सायकलीशी जडले नाते ६: ऊँचे नीचे रास्ते और मन्ज़िल तेरी दूर. . .

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
27 Nov 2015 - 7:20 pm

सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक

सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक

सायकलीशी जडले नाते ३: नदीसोबत सायकल सफर

सायकलीशी जडले नाते ४: दूरियाँ नज़दिकीयाँ बन गईं. . .

सायकलीशी जडले नाते ५: सिंहगड राउंड १. . .

ऊँचे नीचे रास्ते और मन्ज़िल तेरी दूर. . .

सिंहगडावर जाऊन आल्यानंतर एक दिवस खूप थकवा राहिला. शरीराने अजून सायकलशी पूर्ण जुळवून घेतलं नाही, त्यामुळे थोडी कणकणसुद्धा येऊन गेली. त्या दिवशी तर मोठ्या राईडची इच्छाही शक्य नव्हती. पण लवकरच दुस-या मोठ्या राईडची योजना बनवली. सिंहगडावर गेल्यानंतर चार दिवसांनी १९ ऑक्टोबर २०१३ ला पुढच्या राईडची योजना बनवली. ह्या वेळी अजून एक घाट निवडला. पुण्याहून लदाख़ला सायकलिंगसाठी जाणारे लोक सिंहगडाबरोबरच पाबे घाटलाही जातात. त्यामुळे तो निवडला. सोबत तोरणाही बघण्याचा विचार केला.

पाबे घाटचा रस्ता सिंहगडाच्या पायथ्याजवळूनच पुढे जातो. आज ७८ किलोमीटर सायकलिंग व तोरण्याचा ट्रेक अशी योजना बनवली. सकाळी लवकर निघालो. पहाटे किती लवकर निघतो, ह्यावरही असा प्रवास थोड्या प्रमाणात अवलंबून असतो. जितकं हवं होतं, तितक्या लवकर न निघता आल्यामुळे मनात एक नाराजीचा सुर आहे. पण अख्खा दिवस पडला आहे. अजून खूप वेळ आहे. निघालो आणि खानापूरपर्यंत लवकरच पोहचलो. इथपर्यंत अनेकदा सायकलवर आलो आहे. इथून पुढे नवीन रस्ता असेल. सकाळचं प्रसन्न वातावरण आणि निर्जन रस्ता!


पाबे घाटाचा क्लाइंब. पहिले छोटा चढ आणि मग घाट

इथून पाबे घाट जेमतेम दहा- बारा किलोमीटर दूर असेल. पण पूर्ण रस्ता चढाचा आहे. हा रस्ता अगदी निर्जन भागातून जातोय. ह्या रस्त्यावर मोठी गावं लागत नाहीत. थोड्या वेळाने एखादं वाहन क्रॉस होतं आहे. गावातले लोक कामावर जात आहेत. हा रस्ता सिंहगडाला वळसा घालून अर्ध परिक्रमा करतो; त्यामुळे सिंहगड सारखा दिसत राहतो. आता पहिला क्लाइंब आला. तो मला आरामात चढता आला. थोडं स्प्रिंटिंग करावं लागलं आणि काही वेळ जास्त जोर लावावा लागला. पण पायी नाही तर सायकलवरच तो पूर्ण केला. उत्साह अजून वाढला.

जेव्हा सायकलविषयी डे ड्रिमिंग करत होतो, तेव्हा विचार करायचो की, सायकल जर वीस किलोमीटर प्रति तास वेगाने गेली तर दिवसभरात दोनशे किलोमीटरही करेन. कधी वाटायचं जर स्प्रिंटिंगने जास्त वेग मिळणार असेल, तर अजून चालवता येईल. पण स्प्रिंटिंग करणं हानीकारक आहे. पायांना खूप त्रास होतो आणि गंभीर दुखापतही होऊ शकते. चढावावर स्प्रिंटिंग उपयोगी पडत नाही. कारण ऊर्जा मोठ्या प्रमाणात जाणं शरीर फार वेळ सहन करूच शकत नाही. एका अर्थाने हे थोडं हिंसेसारखं किंवा प्रोटेस्टसारखं आहे. जेव्हा आपल्याला दिसतं की, संवादाचा काहीच मार्ग उरला नाही, तेव्हाच आपण हिंसा किंवा प्रोटेस्टचा विचार करू शकतो. सगळ्यात सरळ आणि स्वस्थ मार्ग हाच की, हळु हळु स्टॅमिना आणि फिटनेस इतका वाढवायचा व शरीराला सायकलिंगची इतकी सवय करायची की, चढही सायकलवर सहज चढता येऊ शकेल. आणि हे होतं. पुढच्या राईडसमध्ये मला त्याचा अनुभव आला. आणि जितक्या सहजतेने पुढे जाऊ शकतो, तितका मोठा पल्ला गाठता येतो. ऊर्जेचा वापर शरीराला भारी पडत नसल्याने प्रदीर्घ काळ अशी क्रिया करता येऊ शकते. असो.


उलट बाजूने दिसणारी सिंहगडाची मुद्रा

हा रस्ता जाम आवडला. इतका निर्जन रस्ता आणि पुण्यासारख्या शहराच्या इतका जवळ! खूप मजा येते आहे. वाटेतली गावं अगदी लहान आहेत. त्यामुळे चहा- बिस्कीटाशिवाय अन्य नाश्ता नाही मिळाला. आता पाबे घाटाचा चढ सुरू होतोय. तसा रस्ता पहिल्या क्लाइंबनंतर वरच चढतोय, पण खरा घाट आता येईल. अर्धा किलोमीटर सायकलवर बसून पार झाला. पण आता शक्य नाहीय. कडक ऊन पडलंय. शेवटी एका क्षणी थांबावंच लागलं. सोबत पाणी आहे, पण ते खूप काळजीपूर्वक वापरावं लागेल. पायी पायी वाटचाल सुरू झाली. पण परिसर किती रमणीय आहे! त्यामुळे मजा येतेय.


पाबे घाटातून दिसणारा विस्तीर्ण राजगड (डावीकडे) आणि तोरणा (उजवीकडे)

पाबे घाटाची लांबी जेमतेम चार किलोमीटर आहे. पण क्लाइंबही मोठा आहे. कारण हा ग्रेड २ चा घाट आहे. घाटाच्या स्थानी काहीच वस्ती नाहीय. फक्त एक मंदीर आहे. आता मस्त उतार मिळेल. इथपर्यंत दूर असूनही सिंहगडाने नॉन स्ट्राईकर एंडवरून सोबत दिली. आता पुढे सिंहगड दिसणार नाही. त्याऐवजी दोन महारथी- तोरणा आणि राजगड दिसतील. राजगड! इतक्या दूर अंतरावरूनही त्याचा विस्तीर्ण परिसर दिसतोय! नक्कीच, एकदा तिथे जायचं आहे. .

पण जसा उतार सुरू झाला, सायकलच्या टायरचा आवाजही सुरू झाला! हे काय! सायकलचं पहिलं पंक्चर! आणि माझ्याजवळ काहीही पर्याय नाही! पंक्चर किट किंवा ट्युबही नाही आहे. आणि इथून पहिलं गाव- वेल्हे किमान सहा- सात किलोमीटर दूर आहे. आता उतारही पायी चालण्याशिवाय दुसरा पर्याय नाही! थोड्या वेळापूर्वी एका जागी सायकलजवळ अनेक खेकडे वाटेत आले होते. एक खेकडा मागच्या चाकाखालीसुद्धा आला होता. कदाचित त्याच कारणामुळे पंक्चर झालं असावं! पण आता काही मार्ग नाही. सुमारे सातशे किलोमीटर चालवल्यानंतर पहिलं पंक्चर झालं तर. कधी ना कधी हे होणारच होतं. आणि मी विचारही करून ठेवला होता की, जेव्हा असं होईल, तेव्हा काही अंतर पायी पायी जाईन किंवा लिफ्ट घेईन. आता तेच करायचं आहे. सहा किलोमीटर अजून पायी पायी चालायचं.

हे सहा किलोमीटर चढापेक्षाही मोठे वाटले. मध्ये एकही बरं हॉटेल मिळालं नाही. खूप उशीरा वेल्हेला पोहचलो. हे तालुक्याचं ठिकाण असलं तरी जेमतेम गाव म्हणावं इतकं मोठं होतं. ह्याच्या जवळचा तोरणा किल्ला! पण आता बहुतेक तिथे जायला जमणार नाही. किल्ला लांबच, आता परत जातानाही बसने जावसं वाटतंय. पण पहिले पंक्चर काढावं लागेल. पंक्चरचं दुकान सापडलं, पण ते होतं गावाच्या दुस-या बाजूला. पंक्चर दुरुस्त करणारा बाहेर गेल्यामुले सायकल तिथेच ठेवली व जेवून घेतलं. इथपर्यंत फक्त ३९ किलोमीटर झाले आहेत. त्यातही नऊ किलोमीटर पायी पायीच आलो. घाटातले तीन किलोमीटरही पायी पायीच! आता वाटतंय, बसनेच परत जावं. पंक्चरची रिस्क का घ्यावी?

थोड्याच वेळात पंक्चर ठीक झालं. सायकल थोडी चालवली तर हवा कमी झाली. परत पंक्चर ठीक करावं लागलं. त्यात बराच वेळ गेला. सकाळी सात वाजता निघालो होतो. आता दुपारचा एक वाजतोय. परत जाताना बस/ जीपने जावसं वाटत होतं. पण आता जेवणानंतर आरामही झालाय. त्यामुळे परत ऊर्जा आल्यासारखी वाटते आहे. त्यामुळे ठरवलं, की, चला, सायकलवरच जातो. जे होईल, ते पाहून घेईन. झालंच पंक्चर तर लिफ्ट घेईन.

वेल्हे गावातून बाहेर निघालो. आता परत दुस-या बाजूने पाबे घाटचा चढ. थोड्या वेळ सायकल चालवली. पाबे गावातल्या मुलांनी थोडा वेळ सायकलवर रेस लावली! जसे ते मागे पडले व थांबले, मीसुद्धा थांबलो आणि पायी चालायला लागलो. दुपारच्या उन्हामध्ये सकाळच्या तुलनेत अजून त्रास होतोय. अगदी छोटे छोटे टारगेटस ठेवत पुढे निघालो- ह्या सावलीपासून पुढच्या सावलीपर्यंत जाऊन थांबेन असं. चालत, थांबत, चालत, थांबत खूप वेळाने तो घाट चढलो. जेव्हा 'पाबे खिंड' फलक दिसला, तेव्हा बरं वाटलं. घाटमाथ्यावर ह्या वेळी एक चहावालाही आहे. थोडा वेळ आराम केला. आता राजगड आणि तोरणा मागे राहिले आणि परत सिंहगड समोर आला. अर्थात् ह्या राईडमध्ये मला एका दमात तीन किल्ले बघता आले!

आता पहिले चार किलोमीटरचा उतार! त्याची किंचित भिती वाटली. पण ब्रेक्स लावत निघालो. पण. . . अर्धाही उतार पूर्ण झाला नाही की परत पंक्चर! आता काय करावं? इथे वाहतुक अगदी थोडी आहे. घाट संपल्यावर छोटी गावं येतील, तिथे बघावं लागेल काही होतं का. कसं बसं सायकल ओढत निघालो. उतारावर उतरणंसुद्धा अवघड जातं. थोड्याच वेळात संपला उतार. आता पहिलं गाव येईल. गाव म्हणजे काही घरं. अनेकांना विचारलं, सायकलचं दुकान कुठेच नाही. एकांनी सांगितलं की, पुढच्या गावात पंक्चरवाला नक्की आहे. त्याने त्यांचं नावही सांगितलं. अजून पुढे चालावं लागेल. तिथे पंक्चरचं एक दुकान मिळालं, पण त्याच्याकडचा पंप जुन्या पद्धतीच्या सायकलींचा आहे! त्या पंपाने ह्या सायकलीत हवा भरता येणार नाही! त्याने चांगली गोष्ट ही‌ सांगितली की, पुढच्या एका गावामध्ये मला जीप मिळेल. आणि ह्यावेळेस नशीब चांगलं आहे. जीप मिळाली. ती पुढे जाणारी शेवटची जीप होती. हा भाग पुण्याच्या जवळ असूनही मुख्य महामार्गाच्या जवळ नसल्याने वाहतुक कमीच असते. जीप मिळाल्यानंतर निश्चिंत झालो.

जीपने डोणजेच्या थोडं पुढे सोडलं. जीपवाल्याला एका पंक्चरवाल्याचं दुकानही माहिती होतं. इथे सायकलचं चांगलं दुकान आहे. तिथे पंक्चर काढलं एकदाचं. आता कळतंय की, पंक्चर काढता येणं किती आवश्यक आहे. . . इथून घर फक्त आठ किलोमीटर दूर आहे. संध्याकाळ झाली आहे. खूप वेळानंतर सायकल चालवतोय. पुढे किरकटवाडीमध्ये वडा पाव खाण्यासाठी थांबलो. हवा बघितली तर कमी झालीय! परत पंक्चर! पंक्चर मालिका थांबतच नाहीय! पण आता घरही जवळ आलंय. इथे लगेच दुकान मिळालं. पंक्चर लगेच ठीक झालं आणि पुढे घरापर्यंत त्रास झाला नाही.

पण काय राईड झाली ही! एकूण ६३ किलोमीटर सायकलिंग केलं. त्यापैकी १८ किलोमीटर पायी पायी! पायी चालण्याचाही मस्त सराव झाला! पंक्चरमुळे वैताग खूप झाला, पण मजाही तितकीच आली! अशा राईडसचीही वेगळी मजा असते. मॅनेजमेंटची मजा असतेच, पण मिसमॅनेजमेंटमध्येही खूप मजा येते! जेव्हा काहीच धड होत नाही, तेव्हाही ते एंजॉय करता येऊ शकतं! आणि असे क्षण अगदी विशेष असतात! जसं आपण कडक उन्हात हातात सायकल घेऊन जाताना पाण्याच्या उघड्या बाटलीकडे बघतो आणि त्यामध्ये असलेल्या हवेचा हलकासा आवाज ऐकू येतो! अहा हा!

पुढील भाग: सायकलीशी जडले नाते ७: शहरामधील सायकलिंग. . .

अशा इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग

जीवनमानप्रवासविचारअनुभव

प्रतिक्रिया

बाबा योगिराज's picture

27 Nov 2015 - 7:59 pm | बाबा योगिराज

हां भाग सुद्धा मस्तच झालाय. आवड्यास.
पुढील सायकल वारी साठी शुभेच्छा.

अवांतर:- छोटेखांनी पंक्चर किट मिळत अस ऐकलय. कुणाला काही माहिती आहे का?

मार्गी's picture

27 Nov 2015 - 9:12 pm | मार्गी

नमस्कार. पंप आणि पंक्चर किट 150 रू. पासून मिळतं ना. पण पंक्चर शिकण्यासाठी किमान 5 वेळेस चुकीच्या पद्धतीने काढावं लागतं (आणि 5 वेळेस पंक्चर काढायची वेळ येईल इतकी सायकल चालवावी लागते)... :) नंतरच्या भागांमध्ये त्याविषयी लिहेन.

मस्तच झालाय हा भागसुध्दा.तुम्ही असेच लिहीत रहाल तर ही मालिका संपेपर्यंत मी सायकल राइड्स करायला लागेन!

मस्तच झालाय हा भागसुध्दा.तुम्ही असेच लिहीत रहाल तर ही मालिका संपेपर्यंत मी सायकल राइड्स करायला लागेन!

बोका-ए-आझम's picture

28 Nov 2015 - 1:02 am | बोका-ए-आझम

पुभाप्र!

प्रचेतस's picture

28 Nov 2015 - 9:00 am | प्रचेतस

अप्रतिम लिहिताय.

मित्रहो's picture

28 Nov 2015 - 8:46 pm | मित्रहो

फोटो खूप सुंदर आलेत, तुम्ही सायकल राइड फार एंजॉय करता असेही दिसते.
रस्त्यात पंक्चर झाले तर भिती वाटते हो. म्हणजे पायी जाता येते पण मानसिक त्रास सुद्धा होतो. पंक्चर किट जरी सोबत असली तरी हवा भरायचे काय.

वामन देशमुख's picture

28 Nov 2015 - 11:25 pm | वामन देशमुख

बाइक आणि कारला असतात तसे साइकलीसाठी ट्युबलेस् टायर असतात का?

मार्गी's picture

30 Nov 2015 - 4:31 pm | मार्गी

सर्वांना धन्यवाद! @ वामन पंडित जी, शक्यतो अति एडव्हान्स्ड सायकलिंना ट्युबलेस टायर्स असावीत. अन्यथा नाही. @ मित्रहो जी, पंक्चर किटमध्ये पंप असतोच ना. :)

पैसा's picture

10 Dec 2015 - 5:46 pm | पैसा

एका राईडमधे ४ पंक्चर्स? काय वैताग आहे!! मी तर सायकल टाकून पळून गेले असते बहुतेक!

स्थितप्रज्ञ's picture

18 May 2016 - 5:56 pm | स्थितप्रज्ञ

इथपर्यंत दूर असूनही सिंहगडाने नॉन स्ट्राईकर एंडवरून सोबत दिली. आता पुढे सिंहगड दिसणार नाही.

एखादी जवळची व्यक्ती कायमची परदेशात निघालीये असं फिलिंग आल.