---------------द्वं--द्व---------------

अर्थहीन's picture
अर्थहीन in जनातलं, मनातलं
9 Oct 2015 - 11:19 am

संध्याकाळी ऑफिसवरुन सिटीत मित्रांकडे बाईक वरुन जात असेन. यूनिवरसिटी चौकातल्या जगातल्या सर्वात मोठ्या सिग्नलला गाडी बंद करून उगाच हिकडं तिकडं बघत असेन. तेवढयात एक काळं-शेंबडं पोरगं कडेवर घेतलेली -त्या पोरापेक्षा थोड़िशीच मोठी पोरगी , स्वत् अन कडेवरच्या त्या पोराला कशीबशी सावरत 'कितीही कललं तरी ते बारकं पडणार नाही' या कॉंफीडन्सनं समोर चालत येईल. क्षणार्धात डोळ्यात अतिशय करूण अन हतबल भाव आणून , मारून-मारून शिकवलंय तितकं बारकं तोंड करून खाडकन 'आशेने' आपला तळहात पुढे करेल. मी काही सेकंद तिच्याकड़े बघितल्यासारखं करून चेहरयावर खरंच आपल्या खिशात सुट्टे पैसे नसल्याची खतरुड़ एक्टिंग करून शेवटी 'खरंच नाहियेत्' असं तोंडाने सांगून तिच्याकडे दुर्लक्ष करेन. आसपासचे लोक मागून आपल्याकडेच पाहत असतील. एका क्षुल्लक द्वंदवात अङ्कलेले आपण काहीच निर्णय नाही घेणार.
झटशीर खिशात हात घालुन दोन पाच रूपये देऊही वाटतात (पण शिकलेला असल्यामुळे मी कोणताच निर्णय असा झटशीर घेत नाही??) देताना वाटतं की आपल्या या तुटपुंज्या अन तापुरत्या मदतीने या लोकांच्या आयुष्यात काहीच फरक नाही पडणारय. दिले तर ह्यां पोरांना अशीच सवय लागून हे लोक आळशी होऊन अशेच मागतकरी राहतील अन पुढे काय असं वाटतं.....अन एकदा-दोनदा-दहाधा दिलेही आधी- पण या पैशाचा काहीच उपयोग नाही -- मग पैसे द्यायचा उत्साह मावळून शेवटी मी तोंडाने आपल्यालाकडे सुट्टे पैसे नसल्याची एक्टिंग करतो...
---
ट्रेन मधे असेन. मोबाईल वर काहीतरी टाईमपास करत खिड़कीतनं अधनंमधनं बाहेर बघत प्रवास कापत. अचानक मधेच लोकांच्या कल-कलाटात एक ढोलकी वाजायला चालु होईल. "लुंगीडान्स लुंगीडान्स --फिर डर और कायको." असं काहीतरी गाणं म्हणत, लहान फाटक्या फ्रॉकमधली पोरगी -एक बारकी तारेची रिंग घेऊन त्यातून स्वत:ला वाकडं तिकडं घुसवून कसरत करेन. एवढ्या छोट्या गोल रिंगेतुन ही कशी काय इतकी लावचिक जात असेल? अन तेही एवढ्या गर्दीत जिथं नीट उभं रहायला जागा नाही अशात?? इंडिया हैज् रियली गॉट टॅलेंट -असा मी विचार करेन. तर नंतर गाणं अन कसरत ऊरकुन ती छोटी पोरगी एक ताट वाजवत पैशे मागायला डब्यातल्या सगळ्यांच्या समोर येईल. तिची कसरत कमाल असते. द्यायचे का नाही असा विचार करत मी खिशात हात घालतोच. 5चा डॉलर ताटलीत टाकतो. कसं होणार अशा पोरींचं. 5-10 मिनीट विचार करतो. नंतर काहीतरी करत-करत तो विचार नकळत बाष्पीभवनही होऊन जातो......
---
परिहार चौकात मित्राची वाट पाहत संध्याकाळी उभा असेन. पेहरावावरुन गावाकड़चं वाटेन् असं एक जोड़पं. बाईच्या कडेला एक पोरगं, माणसाच्या हाताला धरलेली एक पोरगी अन दोघांच्या हातात एक-एक बॅग. माणूस जवळ येईल अन म्हणेल की "सायबा आमी बीड कडेचे हावो. काल एसटी चुकली अन पैशे बी चोरलेया आमचे कुणीतरी. काय मदत हुईल् तर बगा देवा. गावाकडं जायचं. 200-400 तिकीटापुरते दया. अडचणीत सापड़लो हो आमी."
आपल्या जवळचं कोणी असं सापडलं तर आपल्याला कसं वाटेन? प्लस लेकरं लहान आहेत, त्यांची दया? -प्लस हा अंगाकाठी-भाषेनं-भिकारी वगैरे नाही असं वाटून कसंतरी स्वत्;ला कन्विंस करून त्याला मी 200 रूपये देतो. देवासारखे भेटलात अन आभार वगैरे मानून ते कुटुंब दुवा दिऊन निघुन जाईन. दोन मिनीट मला छान गुबगुबीत वाटेन्.
........नंतर काही दिवसांनी सेम तेच बिरहाड् योगायोगाने स्वारगेट जवळ माझ्या शेजारच्या माणसाला नगर कडच्या भाषेत "आम्ही नगरकड़चे साहेब- अन आमचे पैसे हानले म्हणून घरी जायला तिकीटाला मदत करा" असं म्हणत पैसे मागताना दिसेल.
"म्हणजे काही दिवसापूर्वी याला मदत केलेले आमी मुर्खच होतो" हे तो आमच्या शेजारीच उभा राहून- आरामात प्रूव करेल.
---
एखाद्या पोकळ दूपारी संभाजी पार्कच्या बाहेर आपण फिरत असू अन तेव्हा परडीत अंबाबाईचा फ़ोटो घेतलेली -चालता येत असेल अशी एक धड़धाकट म्हातारी आपल्या समोर उभी राहून देवीचा फ़ोटो दाखवून पैसे मागेल. असं देवाच्या नावावर तर आपण स्वत: गावाकडचे असून सुद्धा एक रुपयाही देणार नाही.
---
विशाल नगरच्या एका मध्यम हॉटेल मधे मित्रासोबत गपा मारत काचेच्या कपातुन ती “एसिडिटी” पित असू. तर अतिशय थकलेले आजोबा ज्यांला नीट उभाही राहता येत नसेल. म्हणतील -"पोरांनो जेवायला थोड़े पैसे देता का?? पोरगं संभाळत नाही, सुन सारखं कुर-कुर करते म्हणून घर सोडलं. मागून खातो आता. कधी मिळतं कधी उपाशी झोपतो. आपले दिवस कमी राहिले पोरांनो हिथं. वाटलं तर दया. नाही दिलं तरी कायी हरकत नाही. म्हणून तो शांत बसतो."
ह्याची खरंच काही काम करण्याची शक्यता नाही हे पटुन अन गरज ओळखून आपण त्याला 50 ची नोट देतो..........
---
---------------------------------------------------------
रेल्वेतले चिक्की विकणारे आंधळे, गावाकडं स्टॅण्डवर पँट धरून ओढ़णारी बारकी पोरं, दोन्ही-हात दोन्ही-पाय तुटलेल्या माणसाला पाठीवर घेऊन सिग्नलवर पैसे मागणारे दर्देवी- देवळाबाहेर देवाचा फ़ोटो मांडून आधी स्वत्:च त्यावर 10-20 ची चिल्लर टाकून दुवा देत पैशे मागणारे अवलिये, देवळाच्या आत देवाच्या पायाजवळच्या दानपेटीत पैशे टाका म्हणून ओरडत असलेले पुजारी नंतर त्या दानपेटीचा लिलाव करणारे ट्रस्टी---- तोंडावरुन तो मोरपंखाचा झाड़ू अलगद फिरवुन त्या वाळल्या भोपळयात अल्लाच्या नावाने चाराने-आठाने मागणारे जुने बाबा... स्टेशनच्या बाजूला कन्टीन्युस् बड़बडत सापाचा खेळ करून दाखवल्यावर ताटली फिरवणारे कलाकार... वासुदेव, साडी तोंडावर फेकून दुवा देणारे तृतीयपंथी, फेसबुक वर Like किंवा व्हाट्सएप्पवर फॉरवर्ड करून कॅन्सर झालेल्या मुलीच्या ऑपरेशन साठी 10 पैशे ऐड होतील म्हणून सर्क्युलेट होणारे चैन मेसेजेस अन एकूणच --पैसे मागण्याचे अशे हजारो प्रकार... कधी जेन्युइन तर कधी नुसता फार्स....
-----------------------

प्रसंग वेगवेगळे- जागा वेगवेगळ्या- वयं वेगवेगळी- डोळ्यातले भाव वेगवेगळे- मागायची कारणे वेगवेगळी- मिळालेले पैसे खर्चायच्या तरहा वेगवेगळ्या- दुवा द्यायची वाकये वेगवेगळी- देणारयाची प्रांजळता अन मागणारयाची प्रामाणिकता वेगवेगळी,
दात्याच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या... टाळायची कारणे वेगवेगळी... मनातल्या मनात चालणारे विचार वेगवेगळे.. पैसे द्यावे कि डायरेक्ट खायलाच द्यावं हे कन्फ्युजन… मागणाऱ्या बारक्या पोराला 'शिक' असं वगैरे समजवायच्या पद्धती वेगवेगळ्या.......
.
रोज समोर नकळत 1 मिनटात घडून जाणारे प्रसंग पण बॅकग्राउंडला आतमधे या प्रसंगाचं विश्व -त्यातले छुपे कॅरॅक्टर्स -ह्या सगळ्यांचं कलेक्टिव चांगलं-वाईट आणि करूण-कुत्सीत भावविश्व फार-फार मोठं आहे....आपल्या आवाक्या पलिकडलं.......

कथासमाजजीवनमानविचारप्रतिक्रियालेखअनुभवमत

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2015 - 11:31 am | टवाळ कार्टा

अश्या सगळ्यांना शिर्डी/तिरुपती येथे नेउन सोडावे...बघू ते नवसाला पावणारे देव(तरी) काही करतील का

अमृत's picture

9 Oct 2015 - 3:40 pm | अमृत

सहमत

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

9 Oct 2015 - 11:40 am | मिसळलेला काव्यप्रेमी

तुझ्या सगळ्याच लेखांवर काय प्रतिक्रिया द्यावी ते कळतच नाही. म्हणजे हे सगळ असच वाटत असत मला, पण अचानक त्याला शब्दरुप येऊन इतक उघड-नागड समोर येईल अशी अपेक्षा नसते आणि मग सुन्न व्हायला होतं.

लिहीत रहा.

अर्थहीन's picture

9 Oct 2015 - 12:33 pm | अर्थहीन

तुमच्या कडून हे ऐकायला मिळण्यापेक्षा मोठं काय असणार... खूप खूप धन्यवाद...

मानवाच्या सब्कोन्शियसमध्ये --हिडन असलेल्या बाजू Explore करण्यात एक नशा असते... सध्या त्याने मी झपाटलेला आहे असा वाटतं...

संवेदनशील मन अन निरीक्षण क्षमता या जोरावर सध्या जमेल तितकं अन जमेल तसं उमटवण्याचं प्रयत्न करतोय... अजून शिकणंच चालू आहे... :)

खरच सुप्त मनातले हे द्वंद्व नेहमीच चालू असते. ते खरे तर शब्दात उतरवणे कठीण. पण तुम्हाला छान जमलेय.

अवांतर - अजून एक खेळ सांगतो - बर्‍याच वेळेस आपण क्षणार्धात काही गोष्टींबद्दल निर्णय घेतो, काहीवेळेस आपल्याला कळतही नाही की आपण निर्णय घेतलाय म्हणून. अश्या निर्णयांचा अ‍ॅनॅलिसिस करायला मजा येते. आपले सुप्त मन अश्या वेळेस अनेक गोष्टींना एकत्र करून वेगाने निर्णय घेत असते. ते सगळे दुवे एकत्र जोडायला खूप वेळ लागतो.

अर्थहीन's picture

9 Oct 2015 - 1:55 pm | अर्थहीन

हो अशा विषयांवर लिहायला नक्कीच आवडेल... तुम्हाला कोणता Incident वाटतो असा इन जनरल...?

आनन्दा's picture

11 Oct 2015 - 10:34 pm | आनन्दा

विषय अगदी साधे आहेत.. नवरा बायकोचे भांडण, आपले ड्रायव्हिंग, आयुष्यात आलेला एखादा आणिबाणिचा प्रसंग वगैरे..

तुडतुडी's picture

9 Oct 2015 - 12:22 pm | तुडतुडी

अश्या सगळ्यांना शिर्डी/तिरुपती येथे नेउन सोडावे...बघू ते नवसाला पावणारे देव(तरी) काही करतील का

देव कुणाच्या बापाचे नोकर नाहीत . आपली कर्मं सुधारा . देवांकडे भिका मागायची गरज नाही उरणार . आणि हो त्यांना एखाद्या मशिदीत पण सोडून बघा

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2015 - 12:58 pm | टवाळ कार्टा

देव कुणाच्या बापाचे नोकर नाहीत .

देवाला कुणाचे नोकर म्हणणार्यांची गय केली जाणार नाही
- भरधाव हाकरे

आपली कर्मं सुधारा .

मी माझी कर्मं व्यवस्थित करतो...त्याने अश्या लोकांच्या हाल अपेष्टांत फरक पडेल?

देवांकडे भिका मागायची गरज नाही उरणार .

लेखात उल्लेख केलेल्या परिस्थितीत जर देवाला साकडे नाही घालायचे तर मग देवाकडे भिका मागायची गरज कधी असते?

आणि हो त्यांना एखाद्या मशिदीत पण सोडून बघा

मी या लोकांना "माझ्याच" देवाकडे पाठवणार कारण मला माझा देव "जास्त" दयाळू आहे असे वाटते...तुम्हाला स्वताच्याच देवावर विश्वास नाही???

आणि माझा एक सल्ला - आधी स्वतः इथे फुकाच्या गप्पा हाणण्यापेक्षा गरजू लोकांसाठी (गेलाबाजार तुम्हाला हवेच असेल तर फक्त हिंदूंसाठी) काहीतरी करा

अर्थहीन's picture

9 Oct 2015 - 1:55 pm | अर्थहीन

मस्त

बबन ताम्बे's picture

9 Oct 2015 - 12:24 pm | बबन ताम्बे

पुण्यात चौका चौकात भिकारी दिसायला लागलेत. विमाननगरच्या हयात हॉटेल चौकात टोळीच असते. चूकून एखादा फॉरेनर दिसला तर त्याचा भयंकर पिच्छा पुरवतात.
वाईट वाटते माणसाच्या जीवनातील अशी कुरुप बाजू बघून.

मनातलं लिहीले आहे. त्या क्षणी आपल्याला योग्य वाटेल ते करून मोकळं व्हाव, म्हणजे मागं रुखरुख लागून रहात नाही. भले ते आपल्याला फसवत आहेत हे माहीत असले तरी. शिकलेली धडधाकट माणसं लाच मागतात तेव्हा देतो ना डोळे झाकून? कुणाचं पोट भरणार असेल तर काय हरकत आहे ५ रुपये द्यायला?

द-बाहुबली's picture

9 Oct 2015 - 12:56 pm | द-बाहुबली

शिकलेली धडधाकट माणसं लाच मागतात तेव्हा देतो ना डोळे झाकून? कुणाचं पोट भरणार असेल तर काय हरकत आहे ५ रुपये द्यायला?
मार्मीक.

तुडतुडी's picture

9 Oct 2015 - 12:56 pm | तुडतुडी

काही महिन्यांपूर्वी पेपर मध्ये भिकार्यांवर १ लेखमाला आली होती . . हे भिकारी एकमेकांचे कुणीही नसतात .त्यांचे करते करविते धनी वेगळेच असतात . लहान मुलांना चोरून , पळवून आणलेलं असतं .त्यांचा जास्तीत जास्त केविलवाणा अवतार केला जातो . दिवसभरात साठलेले पैसे त्यांच्याकडून हिसकावून घेतले जातात . आणि फक्त जिवंत राहण्यासाठी त्यांना तुटपुंज अन्न दिलं जातं . दुसर्या प्रकारचे भिकारी हे आळशी , काम करावं लागू नये म्हणून भिक मागत बसतात . मिळालेल्या पैशांतून दारू पिवून पडतात . त्यामुळे काही द्यायचं असेल तर पैसे अजिबात देवू नयेत . खायला काहीतरी द्यावं, कपडे द्यावेत . त्याच्यातही हि लहान मुलांना , म्हातार्यांना preferance द्यावा . तरुण , धडधाकटांना साधारणत: देवू नये

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2015 - 1:00 pm | टवाळ कार्टा

या सगळ्यांचे बोलावीते धनी तिकडे दुबईत बस्लेले आस्तात असे ल्हिहायचे र्हैले कै =))

बॅटमॅन's picture

9 Oct 2015 - 3:57 pm | बॅटमॅन

=))

सहमत. मी मध्यंतरी मुद्दाम चॉकोलेट्स ठेवायला सुरुवात केली होती. केवळ या अश्या मुलांना द्यायला.

जगप्रवासी's picture

9 Oct 2015 - 1:30 pm | जगप्रवासी

पेहरावावरुन गावाकड़चं वाटेन् असं एक जोड़पं. बाईच्या कडेला एक पोरगं, माणसाच्या हाताला धरलेली एक पोरगी अन दोघांच्या हातात एक-एक बॅग. माणूस जवळ येईल अन म्हणेल की "सायबा आमी बीड कडेचे हावो. काल एसटी चुकली अन पैशे बी चोरलेया आमचे कुणीतरी. काय मदत हुईल् तर बगा देवा. गावाकडं जायचं. 200-400 तिकीटापुरते दया. अडचणीत सापड़लो हो आमी."

मला देखील सेम अनुभव आला होता, तेव्हा त्या कुटुंबाला प्रत्येकाला बाजूच्या वडापाव च्या गाडीवरून १/१ वडापाव घेऊन दिले म्हटलं खा बाबानो. आपण फसलो आहोत की माहित नाही पण तेव्हा जे वाटल ते केल.

अभ्या..'s picture

9 Oct 2015 - 1:49 pm | अभ्या..

कुठं म्हणे हे?
आयडीमुळे कॅन्व्हास जरा वाईड असेल ना? ;)

"साहेब, मला गावाकडं जायचय. पण माझं पाकिट मारलं गेलंय. मला थोडी पैशांची मदत करता का ?"
मी त्याला म्हटले पाकीट मारले गेलेय ना, चला आपण पोलिसांकडे तक्रार देऊ.
शेपूट घालून पळाला.

हेमंत लाटकर's picture

9 Oct 2015 - 2:33 pm | हेमंत लाटकर

पैसे न देता खाऊ घालावे, तेवढेच पुण्य.
म्हातारे व लहान मुलांना प्राधान्य द्यावे.

अवांतर: भीक मागण्यावर बंदी आणावी.

लोकांना चार दोन रुपये सरसकट नाही दिले तरी अधे मधे द्यावेत. आपली द्यायची सवय कायम राहते. नंतर त्या पैशाचा उपयोग कसा होतो याबाबत विचार करु नये.

राही's picture

9 Oct 2015 - 4:31 pm | राही

लेख आवडला. आपल्याला अशी चुट्पुट बरेच वेळा लागते. पण या भिकार्‍यांना, विशेषतः सिग्नलवर भीक मागणार्‍यांना अज्जिबात पैसे देऊ नयेत. खाण्याचे पदार्थ, जुने कपडे वगैरे (हाताशी असतील तर) द्यावेत. कारण मोक्याची ठिकाणे भीक मागण्यासाठी भिकारी माफियांनी वाटून घेतलेली असतात. प्रत्येकाचा भीक एरिया आणि त्यात काम करणारी मुले हे सगळे वेल-कन्ट्रोल्ड, वेल-प्लॅन्ड असते. हा मोठा संघटित अवैध धंदा आहे. ही मुले फक्त नोकर असतात. मिळालेली सगळी भीक दादाकडे जाते. या मुलांवर लक्ष्य ठेवण्यासाठी दादाचे हेर असतात. कित्येकदा लहान मुलांना पळवणे, त्यांना अपंग करून सहानुभूती निर्माण करणे, भिकेसाठी नवजात बालके भाड्याने घेणे असे गैर प्रकार चालतात. अशी पाचदहा रुपयांची भीक नेहमी देण्याऐवजी वर्षातून एकदा निराधारांसाठीच्या एखाद्या संस्थेला देणगी द्यावी.

चौकटराजा's picture

10 Oct 2015 - 11:34 am | चौकटराजा

अपंग सोडून मी कोणालाही काहीही देत नाही !

ब़जरबट्टू's picture

10 Oct 2015 - 3:53 pm | ब़जरबट्टू

slumdog millionaire बघितल्यानंतर भिक देणे बंद केले...

विवेकपटाईत's picture

11 Oct 2015 - 7:03 pm | विवेकपटाईत

खायला द्या पैशे देऊ नका. मदत करण्यासाठी सुद्धा योजना आखावी लागते. जनकपुरीतील (सनातन धर्म मंदिरात बी ब्लॉक). हिवाळ्यात कंबल वाटणे असो, मुलांना किंवा पुस्तके व फी साठी पैसे, इत्यादी. आधी घरोघरी जाऊन चौकशी करतात. नंतर गरज ओळखून मदत करतात.

बाकी पाकीट कुणाचेही मारल्या जाऊ शकते. २० एक वर्षांपूर्वी धौला कुआंला उतरल्यावर कळले, पाकीट मारल्या गेले आहे. चक्क ११ किमी पाई चालत घरी (उत्तम नगर) आलो. पण दूर जायचे असेल तर मदत मागावीच लागेल. अश्यावेळी मदत देणार्याला देवावर विश्वास ठेउनच दुसर्याला मदत करावी लागते किंवा वेगळा निर्णय घ्यावा लागतो.