प्रवास (१)

Primary tabs

श्रावण मोडक's picture
श्रावण मोडक in जनातलं, मनातलं
11 Aug 2008 - 9:17 pm

तो अनादी आहे. अनंतही असेल. असावाच. कारण आपल्याला अंत आहे.
तो. काळ.

---
संध्याकाळ. ५. ३०.
संध्याकाळ श्रावणातली असली तरी, श्रावणाचा कुठंही मागमूस नाहीये. ना पावसाची रिपरिप आहे, ना मधूनच येणारा उन्हाचा कवडसा. फक्त आभाळ गच्च भरलेलं आहे. पण ते कोंडलेलं आहे. कोणत्याही क्षणी मुक्तपणे उधळण करू शकण्याच्या परिस्थितीत नाही हे लगेचच जाणवून जातं. आम्ही दुष्काळी भागातच आहोत, हे दाखवण्यासाठी आणखी कशाचीही आवश्यकता नाही.
बलवडी येथे संपतराव (पवार) यांनी आयोजित केलेल्या एक सुंदर कार्यक्रमासाठी मी तेथील क्रांती स्मृतिवनात पोचलो आहे. रस्त्यावरून साधारण फर्लांगभर अंतर आत गेलं की क्रांती स्मृतिवनाची सीमा सुरू होते. घनगर्द झाडी. वेगवेगळी झाडं. पावसानं चिखलमय केलेल्या पायवाटेवर अनेक फुलांची उधळण निसर्गानंच करून ठेवलेली. पारिजातक, मोगरा हीही त्यात आहेतच. त्यांचा गंध वातावरणात भरून राहिलेला आहे, असं म्हणता येईलही आणि नाहीही. कारण मधूनच तो गंध तुमच्या नाकपुड्या उल्हासित करून जातो आणि पुढच्याच क्षणी पुन्हा अस्सल पावसाळी वातावरणाचा गंध तुमचा ताबा घेतो. स्मृतिवनाच्या उंबऱ्यशी पोचलो आणि मोराची केका वातावरणात घुमली. येताना रस्त्यातच चांगला साडेतीन फुटांचा पिसारा मिरवत असलेल्या एका मोरानं दर्शन दिलं होतं. आता इथं पुन्हा केका. एकूण थोडासा श्रावणाचा फील त्यातून यावा.
स्मृतिवनाच्या उंबऱ्यापासून आत शिरलो ते भजनाच्या सुरांनी कब्जा केला. 'लहानपण देगा देवा'ची आळवणी सुरू होती. इतक्या विविध प्रकारे की, सांगता सोय नाही. साथीला पेटी आणि मृदंग. त्या सुरावटींवर स्वार होतच आम्ही पुढं सरकतो. एकूण तीन नवे वृक्ष त्या ठिकाणी लावण्याचा हा कार्यक्रम आहे. मेधा पाटकर यांच्या हस्ते तिन्हीचं वृक्षारोपण होतं. शिवाय संजय संगवई मंचाचं भूमिपूजनही. वृक्षारोपणाच्या जागा आणि मंचाची जागा यामध्ये अंतर आहे. संजयच्या आईंचा, विजयाताईंचा, संतसाहित्याचा अभ्यास. त्यामुळं भजनाची योजना. त्यांच्यासमवेतच वृक्षारोपणाच्या जागी आणि मंचाच्या जागी अभंग गातच दिंडीनं जाण्याची कल्पकताही संपतरावच दाखवू जाणे. आम्ही तशा दिंडीनंच त्या वनात फिरलो.
गेल्या काही दिवसांपासून पाऊस या भागात बरसलेलाच नाही. जो काही झाला तो अगदी माती भिजवण्यापुरताच. त्यामुळं पलीकडं येरळा नदीच्या पात्रात वाळूचंच दर्शन होतंय. वनाच्या कडेला थांबून मी येरळेकडे पाहतो. पश्चिमेला फर्लांगभर अंतरावर बळीराजा बंधारा दिसतो. कोरडा ठाक. कधीकाळी सामुदायीक स्वरूपात पाण्याची सोय करण्याचा एक आदर्श म्हणून ज्याचा उल्लेख झाला तो 'बळीराजा'. दुष्काळानंच माणसाच्या या शक्तीवरही मात करून ठेवल्याचा हा आणखी एक दाखला.
लक्ष पूर्वेच्या दिशेनं वळतं. समोरचं एक डबकं साचलेलं आहे. त्याच्या काठाशी बसून एक मोर पाणी पितोय. आमच्यापासून अंतर बरंच आहे, त्यामुळं निर्धोक स्थितीत त्याचा वावर सुरू आहे. पिसारा फुलावा ही माझी इच्छा. पण पावसानंच अंतर दिल्यानं तो तरी बिचारा काय करेल? मघा रस्त्यात भेटलेल्या मोराप्रमाणेच हाही त्या पिसाऱ्याला नुसतंच आपल्या पाठी मिरवत फिरतोय.
---
रात्र. ९. ००.
संपतरावांच्या घरी जेवण करून आम्ही बसलो आहोत. समोर कात्रणांच्या, निवेदनांच्या असंख्य फायली. बळीराजाचा संघर्ष जसा त्यातून समोर उभा राहतोय, तसाच उभा राहतोय तो क्रांती स्मृतिवनाचाही संघर्ष. संपतरावांच्या एका चिरंजिवांच्या अकाली जाण्याची नोंदही त्या कात्रणातून समोर येतेच.
सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी कात्रणं आहेत ती संपतरावांनी पाणीनियोजनाच्या अनुषंगानं केलेल्या लेखनाची. आपल्या या प्रदेशात पाण्याचं नियोजन स्थानिक स्रोतांच्या संवर्धनाच्या अनुषंगानंच व्हावं अशीच त्यांची सारी मांडणी आहे. दुष्काळी भागात पाण्याचं नियोजन सरधोपट मार्गानं करून चालणार नाही. त्यासाठी पाण्याचे स्रोत, त्यातील पाण्याची उपलब्धी आणि त्या उपलब्धतेनुसार शेतकऱ्याच्या हाती उत्पन्न ठेवणारी पीकव्यवस्था आणि त्या पिकांना उत्पादन खर्चानुसार भाव ही त्यांच्या या मांडणीची चतुःसूत्री.
संपतराव बोलू लागतात तेव्हा या चतुःसूत्रीचा एकेक पैलू समोर येत जातो. ऊस ही पाणी पिऊन घेणारी पीकव्यवस्था. तिचा पुरस्कार केल्यानं शेतकऱ्याच्या हाती थोडी वरकड आली असली तरी, पाण्याच्या व्यवस्थेचे तीनतेरा वाजलेत हे ते सांगत जातात. त्यांचा एकेक लेख या मांडणीचा विस्तारच असतो. कधी या लेखातून तर कधी त्या लेखातून एखाद्या मुद्याचा विस्तार होत जातो. आमची चर्चा नंतर वळते ती दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाकडे आणि तिथून बोलता-बोलता झोप आमच्यावर स्वार होते.
---
सकाळ. ८. १५.
आटपाडीच्या दिशेनं आमची गाडी निघते. 'आंदोलन' मासिकाच्या सुनीती सु. र., संपतराव आणि संजय संगवई अभ्यासवृत्तीधारक अभ्यासक दीपक पवार यांच्यासमवेत मी आहे. गाडीचे (सं)चालक सागर साळुंखे. आमची चर्चा पाणी, कालवा, धरण अशा चौकटीतच असते. ती ऐकून त्यांना त्यात रस निर्माण होतो. त्यांच्याकडून प्रश्नांची सरबत्ती सुरू होते. मी ऐकण्याच्या भूमिकेत आहे. त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर त्यांचंच उत्तर मिळावं अशा बेतानं चर्चा सुरू ठेवण्याकडंच माझा कल. हेतू शुद्ध आहे, इथल्या लोकांनाच किती माहिती आहे त्यांच्या प्रश्नांची आणि त्यावरील उत्तरांची, हे मला पहायचं आहे. ते बोलत जातात. तालुक्यात मोठा जलाशय झाला पाहिजे, पावसाळ्यात वाहून जाणारं पाणी रोखलं पाहिजे वगैरै मुद्दे. त्याला एक डिसक्लेमर. "मी माझ्या अकलेनुसार हे बोलतोय. तुमच्या इतका माझा अभ्यास नाही. त्यामुळं यात चुकाही असतील."
---
सकाळ. १०. ००.
आटपाडी ग्रामपंचायतीमध्ये काही मंडळी जमली आहेत. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आहेत, काही पत्रकार आहेत, काही राजकीय कार्यकर्ते आहेत. परिचय करून घेऊन चर्चा सुरू होते.
"मान्सून आमच्याइथं तसा येतच नाही. पहिला येतो तो आमच्यापासून पश्चिमेला थांबतो, नंतर येतो तो पूर्वेलाच सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर थांबतो." एका वाक्यात पावसाच्या स्थितीचं वर्णन होतं.
दर वर्षी जुलै ते सप्टेंबर हे महिने हे गाव पाण्याचा दुष्काळ अनुभवतं. वरच्या पट्ट्यात जोराचा पाऊस झाला की, पुराचं पाणी या गावाच्या वेशीला लागतंच; पण ते वाहून जातं. पुढं पुन्हा दुष्काळ.
"हा तालुका कायम दुष्काळी आहे कारण तो पर्जन्यछायेत येतो," माझ्याशेजारी बसलेले पत्रकार मला सांगू लागतात.
मी त्यांना विचारतो, "त्यावर मार्ग काय?"
"बाहेरून पाणी आणून इथं ते पुरवणं."
त्याविषयीच अधिक चर्चेची आमची अपेक्षा असते. बाहेरून म्हणजे कुठून, ते कसं आणायचं हे त्यातले कळीचे प्रश्न नाहीत. बाहेरूनच का आणायचं, स्थानिक स्रोतांतून पाण्याची उपलब्धता करता येणार नाही का, हा आमचा प्रश्न असतो. पण चर्चा आधी "बाहेरून पाणी" या मुद्याकडंच जातं. टेंभू पाणी योजना हा त्यावरचा सर्वश्रृत पर्याय. कऱ्हाड जवळ टेंभू गावापासून कृष्णेचं पाणी उचलायचं आणि ते आटपाडीमार्गे सांगोल्याला न्यायचं अशी ही योजना आहे. सुमारे शंभरावर किलोमीटर लांबीचा कालवा त्यासाठी करावा लागणार आहे. त्यापैकी काही भागांत कालवा खणून तयार आहेदेखील. एक बोगदाही आहे मध्ये. तोही तयार आहे. पाणी उचलण्याची यंत्रणा मात्र अद्याप कार्यान्वित झालेली नाही. ती होण्याची शक्यता नजिकच्या भविष्यात तरी इथल्या मंडळींना दिसत नाही. चर्चा इथं येऊन थांबते आणि प्रश्न येतो, स्थानिक स्रोतांचं काय?
तालुक्यात असलेल्या प्रत्येक नदी-ओढ्यामध्ये गाळ भरला आहे. तो काढून टाकला पाहिजे. एक सूचना येते. एव्हाना या चर्चेत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ पाटील सहभागी झालेले असतात. हातात सोनेरी पट्ट्याचं घड्याळ, बोटांमध्ये अंगठ्या, खिशात मोबाईल. शुभ्र पांढरा वेष. शर्ट आणि पँट.
"गाळ काढण्याचं नियोजन सरकारी पातळीवर झालं आहे," ते सांगू लागतात. त्यांच्या या मताशी समोर असलेल्यांपैकी काही जण सहमत नाहीत. त्या नियोजनाचे वाभाडे काढण्यास सुरवात होते तेव्हा रामभाऊ सूर बदलतात, "गाळ काढण्याची दुसरी बाजूही ध्यानी घेतली पाहिजे. तो गाळ टाकायचा कुठं?" माझ्याकडं पाहून त्यांचा हा प्रश्न असतो. माझ्या चेहऱ्यावर बहुदा छद्मी हास्य येतं. सरकारी नियोजनाचा पुरस्कार करणारा माणूस क्षणात त्यातील अडचणी सांगू लागलेला पाहूनच ते हास्य आलं असावं. रामभाऊ विषय पुन्हा टेंभूवर नेतात.
"टेंभूतून तरी तुमच्या तोंडी पाणी येणार आहे का?" माझ्या मनातील प्रश्न मनातच राहतो, कारण संपतराव बोलू लागतात. टेंभूला जलआयोगाची मान्यताच नाही हा त्यांचा बिनतोड मुद्दा असतो. रामभाऊ म्हणतात, "म्हणूनच एक पर्याची योजनाही सादर करण्यात आली आहे शासनाला. वरच्या भागातून पावसाच्या काळात वाहून जाणारं पाणी इथं आणून देण्याची." त्याची टिप्पणी संपतरावांकडं असतेच. त्यामुळं त्या योजनेवर पुढं चर्चा होत नाही.
"आटपाडीत स्थानिक स्तरावरच पाण्याचं नियोजन होऊ शकतं की, नाही?" सुनीती यांचा प्रश्न.
उत्तर होकारार्थीच असतं. इतकंच नाही तर पाण्याच्या या प्रश्नावर आम्ही सारे एक आहोत, असंही सांगितलं जातं. पाणी मिळावं यासाठीची ही एकी आहे, ते कसं मिळावं याविषयी नाही हा या चर्चेचा निष्कर्ष मी मनातच नोंदवून ठेवतो.
निघतानाच मी आणखीही एक नोंद करतो. तिथल्या फलकावर सरपंच म्हणून एका महिलेचं नाव आहे. आमच्या या चर्चेवेळी एकही महिला तिथं उपस्थित नसते. अपवाद मी ज्यांच्यासमवेत आहे त्या सुनीती यांचा.
(अपूर्ण)

लेखअनुभववाङ्मयजीवनमानप्रवास

प्रतिक्रिया

पिवळा डांबिस's picture

12 Aug 2008 - 1:42 am | पिवळा डांबिस

मोडकराव,
अनुभव चांगला लिहिता आहांत तुम्ही. पावसाचा आणि पाण्याचा प्रश्न ही एक भेसूर समस्या आहेच. तुमच्या अनुभवाबद्दल आम्ही अनादर मुळीच दाखवित नाही.
परंतू, एकदा म्हणता,
गेल्या काही दिवसांपासून पाऊस या भागात बरसलेलाच नाही.
आणि एकदा म्हणता,
पावसानं चिखलमय केलेल्या पायवाटेवर अनेक फुलांची उधळण निसर्गानंच करून ठेवलेली.
म्हनजे दुष्काळ आनि पावसानं चिखलमय केलेली वाट एकदम एकाच वेळी?
काय वाचकांच्या मेंदूचा भुगा करायचं ठरवलंय काय राव?
एक काय ते निश्चित करा ना...
:)

श्रावण मोडक's picture

12 Aug 2008 - 2:53 pm | श्रावण मोडक

माझी वाक्ये...

गेल्या काही दिवसांपासून पाऊस या भागात बरसलेलाच नाही. जो काही झाला तो अगदी माती भिजवण्यापुरताच.

बरसणं आणि माती भिजवण्यापुरता पाऊस होणं यातला फरक या दोन सलग वाक्यात पुरेसा व्यक्त झालेला आहे. अगदी थोड्याशा शिडकाव्यानंतरही खडकाळ भागात पायवाटेवर येऊन साचलेल्या पाण्याने चिखल होतो हा माझा अनुभव आहे.

पिवळा डांबिस's picture

12 Aug 2008 - 11:05 pm | पिवळा डांबिस

बरसणं आणि माती भिजवण्यापुरता पाऊस होणं यातला फरक या दोन सलग वाक्यात पुरेसा व्यक्त झालेला आहे. अगदी थोड्याशा शिडकाव्यानंतरही खडकाळ भागात पायवाटेवर येऊन साचलेल्या पाण्याने चिखल होतो हा माझा अनुभव आहे.

मग असेल बुवा! आता तुमचा अनुभव आहे म्हटल्यानंतर मग काय!
तरी स्पष्टीकरण देऊन आमच्या मनातला गोंधळ दूर केल्याबद्दल आभार!

साती's picture

12 Aug 2008 - 2:52 pm | साती

पाऊस बरसणे आणि रिमझिमणे यांत फरक आहे.
या भागात पाऊस रिमझिमल्याने अधूनमधून थोडिशी हिरवळ आहे पण शेतीभाती आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्याइतका बरसणारा पाऊस अद्यापि झाला नव्हता.
साती