जीवाची पोकळी - १

नगरीनिरंजन's picture
नगरीनिरंजन in जनातलं, मनातलं
29 Aug 2011 - 2:19 pm

गावात नवीनच उघडलेल्या व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी मॉलला भेट द्यायला जायची बर्‍याच दिवसांची इच्छा बायकोच्या विरोधाला न जुमानता पूर्ण करायला गेलो. व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीला भुलून खर्‍या रिअ‍ॅलिटीला विसरू नये म्हणून आणि खर्‍या सेल्सभवानीच्या व्हर्च्युअल गोडव्याला बळी पडून व्हर्च्युअली रिकामा असलेला खिसा खरोखर कापला जाऊ नये म्हणून लक्ष ठेवायला बायकोलाही बरोबर यावंच लागलं. घरी आधीच पडून असलेल्या दहा वर्षं जुन्या व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी गेम्सचा त्यांच्या त्या वायरींच्या आणि सेन्सर्सच्या जंजाळामुळे वैताग आला होता आणि बाजारात लेटेष्ट काय आहे ते पाहायची भयंकर उत्सुकता होती.
अंडरग्राऊंडमधून मॉलच्या बेसमेंटमध्ये उतरलो तेव्हा तिथे आधीच अमाप गर्दी झालेली होती. वर जाणार्‍या लिफ्टसपाशी लावलेल्या काऊंटर्सवर लोकांनी घोळक्याने रांग लावली होती आणि तिथून काहीतरी घेऊन थोडे थोडे लोक लिफ्टने वर जात होते. आम्हीही जिथे रांगेचं शेवटचं टोक आहे असं वाटलं तिथे जाऊन उभे राहिलो. एकाच दुकानात जास्त वेळ कसा घालवायचा नाही, सेल्सगर्ल्सना कसं टाळायचं यावर बायकोने संधी पाहून बौद्धिक घ्यायला सुरुवात केली आणि मी बुगुबुगु मान हलवत गर्दीतल्या प्रेक्षणीय चीजा शोधायच्या कामाला लागलो. रीतसर दोन-तीन मिर्च्यांनी मी त्यांच्याकडे टक लावून पाहताना पाहून आपल्या नजरेत जमेल तेवढा तिखट तिरस्कार भरून माझ्याकडे फेकून झाला, डोळ्याच्या कोपर्‍यातून दोन-तीन जवान जोड्यांचे एवढ्या गर्दीत चाललेले चावट चुंबचाळे पाहून झाले तरी रांग संपेना. शेवटी पार आता बायको बोलून थकते की काय असं वाटायला लागलं तेव्हा एकदाचे आम्ही लिफ्टपर्यंत पोचलो. तिथं लिफ्टपाशी अंगावर चढवायला नायलॉनसारख्या धाग्यांनी बनलेला एक अंगरखा देत होते. अंगरखा कसला, गवसणीच म्हणायची ती. पार डोक्यापासून पायापर्यंत सगळं झाकणारी, अगदी हलकी आणि वर डोळ्यांवर चढवायला काळा चष्मा. हातात कसली तरी ब्रोशर्स घेतलेल्या एका चंटटंच मुलीने त्यातलं एक ब्रोशर अगदी लिफ्टचं दार बंद होताहोता माझ्या हातात दिलं. लिफ्टमध्ये टाईमपास म्हणून ते लगेचच वाचण्याचा उपक्रम मी हाती घेतला. कुठल्यातरी रशियन हॉटेलची जाहिरात होती ती. या व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी मॉलमध्ये एक साशा नावाची रशियन बाई आणि मिशा नावाचा रशियन बाप्या फिरत होते म्हणे. पुरुषांनी साशाला आणि बायांनी मिशाला पकडायचं होतं आणि मग एका सोप्प्प्या प्रश्नाचं उत्तर दिलं की मग त्या हॉटेलात आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर पाच दिवस-चार रात्री फुकट राहायला मिळणार असं मोठ्या उदारपणे जाहीर केलं होतं. साशाला पकडणे हा भाग सोडला तर मला त्यात काहीही गंमत वाटली नाही आणि त्या ब्रोशरच्या मी घड्यांवर घड्या घालून त्या नायलॉनच्या गवसणीच्या दोन धाग्यांमध्ये असलेल्या जागेतून ते कसं-बसं कोंबून खिशात टाकलं. त्या झटापटीत त्या धाग्यांमधून दोन-चार ठिणग्या पडल्यासारखं मला वाटलं, पण तो स्टॅटिक करंट असेल असं समजून मी दुर्लक्ष केलं. तितक्यात मग लिफ्ट उघडली आणि मी समोर पाहिलं. समोरचं दृश्य पाहून मी इतका हरखून गेलो की मी लिफ्टमधून कधी बाहेर पडलो तेच कळलं नाही. समोर क्षितीजापर्यंत पसरलेल्या विस्तीर्ण प्रदेशात अनेक डांबरी रस्ते दिसत होते आणि त्या रस्त्यांच्या कडेला ट्रॅव्हलेटर्सही होते. त्या ट्रॅव्हलेटर्सना लागून अनेक भव्य दुकानांची सलग अशी लांबच्या लांब रांग होती. रस्त्यांच्या कडेला हार्ले डेव्हिडसन, हायाबुसा वगैरे कंपन्यांच्या मोटारसायकली, बीएमडब्ल्यु, लँबॉर्गिनी, फेरारी, मर्सिडिज बेन्झ वगैरेंच्या गाड्या पार्क करून ठेवलेल्या होत्या. अनुभवी माणसं पटापटा आवडीच्या गाड्या घेऊन निघालीसुद्धा. मी आपला नेहमीप्रमाणे बुजलो आणि कडेच्या ट्रॅव्हलेटरवर जाऊन उभा राहिलो. मंदगतीने जाणार्‍या ट्रॅव्हलेटरवरून दुकानांतल्या चीजवस्तू निरखत मी निघालो. अतिभव्य अशा दुकानांमध्ये सगळ्याप्रकारच्या वस्तु खचाखच भरलेल्या होत्या आणि अनेक गौरवर्णीय ललना तिथे सेल्सगर्लचे काम करत होत्या. काही ट्रॅव्हलेटरवरही होत्या आणि मध्येच जवळ येऊन "तुम्ही अमुकअमुक दुकान पाहिले का? तिथे अमुकअमुकवर तमुकतमुक फ्री आहे किंवा अमकाढमका डिस्काऊंट आहे" वगैरे सांगत होत्या. काही तर कॅसिनोत जायला, डिस्कोत जायला कंपनी पाहिजे का विचारत होत्या. मला बराच वेळ बरीच मजा वाटली पण मग हळूहळू कळले की ही सगळी व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीची कमाल आहे आणि माझ्या अंगावर दिसणारा जेम्स बाँडसारखा सूट, हे रस्ते, या गाड्या, दुकाने, ट्रॅव्हलेटर आणि या बायाही नुसता भास आहेत. प्रत्यक्षात मी माझ्या मूळच्याच (बायकोच्या मते गबाळ्या असणार्‍या) अवतारात एखाद्या एका जागीच फिरणार्‍या ड्रमवरच्या फळकुटावर उभा असणार. पण या भासमान जगात खरेदी मात्र खरी होणार आणि पैसेही खरे जाणार.या अशा नको तिथे नको तो विचार करण्याच्या सवयीने माझं तोंड त्या व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीतही कडू झाले आणि खर्‍या आयुष्यात एखादा सिद्ध पुरुष ज्या विरक्तीने जगतो त्या विरक्तीने मी त्या ट्रॅव्हलेटरवर उभा राहिलो. त्यातल्या त्यात बायको गायब असल्याने डोक्याला ताप नाही असं मला क्षणभर वाटलं पण पुढच्याच क्षणी तिच्या भासमान जगात ती काय करत असेल या विचारांनी माझे धाबे दणाणले. मला पैसे घालवू नको म्हणणारी ती स्वतः शॉपिंग करायला लागली की कुबेर घरी पाणी भरायला येत असल्यासारखी करते याचा मला त्या परिस्थितीतही विसर पडला नव्हता. पटकन यातून बाहेर पडावं म्हणून मी दुसर्‍या बाजूच्या विरुद्ध दिशेला जाणार्‍या ट्रॅव्हलेटरकडे रस्ता ओलांडून गेलो. त्यावर माझ्या पुढे एक सहा फूट उंच गोरी मुलगी उभी होती. घाईघाईत तिला ओलांडून जाताना काय झालं तेच मला कळलं नाही. अचानक ती माझ्याकडे ओढली गेली आणि माझ्या छातीवर तिची पाठ चिकटली. एकदम आकाशात आतिषबाजी वगैरे झाली. बिगुल-बिगुल (म्हणजे दोन बिगुल नाही, तुतारी-बितारी सारखं) वाजले, वरून पुष्पवृष्टीवगैरे झाली आणि आकाशवाणी झाली, "अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन, तुम्ही साशाला पकडण्यात यशस्वी झालात. आता फक्त एका सोप्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि बक्षिस मिळवा."
"ओ..ओ..ओके.", मी चाचरत म्हणालो. साशा कोमात गेल्यासारखी ढिम्म उभी होती.
"प्रश्न आहे, आय लाईक साशा बिकॉज....?"
"अं..अं...", मी जरा तंतरलो. बायको ऐकत नसेल ना अशी शंका मनाला चाटून गेली. पण मी माझ्या जगात आहे हे लक्षात आल्यावर मी हुशारलो. वेळ संपायच्या आत उत्तर द्यायला पाहिजे म्हणून पटकन उत्तरलो,
"बिकॉज शी इअ ऑल्वेज सो क्लोज टू मी."
"थँक्यू", आकाशवाणी म्हणाली," वुई विल गेट बॅक टू यू इन टू वीक्स. प्लीज से युवर युआयडी नंबर."
मी माझा युआयडी नंबर पाठ म्हणून दाखवला. मग साशा एकदम हवेत विरली. दोन-पाच मिनीटे उभा राहिल्यावर बाहेर पडायचे दार आले. मी झटकन बाहेर पडलो. ती लिफ्ट होती.
(क्रमशः)

विडंबनसमाजतंत्रविज्ञानमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रास's picture

29 Aug 2011 - 9:18 pm | प्रास

ते लई भारी आहे, ननिराव!

'क्रमशः' आहे तेव्हा 'पुलेप्र'देखिल आहेच....

रेवती's picture

29 Aug 2011 - 10:27 pm | रेवती

वाचतिये.
हा भाग आवडला.

प्रीत-मोहर's picture

29 Aug 2011 - 10:52 pm | प्रीत-मोहर

वाचत आहे ...

अत्रुप्त आत्मा's picture

29 Aug 2011 - 11:18 pm | अत्रुप्त आत्मा

अमेझींग्ग.......... :-)

साती's picture

30 Aug 2011 - 12:46 am | साती

पुढे काय?
मज येतेय वाचायला.

प्रचेतस's picture

30 Aug 2011 - 9:00 am | प्रचेतस

पुढचा भाग येउ दे लवकर.

स्पंदना's picture

30 Aug 2011 - 10:26 am | स्पंदना

'बुगुबुगु ' 'मिरच्या' अय्योय्यो ! चांगल रंगणार अस दिसतय की ओ!

रंगवा रंगवा!

मस्त आयडिया. आवडली आहे. वाचतोय अन वाट पाहतोय.