पूर्वेच्या समुद्रात - ९

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
3 Nov 2015 - 2:57 pm

पूर्वेच्या समुद्रात - ९

पूर्वेच्या समुद्रात - १
पूर्वेच्या समुद्रात - २
पूर्वेच्या समुद्रात - ३
पूर्वेच्या समुद्रात - ४
पूर्वेच्या समुद्रात - ५
पूर्वेच्या समुद्रात - ६
पूर्वेच्या समुद्रात - ७
पूर्वेच्या समुद्रात - ८
जेट्टीला पोहोचलो तर जहाजावर सर्वजणांनी स्वागत केले. गेले १५-२० दिवस त्यांचे सेलिंग डॉक्टर शिवायच चालले होते. खरं तर या जहाजावर डॉक्टरची काही गरज नाही. पण एकदा डॉक्टर असल्याची सवय झाली कि तो नसेल तर उगाचच असुरक्षित वाटत राहते. शिवाय आता आम्हाला अंदमानच्या दक्षिणेला निकोबार बेटांच्या आसपास आणि मलाक्काच्या सामुद्रधुनीत आठ ते दहा दिवस सलग गस्त घालण्यासाठी जायचे होते. आणि त्या दरम्यान कोणत्याही जवळच्या तळावर डॉक्टर नव्हता.
या पोर्ट ब्लेअर दौर्याच्या अगोदर आम्ही विशाखापटणम मध्ये आमच्या जहाजाची युद्ध चाचणी आणी सराव (वर्कअप) झाली होती. सर्वसाधारणपणे अशी चाचणी फक्त नौदलाच्या जहाजांची आणि त्यावरील सैनिकांची होत असते. यासाठी कोचीला रियर अडमिरल या हुद्द्याच्या अधिपत्याखाली एक WWO (WARSHIP WORKUP ORGANIZATION) आहे. येथे काम करणारे सर्व लोक अतिशय कडक आणी अजिबात दयामाया न दाखवणारे असतात. प्रत्येक विभागाचा प्रमुख त्या विभागाचे तांत्रिक ज्ञान असणारा अधिकारी असतो. आणी जहाजातील तो प्रत्येक उपकरण शस्त्र अस्त्र आणी माणसं यांची कसून तपासणी करतात. नौदलात आपले जहाज जर त्यात नापास झाले तर कमांडिंग अधिकार्याला जहाजाच्या कप्तानपदावरून डच्चू मिळतो. ते लोक पहिल्याने येतात तेंव्हा प्रत्येक अवजार उपकरणाची आणी ते चालवणाऱ्या माणसांची प्राथमिक चाचणी घेतात. त्यात ज्या तृटि असतात त्या कशा सुधारायच्या याचे शिक्षण देतात. आणी त्यानंतर तुम्हाला सराव करायला लावून परत चाचणी घेतात. हे प्रकरण एक महिना चालते. या अखेरीस तुम्ही त्यात पास झालेच पाहिजे अन्यथा तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता दुरापास्त होते. या एक महिन्यात कामाचे तास सकाळी आठ पासून कितीही वाजेपर्यंत असतात.
उदा. डेकवर एक माणूस बेशुद्ध पडला आहे. तेथून त्याला स्ट्रेचर वर घालून खाली दवाखान्यात नेऊन त्याला सलाईन आणी ऑक्सिजन लावायला किती वेळ लागतो आणी या गोष्टी (SOP) प्रमाणे होत आहेत कि नाही हे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी पाहतो. तुमचा तातडीची औषधे ठेवलेला ट्रे मधील सर्व औषधे विशिष्ठ तर्हेने ठेवलेली आहेत का ? ती एक्स्पायर झालेली नाहीत. अतिदक्षतेच्या वेळेस तुमच्या वैद्यकीय सहायकाला ती नीट वापरत येत आहेत कि नाहीत.

किंवा तोफखाना विभागाच्या माणसाना इशारा मिळाल्यापासून किती वेळात प्रत्यक्ष तोफ डागता येते त्यानंतर त्याचे गोळे परत लोड करायला किती वेळ लागतो. ब्यारल गरम झाली असेल तर किती कमी वेळात ती बदली करतात आणी मारलेल्या तोफेचे गोळे किती अंतरावर आणी किती अचूक मारले जातात याची सर्व चाचणी होते. जहाज बुडायला लागले तर सर्व सैनिकांना जहाज बुडायच्या काही काळ अगोदर जहाज सोडून जीवन रक्षा कवच घालून पाण्यात उड्य़ा मारायला लावतात. यावेळेसहि परत उडी मारण्यासाठी मी पहिला पुढे होतो. कारण विशाखापटणम शहराचा मैला त्याच कालव्यात सोडत असत जेथे आमचे जहाज उभे असे. त्यामुळे सर्वात अगोदर ऊडी मारून पोहून परत येऊन भरपूर पाण्याने स्नान करावे या विचाराने मी सर्वात पहिली पाण्यात उडी मारली. डॉक्टर पाण्यात पहिली उडी मारतो आहे हे पाहून त्या वर्क अप टीमचा प्रमुख फारच खुश झाला होता. मी त्याला कशाला आतली गोष्ट सांगू ?
जेथे जेथे सैनिक कमी पडतील तेंव्हा हे अधिकारी त्यांना प्रशिक्षण देतात आणी सराव करायला लावतात. एक महिन्याअखेरीस जर तो सैनिक किंवा अधिकारी परीक्षेस उतरला नाही तर त्याची रवानगी रेशन स्टोर्स किंवा एन सी सी अशा NON COMBAT ड्युटी मध्ये करतात. आणी अर्थातच यानंतर आपली बढती बंद होते. त्यामुळे प्रत्येक सैनिक हे वर्क अप यशस्वीरीत्या कधी संपते याची वाट पाहत असतात.
असो
संध्याकाळी सहा वाजता आम्ही पोर्ट ब्लेअर सोडले आणि दक्षिणेचा रस्ता धरला. तटरक्षक दलाची जहाजे पांढरी असतात त्यामुळे ती लांबून सुद्धा दिसतात. नौदलाच्या जहाजांचे आणी यांचे काम वेगळे असल्यामुळे यांचे लोकांना दृश्य असणे हे चोर, स्मगलर, चाचे किंवा चोरीने मच्छी मारी करणारे कोळी यांना दहशत बसवणारे असते. आणी तटरक्षक दलाचे जहाज येथे तैनात आहे हे माहीत असले कि परदेशी मच्छीमार आपल्या हद्दीत फिरकत नाहीत. पोलीस जसे रात्री जीपमधून गस्त घालत फिरतात तसेच हे आहे,,दोन दिवस असे नुसतेच निकोबारच्या पश्चिमेला समुद्रात गस्त घालत फिरत होतो. सकाळपासून संध्याकाळ पर्यंत चारी बाजूला समुद्र आणी वर निरभ्र आभाळ. मला करायला काहीच नसे. रात्री सुद्धा सर्वत्र काळे पाणी आणी वर असंख्य तार्यांनी भरलेले आकाश.
अलीकडे आम्ही एकदा सहकुटुंब जव्हारला( ठाणे जिल्ह्यातील) गेलो होतो. हे थोडे उंचावर आहे. रात्री जेवण झाल्यावर मी बायको बरोबर पाय मोकळे करायला बाहेर पडलो. तेंव्हा वीज गेली. सर्वत्र अंधार झाला आणी वरचे आकाश तार्यांनी उजळून निघाले. बायकोवर एकदम मोहिनी पडल्यासारखी झाली. ती मला म्हणत होती मुंबईत कधी एवढे तारे दिसत नाहीत सगळीकडे क्षितिजावर दिवेच असल्यामुळे असा अंधार नसतोच. किती सुंदर आकाश आहे. मी आपला तिला दुजोरा देत होतो. थोड्या वेळाने परत दिवे आले तेंव्हा तिला क्षितिजावर असलेला दिव्यांचा उजेड जाणवला. ती मला म्हणाली कि तू काहीच बोलत नाहीस. मी तिला म्हणालो मी तुला नंतर सांगेन.परत आल्यावर मी तिला म्हणालो कि ३ वर्षे समुद्रावर काढली तेंव्हा से निरभ्र आणी तारांकित आकाश खूप पहिले आहे.अति परिचयात अवज्ञा. ती म्हणाली तेंव्हा का बोलला नाहीस? मी म्हणालो तुझा आनंद का हिरावून घेऊ? तू तर असे क्वचितच पाहतेस.
दुसर्या दिवशी संध्याकाळी आम्ही निकोबारच्या पूर्वेला आलो आणी इंदिरा पोईण्ट च्या दक्षिण पूर्वेस गस्त घालत होतो. तेथून इंडोनेशिया फक्त ८० मैलावर होता सूर्यास्त झालेला होता. आकाशात एक काळोखी भरून राहिली होती. वातावरण उदास होते. दोन दिवसांपासून काहीच करायला नव्हते. जहाजाच्या मागच्या बाजूस मी एकटाच उभा होतो. कुटुंबापासून दूर आल्याला दोनच दिवस झाले होते. आपल्या माणसांची आठवण सुरुवातीच्या काळात जास्त प्रकर्षाने होते. जसे दिवस जातात तसं मनसुद्धा स्वतःची समजूत घालतं. आंतरराष्ट्रीय समुद्राच्या हद्दीत आम्ही गस्त घालत होतो. चहूकडे शांतता पसरलेली. समुद्रहि शांत होता. अशा उदास वेळेस मी आपला वॉक मन आणला त्यात टेप टाकली आणी चालू केला. लता दीदींच्या अत्यंत खोल आवाजात गाणे सुरु झाले
नाम गुम जायेगा
चेहरा ये बदल जायेगा
मेरी आवाज ही पहचान है
माझ्या अंगावर काटा आला. अशा कातर वेळेस जेंव्हा मी पूर्ण एकटा होतो तेंव्हा लता दीदींचा आवाज किती आश्वासक वाटत होता. आपण भारतातच आहोत आणी त्या आपल्या पाठीवर थोपटत आहेत असाच भास झाला.माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. या बाईंचे आमच्यासारख्या किती तरी एकाकी लोकांवर किती मोठे उपकार आहेत.
एकदा मी माझ्या बायकोला म्हणालो कि एकदा लतादीदींचे फक्त पाय धरायचे आहेत. बाकी आम्ही सामान्य माणसे त्यांना आणखी काय देऊ शकतो?
"दिन ढले जहां
रात पास हो
जिंदगीकी लौ उंची कर चलो."
गाणे ऐकून झाले पाच मिनटे मी शांत बसलो.

तेव्हा बाबूजींच्या एका गाण्याची आठवण झाली

निर्जीव उसासे वार्याचे
आकाश फिकटल्या तार्यांचे
कुजबुजहि नव्हती वेलींची
हितगुजहि नव्हते पर्णांचे
ऐशा थकलेल्या उद्यानी
स्वर आले दुरुनी

विरहात मनाचे स्मित सरले
गालावर आसू ओघळले
होता ह्रुदयाची दो शकले
जखमेतून क्रंदन पाझरले
घाली "फुंकर" हलकेच कुणी
स्वर आले दुरुनी."

खरंच जखमेवर फुंकर घालणारी हि गीते आहेत.
लता दीदी आणि बाबूजींना साष्टांग प्रणाम

क्रमशः

पूर्वेच्या समुद्रात १०

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Nov 2015 - 3:07 pm | बिपिन कार्यकर्ते

वा! पटापट लिहित राहा हो.

टवाळ कार्टा's picture

3 Nov 2015 - 3:14 pm | टवाळ कार्टा

:)

आनंदराव's picture

3 Nov 2015 - 3:19 pm | आनंदराव

वा

वाटच बघत होतो कि पुढचा लेख कधी टाकताय.
अगदी बोटीवर घेउन गेलात आम्हाला !

एकदा लतादीदींचे फक्त पाय धरायचे आहेत. बाकी आम्ही सामान्य माणसे त्यांना आणखी काय देऊ शकतो?

आमची पण हीच ईच्छा आहे.

असंका's picture

3 Nov 2015 - 4:24 pm | असंका

अप्रतिम!!!

धन्यवाद!!

जातवेद's picture

3 Nov 2015 - 4:39 pm | जातवेद

=)

वा! मस्त अनुभूती मिळाली. पुभाप्र!

अजया's picture

3 Nov 2015 - 4:56 pm | अजया

मस्त भाग.पुभाप्र.पण..
आज डाॅ नी सर्वत्र 'आणी' का लिहिलं ?सारखं वाचताना टोचत होतं.

पैसा's picture

3 Nov 2015 - 4:57 pm | पैसा

किती सुंदर! लताच्या आवाजाने सगळा देश एकत्र बांधला आहे खरंच.

हेमंत लाटकर's picture

3 Nov 2015 - 7:19 pm | हेमंत लाटकर

तुमचा नौदलावरील प्रत्येक लेख आवर्जून वाचत असतो. नौदलावरील अनुभवावर आधारित एखादे पुस्तक काढा.

मुक्त विहारि's picture

3 Nov 2015 - 7:37 pm | मुक्त विहारि

पुभाप्र.

रेवती's picture

4 Nov 2015 - 2:27 am | रेवती

लेखन आवडले.

संदीप डांगे's picture

4 Nov 2015 - 12:18 pm | संदीप डांगे

व्वा! मस्त..... :-)

टुकुल's picture

4 Nov 2015 - 5:09 pm | टुकुल

सुंदर..
पहिल्यांदा विश्वास बसला नाही कि पुढ्चा भाग इतक्या लवकर आला :-)

--टुकुल

नितीनचंद्र's picture

4 Nov 2015 - 5:25 pm | नितीनचंद्र

सर्व लेखन वाचनीय आहे. पुढील लेखनाला शुभेच्छा !

नरेश माने's picture

5 Nov 2015 - 1:23 pm | नरेश माने

मस्त!!! खुप छान सुरू आहे लेखमालिका. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.......

बोका-ए-आझम's picture

7 Nov 2015 - 1:27 am | बोका-ए-आझम

माझ्या अंगावर काटा आला. अशा कातर वेळेस जेंव्हा मी पूर्ण एकटा होतो तेंव्हा लता दीदींचा आवाज किती आश्वासक वाटत होता. आपण भारतातच आहोत आणी त्या आपल्या पाठीवर थोपटत आहेत असाच भास झाला.माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. या बाईंचे आमच्यासारख्या किती तरी एकाकी लोकांवर किती मोठे उपकार आहेत.
एकदा मी माझ्या बायकोला म्हणालो कि एकदा लतादीदींचे फक्त पाय धरायचे आहेत. बाकी आम्ही सामान्य माणसे त्यांना आणखी काय देऊ शकतो?

खरोखर. सैन्यदलांप्रमाणेच लतादीदी सुद्धा देशाची शान आहेत. आपण दाद ही आणि हीच एक गोष्ट देऊ शकतो.

खटपट्या's picture

8 Nov 2015 - 6:16 pm | खटपट्या

खूप सुंदर.
असा एकटेपणा सहन केलाय त्यामुळे तुमच्या भावनांशी सहमत..

पुढच्या भागाची वाट पाहत आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ओ मेरे दिल के चैन, चैन आए मेरे दिल को दुआ किजिए... :- Sanam