बसंतचं लग्न..१३

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
7 Apr 2008 - 6:55 pm

II स्वरभास्कर पं भीमसेन जोशी प्रसन्न II

बसंतचं लग्न..१ (ओळख)
बसंतचं लग्न..२ (यमन, यमनकल्याण)
बसंतचं लग्न..३ (भूप)
बसंतचं लग्न..४ (मिया मल्हार)
बसंतचं लग्न..५ (बिहाग)
बसंतचं लग्न..६ (मालकंस)
बसंतचं लग्न..७ (हमीर)
बसंतचं लग्न..८ (भीमपलास)
बसंतचं लग्न..९ (मुलतानी)
बसंतचं लग्न..१० (तोडी)
बसंतचं लग्न..११ (शुद्धसारंग, गौडसारंग)
बसंतचं लग्न..१२ (अहीरभैरव)

राम राम मडळी,

बसंतच्या लग्नाचा सोहळा आता खरंच देखणा होऊ लागला आहे. यमन-भूपासारखी रागमंडळी सर्वांचं प्रेमानं स्वागत करत आहेत, सारंग मंडळी कुणाला काय हवं, नको ते पाहात आहेत, जेवणाची व्यवस्था त्यांच्याकडेच आहे. कोपर्‍यात कुठेतरी नंद, हमीर, कामोद यांची लग्नातल्या रागिण्यांसोबत माफक टवाळी चालली आहे, मुलतानी, तोडी, दरबारी, पुरिया, मल्हार, झालंच तर आमचे मालकंसबुवा, अहीरभैरव यांसारखी मातब्बर आणि बुजूर्ग मंडळी सर्वात पुढल्या कोचावर स्थानापन्न झाली आहेत. या बुजूर्गांना काय हवं,नको ते इतर खेळकर स्वभावाची राग मंडळी पाहात आहेत! देस सारखा राग यासर्वांची जातीने विचारपूस करतो आहे! एकंदरीत सगळी धमाल सुरू आहे, आनंदोत्सव सुरू आहे! आमच्या बसंतच्या लग्नाचा मंडप म्हणजे भारतीय अभिजात रागसंगीताची ती एक मांदियाळीच आहे!

पण बरं का मंडळी, एका रागाचा उत्साह मात्र अगदी ओसंडून वाहतो आहे. त्याच्या लाडक्या बसंतला कुठे ठेवू अन् कुठे नको असं त्याला झालं आहे! हा सोहळा कधी संपूच नये असंच त्याला वाटतं आहे. अतिशय उत्सवप्रिय व्यक्तिमत्व आहे या रागाचं! नव्हे, तर हा राग म्हणजे स्वरांचाच उत्सव आहे असं मी म्हणेन!

हा राग आहे, केदार! मंडळी, केदार म्हणजे साक्षात स्वरोत्सव, केदार म्हणजे आनंदाचं निधान! केदार म्हणजे रसिकता, केदार म्हणजे तारूण्य, केदार म्हणजे शृंगार! केदार म्हणजे हळवेपणा! अहो किती संपन्न व्यक्तिमत्व असलेला राग आहे हा! विलक्षण जादुई स्वरवेल लाभलेला हा राग अक्षरश: एका क्षणात मैफलीची पकड घेतो असा माझा अनुभव आहे!

केदारचं प्राथमिक स्वरूप, आरोह-अवरोह, पकड, इत्यादी तांत्रिक गोष्टी समजून घेण्यासाठी कृपया हे ऐका. ह्यात आग्रा घराण्याच्या गुणी गायिका शुभ्रा गुहा यांनी 'कंगनवा मोरा..' ही केदारातली पारंपारिक बंदिश किती छान म्हटली आहे पाहा!

केदार रागातलं, मधलं 'हमको मन की शक्ति देना' हे अतिशय लोकप्रिय गाणं इथे ऐका. गुड्डी चित्रपटातील हे फार सुरेख गाणं आहे.

भेदभाव अपने दिल से साफ कर सके
दोस्तोसे भूल हो तो माफ कर सके
झूठसे बचे रहे, सच का दम भरे
दुसरोंके जयसे पेहेले खुद को जय करें!

मंडळी, इथे संगीतकार वसंत देसायाना दाद द्यायला हवी! केदार हा बहुरंगी व्यक्तिमत्वाने नटलेला राग आहे त्यामुळे या गाण्यातल्या अर्थालाही हा राग साजेसाच ठरतो. कुणाबद्दलही मनामध्ये भेदभाव नसलेल्या केदारकडे क्षमाशील वृत्ती मात्र पुरेशी आहे!

"जाओ, साला तुम्हे माफ किया!" असं खुल्या दिल्याने म्हणण्याचा स्वभाव आहे आमच्या केदारचा! :)

वसंत देसायांनी 'दुसरोंके जयसे पेहेले खुद को जय करें!' या अवघ्या एका ओळीत केदारचं एक संपूर्ण सारांशरूप किती छान ठेवलंय बघा! मध्य षड्जापासून ते तार षड्जापर्यंत केदार किती सहजतेने बागडतो बघा. वाटेतल्या प्रत्येक स्वरावर अगदी मनमुराद प्रेम करत करत याच्या आरोहा-अवरोहाची यात्रा सुरू असते!

जयपूर घराण्याच्या तरूण, गुणी गयिका सौ अश्विनी भिडे यांनी गायलेली केदारातली 'चतर सुगर बलमा' ही बंदिश इथे ऐका. यातल्या केदाराचं सौंदर्य किती मोहक आहे पाहा! 'साला अपनेही मस्तीमे कोई जा रहा है' असं वाटतं! ज्याला खर्‍या अर्थाने 'Rich!' म्हणता येईल असं या बंदिशीचं स्वरूप आहे.

वसंतरावांनी केदारकडे कसं बघितलंय त्याची झलक इथे ऐका. वसंतरावांसारख्या बुद्धीमान गवयाला केदाराने भुरळ घातली नसती तरच नवल होतं! वसंतरावांचा स्वभावही तसाच होता, केदार सारखाच दिलदार आणि अवलिया!

बापुराव पलुसकर! घराणेदार गायकीतल्या ग्वाल्हेर परंपरेतलं एक मोठं नांव. अवघ्या ३३-३४ वर्षांच्या आयुष्यात बापुरावांनी गाण्यात जे काम करून ठेवलं आहे ते पाहिलं की मन थक्क होतं! खडीसाखरेसारखा सुमधूर आवाज, तालासुरालयीवर विलक्षण हुकुमत असलेल्या बापुरावांच्या गायकीत सदाबहार ग्वाल्हेर परंपरेतली सगळी वैशिष्ठ्य अगदी पुरेपूर होती. दुर्दैवाने बापुरावांना फारसं आयुष्य लाभलं नाही! असो, बापुरावांनी गायलेली 'कान्हा रे..' ही केदारातली पारंपारिक बंदिश इथे ऐका!

धमाल करा, मजा करा, उत्सव साजरे करा! पण,

Whatsoever, but no guilty at all ! असा आहे आपला केदार!

मी धर्माचे केले पालन
वाली वध ना, खलनिर्दालन!

हे सांगतांना बाबूजींनी किती मुक्तपणे केदारच्या रंगाची उधळण केली आहे! आहाहा, क्या बात है. अहो गीतरामायणातलं हे किती सुंदर गाणं आहे केदरातलं! मरत्या वालीला राम सांगतोय,

"हो, मी मारलं तुला झाडाआडून! काय म्हणणं आहे तुझं? अरे तुझ्या बाबतीत कसली आल्ये निती आणि अनिती?"

तू तर पुतळा मूर्त मदाचा
सुयोग्य तुज हा दंड वधाचा
अंत असा हा विषयांधाचा!

असं उघडपणे सांगायला केदारचेच सूर हवेत मंडळी! आणि बाबूजींसारखा असामान्य प्रतिभावानच त्या रागाची निवड करू जाणे! मी जेव्हा या गाण्यातील केदाराशी आणि माझ्या मनातल्या केदाराशी तुलना करू लागलो आणि एकिकडे गाण्याचा अर्थही लक्षात घेऊ लागलो, तेव्हा बाबूजी माझ्या मनातला केदार मलाच अधिक स्पष्ट करून सांगताहेत असं वाटलं, समोर बसवून शिकवताहेत असं वाटलं!

दिधले होते वचन सुग्रिवा,
जीवही देईन तुझिया जीवा!

या ओळीतलं मैत्र केदारपेक्षा कोण अधिक चांगल्याप्रकारे व्यक्त करू शकणार?!

अंत्य घडी तुज ठरो मोक्षदा
सांभाळीन मी तुझ्या अंगदा
राज्य तुझे हे, ही किष्किंधा
सुग्रीवाच्या करी समर्पण!

आणि एवढं होऊनही केदारच्या मनाची श्रीमंती जराही कुठे कमी झाली नाही, त्यात जराही कुठे कोतेपणा नाही, की जराही कुठे दुराभिमान नाही, की अहंपणचा, जेतेपणाचा स्पर्श नाही! राम वालीला सांगतो की मी तुला मारला खरा, पण तुलाही मोक्षच मिळो लेका! आणि काळजी करू नको, तुझ्या पुत्राला, अंगदालाही मी सांभाळीन, तुझे राज्य तुझ्याच घराण्याच्या सुग्रीवाच्या हवाली करीन. मी खाणार नाही!

वैर, वैराच्या जागी आणि नितीमत्ता, नितिमत्तेच्या जागी! मंडळी, हे उघडपणे, खुल्या दिलाने सांगायला केदारच हवा! आपल्याला काय वाटतं?

असो...!

मी जेव्हा एक व्यक्ति म्हणून केदारकडे बघतो तेव्हा मला असं जाणवतं की मी मोठ्या उदार मनाच्या व्यक्तिकडे पहात आहे. छोटेपणाचा, अशुभतेचा कधी स्पर्शच झालेला नाही या व्यक्तिला! प्रत्येक माणसाच्या आयुष्यात केदरासारखा एखादा तरी सखा असावा असं वाटतं! अगदी सखा नाही, तरी केदाराइतकी मोठ्या मनाची एखादी तरी वडीलधारी व्यक्ति अगदी प्रत्येकाला लाभावी, जिच्याकडे अगदी खुलेपणानं मनातलं बोलता यावं, आपले सगळे लाड पुरवून घेता यावेत, अणि प्रसंगी जिच्या मांडीवर डोकं ठेवून मनमोकळं रडताही यावं!

कारण एकदा मनमोकळं रडून घेतलं की मन अगदी स्वच्छ होतं, आकाश पुन्हा एकदा निळं, निरभ्रं होतं आणि माणूस पुन्हा एकदा केदारासोबत त्याच्या त्या उत्सवप्रिय, मंगलदायी वातावरणात केदारच्या सुरात न्हाऊन निघतो, केदारच्या रंगात गाऊ लागतो!

आणि कुणी सांगितलं की माणसं फक्त दु:खातच रडतात? अहो दु:खाश्रू तर नैसर्गिकच असतात परंतु आनंदाश्रूंचंच कित्येकदा अधिक ओझं वाटतं! दु:खी मनाला आवरण्यापेक्षा हळव्या मनाला आवरणं अधिक मुश्कील! माणसाच्या मनातील या सगळ्या भावभावना समजून घेणारा आणि त्याला सतत पुढे जात रहायला शिकवणारा केदारसारखा दुसरा सखा नाही मंडळी!

-- तात्या अभ्यंकर.

संगीतसंस्कृतीवाङ्मयअनुभवआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

7 Apr 2008 - 7:10 pm | विजुभाऊ

काही हिन्दी कव्वाल्या ही केदार मधे आहेत...
उदा: पल दो पल का साथ हमारा...पल दो पल के याराने है ( बर्नींग ट्रेन)
मराठी गाणे
सत्यम शिवम सुन्दरा .....
आज मी आळविते केदार
ही गाणी पण केदार मधे आहेत...
तात्या रागांची ओळख सांगताना त्या रागातली हिन्दी मराठी गाणी पण सांगा ना

विसोबा खेचर's picture

7 Apr 2008 - 7:26 pm | विसोबा खेचर

विजूभाऊ,

तात्या रागांची ओळख सांगताना त्या रागातली हिन्दी मराठी गाणी पण सांगा ना

तशी या रागात अनेक गाणी आहेत, परंतु मला जी पटकन आठवतात तीच मी सांगतो.

आणि त्या त्या रागातल्या गाण्यांचे नुकतेच संकलन करून येथे देणे, हा या लेखमालेचा उद्देश नसून त्या त्या रागाचा चेहेरा मला जसा दिसला, ते इथे सांगण्याचा हा एक प्रयत्न आहे, हे आपण कृपया लक्षात घ्या!

तात्या.

प्राजु's picture

7 Apr 2008 - 7:31 pm | प्राजु

मी जेव्हा एक व्यक्ति म्हणून केदारकडे बघतो तेव्हा मला असं जाणवतं की मी मोठ्या उदार मनाच्या व्यक्तिकडे पहात आहे. छोटेपणाचा, अशुभतेचा कधी स्पर्शच झालेला नाही या व्यक्तिला! प्रत्येक माणसाच्या आयुष्यात केदरासारखा एखादा तरी सखा असावा असं वाटतं! अगदी सखा नाही, तरी केदाराइतकी मोठ्या मनाची एखादी तरी वडीलधारी व्यक्ति अगदी प्रत्येकाला लाभावी, जिच्याकडे अगदी खुलेपणानं मनातलं बोलता यावं, आपले सगळे लाड पुरवून घेता यावेत, अणि प्रसंगी जिच्या मांडीवर डोकं ठेवून मनमोकळं रडताही यावं!

हे खासच... हा ही भाग उत्तम.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सुधीर कांदळकर's picture

7 Apr 2008 - 7:43 pm | सुधीर कांदळकर

आपण सुरुवातीला जे

II स्वरभास्कर पं भीमसेन जोशी प्रसन्न II

असे लिहिता.
त्या देवतुल्य अक्षरांचा योग्य तो मान राखला जाईल असेच सुंदर लिखाण सर्व भागांत आहे. यापेक्षा जास्त काय लिहूं?

माझ्या संगणकावर हेहि दुवे चालत नाहींत. कांहीच ऐकू येत नाही.

असो अशाच सुरेख भागांची वाट पाहातो.

सुधीर कांदळकर.

प्रमोद देव's picture

7 Apr 2008 - 8:28 pm | प्रमोद देव

केदारचे वर्णन मस्त केलंय आणि त्याची श्राव्य झलकही मस्तच आहे.
जियो तात्या! जियो!

llपुण्याचे पेशवेll's picture

7 Apr 2008 - 9:51 pm | llपुण्याचे पेशवेll

वसंतरावांनी केदारकडे कसं बघितलंय त्याची झलक इथे ऐका. वसंतरावांसारख्या बुद्धीमान गवयाला केदाराने भुरळ घातली नसती तरच नवल होतं! वसंतरावांचा स्वभावही तसाच होता, केदार सारखाच दिलदार आणि अवलिया!
हेही वसंतराव देसाईच का वसंतराव देशपांडे.??? नीटसे कळले नाही . कारण दिलदार आणि अवलिया ही विशेषणे वसंतराव देशपांडे याना पण लागू होतात.

केदारच्या मनाची श्रीमंती जराही कुठे कमी झाली नाही, त्यात जराही कुठे कोतेपणा नाही, की जराही कुठे दुराभिमान नाही, की अहंपणचा, जेतेपणाचा स्पर्श नाही! राम वालीला सांगतो की मी तुला मारला खरा, पण तुलाही मोक्षच मिळो लेका! आणि काळजी करू नको, तुझ्या पुत्राला, अंगदालाही मी सांभाळीन, तुझे राज्य तुझ्याच घराण्याच्या सुग्रीवाच्या हवाली करीन. मी खाणार नाही!

वैर, वैराच्या जागी आणि नितीमत्ता, नितिमत्तेच्या जागी! मंडळी, हे उघडपणे, खुल्या दिलाने सांगायला केदारच हवा!

काय बात आहे तात्या!!! जिंकलस.. एकदम पटले बघ...

पुण्याचे पेशवे

चतुरंग's picture

8 Apr 2008 - 12:28 am | चतुरंग

पेशवेसाहेब, अहो आवाज, आवाज, असा झारदार, 'काळजात कट्यारी' सारखा 'घुसणारा' आवाज कोणाचा असू शकतो? हे पं. वसंतराव देशपांडेच, भाईकाकांचे वसंतखां! शापित गंधर्व!!

चतुरंग

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Apr 2008 - 10:39 am | llपुण्याचे पेशवेll

आवाज, आवाज, असा झारदार, 'काळजात कट्यारी' सारखा 'घुसणारा' आवाज कोणाचा असू शकतो? हे पं. वसंतराव देशपांडेच, भाईकाकांचे वसंतखां! शापित गंधर्व!!
अगदी खरे आहे चतुरंगराव... गाण्यात म्हणजे कशी नागिणीची सळसळ होती... हाय...

पुण्याचे पेशवे

हा आनंदी आणि उत्साहाने ओसंडून वाहणारा केदार ऐकून थकवा कुठल्याकुठे पळून जातो!

तात्या, 'आपकी आंखों में कुछ मेहके हुए से राज़ है' हे किशोरदा आणि दीदींचं 'घर' मधलं पंचमदांनी स्वरबध्द केलेलं 'गुलजार गीत' केदारातलचं आहे ना?

(अवांतर - तात्या, दरबारी बद्दल येऊदेत ना असाच छानसा लेख!)

चतुरंग

विसोबा खेचर's picture

8 Apr 2008 - 9:09 am | विसोबा खेचर

तात्या, 'आपकी आंखों में कुछ मेहके हुए से राज़ है' हे किशोरदा आणि दीदींचं 'घर' मधलं पंचमदांनी स्वरबध्द केलेलं 'गुलजार गीत' केदारातलचं आहे ना?

नाही, हे गाणं केदार रागातलं नाही. याचे सूर बरेच वेगळे आहेत, मिश्र आहेत. माझ्या मते तरी हे गाणं म्हणजे ठराविक असा एक राग म्हणता येणार नाही.

(अवांतर - तात्या, दरबारी बद्दल येऊदेत ना असाच छानसा लेख!)

हम्म! थोडा प्रश्नच पडला आहे! दरबारीचं शिवधनुष्य मला जमेल किंवा नाही याचा! :)

अत्यंत बुजूर्ग व्यक्तिमत्व आहे या रागाचं! शब्दात मांडायला खूप कठीण राग आहे तो. हरकत नाही, कधितरी एकदा नक्की प्रयत्न करून पाहीन...

आपला,
(दरबारीने भारवलेला) तात्या.

बेसनलाडू's picture

8 Apr 2008 - 4:14 am | बेसनलाडू

लेखमाला उत्सुकतेने वाचत आहे. पुढचे भाग येऊ देत अविरत.
(वाचक)बेसनलाडू

सहज's picture

8 Apr 2008 - 8:36 am | सहज

"बसंताचे लग्न" हे तात्याचे सर्वात उठावदार [नंबर १] लेखन आहे असे [माझ्यासह अजुन] किती जणांना वाटते?

केशवसुमार's picture

8 Apr 2008 - 10:29 am | केशवसुमार

लेखमाला वाचत आहोत. पुढचे भाग येऊ देत ..
(वाचक) केशवसुमार
शास्त्रीय संगित ऐकायला आवडत पण त्या गाण्यातल ओ की ठो कळत नसल्या मुळे ह्या पेक्षा अधीक काय लिहीणार..
(कानसेन)केशवसुमार

स्वाती दिनेश's picture

8 Apr 2008 - 11:00 am | स्वाती दिनेश

लेखमाला वाचत आहे. पुढचे भाग येऊ देत ..लवकर....
शास्त्रीय संगित ऐकायला आवडत पण त्या गाण्यातल ओ की ठो कळत नसल्या मुळे ह्या पेक्षा अधीक काय लिहीणार...

स्वाती

ऋषिकेश's picture

9 Apr 2008 - 8:57 pm | ऋषिकेश

दोन्ही प्रतिक्रियाबद्द्ल अस्सेच म्हणतो :)

-(कानसेन वाचक) ऋषिकेश

संजय अभ्यंकर's picture

9 Apr 2008 - 9:37 pm | संजय अभ्यंकर

शास्त्रीय संगीतातले मलाही काही कळत नाही.
परंतु तात्यांची लेखन शैली उत्तम आहे.
रागदारी संगीत आमच्या सारख्यांना कळावे हा त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

शैलेश दामले's picture

8 Apr 2008 - 8:16 am | शैलेश दामले

तात्या तुमच्या कडे वसन्तराव यान्चा केदार रागाचे रेकोर्डिन्ग आहे का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Apr 2008 - 8:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

केदार म्हणजे आनंदाचं निधान! केदार म्हणजे रसिकता, केदार म्हणजे तारूण्य, केदार म्हणजे शृंगार! केदार म्हणजे हळवेपणा! अहो किती संपन्न व्यक्तिमत्व असलेला राग आहे हा!

आणि

मी जेव्हा एक व्यक्ति म्हणून केदारकडे बघतो तेव्हा मला असं जाणवतं की मी मोठ्या उदार मनाच्या व्यक्तिकडे पहात आहे. छोटेपणाचा, अशुभतेचा कधी स्पर्शच झालेला नाही या व्यक्तिला! प्रत्येक माणसाच्या आयुष्यात केदरासारखा एखादा तरी सखा असावा असं वाटतं! अगदी सखा नाही, तरी केदाराइतकी मोठ्या मनाची एखादी तरी वडीलधारी व्यक्ति अगदी प्रत्येकाला लाभावी, जिच्याकडे अगदी खुलेपणानं मनातलं बोलता यावं, आपले सगळे लाड पुरवून घेता यावेत, अणि प्रसंगी जिच्या मांडीवर डोकं ठेवून मनमोकळं रडताही यावं!

वा तात्या, वा !!!
केदार वर्णन सुंदर झालं आहे.

( गाण्यातले बारकावे कळत नाही, पण आपल्या केदार वर्णनाने गाण्याची गोडी लागेल असे वाटते. )

मदनबाण's picture

8 Apr 2008 - 10:33 am | मदनबाण

सुधीर कांदळकरांशी अगदी सहमत.....

(तात्यांचे गाणे प्रत्यक्ष ऐकण्यास उत्सुक)
मदनबाण

नंदन's picture

8 Apr 2008 - 12:35 pm | नंदन

लेख. गीतरामायणातलं उदाहरण आणि त्याचा केलेला विस्तार आवडला.

केदार म्हणजे साक्षात स्वरोत्सव, केदार म्हणजे आनंदाचं निधान! केदार म्हणजे रसिकता, केदार म्हणजे तारूण्य, केदार म्हणजे शृंगार! केदार म्हणजे हळवेपणा!
-- वा!

अगदी सखा नाही, तरी केदाराइतकी मोठ्या मनाची एखादी तरी वडीलधारी व्यक्ति अगदी प्रत्येकाला लाभावी, जिच्याकडे अगदी खुलेपणानं मनातलं बोलता यावं, आपले सगळे लाड पुरवून घेता यावेत, अणि प्रसंगी जिच्या मांडीवर डोकं ठेवून मनमोकळं रडताही यावं! कारण एकदा मनमोकळं रडून घेतलं की मन अगदी स्वच्छ होतं, आकाश पुन्हा एकदा निळं, निरभ्रं होतं आणि माणूस पुन्हा एकदा केदारासोबत त्याच्या त्या उत्सवप्रिय, मंगलदायी वातावरणात केदारच्या सुरात न्हाऊन निघतो, केदारच्या रंगात गाऊ लागतो!

-- सुरेख. रागदारीतलं काही कळत नसलं, तरी हे वर्णन अतिशय जिवंत आहे.

गदिमांनी लिहिलेल्या आणि पुलंनी संगीत दिलेल्या 'ही कुणी छेडिली तार' ह्या गाण्यात केदाराला दिलेलं प्राजक्ताच्या मधुगंधाचं उदाहरण अप्रतिम आहे. त्याचं पहिलं कडवं आणि ध्रुवपद इथे लिहिण्याचा मोह आवरत नाही.

ही कुणी छेडिली तार
प्राजक्ताच्या मधुगंधासम, कुठुनि ये केदार?

तूच छेड ती तूच ऐक ती, आर्त सुरावट तुझ्याच हाती
स्पर्शावाचून तूच छेडिसी, माझी हृदयसतार

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

विसोबा खेचर's picture

9 Apr 2008 - 10:02 am | विसोबा खेचर

संगीतावर प्रेम करणार्‍या आणि आपुलकीने प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिकवाचकवरांचे मनापासून आभार...
आपल्यासारख्या वाचकांमुळेच आम्हाला लिहायचा उत्साह येतो.

तसेच ज्यांना हा लेख, बरावाईट कोणताच प्रतिसाद देण्याच्या लायकीचा वाटला नाही, त्यांचेही औपचारिक आभार!

तात्या.

वरदा's picture

9 Apr 2008 - 9:48 pm | वरदा

आज वेळ मिळाल्यावर आरामात वाचला लेख.. नेहेमीसारखा सुरेख...

सुवर्णमयी's picture

9 Apr 2008 - 10:32 pm | सुवर्णमयी

सर्व लेख छान आहेत. पण मला स्वतःला यमन आणि केदार याविषयीचे लेख जास्त भावले.
सोनाली.