कणेकरसाहेब.... तुमनेच हमको बिघडव्या !

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
4 Jun 2018 - 4:03 pm

वो क्या है.... हमारे लहानपणी... जर वेळ मिळ्या कि पुस्तक वाचनेका... वेळ मिळ्या कि पुस्तक वाचनेका. ऐसा. लेकिन... मगर (येस्स्स्स.. दोन्हीही).. उन दिवसोंमें पुस्तकोंमे जरा वरण भात जैसा लिखाण होता था.

मला नक्की काय म्हणायचंय ते तुमच्यासारख्या interpretative analytical in-depth reporting करणार्‍या माणसाला एरवीच कळालं असेल. आमचं बालपण - आम्ही टिळक, आगरकर, सावरकर, आंबेडकर, फुले नाही... पण आम्ही पुण्याचे असल्यामुळे आम्ही टोणगेपण किंवा कार्टेपण वगैरे पार करून डायरेक्ट बालपणाला क्वालिफाय होतो. तर आमचं बालपण गेलं पुण्याच्या पेठांमधे. आमचा पुस्तकांचा खुराक म्हणजे पु.लं, द.मा. मिरासदार, भा.रा. भागवत, व्यंकटेश माडगूळकर, चित्तमपल्ली, वीणा गवाणकर वगैरे स्टेपल डाएट. कधी जरा "हेवी" भूक असेल तर रणजीत देसाई, मृणालिनी जोशी, शिवाजी सावंत आणि कधी अगदीच ब्रेड - जॅम खावासा वाटला तर एनिड ब्लाआयटन, फ्रँकलिन डिक्सन वगैरे. थोडक्यात खायला भरपूर आणि पौष्टिक होतं. पण सग्गळा आहार होता शाकाहारी!

पण एकदा लायब्ररीत "क्रिकेटवेध" हाती लागलं आणि एक वेगळीच चव चाखायला मिळाली. आधीच क्रिकेटसारखा आवडीचा विषय आणि त्यात इतकं खुशखुशीत खुमासदार लिखाण! तश्यात "फिल्लमबाजी" ऐकली आणि कटाची आमटी समजून भुरका मारावा आणि तांबडा रस्सा निघावा तशी अवस्था झाली. दुडुदुडु धावणारी माला सिन्हा, वाळत घातलेल्या पापडासारखी उघडी असणारी शिल्पा शिरोडकर, धाकट्या बहिणीची क्वार्टरपँट घालून "जल्दी करो पेट्रोल भरो" गाणारी 'आपली' पद्मिनी कोल्हापुरे... दीड दोन तासांत आमच्या डोक्यातल्या सुलोचना आणि दुर्गा खोटे टाइप विचारांची एकदम "सरकाईलो खटिया" वाली करिष्मा कपूर केलीत राव! तेव्हा आमचेही "डोळे उघडायला" लागले होते म्हणा... अगदी घरात नाही तरी मनात माधुरी दीक्षितचं पोस्टर लागलं होतं. जूही चावला, रवीना टंडन, प.पू. उर्मिलाताई मातोंडकर खुणावायला लागल्या होत्या. थोडक्यात काय तर वरण भातापेक्षा चिकन शेजवान राईस जास्त चवीचा वाटत होता. आमचं वयात येणं, नॉन-व्हेज खायला सुरुवात करण, रवीनाचं 'टिप टिप बरसा पानी' आणि तुमचं लिखाण एकत्रच आलं.

त्यामुळे अर्थातच "कट्ट्या"वरच्या मित्रांच्या 'गोतावळ्या'त चालणार्‍या 'टिवल्या - बावल्या' - होणारी 'चहाटळकी', 'इरसालकी' ह्यात सगळ्यात तुमचा हात होताच. "आचरटपणा" हा राजेंद्रनाथ आणि तुमच्या लेखनाचा स्थायीभाव आमच्यात उतरला नसता तरच नवल होतं. तुमची वाक्यं तुमच्या लहेजासकट आमच्या बोलण्याचा "अविभाज्य भाग" कधी होऊन गेली कळलं पण नाही. धमाल करायचो आम्ही. पण एक जाणीव नेहेमीच होती की आम्ही आचरटपणाच्या ज्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये बसायचो त्या बिल्डिंगच्या ४०व्या मजल्यावरचा पेन्टहाऊस तुमचा होता. "मुझे कुछ देर के लिये अकेला छोडो" - म्हणून हास्पिटलात नाकात नळ्या खुपसलेल्या अवस्थेतल्या मित्राला खळखळून हसायला लावलंय, खीर खाऊ घालणार्‍या मैत्रिणीची टिंगल केलीये, "कव्हरला यॉर्कर शॉट" मारणार्‍या मित्राच्या अकलेचे वाभाडे काढलेत ते तुमच्याच जोरावर.

बॉस - आमच्या मसालेभात, अळूचं फदफदं, बटाट्याची भाजी अश्या मेन्यूमध्ये सुकटाची चटणी, मटण रस्सा आणि कोळंबी पुलाव आणला तुम्ही. आणि चिकनकरी फिशकरी सारखीच ती "कणेकरी" अजून चाखतोय! पुलं सांगायचे की विनोद कसलेल्या न्हाव्यासारखा करावा. गुळगुळीत हजामत तर झाली पाहिजे पण रक्त येता कामा नये. पण इथे तुम्ही दोन हातात तलवारी घेऊन तुमच्या "सावजाला" बिनधास्त भोसकता. आणि ते सावजही मेलं खदाखदा हसत भोसकून घेतं! कारण त्याला माहिती असावं हा माणूस माझ्यावर प्रेमही तितकंच करतो. काय उतकट लिखाण केलंत कणेकरसाहेब! मझा आला! दिलफेक प्रेम करायला शिकवलंत तुम्ही. लताबाई, गावसकर, तेंडुलकर, राज कपूर ही तुमच्या प्रमाणेच आमचीही भावस्थानं. पण साहेब चोरी चोरी चुपके चुपके तुम्ही पण आमच्यासाठी त्या रांगेत जाऊन बसलात.

तुमचा वाढदिवस.. पंच्याहत्तरी वगैरे सगळं थोतांड आहे. तुम्हाला आणि तुमच्या लिखाणाला कसलं आलंय वय? यू आर फॉरेव्हर २६ (महाराष्ट्रात "पिण्याचं" वय पंचवीस आहे म्हणे). तुमच्या लिखाणाला चिरतारुण्याचं वरदान आहे. त्यामुळे ७५ ह खरोखरंच फक्त एक आकडा आहे तुमच्याबाबत. रँग्लर कणेकर - तुमची वजाबाकी पक्की आहे महितिये आम्हाला. पण आता १०० पर्यंत पोचायची बेरीज चालू करा! तुमच्या "प्रदीर्घ आणि दैदीप्यमान" कारकीर्दीचा २५ वर्षांचा एक टप्पा येऊ घातलाय! तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

जीते रहो सर! लिहिते रहो !

जे.पी. मॉर्गन

विनोदसाहित्यिकप्रकटनसद्भावनाशुभेच्छाअभिनंदन

प्रतिक्रिया

रामदास२९'s picture

4 Jun 2018 - 4:37 pm | रामदास२९

सुन्दर लेख!!!

manguu@mail.com's picture

4 Jun 2018 - 5:13 pm | manguu@mail.com

छान

सुखी's picture

4 Jun 2018 - 6:32 pm | सुखी

बहोत खूब

चांदणे संदीप's picture

4 Jun 2018 - 6:34 pm | चांदणे संदीप

आम्हीही त्या आचरटपणाच्या इमारतीच्या बेसमेंटांच्या एका कोपऱ्यातल्या बिळातले... जौदे...

यानिमित्ताने कणेकरांना आणि कणेकरी फॅन्सना शुभेच्छा!

Sandy

शेखरमोघे's picture

4 Jun 2018 - 6:48 pm | शेखरमोघे

लेख आवडला.

बोलघेवडा's picture

4 Jun 2018 - 6:49 pm | बोलघेवडा

काय अभ्यास!! काय अभ्यास!!! शाळेत कशाला जायला पाहिजे तुम्हाला!!
एवढा प्रदीर्घ लेख लिहिलात त्यात माला सिन्हाच्या आंघोळीविषयी काही लिहलं नाहीत तुम्ही!!
:)

विजुभाऊ's picture

4 Jun 2018 - 7:05 pm | विजुभाऊ

त्या घटत्या उपयुक्ततेचं उदाहरण असणार्‍या रेहेना सुलतान आणि शत्रुघ्न सिन्हा ला पण आणायचे की.

सुबोध खरे's picture

4 Jun 2018 - 7:50 pm | सुबोध खरे

कणेकर सुरुवातीला आवडत असत
कालांतराने त्यांचे लिखाण एकसुरी झाले म्हणून वाचणे सोडून दिले
मध्येच कधीतरी आता कसे लिहितात म्हणून काही वेळेस वाचून पहिले
पण "हा हन्त"
आता कंटाळ्वाणेच( तेच तेच) लिहितात असे मत आहे)

मार्मिक गोडसे's picture

4 Jun 2018 - 8:20 pm | मार्मिक गोडसे

पण "हा हन्त"
आता कंटाळ्वाणेच( तेच तेच) लिहितात असे मत आहे)

सहमत.
कणेकरांना ऐकणे म्हणजे एक प्रकारची शिक्षाच असते.

राजाभाउ's picture

5 Jun 2018 - 11:00 am | राजाभाउ

+११

भंकस बाबा's picture

12 Jun 2018 - 3:56 pm | भंकस बाबा

लक्ष्या बेर्डे आणि अशोक सराफ ही जोड़ी सिनेमात असली की धमाल येणार अशी आमची अटकळ असायची , पण नंतर जो चहाटळपणा यांनी चालवला तेव्हा मात्र आत्ता बास अशी बोलायची वेळ आली

पद्मावति's picture

4 Jun 2018 - 7:53 pm | पद्मावति

फारच मस्तं लिहिलंय.

नाखु's picture

4 Jun 2018 - 9:01 pm | नाखु

कणेकर सामान्य वाचकांना टिकाऊ लेखक वाटत नसतील पण टाकाऊ नक्कीच नाहीत

काही पुस्तके वाचलेला नाखु
बाकी त्यांचं सामनात एक सदर येत असे ते वाचायचो बुवा

नित वाचक नाखु

वरुण मोहिते's picture

4 Jun 2018 - 9:44 pm | वरुण मोहिते

कधी खूप वाचून त्यांचे एकसूरी वाटतात ते. पण ठीक आहे. डॉक्टर कणेकरांचा मुलगा म्हणून आत्मचरित्रात प्रामाणिक लिखाण केलंय. दीर्घायुष्य लाभो .

कणेकर बरे लिहितात कधीमधी. क्रिकेटपेक्षा सिनेमावर लिहिलेलं अंमळ जास्त सुसह्य असतं. सुरुवाती-सुरुवातीला कणेकरी लिखाण वाचायला मजा यायची हेही तितकंच खरं.

कणेकरांना अजून किमान पंचवीस धावा करण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. पंचाहत्तर मारलेत. हा हा म्हणता म्हणता शतक लावतील बोर्डावर. आपला विश्वास आहे.

बादवे लेख आवडला.

सुमीत भातखंडे's picture

5 Jun 2018 - 9:25 am | सुमीत भातखंडे

मस्त लेख! मी पण पंखा आहे कणेकरांचा.
सध्या सामनामधे सदर चालू आहे त्यांचं.

त्यांच्या पुस्तकांचं अर्धशतक होत आलंय. वयाचं शतकही नक्कीच पूर्ण करतील. मनापासून शुभेच्छा.

सिरुसेरि's picture

5 Jun 2018 - 11:03 am | सिरुसेरि

कणेकरांची लेखनशैली आवडते . वरील प्रतिसादातील लिंक खुप छान आहे .

विनोद जाडेभरडेपातळहलकेवात्रट सगळेच हसवतात पण सांगणाय्राचं वयही पहावं लागतं. त्यावेळी जे ज्योक मारले तेच आता अपेक्षित नाही.
वाचनालयाचा एक कोपरा कणेकरी नक्कीच राहिल.

भोवताल रूक्ष, रखरखीत, उदास(समाजवाद्यांच्या थोबाडासारखं) असताना कणेकरी शिडकावा बरा वाटतो.
लोकप्रभेतील मेतकूटमधले सगळे लेख आवडतात.

लोकप्रभात आलेला त्यांचा Oscar Wilde वरचा लेख खूप आवडला होता. अगदी हरखून गेलो.
पण….
त्यांचे “मी”पणाचे लेखन नाही आवडत बुवा.

फेरफटका's picture

6 Jun 2018 - 6:40 pm | फेरफटका

"त्यांचे “मी”पणाचे लेखन नाही आवडत बुवा." - सहमत. क्रिकेट / सिनेमा ह्या विषयावरचं लिखाण आवडतं. पण 'मी पणा', 'कट्टा-जोक्स', 'दुसर्याची टवाळी' वगैरे सुरू झालं की कंटाळा येतो. विनोदी नाही वाटत किंवा अदरवाइज व्हॅल्यू अ‍ॅड पण नाही वाटत.

विअर्ड विक्स's picture

10 Jun 2018 - 11:49 am | विअर्ड विक्स

सामन्याचा नित्य वाचक असल्याने रविवारी मेजवानी असते.

आजचा लेख - http://www.saamana.com/article-on-ashok-mulye-by-shirish-kanekar/

सुरुवातीस रटाळ वाटेल , पण शेवट चांगला आहे.