांची समजूत होती की देवाने माणसाला प्रकाश मिळावा म्हणून चंद्र-सूर्य तयार केले आणि आकाशाचं छप्पर त्यावर बांधलं. त्या छपराला पडलेल्या भोकातून त्या पलिकडचा स्वर्गीय प्रकाशच लुकलुकतो जणू. पण आता आपल्याला माहीत आहे की हे लुकलुकणारे ठिपके म्हणजे आपल्या सूर्यासारखेच तारे आहेत. काही ठिपके तर आपल्या आकाशगंगेप्रमाणे इतर दीर्घिका आहेत. त्यांमध्ये अब्जानुअब्ज तारे आहेत. किती तरी ताऱ्यांभोवती पृथ्वीसारखे ग्रह आहेत. आणि कुणास ठाऊक, त्यांतल्या अब्जावधी ग्रहांवर आपल्यासारखेच जीवही असतील. हा महाप्रचंड पसारा पाहिल्यावर आपल्याला अनेकदा आपल्या लहानपणाची जाणीव होते. मी, माझं विश्व, माझे त्रास, माझे प्रश्न, माझे आनंद, माझी दुःखं - ही सगळी मला मोठी वाटतात. पण अब्जावधी प्रकाशवर्षांच्या महाप्रचंड विश्वात आपण म्हणजे कःपदार्थ! हा स्वतःच्या क्षुद्रतेचा विचार काहीसा धक्का देणारा असतो. पण त्याच धक्क्यामध्ये आपलं मीपण सांडवून टाकून देण्याची क्षमता आहे. वैज्ञानिक लोक कदाचित विश्व नक्की किती मोठं आहे हे गणितं करून सांगू शकत असतील. पण आपल्या डोळ्यांसाठी ते अनंतच दिसतं. या अनंतात एक क्षणभर का होईना, विलीन होणं हे सुखद असतं. अवकाशाचा आवाका जसा महाप्रचंड आहे तसाच काळाचाही. आपण जन्मतो आणि ऐशी-शंभर वर्षं जगतो. आपल्या आजीआजोबांविषयीची माहिती आपल्याला त्यांच्या तोंडून कळते. त्याआधीचा इतिहास आपण पुस्तकांमधून वाचतो, सिनेमांमधून पाहातो. पण हजार दोन हजार वर्षं मागे जायला लागलं की इतिहासही अंधूक, धूसर व्हायला लागतो. आणि तेही समजण्यासारखं आहे. माणूस ज्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून जन्माला आला, त्या प्रक्रियेचा हा परिणाम आहे. जगण्यासाठी त्याला काल, परवा, आत्ता, या क्षणी, गेल्या मिनिटात, काय झालं एवढंच जाणून घेणं आवश्यक असतं. एखाद्या गोष्टीचे परिणाम शंभर वर्षांनी काय होतील याची पर्वा करण्याची गरज नसते, उपयोगही नसतो. तसंच शंभर वर्षांपूर्वी, हजारो वर्षांपूर्वी काय झालं ज्यामुळे आजच्या क्षणीचं सत्य समोर दिसतं आहे, हेही समजून घेण्याची गरज नसते. त्यामुळे आपली काळाची जाण ही सेकंद-मिनिट-तासावर अधिक असते. दिवस-महिना-वर्षाच्या गोष्टीही जाणून घेऊ शकतो. पण त्या जाणीवांना तितकी धार नसते. दशकं-शतकं-सहस्रकांची तर बातच सोडा. ताऱ्यांकडे पाहाताना जशी दृष्टी तोकडी पडते, तशीच अतिप्राचीन काळाकडे मागे वळून पाहातानाही आपली जाणीव थिटी पडते. अतिप्राचीन म्हणजे नक्की किती प्राचीन? या विश्वाचाच जन्म सुमारे चौदा अब्ज वर्षांपूर्वी झाला. पृथ्वीचा जन्म सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी झाला. मनुष्याचे जवळचे जातभाई सुमारे वीस लाख वर्षांपूर्वी पृथ्वीतलावर अवतरले. आणि आपला ज्ञात इतिहास आहे काही हजार वर्षांचा. अब्ज, कोटी, लाख, हजार - नुसते कोरडे आकडे बनतात. इतक्या मोठ्या आकड्यांनाही आपल्याला सहजपणे गवसणी घालता येत नाही. एकावर तीनचार पलिकडे शून्यं पडली की 'खूप खूप' पलिकडे समजण्यासाठी आपल्याला गणितं करावी लागतात. त्यापेक्षा आपण एक डोळ्यासमोर प्रतिमा उभी करू. कल्पना करा की तुम्ही दोन्ही हात पसरून उभे आहात. तुमची पसरलेली एक वाव म्हणजे आत्तापर्यंत पृथ्वीवर गेलेला एकंदरीत काळ. तुमच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाचं टोक म्हणजे पृथ्वीचा जन्म. शून्य वर्ष. आणि उजव्या हाताच्या मधल्या बोटाचं टोक म्हणजे आत्ताचा क्षण. या कवेत तुम्ही पृथ्वीचं आख्खं आयुष्य सामावून घेत आहात. या हातावर मनुष्यप्राणी नक्की कुठे आहे? असं विचारणं म्हणजे 'या महाप्रचंड अवकाशात आपण नक्की कुठल्या कणावर आहोत?' असं विचारण्यासारखंच. आपण प्रयत्न करून पाहू. तुमच्या डाव्या हाताच्या मनगटापर्यंत संपूर्ण अंधार आहे. त्या पहिल्या सुमारे पन्नास कोटी वर्षांआधीचं आपल्याला काहीच माहीत नाही. आपल्याला माहीत असलेले सर्व दगड त्यानंतरचे आहेत. तुमचं मनगट आणि कोपर यामध्ये कुठेतरी अगदी साधे, आदीम जीव पृथ्वीवर अवतरले. हे सर्व जीव एकपेशीय होते. आणि पुढच्या काहीशे कोटी वर्षांपर्यंत सगळी जीवसृष्टी एकपेशीयच होती. तुमच्या डाव्या खांद्याच्या आसपास कधीतरी वातावरणात ऑक्सिजनची वाढ व्हायला लागली. आणि त्याचबरोबर एकपेशीय जीवांची सद्दी संपण्याचे दिवस सुरू झाले. पण तरी हे ताबडतोब झालं नाहीच. पृथ्वीच्या आयुष्याचा विचार करताना तसंही 'ताबडतोब' काहीच होत नाही. त्यानंतर शंभरेक कोटी वर्षांनी, तुमच्या डोक्यापलिकडे, उजव्या खांद्याच्या आसपास पृथ्वीला द्विपेशीय जीवांचं दर्शन झालं. एकदा दोन पेशींचे जीव तयार झाल्यानंतर मग पुढच्या उत्क्रांतीने काहीसा 'वेग' पकडलेला दिसतो. उजव्या कोपराच्या थोडं पुढे, म्हणजे पुन्हा साधारण शंभरेक कोटी वर्षांनी आपल्याला आपल्याला काही जटिल जीवांचे पुरावे मिळतात. पण तुम्ही जोपर्यंत मनगटांपर्यंत येत नाही तोपर्यंत कुठल्याच जीवाला हाडं, कवच, दात वगैरेंप्रमाणे कठीण भाग तयार झालेले दिसत नाहीत. तसं झाल्यानंतरच अश्मीभूत झालेले जीवनाचे स्पष्ट ठसे आपल्याला सापडतात. मधल्या बोटाची पहिली दोन पेरं म्हणजे डायनोसॉरचा कालखंड. उरलेलं पेर म्हणजे त्यानंतरची साडेसहा कोटी वर्षं. त्यानंतर माणूस कधी आला? सुमारे साठ ते सत्तर लाख वर्षांपूर्वी मानवाचा मूळ पूर्वज पृथ्वीवर वावरत होता. हा प्राणी दोन पायांवर चालण्याचा प्रयत्न करत असे. चिंपांझी किंवा गोरिलांप्रमाणे चालताना हाताची मूठ टेकवून चालत असे. त्याच सुमाराला दोन पायांवर चालणारे आणि हाताच्या मुठींचा वापर करत चालणारे चिंपांझी-गोरिलासारखे प्राणी यांच्या वंशवृक्षाच्या फांद्या वेगळ्या झाल्या. त्यानंतर द्विपादांची फांदी ऑस्ट्रॅलोपिथेकस, आणि होमो इरेक्टस, होमो सेपिअन्स अशा पायऱ्यांनी पुढे गेली. आपण पसरलेल्या काळाच्या वावेत हे अंतर किती आहे? सुमारे सत्तर लाख वर्षं म्हणजे आपल्या बोटाच्या पेराचा एक दशांश भाग. त्यानंतर आलेले होमो सेपिअन काही लाख वर्षांपूर्वीचे, साधारण पंधरा दिवस वाढलेल्या, आता कापायला झालेल्या नखाइतकं अंतर व्यापतात. आणि आपल्याला माहीत असलेला लिखित इतिहास? शेतीप्रधान संस्कृतीनंतरचा इतिहासच आपल्याला वेगवेगळ्या संस्कृती म्हणून ठाऊक आहे. या संस्कृतीत काय येत नाही! हराप्पा-मोहेंजोदारो, इजिप्तचे पिरॅमिड, बाबिलोनियन सुमेरियन संस्कृती, महाभारत-रामायणांसारखी महाकाव्यं, सिकंदर-पोरसाची लढाई, येशू-बुद्ध-पैगंबरांचे धर्म, चेंगीझ खान-हिटलरसारखे क्रूरकर्मा आणि त्यांची युद्धं सगळं काही येतं. ज्ञात-अज्ञात अशा अब्जावधी लोकांची आयुष्यं, त्यांची सुखं-दुःखं, त्यांनी जीवनाशी दिलेले लढे, त्यांचे लहानमोठे जय-पराजय... अब्जावधी आयांनी आपल्या मुलांना दिलेले जन्म आणि सोसलेल्या वेदना, जोपासलेल्या आशा, त्यांची फळलेली किंवा विझलेली स्वप्नं... एवढा महाप्रचंड आवाका या काळाच्या कवेत कुठे बसतो? तुमच्या किंचित वाढलेल्या नखाकडे पाहा. आता ते नख भिंतीवर थोडं घासा. नखाचे काही कण निश्चितच भिंतीला चिकटले असतील. तुमच्या नखाची लांबी किंचित कमी झाली. काळाच्या कवेच्या तुलनेत मनुष्याच्या इतिहासाची आणि संस्कृतीची लांबी एवढीच आहे. आपल्या केसाच्या जाडीच्या सुमारे एक शतांश! आपल्या आकाशगंगेत दहाहजार कोटी तारे आहेत, अशा अब्जावधी आकाशगंगा आहेत... कित्येक ताऱ्यांभोवती ग्रह फिरतात... त्या ग्रहांवरही कदाचित सृष्टी असेल, त्यांच्यातही आपल्यासारखे प्रगत जीव असतील. त्यांचेही इतिहास कदाचित असेच समृद्ध असतील. कदाचित त्यांचेही इतिहास अशाच नखाच्या टोकांवर मावणारे असतील. त्यांनाही त्या नखाच्या टोकावरच्या कणाच्याही कणात आपलं आयुष्य मर्यादित करण्याची सवय असेल. आपण आपलं आयुष्य असं कणात व्यतित करतोच. पण याचा अर्थ असा नाही की तो आपला लहानगा कप्पा सोडून इतर विश्व तपासून पाहूच नये. आपण लहान आहोत, क्षुद्र आहोत म्हणून इतक्या भव्य दिव्यतेकडे डोळे उघडून पाहूच नये असं नाही. किंबहुना या विराट विश्वाकडे पाहून त्यातल्या प्रत्येक कणाच्या वेगळेपणातून आपण थक्क व्हायला हवं. आपल्या मर्यादित कणाच्या मर्यादित अवकाशात डोळ्यांवर झापड लावून बसलो, तर या आनंदाला आपण मुकून जाऊ. कणाकणाने का होईना, पण या विश्वरूपाचं आपण दर्शन घेण्याचा प्रयत्न करायला हवा. या काळाच्या विशाल कवेत आपला कण सामावून देऊन त्याला आपले हात पसरून मिठी मारायला हवी. (मी मराठी लाइव्हवर पूर्वप्रकाशित)
  • विश्वाचे आर्त - भाग १८ - गुरुत्वीय लहरी
  • विश्वाचे आर्त - भाग १९ - कार्बन डेटिंग
  • विश्वाचे आर्त - भाग २ - नासदीय सूक्त
  • विश्वाचे आर्त - भाग २० - उत्क्रांतीचे पुरावे - भूस्तरीय अवशेष
  • विश्वाचे आर्त - भाग ३ - अस्तिस्तोत्र
  • विश्वाचे आर्त - भाग ४ - उत्क्रांतीचे उत्तर
  • विश्वाचे आर्त - भाग ५ - कोंबडी आधी की अंडं आधी
  • विश्वाचे आर्त - भाग ६ - जंबोजेट दृष्टान्त
  • विश्वाचे आर्त - भाग ७ - 'अ'चेतनापासून 'स'चेतनापर्यंत
  • विश्वाचे आर्त - भाग ८ - रेणूंपासून पेशींपर्यंत
  • विश्वाचे आर्त - भाग ९ - अनैसर्गिक निवड
  • विश्वाचे आर्त - भाग १० - नैसर्गिक निवड
  • विश्वाचे आर्त - भाग ११ - सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट
  • विश्वाचे आर्त - भाग १२ - सामाजिक डार्विनवाद
  • विश्वाचे आर्त भाग १३ - 'आहे' आणि 'असावं'
  • विश्वाचे आर्त - भाग १४ - उत्क्रांती आणि हरितक्रांती
  • विश्वाचे आर्त - भाग १५ - १३० दाण्यांची द्रौपदीची थाळी
  • विश्वाचे आर्त - भाग १६ - जीएमओ एक तोंडओळख
  • विश्वाचे आर्त - भाग १७ - डीएनए एक तोंडओळख

Book traversal links for विश्वाचे आर्त - भाग १ - काळाचा आवाका

  • विश्वाचे आर्त - भाग १८ - गुरुत्वीय लहरी ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
48675 वाचन

💬 प्रतिसाद (137)

प्रतिक्रिया

या लेखमालेतले पहिल्या दोनतीन

राजेश घासकडवी
गुरुवार, 12/03/2015 - 19:05 नवीन
या लेखमालेतले पहिल्या दोनतीन प्रास्ताविक लेखांनंतर बरेच लेख उत्क्रांती या विषयाला वाहिलेले आहेत. नुकतीच उत्क्रांती या विषयावर चर्चा झाली म्हणून अधिक स्पष्टपणे तो विषय मांडण्यासाठी ही लेखमाला इथे प्रसिद्ध करतो आहे. कुठचेच तांत्रिक शब्द शक्यतो न वापरता सोप्या भाषेत संकल्पना समजावून सांगण्याचा हा प्रयत्न आहे. मिपाकरांना ही लेखमाला आवडेल अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments

वा!!!पुभाप्र

दमामि
गुरुवार, 12/03/2015 - 19:16 नवीन
वा!!!पुभाप्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

मी आज हा पहिला लेख वाचला.

उल्का
Sat, 03/19/2016 - 21:02 नवीन
मी आज हा पहिला लेख वाचला. मस्त मालिका असणार यात शंका नाही. ती संपूर्ण वाचून झाल्यावर नक्की प्रतिक्रिया देईनच. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

जड विषय हलका करून सांगितलात.

शिव कन्या
गुरुवार, 12/03/2015 - 19:27 नवीन
जड विषय हलका करून सांगितलात. उत्तम. पुलेप्र.
  • Log in or register to post comments

छान माहीती.

मार्मिक गोडसे
गुरुवार, 12/03/2015 - 19:43 नवीन
छान माहीती. उत्क्रांतीविषयी वाचायला आवडेल. अनेक तारे पृथ्वीपासून अब्जावधी प्रकाशवर्षे दूर आहेत, म्हणून आपण विश्वातील अब्जावधी वर्षापूर्वी घडलेल्या अनेक घटना आजही बघू शकतो. त्यामुळे विश्वाचे गुढ उकलण्यास मदत होते.
  • Log in or register to post comments

वा छानच!

बोका-ए-आझम
गुरुवार, 12/03/2015 - 19:52 नवीन
पुभाप्र!
  • Log in or register to post comments

अरेवा! हे पाऊल उचलल्याबद्दल

संदीप डांगे
गुरुवार, 12/03/2015 - 19:54 नवीन
अरेवा! हे पाऊल उचलल्याबद्दल मनापासून शतशः धन्यवाद! लेख पूर्ण वाचला नाही. वाचून प्रतिसाद देतो. पुनश्च धन्यवाद!
  • Log in or register to post comments

हम्म

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 12/03/2015 - 20:01 नवीन
या काळाच्या विशाल कवेत आपला कण सामावून देऊन त्याला आपले हात पसरून मिठी मारायला हवी.
तुम्हालाच मिठी मारतो आता. गुर्जी असले काही लिहीतील आणि ते आवडेल असे कधी वाटलेच नाही. जाम भारी!
  • Log in or register to post comments

फारच बोअर लेखमाला आहे

विवेक ठाकूर
गुरुवार, 12/03/2015 - 20:06 नवीन
सगळं जग व्यक्तीच्या जाणीवेत सामावलेलं आहे. जाणीव संपली, जग संपलं. जग केंव्हा निर्माण झालं? जेंव्हा ते जाणीवेत आलं तेंव्हा. अर्थात, भयंकर पण एकदम निरर्थक टाईमपास करायचा तर लेखमाला उत्तम आहे
  • Log in or register to post comments

खटकण्याजोगा प्रतिसाद

गॅरी ट्रुमन
Fri, 12/04/2015 - 16:03 नवीन
अर्थात, भयंकर पण एकदम निरर्थक टाईमपास करायचा तर लेखमाला उत्तम आहे
या प्रतिसादात कोणालाच काहीच आक्षेपार्ह वाटले नाही असे म्हणायचे की याला पूर्णपणे फाट्यावर मारायचे मिपाकरांनी ठरविले आहे असे म्हणायचे? जर का अन्य कोणी सदस्य काहीतरी लिहित असेल आणि त्या लेखनात काही उणीव जाणवली तर त्यात आपल्या परिने भर घालावी किंवा माहिती चुकीची आहे असे वाटल्यास बरोबर माहिती कोणती हे लिहावे आणि ते ही करायचे नसल्यास पूर्ण दुर्लक्ष करावे पण अशाप्रकारची भाषा नक्कीच खटकण्याजोगी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

सहमत.

सस्नेह
Fri, 12/04/2015 - 16:20 नवीन
अर्थ समजला नाही म्हणून एखादे लेखन निरर्थक होत नाही. शिवाय जे काही समजले नाही, ते लेखकाला विचारून स्पष्ट करून घेता येतेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

लेखाचे शीर्षक पाहा :

विवेक ठाकूर
Fri, 12/04/2015 - 20:27 नवीन
विश्वाचे आर्त - भाग १ - काळाचा आवाका मुळात काळ असं काही नाहीये, ती प्रक्रियेचा कालावधी मोजण्यासाठी मानवानं निर्माण केलेली कल्पना आहे. जी गोष्ट अस्तित्त्वातच नाही त्यावर चर्चा निरर्थक आहे. माझ्या या प्रतिसादावर लेखकानं यावर मला अत्यंत बाळबोध प्रश्न विचारला होता : काळ नसेल तर पृथ्वी स्वतःभोवती कशी फिरेल? आणि त्याला मी असं उत्तर दिलंय : हे म्हणजे घड्याळ नसेल तर माणूस कसा चालेल विचारण्यासारखं आहे. त्यामुळे लेखकाला विचारणा झालीये पण त्यातूनही काही निष्पन्न नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

घड्याळ हे कालमापनाचं यंत्र

राजेश घासकडवी
Fri, 12/04/2015 - 20:40 नवीन
घड्याळ हे कालमापनाचं यंत्र आहे. मी काळ या राशीबद्दल बोलत होतो. पृथ्वीचं भ्रमण म्हणजेच 'आधी' इथे आणि 'नंतर' तिथे. त्यामुळे भ्रमण होतं आहे म्हणून काळाचा भास होतो हे म्हणणं योग्य नाही. काळ आहे म्हणून भ्रमण शक्य आहे. असो. काळ असं काही नाहीच, असं जर तुमचं मत असेल तर त्याविषयी तुम्ही स्वतंत्र मांडणी करावी असं मी म्हणतो. या लेखमालेत मी सर्वसामान्य विज्ञानाच्या पुस्तकांत जगभर जे शिकवलं जातं तेच मांडतो आहे. त्यात काल ही एक मूलभूत राशी आहे हेच सर्वमान्य आहे. तुम्हाला वेगळं मत बाळगायला माझी काही हरकत नाही. पण तुमचंच बरोबर, आणि मी मांडतो ते कसं चूक असं किती वेळा म्हणत राहाणार? खाली एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे जर तुम्हाला हे सगळं चुकीचंच वाटत असेल तर या लेखमालेतून तुमच्या हाती काही लागणार नाही. तुम्ही स्वतंत्र लिखाण करून तुमचं कसं बरोबर आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करा अशी मी विनंती करतो. पण यापुढे मी 'काळ हा भ्रम आहे' या विषयावर चर्चा करू इच्छित नाही. आपण पुढे जाऊया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

हे बरोबर नाही तुमचं.

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 12/04/2015 - 21:03 नवीन
>> आपण पुढे जाऊया. << ते जर काळाची गती मानतच नसतील तर ते पुढे कसे जाणार? ते तिथेच राहणार. त्यांच्या संदर्भचौकटीत तुमचे ग्रह* उलगडून दाखवा. *ही कोटी दुर्दैवी आहे, हे मलाच मान्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

भ्रमण कालात होत नाही आवकाशात होतं

विवेक ठाकूर
Fri, 12/04/2015 - 21:11 नवीन
तुम्ही काल आणि आवकाश या दोन्हीची गल्लत करतायं. ____________________________ खालच्या प्रतिसादात, तुमच्या विचारसरणतली चूक दर्शवून दिली आहे. तुम्ही मला विचारलं होतं : काळ नसेल तर पृथ्वी स्वतःभोवती कशी फिरेल? स्थिरच राहाणार नाही का? आणि मी म्हटलंय हे म्हणजे घड्याळ नसेल तर माणूस कसा चालेल विचारण्यासारखं आहे. _______________________ पुन्हा एका प्रतिसादात तुम्ही असं म्हटलंय : मुद्दा : आवर्तनं सत्य आहे, काळ भ्रम आहे. तुमचं उत्तर : आवर्तन या शब्दातच काळ अंतर्भूत आहे. हा मुद्दा मी वरदेखील मांडलेला आहे. तुम्ही पुन्हा मापन आणि प्रक्रिया यात घोळ करतायं. ________________________ पुढे तुमच्या कल्पनेतली चूक तुम्ही अधिक स्पष्ट केलीये : तुमचा प्रतिसाद : मी तुमचाच मुद्दा थोडा बदलून एक विधान करतो 'गती सत्य आहे, अवकाश किंवा अंतर हा भ्रम आहे' हे विधान तुम्हाला मान्य आहे का? यावर साधा विचार करा : समजा तुमचं शरीर नेमक्या त्याच आकाराच्या खोलीत बंद आहे तर हालचाल शक्य आहे का? अंतर नसेल तर गती असंभव आहे. आणि गतीच नसेल तर मापनाचा प्रश्नच येत नाही. थोडक्यात, कोणत्याही आकाराच्या गतीसाठी किमान त्यापेक्षा जास्त निराकाराची पूर्वौपस्थिती आवश्यक आहे. म्हणजे आवकाश हा भ्रम नसून वास्तविकता आहे आणि कालही केवळ प्रक्रिया मोजण्यासाठी निर्मित मानवी कल्पना आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

बरं बुवा. तुम्ही म्हणत असाल

राजेश घासकडवी
Fri, 12/04/2015 - 21:25 नवीन
बरं बुवा. तुम्ही म्हणत असाल तर तेच बरोबर असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

हे फॅक्च्युअल आहे, ते एकतर मान्य होईल किंवा अमान्य

विवेक ठाकूर
Fri, 12/04/2015 - 22:49 नवीन
त्यात मी म्हणतो म्हणून बरोबर याला अर्थ नाही. आणि काल ही कल्पना आहे तर मग "काळाचा आवाका" अशा लेखमालीकेला अर्थ राहात नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

सगळं जग व्यक्तीच्या जाणीवेत

स्रुजा
Sat, 12/05/2015 - 01:33 नवीन
सगळं जग व्यक्तीच्या जाणीवेत सामावलेलं आहे. जाणीव संपली, जग संपलं. जग केंव्हा निर्माण झालं? जेंव्हा ते जाणीवेत आलं तेंव्हा. अर्थात, भयंकर पण एकदम निरर्थक टाईमपास करायचा तर लेखमाला उत्तम आहे
हा तुमचा पहिला प्रतिसाद. या मध्ये अवकाश, काळ, कालमापनाची प्रक्रिया आणि एकक ( तुम्ही घड्याळाचा उल्लेख केलाय , म्हणुन एकक) याचा कुठेच उल्लेख नाही. तुमच्या मताप्रमाणे जी विसंगती आहे , ती, त्यांनी जसा पब्लिकली लेख सादर केलाय तशी तुमच्या प्रतिसादात करायला हवी होती. लेखकाने त्याचे उत्तर दिलेच असते आणि वाचकांना पण चांगला संवाद/ वाद वाचायची संधी मिळाली असती. तुमच्या पहिल्या प्रतिसादात कुठलंही कारण न देता केवळ शेरेबाजी केली आहे आणि लेखमालेला निकालात काढलं आहे. याची काय गरज होती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

नमस्कार.

शरभ
गुरुवार, 12/03/2015 - 20:08 नवीन
नमस्कार राजेशजी, Big bang आणि तद्दन विश्वाचा जन्म आणि विस्तार ह्या गोष्टी मुळीच पट्णार्‍या नाहीत. ह्या पुढचा प्रतिसाद English मध्ये लिहीतोय. क्षमस्व. I believe Big bang and all theories are based out on observations made. Since every single object has been found moving away from each other, big bang came into picture - so to satisfy current state of the expanding Universe. Relevant scientists would have further imagined and put forward big crunch etc. Nobody today is able to satisfactorily answer singularity and pre-big bang conditions. On other side rules of quantum mechanics do not apply to "observed" World/Universe. This is a very vast topic to comment. However I wish to introduce you and everybody here to something new. It is called "Biocentrism" which if believed in principle for even a slightest probability would answer many questions on existence (or rather non-existence) of (real) space and time and which are relevant only to an “observer”. मनापासुन लिहायचय. वेळ मिळाला तर detailed लिहीन.
  • Log in or register to post comments

बिग बॅंग वर एक स्वतंत्र, पण

राजेश घासकडवी
गुरुवार, 12/03/2015 - 20:12 नवीन
बिग बॅंग वर एक स्वतंत्र, पण छोटेखानी लेख लवकरच येईल. तेव्हा या विषयावर चर्चा करू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरभ

बिग क्रंच होण्याची शक्यता कमी

शब्दबम्बाळ
गुरुवार, 12/03/2015 - 20:28 नवीन
बिग क्रंच होण्याची शक्यता कमी वाटते त्यापेक्षा विश्व प्रसरण पावत जाउन शेवटी सगळी उर्जा गमाउन बसेल आणि सगळीकडे अंधारच राहील असे वाटते. कृष्णविवरे बराच काळ टिकून राहतील पण शेवटी तीही उर्जेअभावी कोसळतील. पण जर आपण कृष्ण विवरे मानतो तर white whole देखील असू शकते कि! आणि असे एक माहितीतले white whole म्हणजे Big Bang ;) quantum mechanics चे जग मात्र भन्नाट आहे! सध्या या जगाला जन्म देणाऱ्या एका प्रयोगाच्या तयारी साठी साहित्य गोळा करतोय. Thomas Young चा डबल स्लिट चा प्रयोग! एकदा बघायचाच आहे करून स्वताच्या डोळ्यांनी Dual nature of Light :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरभ

:)

शरभ
गुरुवार, 12/03/2015 - 20:34 नवीन
नक्की करा आणि कळवा सगळ्यांना. If interested try google - "Delayed Eraser Double Slit" अजून मजा येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

सिंगल स्लिटचा

मार्मिक गोडसे
गुरुवार, 12/03/2015 - 20:52 नवीन
सिंगल स्लिटचा (दोन बोटांचा) प्रयोग करून बघितला. मजा आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

ह्म्म

तुषार काळभोर
Fri, 12/04/2015 - 14:06 नवीन
एफ ई च्या अ‍ॅप्साय मध्ये फिजिक्सला होतं खरं हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

कृष्णविवरे

गॅरी ट्रुमन
Fri, 12/04/2015 - 15:57 नवीन
कृष्णविवरे बराच काळ टिकून राहतील पण शेवटी तीही उर्जेअभावी कोसळतील.
या विषयातले मला काहीही म्हणजे काहीही कळत नाही. तरीही या चर्चेत एक गोष्ट लिहित आहे. बी.ए.आर.सी मधून मागच्या वर्षी निवृत्त झालेल्या आभास कुमार मित्रा यांचे म्हणणे आहे की कृष्णविवरे असे काही नसतेच. मागच्या वर्षी काही कारणाने आभास कुमार मित्रा यांना भेटलोही होतो. आता त्यांच्याशी काहीच संपर्क नाही पण त्यांचा चेहरा नक्कीच लक्षात होता. काही दिवसांपूर्वी कुणीतरी फेसबुकवर ही लिंक पोस्ट केली आणि आभास कुमार मित्रांचा फोटो त्यात दिसला म्हणून लिंक क्लिक केली इतकेच.वर उल्लेख केल्याप्रमाणे या विषयातले मला अगदी शून्य आकलन आहे.त्यामुळे याविषयी अन्य काही मुद्दे आल्यास त्यावर मला काहीही लिहिता येणार नाही. तरीही समजा या चर्चेत उपयोगी होणार असे काही त्या लिंकेत असायची शक्यता आहे म्हणून ते इथे लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

धन्स दुव्याबद्दल.

sagarpdy
Fri, 12/04/2015 - 16:09 नवीन
धन्स दुव्याबद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

मध्यंतरी बहुतेक हॉकीन्स साहेबांनी पण असाच दावा केला होता...

अर्धवटराव
Sat, 12/05/2015 - 01:48 नवीन
म्हणजे कृष्णविवराविषयी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

ही तर 'ब्रेकिंग न्यूज'च म्हणायची

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 12/05/2015 - 03:40 नवीन
मला जे काही समजलं होतं त्यानुसार आभास मित्रा जे काही म्हणतात त्याचा आणि हॉकिंगने जे काही मांडलंय ते विरुद्धार्थी आहे. हॉकिंगने कायमच कृष्णविवरं आहेत अशी आणि त्यांच्या अस्तित्वाबद्दल खगोलभौतिकीबद्दल मांडणी केली आहे. अलिकडच्या काळातही त्याने काही निराळं म्हटलेलं नाही. हॉकिंगने पावणेदोन वर्षांपूर्वी मांडलेल्या सिद्धांताचा सोप्या भाषेतला अर्थ - "ब्रेकिंग न्यूज" - कृष्णविवरं नाहीतच - स्टीफन हॉकिंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

"ब्रेकींग न्युज" शक्य आहे

अर्धवटराव
Sat, 12/05/2015 - 05:57 नवीन
आमच्याकडे एक वैज्ञानीक बुवा आहेत. ते विकीपंडीत असले तरी बरेचदा त्यांची माहिती बरोबर असते. ब्लॅक होल्सबद्द्ल त्यांच्याकडुनच असं काहितरी ऐकलं होतं. इन फॅक्ट, तुमच्याशी मागे एकदा गप्पा मारतानाचाच तो काळ होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अत्यंत सुंदर लेखमाला अत्यंत सुयोग्य वेळी शुभारंभ

मारवा
गुरुवार, 12/03/2015 - 20:09 नवीन
अत्यंत सुंदर लेखमालेचा प्रारंभ. इथे सध्या या लेखमालेची आत्यंतिक गरज होती. ती पुर्ण झाली आहे. राजेशजी लेख इथे प्रकाशित करण्यासाठी तुम्हाला अनेकदा धन्यवाद ! सर्वात महत्वाचं म्हणजे यात अत्यंत सोप्या ओघवत्या भाषेत सुबोध सुंदर मांडणी केलेली आहे. क्लीष्टता अजिबात नाही. प्रत्येकाने आवर्जुन एकदा तरी वाचावी अशी लेखमाला.
  • Log in or register to post comments

सुंदर सुरूवात ! और आने दो.

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 12/03/2015 - 20:36 नवीन
सुंदर सुरूवात ! और आने दो.
  • Log in or register to post comments

उत्कृष्ट. धन्यवाद..

गवि
गुरुवार, 12/03/2015 - 20:40 नवीन
उत्कृष्ट. धन्यवाद..
  • Log in or register to post comments

+१

मितभाषी
Fri, 12/04/2015 - 16:32 नवीन
हेच बोल्तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

+१

मूकवाचक
Fri, 12/04/2015 - 17:16 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

पुढच्या लेखांची उत्सुकता

अजया
गुरुवार, 12/03/2015 - 20:47 नवीन
पुढच्या लेखांची उत्सुकता वाढली आहे सुरूवात वाचून.पुभाप्र
  • Log in or register to post comments

पुढ्ले भाग लौकर टाका इथे :)

टवाळ कार्टा
गुरुवार, 12/03/2015 - 20:55 नवीन
पुढ्ले भाग लौकर टाका इथे :)
  • Log in or register to post comments

अप्रतिम सुरुवात. लेखमालेसाठी

स्रुजा
गुरुवार, 12/03/2015 - 21:04 नवीन
अप्रतिम सुरुवात. लेखमालेसाठी शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

लेख

रामदास
गुरुवार, 12/03/2015 - 21:14 नवीन
मी मराठी वृत्तपत्रात आधीच वाचले आहेत पण पुन्हा एकदा वाचताना आनंद वाटला.
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

अनुप ढेरे
गुरुवार, 12/03/2015 - 21:18 नवीन
अप्रतिम!
  • Log in or register to post comments

छान लेखन!

चतुरंग
गुरुवार, 12/03/2015 - 21:47 नवीन
जगण्यासाठी त्याला काल, परवा, आत्ता, या क्षणी, गेल्या मिनिटात, काय झालं एवढंच जाणून घेणं आवश्यक असतं. एखाद्या गोष्टीचे परिणाम शंभर वर्षांनी काय होतील याची पर्वा करण्याची गरज नसते, उपयोगही नसतो.
या आत्ताचंच बघण्याच्या, आपलं झालं ना मग जाऊदेत...प्रवृत्तीमुळेच प्रदूषण किंवा तशाच इतर जागतिक दूरगामी समस्यांकडे डोळेझाक होते का? असा एक विचार आला.... तसेही उत्क्रांतीदेखील एक दिवस एका वेळी अशीच होत आलीये त्यामुळे छोट्या कालखंडाचं महत्त्व हे थेंबे थेंबे तळे साचे या न्यायाने निसर्गातच अधोरेखित आहे असे वाटते. पुढील भागाच्या प्रतीक्षेत. -रंगा
  • Log in or register to post comments

उत्कृष्ट लेख.

प्रचेतस
गुरुवार, 12/03/2015 - 21:56 नवीन
उत्कृष्ट लेख. पुभाप्र.
? या विश्वाचाच जन्म सुमारे चौदा अब्ज वर्षांपूर्वी झाला
ह्या वयापेक्षाही जुन्या असलेल्या काही आकाशगंगांचा शोध लागलाय त्यामुळे विश्वाचे वय अजून मागे जातेय ह्या विषयी कुठेतरी वाचले होते.संदर्भ आता आठवत नाहीये.
  • Log in or register to post comments

या विश्वाचाच जन्म सुमारे चौदा

कानडाऊ योगेशु
गुरुवार, 12/03/2015 - 21:59 नवीन
या विश्वाचाच जन्म सुमारे चौदा अब्ज वर्षांपूर्वी झाला.
त्याआधी काय होते? (ह्या प्रश्नाचा विचार करताना मला नेहेमी मळमळायला होते.ह्यात कृपया काहीही उपरोध नाही आहे.)
  • Log in or register to post comments

त्याआधी काय होते?

विवेक ठाकूर
गुरुवार, 12/03/2015 - 22:41 नवीन
मस्त, पण इतका साधा विचार बहुदा कुणी करत नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

थोडक्यात सांगायचं झालं तर काळ

राजेश घासकडवी
गुरुवार, 12/03/2015 - 22:44 नवीन
थोडक्यात सांगायचं झालं तर काळ ज्या क्षणाला सुरू झाला 'त्याच्या आधी' या कल्पनेला अर्थ राहात नाही. असो. या विषयावर फार लिहीत नाही, कारण याची चर्चा पुढच्या एकदोन लेखांतच होणार आहे. तेव्हा बोलूच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

काळ असं काही नाही

विवेक ठाकूर
गुरुवार, 12/03/2015 - 23:01 नवीन
याची तुम्हाला बहुदा कल्पना दिसत नाही. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे निर्माण होणारा तो निव्वळ भास आहे. त्यामुळे `अस्तित्व केंव्हा अस्तित्वात आलं' या विषयाचा घनघोर पण निरर्थक चर्चा करण्यापलिकडे काहीएक उपयोग नाही. इन फॅक्ट वरचा एकच प्रश्न : `या विश्वाचाच जन्म सुमारे चौदा अब्ज वर्षांपूर्वी झाला'......ओके, पण... त्या आधी काय होते? संपूर्ण विषयाचा बोजवारा उडवतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

काळ नसेल तर पृथ्वी स्वतःभोवती

राजेश घासकडवी
गुरुवार, 12/03/2015 - 23:08 नवीन
काळ नसेल तर पृथ्वी स्वतःभोवती कशी फिरेल? स्थिरच राहाणार नाही का? गती ही संकल्पनाच काळावर आधारित आहे. कारण त्यात 'आधी' पृथ्वी अमुक अवस्थेत होती, 'नंतर' ती फिरून तमुक अवस्थेला पोचली हे मान्य केलेलं आहे. काळ नसेल तर 'त्याआधी काय होतं' हा प्रश्नच निरर्थक होतो. कारण आधी आणि नंतर जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही काळाचा वापर करत आहात. तेव्हा एक काय ते ठरवा, काळ आहे की नाही? आणि लवकर ठरवा, फार 'काळ' लावू नका. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

तुमचा वेळ नका वाया घालवू!इथे

शब्दबम्बाळ
Fri, 12/04/2015 - 00:49 नवीन
तुमचा वेळ नका वाया घालवू! इथे त्यांना बर्याच प्रकारे सांगितलाय वेळेच्या अस्तित्वाबद्दल पण त्यांना ऐकून घ्यायचंच नाहीये असे दिसतंय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

तुमचा वेळ नका वाया घालवू!इथे

शब्दबम्बाळ
Fri, 12/04/2015 - 00:49 नवीन
तुमचा वेळ नका वाया घालवू! इथे त्यांना बर्याच प्रकारे सांगितलाय वेळेच्या अस्तित्वाबद्दल पण त्यांना ऐकून घ्यायचंच नाहीये असे दिसतंय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

काळ नसेल तर पृथ्वी स्वतःभोवती कशी फिरेल?

विवेक ठाकूर
Fri, 12/04/2015 - 10:07 नवीन
हे म्हणजे घड्याळ नसेल तर माणूस कसा चालेल विचारण्यासारखं आहे. गती ही संकल्पनाच काळावर आधारित आहे. कारण त्यात 'आधी' पृथ्वी अमुक अवस्थेत होती, 'नंतर' ती फिरून तमुक अवस्थेला पोचली हे मान्य केलेलं आहे. काल ही, प्रक्रिया मापनाची सोय किंवा मानक आहे. पण मुळात काल असं काहीही अस्तित्वात नाही. तो पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यानं होणारा भास आहे कारण सूर्य सदैव प्रकाशमान आहे. तस्मात, लेखविषयातून काहीही निष्पन्न होणार नाही. तो प्रयास निरर्थक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

बाहुबलीने असा विचार केला असता

sagarpdy
Fri, 12/04/2015 - 11:25 नवीन
बाहुबलीने असा विचार केला असता तर जल्पर्बत चढून गेला असता का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा