✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सायकलीशी जडले नाते १०: एक चमत्कारिक राईड- नर्वस नाइंटी!

म
मार्गी यांनी
Fri, 12/18/2015 - 12:00  ·  लेख
लेख
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद. सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक सायकलीशी जडले नाते ३: नदीसोबत सायकल सफर सायकलीशी जडले नाते ४: दूरियाँ नज़दिकीयाँ बन गईं. . . सायकलीशी जडले नाते ५: सिंहगड राउंड १. . . सायकलीशी जडले नाते ६: ऊँचे नीचे रास्ते और मन्ज़िल तेरी दूर. . . . . . सायकलीशी जडले नाते ७: शहरामधील सायकलिंग. . . . . . सायकलीशी जडले नाते ८: सिंहगड राउंड २! सायकलीशी जडले नाते ९: दुसरे शतक. . . एक चमत्कारिक राईड- नर्वस नाइंटी! ८ फेब्रुवारीला दुसरं शतक केल्यानंतर काही दिवसांची गॅप पडली. छोट्या राईडससुद्धा कराव्याशा वाटल्या नाहीत. त्या काळात मला छोट्या पण नियमित राईडसचं महत्त्व माहिती नव्हतं. त्यामुळे विचार करायचो तो मोठ्या राईडसचाच. कित्येक दिवस डे- ड्रिमिंग चालायचं. लवकरच पुढच्या राईडची योजना बनवली. समुद्राचं खूप मोठं आकर्षण मनात आहे. त्यामुळे विचार करतोय की, समुद्र किना-यापर्यंत सायकल चालवेन. पुण्यातून कोंकणातील दिवे आगारपर्यंत जाण्याची योजना बनवली. एकूण प्रवास १६० किलोमीटरचा होईल. आधी १२१ आणि ११२ किलोमीटर चालवल्यामुळे १६० किलोमीटर चालवण्याचा विश्वास वाटत आहे. आणि ह्या राईडमध्ये मी घाट उतरून कोंकणात जाईन. त्यामुळे सुमारे २० किलोमीटरचा उतारही मिळेल. इंटरनेटवरून सगळी माहिती घेऊन तयार झालो. २३ फेब्रुवारी २०१४. ह्या वेळी पहाटे ५.३० वाजता बाहेर पडून सायकल सुरू केली. पहिल्यांदाच इंडिकेटर लाईटचा वापर करतोय. सायकलवर बाटली ठेवण्यासाठी एक छोटा स्टँडसुद्धा लावला आहे. पहाटेची मस्त थंडी! थोडं अंतर गेल्यावरच बाटली पडली. मग ती सॅकमध्येच ठेवलं. अंधारातच एनएच ४ वर सायकलिंग सुरू केलं. एक इंडिकेटर आणि एक टॉर्च सोबत आहेत. पण लवकरच ते पुरेसे नाहीत, हे कळालं. त्यामुळे सुमारे दिड तास अंधारातच सायकल चालवली. हायवेवर चालवताना अडचण येतेय, पण पुढच्या व मागच्या वाहनांचा प्रकाशही आहे. बारा किलोमीटरनंतर हायवे सोडला तेव्हा अवघड वाटलं. कारण आता प्रकाश अगदी कमी आहे आणि मध्येच वेगात जाणारी वाहनं येत आहेत. त्यामुळे डोळ्यांना दोन क्षण काहीच दिसत नाही. हळु हळु उजाडायला सुरुवात झाली. एक पाचव्या ग्रेडचा घाट अंधारातच पार झाला.    चांगलं उजाडलं तेव्हा बरं वाटलं. धुकं ओढून पहुडलेले डोंगरही दृग्गोचर झाले. अंधारामध्ये मिस झालेला सुंदर नजारा आता दिसायला लागला. इथून पुढे सुंदर नजा-यांची मेजवानी मिळणार! आता पहिले नाश्त्याचं हॉटेल बघायचं आहे. वाटेत हॉटेल अनेक लागत आहेत, पण सकाळचे साडेसातच वाजले आहेत, त्यामुळे ते बंद आहेत. तितक्यात अजून एक चढ लागला. पिरंगुटच्या आधीचा घाट. इथून सिंहगडही दूरवरून दिसतोय. दोन तास झाल्यामुळे आता पाय मोकळे झाले आहेत. त्यामुळे चढावर अडचण आली नाही. दोन तासांमध्ये सुमारे चोवीस किलोमीटर झाले आहेत आणि भरपूर घाम आला आहे. पाणीसुद्धा भरून घ्यायचं आहे. पिरंगुटमध्ये हॉटेल मिळालं. इथे नाश्ता केला आणि लगेच पुढे निघालो. पिरंगुटनंतर मोठं गाव एकच लागतं- पौड. त्यानंतर पुढे वस्ती विरळ होत जाईल. पिरंगुटनंतर लगेच पुन: एक चढ आला. पण थकलो नसल्यामुळे तो सहज पार झाला. सायकलमधली हवा बहुतेक कमी झाली आहे. पंक्चरची भिती वाटली. पौड हेच ह्या रस्त्यावरचं मोठं गाव. त्यानंतरचं मोठं गाव सुमारे साठ- सत्तर किलोमीटर नंतरच येईल. सुदैवाने इथे एक सायकलचं दुकान मिळालं. दुकान आहे, पण घर उघडं होतं. त्यामुळे पंक्चर चेक करता आलं. पंक्चर नव्हतं, फक्त हवा कमी झाली होती. लगेच पुढे निघालो.    हळु हळु ऊन्हाचा कडाका वाढतोय. फेब्रुवारी महिना म्हणजे 'संधी काल' आहे. पहाटे कडक थंडी असते आणि पूर्ण दिवसभर कडक ऊन. घड्याळाचा काटा पुढे जातोय तसं ऊन वाढत आहे. भरपूर पाणी पिऊनही त्रास कमी होत नाहीय. ह्या रस्त्यावर दुसरी अडचण म्हणजे खाण्याचे पर्याय फार कमी आहेत. गावंही छोटी लागतात. बरंच अंतर पुढे गेल्यावर माले गाव आलं जिथे थोडा नाश्ता मिळाला. आत्तापर्यंत सुमारे साठ किलोमीटर झाले आहेत. थोडा थकवा सुरू झाला आहे. कडक ऊन्हामुळे अजून त्रास होतोय. आता वारंवार थांबावं लागत आहे. पण नजारे अतिशय सुंदर आहेत! छोटा निर्जन रस्ता, त्याच्याजवळ शेती, डोंगर आणि नदी! मुळा नदी ह्या रस्त्याला समांतर वाहते. मुळशी गावाजवळ असलेलं धरण दिसू लागलं. आता हा रस्ता धरणाला वळसा घालून पुढे जाईल. रस्ता तसा समतलच आहे. मध्ये मध्ये चढ- उतार येतोय. मुळशीनंतर एका जागी तीव्र चढ लागला आणि सायकलची चेन पडली. ह्या चढावर सायकल चालवणं कठिण झालं. चढ फार तीव्र नाही, पण साठपेक्षा जास्त किलोमीटर पूर्ण झाल्यामुळे थकवाही वाढतोय आणि ऊर्जा स्तर कमी होत जातोय. त्यामुळे हा छोटा घाट पायी पायी चढावा लागला. सतत घाम येतोय आणि शरीर थकत आहे. इथून उत्साह कमी व्हायला सुरुवात झाली! पण तरीही पुढे जात राहिलो. ह्या प्रवासाचं गंतव्य स्थान- किना-यावरील दिवे आगारच्या एका रेसॉर्टचा बोर्ड दिसला, त्यामुळे थोडी प्रेरणा मिळाली. एका ठिकाणी लॉरीमध्ये सायकल ठेवून परत जाणारा सायकलिस्टही दिसला.    मुळशीनंतर रस्ता अगदी निर्जन भागातून जातो. ह्या टप्प्यावर मैलाचे दगडही लागत नाहीत. काही वेळ अनिश्चितता वाटली की मी नक्की कुठे आलोय. मोबाईलच्या जीपीएसवर चेक केलं तेव्हा कळालं की, मी ताम्हिणी घाटाच्या जवळ आलोय. अजून थोडंच अंतर आणि मग ताम्हिणी घाट येईल जिथून उतार मिळेल. थांबत थांबत पुढे जात राहिलो. आता सकाळचे अकरा वाजले आहेत. 'फक्त अकरा', पण मी पहाटे साडेपाचपासून सायकलवर असल्यामुळे ते 'अकरा!!' वाटत आहेत. खूप वेळाने ताम्हिणी गाव आलं. पण हे काय! इथे काहीही नाहीय. एक टपरीसारखं हॉटेलही नाहीय. चहासुद्धा नाही! कसंबसं फक्त पाणी मिळालं. आता मनोबल वेगाने कोसळत आहे. त्यातच आणखी एक गोष्ट- अजून उतार आलेलाच नाही. किंबहुना रास्ता हलक्या चढ- उताराचा आहे! हा टप्पा ह्या राईडमधला सगळ्याट कठिण टप्पा आहे. मैलाचे दगड नेमकी माहिती देत नसल्याने किती पुढे आलोय, हेही नीट कळत नाहीय. शरीरात ऊर्जा झपाट्याने कमी होते आहे. सायकलिंगचा वेगही थोडा कमी झाला आहे. अर्थात् आधीच्या घाटानंतर मोठा चढ लागलेला नाहीय. तसंच जात राहिलो आणि पुढे एक गाव लागलं. इथे स्टोअरसुद्धा आहे. चला, बिस्किट- चिप्स मिळतील. पाणीसुद्धा मिळेल. मोबाईलला नेटवर्क नाहीय, बूथवरून घरी बोललो. फक्त सत्तर किलोमीटरच आलोय, पण वाटतंय असं की, मी खूप दिवसांपासून सायकलिंग करतोय! बिस्किट खात असताना एक बस येऊन थांबली. मनात इच्छा आली की, एक मित्र उतरला तर किती बरं होईल! हळु हळु मन सायकल चालवण्याच्या विपरित होतं आहे- यु टर्न घेण्याकडे वाटचाल करत आहे!    त्या एकाकी गावातून पुढे रस्ता आणखी निर्जन भागात जातोय. इथे जंगलच दिसतं आहे. आता मोठे डोंगर अगदी जवळ आले आहेत. पण हा रस्ता खाली कधी उतरणार? परिसर अतिशय रम्य आहे. माणसाला कितीही गर्व होवो, तो स्वत:ला निसर्गापेक्षा कितीही श्रेष्ठ मानो, निसर्ग इतका विराट आहे कि, मानव त्याच्यापुढे मुंगीइतका क्षुद्र आहे. उंच डोंगर आणि तिथलं जंगल! जंगलासारखा परिसर असल्यामुळे रस्त्यावर माकडंही आहेत. हे सर्व ठीक आहे, पण. . उतार आहे कुठे? दूरवर हळु हळु डोंगरांची रांग संपताना दिसतेय. नक्कीच पुढे एका बिंदुपाशी डोंगर रांग संपेल आणि तिथून मोठा उतार मिळेल जो सरळ खाली कोंकणात घेऊन जाईल. पण कधी? शरीर झपाट्याने थकत जातंय. एक रस्ता लोणावळाकडे जाणारा मिळाला. थोड्या वेळासाठी वाटलं की, डोंगर रांग संपली आणि आता उतार आलाच. पण नाही. रस्ता अजूनही समतलच आहे. आता कसंबसं स्वत:ला ओढतो आहे. लवकरात लवकर हॉटेल मिळायला हवं नाही तर माझी स्थिती अजून बिकट होईल.   लोणावळाकडे जाणारा रस्ता  बराच वेळ चालत राहिल्यानंतर शेवटी एक हॉटेल मिळालं. चला, उतार तर नाही, पण हॉटेल मिळालं. दुपारचे "फक्त" साडेबारा वाजले आहेत. पण शरीराने आता परतीचा निर्णय घेतला आहे. इथूनच- आदरवाडीमधून- लिफ्ट घेऊन परत फिरावं असं वाटत आहे. आधी काही खातो, मग बघतो. इथे आमलेट मिळालं. बराच वेळ विश्रांती घेतली. नक्की किती अंतर चाललो आहे, हे मॅप बघितल्यावरच कळेल. पण ७५- ८० किलोमीटर नक्की आलो असणार. पण आता पुढे जाण्याचा विचारही करवत नाहीय. दहा- पंधरा किलोमीटर उतार धरला तरी पुढचा रस्ता प्रचंड कठिण जाईल. त्यामुळे इथूनच परत फिरतो. लिफ्टसाठी जीप/ लॉरी असं काही मिळेल. खूप वेळानंतर एक चांगली गोष्ट झाली ती म्हणजे लवकरच बस जाईल, ही माहिती मिळाली. एकदम बरं वाटलं. अर्थात् मनामध्ये शंकाकुशंका होत्याच की, ती बस इथे थांबेल का? बसचा कंडक्टर सायकल ठेवू देईल. . . ? आदरवाडी गावात हा स्टॉप आहे. तिथेही पायी पायीच गेलो. स्टॉपवर ग्रामस्थ भेटले. बोलून थोडं बरं वाटलं. थोड्या वेळाने बस आली. सायकल वर ठेवताना कंडक्टरने बरीच मदत केली. त्यानेच वर चढून सायकल ठेवली. पण हे सर्व होताना मन खूप नर्वस आहे. परतीचा प्रवास सुरू झाला. पण मन स्वत:ला दोष देतं आहे. अरे रे! "क्या से क्या हो गया!!" कुठे १६० किलोमीटरचं लक्ष्य आणि फक्त ८० किलोमीटरमध्येच माघार!!?? पण जे झालं ते असं. शरीराने आदेश दिला व तो ऐकावा लागला.  तीन छोटे क्लाइंबस  रूट मॅप   नंतर चांदणी चौकात बसमधून सायकल खाली उतरवली. रस्त्यावरच्या एका माणसानेसुद्धा मदत केली. सायकल चढवणं आणि मग उतरवणं कठिण वाटलं. पण झालं एकदाचं. आता इथून बारा किलोमीटर परत सायकल चालवेन. हा शेवटचा टप्पा सोपा गेला. कधी‌ एकदा घरी पोहचतो, असं डेस्परेशन झालं, पण अंतर कमी असल्यामुळे चालवत गेलो. अंधार होण्यापूर्वी घरी पोहचलो. पूर्ण शरीरभर वेदना आणि थकवा आहे. घरातल्या सुरक्षिततेमध्ये पोहचल्यावर आनंद वाटला. बराच वेळ आराम केला. नंतर ह्या प्रवासाचं अंतर बघितलं. तेव्हा कळालं की, मी दुपारी एक वाजायच्या आत ८१ किलोमीटर सायकल चालवली होती. पहाटे साडेपाच पासून साडेसहा- सात तासांमध्ये ८१ किलोमीटर. मध्ये कमीत कमी दिड- दोन तास थांबलो असेन. एव्हरेज स्पीड बारा किलोमीटर आणि मूव्हिंग स्पीड सुमारे पंधरा किलोमीटर असं सायकलिंग झालं. अर्ध्या दिवसात ८१ किलोमीटर अंतर पूर्ण केलं. दिवसाचे किमान पाच- सहा तास बाकी होते. हा विचार केला तर चांगलंच सायकलिंग झालं. आणि शेवटी पुन: बारा किलोमीटर सायकल चालवता आली. म्हणजे एकूण ९३ झाले. १६० चं लक्ष्य होतं, ९३ किलोमीटर चालवू शकलो. अगदीच वाईट नाही. ही एक चमत्कारिक राईड झाली ज्याचा काहीही आगा- पीछा नव्हता. ८ फेब्रुवारीला शतक केल्यानंतर मध्ये एकही राईड न करता थेट २३ फेब्रुवारीची ही राईड! अगदीच वेडेपणा! अर्धशतक आणि शतक तर झाले होते, ह्यावेळी नर्व्हस नाइंटीचासुद्धा आस्वाद घेतला! पुढील भाग ११: नव्या रस्त्यांवरील राईडस अशा इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग

Book traversal links for सायकलीशी जडले नाते १०: एक चमत्कारिक राईड- नर्वस नाइंटी!

  • ‹ सायकलीशी जडले नाते ९: दुसरे शतक. . .
  • Up
  • सायकलीशी जडले नाते ११: नव्या रस्त्यांवरील राईडस ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रवास
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
अनुभव

प्रतिक्रिया द्या
7659 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

मस्त

आनंदराव
Fri, 12/18/2015 - 12:13 नवीन
मस्त मजा येत आहे वाचायला. एवढ्या लांब जाण्याचे धाडस केले तुम्ही, तेच तर महत्वाचे आहे हो.
  • Log in or register to post comments

उत्कृष्ट लेखन.

प्रचेतस
Fri, 12/18/2015 - 15:59 नवीन
उत्कृष्ट लेखन.
  • Log in or register to post comments

बाप्पो.

बाबा योगिराज
Fri, 12/18/2015 - 18:37 नवीन
बाप्पो. पुणे ते दिवेआगार. खतरनाक हिम्मत आहे बुआ.... अजून सुद्धा सायकल चालवने चालू आहे का???
  • Log in or register to post comments

पुभाप्र.

एस
Fri, 12/18/2015 - 19:56 नवीन
पुभाप्र.
  • Log in or register to post comments

हरकत नाही

अरिंजय
Sat, 12/19/2015 - 10:09 नवीन
सगळंच काही हॅप्पी एन्डींग नसतं. पण मार्गीदादा तुमच्या अनुभवांमधुन आम्हाला बरंच काही शिकायला मिळतं.
  • Log in or register to post comments

सर्वांना धन्यवाद!

मार्गी
Sat, 12/19/2015 - 12:17 नवीन
सर्वांना धन्यवाद! @ बाबा योगिराज- हो, चालवतो ना.
  • Log in or register to post comments

मला आमच्या फसलेल्या कोकण

पिंगू
Sat, 12/19/2015 - 13:57 नवीन
मला आमच्या फसलेल्या कोकण राईडची आठवण झाली. ताम्हिणीच्या रोडवर आमचे ३ अपघात झाले होते. पहिल्या अपघातात एकाची सायकल खोल खड्ड्यात पडली होती. तेव्हा सर्वजण बाजूला १० मिनिटांचा विसावा घेत होतो. त्यानंतर १ तासाच्या फरकाने दुसर्‍या अपघातात मी सायकलवरचे नियंत्रण सुटल्यामुळे पडलो होतो. तरीसुद्धा दुखावलेला खांदा आणि वाकडे झालेले हँडल धरुन सायकल चालवतच होतो. पण तिसरा अपघात जरा मोठाच झाला, ताम्हिणी घाटाच्या सुरुवातीला मोदक सायकलसकट खड्ड्यात गेला. पण तरीही आम्ही सर्वजण माणगावपर्यंत गेलो होतो.
  • Log in or register to post comments

मस्त राइड

मित्रहो
Sun, 12/20/2015 - 17:21 नवीन
सुंदर लेखन ताम्हीणी घाट तर गाड्यांनाही चढायला त्रास होतो. तुम्ही तिथे सायकल घेऊन गेलात. पिंगू यांचा अनुभव पण जबरदस्त मागे मोदक यांच्या धाग्यावर सुद्धा वाचला होता.
  • Log in or register to post comments

मस्त राइड

मित्रहो
Sun, 12/20/2015 - 17:21 नवीन
सुंदर लेखन ताम्हीणी घाट तर गाड्यांनाही चढायला त्रास होतो. तुम्ही तिथे सायकल घेऊन गेलात. पिंगू यांचा अनुभव पण जबरदस्त मागे मोदक यांच्या धाग्यावर सुद्धा वाचला होता.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा