जीवाची पोकळी - २

नगरीनिरंजन's picture
नगरीनिरंजन in जनातलं, मनातलं
30 Aug 2011 - 2:46 pm

जीवाची पोकळी-१

लिफ्टने खाली आलो, ती अंगावरची गवसणी उतरवली, गॉगल काढला आणि त्या काऊंटरवरच्या पोरीसमोर टाकून मोकळा झालो एकदाचा. बायकोला फोन लावावं म्हटलं तर अनरिचेबल येत होता. मग काय करणार? राहिलो उभा तिथेच, येणारी जाणारी गंमत बघत. प्रत्येक वर जाणार्‍या लिफ्टमध्ये जाणारी माणसं कशी आहेत आणि त्यातला कोण कशा प्रकारच्या दुकानात जाईल याचे आडाखे बांधणे आणि खाली आलेल्या लिफ्टमधून बाहेर येणार्‍यांच्या चेहर्‍यावरून कोणी वरती काय दिवे लावले असतील याचा अंदाज करणे यात बरा वेळ चालला होता. साधारण तासाभराने, खाली आलेल्या एका लिफ्ट मधून बाहेर आलेल्या एका घोळक्यातून एक बाई धावत धावत माझ्याकडे आली. मी दचकलो. बघतो, तर बायको. भलतीच खूश दिसत होती. चेहरा इतका उजळला होता की नक्कीच वरती हजार वॅटचा दिवा लावून आलेली असणार हे मी लगेच ओळखले.
"कसली धम्माल आहे ना रे?", तिने उत्साहाने फसफसत प्रश्नार्थक उद्गाराने जाहीर केले.
"मज्जा आहे खरी", मी पुन्हा मनातल्या मनात त्या प्रदेशात फेरफटका मारून आलो.
"तू काय केलंस? कधी आलास खाली?"
"काही नाही केलं. खाली येऊन तासभर झाला असेल."
"काय? खरं बोल... काहीच नाही केलंस?", तिच्या डोळ्यातून नेहमीच्या विश्वासाने संशय सांडत होता.
मला तेवढ्यात आठवलं आणि मी साशाच्या त्या गमतीबद्दल सांगायला तोंड उघडलं. पण तितक्यात,
"तुला सांगू? वरती इतका छान डिनरसेट पाहिला ना मी! अगदी चायनावेअरचा वाटतो पण अनब्रेकेबल! त्या माणसाने त्यातला एक बोऊल खाली आपटूनसुद्धा दाखवला मला!", असं बायकोचं चिवचिवणं सुरु झालं.
मी डोक्यावर हात मारून घेतला. व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीत त्यांनी हातातून जमिनीवर बोऊलच काय, हिमालयावरून अंडं पायथ्याशी आपटलं तरी ते फुटणार की नाही हे त्यांच्या हातात आहे हे तिला कसं कळत नाही या विचाराने मला अपार निराशा आली. किती पैसे घालवले त्या डिनरसेटला हे विचारणंही परवडणारं नव्हतं. नाहीतर लगेच सारखा माझा खर्च काढतो वगैरे म्हणून तिथेच मुसमुस, धुसफुस वगैरे सुरु झालं असतं.
"हो? अरे वा!" एवढं म्हणून मी अंडरग्राऊंडच्या दिशेने चालू लागलो. बायको मागेमागे पडदे, फुलदाण्या इत्यादी गोष्टींबद्दल बडबडत आली. ती वस्तूंचे वर्णन करत आणि मी बुगुबुगु मानेबरोबरच "हो? अरे वा!" चा मंत्र जपत एकदाचे घरी पोचलो.
त्या घटनेनंतर सेकंद, मिनीटे, तास, दिवस आणि आठवडे उलटले तसा व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीचा धसका कमी कमी होत गेला आणि मी तो सगळा घटनाक्रम हळूहळू विसरलो आणि नेहमीच्या उद्योगाना लागलो.
काही दिवसांनी संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर चहा घेत पुढच्या खोलीत इंटरनेट टीव्हीवर इमेल्स पाहात होतो. बायको दुसर्‍या सोफ्यावर टॅबलेटवर पुस्तक वाचत होती. नव्या इमेल्समध्ये सगळ्यात वरती एक MME म्हणजे Multi-Media Email होता. प्रेषक sasha@lyubovnik-dolls.com. मी उत्सुकतेने तो MME उघडला. उघडल्याबरोबर एक व्हिडिओ सुरु झाला आणि टीव्हीच्या पडदाभर साशाचा चेहरा दिसू लागला.
"हल्लो, लव्हरबॉय", साशा म्हणाली.
त्याच क्षणी बायकोकडे न बघताही तिच्या दोन डोळ्यातून क्रोधाच्या लेझर ठिणग्या बाहेर पडून माझ्या कपाळाला दोन भोकं पाडून माझा मेंदू करपवून टाकत आहेत हे मला स्पष्ट जाणवले. मी शक्य तितका गंभीर चेहरा करून आणि डोळ्यात मांजरीच्या पिलाचा गोडवा आणायचा प्रयत्न करून तिच्याकडे पाहिले आणि म्हणालो,"मला हे काय आहे ते माहित नाही. स्पॅम असू शकते."
बायकोने काहीही न बोलता तुच्छतेने मान वळवली आणि ती व्हिडिओ पाहू लागली.
"अभिनंदन!", साशा सांगत होती, "ल्यूबोवनिक डॉल्सच्या प्रोमोशन काँटेस्टमध्ये तू भाग घेतला होतास हे तुला आठवतच असेल. मला सांगायला आनंद होतो की तू त्या कॉन्टेस्टचा तीनपैकी एक विजेता आहेस!". बायकोने वळून माझ्याकडे पाहिले, मी माझी बत्ती पेटली असूनही मख्खपणे खांदे उडवले.
"तर एक विजेता म्हणून तू जिंकला आहेस ऑर्बिटॉल पॅलेस या जगातल्या पहिल्या स्पेस हॉटेलमध्ये पाच दिवस आणि चार रात्रींचा निवास! काँटेस्टच्या इतर नियमांची तू पूर्तता केलीस तर तुझ्या प्रिय व्यक्तीबरोबर अंतराळात तुला पाच दिवस राहता येईल आणि ते ही अगदी फुकट! काँटेस्टचे नियम वेगळ्या इमेलद्वारे तुला पाठवण्यात आलेले आहेत!", इतकं बोलून आणि एक उडता मुका फेकून साशा अंतर्धान पावली.
"अय्या!," बायको पुढच्याच क्षणी किंचाळली, "स्पेस हॉटेलमध्ये? जगातल्या पहिल्या स्पेस हॉटेलमध्ये? कित्ती कित्ती मज्जा नै? "
"हो ना.", मलाही थोडीशी मजा वाटली खरी.
"जगातल्या पहिल्या आणि एकमेव स्पेस हॉटेलात आपण दोघं! आणि बाकीचे बसणार नुस्तंच आकाशाकडे बघत! यावेळी किटीपार्टीत मजा येईल. नुसतं क्रूझवर जाऊन आले तर किती भाव खातात लोकं!"
"हौ हौ हौ," मी न राहवून म्हणालो," इतक्यात उडू नका बाईसाहेब. अजून बाकीच्या अटी बघायच्या आहेत. आणि हो, हे काही एकमेव नाहीय हॉटेल. ते पहिलं आहे म्हणजे दहा वर्षं जुनं आहे. २०१६ मध्ये रशियन कंपनीनं सोडलेलं आहे वरती."
"हो?", बायकोचा चेहरा किंचित उतरला पण लगेचच ती उसळली," म्हणून काय झालं? स्पेस हॉटेल ते स्पेस हॉटेल. आपल्या मित्रमंडळींपैकी दुसरं कोणी जायच्या आत आपण जायचं म्हणजे जायचं. बस्स."
तितक्यात टिडिंग आवाज करून नवीन इमेल आलं. ल्युबोवनिक डॉल्सकडूनच होतं. त्यांनी उर्वरित अटी पाठवल्या होत्या. मी लगेचच त्या उघडल्या आणि वाचल्या. बर्‍याचशा किरकोळ होत्या फक्त दोन अटी वाचताना माझे डोळे मोठे झाले.
एक म्हणजे प्रवासखर्चाच्या वीसटक्के म्हणजे एक लाख पौंड भरायचे होते आणि दुसरी म्हणजे त्यांची व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीतली कंपॅनिअन डॉल साशा किंवा तो मिशा विकत घ्यायचा. किंमत फक्त दहाहजार डॉलर्स.
मी बायकोकडे पाहिले. तिने भुवया उंचावल्या आणि मग छताकडे पाहात विचारात पडली.
"चला. नकोच ती नस्ती भानगड.", असं मनात म्हणून मी सुस्कारा सोडला आणि उठून आत जाऊ लागलो.
तितक्यात, "मी ना, वर्षभर काहीच शॉपिंग करणार नाही रे....", हे बायकोचं वाक्य कानी पडलं.
मी उभ्या जागीच खिळलो आणि जमीन दुभंगून मला गिळंकृत करेल या आशेने डोळे गच्च मिटून घेतले.
(क्रमशः)

कथाविडंबनसमाजजीवनमानविज्ञानविरंगुळा

प्रतिक्रिया

स्पा's picture

30 Aug 2011 - 2:50 pm | स्पा

झकास... वाचतोय

गवि's picture

30 Aug 2011 - 3:07 pm | गवि

हा हा.. मजा येतेय..

समीरसूर's picture

30 Aug 2011 - 3:32 pm | समीरसूर

इंटरेस्टिंग आहे....पुढचे लवकर येऊ द्या...

समीर

अन्या दातार's picture

30 Aug 2011 - 3:45 pm | अन्या दातार

मला वाटले तुम्ही नि:श्वास टाकलात म्हणजे संपली कथा!
पण क्रमशः वाचून आनंद झाला.

छान कहानी सुरु आहे ..

लिहित रहा.... वाचत आहे ....

गणेशा's picture

30 Aug 2011 - 3:55 pm | गणेशा

प्र.का.टा.आ.

गणेशा's picture

30 Aug 2011 - 3:55 pm | गणेशा

प्र.का.टा.आ.

प्रास's picture

30 Aug 2011 - 4:30 pm | प्रास

मस्त! मस्त! मस्त!

मागल्या वेळी जे वाटलेलं त्यापेक्षाही हे पॅकेज सॉलिड तयार होतंय.

याहीवेळी क्रमशः असल्याने उत्सुकता वाढलेली आहे हे वे. सां. न. :-)

प्रचेतस's picture

30 Aug 2011 - 5:00 pm | प्रचेतस

येउ दे पुढचे भाग लवकर. छानच लिहिताय.

रेवती's picture

30 Aug 2011 - 7:59 pm | रेवती

वाचतिये.

शुचि's picture

30 Aug 2011 - 11:03 pm | शुचि

खूप छान. वाचते आहे.

५० फक्त's picture

31 Aug 2011 - 1:51 am | ५० फक्त

जबरा रे , येउ दे अजुन.

अवांतर - स्पेस हाटेलात पराठे खाण्याच च्यालेज असतंय का ?

स्पंदना's picture

31 Aug 2011 - 6:37 am | स्पंदना

अच्छा ? तुम्ही जिंकलात ? आम्हाला नाय हो कंदी असल काय लागत. बघाव तेंव्हा आम्ही तुमच्या सारख्या भाग्यवंतांकडे ????? जळु नजरेने पहात असतो.
बर मला सांगा तुम्ही साषा विकत घेणार की मिश्या???

धमाल मुलगा's picture

31 Aug 2011 - 5:26 pm | धमाल मुलगा

व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीसंदर्भात किती रे रिअ‍ॅलिस्टिक लिहितोस! डोळे भरुऽऽन आले रे. ;)

पुढच्या भागांची आतूरतेनं वाट पाहतोय रे. :)

>>बर मला सांगा तुम्ही साषा विकत घेणार की मिश्या???
निर्‍याला मिशा असाव्यात (म्हणजे तो शेव्हिंग करत असला तरी उगवत असाव्यात.) तर पुन्हा मिशा घेण्यात काय पाइंट? लाडिक लाडीक बोलणारी अन् (सध्यातरी) फ्लाइंग किस देणारी साशाच घेईल बहुतेक. ;)