पूर्वेच्या समुद्रात -- १२

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
2 Dec 2015 - 7:54 pm

पूर्वेच्या समुद्रात- १



5
6
7
8
9
10
11
पूर्वेच्या समुद्रात -- १२
नारकोंडम वरून आम्ही परत निघालो. अंदमानच्या समुद्रातील आमच्या सफरी एक एक अविस्मरणीय अशाच होत होत्या. आता आम्ही उत्तरेच्या प्रीपारीस आणि कोको बेटांच्या आजूबाजूने रात्रीचे टेहळणी करत, गस्त घालत रात्री केंव्हा तरी दिगलीपूर या बंदरात येउन ठेपलो. रात्री तेथे फारसे काहीच दिसत नव्हते म्हणून मी थंडपणे झोपलो.दिवसभर नारकोंडम मध्ये फिरून समुद्रात पोहून आणि नंतर वल्ही मारून थकलो होतोच त्यामुळे पाठ टेकल्यावर झोप लागली. सकाळी उठलो आणि केबिनच्या खिडकी च्या काचेतून पहिले तर पाचूच्या बेटाचे हिरवेगार दर्शन घडले. पहिले तर पहाटेचे साडे पाच वाजले होते आणि सगळीकडे स्वच्छ उजाडले होते. अंदमान आपल्या पूर्वेला असल्याने जवळ जवळ दीड ते दोन तास अगोदर उजाडते. मी आहे तसाच बाहेर आलो आणि डोळ्याचे पारणे फिटले. आमचे जहाज एका जेट्टीवर उभे होते. तेथे येणारा एक रस्ता होता आणि त्या रस्त्याच्या मागे हिरवे गार जंगल होते. समोर निळा शार समुद्र मागे हिरवे जंगल मागच्या जंगलात वेगवेगळ्या पक्षांचे आवाज येत होते. मी घाई घाईने जाऊन तोंड धुतले. चहाचा कप घेऊनच बाहेर आलो. चहा पिता पिता आजू बाजूला पाहत होतो. तेंव्हा प्रेम कुमार तेथे आला. कालचा प्रसंग आठवून आम्हाला हसायला येत होते. आमचा EXO राजकुमार पण आला.हसत मला म्हणाला, 'डॉक, काल तुम्ही आमच्या तोंडचे पाणी पळवले"
मी पण हसत म्हणालो सर जे झाले त्यात माझी किंवा कुणाचीच काही चूक नव्हती. सगळे जण हसत हसत गप्पा मारत होतो. आम्ही जहाजाच्या मागच्या डेक वरच नाश्ता घ्यायचे ठरवले. नाश्त्याला पुरी आणि बटाट्याची भाजी होती. मजेत नाश्ता केला छान सकाळच्या वातावरणात कॉफी घेतली आणि सकाळच्या थंड वातावरणात गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यात मला तेथे एक छोटी नाववाला मासे मारी करताना दिसला तो अगदी किनार्याच्या जवळच होता. अर्धा तास आम्ही पाहत होतो नंतर तो जेंव्हा परत आला तेंव्हा मी EXO ला विचारले सर काय आहे पाहूया काय?
त्यांनी त्या नावाड्याला विचारले काय मिळाले? तर त्याने छानसे प्रॉन्स(झिंगे) दाखवले. अगदी आमच्या समोर ताजे ताजे पकडले होते. मी सरांना म्हणालो सर सगळ्या नौसैनिकांसाठी पण घेऊया. ते अर्थातच हसले. त्याला किंमत विचारली ती अर्थातच मुंबईपेक्षा फारच कमी होती. त्याच्या कडे असलेले सर्वच्या सर्व प्रॉन्स आम्ही विकत घेतले. त्यावर त्याने खुश होऊन एक मोठा सुरमई आम्हाला देऊन टाकला. त्याच्या मेहनतीचे त्याला अपेक्षेप्रमाणे घासाघीस न करता पैसे मिळाले होते. आणि आम्हाला समोरच स्वस्त आणि एकदम ताजा माल मिळाला होता. ते प्रॉन्स आणि सुरमई पाहून सर्वाना परत भूक लागली. नाही तरी समुद्रात फार दिवस फिरून काही तोंडाला चव नव्हती. मी ताबडतोब आमच्या कुक ला बोलावणे पाठवले.त्याला दोन तृतीयांश प्रॉन्स आणि सुरमई नौसैनिकांच्या स्वयंपाक घरात पोहोचवायला सांगितले आणि त्याला विचारले या प्रॉन्सचे काय करता येईल तो म्हणाला सर गार्लिक बटर फ्राय करता येईल. मग आम्ही त्याला सांगितले कि जा करून आण. त्याने ते प्रॉन्स अमूलच्या बटर मध्ये छान लसुण ठेचून गुलाबीसर रंगावर परतून आणून ठेवले. ते पाहून सर्वांनी त्याच्या वर आडवा हात मारला. मी तर इतके खाल्ले कि मी कुक ला आता जेवणार नाही हे जाहीर करून टाकले. इतके ताजे आणि समोरच स्वच्छ निवळशंख पाण्यात पकडलेले प्रॉन्स मी यापूर्वी कधीही खाल्ले नव्हते कि नंतरही खायचा योग आला नाही. मुंबई पुण्यात किंवा गोव्यातहि मिळणारे प्रॉन्स आदल्या दिवशी रात्री पकडलेले बर्फात ठेवलेले असतात. फारच क्वचित ठिकाणी बर्फात न ठेवलेले मत्स्यवर्गीय अन्न मिळू शकते.
दुपारी न जेवता झोपण्याचा विचार होता पण एकदम आठवले कि सुरमई पण घेतली आहे. मी स्व्याम्पाक्घरात गेलो आणि कुक ला विचारले कि जेवायला काय आहे. त्यावर त्याने सांगितले सर सुरमई फ्राय, सुरमई कढी आणि भात आहे. मग म्हटले कशाला सोडा. पोट भरले असले तरी असे काही मिळाले तर गळ्यापर्यंत जेवण्यास माझी ना नसते. यालाच आकंठ जेवणे असे म्हणत असावेत. अर्थात मी जे जेवलो त्याने राजकुमार सरांचा घसा सुद्धा ओला झाला नसता.
दुपारी जेवून झोपलो आणि त्यानंतर आमचे जहाज दिगलीपूर सोडून परत समुद्रात गस्त घालण्यास निघाले. समुद्रात इकडे तिकडे फिरणे आणि रडारवर दिसणाऱ्या बोटींचा माग काढून त्यांची तपासणी करणे हे काम चालू होते. रात्रभर असेच चालू होते . दुसर्या दिवशी सकाळी उठलो तेंव्हा जहाज एका वेगळ्याच बंदरात शिरत होते. हे माया बंदर होते आणि हे दिगलीपूर च्या दक्षिणेस असलेले एक समुद्र किनार्यावरील गाव आहे. राजकुमार सर म्हणाले डॉक्टर आम्ही सर्व माया बंदर च्या बाजारात जाणार आहोत. तू येणार का? आता हे काय विचारणे झाले? जहाजात सर्वात रिकामटेकडा मीच होतो. मग काय लगेच उठून अंघोळ नाश्ता केला आणि तयार झालो. जहाजाच्या जीप मध्ये बसून जंगलातून तास भर कुठेतरी गेल्यावर एक छोट्याशा रस्त्याच्या दोन बाजूना दुकाने असलेला एक गावाचा बाजार होता तो. पण तेथे वेताच्या(cane) वस्तू फारच छान आणि अतिशय स्वस्त होत्या. मी काय करावे हा विचार करत होतो तो राजकुमार सर म्हणाले डॉक्टर काही विकत घ्यायचे नाही का तुला? मी म्हणालो विकत तर घ्यायचे आहे पण ते घेऊन कसे जाणार. ते हसले आणि म्हणाले आपला( तटरक्षक दलाचा) ट्रक येथे रेशन साठी आला आहे त्यात तुला अख्ख्या घरासाठी समान हवे असेल तरी ठेवायला जागा आहे. घे तुला पाहिजे ते. मग मी एक कोपर्यात ठेवायचे एक चतुर्थांश वर्तुळाच्या आकाराचे टेबल रुपये ७००. दिवाणखान्याच्या मध्ये ठेवायचे टी पॉय ४०० रुपये आणि बसायचे दोन मोढे ( छोटी स्टुले)रुपये ३५० ला एक घेतली. त्या माणसाला पैसे दिले आणि सामान तटरक्षक दलाच्या ट्रक मध्ये टाकायला सांगितले. मग इतर दोन अधिकारी बाजूच्या दुकानात चहा पीत होते तेथे गेलो तो समोर एक पिवळ्या रंगाचे अतिशय उत्साहवर्धक दुकान दिसले. एस टी डी बूथ. ही फार दुर्मिळ गोष्ट होती. लगेच मी तेथे जाऊन विशाखा पटणमला फोन लावला. आम्ही राहत होतो तेथे दुसर्या मजल्यावर एक कॅप्टन राव होते. त्यांना फोन करून विचारले कि कृपया माझ्या पत्नीला बोलावणे शक्य होईल का? ते हो म्हणाल्यावर मी त्यांना विनंती केली कि मी बरोबर दहा मिनिटांनी परत फोन करतो. मी विशाखापटणम सोडल्यापासून बायकोशी बोललोच नव्हतो त्याला आता जवळ जवळ १५ दिवस व्हायला आले होते. घरची ख्याली खुशाली कळायचा काहीच मार्ग नव्हता. आम्ही भटकत होतो बहुतांश ठिकाणी एस टी डी बूथ नव्हते आणि असले तरी आमच्या स्वतःच्या घरी फोन नव्हता.
दहा मिनिटांनी मी परत फोन केला तेंव्हा पत्नीनेच फोन केला. ख्याली खुशालीची अदला बदल झाली. मी माया बंदरला आहे (म्हणजे कुठे) ते सांगितले.
मुलांच्या बद्दल विचारले त्यावर ती म्हणाली कि काल एक भयंकर प्रकार झाला मी काळजीने विचारले काय झाले? त्यावर तिने सांगितलेली कथा अशी आहे. आमची मुलगी नौदलाच्या केजी स्कूल मध्ये होती. तिला न्यायला पोहोचवायला एक रिक्षावाला लावला होता. काल दुपारी बारा वाजता मी तिला घ्यायला इमारतीच्या बाहेर रस्त्यावर आकाशला( आमच्या मुलाला वय दीड वर्ष ) बरोबर घेऊन थांबले होते. थोड्या वेळाने रिक्षावाला आला. तेंव्हा त्या रिक्षात शमिका( आमची मुलगी वय चार वर्षे ) नव्हती. मी त्याला विचारले मुलगी कुठे आहे त्यावर तो मोडक्या तोडक्या हिंदीत म्हणाला कि ती आली नव्हती म्हणून मी परत आलो. त्याला मी विचारत होते कि तू मुलीला असेच सोडून परत कसा आलास तर त्यावर त्याचे काही उत्तर नव्हते.त्याला दुसर्या मुलांना पोहोचवायची घाई होती. माझ्या पायाखालील जमीन सरकली. मी तशीच परत घरी गेले. हेल्मेट घेतले. मुलाला पुढे स्कूटरवर उभा करून घाईघाईने शाळेत गेले. ते दोन किमी अंतर सुद्धा फार लांब वाटत होते. कशीबशी घाईघाईने शाळेत पोहोचले वर्गात गेले तर तेथे शमिका तिच्या लक्ष्मी टीचरच्या जवळ बसली होती. माझ्या जीवात जीव आला आणि मी टीचर ला विचारले काय झाले तेंव्हा ती म्हणाली कि आमचा वर्ग सोडला तेंव्हा मी प्रत्येक मुलाला त्यांच्या बस किंवा रिक्षात बसवून देते आज तुमचा रिक्षावाला दिसलाच नाही.म्हणून मी तिला बाजूला उभे करून बाकी सर्व मुलांना त्यांच्या बस/ रिक्षात बसवून हिला घेऊन परत वर्गात आले. मी तिला विचारले पण तुम्ही किती वेळ थांबला असतात. त्यावर ती म्हणाली की संध्याकाळी पाच पर्यंत थांबले असते. इतक्या लहान मुलीला कसे सोडून देणार. तुमच्या मुलीच्या ड्रेस वर पत्ता होता पण फोन नंबर नाही. नाही तर मग मी तिला घरापर्यंत पोहोचवायला आले असते. मला तिचे पायच धरावेसे वाटले. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी त्या टीचर ला परत परत धन्यवाद दिले अशा शिक्षकांचा खरा तर जाहीर सत्कार करायला पाहिजे. कारण "आपल्याला काय करायचे आहे" अशी वृत्ती वाढत चाललेल्या जगात असे उदाहरण सर्वांच्या समोर असायला हवे. यानंतर मी शमिकाला स्कूटर वर बसवून घरी आले. आजपासून मी तिला रिक्षाने पाठवणार नाही. मग मला दोन चकरा झाल्या तरी चालतील. आपल्या मुलाची सुरक्षितता दुसर्या शहरात एखाद्या बेजबाबदार रिक्षावाल्यावर सोडता येणार नाही.
मी ऐकून सुन्न झालो आणि तिला फक्त म्हणालो स्वतःची काळजी घे. पाहीजे तेवढे पैसे खर्च कर पण स्वतःची आणि मुलांची आबाळ करू नकोस.
दूर अशा एकाकी ठिकाणाहून मी तरी काय करू शकत होतो? मला फारच असहाय्य वाटलं एस टी डी संपवून मी पाच मिनिटे शांतपणे बसलो. मग जीप मध्ये बसून परत जहाजात आलो. थोड्या वेळाने माझे सामान सुद्धा आले. ते जहाजात उतरवून खालच्या डेकवर दोरीने बांधून टाकले. कारण अजून बरेच दिवस समुद्रात काढायचे होते. तेथून यथावकाश आम्ही परत समुद्रात गस्त घालायला निघालो.
क्रमशः

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

बापरे! अशा वेळेस खरेच फारच असहाय्य वाटते.

बाकी हे सगळे अनुभव वाचायला फारच रोचक वाटत आहे. त्या नारकोंडम बेटावर जायची खूपच उत्सुकता लागली आहे. सिव्हिलियन्सना जाण्याची परवानगी असते का?

असंका's picture

2 Dec 2015 - 9:07 pm | असंका

काय एकेक अनुभव आहेत डॉक्टरसाहेब! अगदी एखादी कादंबरी वाचल्याचा फील येत होता. आणि लिहिलंयत पण खूप सुंदर!

अनेक धन्यवाद!

रेवती's picture

3 Dec 2015 - 1:15 am | रेवती

वाचतिये.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Dec 2015 - 1:50 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लेख. "जसे आहे तसे" लिहिण्याची शैली आणि मधुनच आलेले भावनिक अनुभवाचे क्षण ही तुमच्या लेखनाची खूण आहे.

पुभाप्र.

तुषार काळभोर's picture

3 Dec 2015 - 9:13 am | तुषार काळभोर

"जसे आहे तसे" लिहिण्याची शैली आणि मधुनच आलेले भावनिक अनुभवाचे क्षण

निनाद's picture

3 Dec 2015 - 5:09 am | निनाद

फार छान वाटते आहे वाचायला तुमचे अनुभव. रिक्षावाल्याचा अनुभव आणि असहाय्यता आगतिक करून जाते.

आनंदराव's picture

3 Dec 2015 - 10:38 am | आनंदराव

हेच म्हणतो

मुक्त विहारि's picture

3 Dec 2015 - 10:51 am | मुक्त विहारि

पुभाप्र...

जबरदस्त अनुभव आहेत डॉक्टर साहेब. कुठला माणूस कसा भेटेल सांगता येत नाही. एक तो रिक्षावाला आणी एक त्या शिक्षीका.

सस्नेह's picture

3 Dec 2015 - 11:41 am | सस्नेह

डॉ. साहेब आपण अगदी साध्या पण प्रांजळ शब्दात छान लिहिता.

प्रमोद देर्देकर's picture

3 Dec 2015 - 12:26 pm | प्रमोद देर्देकर

मागचे राहिलेले दोने तीन भाग आताच सलग वाचले. छान चाललीये तुमची सफर. उत्कंठावर्धक.

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Dec 2015 - 8:50 am | कैलासवासी सोन्याबापु

डॉक साब, हॅपी नेवी डे सर!

नौदल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, Ahoy to the Navy Blues of India _/\_

सुबोध खरे's picture

4 Dec 2015 - 8:48 pm | सुबोध खरे

धन्यवाद

रुस्तम's picture

4 Dec 2015 - 9:33 am | रुस्तम

पुभाप्र...

संदीप डांगे's picture

4 Dec 2015 - 9:48 pm | संदीप डांगे

प्रत्येक भागाच्या वेळी वाटते की हा भाग सर्वोत्तम आणि शेवटचा. पण ही मैफल तर रंगतच जात आहे.

तुमच्या अनुभव विश्वाला सलाम आणी आमच्या साठी लिहिण्याचे कष्ट घेताय त्याबद्दल धन्यवाद.

जाता जाता, तुम्ही त्यावेळी डायरी लिहायचे काय? कारण कि सहकार्‍यांची आणी ठीकाणांची नावे आणी त्यांचा क्रम बरोबर नमुद करत आहात तुम्ही.

--टुकुल

तुम्ही त्यावेळी डायरी लिहायचे काय
नाही साहेब,
सुदैवाने माझी स्मरणशक्ती सुरुवातीपासून बरीच चांगली आहे आणि यातील बरेचसे प्रसंग मला आजही स्पष्टपणे डोळ्यापुढे दिसतात.
थोडेसे देवाचे उपकारच समजा.

सिरुसेरि's picture

9 Dec 2015 - 9:16 am | सिरुसेरि

खुप छान माहिती . हल्लीच्या काळात बरेचदा असे दिसते की - नेव्ही , मर्चंट नेव्हीमधील खडतर जीवनशैलीमुळे मुली अशा ठिकाणी लग्न करायला नाखुश असतात . अशा वेळी तुमचे लेख चांगले कौन्सिलींग करु शकतात .