कृषिविद्यापीठांना अनुदान कशाला हवे?

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जनातलं, मनातलं
7 Mar 2011 - 10:15 am

कृषिविद्यापीठांना अनुदान कशाला हवे?

जेव्हा जेव्हा शेतीच्या दुर्दशेचा विषय निघतो, तेव्हा तेव्हा ज्या अनेक उपाययोजना सुचविल्या जातात, त्या अनेक उपाययोजनांपैकी कृषी विद्यापीठे आणि त्यांचे संशोधन हा एक हमखास उपाय सुचविला जातो. या सर्व तज्ज्ञांच्या मते कृषी विद्यापीठाने आजवर फार मोठे चमत्कारिक संशोधन केलेले आहे पण ते संशोधन शेतकरीवर्गापर्यंत पोचत नाही किंवा पोचले तरी शेतकरी ’आळशी’ ’अज्ञानी’ वगैरे असल्याने तो ते अंगिकारत नाही म्हणून त्याला शेती परवडत नाही. त्यांच्या मते कृषी विद्यापीठांनी केलेले संशोधन जर शेतीमध्ये वापरले गेले तर या समग्र भारत देशातल्या शेतीत क्रांतीकारी बदल घडून येतील आणि शेती व्यवसायाची प्रचंड भरभराट होईल.
कृषी विद्यापीठातील संशोधक, विषयतज्ज्ञ, आणि स्वतः कुलगुरू यांच्याही बोलण्याचा रोख कायमच उपदेशात्मक असतो. जणू काही शेतकर्‍यांच्या उत्थानासाठी परमेश्वराने यांना ’प्रेषित’ म्हणूनच भूतलावर जन्माला घातले आहे.
दरवर्षी या विद्यापीठांना पोसण्यासाठी शासकीय तिजोरीतून प्रचंड खर्च केला जातो. त्याबदल्यात संशोधन काय केले जाते, याचाही आढावा घेणे गरजेचे आहे, अशी मात्र कोणालाच गरज भासत नाही. ऊस, केळ, ज्वारी, गहू, बाजरी, तूर,सोयाबीन वगैरे मुख्य पिकांसंदर्भात क्रांतीकारी संशोधन करण्यास किंवा त्या-त्या पिकाच्या क्रांतीकारी जाती,प्रजाती अथवा संकरित वाणाचे संशोधन करण्यात अजूनही या कृषी विद्यापीठातील संशोधकांना फारसे यश आलेच नाही, याकडेही सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते.
पाऊस गरजेपेक्षा जास्त किंवा कमी पडला तरी तग धरेल, बदलत्या हवामानाचा प्रतिकार करून चांगले उत्पन्न देऊ शकेल, अशा तर्‍हेचे वाण अजूनही संशोधित करण्यात यश आलेले नाही. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरवातीस पाऊसपाण्याविषयी अनुमान वर्तविण्यात येत असते. पण यांच्या अनुमानात आणि एकंदरीत पाऊस पडण्यात कुठेही ताळमेळ दिसत नाही. याउलट यांनी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असे भाकीत वर्तविले की हमखास त्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडून कोरडा दुष्काळ पडतो आणि यांनी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असे भाकीत केले की त्यावर्षी अती पाऊस पडून हजारो एकर जमीन पाण्याखाली बुडून ’’ओला दुष्काळ" जाहीर करावा लागतो.
सलग दोन-तीन वर्षे पाऊस कमी पडला की, "शेतकर्‍यांनी प्रचंड वृक्षतोड केली म्हणून निसर्गाचा समतोल बिघडला" असा घासून पिटून गुळगुळीत झालेला एकमेव निष्कर्ष काढून ही मंडळी मोकळी होतात. त्यापुढे काही यांच्या संशोधनाची मजल जात नाही. मग शासनाच्या कृषी विभागाच्या मदतीने व सरकारी पैशाने "वृक्ष लावा, निसर्ग वाचवा" "पाणी अडवा, पाणी जिरवा" यासारख्या प्रचारकी थाटाच्या मोहिमा हाती घेतल्या जातात. अशा मोहिमांवर प्रचंड आर्थिक खर्च केला जातो, पण ही मंडळी (साहेब असल्यामुळे) स्वतः झाडे लावत नाहीत, आणि जनतेचा यांच्या शब्दावर विश्वास नसल्याने जनताही झाडे लावण्याच्या फंदात पडत नाहीत. निदान या मंडळींनी स्वतः काही झाडे लावली असती तर काही उपयोग तरी झाला असता, काही झाडे तरी लावल्या गेल्याचे समाधान मिळाले असते पण साहेबांनी झाडे थोडी लावायची असतात? साहेबांनी शारीरिक श्रमाची कामे करायचीच नसतात, शारीरिक श्रमाची कामे करण्यासाठी देवाने शेतकरी नावाचा प्राणी जन्माला घातला आहे, त्यानेच खड्डे खोदायचे, झाडे लावायची, असा या मंडळींचा पक्का समज असतो. त्यामुळे ही मंडळी सल्ले द्यायची कामे तेवढी करीत राहतात आणि शेतकरी यांच्याकडे कुतूहलाने बघत असतात. आणि यदाकदाचित काही झाडे लावली गेलीच तरी त्या झाडांचे आयुष्य फार तर महिना-दोन महिन्याचेच असते. कारण नंतर त्या झाडांचे संगोपनाचे पालकत्व कुणाकडेच नसते.
एवढी सगळी मोहीम राबवूनही नवीन झाडे काही लागले जात नाहीत. झाडे-झुडपे-जंगल आहे तोच असतो. तेवढ्यातच नवा पावसाळा सुरू होतो. आणि पाऊस धुवांधार कोसळायला लागतो. पाऊस एवढा कोसळतो की, पाऊस पडण्याचे सर्व उच्चांक मोडीत निघतात. "प्रचंड वृक्षतोडीमुळे पावसाचा तोल बिघडला" या अतीअभ्यासांती काढलेल्या सिद्धांताचे बारा वाजतात.
शेतीच्या औजाराच्या संशोधनाबद्दलही तेच. विद्यापीठांनी शेतीसाठी बहुउपयोगी औजार बनविले आणि ते शेतीसाठी फारच उपयोगी ठरत आहे, असेही फारसे कधी घडत नाही. शेतीसाठी लागणार्‍या औजारामध्ये दोर-दोरखंड, कुळव-तिफण, कुर्‍हाड-पावडे वगैरे साहित्याचे डिझाइन गावातले कारागीर, ज्यांना अधिकृतपणे अकुशल मानले जातात तेच कारागीर करतात. लोखंडी नांगर, फवारणी यंत्र, मोटारपंप, यापासून ते टॅक्टरपर्यंतचे सर्व डिझाइन खाजगी कंपन्या करीत असतात, या क्षेत्रातही कृषी विद्यापीठातील संशोधकांचे योगदान नगण्यच आहे.
संपूर्ण देशातील कृषी विद्यापीठांनी थोडीफार कामगिरी केली असे एकमेव क्षेत्र आहे बियाणे संशोधन. कृषी संशोधकांनी संकरित बियाणात संशोधन करून नवे वाण निर्माण केले, पण अधिक उत्पन्न देणारे संकरित वाण केवळ कापूस, ज्वारी आणि टमाटर या पिकांपुरतेच मर्यादित राहिले. गहू, तूर, हरबरा, सोयाबीन, उडीद, मूग, भात, भुईमूग या पिकामध्ये अजूनपर्यंत तरी भरघोस उत्पन्न देणारे संकरित वाण निर्माण झाले नाही. निवड पद्धतीने सुधारीत जाती तयार होण्यापलीकडे अजून तरी बियाणे संशोधकांची झेप गेलेली नाही. पण बियाणे संशोधन विभागातही कृषिविद्यापीठांची मोलाची भूमिका आहे, असे म्हणण्यासारखी स्थिती नाही.
१९७० च्या सुमारास गुजरात विद्यापीठाने कपाशीमध्ये एच-४ नावाचे संकरित वाण तयार केले, त्यानंतर त्यांना दुसरे दर्जेदार संकरित वाण निर्माण करण्यास फारसे यश आले नाही. नाही म्हणायला एच-६, एच-८ संकरित वाण त्यांनी आणले पण ते वाण बदलत्या हवामानात फ़ारकाळ टिकू शकले नाही. त्याचप्रमाणे १९८० च्या सुमारास मराठवाडा कृषिविद्यापीठाने एनएचएच-४४ व पंजाबराव देशमुख कृषिविद्यापीठाने एएचएच-४६८ या दोन कापसाच्या संकरित जाती निर्माण करण्याखेरीज संकरित बियाणे संशोधनात फार काही मौलिक संशोधन केलेले नाही, हे उघड आहे.
पण हे सर्व संशोधन पंधरा-वीस वर्षापूर्वीचे आहे, आणि हे सर्व संकरित वाण आता शेतीतून हद्दपार झालेले आहे.
या उलट गेल्या वीस वर्षात खाजगी कंपन्यांनी मात्र बियाणे क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. जवळ-जवळ सर्वच पिकांमध्ये स्वतः संशोधन करून स्वसंशोधित बियाणे बाजारात आणले आहे आणि त्यालाच शेतकर्‍यांची पसंती मिळाली आहे.
२०१०-११ हा खरीप हंगाम शेतीसाठी प्रतिकूल असूनही केवळ बीटीयुक्त बियाणे शेतीमध्ये पेरले म्हणून कापसाचे बर्‍यापैकी उत्पादन आले आहे. आणि कापसाची निर्यात सुरू आहे म्हणून कापसाला विक्रमी भाव मिळत आहे. कापूस उत्पादकांच्या आयुष्यात कदाचित चांगले दिवस येण्याची शक्यता निर्माण होत असेल तर ती बिटी बियाणे संशोधित करणार्‍या मोन्सॅटो कंपनीची किमया आहे. कापसाला चांगले भाव मिळत असेल तर ती मुक्तअर्थव्यवस्थेची किमया आहे. मग कापूस उत्पादकांच्या आयुष्यात कदाचित चांगले दिवस येण्याची शक्यता निर्माण होत असेल तर यात शासन किंवा कृषिविद्यापीठांचे काय योगदान आहे?
पण हे सत्य कोणी मानायलाच तयार नाही. कृषिविद्यापीठांनी गेल्या पन्नास वर्षात केलेल्या संशोधनाच्या समर्थनार्थ ते गाढाभर कागदपत्रांचा दस्तऐवज सादर करायला नेहमीच उतावीळ असतात. पण कागदोपत्री संशोधनाच्या आधारे पीएचडी, डी लिट वगैरे मिळू शकते, पण शेती पिकवायसाठी बियाणे-खते-कीटकनाशके लागतात, कागदपत्री दस्तऐवज हे काही पिकांचे खाद्य नाही. शिवाय या दस्तऐवजांचे सेंद्रिय खतात रूपांतर केले आणि पिकाला खाऊ घातले तर जास्तीत जास्त क्विंटल-दोन क्विंटल अन्नधान्य पिकू शकेल, पिकाच्या भाषेत या दस्तऐवजाला यापेक्षा जास्त काही अर्थ उरत नाही. मुलांची भाषा ज्याला चांगली कळते तोच चांगला पालक. ज्याला विद्यार्थ्याची भाषा कळत नाही तो शिक्षक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणू शकत नाही, अगदी तसेच, ज्याला पिकांची भाषा कळत नाही तो शेतीमध्ये चांगले संशोधन करूच शकत नाही.
पण दुर्दैवाने विद्यापीठीय शेतीसंशोधक आणि प्रत्यक्ष शेती यांचा अर्थाअर्थी काहीही संबंधच राहिलेला नाही. शेतीचे अर्थशास्त्र यांना कळत नाही कारण शेती किंवा शेतीसंशोधन याऐवजी शासकीय अनुदानावर यांचे प्रपंच चालतात. आणि निसर्गाचा लहरीपणा, हवामान, पाऊसपाणी किंवा ओला-कोरडा दुष्काळ यांचेशी शासकीय अनुदानाचा काहीही संबंध नसतो. अनुदान हे हमखास पीक असते.
कृषी विद्यापीठांकडे हजारो एकर जमीन आहे. सिंचनाची व्यवस्था आहे, त्यांनीच गेल्या पन्नास वर्षात केलेल्या संशोधनाची शिदोरी आहे. मग कृषी विद्यापीठांना अनुदानाची गरज का पडावी? आता एकदा सर्व विद्यापीठांचे अनुदान बंद करून यांना सांगण्याची गरज आहे की, बाबा रे, निव्वळ सल्ले देणे खूप झाले, या विद्यापीठाच्या हजारो एकरावर तुमच्याच संशोधनाच्या आधारे आता शेती करून किमान पाच वर्ष तरी जगून दाखवा, प्रपंच चालवून दाखवा आणि शेती करून होणार्‍या मिळकतीवर विद्यापीठाचे सर्व कारभार अनुदान न घेता चालवून दाखवा.
"आधी केले मग बोलिले" यासारखा दुसरा चांगला मार्ग नाही.
पण ज्या विद्यापीठांना शेतीतील गरिबीचे कारण शेतीत उत्पादित केलेल्या मालास "उत्पादन खर्च भरून निघेल" एवढाही भाव मिळत नाही, यात दडलेले आहे, हेच अजूनपर्यंत कळलेले नाही, त्यांच्याकडून फारश्या अपेक्षा करणे, हेच मूर्खपणाचे आहे.

गंगाधर मुटे
-----------------------------------------------------------------------------------------------------

तंत्रविज्ञानअर्थकारणराजकारणशिक्षणप्रकटनविचारलेखमत

प्रतिक्रिया

एक प्राध्यापक गेल्या वर्षी मला म्हणाले होते कि भारतात शेती हा कधीच फायदेशीर उद्योग होणार नाही. कारण भारतात शेतीसाठी असणार्‍या सर्व संधी बेभरवश्याच्या आहेत.

नेत्रेश's picture

7 Mar 2011 - 11:00 am | नेत्रेश

पारंपारीक शेती जी पावसाच्या पाण्यावर अवलंबुन असते ती कायम १००% फायद्यात येणे फार कठीण आहे. १२ महीने सिंचनाखाली जमीन असलेले, फळ बागायतदार, उसाचे मळेवाले सुद्धा क्वचित तोट्यात जातात. पण आधुनीक, प्रयोगशील आणी प्रशीक्षीत शेतकरी शेती आणी जोडधंदे मीळुन कायम फायद्यात राहु शकतात. असे काही माझ्या परीचयाचे आहेत.

गंगाधर मुटे's picture

8 Mar 2011 - 7:52 pm | गंगाधर मुटे

पण आधुनीक, प्रयोगशील आणी प्रशीक्षीत शेतकरी शेती आणी जोडधंदे मीळुन कायम फायद्यात राहु शकतात.

शेतीसोबत जोडधंदा करण्यापेक्षा निव्वळ धंदा सुद्धा फायद्याचा असतो.
त्यामूळे शेती आणी जोडधंदे मीळुन धंदा करण्यापेक्षा निव्वळ धंदा करणारे जास्त फायद्यात असतात.

जोडधंद्याशिवाय परवडत नसेल तर शेती तोट्याचीच, हाच अर्थ यातून निघतो.

नितिन थत्ते's picture

7 Mar 2011 - 11:23 am | नितिन थत्ते

शेती कोणत्याच देशात किफायतशीर नाही. अमेरिका आणि युरोपमध्येही ती सबसिडीवरच तगवली जाते.

गंगाधर मुटे's picture

8 Mar 2011 - 7:52 pm | गंगाधर मुटे

भारतात शेतीसाठी असणार्‍या सर्व संधी बेभरवश्याच्या आहेत.

त्यातल्या त्यात शेतमालाचे भाव ही बाब सर्वात जास्त बेभरवश्याची आहे.

>>पण दुर्दैवाने विद्यापीठीय शेतीसंशोधक आणि प्रत्यक्ष शेती यांचा अर्थाअर्थी काहीही संबंधच राहिलेला ना>>>>
१००% सत्य!
आम्हाला जमेल तेव्हढ आम्ही कमावतो . यांच्या संशोधनान काही फारसा फरक नाही पडला आजवर शेती मध्ये. जोपर्यंत सरकारी अधिकारी या सगळ्या योजना वा संशोधन घेउन स्वतः खुर्ची वरुन उतरुन मातीत पाउल घालत नाहीत तोवर तरी भारतात शेती म्हणजे बुडीत खातच राहिल.

वारकरि रशियात's picture

7 Mar 2011 - 11:10 am | वारकरि रशियात

मुटेजी,
आपण आपल्या लेखात अनेक मुद्द्यांना स्पर्श केला आहे.

सविस्तर वाचून कांही विचारावेसे वाटल्यास विचारीन. तोवर,
१) (महाराष्ट्रातील) बहुतांश / सर्व कृषी विद्यापीठांचा या आढाव्यातील विचार लागु होणारे आहेत असे जाणवते. उदा. दापोली / कोकण, राहुरी, परभणी, डॉ.पंजाबराव देशमुख ...
२) कांही संशोधन उदा. गणेश डाळिंबे, सीडलेस द्राक्षे वगैरे शेतक-यांना उपयुक्त ठरले असे वाटते. त्याबद्दलची नेमकी वस्तुस्थिती / खरी परिस्थिती काय आहे?
३) कांही संशोधन उदा.सीडलेस आंबा (खूप लहान बाठ) वगैरे ग्राहकांच्या पसंतीला उतरले नाही असे काही झाले काय?

अवांतरः
१) पूर्वी अनाबेशाही / सीडलेस चमन / तासगावी चमन वगैरे द्राक्षांच्या जातीची नावे ऐकु येत. पण अलिकडे ऐकु येत नाहीत.
२) या वाणांच्या निर्मितीत विद्यापीठांचा सहभाग होता का?

गंगाधर मुटे's picture

8 Mar 2011 - 7:56 pm | गंगाधर मुटे

कांही संशोधन उदा.सीडलेस आंबा (खूप लहान बाठ) वगैरे ग्राहकांच्या पसंतीला उतरले नाही असे काही झाले काय?
या वाणांच्या निर्मितीत विद्यापीठांचा सहभाग होता का?

विद्यापीठांनी संशोधन केले नाही असे नाही, पण त्याची उपयोगीता काय?
हाच मुख्य प्रश्न आहे.

शेतकी महाविद्यालये आणि त्यांचे अनुदान कीती आणि का ? याबद्दल मी अज्ञानी आहेच.

पण आपण दिलेले सर्व मुद्दे पटत आहेत. शेतकर्याच्या वतीने अशी मते ओपनली सरकारला विचारलीच गेली पाहिजेत .
आपल्याला शक्य झाल्यास तसे करता येइल का?

गंगाधर मुटे's picture

8 Mar 2011 - 8:00 pm | गंगाधर मुटे

शेतकर्याच्या वतीने अशी मते ओपनली सरकारला विचारलीच गेली पाहिजेत .

विचारायलाच हवी. पण विचारायचे कसे?

१) सामान्य शेतकर्‍याला संसदेत जावून काही विचारण्याची मुभा नाही.
२) सामान्य शेतकर्‍यांचे मनोगत वृत्तपत्र छापायला तयार नाहीत.
३) पत्र पाठवायचे तर त्याची साधी पोच सुद्धा मिळत नाही. उत्तर मिळणे ही लांबची गोष्ट.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Mar 2011 - 10:21 am | निनाद मुक्काम प...

ह्या संदर्भात एक बातमी वाचली होती .
नितीन गडकरी नुकतेच तेल अलीव येथे गेले असता .त्या ज्यू राष्ट्राने वाळवंटात नवीन तंत्रांद्यान वापरून शेती केली आहे .त्याचा फायदा त्यांचे सरकार असणाऱ्या राज्यात केला जाणार आहे . मेड इन चायना ह्या सिनेमात सुध्धा ह्याचा उल्लेख आहे .की पदवीधर शेतकरी ( तेथे जाऊन उच्च शिक्षण घेऊन आला आहे .

ह्याच मुद्यावर हा एक पूरक लेख

अजुन एक वाचण्यात मुद्दा असा की ऑन लाईन शेतीविषयक सल्ले बारामती येथील कृषी विद्यापीठ देते .त्याचा जगभरातील शेतकरी फायदा करून घेतात .
माझ्या मते अनुदान देणे वाईट नाही पण प्रगत राष्ट्रांशी संशोधनासाठी करार करायला हवे .
प्रसार माध्यमांनी शेती विषयक बातम्या जास्त देऊन जनतेत शेतीविषयी जिव्हाळा परत उत्पन्न करावा असे वाटते ( शेतीविषयी काही माहीत नसलेले आमची माती आमची माणसे पाहून खूप काही शिकली होती सदर कार्यक्रम अजुन लक्षात आहे .

मोटेंक सिंग ह्यांनी एका जागतिक परिसंवादात एका भारतीय उद्योजकाच्या प्रश्नाला उत्तर दिले की ''जगात सर्वत्र शेतीविषयक सबसिडी ह्या दिल्या जातात .व त्याचे वितरण व्यवस्था ही योग्य नसते'' ( सदर उद्योजकाचे म्हणणे होते जादा सबसिडी देऊन किंवा आधी भरमसाट कर्ज देऊन विरोधी पक्षाच्या दबावात ती माफा करणे हे जनतेच्या कराचा अपव्यय आहे .

तस्मात सुधारणेस वाव आहे . म्हणजेच विद्यापीठात शिकण्यासाठी शेतकरी साक्षर हवा .व
विद्यापीठांनी बळीराजा पर्यत पोहोचून त्यास माहिती दिली पाहिजे .
सामुहीक शेतीस पाठिबा देण्यास किंवा उद्योग विश्वाचा शेतीत सहभाग होणे गरजेचे आहे (तेच एकतर अनुदान देतील किंवा स्वताची आधुनिक विद्यापीठे उभारतील )

टाटा ह्यांनी मीठ बनवले मग अजुन एका संस्थेने ते बनवून विकले .त्यामुळे मीठ भरमसाट महाग किंमतीत विकल्या गेले नाही .उलटपक्षी त्याची शुध्ध्ता व दर्जा सुधारला .
दुसर्या हरित क्रांतीची गरज आहे .पण ती केव्हा येणार ?
४ जी टेक्नोलॉजी आल्यावरच बहुदा ( ती येत्या २ वर्षात येईन बहुतेक )