पूर्वेच्या समुद्रात- ८

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
1 Nov 2015 - 1:25 am

पूर्वेच्या समुद्रात -१
पूर्वेच्या समुद्रात-२
पूर्वेच्या समुद्रात-३
पूर्वेच्या समुद्रात-४
पूर्वेच्या समुद्रात-५
पूर्वेच्या समुद्रात-६
पूर्वेच्या समुद्रात-७

पूर्वेच्या समुद्रात- ८
शेवटी दुपारी जेवून मी स्टेशन वर गेलो. गाडी आली वातानुकुलीत दुसर्या दर्जाच्या शयनयानात माझी जागा होती तेथे स्थानापन्न झालो . गाडी रडत रडत ८ तासांनी विजयवाड्याला पोहोचली. तेथे आमच्या बाजूचा वातानुकुलीत दुसर्या दर्जाच्या डबा बाजूला काढण्यात आला कारण या डब्याच्या चाकात दोष होता आणि त्यामुळे गाडीला ५० किमी पेक्षा जास्त वेग घेण्यास मनाई केलेली होती. यानंतर मात्र गाडी सुसाट वेगाने मद्रास( आता चेन्नई) ला पोहोचली.संध्याकाळी ५ ला पोहोचणारी गाडी रात्री बाराला पोहोचली. पण मला त्याचे दुःख नव्हते कारण माझे विमान दुसर्या दिवशी सकाळचे होते. मी चेन्नई सेन्ट्रल वरून शेवटची लोकल पकडून तांबरमला उतरलो. तेथून रिक्षाने वायुसेनेच्या तळावर पोहोचलो. तेथे माझा कूच आदेश(movement order) दाखवला. त्यांनी मला तिथल्या अधिकारी मेस मध्ये पाठवले आणि जाताना म्हणाले कि सर उद्या विमान नाही. परवा सकाळी आहे. मला थोडा वैताग आला. मी म्हणालो हे अगोदर माहित असते तर एक दिवस दिवाळीचा घरी तरी घालवला असता.
मेस मध्ये सकाळी उठलो आणि न्याहारी साठी गेलो तर तेथला डॉक्टर भेटला. फ्लाईट लेफ्ट. भार्गव म्हणून. वायुसेनेत डॉक्टरच्या कॉलरवर गुंडाळी केलेल्या सापांचे चिन्ह असते त्यामुळे इतर अधिकार्यांपेक्षा तो वेगळा समजून येतो . त्याच्याशी बोलताना तो ए एफ एम सी चाच डॉक्टर आहे हे कळले. तो मला ६ वर्षे कनिष्ठ होता (ए एफ एम सी च्या स्थापनेपासुन पहिल्या ब्याच ला A आणी नंतर B, C असे करत माझी ब्याच V आहे) भार्गव B २ ब्याचचा होता. त्याचे लग्न झालेले नव्हते त्यामुळे तो तसा रिकामाच होता. मी त्याच्या बरोबर त्याच्या दवाखान्यात गेलो. त्याच्या बरोबर मी पण रुग्णसेवा केली. त्यानंतर आम्ही तेथे असणारे SMO( SENIOR MEDICAL OFFICER) वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी विंग कमांडर कश्यप यांना भेटायला गेलो. हे P ब्याचचे होते. त्यांनी विंग कमांडर खान यांना फोन करून हे नौदलाचे डॉक्टर आले आहेत आणि त्यांना तातडीने पोर्ट ब्लेअर ला पोहोचवायचे आहे तर उद्याच्या विमानात जागा द्या अशी "विनंती"केली. त्यांच्याशी गप्पा मारून त्यांच्या बरोबर चहा पिउन आम्ही परत आलो. भार्गव बरोबर त्याच्या स्कूटर वर दुपारी चेन्नई शहरात थोडे फार फिरलो. रात्री परत आलो आणि जेवल्यावर धावपट्टीवर चालत फिरायला गेलो. तांबरमचा हवाई तळ तेंव्हा जंगलात होता त्यामुळे धावपट्टी वर हरणे फिरत होती. अगदी ३०-४० मीटर वरून जाताना दिसत होती. एक मिनिट माझ्या डोक्यात विचार आला कि या हरणाच्या मागावर एखादा बिबळ्या आला तर फुकट गडबड होईल. परंतु भार्गव म्हणाला कि येथे कोणताही शिकारी प्राणी नसल्याने हरणे मुक्तपणे फिरतात.
रात्री त्याच्या शेजारच्या खोलीत झोपलो आणि सकाळी साडेसहाला मेस मध्ये नाश्ता करून मी ७ वाजता गणवेष घालून विमानाच्या उड्डाण तळाशी पोहोचलो. तेथे एक वॉरन्ट ऑफिसरने मला विचारले काय पाहिजे? मी त्याला सांगितले पोर्ट ब्लेअर च्या विमानासाठी आलो आहे. त्यावर त्याने रागाने सांगितले त्या विमानासाठी तुम्हाला पहाटे ५ वाजता येथे यायला पाहिजे. मी त्याला सांगितले मला विंग कमांडर कश्यपनी ७ वाजता यायला सांगितले त्याप्रमाणे मी आलो आहे. त्यावर तो उर्मटपणे म्हणाला आपण उशिरा आल्यामुळे मी आपल्याला या विमानात पाठवू शकत नाही. मी त्याला तितक्याच थंड पणे सांगितले,तुम्ही विंग कमांडर कश्यपशी बोला आणि माझ्याबद्दल म्हणाल तर मला काहीच घेणे देणे नाही. कारण मी जेंव्हा तुमच्या तळावर रिपोर्ट केला तेंव्हापासून माझी जबाबदारी सम्पली.आता तुम्हाला मला पोर्ट ब्लेअरला पोहोचवायचे नसेल तर मी येथे चेन्नईत आराम करतो.
एवढ्यात दोन पायलट तेथे आले आणि त्याने त्यांचे नाव त्या विमानाच्या यादीत (mention) घातले. आता मी त्याला विचारले कि हे पायलट उशिरा आले ते कसे चालते? यावर त्यःचा आवाज बंद झाला. त्याने रागाने धुमसत विंग कमांडर खान यांना फोन केला आणि त्यांना म्हणाला सर या डॉक्टरना उशिरा आल्याने मला पाठवता येणार नाही. विंग कमांडर खान यांनि त्याला स्पष्टपणे सांगितले कि या डॉक्टरना लवकरात लवकर पोर्ट ब्लेअरला पोहोचवायचे आहे. नाहीतर गडबड होईल आणि मला विंग कमांडर कश्यप यांनि "विनंती" केली आहे. तेंव्हा त्यांना विमानातून पाठवायलाच लागेल. त्या वॉरन्ट ऑफिसरचा अहं दुखावला गेला पण काही करता येत नव्हते. ते दोघे पायलट सुद्धा तेथे बसून गम्मत पाहत होते. मला त्यांचा रागच आला. निदान त्यांनी दोन शब्द बोलायला हरकत नव्हती कि हा नौदलाचा अधिकारी आहे, याला वायू दलाचे नियम माहित नसतील.
असो. एवढ्या प्रेमालापानंतर त्याने आम्हा सर्वाना विमानाकडे कूच करण्यास सांगितले. विमानाकडे गेलो तेथे विमानात भाज्यांची पोती, मटणाच्या पिशव्या ( ज्यात कापलेले बोकड होते) असे सर्व मध्यभागी ठेवलेले होते आणि विमानाच्या भिंतीला बाकडी लावलेली होती त्याची सीट खाली करून त्यावर बसायचे होते. आतल्या भागात सर्व आर्मीचे सैनिक अगोदर येउन बसले होते. (अधिकारी म्हणून तुम्ही शेवटी चढता आणि अगोदर उतरता)
मला त्या सीटवर बसायला सांगितले ते माझ्या पायाखाली भाज्यांची पोती आणि एक मटणाची पिशवी होती. मी तेथे पाय ठेवायला नकार दिला. कारण मृत असेल तरी एखाद्या जनावराचा पार्थिवावर किंवा भाजीच्या पोत्यावर पाय देणे मला पटत नव्हते. अन्नावर पाय देणे माझ्या संस्कारात बसणारे नव्हते.
येथे मला सई परांजपे यांनी लिहिलेला लेख आठवला त्यांच्या गड्याने त्यांना भांडी पुढे सरकवायला सांगितली तेंव्हा सई ताईनि ती पायांनी सरकवली. यावर तो गडी म्हणाला "ताई भांड्यांना पाय लावू नका भांड्यांनाही जीव असतो."
मी ती भाज्यांची पोती सरकवून तेथे असलेला एक तंबूचा बॉक्स माझ्या पायाखाली घेतला. विमान AN ३२ आता तिथून निघाले आणी दोनच मिनिटात समुद्रावरून उडू लागले. भरपूर वेळ सगळीकडे फक्त समुद्रच होता आणी ढगांवर गेल्यावर काहीच दिसेनासे झाले. मग मी बाजूला मोर्चा वळवला तर तेथे एक सुभेदार साहेब बसले होते. आणी खान्द्यावर MLI( मराठा लाईट इन्फंट्री) लिहिलेले. मी त्यांच्या नावपट्टी वर नाव वाचले तर ते पवार होते. मी त्यांना विचारले सुभेदार साहेब कुठले तुम्ही? त्यांनी सातारा जिल्ह्यात तारगाव मसूरच्या बाजूला कुठल्यातरी खेड्याचे नाव सांगितले. मी त्यांना पुण्याला ए एफ एम सी आणी कमांड रुग्णालयात शिकलो ई सांगितले. त्यांच्या दोन्ही मुलांचा जन्म कमांड रुग्णालयातच झाला होता. ते सुट्टी संपवून पोर्ट ब्लेअर ला चालले होते तेथे त्यांची रेजिमेंट होती. त्यांना पण माहेरचा माणूस भेटल्याचा आनंद झाला. मराठी माणसाची किंमत आणी मराठी माणूस भेटल्याचा आनंद तुम्ही महाराष्ट्राचे बाहेर असतानाच होतो. पिकते तेथे विकत नाही.
दोन तासांनी समुद्र बघून कंटाळा आला असता खाली हिरवेगार असे बेट दिसू लागले. एखाद्या चित्रात असावे तसे. विमान जसे जसे खाली येऊ लागले तसे ते अधिकच सुंदर दिसू लागले. थोड्या वेळाने धावपट्टी दिसू लागली आणि दोन मिनिटातच विमान धावपट्टीवर उतरले. पोर्ट ब्लेअरला उतरलो तर विमान धावपट्टीच्या दुसर्या टोकाला उभे होते आणी सर्वाना पूर्ण धावपट्टीच्या कडेने चालत जाऊन मुख्य इमारतीतून बाहेर जायचे होते. (पोर्ट ब्लेअर चा विमानतळ नौदलाचा आहे) पण तेथे जवळ आमची नौदलाची रुग्णवाहिका उभी होती. ती पाहून मला आनंद झाला. (रुग्णवाहिका आपत्कालीन व्यवस्थेचा एक भाग म्हणून विमान जेथे उतरते तेथे आगीच्या बम्बाबरोबर उभी असते.) तेवढ्यात त्यातून एक वैद्यकीय साहाय्यक उतरला. त्याला पण नौदलाचा वैद्यकीय अधिकारी पाहून आनंद झालेला दिसला. तो मला ओळखत होता कारण तो मुंबईच्या अश्विनी रुग्णालयातून तेथे बदली होऊन आला होता. त्याच्या मुलाच्या वेळेस त्याच्या बायकोची सोनोग्राफी मी केली होती असे तो म्हणाला. मग मी ऐटीत त्या रुग्णवाहिकेत बसलो ते दोन्ही पायलट पाहत होते. आता मी इथे शेर होतो. ते धावपट्टी वरून चालत होते आणि मी छान गाडीत बसून चाललो होतो.
जीवनात असेच असते-- जेंव्हा पूर येतो तेंव्हा मासा मुंगीला खातो आणी जेंव्हा पाणी आटते तेंव्हा मुंगी माशाला खाते.
त्या रुग्णवाहिकेतून मी विमानतळाच्या दवाखान्यात पोहोचलो तेथे मला एक वर्ष पुढे असलेला गोयल डॉक्टर म्हणून तैनात होता. मग त्याच्या बरोबर चहा पाणी झाले आणी तो म्हणाला, 'अरे तुझ्या तटरक्षक दलाचा निरोप आला आहे कि तू आलास कि लगेच तुला जहाजात पाठवायचे आहे. कारण त्यांना सेलिंग वर जायचे आहे". मग मी माझी बैग उचलली आणी त्याच्या जीप मध्ये बसलो आणी तेथे असलेल्या हाड्डो जेट्टीला गेलो आणी समुद्र्सफरीला तयार झालो.
क्रमशः

पूर्वेच्या समुद्रात - ९

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

1 Nov 2015 - 2:00 am | टवाळ कार्टा

बर्याच दिवसांनी आला हा लेख...आणि मी पयला :)

संदीप डांगे's picture

1 Nov 2015 - 2:28 am | संदीप डांगे

डॉक, एकदम कडक,

मस्त आहे लेखमालिका... लिवा डागतरबाबू, अजून लिवा

इडली डोसा's picture

1 Nov 2015 - 3:03 am | इडली डोसा

सगळे भाग वाचले. छान ओघवती शैली आहे तुमची. एका वेगळ्या विश्वाची ओळख करुन देताय त्या बद्दल धन्यवाद.

कैलासवासी सोन्याबापु's picture

1 Nov 2015 - 8:01 am | कैलासवासी सोन्याबापु

मराठी माणसाची किंमत आणी मराठी माणूस भेटल्याचा आनंद तुम्ही महाराष्ट्राचे बाहेर असतानाच होतो. पिकते तेथे विकत नाही.

हे बाकी लैच लैच जाणवले डॉक साब, अरुणाचल मधे मराठा लाइट इन्फंट्रीची 'क्ष' बटालियन तैनात आहे हे ऐकुनच मस्त वाटले होते, तिचा सीओ यूपी चा होता पण शिवरायांच्या कथा तोंडपाठ त्याला नंतर नंतर जवानांशी मिक्सप झालो मजा मजा होती, सर्वाधिक जाणवते ते तवांग मधे, बीजिंग च्या दिशेने तलवार घुसवलेले शिवराय आहेत तिथे उभे कायम घोड़ी वर मांड ठोकुन! विलक्षण अनुभव असतो तो

वा! क्या बात है. लष्करातल्या माणसांचे अनुभव आम्हां नागरिकांना वाचायला रोचक वाटतात! पुभाप्र.

मुक्त विहारि's picture

1 Nov 2015 - 9:18 am | मुक्त विहारि

पुभाप्र.

आता पुढला भाग जरा लवकर टाकलात तर बरे...

डॉक.
हि मालिका आणी तुमचे ईतर ही सगळे लेख खूपच छान असतात.. असेच लिहीत रहा आणी आमचेही अनुभव विश्व संप्पन्न करत रहा.. खूप खूप धन्यवाद!!

बोका-ए-आझम's picture

1 Nov 2015 - 12:41 pm | बोका-ए-आझम

पुभाप्र!

अभ्या..'s picture

1 Nov 2015 - 12:44 pm | अभ्या..

मस्त डॉक्टरसाहेब.
संरक्षण दलात पण बरेच गोत्र, प्रवर असते वाचून मौज वाटली.

सुबोध खरे's picture

2 Nov 2015 - 2:04 pm | सुबोध खरे

वायुदलात गोत्र प्रवरच काय पण चातुर्वर्ण्य पद्धत आहे असे मजेने म्हटले जाते.
कारण कमांडिंग अधिकारी आणि डॉक्टर "ब्राम्हण" आहेत. त्यांना कोणीही हात लावू शकत नाही.
लढाऊ आणि इतर वैमानिक "क्षत्रिय" आहेत. त्यामुळे तेही उच्च वर्णीय. वायू दला बाबत असे म्हणतात कि AIR FORCE IS --FOR THE PILOTS, BY THE PILOTS, OF THE PILOTS
अकौन्टस आणि लॉजिस्टिक्स अधिकारी तुमचे पगार, भत्ते, रेशन इ. पाहतात ते "वैश्य" आहेत. तेंव्हा त्यांना नाराज करून चालत नाही.
आता राहिले कोण तर विमाने दुरुस्त करणारे, तांत्रिक, इंजिनियरिंग सिग्नल इ वाले. हे "शुद्र" समजले जातात. त्यामुळे जो येतो तो त्यांच्यावर आरडा ओरड करून जातो आणि त्यांचे मात्र कुणीही ऐकत नाही.
तुमची सामाजिक परिस्थिती तुमच्या शक्ती(power ही लोकांचे भले करण्याची शक्ती समजली पाहिजे) किंवा त्रास देण्याची क्षमता (nuisance value) यावर ठरते. दुर्दैवाने बरीच माणसे त्रास देण्याच्या क्षमतेला शक्ती समजतात.

अभ्या..'s picture

3 Nov 2015 - 12:24 am | अभ्या..

ईंटरेस्टींग डॉक.

दुर्दैवाने बरीच माणसे त्रास देण्याच्या क्षमतेला शक्ती समजतात.

ह्याला मात्र कचकून सहमत

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Nov 2015 - 12:57 pm | ज्ञानोबाचे पैजार

मस्त चालली आहे लेखमाला
हा भागही आवडला.

पैजारबुवा,

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Nov 2015 - 3:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लेख. आत्तापर्यंत सगळीच लेखमाला रोचक आहे. जरा लवकर लेख टाकावे.

खटपट्या's picture

1 Nov 2015 - 4:34 pm | खटपट्या

नेहमीप्रमाणे अतिसुन्दर,

पु.भा.प्र.

रेवती's picture

1 Nov 2015 - 4:49 pm | रेवती

लेखन आवडले.

पैसा's picture

1 Nov 2015 - 5:10 pm | पैसा

मस्त लिहिताय! एकदम ओघवते!

जीवनात असेच असते-- जेंव्हा पूर येतो तेंव्हा मासा मुंगीला खातो आणी जेंव्हा पाणी आटते तेंव्हा मुंगी माशाला खाते.

वाह क्या बात है डॉक..

टुकुल's picture

2 Nov 2015 - 3:03 pm | टुकुल

मस्त..

तुषार काळभोर's picture

2 Nov 2015 - 4:24 pm | तुषार काळभोर

मराठी माणसाची किंमत आणी मराठी माणूस भेटल्याचा आनंद तुम्ही महाराष्ट्राचे बाहेर असतानाच होतो.

मी चेन्नैमध्ये एक वर्षे काढलंय माझ्या पहिल्या जॉबसाठी. आमच्या ऑफिसच्या इमारतीतून खाली उतरून आम्ही रस्त्याच्या कडेला सायकलवरच्या आण्णाकडे कापी प्यायचो. (गिण्डी इंड एरिया) रस्त्याच्या पलिकडे एक औषधांचे गोदाम होते. तेथे बर्‍याचदा एमेच सिरीजचे ट्रक दिसायचे. १,२,३,४,५ सिरीज असेल तर मी ट्रकच्या जवळ जाऊन ड्रायवरच्या बोलण्याचा अंदाज घ्यायचो आणि एमेच ११ असेल तर डायरे़क्ट मराठीत बोलायचो. बर्‍याच ड्रायवरांना कापी पाजलिये तेव्हा. खरोखर माहेरचा माणूस भेटल्याचा आनंद होतो.

च्यायला त्या पुरस्कारांच्या गर्दीत हा धागा हरवला होता. सापडला अखेरीस..