द स्केअरक्रो भाग ३

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
20 Jun 2015 - 12:39 am

द स्केअरक्रो भाग १
द स्केअरक्रो भाग २

द स्केअरक्रो भाग ३ (मूळ लेखक मायकेल कॉनेली)

माझ्या दुःखात सहभागी व्हायला मी सोडून मोजून ३ जण आले होते. लॅरी बर्नार्ड तर होताच आणि दोन क्रीडापत्रकार होते. ते कदाचित दररोज शाॅर्ट स्टाॅपला जात असतील.

शाॅर्ट स्टाॅप बार एल्.ए. च्या एको पार्क भागात सनसेट अॅव्हेन्यूवर होता. एल्.ए.डाॅजर्सचं स्टेडियम त्याच भागात होतं. कदाचित बेसबाॅलमधल्या एका पोझिशनवरुन शाॅर्ट स्टाॅप हे नाव आलं असेल. तो पोलिस अॅकॅडमीपासूनही जवळ होता आणि त्यामुळे सुरुवातीच्या काळात तो पोलिसवाल्यांचा आवडता बार होता. पण आता ते दिवस भूतकाळात जमा झाले होते. एको पार्कचं रुप पालटत होतं. हाॅलिवूडच्या संगतीचा परिणाम म्हणून एको पार्कही झगमगीत व्हायला लागला होता. पोलिसांऐवजी इथे आता साॅफ्टवेअर किंवा इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये काम करणा-या तरुण लोकांची गर्दी व्हायला लागली होती. त्यामुळे इथल्या किंमतीही वाढल्या होत्या आणि परिणामी पोलिस इथे येईनासे झाले होते.

मला तरीही हा बार आवडायचा कारण तो डाऊनटाऊन - जिथे मी काम करायचो आणि हाॅलिवूड, जिथे माझं घर होतं - या दोघांच्या मध्ये होता. आम्ही जेव्हा तिथे पोचलो तेव्हा नेहमीची गर्दी सुरु झालेली नव्हती त्यामुळे आम्हाला व्यवस्थित जागा मिळाली, तीसुद्धा टीव्हीच्या समोर - मी, लॅरी, शेल्टन आणि रोमानो. हे दोघं स्पोर्टस् वाले असल्यामुळे आमची जुजबीच ओळख होती. त्यामुळे लॅरी आमच्या मध्ये बसला होता हे एकपरीने बरंच होतं. ते दोघंही स्पोर्टस् बीटच्या पुनर्रचनेबद्दल बोलत होते. सध्यातरी ही अफवाच होती. पण जर खरोखर असं झालं तर दोघांनाही डाॅजर्स किंवा लेकर्स सारख्या एखाद्या नामवंत टीमला कव्हर करायचं होतं. दोघंही चांगलं लिहितात ह्याची मला जाणीव होती. पण क्रीडापत्रकाराला चांगलं लिहावंच लागतं कारण शंभरातल्या नव्याण्णव वेळा वाचणा-याला सामन्याचा निकाल काय लागला ते माहीत असतं. कोण जिंकलं, कसं जिंकलं, का जिंकलं - सगळं लोकांना आधीच कळलेलं असतं. कधीकधी तर लोकांनी पूर्ण सामनाही पाहिलेला असतो. पण तरीही लोकांनी दुस-या दिवशी तुम्ही लिहिलेलं वाचावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या लिखाणात दम पाहिजे. लोकांना न दिसलेल्या गोष्टी तुम्हाला त्यांना सांगता आल्या पाहिजेत.

माझं म्हणाल तर मी क्राईम रिपोर्टर झालो कारण मला वाचकांना त्यांना माहीत नसलेल्या गोष्टी सांगायला आवडायच्या. गुन्हा, गुन्हेगार, गुन्हेगारी - याविषयी लोकांना आकर्षण असतंच. माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची काळी, अंधारी बाजू जाणून घ्यायला प्रत्येकाला आवडतं. गुन्ह्याच्या कथा या बहुतेक वेळा अत्यंत टोकाच्या भावना
दाखवणा-या असतात आणि लोक त्यांच्याकडे मत्स्यालयात शार्क माशाकडे किंवा आॅक्टोपसकडे पाहावं असंच पाहातात. त्यांना अंडरवर्ल्डचा अनुभव नसतो, पण त्याच्याविषयी जाणून घेण्याची इच्छा असते. आणि मी कधीच फक्त गुन्ह्याविषयी सांगून थांबायचो नाही तर त्याच्यामागची सर्व पार्श्वभूमी वाचकांना द्यायचो.
दोन आठवड्यांनंतर जेव्हा माझी नोकरी संपुष्टात येण्याची वेळ येणार होती तेव्हा या एका गोष्टीची उणीव मला भासणार होती.

" ही बाल्टिमोरमध्ये घडलेली घटना तुला माहीत आहे का?" लॅरीने मला कुजबुजल्या आवाजात विचारलं.
" नाही. काय झालं? "
" आपल्यासारखाच रिपोर्टर होता. त्यालाही बाल्टिमोरमधल्या त्याच्या पेपरने असाच फुटवला होता. त्याने त्याच्या शेवटच्या दिवशी एक स्टोरी फाईल केली आणि ती पूर्णपणे बोगस स्टोरी होती. सगळा त्याच्या मनाचा खेळ होता. "
" आणि त्यांनी ती छापली?"
" हो ना. दुस-या दिवशी जेव्हा पेपरच्या आॅफिसमध्ये फोन यायला लागले तेव्हा त्यांना समजलं."
" कशाबद्दल होती स्टोरी? "
" नीट आठवत नाही मला. पण मॅनेजमेंटला ही एक मजबूत थप्पड होती. "

मी वाईनचा घोट घेतला आणि यावर जरा विचार केला, " नाही. मला नाही वाटत असं. "
"का?"
" कारण हे सगळं झाल्यावर मॅनेजमेंटचे सगळे लोक एकत्र बसले असतील आणि म्हणाले असतील की आपण याला बाहेर काढलं ते बरोबरच केलं. जर तुला खरंच मॅनेजमेंटला थप्पड मारायची असेल तर असं काहीतरी तू करायला पाहिजे की त्यांना तुझ्याशी असं वागल्याचा पश्चात्ताप व्हायला पाहिजे. त्यांना असं वाटलं पाहिजे की तुला जायला सांगणं ही त्यांच्या हातून घडलेली सर्वात मोठी चूक होती. "
" अच्छा! म्हणजे हे असं ठरवलं आहेस तू? "
" नाही रे बाबा. मी शांतपणे निघून जाणार आहे. मी एका कादंबरीवर काम करतोय आणि ती कादंबरी म्हणजे मी मारलेली थप्पड असेल. अजून या कादंबरीचं नाव मी ठरवलेलं नाही पण तात्पुरतं नाव आहे ' क्रॅमर, गेलास भोxxx '. "

बर्नार्ड जोरात खिदळला आणि आम्ही विषय बदलला. पण बोलत असतानादेखील माझ्या मनात माझ्या कादंबरीबद्दलचे विचार चालू होते. घरी जाऊन त्यावर काम करण्याची माझी इच्छा होती. पुढचे दोन आठवडे दररोज घरी गेल्यावर हेच करणार होतो मी.

माझा फोन वाजला आणि मी पाहिलं तर माझ्या माजी पत्नीचा फोन होता. हा फोन घ्यायलाच पाहिजे. मी माझ्या जागेवरून उठलो आणि बारच्या बाहेर पार्किंग लाॅटमध्ये आलो. इथे जरा शांतता होती. माझ्या पत्नीने वाॅशिंग्टन डी.सी. मधून फोन केला होता. डीसी म्हणजे तीन तास पुढे. माझ्या काॅलर आयडीवर आलेला नंबर तिच्या डेस्क फोनचा होता.

" कीशा, तू अजून आॅफिसमध्येच आहेस? काय करते आहेस?" मी माझ्या घड्याळात वेळ पाहिली. इथे ७ म्हणजे तिथे १०.
" पोस्टची एक महत्वाची स्टोरी आहे. ती जरा बघतोय आम्ही. "

अमेरिकेच्या पश्चिम किना-यावरच्या पेपरसाठी काम करायचा एक फायदा आणि कधी कधी तोटासुद्धा - की तुमची डेडलाईन पूर्व किना-यावरच्या पेपरच्या जवळजवळ ३ ते ३.५ तास नंतर असते. त्यामुळे कितीतरी वेळा रात्री उशिरा घडलेल्या स्टोरीज - अगदी बोस्टन, न्यूयाॅर्क, डीसीमधल्या - आम्ही ब्रेक केलेल्या होत्या, किंवा मग तिथे ब्रेक झालेल्या स्टोरीचा वेगळा अँगल किंवा फाॅलो अप दिला होता. त्यामुळे अगदी व्हाईट हाऊसमध्येही आमची वेब एडिशन पहिल्यांदा वाचली जायची किंवा अजूनही वाचली जाते, एल्.ए. ३००० मैल दूर असूनसुद्धा!

कीशा रसेल, माझी माजी पत्नी, एल्.ए. मध्ये असताना एक नामांकित पत्रकार होती. पोलिस आणि राजकीय बातम्या हा तिचा बीट होता. आता टाईम्सच्या डीसी ब्यूरोची जबाबदारी तिच्यावर होती आणि त्यामुळे रात्री १० किंवा त्याच्यापुढेही काम करणं तिच्यासाठी स्वाभाविक होतं.

" त्रासच आहे हा! " मी म्हणालो.
" तुला जो त्रास आज झालाय त्याच्यापेक्षा कमीच. "
" हो. माझी नोकरी गेली. "
" साॅरी जॅक. "
" हो. "

खरं सांगायचं तर दोन वर्षांपूर्वी तिला जेव्हा डीसीला पाठवलं आणि मला मात्र मागे ठेवलं तेव्हाच मला हे समजायला हवं होतं की भविष्यात काय होणार आहे. पण तेव्हा मी लक्ष दिलं नव्हतं.

बराच वेळ आम्ही दोघंही शांत राहिलो.

" माझी अर्धवट राहिलेली कादंबरी मी आता पूर्ण करणार आहे, " मी म्हणालो, " पैशाचा प्रश्न फारसा येणार नाही. एक वर्षभर मी नक्कीच निभावून नेऊ शकेन. तोपर्यंत काहीतरी नक्कीच मिळेल मला. "
" हो. नक्कीच. सगळं ठीक होईल जॅक! " कीशा ओढूनताणून आणलेल्या उत्साहाने म्हणाली.

माझ्या कादंबरीचा कच्चा ड्राफ्ट तिने वाचला होता हे मला माहीत होतं. तेव्हा आम्ही एकत्र होतो. पण तिने हे कधीच मान्य केलं नव्हतं कारण मग तिला तिचं खरं मतही सांगायला लागलं असतं.

" तू एल्.ए. मध्येच राहणार आहेस?" तिने विचारलं.

हा प्रश्न बरोबर होता कारण माझी कादंबरी कोलोरॅडोच्या परिसरावर आधारित होती. मी तिथेच लहानाचा मोठा झालो. पण एल्.ए. ची ओढ मला सोडवत नव्हती.

" मी अजून विचार नाही केलाय त्याबद्दल. आता या क्षणी तर मी माझ्या करिअरचा शेवट साजरा करतोय. "
" कुठे आहेस तू? रेड विंड? "
" नाही. शाॅर्ट स्टाॅप. "
" कोण कोण आहे तुझ्याबरोबर? "
" बरेच जण आहेत. लॅरी आहे, मेट्रो डेस्कवरचे बरेचजण आहेत. काही स्पोर्टवालेपण आलेत."

पुढे काही बोलण्याआधी ती एक सेकंद थांबली. मी अतिशयोक्ती करतोय हे तिला समजलं असावं बहुतेक.

" तू नाॅर्मल राहशील ना जॅक? "
" अर्थातच. मला फक्त पैसे सांभाळून वापरावे लागतील. "
" जॅक, मला दुसरा का‌ॅल येतोय. बहुतेक माझा सोर्स आहे. " तिच्या आवाजात थोडी भीती होती. जणू हा काॅल नाही घेतला तर यापुढे कुठलाच काॅल येणार नाही!
" हो हो. काॅल घे. " मी म्हणालो, " आपण नंतर बोलू. "

मी फोन बंद केला आणि मनातल्या मनात तो जो कोण वाॅशिंग्टनमधला कीशाचा सोर्स होता त्याचे आभार मानले.
बारमध्ये परत गेल्यावर मी आयरिश कार बाँबची आॅर्डर दिली आणि ग्लास आल्यावर एका घोटात रिकामा केला. व्हिस्की माझा घसा जाळतच आत उतरली. समोर डाॅजर्सना जायंटसकडून मजबूत चोप मिळत होता. त्यामुळे मी जास्तच उदास झालो. रोमानो आणि शेल्टन लवकर निघाले आणि तिसरी इनिंग चालू झाली तेव्हा लॅरी बर्नार्डही जाण्याची तयारी करायला लागला.

" ही देवाचीच कृपा म्हणायला पाहिजे, " तो म्हणाला.
" म्हणजे?"
" तुझ्याऐवजी आज मी असू शकलो असतो. दुसरा कोणीही असू शकला असता पण त्यांनी तुझा पत्ता कट केला, कारण तू सेलिब्रिटी पत्रकार आहेस. त्यामुळे तुझा पगार जास्त आहे आणि म्हणूनच त्यांना तुला घालवण्यात आर्थिक फायदा आहे. तू सात वर्षांपूर्वी इथे आलास तेव्हा तुझ्याभोवती ग्लॅमर होतं. तुझं पोएट केसवरचं पुस्तक बेस्टसेलर ठरलं होतं. लॅरी किंगच्या कार्यक्रमात तू जाऊन आला होतास. टाईम्सने त्यावेळी तू म्हणशील तेवढा पगार देऊन तुला आपल्याकडे ओढलं आणि आता तेच नडलंय तुला! खरं सांगायचं तर तू एवढे दिवस राहिलास तेच आश्चर्य आहे. "
" काहीही असो. मला फरक पडत नाही. "
" हो, पण तरीही मला हे तुला सांगायचं होतं. एनी वे, मी निघतोय. तू पण जातोयस घरी? "
" अजून एक घेईन मी. "
" नको यार! तू आॅलरेडी भरपूर प्यायला आहेस! "
" अजून एकाने काही फरक पडत नाही. मी ठीक आहे. तसंच काही वाटलं, तर मी टॅक्सीने घरी जाईन, ओके? "
" काय करशील ते कर पण पोलिसांच्या हातात सापडू नकोस. दारू पिऊन गाडी चालवणं - मॅनेजमेंटला तेवढंच कोलित मिळेल! "
" अच्छा! काय करतील ते? मला कामावरून काढतील? "

नव्याने हा मुद्दा लक्षात आल्यासारखी लॅरीने मान डोलावली, माझ्या पाठीवर जोरात थाप मारली आणि तो निघून गेला. मी आता एकटाच राहिलो. माझ्या पुढच्या ड्रिंकसाठी मी सरळ जेम्सन आॅन द राॅक्स मागवली आणि एकाचे दोन-तीन कधी झाले तेच मला समजलं नाही. मला माझी करिअर अशी संपायला नको होती. व्हॅनिटी फेअर किंवा एस्क्वायर यासारख्या साप्ताहिक किंवा मासिकांसाठी मोठे लेख किंवा स्तंभ लिहायची माझी इच्छा होती. मी त्यांच्याकडे जाण्याऐवजी त्यांनी माझ्याकडे यायला मला हवं होतं. मला कुणीतरी कशावर लिहायचंय हे सांगण्याऐवजी मी ठरवलेल्या विषयावर मी लिहितोय अशी परिस्थिती मला नक्कीच आवडली असती.

मी अजून एक जेम्सन मागवल्यावर बारटेंडरने माझ्याशी वाद घालायला सुरूवात केली. जर मी त्याला माझ्या गाडीच्या चाव्या दिल्या तरच तो मला जेम्सन अाॅन द राॅक्स देणार होता. मला हा सौदा बरा वाटला आणि मी त्याच्या हातात चाव्या दिल्या.

जेम्सन माझ्या मेंदूचा हळूहळू ताबा घेत असताना माझ्या डोक्यात एक कल्पना आली. लॅरी बर्नार्डने सांगितलेल्या बाल्टिमोरमधल्या पत्रकाराने जे केलं तसंच पण चांगल्या अर्थाने मला करायचं होतं. मी माझा ग्लास उंचावून स्वतःलाच टोस्ट दिला - " मृत्यू हाच माझा बीट. माझं आयुष्य त्यावर आहे. माझा नावलौकिक त्याच्यावरच आहे. "

यापूर्वीही मी हे शब्द उच्चारले होते पण स्वतःच्या स्तुतीसाठी कधीच नाही. त्या क्षणी माझ्या लक्षात आलं की मी कसा जाईन. मी अनेक खुनांच्या स्टोरीज लिहिल्या होत्या. जवळपास हजार. पण आता मी एक शेवटची स्टोरी लिहिणार होतो. मी गेल्यानंतरही टाईम्समधल्या लोकांना लक्षात राहील आणि मला घरी पाठवल्याचा त्यांना पश्चात्ताप होईल, अशी स्टोरी.

क्रमशः

(अनुवाद मूळ लेखकाच्या पूर्वपरवानगीने अव्यावसायिक वापरासाठी)

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

आतिवास's picture

20 Jun 2015 - 1:52 am | आतिवास

पण क्रीडापत्रकाराला चांगलं लिहावंच लागतं कारण शंभरातल्या नव्याण्णव वेळा वाचणा-याला सामन्याचा निकाल काय लागला ते माहीत असतं. कोण जिंकलं, कसं जिंकलं, का जिंकलं - सगळं लोकांना आधीच कळलेलं असतं. कधीकधी तर लोकांनी पूर्ण सामनाही पाहिलेला असतो. पण तरीही लोकांनी दुस-या दिवशी तुम्ही लिहिलेलं वाचावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या लिखाणात दम पाहिजे. लोकांना न दिसलेल्या गोष्टी तुम्हाला त्यांना सांगता आल्या पाहिजेत.
हे निरीक्षण जबरदस्त आहे.
अनुवाद ओघवता आहे, मजा येतेय वाचायला.
शेवटच्या कंसाबद्दल आभार.

एक एकटा एकटाच's picture

20 Jun 2015 - 8:47 am | एक एकटा एकटाच

. पण आता मी एक शेवटची स्टोरी लिहिणार होतो. मी गेल्यानंतरही टाईम्समधल्या लोकांना लक्षात राहील आणि मला घरी पाठवल्याचा त्यांना पश्चात्ताप होईल, अशी स्टोरी.

क्रमशः

च्यायला हे "क्रमश:" कशाला उगी मधेमधे कडमडतय......

प्रचेतस's picture

20 Jun 2015 - 9:03 am | प्रचेतस

खतरा झालाय अनुवाद.
एकदम जबरदस्त कथा.

एस's picture

20 Jun 2015 - 9:08 am | एस

वाचतोय. पुभाप्र.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Jun 2015 - 10:25 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मस्तं. लहान भाग टाकता तुम्ही खुप :)

वाचतेय.जरा मोठा भाग टाका हो!

अद्द्या's picture

20 Jun 2015 - 12:46 pm | अद्द्या

मस्तच होतेय लेखमाला .

पण आधी म्हणालो तसंच . अजून थोडे मोठे भाग आले तर मस्त . .

आठवड्याला एक चाप्टर या गतीने कादंबरी येणार असेल तर हा सस्पेन्स सहन होणारा नाही....

भाषांतर अप्रतिम!

आज एका धाग्याच्या प्रतिसादांमधून या लेखमालीकेची खूप तारीफ ऐकली आणि म्हणून पहिला भाग वाचायला सुरवात केली. एकामागून एक असे तीन भाग वाचून काढले. अतिशय उत्कंठावर्धक लिखाण. वाचून खरोखर आता वाटत आहे की आतापर्यंत इतकी छान कथा मी कशी काय मिस केली? पण म्हणतात नं की देर आये पर दुरुस्त आये. पुढचे भाग वाचणारच आहे एक दोन दिवसात.

नाखु's picture

16 Jul 2015 - 2:14 pm | नाखु

तंतोतंत

शाम भागवत's picture

27 Dec 2015 - 10:39 am | शाम भागवत