पूर्वेच्या समुद्रात ६
महाबली पूरम ला जातानाचा पूर्व किनारा रस्ता (EAST COAST ROAD) यावर तेथल्या राजकारणी आणी चित्रपट अभिनेते यांचे प्रासादतुल्य बंगले त्याच्या बाजूच्या मोठ्या मोठ्या बागा त्यातील हिरवळी हे पाहून आपण भारतात आहोत कि एखाद्या परदेशात असा संभ्रम पडेल.
रस्त्यात मध्ये मगरींचे संग्रहालय पाहिले.वेगवेगळ्या मगरी सुसरी घडीयाल कासवे ई सरीसृप जातीचे प्राण्यांचे जतन केंद्र तेथे आहे.
तेथे तमिळनाडूतील इरुला या( गारुडी सारख्या) भटक्या जमातीच्या सहकारी सोसायटीचे सर्प पालन केंद्र हि होते. येथे नाग, नागराज, मण्यार, घोणस आणी फुरसे या जातीचे साप ठेवलेले होते या सापांचे विष काढून ते शीत तापमानात निर्जलीकरण करून ठेवले जात असे. हे निर्जलीकरण केलेले सर्प विष विविध प्रयोगशाळा आणी औषध कंपन्यांना सर्प विष प्रतिबंधक तयार करण्यासाठी विकले जाते आणी यातून मिळणारा पैसा त्या जमातीच्या लोकांचा चरितार्थ आणी त्यांच्या विकासासाठी वापरला जातो. हि सोसायटी प्रसिद्ध सर्पतज्ञ रोम्युलस व्हाईटेकर यांनी स्थापन केलेली आहे.
पुढे महाबलीपुरमला तेथे असलेली मंदिरे आणी भव्य शिल्पे पाहून दृष्टी निवली. त्यातून युनेस्कोची हेरीटेज साईट म्हणून अनुदान मिळत असल्याने त्याची निगा सुद्धा व्यवस्थित ठेवलेली आहे. जाला वर त्याची अनेक चित्रे आणी माहिती उपलब्ध आहेच.
दुपारी तिथेच हॉटेलात जेवलो आणी परतीच्या रस्त्याला लागलो. अशा कोणत्याही उत्तम पर्यटन स्थळाला जाऊन परत येताना मन नेहमी उदास होते कि आता परत रोजच्या कामावर जावे लागणार म्हणून.तरीही डॉक्टर महापात्राच्या कृपेने दिवस तरी चांगला गेला होता. सय्योनी गाणे केवळ मलाच नाही तर इतर तिघानाही फारच आवडलेले असावे कारण ते गाणे आम्ही कमीत कमी पाच सहा वेळा तरी ऐकले.
संध्याकाळी परत येताना मरीना बीच वर थांबलो. तेथे मसाला छोले, काकडी असे सटर फटर पदार्थ खाल्ले नारळाचे पाणी प्यायलो. मी सूर्यास्ताची वाट पाहत होतो तेंव्हा लक्षात आले कि आपण पूर्व किनार्यावर आहोत आणी येथे समुद्रकिनार्यावरून सूर्यास्त दिसत नाही. ( हा अनुभव आत्तापर्यंत कधीच आला नव्हता कारण आत्तापर्यंत पहिलेले सर्व समुद्रकिनारे पश्चिम किनार्यावरीलच होते) त्याने अजूनच उदास झाले.
शेवटी महापात्राने मद्रास च्या बंदराच्या बाहेर सोडले तेथून कोळशाच्या ओल्या काळ्या पुडीतून चालत जहाज गाठले. तेथे एक बातमी वाट पाहत होती. आपले संरक्षण मंत्री श्री जॉर्ज फर्नांडीस मद्रास ला ( बहुधा कल्पक्कम अणुकेंद्र आणी वीजकेंद्राला) भेट देणार आहेत तर त्यांच्या साठी एक पार्टी तटरक्षक दलाने चार दिवसांनी ठेवली आहे. आणी त्यासाठी आपल्या जहाजाच्या मागच्या भागाची( QUARTER DECK) निवड करण्यात आलेली आहे.
झालं. म्हणजे आता जहाजाला परत रंगरंगोटी करा सजवा आणी वेळेत विशाखापटणमला( जेथे आमचे जहाज आपला तळ हलवणार होते) पोहोचण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. परत आलो ती वार्ता कमांडिंग अधिकार्याला कळली. त्याने आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतले. त्याना भेटलो तेंव्हा ते म्हणाले डॉक्टर आपल्या मुद्पाक खान्यात फार झुरळं झाली आहेत काही तरी कर. मी वैतागून म्हणालो मी काय करू? तुम्ही पेस्ट कंट्रोल वाल्यांना बोलवा. त्यावर ते म्हणाले डॉक्टर संरक्षण मंत्री येथे जेवायला येणार त्याबरोबर संरक्षण सचिव, तट रक्षक दलाचे महानिदेशक आणी तामिळनाडू सरकारच्या इतर अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येणार. आपल्या इज्जतीचा कचरा व्हायला नको. त्याला मी विक्रांत मध्ये केलेला कीटकनाश माहित होता. मी त्याना म्हणालो सर ते काम DRDO ने येऊन केले आहे आता एवढ्या कमी वेळात त्यांना बोलावून काहीही करणे शक्य नाही. त्यावर ते म्हणाले डॉक्टर काहीतरी करायलाच पाहिजे. मी त्यांना एक उपाय सुचवला कि मुंबईतून एक धूर करणारे संयंत्र मागवता येईल का? सुदैवाने आमचा एक अधिकारी कोची हूनच काही कामासाठी मुंबईला गेला होता. त्याला मी फोन लावला. आणी मरीनलाइन्स स्टेशनच्या जवळ प्रिन्सेस स्ट्रीटला एक व्होरा केमिस्ट आहे त्याच्या कडून CANON SMOKE INSECTICIDE घेऊन यायला सांगितले.
http://mumbai.all.biz/canon-smoke-insecticide-g342557#.VgZVStKqqko
हे छोट्या डब्यासारखे असते. दुसर्या दिवशी रात्री(सोमवारी) तो अधिकारी विमानाने आला तेंव्हा ते घेऊन आला.मंगळवारी सकाळी न्याहारी नंतर सगळ्या अधिकारी आणी सैनिकांना बाजूच्या विक्रम या तट रक्षक दलाच्या जहाजावर पाठविले आणी फक्त अग्निशमनाचे काम करणाऱ्या चार कर्मचार्यांना मी बरोबर ठेवले. ते CANON चे डबे मुदपाकखान्यात एक आणी एक जेवायच्या हॉल मध्ये ठेवले. तो डबा फोडून त्यात जळती काडी टाकायची आणी खोली बंद करायची. आतल्या धुराने सगळे कीटक घुसमटून बाहेर येतात आणी बाहेर मरतात.एक दीड तासाने खोली उघडली आणि तेथे गेलो तर भरपूर झुरळे आणी माश्या मरून पडलेले होते. ती पाहून कमांडिंग अधिकारी खुश झाला आणी म्हणाला, "डॉक, तुमने तो कमाल कर दिया!" मी त्यांना म्हणालो सर जॉर्ज साहेब यायच्या आदल्या दिवशी एकदा परत एकदा मोर्टीनचे स्प्रे मारायला हवेत. या परमेथ्रीन असलेल्या स्प्रेचा वास रेंगाळत राहत नाही त्यामुळे आदल्या दिवशी रात्री याचे फवारा मारून ठेवू म्हणजे उरली सुरली झुरळे माश्या आणी इतर किडे मरतील. निदान पार्टी तरी व्यवस्थित पार पडेल. असा फवारा मी आदल्या दिवशी रात्री कुक आणी स्टेवर्ड कडून मारून घेतला. इतर नौसैनिकांनी एखाद्या लग्नाच्या मांडवासारखे जहाज सजवले होते. आतून बाहेरून पांढरा स्वच्छ रंग मारला होता.
दुसर्या दिवशी दुपारी बातमी आली जॉर्ज साहेबांचा कार्यक्रम बदलला आहे तेंव्हा ते कल्पक्कम वरून थेट विमानतळावर जाणार असून तेथून दिल्लीला रवाना होतील. हे म्हणजे एखाद्या मुलीने "दाखवायच्या" कार्यक्रमासाठी पूर्ण जामा निमा करायचा आणी मुलाच्या आईचे पोट बिघडले म्हणून कार्यक्रम रद्द असा निरोप यावा असे झाले. पण सांगता कुणाला?
त्याच बरोबर आम्हाला विशाखापटणमला कूच करायचाही हुकुम मिळाला. आता त्यांची (स्थानीक तट रक्षक मुख्यालयाची) गरज संपली होती. आम्ही सुद्धा घाई घाईने मद्रास बंदर सोडले कारण जास्त वेळ तिथे रेंगाळले असतो तर फुकट नवीन काम (पाल्क च्या सामुद्रधुनीत गस्त घालणे इ) गळ्यात पडण्याची शक्यता होती. जहाजावर प्रत्येकाला आपला तळ हलवून आपला बाड बिस्तरा घेऊन आपल्या कुटुंबाला विशाखापटणमला हलवायचे होते. मुलांच्या शाळा सुरु झाल्या होत्या. त्यांना इकडच्या शाळेत प्रवेश घ्यायचे होते.
दुसर्या दिवशी संध्याकाळी आम्ही विशाखापटणमला पोहोचलो. तेथे पोहोचल्यावर मला एक सुवार्ता कळली ती म्हणजे माझे डेप्युटेशन तटरक्षक दलात असल्याने मला नौदलात घर मिळणार नव्हते आणि तटरक्षक दलाकडे घरे नव्हतीच. म्हणजे मला शहरात कुठेतरी घर शोधायला लागणार होते. एक तर मी स्वतः नौदलात अधिकारी असताना मला घर मिळणार नाही हि गोष्टच माझ्या पचनी पडत नव्हती त्यातून मी जहाजात काम संपले कि विशाखापटणमच्या रुग्णालयात काम करायचे असे माझ्या बदलीच्या हुकुमत लिहिलेले होते. म्हणजे कामाला मी नौदल आणि तट रक्षक दलात दोन्ही कडे आणि सुविधांसाठी कुणाचाच नाही.अंगाचा अगदी तिळपापड झाला होता. परंतु मी पहिल्यांदा शहरात घर शोधायला सुरुवात केली. नौदल तळाजवळ घरे नव्हती. शहरात असा भाग शोधायचा होता जो नेव्हल पब्लिक स्कूल च्या जवळ आहे किंवा जिथे त्यांची बस येते म्हणजे माझ्या मुलीला के जी मध्ये प्रवेश घेणे सोपे झाले असते. रोज संध्याकाळी आपली मोटार सायकल घेऊन मी घरे शोधाच्या मोहिमेवर निघायचो. एच आर ए (घरभाडे भत्ता) जास्तीत जास्त १५०० रुपये मिळणार होता. तेवढ्या पैश्यात मी विशाखापटणमला तीन बेडरूमचे प्रशस्त घर भाड्याने घेतले. हे शहरापासून लांब होते परंतु नेव्हल के जी ला तेथून बस होती. घर भाड्याने घेतले आणि आता कुटुंब तेथे आणण्याची तजवीज करायला लागलो. परंतु तटरक्षक दलाने आम्हाला उसंत दिली नाही. दर दोन दिवसानी आम्हाला चार पाच दिवस सेलिंग ला जायला लागायचे. म्हणजे पाच दिवस समुद्रावर काढले कि उरलेल्या दोन दिवसात सकाळी मी तिथल्या रुग्णालयात काम करायला जात असे आणि संध्याकाळी मुंबईत फोन करून सामान हलवायचे कुटुंबाला कसे इकडे आणायचे याचे बेत ठरवत असे.प्रत्येक बेत ढासळत असे कारण आम्हाला समुद्रावर पाठवत.जहाजावर मी एकटाच डॉक्टर असल्याने मला सुटी सुद्धा मिळत नव्हती. कारण जहाजावर हेलीकॉप्टर असेल तर डॉक्टर असणे आवश्यक होते. असा एक महिना गेल्यावर शेवटी माझे वडील माझ्या बायको मुलांना( मुलगी ४ वर्षे आणि मुलगा दीड वर्षे वय ) घेऊन विमानाने विशाखापटणमला आले आणि भावाने माझे सामान एका ट्रक मध्ये विशाखापटणमला पाठवून दिले. विशाखापटणमला एका वर्षात मी चार घरे बदलली.आणि माझ्या मुलीने दीड वर्षात पाच शाळात प्रवेश घेतला. त्याची कहाणी पुढे येईलच. यातच माझ्या पुढील संघर्षाची बीजे पेरली गेली.
क्रमशः
Book traversal links for पूर्वेच्या समुद्रात ६
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वाचतोय!
नेहमीच अनुभवसमृद्ध होता येते
नेहमीच अनुभवसमृद्ध होता येते असे नसते....
छे हो, राग कसला त्यात! आता
"विशाखापटणमला एका वर्षात मी चार घरे बदलली....
खुप वेळ लागला बुवा या भागाला.
छान
अरे बाप रे! काय तो वैताग असेल
डॉक..मस्त चाललंय कथाकथन
वाचतिये.
आज पहिल्यांदाच वाचतोय. मस्त
हा संघर्ष काही प्रमाणात
किमान संरक्षण क्षेत्रात तरी असं नको व्हायला....
असाच अनुभव माझा पण आहे....
मस्त चालली आहे लेखमाला ! खूप
बदलीची नोकरी असेल तर मुलं
अगदी! अभ्यासाचे नुकसान मात्र
डॉक,पुढचा भाग टंकण्यास जास्त
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Ashai Mugam" ft. Vidya Vandana :- Shankar Tuckerच्यायला डेपुटेशन असलीच कटकट
बापूसाहेब
ही लेखमाला अप्रतिम आहे डाॅक्टर
हा भागही खूप आवडला.
भाग नेहमीप्रमाणे आवडला!
आवडला हा पण...
वाचते आहे
नेहमीप्रमाणे अप्रतीम भाग.
वाचतोय.