अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ४ जोशीमठ दर्शन

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
10 Oct 2015 - 11:15 am

सर्व मान्यवर वाचकांना मन:पूर्वक अभिवादन! डिसेंबर २०१२ मध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या प्रवासाच्या आणि ट्रेकिंगच्या आठवणी इथे शेअर करत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जिथपर्यंत रस्ता सुरू असेल, तिथपर्यंत फिरायला जावं ह्या विचाराने हा प्रवास केला. उत्तराखंडमध्ये हिवाळ्यामध्ये बद्रिनाथच्या जवळ भ्रमंती करताना अपूर्व असा रमणीय भाग बघता आला. त्याचं हे प्रत्यक्ष वर्णन. .

अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: १ हिमालयाच्या पायथ्याशी
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: २ थल- बागेश्वर मार्गे रमणीय बैजनाथ
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ३ नयनरम्य ग्वालदाम आणि कर्णप्रयागमार्गे जोशीमठ

जोशीमठ दर्शन

१६ डिसेंबर २०१०! लवकर जाग आली. पहाटे पाच वाजल्यापासून खाली मार्केटमधून देहरादून आणि ऋषीकेशच्या बस निघतात. त्यांचे कंडक्टर बराच वेळ प्रवाशांना बोलवत आहेत. आता खरी थंडी कळते आहे. रजईच्या बाहेर यावसं वाटतच नाहीय. थोडा वेळ तसाच आराम केला. हळु हळु सकाळ झाली आणि तयार होऊन हॉटलच्या रिसेप्शनकडे आलो. आज जोशीमठमध्येच फिरायचं आहे. या प्रवासातलं एक उद्दिष्ट औलीला जायचं हे आहे. औली जोशीमठहून जास्त म्हणजे सुमारे २७०० मीटर उंचीवर आहे. त्यामुळे विचार केला की एक दिवस जोशीमठला थांबलो तर ह्या थंडीला थोडं जुळवून घेता येईल.

रस्ता कुठपर्यंत चालू असेल, हे हॉटेलच्या रिसेप्शनवर विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं‌ की, पंडुकेश्वर जाता येऊ शकेल. हे गांव बद्रिनाथ रोडवर बद्रिनाथच्या आधी वीस किलोमीटर आहे. जोशीमठमध्ये मुख्य मंदीर आदि शंकराचार्यांचं आहे. ह्याचं मूळ नाव ज्योतिर्मठ होतं जे नंतर जोशीमठ झालं. अगदी अरुंद जागी आणि चढावावर वसलेलं गांव! सकाळी आरतीच्या वेळेस मंदिरात गेलो. हिवाळ्यामध्ये बद्रिनाथमधील मूर्ती जोशीमठ गावातल्या मंदीरात ठेवली जाते. इथे आदि शंकराचार्यांनी साधना केली आणि ज्योतिर्मठ आणि बद्रिकाश्रमाची स्थापना केली होती! खरोखर बाराशे वर्षांपूर्वी त्या काळाच्या मानाने अत्यंत दूरवरील दक्षिण भारतातून ते इथे कसे आले असतील? बाराशे वर्ष जाऊ द्या, आत्ता उभा असलेला रस्ताही अगदी नाजुक आहे. कधीही तुटू शकतो. आजपासून साठ वर्षांपूर्वीसुद्धा चारधाम यात्रेला जाताना चूल- रेशन असं सगळं सामान सोबत न्यावं लागायचं. जुन्या काळी अनेक आव्हानं असली तरी एक गोष्ट नक्की अनुकूल राहिली असणार. तेव्हा लोक साधे असायचे. आज आहे तसं मार्केट आणि स्वार्थाचा ज्वर नव्हता. त्यामुळे प्रवाशांना अडचणी तर असणारच, पण लोक मदतसुद्धा करत असणार.

ऑफ सीजन असूनही मंदीर परिसरात काही यात्रेकरू आहेत. जोशीमठातलं मंदीर बघताना शंकराचार्यांच्या दूरदृष्टीची जाणीव होते. शंकराचार्यांनी जिथे पीठ/ मंदीर उभे केले, ती ती स्थानं आज भारताच्या सीमेजवळ आहेत. जसं द्वारका आणि श्रीनगर. आणि त्यांनी उत्तर भारताच्या पीठांसाठी दक्षिण भारतातले पुजारी नियुक्त केले आणि आजही हीच परंपरा सुरू आहे. इथे अनेक मंदीर आहेत आणि त्यासह ध्यान- भूमी आणि बर्फाच्छादित पर्वतांची सोबत!

मंदीरात एक स्वामीजी भेटले. त्यांनी बोलावल्यामुळे आरतीला बसलो. थोडी ओळख झाल्यावर त्यांनी सांगितलं की, तपोबनपर्यंतसुद्धा रस्ता चालू आहे आणि शेअर जीप सुरू आहेत. नवीन माहिती मिळाली! मंदीर बघितल्यानंतर जोशीमठ गावात फिरलो. समोर डोंगरात एका गावाकडे जाणारा रस्ता अगदी वर चढताना दिसतोय. थंडीमुळे उन्हात बसण्यामध्ये किती सुख आहे! असंच बसून राहावसं वाटत आहे. आज आरामच करावासा वाटतोय. थंडीमुळे थोडी सुस्ती येतेच. कारण आपण सामान्यत: उष्ण प्रदेशात राहणारे लोकच तर आहोत. फिरता फिरताच नाश्ता केला.

दुपारी परत डॉर्मिटरीमध्ये जाऊन विश्रांती घेतली. इथे इंटरनेट बंद आहे. फोनवर बोलण्याचीही फारशी इच्छा नाही. एक प्रकारची शांतता आणि स्वस्थता इथे जाणवते आहे. भरपूर आराम झाल्यानंतर तीन वाजता परत बाहेर पडलो. जोशीमठच्या खालच्या भागात काही मंदीरं आहेत. इथे बद्रिनाथ मंदीरातली गादी स्थापित केली जाते. ते बघायला गेलो. हा भाग थोडा उतारावर आहे. येताना वाटेत गावातून वाहत येणारा एक झ-यासारखा नालापण लागला. दूरवर अलकनंदा दिसते आहे. तासभर फिरलो नाही तर संध्याकाळच झाली. आणि पाच वाजल्यापासून अंधार पडतो आहे. थंडीही एकदम वाढते आहे. उद्या बद्रिनाथ रस्त्यावर पंडुकेश्वरला जाईन. तिथे जाणारी जीप कुठून निघते ही माहिती करून घेतली. रात्रीचं जेवण आत्ताच करून घेतो.

साडेपाच वाजेपर्यंतर तर रात्रच झाली आहे. आता रजईमध्ये शिरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. थंडीचं थैमान सुरू होत आहे. . पण ह्या थंडीमुळेच ही डॉर्मिटरी रिकामी आहे. डॉर्मिटरी पद्धत छान आहे! तिकडे बैजनाथमध्येसुद्धा नाममात्र दराने आरामात मुक्काम केला होता. तिथे फक्त ८० रूपये भरले तर इथे १४० रूपये. पण सुविधा एकदम छान आहे. पडल्या पडल्या मोबाईलमधल्या संगीताचा आस्वाद घेतला. 'ॐ मणि पद्मे हुँ' ह्या तिबेटी‌ मंत्रावर काही प्रवचनही ऐकले. अशा जागी ते प्रवचन ऐकताना आणखी जास्त रंगत अनुभवता आली...
आजच दिवस तसा आळसातच गेला. पण जर मला उद्या फिरायचं असेल तर आज आराम हवाच होता. आराम आणि श्रम ह्या एकाच ऊर्जेच्या दोन बाजू आहेत ना. जितका चांगला आराम, तितकं चांगलं फिरता येईल. आराम हीसुद्धा खरं तर एक कला आहे आणि अनेक लोक आपल्या काळज्या आणि अस्वस्थतांना बाजूला ठेवू शकत नाहीत. त्यामुळे आज आराम झाला तेच बरं झालं. आणि थंडीसुद्धा अशी आहे की काही करायला जास्त स्कोप नाही.

लवकरच १६ डिसेंबरचा दिवस संपत गेला. . . हा तोच दिवस होता ज्या दिवसाने पूर्ण देशाला हादरवून टाकलं. दिल्लीतल्या बलात्कार आणि अपराध कांडाने सर्वांना अस्वस्थ केलं. पण त्या वेळी मला त्याची बातमी नाही. . एका अर्थाने मी सर्व जगापासून दूर विश्रांत अवस्थेत आहे.

पुढील भाग: अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ५ अलकनंदेसोबत बद्रिनाथच्या दिशेने. .

हा लेख हिंदीमध्ये वाचण्यासाठी आणि इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग

संस्कृतीजीवनमानप्रवासछायाचित्रणविचारआस्वादअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

वाचतोय. आराम करणं हीपण एक कला आहे. सर्व चिंता-काळज्या विसरून मनःशांती अनुभवता येणं हे वाटतं तितकं सहज नाही.

पुभाप्र.

पुढला भाग लौकर टाका मार्गीभाव...

बोका-ए-आझम's picture

10 Oct 2015 - 7:46 pm | बोका-ए-आझम

आवडला! पुभाप्र!

तर्री's picture

10 Oct 2015 - 8:57 pm | तर्री

मस्त सुटसुटीत भाषा. गो.नि.दा.प्रमाणे.

मार्गी's picture

12 Oct 2015 - 11:07 am | मार्गी

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद! :)

निवांतपणा हवाच शरीराला आणि मनाला.
वाचतेय. पुभाप्र.

पैसा's picture

22 Oct 2015 - 6:00 pm | पैसा

_/\_ हा अनुभव घ्यायचा आहे नक्की!