अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ५ अलकनंदेसोबत बद्रिनाथच्या दिशेने. .

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
12 Oct 2015 - 10:10 am

सर्व मान्यवर वाचकांना मन:पूर्वक अभिवादन! डिसेंबर २०१२ मध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या प्रवासाच्या आणि ट्रेकिंगच्या आठवणी इथे शेअर करत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जिथपर्यंत रस्ता सुरू असेल, तिथपर्यंत फिरायला जावं ह्या विचाराने हा प्रवास केला. उत्तराखंडमध्ये हिवाळ्यामध्ये बद्रिनाथच्या जवळ भ्रमंती करताना अपूर्व असा रमणीय भाग बघता आला. त्याचं हे प्रत्यक्ष वर्णन. .

अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: १ हिमालयाच्या पायथ्याशी
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: २ थल- बागेश्वर मार्गे रमणीय बैजनाथ
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ३ नयनरम्य ग्वालदाम आणि कर्णप्रयागमार्गे जोशीमठ
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ४ जोशीमठ दर्शन

अलकनंदेसोबत बद्रिनाथच्या दिशेने. .

१७ डिसेंबर २०१२ ची सकाळ! आज बद्रिनाथच्या जवळ पंडुकेश्वर आणि पुढे जायचं आहे. हिवाळ्यातही ह्या रस्त्यावर जीप चालतात आणि स्थानिक लोक येत- जात राहतात. सकाळी चहा पिताना कळालं की, रात्री जोशीमठ गावाच्या वरच्या भागामध्ये बर्फ पडला आहे. हलकी बर्फवृष्टी झाली आहे. जोशीमठ हे उतारावर वसलेलं असल्यामुळे खालचा भाग आणि वरचा भाग ह्याच्या उंचीमध्ये फरक आहे. आता जवळच्या डोंगरांवर मस्त बर्फ दिसतोय. बहुतेक मला बद्रिनाथ रोडवरही मस्त बर्फ मिळणार!

थोड्या वेळात पण्डुकेश्वरची जीप घेतली. शेअर प्रवाशांना घेऊन जाणा-या ह्या जीप्स मस्त आहेत. अजूनही पंडुकेश्वरपर्यंत आणि दुस-या बाजूला तपोबनपर्यंत अशा जीप्स सुरू आहेत. पण ह्या प्रवासाचं एक मुख्य आकर्षण असलेल्या औलीकडे शेअर जीप्स चालत नाहीत. एक तर अठरा रस्त्याने किलोमीटर पायी पायी जावं लागेल किंवा आठ किलोमीटरचा खडा ट्रेक करावा लागेल. पण त्याआधी आज बद्रिनाथच्या जवळ जाऊन येईन. हिवाळ्यामध्ये मोठी बस जोशीमठपर्यंतच येते. इथून पुढे शक्यतो जीप्सच जास्त चालतात आणि इतर आर्मी/ आयटीबीपीची ट्रक्स व अन्य वाहनं असतात. जागोजागी बी.आर.ओ. चे फलक बघून मस्त वाटलं.

जोशीमठनंतर रस्ता आधी खाली उतरतो आणि अलकनंदेजवळ जातो. इथेही एक 'प्रयाग' म्हणजेच दोन नद्यांचा संगम आहे. इथे विष्णुप्रयाग आहे व तिथे एक हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट आहे. त्यानंतर रस्ता परत वर चढतो. काय नजारा आहे! अतिशय रोमांचक! बर्फाच्छादित शिखर जवळ येत आहेत. रस्ताही दुर्गम जागेतून जातोय. अर्थात् रस्ता पक्का आहे. थोड्याच वेळात गोविंदघाट आलं. इथून एक कच्चा रस्ता घांघरियाकडे व तिथून व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि हेमकुंड साहिबकडे जातो. प्रसिद्ध व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि हेमकुंड साहिब इथून अगदी जवळच आहे. पण पायी जाण्याच्या रस्त्यावर हिवाळ्यात बर्फ साचतो व त्यामुळे हिवाळ्यात तिथे जाता येत नाही. ती स्थाने खूप जास्त उंचीवर आहेत. हेमकुंड साहिबविषयी एक गोष्ट अशी‌ की दर वर्षी मे महिन्यामध्ये भक्तगण येतात आणि स्वत: हेमकुंड साहिबला जाण्याचा रस्त साफ करत जातात. ह्या कार्याला कार सेवा म्हणतात. सात पर्वतांनी वेढलेलं हेमकुंड ४६०० मीटरहून अधिक उंचीवरचं एक ग्लेशिअर आहे. इथे शीखांचे दहावे गुरू श्री गोविंद सिंहांनी साधना केली होती. असो.

गोविंद घाट! विश्वास बसत नाहीय की, हिमालयात इतकं आत येऊ शकलो आहे. अपूर्व नजारा! गोविंद घाटपासून थोडं पुढे पंडुकेश्वर आहे. इथे पोहचायला जवळ जवळ दीड तास लागला. अजून एक आनंदाची गोष्ट- जीप अजून पुढे जाते आहे! जीप अजून चार किलोमीटर पुढे असलेल्या लामबगड़ गावापर्यंत जाईल. शेवटी तिथे जाऊन जीप थांबली. परत जाणारी जीपसुद्धा इथूनच मिळेल. सकाळचे अकरा वाजत आहेत. चहा घेतला. रस्ता कुठपर्यंत सुरू आहे, ह्याची माहिती घेतली. तेव्हा कळालं की, पायी पायी पुढे जाता येऊ शकतं. इथून बद्रिनाथ फक्त १९ किलोमीटर दूर आहे. रस्ता तर चांगला दिसतोय. चला, आता पायी पायी जाऊया. जिथपर्यंत रस्ता सुरू असेल, तिथपर्यंत जातो. असंच परतही येतो.

चारही बाजूंना जवळ येणारे हिमाच्छादित पर्वत! अलकनंदेचा निनाद! भूजलशास्त्राच्या दृष्टीने अलकनंदाच गंगा नदीची मुख्य जलधारा आहे. कारण गंगोत्रीवरून येणा-या गंगेची (भागीरथी) लांबी आणि तिच्यात वाहून येणारं पाणी अलकनंदेपेक्षा कमी आहे. अर्थात् मान्यतेनुसार गंगेला मुख्य नदी आणि अलकनंदेला तिची उपनदी मानलं जातं. . .

इथेसुद्धा एक जेपी पॉवर प्रोजेक्ट सुरू आहे. अलकनंदा नदीच्या काठावरच आहे. कंपनीने काठावर एक मंदीरसुद्धा बनवलं आहे. परत येताना ते पाहीन. रस्ता अगदी सुनसान आहे! फक्त क्वचित कंपनीची काही वाहनं आणि काही मिलिटरीची वाहनं! आता ह्या प्रवासातलं खरं ट्रेकिंग सुरू झालं! चढ- उताराचा रस्ता आहे. हळु हळु रस्ता वर चढतोय. अरे! रस्त्यावर पांढरं कापसासारखं काय दिसतंय! बर्फ चक्क! रस्त्यावर पडलेला बर्फ सरकवून एका बाजूला ठेवलेला दिसतोय! आता समोरसुद्धा बर्फ दिसतोय. एका जागी रस्त्याने अलकनंदा ओलांडली.

हळु हळु नुकताच पडलेला बर्फ दिसायला लागला. नक्कीच पहाटे बर्फ पडला असणार. इथे वाहतुक अगदी तुरळक असल्यामुळे अजून तसाच राहिला आहे. हळु हळु बर्फाचं प्रमाण वाढत गेलं. आयुष्यात दुस-यांदा इतका सलग बर्फ बघतोय. ह्याआधी ह्यापेक्षा जास्त- संपूर्ण बर्फाच्छादित रस्ता फक्त एकदा लदाख़च्या चांगलामध्ये बघितला होता. चला, आज मस्त बर्फ बघण्याची इच्छा तर पूर्ण होणार! एका जागी अलकनंदेवर छोटी पुलिया आहे आणि एक पायवाट नदीला ओलांडते आहे. इथे बी.आर.ओ.चं एखादं केंद्र असणार.

पुढे गेल्यावर नदीचं विहंगम दृश्य दिसलं! एका झ-यासारखी अलकनंदा वाहते आहे! रस्त्याच्या बाजूला विशाल उंच वृक्ष आहेत! आता सगळीकडे बर्फच बर्फ दिसतोय! समोर जे पर्वत दिसत आहेत, ते नक्कीच बद्रिनाथ जवळचे नर- नारायण इत्यादी पर्वत असावेत. एक तीव्र ओढ मला पुढे ओढतेय. मध्ये मध्ये फोटो घेत पुढे जातोय. चांगलं ऊन पडलेलं असल्यामुळे थंडी जवळजवळ वाटत नाहीय. शिवाय सतत चालत असल्यामुळेही शरीराला ऊर्जा मिळते आहे. एका जागी बी.आर.ओ.चे मजूर आहेत. एकमेकांकडे हसूनच विचारपूस झाली. बद्रिनाथ अगदी जवळ येत आहे. जवळजवळ दोन तासांमध्ये मी सहा किलोमीटर पुढे आलो आहे. म्हणजेच बद्रिनाथ इथून जेमतेम बारा- तेरा किलोमीटर असलं पाहिजे. दुपारचा एक वाजतोय. जर मध्ये पोलिस किंवा आयटीबीपीने थांबवलं नाही तर आज मी नक्कीच बद्रिनाथला पोहचेन. पण मग आज तिथेच मुक्काम करावा लागेल. बघूया.

थोडा चढ लागला पण चालणं हा इतका सहज होणारा व्यायाम आहे की, अशा चढावरही चालताना अजिबात अवघड वाटत नाही. मिलिटरीच्या वाहनांमुळे रस्त्यावर बर्फात ठसे उमटले आहेत. एक झरा ओलांडण्यासाठी एक लोखंडी पूल लागला. आता समोर काही लोक दिसत आहेत. आणि ते चक्क क्रिकेट खेळत आहेत! हे हनुमान चट्टी गांव आहे! पण पूर्ण बंद दिसतं आहे. दुकान आहे पण तेही बंद आहे. पुढे गेल्यावर स्थिती काय आहे हे कळालं. समोर खेळणारे जण उत्तराखंडचे पोलिस आहेत आणि इथे त्यांचं एक चेक पोस्ट आहे. सामान्य नागरिकांना पुढे जाण्याची अनुमती नाही. त्यानंतरचा भाग भारत- तिबेट सीमा पोलिस आणि अर्थातच आर्मीच्या नियंत्रणात आहे. म्हणजे मला इथून परत जावं लागणार तर. इथून भारत- तिबेट सीमा जेमतेम पन्नास किलोमीटर असेल. आणि बद्रिनाथच्या जवळ जास्त बर्फही आहे. त्यामुळे पुढे जायची अनुमती नाही. . . पण काय नजारे आहेत!

हनुमान चट्टी! इथे लिहिलं आहे की ज्या जागी वृद्ध हनुमानाने भीमाचं गर्वाहरण केलं ती जागा हीच! थोडा वेळ थांबलो; फोटो घेतले आणि आठवणी साठवून घेतल्या. अडीच तास चाललो आहे. बहुतेक साडेसात किलोमीटर आलोय. ह्या जागेची उंची सुमारे २५०० मीटर्स आहे. आयुष्यात पहिल्यांदाच इतक्या उंचीवर ट्रेकिंग करतोय. आजचा दिवसच वेगळा आहे! आणि विशेष म्हणजे थकवा अजिबात नाहीय. उलट मला बद्रिनाथच्या दिशेने ओढ जाणवते आहे. जर ही चेकपोस्ट नसती आणि जर रस्ता सुरू असता तर बाकी अकरा किलोमीटरसुद्धा गेलो असतो . . .


बीआरओची शिवालिक परियोजना!

पण आता निघायला हवं. दुपारचे दोन वाजत आहेत. इथे संध्याकाळ होतच नाही; दुपारच बघता बघता रात्र होते. त्यामुळे आता लवकर जायला हवं. येतानाही फोटो घेत राहिलो. पण आता सूर्य डोंगराआड गेला आहे आणि हा भाग डोंगरांनी वेढलेला असल्यामुळे आता सावली पसरली आहे आणि त्यामुळे एकदम थंडी वाढते आहे. . . अलकनंदेवर जिथे पूल होता, तिथे खाली नदीपर्यंत जायला वाट आहे. अलकनंदेला नमन केलं! किती शुद्ध जलधारा! जीवनाच्या उगमाच्या जवळ गेल्यावर मिळणारी शांती आणि प्रसन्नता! अलकनंदेमधले काही दगड सोबत घेतले! परत येतानाही पाय दुखत नाही आहेत. हलकासा उतार आहे. जेपी कंपनीने बनवलेलं मंदीरही बघितलं. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स बघता आली नाही तरी इथली फुलंही कमी सुंदर नाहीत!

लामबगड़ला पोहचेपर्यंत साडेतीन वाजले आहेत. इथे चहा मिळाला. इथून परत वस्ती सुरू झाली. पण अजून जोशीमठची जीप दिसत नाहीय. कदाचित ती‌ यायला वेळ असेल. चालताना इतकं छान वाटत आहे की, पंडुकेश्वरच्या दिशेने पुढे निघालो. जोशीमठची जीप जेव्हा जाईल, तेव्हा तिला रस्त्यावर थांबवेन. पंडुकेश्वरमध्ये ध्यान- योग बद्रि मंदीर आहे. लामबगड़पासून पंडुकेश्वर चार किलोमीटर दूर आहे. पाय अजिबात थकलेले नाहीत. रस्ता मधोमध थोडा कच्चा किंवा तुटलेला आहे. एक पॅच ओलांडताना किंचित भिती वाटली. सुमारे १९ किलोमीटर चालणं होईल आज माझं. पंडुकेश्वर यायच्या थोडं आधी जीप मिळाली. चालवणा-याने सांगितलं की, हीच जोशीमठची शेवटची जीप आहे. त्याला विनंती केली की, ध्यान- योग बद्रि मंदीराजवळ रस्त्यावर थांब, मी मंदीर बघून येतो. हे मंदीर पंडुकेश्वर गावाच्या खालच्या भागत आहे. लवकरच खाली उतरलो. फटाफट मंदीर बघितलं. दुपारचे साडेचार झाले आहेत. उजेड कमी होत आहे. जीप थांबलेली असल्यामुळे लवकर निघालो. पण चढताना गावातल्या पाय-या मोठ्या वाटल्या. दोन फूटांची एक पायरी असेल. त्यामुळे त्या सलग चढताना थोडा थकवा आला आणि थांबावंही लागलं. पहाडात असलेल्या गावातल्या एका संध्याकाळचं दृश्य बघायला मिळालं. मग लगेच वर रस्त्यावर येऊन जीप घेतली.

अविश्वसनीय दिवस आहे हा! विश्वास बसत नाहीय एकोणीस किलोमीटर चाललो. आणि तेसुद्धा अशा स्वर्गीय नजा-यांमध्ये! आता संध्याकाळ नव्हे रात्र पडते आहे. थंडी वाढते आहे. जीपमध्ये प्रवाशांशी जुजबी बोलणं झालं. तितक्यात एका दिदींनी सांगितलं- ते पाहा, हरिण पळालं आत्ताच! पहाडी लोक किती‌ साधे असतात आणि किती आतिथ्य करतात! पहाड बघायला आलोय तर काहीही सुटायला नको, म्हणून त्यांनी हरिण दाखवलं. . . जोशीमठला पोहचेपर्यंत अंधार झाला आहे. स्टँडवरून डॉर्मिटरीकडे जाताना थंडी कुडकुडवते आहे. ध्रुव तारा आकाशात दक्षिण भारताच्या तुलनेत जास्त वर दिसतोय! थोडं खाल्ल कसं तरी आणि रजईला शरण गेलो. आज जे बघितलं त्यावर विश्वास बसत नाहीय. जर आज इतकं चालता आलं तर उद्या नक्की औलीला जाता येईल. बघूया.


अलकनंदा. . .


योग ध्यान बद्रि मंदीर

... अडीच वर्षांनंतर हे अनुभव शब्दबद्ध करतानाही सर्व नजरेसमोर तसंच आहे! जे नजारे बघितले- जी नदी, जे रस्ते, जी गावं आणि त्या जागा- ते सर्व एका अर्थाने हरवून गेलं आहे. माझ्या प्रवासानंतर सहा महिन्यांनीच प्रलयंकारी पूर येणार होता आणि त्यात सर्व काही वाहून जाणार होतं. पण माझ्या स्मृतीमध्ये अजूनही सर्व जीवंत आहे. . .

पुढील भाग: अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ६ औली जाण्याचा अयशस्वी प्रयत्न आणि तपोबन भ्रमण

हा लेख हिंदीमध्ये वाचण्यासाठी आणि इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग

प्रवासछायाचित्रणविचारआस्वादअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

खेडूत's picture

12 Oct 2015 - 10:27 am | खेडूत

वाचतोय...
सगळंच अप्रतिम- निव्वळ अफाट आहे!

मस्त लिहिलंय. हिमालयाशी एकरूप झाल्यासारखं वाटत असेल असा ट्रेक करून!

पुभाप्र.

पद्मावति's picture

12 Oct 2015 - 11:08 am | पद्मावति

केवळ अप्रतिम. अद्भुत सफर आहे ही.

बोका-ए-आझम's picture

13 Oct 2015 - 12:17 am | बोका-ए-आझम

हे अफाट आहे.

भूजलशास्त्राच्या दृष्टीने अलकनंदाच गंगा नदीची मुख्य जलधारा आहे. कारण गंगोत्रीवरून येणा-या गंगेची (भागीरथी) लांबी आणि तिच्यात वाहून येणारं पाणी अलकनंदेपेक्षा कमी आहे. अर्थात् मान्यतेनुसार गंगेला मुख्य नदी आणि अलकनंदेला तिची उपनदी मानलं जातं. . .

या माहितीबद्दल धन्यवाद! हर हर गंगे!

प्रचेतस's picture

14 Oct 2015 - 8:38 am | प्रचेतस

प्रचंड सुंदर.

पैसा's picture

22 Oct 2015 - 11:15 pm | पैसा

अद्भुत!

मार्गीजी, तुम्ही लिहिलेली ही मालिका केवळ अद्भुत आहे! मी सर्व प्रथम हिमालयाचे दर्शन ह्याच मार्गावरुन केले आहे. पुन्हा एकदा सर्व आठवणी जाग्या झाल्या हे सारे भाग वाचताना.. आपल्याला हिमालयाचे दर्शन त्याच्या सोबत वाहणार्‍या नद्या, झर्‍यांसह, कडे, पहाड आणि दर्‍या खोर्‍यां आणि जंगलांसह सतत प्राप्त होवो, हीच त्या नगाधिराजाकडे प्रार्थना!

विवेकपटाईत's picture

23 Oct 2015 - 6:55 pm | विवेकपटाईत

आवडले