धर्म - अर्थ - काम - मोक्ष हे पुरुषार्थ, बद्ध - मुमुक्षु - साधक - सिद्ध, या अवस्था आणि अष्टांगयोग

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
2 Oct 2011 - 12:49 pm

धर्म - अर्थ - काम - मोक्ष हे पुरुषार्थ, बद्ध - मुमुक्षु - साधक - सिद्ध, या अवस्था आणि अष्टांगयोग

रोजनिश्यांमधील आठवणी वाचताना जाणवलं, की अरे, आपण किती उत्साही, धडपड्ये होतो, भविष्याची यत्किंचीतही कल्पना नसताना जेंव्हा जे जे समोर येत गेलं, सुचत गेलं, ते ते करत गेलो, यातून काहीतरी हिताचं असं घडतच गेलं, आणि आज बहुतांश कौटुंबिक जबाबदारया संपून आपण आता वाटेल ते करायला - आपल्या विशिष्ट मर्यादांमध्ये का होईना, स्वतंत्र आहोत...
... म्हणजे बर्‍यापैकी पुरुषार्थ आपण केला, असे म्हणता यावे...

चार पुरुषार्थापैकी अगदी सुरुवातीलाच "धर्म"
...पण मंदिरात जाणे, पूजाअर्चा, सत्यनारायण वगैरे व्रतवैकल्ये, असले काही आपल्या आई-बापाने सुद्धा कधी काही केले नाही, मग धर्म, अर्थ, काम, मोक्ष, हे चार पुरुषार्थ, आणि बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध, या चार अवस्था; याची आपल्या स्वत:च्या जीवनाशी कशी सांगड लावता येते ? हा प्रश्न उद्भवला, आणि विचार सुचत गेले ...

... अगदी सुरुवातीला शिकणे हे महत्वाचे असायचे, की बाबा आपण पेंटिंग शिकावे, पेटी वाजवता यायला हवी, जादूचे नवनवीन प्रयोग शिकावेत, इंग्रजी चांगले शिकले पाहिजे, फिजिक्स केमिस्ट्री वगैरे शिकून डिग्र्या वगैरे पण मिळवल्या पाहिजेत, आसनं, व्यायाम शिकावेत वगैरे.... म्हणजे एकंदरीत स्वतःचे असे विशिष्ट 'गुणधर्म' असलेली एक समर्थ व्यक्ती बनण्यासाठी करायचे खटाटोप म्हणजे 'धर्म' ही पायरी.
नंतरच्या काळात अर्थार्जन वा स्वतःची स्वतंत्र मिळकत होईल असा उद्योग करत राहून स्वावलंबी राहणे, म्हणजे 'अर्थ' ही पायरी.

पुढे क्षणोक्षणी आणि पुन्हापुन्हा उत्पन्न होणार्‍या, दीर्घ काळ टिकून राहणार्‍या, कामना पूर्ण करत राहता याव्यात, आणि पुन्हा पुन्हा निर्माण होत जाणार्‍या प्रतिकूलतेशी झुंज देता यावी, यासाठी एक सुरक्षित विश्व निर्माण करत जाणे ... म्हणजे सुरुवातीला किरकोळ वापरायच्या वस्तू वा भाड्याची खोली मिळवण्यापासून, पुढे स्वतःचे घर, मुलेबाळे - कुटुंबकबिला; उपजीविकेचे,कर्तव्य म्हणून,वा आवडीने अंगावर घेतलेले काम... असा वाढत जाणारा 'स्व' चा पसारा, आणि त्यातून पुन्हा उत्पन्न होणार्‍या नानाविध कामनांचा गुंता, म्हणजे "काम"
या सर्वात जास्त जास्त गुंतत जाऊन मुळातल्या 'स्व' कडे सुद्धा लक्ष न पुरवता येण्यासारखी परिस्थिती होऊन त्यातून येणारी बेचैनी. मग धर्म, अर्थ, काम या तिहीतून निर्माण झालेली "बद्ध" अवस्था अनुभवत, यातून आता सुटका व्हावी, अश्या तळमळीची "मुमुक्षु" अवस्था. (अर्थात हे मुमुक्षुपण सुद्धा आपण लहानपणापासून अनुभवत असतोच, जसे शाळेच्या सुट्टीची वाट बघणे वगैरे) यापुढील पायरी म्हणजे "साधक" अवस्था, आणि शेवटी त्या साधनेतून प्राप्त होणारी "सिद्ध" अवस्था.
आता मुमुक्षु अवस्थेतून साधक अवस्थेत जायचे, तर जी प्रत्यक्ष साधना करायची, ती कोणती, कशी, वगैरे गोंधळातून मार्ग काढायला कुणी गुरु मिळायला हवा, दीक्षा घ्यायला हवी, असं ऐकलेलं ...हल्ली तर टीव्ही वर असे अनेकानेक गुरु, महाराज, बुवा हजरच असतात ... हा परत आणखी गोंधळ.
शिवाय भक्तिमार्ग बरा की ज्ञानमार्ग, की कर्म, की योग, की जप की तप, वगैरे सतरा भानगडी...

...तर पुन्हा स्वतः पुरते बोलायचे म्हणजे भक्ती, जप, स्वामी-बाबा लोकांचे उपदेश वगैरे गोष्टी आपल्याला अगम्य असल्याने पतंजलीप्रणित अष्टांगयोग (यम-नियम-आसन-प्राणायाम-प्रत्याहार-धारणा-ध्यान-समाधी) उत्तम, असे वाटले. अर्थात हा मार्ग कठीण खरा, पण अतिशय व्यवस्थितपणे मांडणी केलेली असल्याने पायरी-पायरीने समजणे आणि प्रत्यक्षात उतरवणे, यात शक्य वाटते. मुख्य म्हणजे कोणतीही गोष्ट "मानायची" वा "श्रद्धा" वगैरेंची ची आवश्यकता नाही. प्रत्यक्ष क्रिया करा, आणि त्याचे फळ चाखा.

पातंजलयोगाचा अभ्यास करायचा, असे वाटू लागल्यावर यावर कोणकोणती पुस्तके उपलब्ध आहेत, हे बघायला सुरुवात केली. लायब्ररीत कुणा कोल्हटकर यांचे जुने, जाडजूड पुस्तक दिसले, ते आणून वाचायला घेतले, त्यात अगदी सुरुवातीलाच "अथ योगानुशासनम' या सूत्राच्या विवेचनात पातंजलयोग हा वेदांना अनुसरून आहे, हे सिद्ध करण्याचा खटाटोप बघून जरा साशंक झालो, म्हणजे सूत्रांचा सरळ अर्थ सांगण्यापेक्षा लेखकाला वेदांचे,हिंदूधर्माचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यात जास्त स्वारस्थ्य आहे की काय, असे वाटू लागले, तरी चिकाटीने बराचसा भाग वाचून काढला, त्यातून एवढे समजले, की यापेक्षा चांगले विवेचन केलेले पुस्तक शोधणे क्रमप्राप्त आहे.

पुढील काही वर्षात बीकेएस अय्यंगार, प.वि.वर्तक व अन्य काही लेखकांची पुस्तके वाचनात आली, (गीताप्रेसचा पातंजलयोगावरील वशिष्ठऋषींचा ग्रंथ चाळला, पण घेतला नाही), पण माझ्या मनाचा अगदी ठाव घेतला, तो आचार्य रजनीश यांच्या चार खंडात प्रकाशित प्रवचनांनी.
यात एक एक सूत्र व त्याचा अर्थ असे नसून ही ही सूत्रे समजून घेण्यासाठी आणि जीवनात उतरवण्यासाठी कशी मनोभूमिका असावी, त्यासाठी मनाची मशागत कशी करावी, त्या त्या सूत्राच्या अर्थाचा आवाका किती विस्तृत आहे, त्याच्या कश्या अनेक अर्थछटा आहेत, आधुनिक काळातल्या संशोधनाचा त्याचेशी कसा आणि काय संबंध आहे, असे अनेकअंगी स्वरूप या प्रवचनांचे आहे.

रोज पहाटे एक सूत्र पाठ करण्याचा निश्चय करून चौदा-पंधरा सूत्रांपर्यंत मजल गाठली, पण मग अन्य व्यापात ते मागे पडले. अर्थात सूत्रे पाठ करून काय होणार, ती प्रत्यक्षात उतरवणे महत्वाचे, हे तर खरेच, पण मला या बाबतीत एक अद्भुत अनुभव आला तो असा, की जे सूत्र मी पाठ करायचो, ते त्या दिवशी दिवसरात्र मनात घोळत असायचे आणि दिवसभरातील घडामोडीत त्या सूत्राचा अन्वयार्थ लागत रहायचा. आणि विशेष म्हणजे बहुधा दुसऱ्या दिवशी पहाटे उठताना त्यातील आणखी नवीनच अर्थछटा स्पष्ट व्हायची, आणि अतिशय आनंदात मी जागा व्हायचो.

एकूण फक्त १९७ सूत्रात, आशयाचा अतिशय विस्तीर्ण आवाका असलेला हा ग्रंथ अद्वितीय, अद्भुत आहे. हा समजून घेण्यासाठी नुसते संस्कृत भाषेचे पांडित्य पुरेसे नाही. जीवनाच्या प्रत्येक अनुभवातून यातील मर्म हळूहळू उलगडत जाणे, हे मला याचे वैशिष्ट्य वाटले.
आता पुन्हा नव्या उमेदीने मी हा अभ्यास करू म्हणतो. यावर काही लिहिण्याइतपत लायकी मिळवता आली, तर इथे लिहीन सुद्धा.
__________________________________________________
जिज्ञासूंसाठी: बीकेएस अय्यंगार यांच्या पुस्तकातून प्रत्येक सूत्राच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेउन जोडीला त्यावरील ओशोंचे प्रवचन वाचणे हा सर्वोत्तम मार्ग, असा माझा अनुभव आहे.
_______________________________________________
या विषयावर यापूर्वी मिपावर कुणी लिहिले असल्यास कृपया धाग्याचा दुवा द्यावा.

जीवनमानतंत्रविज्ञानलेखसंदर्भशिफारसअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

2 Oct 2011 - 12:56 pm | शिल्पा ब

बरं मग?

नेत्रेश's picture

3 Oct 2011 - 9:31 am | नेत्रेश

आपल्याला न आवडलेल्या किंवा न समजलेल्या धाग्यावर प्रतिसाद दिलाच पाहिजे असे नाही.

लोक आपला बहुमुल्य वेळ खर्च करुन ईथे लिहीतात. तेव्हा जर आपल्याकडे कौतुकाचे चार शब्द किंवा काही कंस्ट्रक्टीव फीडबॅक नसेल तर गप्प रहाणे चांगले. अन्यथा अशा प्रतिक्रियांमुळे लेखक नाउमेद होण्याची शक्यता असते. या पुढे सुधारणा होईल अशी आशा आहे. स्पष्ट लिहीले आहे, कृपया वाईट वाटुन घेउ नये.

शिल्पा ब's picture

3 Oct 2011 - 10:07 am | शिल्पा ब

मी कुठे काय लिहावं ते मी बघेन. ज्यांचं मन जर एवढंच ठीसुळ असेल तर स्वतःच्या ब्लॉगवर लिहावे. कंस्ट्रक्टीव फीडबॅक देण्याजोगं वाटतं तिथे दिला जातो. स्पष्ट लिहीले आहे, कृपया वाईट वाटुन घेउ नये.

धन्या's picture

4 Oct 2011 - 2:51 am | धन्या

चुकीच्या ठीकाणी प्रतिसाद दिलात. अगदी असाच उप-प्रतिसाद मलाही दयावासा वाटत होता. पण मी मागे वळून पाहिलं आणि मोह आवरता घेतला. काही गोष्टी अनुल्लेखाने मारायच्या असतात. ;)

मोह आवरला असता तर हा प्रतिसाद सुद्धा दिला नसता!!! उगाच फुकाच्या गप्पा कशाला?

पण माझ्या मनाचा अगदी ठाव घेतला, तो आचार्य रजनीश यांच्या चार खंडात प्रकाशित प्रवचनांनी.

हॅ हॅ हॅ
:)

या विषयावर यापूर्वी मिपावर कुणी लिहिले असल्यास कृपया धाग्याचा दुवा द्यावा.

या विषयावर नाही, पण ओशो वर लिहीलं आहे मिपावर

झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये - १
झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये - २
झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये -३

विलासराव's picture

2 Oct 2011 - 6:19 pm | विलासराव

>>>>>>>>>>पण माझ्या मनाचा अगदी ठाव घेतला, तो आचार्य रजनीश यांच्या चार खंडात प्रकाशित प्रवचनांनी.
सहमत. मीही खरोखर प्रभावीत झालो ही ओशोंची प्रवचने वाचुन. मग हळुहळु आवड लागली. मग पुढे विवेकानंदांचे साहित्य वाचले. मग कबीर, नानक्,तुकारामांचे ते अगदी रसेल्,टॉलस्टॉय, सॉक्रेटीस असे बरेच वाचन झाले. जसे जे मिळेल तसे.
पण अनुभव शुन्य. वाटले एवढे सगळे वाचुनही मी तर कोराच. जसा होतो तसाच. फक्त मी अमुक-अमुक वाचलेय त्याचा अभिमानच.
आनी मग असाच एक दिवस विपश्यनेला गेलो. आनी या सर्वांनी ज्याचा उल्लेख केलाय ती शक्ती,आत्मा ,परमात्मा, देव, ईश्वर्,तत्व याचा थोडासा स्वानुभव आला. आनी मुमुक्षु बनुन जी वाचनसाधना केली जवळपास २०-२२ वर्षे ती फळाला आली आनी मी साधक झालो.
आता निरंतर साधना चालु आहे.
जास्त काही आत्ता लिहु शकत नाही कारण तेवढा अनुभव नाही अजुन.
पण एकच सांगतो मला जगण्यातला नवा अर्थ सापडला.

विलासराव यांचा प्रतिसादः
..... आता निरंतर साधना चालु आहे. ...
या साधनेबद्दल माहिती द्या ना काही, कशी, केंव्हा, आणि किती वेळ साधना करता, त्यावेळी नेमके काय करता आणि त्याचे कोणते परिणाम दिसू लागलेत, वगैरे जाणून घेणे आवडेल.

स्वानन्द's picture

3 Oct 2011 - 8:17 am | स्वानन्द

ते गौतम बुद्ध याने सांगितलेल्या विपश्यना साधनेबद्दल बोलत आहेत. त्यावर लीमाउजेट यांनी इथेच मिसळपाव वर 'काय ध्यान आहे' नावाची लेखमाला लिहीली होती.
ही साधना काय आहे, किंवा कशी करतात याबद्दल उत्सुकता असेल तर सर्वात उत्तम पर्याय म्हणजे सत्यनारायण गोयंका यांच्या विपश्यनेच्या शिबिराला जाऊन या. याची कसलीही फी द्यावी लागत नाही. शिबीर संपल्यानंतर तुम्हाला वाटले, की ह्या शिबीराचा मला फायदा झाला, तसा दुसर्‍या कुणालासुद्धा होवो, तर तुम्ही देणगी देऊ शकता.
अधिक माहिती तुम्हाला http://www.dhamma.org/ इथे मिळू शकेल.

विलासराव's picture

3 Oct 2011 - 10:27 am | विलासराव

धन्यवाद स्वानंद.
मी विपश्यना साधनेबद्दलच लिहीले आहे.
रोज सकाळ-संध्याकाळ १-१ तास. मझ्याकडे भरपुर वेळ असल्याने जेंव्हा एकटा असतो तेंव्हा कधीही. म्हणुन निरंतर हा शब्द वापरला.
फायदे तर भरपुर झालेत. पन ते गौण आहेत.
या साधनेचा मुख्य उद्देश आहे मन निर्विकार/ निर्मळ करणे. तो अगदी एका शिबीरातही प्रत्ययास येतो.

" या साधनेचा मुख्य उद्देश आहे मन निर्विकार/ निर्मळ करणे. तो अगदी एका शिबीरातही प्रत्ययास येतो. "

मन निर्विकार अथवा निर्मळ होते म्हणजे नेमके काय होते?

आणि त्याचा प्रत्यय शिबिरातील ८-१० दिवसात कसा येतो?

कारण विकार हे आयुष्यातील वेगवेगळ्या प्रसंगी, आणि समयी उद्भवतात .. आणि मन हे निर्मळ आहे मलिन आहे, कणखर आहे कि कमकुवत आहे हे वेगवेगळ्या प्रसंगात आपण कसे वागतो, कसे प्रतिसाद देतो इ. वरून ठरत असते . मग त्याची परीक्षा ८-१० दिवसात कशी होते? ...

उदय के'सागर's picture

3 Oct 2011 - 4:37 pm | उदय के'सागर

@मनीषा - तुमचे प्रश्न सहाजीक आहेत. मलाही हे प्रश्न पडले होते ह्या विपश्यनेला जाण्यापुर्वि पण खरं सांगतो सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली.
तुम्ही म्हणतात ते अगदी बरोबर आहे "कारण विकार हे आयुष्यातील वेगवेगळ्या प्रसंगी, आणि समयी उद्भवतात .. आणि मन हे निर्मळ आहे मलिन आहे, कणखर आहे कि कमकुवत आहे हे वेगवेगळ्या प्रसंगात आपण कसे वागतो, कसे प्रतिसाद देतो इ. वरून ठरत असते "

शिबीरा मधे काय शिकवतात ते असं इथुन तर सांगता येण्यासारखं नाहिये पण तरीहि थोडक्यात म्हणेन की ते हेच शिकवतात कि "सर्व काहि क्षणीक असतं म्हणुन सुखाने हुरळु नका अणि दुखःने खचु नका" हे ऐकताना कदाचीत अगदी साधं वाटेल पण ते पट्ण्यासाठी तिथे ध्यानधारणेच्या काही क्रिया असतात (त्यालाच विपश्यना म्हणतात) त्याने अपल्याला हे अगदी मनापासुन पटतं आणि आपण ते आचरणातही आणतो. (अर्थात तुम्ही ते किति आशावादी पणे, सातत्याने आणि मनापसुन करतात त्या वरही ते अवलंबुन असतं. )

विलासराव's picture

3 Oct 2011 - 8:31 pm | विलासराव

अधाशी उदय यांनी उत्तर दिलेच आहे.
तरीही काही प्रश्न असल्यास माझा नंबर आहे ९८२०६५८३४८.
मी काही माहीती देउ शकेल जमेल तशी. पण वादविवादासाठी नाही.
तुम्ही प्रत्यझ कोर्स करुन पडताळा घेउ शकता.

चित्रगुप्त's picture

4 Oct 2011 - 1:50 am | चित्रगुप्त

मी काही वर्षांपूर्वी दहा दिवसांच्या विपश्यना शिविरात भाग घेतला होता. मला ते सर्व खूप आवडले, आणि माझी पाठ्दुखी (एका विशिष्ट क्षणी, आणि ते मला अगदी स्पष्ट कळले देखिल) बरी झाली.
मात्र त्यानंतर मी एकदाही विपश्यना केली नाही, हा अर्थात माझा भाग.

मी माझ्या एका परिचिताना, (वय सुमारे साठ, यांना इथे आपण 'क्ष' म्हणू) आग्रहाने शिविराला घेऊन गेलो होतो, शिविरादरम्यान सातव्या दिवशी पहाटे त्यांना त्यांची वृद्ध आई आर्तपणे बोलावत आहे, असे दिसले ( स्वप्न पडले वा भास झाला), आणि ते फारच बेचैन झाले. त्यांना विपश्यना वगैरे करणे अशक्य झाले आणि त्यांची स्वतःचीच स्थिती काळजी करण्यासारखी झाली.

हे बघून मी शिविर संचालक एक पंजाबी गृहस्थ होते, त्यांना भेटून सर्व सांगितले, आणि 'क्ष' ना घरी जाऊ द्यावे, अशी विनंती केली. यावर ते संचालक माझ्यावरच भडकले आणि शिविरात मौन पाळायचा नियम असता तुम्ही त्यांचेशी आणि माझ्याशी बोललातच का, इतरांच्या भानगडीत पडलातच का, अशी सुरुवात करून अतिशय अपमानास्पद वागणूक दिली.

दुपारी बारा वाजण्याचे सुमारास 'क्ष' चे शेजारी आले, त्यांना फार मुश्किलीने आत येऊ दिले गेले होते. त्यांनी त्याच सकाळी 'क्ष' ची आई वारल्याची बातमी आणली होती. ती माउली आपल्या मुलाच्या नावाचा जप करत, वाट बघून गेली होती... हे ऐकून 'क्ष' ची जी स्थिती झाली, तिचे वर्णन करणे अशक्य. त्यांना कसेबसे घरी नेले. यावेळी सुद्धा त्या संचालकाने मला दूर ठेवले, आणि मला जाऊ दिले नाही. मी माझ्या जबाबदारीवर 'क्ष' यांना आणले असल्याने माझी स्थिती विचित्र झाली होती.

नंतरचे उर्वरीत दिवस मला तिथे राहणे काहीसे कठीणच गेले.

घरी गेल्यावर आणखीनच नवे प्रकरण झाले. 'क्ष' यांची स्थिती भ्रमिष्टासारखी झालेली होती. यांची पत्नी 'ब्रम्हकुमारी' असल्याने त्यांचे घरी पांढरी वस्त्रे परिधान केलेल्या ब्रम्हकुमार्‍या जमलेल्या होत्या, त्यांनी या सर्व प्रकरणाबद्दल मलाच जबाबदार ठरवले. मी 'क्ष' यांना कुठेतरी भलत्याच ठिकाणी घेऊन गेलो, तिथे काहीतरी जादूटोण्याचा प्रकार घडला, त्यामुळे अशी परिस्थिती ओढवली, वगैरे दोषारोपण माझ्यावर केले गेले, हे सर्व ऐकून मी हतबुद्धच झालो.....

त्यानंतर मी कानाला खडा लावला, आणि यापुढे लष्करच्या भाकर्‍या भाजायच्या भानगडीत पडायचे नाही, असे ठरवले. 'आर्ट ऑफ लीव्हिंग' चा अनुभव पण माझेसाठी फारसा चांगला नव्हता. ती एक वेगळी कहाणी आहे.

मला विपश्यना या तंत्राबद्दल वा अन्य कोणत्याही विचारसरणीबद्दल काही तक्रार नाही, परंतु अश्या ठिकाणी ज्या व्यक्ती जबाबदारीच्या भूमिकेत असतात, त्यांचेबद्दल मात्र चांगले अनुभव आलेले नाहीत, हे खरे. ही परिस्थिती दिल्ली, हरियाणातील आहे. महाराष्ट्रात असे नसेल, अशी आशा करतो.

'आर्ट ऑफ लीव्हिंग' चा अनुभव पण माझेसाठी फारसा चांगला नव्हता. ती एक वेगळी कहाणी आहे.

काका, एकदा या विषयावरही लिहा. भयानक कुतुहल आहे या प्रकाराबद्दल.