पौराणिक कथांवरील नवीन मालिकांविषयी थोडंसं...

देवदत्त's picture
देवदत्त in जनातलं, मनातलं
8 Jul 2008 - 2:07 am

सध्या वेगवेगळ्या वाहिन्यांची पौराणिक कथांवर मालिका दाखविण्याची स्पर्धा सुरू आहे असे दिसते. साईबाबा, वैष्णोदेवी, हनुमान, रामायण ह्या मालिका (आणि इतर भरपूर) सुरू आहेत. पुर्वी ह्या सर्व मालिकांची वेळ रविवार सकाळ असायची. त्याला पहिले कारण म्हणजे रविवारी सर्वांना सुट्टी असते आणि सकाळपासून लोक टीव्ही बघत असतात. तसेच दुसरे कारण म्हणजे आधी दाखविलेल्या रामायण, महाभारत, श्रीकृष्ण ह्या मालिकांचे यश असेल. असो, सध्या तरी त्या मालिका इतरवेळीही पुन्हा दाखविणे चालू होते.

मग एन डी टी व्ही इमॅजिन ने नवीन ’रामायण’ आणले. निर्माते जुन्या रामायणचेच. सागर आर्ट्स. त्यामुळे लोकांच्या थोडाफार अपेक्षा असतीलच. त्यात त्यांनी वेळ निवडली प्राईम टाईमची. नक्की माहित नाही पण एका ठिकाणी वाचल्याप्रमाणे, एनडीटीव्ही ला त्याचा फायदा झाला. (जरी लोक आय़ पी एलचे सामने जास्त बघत होते तरी त्यांना तेवढे नुकसान झाले नाही.)

आमच्या घरी रामायण पाहणे सुरू असते. सुरूवातीला तसे बरे वाटले. अजूनही बरेच चांगले सूरू आहे. तरीही जुन्या रामायण मालिकेसोबत तुलना होणे स्वाभाविकच आहे. त्यात स्टार उत्सव वर ती जुनी मालिका दाखवित आहेत. मग तर काय संध्याकाळी जुने रामायण, रात्री नवीन रामायण. आता ह्यात जास्त तुलना होते ती कलाकारांच्या अभिनयाची, सादरीकरणाची. नवीन रामायणात मला सुरूवातीला तरी थोडा तजेलदारपणा वाटला. नवीन वाहिनी, नवीन कलाकार, नवीन तंत्रज्ञान. ह्याचा फरक तर दिसणारच. पण ह्यात राण्यांचा पेहराव, त्यांचे थोडेफार वागणे ह्यात सांस बहू मालिकांचा प्रभाव दिसत होता. मग पुढे दिसू लागला संगणकीय प्रभाव. हे मान्य आहे की ह्यात राक्षस, बाणांचा वर्षाव वगैरे आणि भरपूर गोष्टी प्रत्यक्षात दाखवू शकत नाही, तेव्हा त्यामागे स्पेशल इफ़ेक्ट्स वापरावे लागतात. पण इतर ठिकाणी तो जिवंतपणा वाटत नाही आहे. राजा दशरथाचा महाल बाहेरून दाखविण्यात संगणकाचा वापर जास्त केला असे दिसून येते. संध्याकाळचे राजमहालाचे दृष्य पाहताना त्याची जाणीव होते. इतरही वेळा वाटते की काहीतरी कृत्रिम दाखवण्यात येत आहे.

मग सुरू झाले 9x वाहिनीवर महाभारत सुरू होण्याचे वारे. गेले २ महिने रणभूमी, गदा, धनुष्य वगैरे दाखवून महाभारतातील एक एक गोष्टी समोर आणत त्याची जाहिरात दाखवत होते. त्या जाहिराती बघतानाही जाणवत होते की ह्यात थोडी अंधाराची छटा आहे. इथेही कृत्रिमतेचा भास होत होता. म्हटले पाहूया ह्यात काय आहे ते? काल परवा ह्याची नवीन जाहिरात पाहिली तेव्हा वाटले की हे पूर्ण फिल्मी प्रकारात चित्रीत केले आहे. आज कालचे नायक/खलनायक ज्याप्रमाणे दिसतात त्याप्रमाणे ती पात्रे दिसत होती.

मग आज रात्री ९ वाजता महाभारत दाखविणे सुरू झाले. सुरूवातीलाच धर्मराज खेळात हरलेला दाखविला. दुर्योधन सांगतो की द्रौपदीला घेउन ये. हे सर्व पाहत असताना मला वाटले की मी संगणकावर एखादा नवीन गेम बघत आहे. तेच स्पेशल इफेक्ट्स. ह्यात प्रजा दाखविली ती पूर्णत: संगणक निर्मित. मागील महालही तसाच वाटला. मग दुशासन द्रौपदीला आणायला जाताना दाखविला. पूर्णत: कृत्रिम माणूस. चेहयावरील भाव काहीच प्रभाव पाडत नाहीत. महालातील दासी तशाच. त्याआधी बाहेर युधिष्ठिर दाखवला होता. त्याला पाहताना मला राम गोपाल वर्माच्या ’कंपनी ’ मधील चंदू (विवेक ओबेराय)ची झलक दिसली. त्यात भर पाडली ती पार्श्वसंगीताने. ’सरकार’ मधील पार्श्वसंगीत जसे आहे तसेच. मला वाटले थोड्या वेळाने ’गोविंदा गोविंदा’ही सुरू होईल व द्रौपदीला वाचवायला कृष्ण आला आहे असे दाखवतील. पण आमच्या मातोश्रींना दुसरी मालिका पहायची होती म्हणून मग वाहिनी बदलण्यात आली.

तर हे सांगण्याचा उद्देश हाच की आता पौराणिक कथा पुन्हा तयार करून दाखवत आहेत हे कौतुकास्पद आहे. पण ते पाहताना आपण रामायण/महाभारत, राम/कृष्ण पाहत आहोत हे जाणविले पाहिजे. सध्या तरी रामायणामध्ये ते थोडेभार दिसते. पण नवीन महाभारताच्या पहिल्या दहा मिनिटांतच मला वाटले की ह्यात काहीतरी कमी आहे. कितपत चांगले वाटते ते बघू.

जमल्यास थोडी आणखी वाट पाहूया. २१ जुलै पासून नवीन वाहिनी ’कलर्स’ वर श्रीकृष्णावर (की बालकृष्णावर) मालिका येत आहे. ह्याच्या जाहिरातीही सुरू आहेत. त्यात तरी हा कृत्रिमपणा जाणवत नाही. खरं काय ते मालिका सुरू झाल्यावरच कळेल.

(हाच लेख माझ्या अनुदिनीवरही वाचता येईल)

कलासंस्कृतीतंत्रमौजमजाप्रकटनप्रतिसादप्रतिक्रियासमीक्षा

प्रतिक्रिया

पक्या's picture

8 Jul 2008 - 11:55 am | पक्या

ह्म्म्..हल्लीच्या पौराणिक मालिकांमध्ये स्पेशल इफेक्ट्स वापरले तरी त्याचा प्रभाव जेवढा जाणवायला हवा तेवढा अजिबात जाणवत नाही. उलट ते सर्व हास्यास्पद वाटू लागते. हल्लीच्या काळातील मला बरी वाटलेली मालिका म्हणजे झी टीव्ही वरील रावण. ही मालिका जरा ठीक होती.

वरद's picture

8 Jul 2008 - 2:22 pm | वरद

महाभारत नाही ते "के-भारत" होते

आर्य's picture

8 Jul 2008 - 3:17 pm | आर्य

भारत ऐक खोज - फार बरे होते या सगळ्यांत.....(काहींना यावर आक्षेप असु शकतो-ओम पुरी मुळे)

देवदत्त's picture

10 Jul 2008 - 11:42 pm | देवदत्त

म्हणजे अशा प्रतिक्रिया देणारा मी एकटा नाही हे दिसले :)
उलट ते सर्व हास्यास्पद वाटू लागते.
सहमत.
महाभारत नाही ते "के-भारत" होते
हीही... आज पुन्हा थोडे पाहिले. त्यात गंगा, शंतनु व भीष्म ह्यांचा संवाद पाहिला. त्यातही मला तेच वाटत होते. मी आधी म्हटल्याप्रमाणे त्याप्रकारे ह्यात कृत्रिम असे नव्हते काही. तेव्हा जरा बरे वाटले.
वास्तविक मी हा लेख लिहिल्यानंतर दुसर्‍या दिवशी प्रतिक्रिया पाहिल्या तेव्हा मला कळले ही मालिका एकता कपूर निर्मित आहे. चला, म्हणजे माझे मत हे पूर्वग्रहदूषित नव्हते. :D