मंडालेचा राजबंदी-१

अमितसांगली's picture
अमितसांगली in जनातलं, मनातलं
22 Jun 2012 - 10:50 am

नुकतेच अरविंद गोखले यांचे 'मंडालेचा राजबंदी ' हे लोकमान्य टिळक यांच्यावरील राजद्रोहाच्या तिन्ही खटल्यांची माहिती देणारे पुस्तक वाचनात आले. लोकमान्यांचे केसरीमधील लेख, त्यांची भाषणे, मंडालेच्या तुरुंगातील पत्रव्यवहार, त्यांचे वकिली कौशल्य, राजद्रोहाच्या शिक्षेची कारणे, त्याबद्दल लोकमान्यांनी दिलेले स्पष्टीकरण, मंडालेच्या तुरुंगामधील त्यांनी काढलेली ६ वर्षे, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, पाली व संस्कृत या भाषांमधील त्यांचे ज्ञान व वाचन, त्यातून जन्माला आलेला गीतारहस्य ग्रंथ, स्वराज्याबद्दल वाटणारी कळकळ व टिळकांचे मृत्यूपत्रही त्यात वाचायला मिळेल.अरविंद गोखले हे केसरी या नियतकालीकेचे दहा वर्ष संपादक होते. लोकमान्य टिळकांचे नातू जयंत टिळक यांच्याशी त्यांचा अत्यंत घनिष्ट संबंध होता. या खटल्यांची माहिती सारांश रूपाने मांडण्याचा मी प्रयत्न करतो.

राजद्रोहाचा पहिला खटला :

१८९६ मध्ये महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारी उपाय योजनांना पूर्ण सहकार्य देण्याचे धोरण टिळकांनी स्वीकारले होते. दुष्काळ, दुष्काळाचे स्वरूप, दुष्काळाची कारणे, दुष्काळ निवारण्याचे मार्ग, दुष्काळ निवारण्याची तयारी, जमिनीच्या साऱ्याची तहकुबी व सुट, साऱ्याच्या तहकुबीबद्दल सरकारचा ठराव असे सरकारी उपायांना जनतेपर्यंत घेऊन जाणारे अग्रलेख त्यांनी लिहिले. त्या काळी फॅमिन कमिशनरांनी दुष्काळ निवारणीसाठी फॅमिन कोडा अंतर्गत काही तत्वे नमूद केली होती (जी फक्त इंग्रजी भाषेत उपलब्ध होती)

त्याकाळी दुष्काळ किती भयंकर होता हे एका परिस्थितीवरून स्पष्ट होते. मुळशी या भागात सामान्य माणूस माडाची झाडे तोडून आणायचा आणि त्याचे पीठ करून ते पाण्यात मिसळून खायचा. हे पीठ निसत्व होते तरीही त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. चार-चार दिवस चूल पेटत नव्हती. दीडशे वस्तीच्या भागात ५ पायली पण धान्य निघत नव्हते. हाडांचे सापळे बनलेले शेकडो लोक दिसत होते. पाच माणसांच्या कुटुंबापैकी एकास दाणे मिळाल्यास सारी माणसे दाणे दळून त्याचे पीठ करून ते पाण्यात घालून वाटी-वाटी पीत असत.

दुष्काळाच्या काळात सरकारी उपाययोजना खेडोपाडी पोहचविणारी पुरेशी यंत्रणाच सरकारकडे नव्हती. वृत्तपत्रे जी माहिती पुरवितील ती ग्रामीण भागात पोहचतीलच याची शाश्वती नव्हती. त्यातून निरक्षरतेचे प्रमाण मोठे. टिळकांनी फॅमिन कोडाचे मराठीत भाषांतर करून ते केसरीतून प्रसिद्ध केले व गावोगाव त्या पुस्तिकांचे वाटप त्यांनी स्वतः केले. लोकांनीही कोणत्या गोष्टी अगदी तातडीने करायला हव्यात हेही त्यांनी समजावून सांगितले होते.

फॅमिन कोड्यात त्यांनी बऱ्याच दुरुस्त्याही सुचविल्या असून अनेक बाबतीत सरकारची खरडपट्टी काढली आहे. दुष्काळ निवारण्याच्या कामी सरकारने दाखविलेली क्षुद्रबुद्धी, धमकी देऊन शेतसारा वसूल करणे, शेतकीच्या व जनावरांच्या झालेल्या व असलेल्या नायनाटविषयी सरकारची बेपर्वा वृत्ती, रिलीफ कामावर होणारी दंडाची चंगाळी, उपासमारीमुळे सामान्य लोकांच्या आरोग्याची होत असलेली खराबी, कोष्टी कारागिरांची सामान्य मजुरात गणना झाल्यामुळे वरिष्ठ धंद्याची झालेली मानखंडना व त्यांना सोसाव्या लागणाऱ्या यातना या सर्वांची जाणीव त्यांनी सरकारला करून दिली होती.

टिळकांना या काळात जनमत संघटीत करायचे होते आणि दुष्काळाविरुद्ध लढण्याची जनतेची ताकद वाढवायची होती. दुष्काळाने खचलेला, पिचलेला माणूस स्वातंत्र्य मिळविण्यासाठी संघर्ष करू शकणार नाही हे त्यांनी ओळखले होते. दुष्काळ निवारण्यासाठी त्यांनी केलेले प्रामाणिक प्रयत्न त्यांना सर्वसामान्य लोकांपर्यंत घेऊन जाण्यास उपयोगी ठरले.

१८९६-९७ मध्ये दुष्काळाबरोबरच प्लेगच्या साथीनेही धुमाकूळ घातला होता. तेव्हाही सुरवातीच्या काळात टिळकांनी सरकारी उपाययोजनांना विरोध केला नाही. प्राण वाचविण्यासाठी सरकारने सक्ती केली तर ती समजावून घेऊन जनतेने सरकारशी सहकार्य करायला हवे असाच सल्ला त्यांनी दिला होता. प्लेगविरोधी सरकारी उपायांचे टिळकांनी समर्थन केले होते.

प्लेगची साथ चीनमधून भारतात आली होती. हाँगकाँगमधून अन्नधान्याने भरलेली पोती मुंबईच्या बंदरात उतरली, त्याबरोबर उंदीरही आले आणि पाहता-पाहता प्लेगचा धुमाकूळ सुरु झाला. रोज स्मशानात प्रेतांची रीघ लागू लागली. कोणताही भाग राहिला नाही जिथे प्लेगचा प्रादुर्भाव झाला नाही. साताऱ्यात उपजिल्हाधिकारी असणाऱ्या व्हॉल्टर रँड याला पुण्यात प्लेग निवारण करण्यासाठी पाठविण्यात आले. प्लेगविरुद्ध कोणती उपाययोजना हवी याविषयीचे मार्गदर्शन केसरीत करण्यात येऊ लागले. विरोधासाठी विरोध करून चालणार नाही हे टिळकांनी मान्य केले होते.

रँडसाहेबाने नदीपलीकडे छावणी टाकून प्लेगग्रस्तांना बाजूला केले. त्यास संसर्गरोध छावणी म्हणले गेले. सरकारच्या या योजनेसही जनहितासाठी टिळकांनी विरोध केला नाही. सरकारने छावणी सुरु केली पण तिथे खाण्यापिण्याची व्यवस्था केली नाही. त्याचा परिणाम असा झाला कि रुग्णाला इस्पितळात हवाली करायला नागरिक घाबरू लागले. मग सरकारने दंडुकशाहीचा वापर सुरु केला. याच सुमारास सरकारने त्यांच्या अधिकारास आव्हान देणाऱ्यास तुरुंवासाची शिक्षा देणारा कायदा संमत करून घेतला.

रँडसाहेब पुण्यात येणार व सामान्य माणसावर जुलूम जबरदस्ती होणार हे ओळखून टिळकांनी पुण्यातील डॉक्टरांना प्लेगविरुद्ध एकत्र केले. संघर्ष करू शकणारी जिद्दीची तरुण मंडळी एकत्र केली. प्लेगविरुद्ध सरकारी उपाययोजना व्यवस्थित अमलात येणार असतील व प्लेग आटोक्यात येणार असेल तर त्यास विरोध नको असे टिळकांचे मत होते. आपल्या विविध अग्रलेखातून त्यांनी सरकारी दडपशाहीला वाचा फोडली पण तरीही सरकारने कायद्याचा सर्रास दुरुपयोग केला.

चीजवस्तूंपासून घरे-दारे जाळण्यापर्यंत त्यांची मजल गेली. सामान्य नागरिकांच्या विनवण्या, दयेची भीक, ताटातूट न करण्याबद्दलच्या विनंत्या यांना सरकारने भीक घातली नाही. प्लेग नसतानाही काही जणांना जबरदस्तीने छावण्यात घुसविण्यात आले. फेब्रुवारी १८९७ मध्ये मक्केच्या वारीवर बंदी घालण्यात आली. हिंदुस्थानातून एकही मुस्लीम मक्केला जाऊ देण्यात येणार नाही असा आदेश निघाला. इंग्रजांचा फौजफाटा घराघरात शिरू लागला. देवघरात बूट घालून देवांना रस्त्यावर भिरकविण्यात आले. सामानही रस्त्यावर आले.मोहरमच्या मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली.

मुस्लीम महिलांचे बुरखे फाडण्यात आले. घरातल्या माणसांची शारीरिक पाहणी करताना त्यांना घराबाहेर उघड्यावर आणले जात असे. तिथेही पुरुषांना अक्षरशा नागव्याने उभे करीत (याबद्दलचे छायाचित्रही पुस्तकात उपलब्ध आहे). बायकांना चोळ्या काढून लुगडी वर करायला लावत. यावेळी याला कोणी विरोध केला तर त्याला गुरासारखे पिटले जायचे.

पुण्यातील सदाशिव पेठेत मंडईच्या रस्त्यावर इंग्रजांनी काही स्त्रियांची विटंबना केली. त्यांच्या अंगाशी लगट केली. हे सर्व असह्य होऊन त्या स्त्रियांनी शनीच्या पारावर आपली डोकी आपटून कपाळमोक्ष करून घेतला. (या अत्याचारांच्या कथा वाचून आजही आपला संताप अनावर होतोय, आपल्या डोळ्यातून अश्रुधारा वाहतात तर प्रत्यक्षात ज्यांच्यावर हि वेळ आली होती त्यांच्या अवस्थेची कल्पना देखील करवीत नाही).

दुष्काळ व प्लेग अशा भीषण कात्रीत सापडलेल्या पुणेकरांवर इंग्रज सरकारकडून अनन्वित अत्याचार करण्यात येत होता. निराशा, संताप, चीड, मानसिक ताण अशा विविध भावनांचा थरकाप उडाला होता. आया-बहिणींची अब्रू लुटली जात होती. अशा परिस्थितीमध्ये टिळक कसे स्वस्थ बसतील. त्यावेळी केसरीचा खप जरी पंधरा हजारांच्या घरात असला तरी त्याचा प्रभाव कित्येक लाखांच्या घरात होता. केसरीत काय प्रसिद्ध झाले कि ते टाइम्स मध्ये इंग्रजीत यायचे यावरूनच त्यांच्या लिखाणाची दहशत समजून येते. टिळकांनी अत्यंत धारधार लिखाण सुरु केले. पेठापेठातून सभा घेण्याचा धडाका सुरु केला.

अशाच काही अग्रलेखातून व पुण्यातील चौकात एका गाजलेल्या सभेतून प्रेरणा घेऊन क्रांतिकारकांनी रँडचा कसा वध केला व सरकारने कसे टिळकांना राजद्रोहाच्या खटल्यात अडकविले ते जाणून घेऊया पुढील भागात........

संस्कृतीइतिहासवाङ्मयविचारप्रतिसादप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

22 Jun 2012 - 10:55 am | श्रीरंग_जोशी

इतके तत्काळ लिहून काढलेत.
नंतर सविस्तर प्रतिक्रिया देईनच...

अन्या दातार's picture

22 Jun 2012 - 11:37 am | अन्या दातार

सदर मजकूर तुम्ही स्वत: लिहिला आहे की पुस्तकातून घेतला आहे?

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Jun 2012 - 12:54 pm | llपुण्याचे पेशवेll

हा एकूण मजकूराचा गोषवारा मांडला आहे. मी पुस्तक वाचले आहे त्या या सर्वाची विस्तृत माहीती देण्यासाठी अनेक प्रकरणे खर्ची घातली आहेत.
टिळकांना पहील्यांदा तुरुंगात पाठवणारे न्या.महादेव गोविंद रानडेच काय?

मुक्त विहारि's picture

22 Jun 2012 - 4:41 pm | मुक्त विहारि

छान माहिती.

प्रचेतस's picture

22 Jun 2012 - 5:04 pm | प्रचेतस

ऊत्तम परिचय करून दिलास अमित.
पुभाप्र.

पैसा's picture

22 Jun 2012 - 8:22 pm | पैसा

आणखी माहिती येऊ द्या.

गोंधळी's picture

22 Jun 2012 - 8:57 pm | गोंधळी

.

सुधीर's picture

23 Jun 2012 - 11:34 pm | सुधीर

मागे लोकसत्ता मध्ये हे तीन लेख वाचनात आले होते.
१. कर्मयोगी टिळक - प्रा. नरहर कुरुंदकर (ध्वनिमुद्रण, लेखन, संपादन, पुनर्लेखन- राम देशपांडे, कोल्हापूर)
२. लोकमान्यांचा व्यासंग
३. ‘गीतारहस्य’ : तत्वज्ञानातील लेणे प्रशांत दीक्षित

हे लेख वाचून खूप प्रभावित झालो होतो. अलिकडेच गीतारहस्य वाचावयास घेतले. शेवटची २ प्रकरणे अजून बाकी आहेत पण आत्तापर्यंत वाचून जे काही समजले त्यावरून येवढेच म्हणावेसे वाटते, खूप महान माणूस. आयुष्यात याउपर अजून काही वेगळे "ज्ञान" पदरी पडेल असे वाटत नाही. गीतारहस्यामुळेच प्रथम मला विज्ञान आणि तत्वज्ञान यामधली रेशा कळली. नितिमत्ता, कर्मयोग यावरचं त्याचा भाष्य विज्ञानाची कास धरणार्‍याला आवडेल आणि नक्कीच विचार करायला लावेल. त्यांना अभिप्रेत असलेल्या कर्मयोगाच्या दृष्टीकोनातून जीवनाकडे पाहिल्यास आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळेल.

ग्रंथातली १०० वर्षापूर्वीची भाषा, गहन विचार, पृष्ठसंख्या यामुळे सकस वाचन आणि मराठीपासून दूर जाणारी नवीन पिढी पाहिली की वाटतं, या ज्ञानापासून ते वंचित तर नाही ना राहणार? असो, मी लेखक नाही पण मला टिपणं काढायला आवडतात. एकदिवस त्यांच्या ग्रंथाच्या प्रत्येक प्रकरणांची संक्षिप्त रुपातली टिपणं सोप्या भाषेत ब्लॉगवर उतरवेन.

शिल्पा ब's picture

24 Jun 2012 - 8:39 pm | शिल्पा ब

चांगली माहीती आहे. लोकमान्यांच्या विषयी अजुन लिखाण येउ द्या.
तसेच टिळकांना प्रथम तुरुंगात धाडणार्‍या न्या. महादेव रानड्यांविषयीसुद्धा लिहा.

सुधीर : जुनी भाषा समजणे अवघड जाते त्यामुळे तुम्ही गीतारहस्यातील एका एका चॅप्टरचं भाषांतर करायला घेतलं तर आम्हालाही समजेल. अर्थात मदतीला कोणी भाषा विषयातील अभ्यासु मदतीला घेतला तर उगाच एखाद्या शब्दावरुन होणारे वादंग कदाचित होणार नाहीत.

भाषा जुनी खरी. पण तेवढी अवघडही नाही. माझंच मराठी थोडं कच्च असल्याने वा, अवांतर वाचनाची सवय अलिकडेच लागल्याने असेल कदाचित, सुरुवातीस बराच अडखळत होतो. उ.दा. "प्रतिपाद्य आहे" वगैर शब्दांचा अर्थ निटसा कळत नव्हता. पण २-३ र्‍या प्रकरणानंतर वाचण्यात जम बसला. पण तरीही मी फार धीम्या गतीने वाचलं\वाचतोय. २-३ पानं दिवसाला फक्त. मला माहित आहे इथे फार वाचनवेडे अन ज्ञानी माणसं बरीच आहेत. मदत करतीलच अशी आशा आहे.

ग्रंथाची जालीय आवृत्ती तुम्हाला इथे मिळेल. इंग्रजीमधली जालीय आवृतीही मागे कुठेतरी सापडलेली होती पण ती लिंक आता नाही सापडत आहे.

अमितसांगली's picture

25 Jun 2012 - 1:17 pm | अमितसांगली

मी पण वाचतोय आता...जितक आवश्यक वाटते ते लिहुन काढण्याचा प्रयत्न करित आहे...

मन१'s picture

24 Jun 2012 - 10:14 pm | मन१

२२ जून १८९७ ह्या नावाचा लहानपणी डीडीवर पाहिलेला चित्रपट आठवतोय.
जालावर http://www.misalpav.com/node/11342 आणि http://mr.upakram.org/node/461 ह्या घटनेबद्दल वाचता येइल.
टिळकांची ह्याबाबतीतली भूमिका ह्या अर्थाने ह्या मालिकेचे महत्व आहेच.