सायकलीशी जडले नाते ४: दूरियाँ नजदिकीयाँ बन गई. . .

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
23 Nov 2015 - 1:48 pm

सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक

सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक

सायकलीशी जडले नाते ३: नदीसोबत सायकल सफर

दूरियाँ नजदिकीयाँ बन गई. . .

पुण्याच्या जवळपासच्या चढ- उतारांच्या रस्त्यांवर दोन अर्धशतकांनंतर चांगला आत्मविश्वास आला. आता हाच क्रम पुढे सुरू ठेवायचा आहे. पानशेत डॅमच्या सोलो राईडनंतर चारच दिवसांनी तिथे परत दोन मित्रांसोबत ग्रूप राईड केली. नंतर २ ऑक्टोबरला त्याच मित्रांसोबत एनएच ४ वरसुद्धा एक राईड केली. त्यामध्ये पन्नास- साठ किलोमीटर जाणं अपेक्षित होतं, पण मित्राची सायकल पंक्चर झाल्यामुळे ते जमलं नाही. त्याऐवजी फक्त २८ किलोमीटरची एक छोटी राईड झाली. पण त्यातही दिड किलोमीटर टनेलमध्ये सायकल चालवली. लहान लाईट असले तरी अंधारातला बोगदा आणि त्यातून जाणारा रस्ता. दोन लेनचा रस्ता असला तरी सायकल चालवणा-यांना हेवी ट्रॅफिकचा त्रास होतो. आणि टनेलमध्ये रस्त्याच्या डावीकडे काचेचे बारीक तुकडे विखुरलेले होते. जेव्हा अपघात झाले असतील, तेव्हा पडलेले काचेचे तुकडे टनेकमध्ये डाव्या बाजूला ठेवले असणार. पण तरीही टनेलच्या आत चालवताना मजा आली. टनेल संपत आलं, तसा हळु हळु प्रकाश वाढत गेला. आपल्यापैकी कित्येकांना असं स्वप्न पडलं असेल- आपण एका टनेलमधून जातोय आणि शेवटी पुढे प्रकाश आहे. जीवनाची एकूण कथा हीच तर आहे- किंवा असायला हवी. . असो. ह्या राईडमध्ये एक छोटा घाट चढण्याचा अनुभवही मिळाला.

थोड्याच दिवसांनी ६ ऑक्टोबर २०१३ ला मोठी राईड केली. पुण्याच्या एका टोकापासून दुस-या एका टोकापर्यंत- डिएसके विश्व, धायरी ते एनएच ४- वाकड- चिंचवड गाव- तळवडे एमआयडीसी मार्गे चाकणजवळच्या खराबवाडीकडे. एकूण अंतर सुमारे ५२ किलोमीटर आणि वेळ फक्त साडेतीन तास इतका लागला. त्यामुळे उत्साह आणखीन वाढला. आतापर्यंत शरीराला अशा सायकलिंगची चांगली सवय झाली आहे. त्यामुळे थकवाही अगदी थोडा आला. दुस-या दिवशी त्याच मार्गाने परत गेलो. प्रचंड ट्रॅफिक असलेल्या एनएच ४ वरून सायकल चालवून छान वाटलं. आणि सायकलवर लागलेला वेळ साडेतीन- चार तास हा बसने लागणा-या वेळेइतकाच आहे (बस बदलणे- बसची वेटिंग- स्टॉप्स धरून). पण त्या रस्त्याने सायकल चालवण्याचा आनंद अवर्णनीय आहे! मोठ्या शहरांमध्ये मला न आवडणा-या अनेक गोष्टी आहेत; पण काही थोड्याशा गोष्टी मला आवडणा-या आहेत आणि त्यात नवीन बनलेले सुंदर रस्ते आहेत! इंडस्ट्रियल एरियामधले नवीन बनलेले सुंदर दोन लेनचे हायवे! आणि आत्ता ते नवीन आहेत, त्यामुळे ट्रॅफिकही कमी आहे. अशा सुंदर व सुनसान रस्त्यांवर सायकल चालवण्याची मजा और! दुस-या दिवशीच्या अर्धशतकासह लागोपाठ दोन दिवशी अर्धशतक झाले. गेल्या एक महिन्यात भरपूर सायकल चालवली.


शहरीकरणाच्या रेट्यामध्ये नष्ट होण्याच्या मार्गावर असलेलं जांभुळवाडीचं तळं

आता हळु हळु सायकल चालवण्याचे फायदे समजत आहेत. शारीरिक लाभ तर आहेतच- शरीर भक्कम होतं, पोटाचे- पायांचे विकार ठीक होऊ लागतात; चांगली भूक लागते; चांगलं पचन होतं. शरीरामध्ये जमा असलेली अतिरिक्त ऊर्जा खर्च होते. म्हणजे जर कोणाला तोंडात फोड आले असतील, तर सायकलवर मोठी राईड सुरू केल्यास लवकरच ते निघून जातात. कारण शरीरात अतिरिक्त असलेली ऊर्जा मोकळी होत जाते. त्याच्याशिवाय मानसिक लाभही आहेत. शरीराप्रमाणेच मनातही ब्लॉकेज असतात. ते ह्यामुळे मोकळे होऊ लागतात. शिवाय निसर्गाच्या जवळ वेळ घालवल्यामुळे सकारात्मक ऊर्जा खूप मिळते. मनामध्ये आधी जे तणाव- चिंता असतात, त्याही वाहून जातात. एकाग्रताही वाढते. स्वत:ला खूप मोठा पॉझिटिव्ह स्ट्रोक मिळतो की मी इतकं सायकलिंग करू शकतो. अर्थात् सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एक नवीन दृष्टी- नवीन व्हिजन मिळते की ह्या गोष्टी अशासुद्धा करता येऊ शकतात. आणि अन्य एक परिणाम म्हणजे इच्छा मंदावतात. ज्या दिवशी मोठी राईड केली असेल, त्या दिवशी अन्य दुसरी इच्छा प्रबळ होत नाही. असो.


सकाळच्या प्रसन्न वेळेस सायकलिंग! अहा हा!

आत्तापर्यंत जितक्या राईडस केल्या आहेत, त्यातल्या दोन सोडून इतर सर्व सोलो राईडसच आहेत. घरचे अनेकदा म्हणतात की, ग्रूपमध्ये जात जा. माझा दृष्टीकोन थोडा वेगळा आहे. कदाचित ग्रूप सायकलिंग मला फारसं जमणार नाही. आणि जे दोन ग्रूप राईडस केले, त्यातही हेच दिसलं. एका व्यक्तीची सायकलिंग ही खूप युनिक गोष्ट असते. तुमचं सायकलिंग ह्यावर अवलंबून आहे की, तुमचा फिटनेस किती आहे, सध्याचा स्टॅमिना किती आहे, तुम्ही किती नियमित किंवा अनियमित सायकल चालवता, तुम्ही कोणत्या प्रकारच्या रस्त्यांवर जास्त सायकल चालवता, तुमची सायकल कोणत्या प्रकारची आहे आणि प्रत्यक्ष सायकल चालवण्याच्या वेळी तुमचा आहार आणि शरीरातील ऊर्जा स्तर कसा आहे. त्यामुळे सायकल चालवणं ही खूप individualized गोष्ट असते. जर ग्रूपमध्ये जायचं असेल, तर सगळ्यांना सोबत जावं लागतं. अर्थातच त्यात अडचण होते. जो फास्ट चालवणारा असेल, त्याला कमी गतीने जावं लागतं आणि जो कमी गतीने जाणारा असेल, त्याच्यावर लवकर जाण्यासाठी दडपण येतं. आणि प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. कोणी पहिल्या किलोमीटरपासून वेग घेतो; कोणी हळु हळु वार्म अप होतो. कोणाला कमी अंतरानंतर ब्रेक्स लागतात तर कोणाला जास्त. प्रत्येकाचा स्टॅमिना आणि तयारीची पातळी वेगळी असते. त्यामुळे ग्रूप सायकलिंग मला फारसं आवडलं नाही. त्याऐवजी स्वत:च्या नैसर्गिक गतीने जाता येईल असं सोलो सायकलिंगच जास्त ठीक वाटलं. त्यामुळे मी पुढे बहुतांश राईडस ग्रूप ऐवजी एकट्याने केल्या. सुरक्षेच्या दृष्टीने मला काहीही गरज वाटली नाही. आणि राहिला पंक्चर व इतर बाबींचा मुद्दा, त्याबद्दल मी हळु हळु शिकत गेलो. मला तर वाटतं ग्रूपमध्ये सायकलिंग करण्याऐवजी एकट्याने केल्यामुळेच मी अनेक गोष्टी शिकलो. अर्थात् काही गोष्टी ग्रूपमध्ये जास्त चांगल्या शिकता येतात. त्याची जाणीव मला पुढच्या वर्षी परभणीच्या ग्रूपमध्ये सायकलिंग केलं, तेव्हा झाली. असो.

. . सायकल चालवण्याचा आत्मविश्वास वाढतोय तसा पुढच्या राईडसचा विचार करतोय. आता इतक्या राईडसनंतर डिएसकेचा चढही सायकलीवर बसून पार होतोय. अर्थात् मध्ये दोनदा थोडं थांबावं लागतंच. पण सुधारणाही बरीच आहे. आता विचार करतोय सिंहगडावर जाऊन पाहावं. जर डिएसकेचा क्लाइंब सायकलवर पूर्ण करता येतोय, तर तिथेही जाऊन बघावं. तेव्हा खरं कळेल.

पुढील भाग: सायकलीशी जडले नाते ५: सिंहगड राउंड १. . .

अशा इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग

समाजजीवनमानप्रवासविचारअनुभव

प्रतिक्रिया

सिंहगडाच्या राईडच्या प्रतीक्षेत.

मोदक's picture

23 Nov 2015 - 2:09 pm | मोदक

वाचतोय.

मीही थोड्याफार प्रमाणात याच मार्गांवर सायकलींगची सुरूवात केली होती.

पुढील भागांच्या प्रतिक्षेत..!!!!

बोका-ए-आझम's picture

23 Nov 2015 - 2:39 pm | बोका-ए-आझम

च्याशिवाय मानसिक लाभही आहेत. शरीराप्रमाणेच मनातही ब्लॉकेज असतात. ते ह्यामुळे मोकळे होऊ लागतात. शिवाय निसर्गाच्या जवळ वेळ घालवल्यामुळे सकारात्मक ऊर्जा खूप मिळते. मनामध्ये आधी जे तणाव- चिंता असतात, त्याही वाहून जातात. एकाग्रताही वाढते. स्वत:ला खूप मोठा पॉझिटिव्ह स्ट्रोक मिळतो की मी इतकं सायकलिंग करू शकतो. अर्थात् सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एक नवीन दृष्टी- नवीन व्हिजन मिळते की ह्या गोष्टी अशासुद्धा करता येऊ शकतात. आणि अन्य एक परिणाम म्हणजे इच्छा मंदावतात. ज्या दिवशी मोठी राईड केली असेल, त्या दिवशी अन्य दुसरी इच्छा प्रबळ होत नाही.

+१००००००

अजया's picture

24 Nov 2015 - 9:09 am | अजया

सहमत.
सायकल घेण्याची इच्छा इथले निरनिराळे लेख वाचून बळावते आहे.

_मनश्री_'s picture

23 Nov 2015 - 3:35 pm | _मनश्री_

खूप सुरेख लिहिलंय
पुढील भागाच्या प्रतीक्षेत

मित्रहो's picture

23 Nov 2015 - 5:50 pm | मित्रहो

सिंहगड राइडचा अनुभव वाचायला आवडेल.
फोटो छान आहेत.

बाबा योगिराज's picture

23 Nov 2015 - 5:53 pm | बाबा योगिराज

मस्तच अनुभव आहेत.अजूनही येऊ द्या.
पुढील भागाची वाट बघत आहोत.

लेख व जांभूळवाडीचा फोटो आवडला. पुढील भाग कधी?

अरिंजय's picture

24 Nov 2015 - 1:00 pm | अरिंजय

मार्गी दादा, मोदक दादा तुमचे सायकलींवरचे लेख वाचुन माझे पण सायकल वेड जागे झाले आहे. साधारण १९९२, अभियांत्रीकी व्दितीय वर्षानंतर सायकल चालवणे बंद झाले ते आजतागायत. गेल्या वर्षी मुलीला सायकल घेतली ती गंमत म्हणुन थोडीफार चालवली. मी या वर्षी नविन घ्यायचा विचार करत होतो त्यात अजुन तुमचे लेख वाचुन जास्तच आग लागली. लवकरच श्रीगणेशा करणार.

मार्गी's picture

24 Nov 2015 - 4:00 pm | मार्गी

सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि सायकलिंगसाठी शुभेच्छा!!

पैसा's picture

1 Dec 2015 - 9:50 pm | पैसा

मस्त वाटतंय वाचून!